Wednesday, May 13, 2020

रामायणातील संजीवनी वनस्पतीचा शोध

के. एम. गणेशाय, आर. वासुदेवा आणि आर. उमाशंकर या संशोधकांनी लक्ष्मणास मर्छिता अवस्थेतून बाहेर काढणारी संजीवनी वनस्पती सिलाजीनेला असल्याचे काही उदाहरणे देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५


रामायणातील संजीवनी वनस्पतीचा शोध अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तराखंडमधील आयुष विभागाने संजीवनी बुटीच्या शोधासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. यापूर्वीही या संदर्भात संशोधन झालेले आहे. याच संशोधनाच्या आधारावर सिलाजीनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती रामायणातील संजीवनी बुटी असल्याची शक्‍यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. या वनस्पतीची वैशिष्ट्ये आणि त्याचे उपयोग आणि आढळ विचारात घेता ही वनस्पती रामायणातील संजीवनी बुटी असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. 

डॉ. संदीप पांडे, आरती शुक्‍ला, सुप्रिया पांडे, अंकिता पांडे या संशोधकांच्या गटाने सिलाजीनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती उष्माघात, उष्णतेमुळे झालेले विकार, खोलवर झालेल्या जखमा, सूर्यप्रकाशामुळे त्वचेवरील मृत झालेल्या पेशी, स्त्रियांचे प्रजननासंबंधीचे आजार आदीवर उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.

के. एम. गणेशाय, आर. वासुदेवा आणि आर. उमाशंकर या संशोधकांनी लक्ष्मणास मर्छिता अवस्थेतून बाहेर काढणारी संजीवनी वनस्पती सिलाजीनेला असल्याचे काही उदाहरणे देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. उष्णतेच्या झटक्‍यामुळे किंवा तडाख्यामुळे तसेच बाणातील विषामुळे लक्ष्मण मूर्छीत पडला होता. सिलाजीनेला ही वनस्पती उष्माघात आणि विषामुळे आलेली कोमावस्ता यावरील औषधे तयार करण्यासाठी वापरली जाते. यामुळे ही वनस्पती संजीवनी बुटी असल्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. 

संजीवनी वनस्पतीची वैशिष्ट्ये 

सिलाजीनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती फर्न नेचे वर्गीय वनस्पतीमध्ये मोडते. वाढीसाठी पाणी मिळाले नाही तर ही वनस्पती सुकते पण तिच्यातील जिवंतपणा कायम असतो. पुन्हा तिला पाणी मिळाले तर ती पुन्हा फुलते टवटवीत होते. ही वनस्पती मातीत तसेच दगडावरही वाढते. हिमाचल प्रदेशातील कैलास आणि वृषभ पर्वतरांगांमध्ये ही वनस्पती मुख्यतः आढळते. उत्तरांचल भागातील डोंगर रांगांमधील जोशीमठ, कुमिन, गडवाल येथेही तिचा आढळ पाहायला मिळतो. अरवली पर्वत रांगा तसेच मध्य प्रदेशातील सातपुडा, बिलासपूर, होशांगबाद, जबलपूर, अमरकंटक चिंदवाडा, बेतुल, सेहोरे या भागामध्येही वनस्पती आढळते. 


संशोधकांनी शोधलेल्या संजीवनी वनस्पती

स्थानिक भाषेत संजीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हजारो वनस्पती आहेत. त्यातील सिलॅजिनेला ब्रायोपटेरीस, क्रेसा क्रिटीका, डेसमोट्रायकम्‌ फिम्ब्रियाटम या तीन वनस्पतीवर संशोधकांनी सखोल अभ्यास केला त्यामध्ये सिलाजीनेला ही वनस्पती रामायणातील संजीवनी बुटी असल्याची संशोधकांनी शक्‍यता व्यक्त केली.  

No comments:

Post a Comment