Sunday, May 31, 2020

नातरी साखरेचा माघौता । बुद्धिमंतपणेंही करितां ।


मन शुद्ध झाले की मग ते आत्मज्ञानात रूपांतरित होण्यास योग्य होते. अध्यात्मातील या रासायनिक प्रक्रिया समजून घ्यायला हव्यात. कुंडलिनी जागृत करण्यासाठी आवश्‍यक साधना ही करायला हवी. रस कायलीत ओतल्यानंतर तो तापविण्यासाठी जाळ द्यावा लागतो किंवा साखर करताना रस गरम करावा लागतो. तरच त्यातील मळी दूर होते. तसे शरीरात कुंडलिनी जागृत करून मनाची शुद्धी ही साधायला हवी.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621


नातरी साखरेचा माघौता । बुद्धिमंतपणेंही करितां ।
परि ऊस नव्हे पंडुसुता । जियापरी ।। 200 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 8 वा

ओवीचा अर्थ - अथवा उसाची साखर झाल्यावर, त्या साखरेचा मूळचा ऊस करण्याचे जरी बुद्धिमान पुरुषानेहि मनात आणले तरी पुनः ऊस होणे ज्याप्रमाणे शक्‍य नाही.

शेतमाल हा नाशवंत आहे. फळे, भाजीपाला ही उत्पादने फार दिवस टिकून राहात नाहीत. फळे पिकल्यानंतर ती योग्य कालावधीपर्यंतच खाण्यास योग्य असतात. त्यानंतर ती टाकून द्यावी लागतात. नुसते उत्पादन घेणे म्हणजे शेती नव्हे. उत्पादित माल टिकवून ठेवणे किंवा त्यावर प्रक्रिया करून उपपदार्थांची निर्मिती करणे हे आवश्‍यक आहे. अनादिकालापासून हा प्रकार सुरू आहे. उसापासून गूळ, साखर, दुधापासून, दही, ताक, लोणी, तूप असे पदार्थ तयार केले जातात. आंब्यापासून आमरस काढून त्याच्या पोळ्या केल्या जातात.

कच्च्या कैऱ्यापासून लोणची, मुरांबे केले जाते. पणे केले जाते. एकच पदार्थ आपण वारंवार खाऊ शकत नाही. पेढ्याची बर्फी, गुलाबजामुन हे गोड पदार्थ आपण किती खाऊ शकतो. काही ठराविक पातळीपर्यंतच ते खाता येऊ शकतात. त्यानंतर आपली ते पदार्थ खाण्याची मानसिकता राहात नाही. फळे, भाजीपाला यांचेही तसेच आहे. नेहमीच तेच तेच खाऊन आपणास कंटाळा येतो. यासाठी त्याचे उपपदार्थ करून खाणे योग्य होते. पूर्वी लोकसंख्या कमी होती. यामुळे उत्पादित शिल्लक माल टाकून द्यावा लागे. मग पुढे प्रक्रिया करून कित्येक महिणे टिकून राहू शकतील असे उपपदार्थ तयार केले जाऊ लागले.

आत्ताच्या काळात शेतमालाचे बाजारमुल्य वाढविण्यासाठी प्रक्रिया ही गरजेची झाली आहे. उत्पादित माल नाशवंत आहे. तो ठराविक कालावधीत खपायला हवा. तसेच त्याला योग्य दरही मिळायला हवा. यासाठी आता उपपदार्थ करणे हे आवश्‍यक आहे. अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. पपईपासून टुटीफ्रुटी, जाम केले जाते. अनेक फळापासून जाम, जेली, कॅचअप केले जाते. पण असे उद्योग आहेत कोठे? ते मोठ्या प्रमाणावर उभे राहण्याची गरज आहे. आजही देशातील 40 टक्के शेतमाल हा फेकूण दिला जातो. फेकूण देण्यामध्येही तोटा आहे. उंदीर, डासांचा प्रादुर्भाव वाढतो. हे रोखायचे असेल तर काढणी पश्‍चात तंत्रज्ञानावर अधिक भर द्यायला हवा. उत्पादित शेतमालावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे.

शेतमालाला योग्य भावही मिळू शकेल तसेच नवा जोड धंदा उभा राहिल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक विकासही होऊ शकेल. पूर्वी वीज नव्हती, इंधनाची प्रगत साधणे नव्हती तरीही प्रक्रिया केली जायची. चरक्‍यात बैलाच्या साहाय्याने ऊस गाळला जायचा. साखरेचे उत्पादन केले जायचे. देशातील हा प्रक्रिया उद्योग पाहता पूर्वी देश हा शेतीमध्ये अग्रेसर असणार हे निश्‍चित. आता इतर उद्योग वाढल्याने शेतमालाच्या उद्योगांकडे फारसे लक्ष दिले जात नाही असेच चित्र आहे.

साखर कारखाने उभे राहिले पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. अशा परिस्थितीमुळेच ते उद्योग डबघाईला येऊ लागले आहेत. राबणाऱ्या हातांना त्यांच्या कष्टाचे मोल हे मिळायला हवे. ते मिळाले तरच हा उद्योग टिकून राहील. आज देशातील अनेक उद्योग डबघाईला आले आहेत. राबणाऱ्या हातांना योग्य मोबदला त्यांनी दिला नाही. यामुळेच ते डबघाईला आले. मालक आणि कामगार यांच्यातील दरी दुरावली की उद्योगाची पीछेहाट सुरू होते. उद्योग बुडाले म्हणून प्रक्रिया उद्योग उभारणी थांबली का? नव्या पद्धतीने, नव्या तंत्रज्ञानाच्या आधारावर उद्योग हे उभारले जात आहेत.

पूर्वी साखर कारखान्यांची गाळप क्षमता 2500 टन होती. आता नव्याने उभारलेल्या साखर कारखान्यांची गाळप क्षमता पाच ते सात हजार टन आहे. क्षमता वाढवून उद्योग वाढविला जात आहे. पूर्वी खांडसरी होत्या. मग छोटे छोटे साखर कारखाने उभे राहिले आता मोठे-मोठे साखर कारखाने उभारले जात आहेत. यातून अनेक कारखाने बंद पडले आहेत. काही आजारी आहेत. पण नव्या कारखान्यांचीही संख्या वाढत आहे. कष्टकरी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देणारे कारखानेच टिकून राहिले. यापुढेही हाच विचार त्यांनी लक्षात घ्यायला हवा. दुधाचे दही झाले. ताक झाले. पण त्या ताकाचे पुन्हा दूध होत नाही. उसाची साखर झाली. पण त्या साखरेपासून पुन्हा ऊस होत नाही.

एकदा प्रक्रिया करून रूपांतरित केलेला पदार्थ पुन्हा मिळवता येत नाही. तसेच अध्यात्माचे आहे. अध्यात्म ही एक प्रक्रियाच आहे. येथे जिवाचा शिव होतो. नराचा नारायण होतो. जिवाचा शिव झाल्यावर पुन्हा जिवात रूपांतर होत नाही. एकदा अमर झाल्यावर पुन्हा जन्म-मरणाचा फेरा नाही. यासाठी अध्यात्माची ही प्रक्रिया काय आहे हे जाणून घ्यायला हवे. जिवाचा शिव कसा होतो. याचा अभ्यास करण्याची गरज आहे. दुधाचे दही ही प्रक्रिया जुनीच आहे. हे रूपांतर होताना दुधात विरजण मिसळावे लागते. विरजण काय असते? ताकाचे किंवा दह्याचे विरजण असते. दुधात मिसळले की काही कालावधीनंतर त्याचे दह्यात रूपांतर होते. आत्मज्ञानी सद्‌गुरूंचा अनुग्रह हे विरजण आहे. सद्‌गुरूंनी विरजण मिसळल्यानंतर काही कालावधीनंतर शिष्याचे सद्‌गुरूमध्ये रूपांतर होते.

शिष्य आत्मज्ञानी होतो. उसाचे साखरेत रूपांतर करताना, रस वेगळा करावा लागतो. यासाठी ऊस चरक्‍यात घातला जातो. रस गाळून घ्यावा लागतो. त्यातील घाण वेगळी करावी लागते. रस उकळल्यानंतर त्यातून मळी वेगळी केली जाते. विविध प्रक्रिया करून मग साखरेत रूपांतर होते. अध्यात्मातही असेच आहे. अनुग्रहानंतर शिष्याने नित्य साधना करायला हवी. मनातील दुष्ट विचार बाजूला सारायला हवेत. ते वेगळे करायला हवेत. रस गरम केल्यानंतर मळी वेगळी होते. तशी साधनेने अंग गरम व्हायला हवे. कुंडलिनी जागृत करायला हवी. यासाठी मनामध्ये सात्त्विक वृत्ती वाढवायला हवी.

मळी दूर करण्यासाठी रसात विविध रसायने मिसळली जातात, तसे सात्त्विक विचारांचा मारा करायला हवा. मन शुद्ध झाले की मग ते आत्मज्ञानात रूपांतरित होण्यास योग्य होते. अध्यात्मातील या रासायनिक प्रक्रिया समजून घ्यायला हव्यात. कुंडलिनी जागृत करण्यासाठी आवश्‍यक साधना ही करायला हवी. रस कायलीत ओतल्यानंतर तो तापविण्यासाठी जाळ द्यावा लागतो किंवा साखर करताना रस गरम करावा लागतो. तरच त्यातील मळी दूर होते. तसे शरीरात कुंडलिनी जागृत करून मनाची शुद्धी ही साधायला हवी. तरच आत्मज्ञानाची साखर तयार होईल.
 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621




Friday, May 29, 2020

बीजा आणि भुसा । अंधु निवाडु नेणें जैसा ।


भुईमुगाच्या शेंगांच्या बाबतीतही तेच घडले. संकरित जाती आल्या. एका जाळीला शंभर शेंगा लागायच्या. सुरवातीची तीन चार वर्षे या जातींनी शंभर पर्यंत उत्पादन दिले पण आता याच जातीच्या जाळीला दहा शेंगाही लागत नाहीत. ही परिस्थिती आहे. वाढत्या लोकसंख्येला कुपोषणापासून रोखण्यासाठी उत्पादकता वाढविणे हे आव्हान आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

बीजा आणि भुसा । अंधु निवाडु नेणें जैसा ।
नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ।। 234 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 3 रा

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे आंधळा धान्य आणि कोंडा यांची निवड जाणत नाहीं त्याप्रमाणें कधी कधीं डोळसालाहि कळत नाही, असे कां व्हावे ?

शेतीमध्ये नवनवे शोध लागत आहेत. उत्पादन वाढीसाठी संकरित बियाण्यांची पैदास केली जात आहे. पण ही पैदास करताना केवळ उत्पादन वाढ हाच एकमेव मुद्दा विचारात घेतला जातो. एखादी जात एकरी 25 क्विंटल उत्पादन देत असेल, तर नवी जात 30 क्विंटल कसे उत्पादन देईल याकडे अधिक लक्ष दिले जाते. उत्पादित होणारे 30 क्विंटल पौष्टिक आहे का नाही? याचा विचार केला जात नाही. काहीजण यावर शंका घेऊ शकतील सर्वच बाबतीत तसे घडत नाही. पण आता जनुकीय सुधारित जाती विकसित होत आहेत. याबाबत आपण हे सांगू शकता का? या जातीचे बियाणे खाण्यास योग्य आहे का? याचा विश्‍वास दिला जातो का? जर नवे उत्पादित धान्य खाण्यास योग्य नसेल तर त्याचे उत्पादन करण्यात अर्थ काय? केवळ उत्पादन अधिक मिळते म्हणून ते पिकवायचे का? उत्पादित होणारा माल बीज आहे की कोंडा याचा विचार नको का? जनावरांनाही खायला घालण्यास अयोग्य असणारे पदार्थ उत्पादित करायचे का? आरोग्यास घातक अशी ही उत्पादने विकसित केली जात आहेत. शेतकऱ्यांना याची कल्पनाही नाही. आपण शेतात अधिक उत्पादन येते म्हणून जे पिकवतो ते एक प्रकारचे विषच आहे. यासाठी आपण काय पिकवतो याचा विचार शेतकऱ्यांनी करायला हवा. कापसाच्या जनुकीय सुधारित जाती आल्या त्यांनी उत्पादनात क्रांती केली. पण त्यानंतर तीन वर्षांनी उत्पादनाचा आलेख ढासळू लागला. आता या सुधारित जाती पूर्वी इतकी उत्पादने देत नाहीत. भुईमुगाच्या शेंगांच्या बाबतीतही तेच घडले. संकरित जाती आल्या. एका जाळीला शंभर शेंगा लागायच्या. सुरवातीची तीन चार वर्षे या जातींनी शंभर पर्यंत उत्पादन दिले पण आता याच जातीच्या जाळीला दहा शेंगाही लागत नाहीत. ही परिस्थिती आहे. वाढत्या लोकसंख्येला कुपोषणापासून रोखण्यासाठी उत्पादकता वाढविणे हे आव्हान आहे. पण हे आव्हान स्वीकारताना उत्पादित होणारा माल आरोग्यास घातक ठरणार नाही किंवा शेतकऱ्यांचे नुकसान करणारा ठरणार नाही याचा विचार करायला नको का? भाताच्या संकरित अनेक जाती आल्या. त्याची यादी लांबलचक आहे. दरवर्षी यामध्ये भरच पडत आहे. पण या जाती घनसाळ, चंपाकळी, काळा जिरगा आदी पारंपरिक देशी जातींची बरोबरी करू शकतात का? त्यांच्या इतके पौष्टिक धान्य देऊ शकतात का? याचा विचार व्हायला नको का? येणारे उत्पादन हे कोंडाच असेल तर ते घेणे योग्य आहे का? आपण काही अंध नाही. यातील फरक आपणास ओळखता यायला नको का? देशी वाणांचे संवर्धन हे यासाठीच गरजेचे आहे. कोंड्याचे उत्पादन करण्यापेक्षा सशक्त देशी वाणांचे धान्य उत्पादित करायला हवे. पौष्टिकतेचा विचार करून आरोग्यदायी अशी उत्पादने शेतकऱ्यांनी घेतली तर देश सशक्त होईल. भावी पिढीही सशक्त राहील. 


 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621



Thursday, May 28, 2020

अहो वासरूं देखिलियाचि साठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी ।


स्पर्धेच्या युगात जुण्या विचारांना गावंढळ म्हटले जात आहे. या विचारांची टिंगलही केली जात आहे. अशा नवी ग्रामीण पिढी या विचारांपासून दूर चालली आहे. या संस्कृतीत असलेला गोडवाच ज्यांना समजलेला नाही. ते टिंगल-टवाळी करणारच. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

अहो वासरूं देखिलियाचि साठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी ।
स्तनामुखाचिये भेटी । काय पान्हा न ये ।। 40 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ - अहो, वासरूं पाहिलें की लागलीच प्रेमाने गाय खडबडून उभी राहते; मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची व त्याच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पान्हा येणार नाही काय ?

हुर...हुर..हौशा..हे शब्द ऐकताच बैल उठून उभा राहतो. मालकाचा मान तो राखतो. इतके प्रेम, माया त्याच्यामध्ये सामावलेली असते. इतके ते इमानदार असते. मालकाच्या शब्दात तितके प्रेम भरलेले असते. शेळी असो मेंढी असो किंवा गाई, म्हशी, बैल ही पाळीव जनावरे असोत. त्यांना हे प्रेमाचे शब्द लगेच समजतात. शेतात राबणारे हे शेतकऱ्याचे सोबती, उत्पन्न वाढविणारे हे सहकारी शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार असतात. यासाठीच या जनावरांची पूजा केली जाते. पोळा हा सण हा यासाठीच साजरा केला जातो. धर्म हा स्नेह वाढविण्यासाठी आहे. धर्माचे नियम हे स्नेह उत्पन्न करण्यासाठी आहेत. हिंदुधर्मामध्ये या मुक्‍या जनावरांची पूजा केली जाते. त्यांच्या सहकार्याची जाणीव व्हावी हा या मागचा उद्देश आहे. यामुळेच खेड्याकडील लोकांमध्ये प्रेम भरलेले असते. आपुलकी असते. हे प्रेम राहावे, वाढावे मनामध्ये सात्त्विक भाव जागृत व्हावा हाच उद्देश या सणांमध्ये आहे. सणांचे स्वरूप आता बदलले आहे. पोळ्याच्या सणाला बैलांना सजविले जायचे. त्या दिवशी त्यांना कामास जुंपले जात नाही. गोड पोळीचा नैवेद्य त्यांना भरविला जातो. सुवासिनी बैलांची पूजा करतात. दीपावलीच्या आदल्यादिवशी वसुबारस दिवशीही या जनावरांची पूजा केली जाते. वर्षभर राबून घरात धनधान्य आणण्यात शेतकऱ्यांचे सहकारी असणारे हे सोबती हे शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी पूजनीय आहे. ग्रामीण संस्कृतीत हे संस्कार पाहायला मिळतात. काळानुसार यामध्ये आता बदल झालेला पाहायला मिळतो. विचारसरणी बदलत चालली आहे. नव्या विचारांमध्ये हे वात्सल्य, प्रेम दिसून येत नाही. राजकीय चढाओढीमुळे ग्रामीण वातावरण बिघडत चालले आहे. स्पर्धेच्या युगात जुण्या विचारांना गावंढळ म्हटले जात आहे. या विचारांची टिंगलही केली जात आहे. अशा नवी ग्रामीण पिढी या विचारांपासून दूर चालली आहे. या संस्कृतीत असलेला गोडवाच ज्यांना समजलेला नाही. ते टिंगल-टवाळी करणारच. वात्सल्य या शब्दाचा अर्थ वासना असा लावणाऱ्यांना ग्रामीण संस्कृती कशी समजेल. कशी रुचेल. ग्रामीण तरुणांनी हा विचार करायला हवा. संस्कृती हा एक उच्च विचार आहे. तो विचार त्या चळवळीत रुजला आहे. हा विचार बदलू पाहणारेच बदलतील. इतके सामर्थ्य या ग्रामीण संस्कृतीत दडले आहे. सर्वत्र प्रेमाचा वर्षाव व्हावा असा विचार आजही या संस्कृतीत जोपासला जातो. शेतकऱ्यांच्या घरात आजही या प्रेमाचा महापूर पाहायला मिळतो. पाहुण्यांचे आदरातिथ्य हा त्यांचा स्थायीभाव आहे. वासरू पाहिल्यावर गायीलाही पान्हा फुटतो. तसे हे प्रेम ओसंडून वाहत आहे. या प्रेमात डुंबायला शिकावे. हे वात्सल्यच प्रगतीच्या वाटा दाखवते. झटपट श्रीमंतीची स्वप्ने दाखविणारे विचार हे प्रेम कधीही समजू शकणार नाहीत. कष्टाच्या भाकरीची गोडी कशी असते हे कष्टकरी झाल्याशिवाय कळत नाही. अध्यात्मात साधना केल्याशिवाय साधनेतील आनंद समजत नाही. गुरूप्रेम त्याशिवाय उमजत नाही.

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Wednesday, May 27, 2020

पैं बल्वचेचि महामारी । पिंपळा कां वडाचिया परी ।


मोठे वृक्ष आता कोणी लावतही नाही. एकत्र कुटुंब पद्धती जशी नष्ट होऊ लागली आहे. तसे हे मोठमोठाले विस्तार असणारे वृक्ष जाऊन त्या जागी आता छोटे छोटे वृक्ष उदयास येत आहेत. मोठ्या वृक्षांचे बोन्साय झाले आहे. संसारही आता बोन्साय झाला आहे. पण या वड-पिंपळाच्या वृक्षाप्रमाणे आपला संसार आहे. कुटुंबे छोटी छोटी झाली तरी त्यांचा विस्तार हा वाढतच आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621


पैं बल्वचेचि महामारी । पिंपळा कां वडाचिया परी ।
जे पारंबियांमाझारीं । डहाळिया असती ।। 58 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - झपाट्याने वाढणाऱ्या लव्हाळ्याच्या गवताप्रमाणे तसाच पिंपळाप्रमाणे अथवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा संसारवृक्ष आहे. कारण की पिंपळाप्रमाणे अथवा वडाप्रमाणें याच्या पारंब्यांमध्ये डहाळ्या आहेत.

वड आणि पिंपळ हे वृक्ष शाश्‍वत आहेत. अनंत काळापर्यंत ते जिवंत राहतात. विशेष म्हणजे या झाडाचा विस्तार चौफेर असतो. एकच झाड मोठी जागा व्यापते. या वृक्षाची हवेत तरंगणारी मुळे कालांतराने नव्या खोडात रूपांतरित होतात. या नव्या खोडामुळे झाडाचा विस्तार अधिकच वाढतो. म्हणूनच पूर्वीच्याकाळी या वृक्षांची लागवड केली जात होती. आता हे वृक्ष दुर्मिळ होऊ लागले आहेत. अशा वृक्षांच्या तोडीमुळेच पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरणाचे संवर्धन करायचे असेल तर अशा वृक्षांची लागवड ही गरजेची आहे.

पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढतच जात आहे. जागतिक तापमान वाढ यावर नुसत्या गप्पाच मारल्या जातात. प्रत्यक्षात आवश्‍यक त्या कृती केल्याच जात नाहीत. तापमानवाढीने गारपीट, अतिवृष्टी, अवेळी पाऊस, दुष्काळ अशा समस्या उद्‌भवत आहेत. यावर उपाय योजण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन हे गरजेचे आहे. या मोठ्या वृक्षांमुळे परिसरातील तापमानात मोठा फरक पडतो. अशा वृक्षांच्या परिसरात गारवा असतो. अशा थंड ठिकाणी आध्यात्मिक साधना उत्तम होते. या वातावरणात मन प्रसन्न राहते. यासाठीच अनेक थोर संतांनी वड-पिंपळाच्या झाडाखाली साधना करत. गौतम बुद्धांना पिंपळाखाली आत्मज्ञान प्राप्ती झाल्याचेही उल्लेख आहेत. वडाच्या झाडाची सुवासिनींकडून पूजा केली जाते. हा वृक्ष अनेकवर्षे जिवंत राहतो. तशी आपल्या पतीचीही साथ कायम राहावी, अशी यामागची श्रद्धा आहे. आता वटपौर्णिमेला सुवासिनींना वडाची झाडेही पूजेसाठी शोधावी लागतात अशी स्थिती आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही आता हे वृक्ष दुर्मिळ झाले आहेत. या वृक्षांचे महत्त्व जाणून घेऊन याची लागवड करणे गरजेचे आहे.

रस्त्यांच्या दुतर्फा या वृक्षाची लागवड केली गेली होती. पण आता वाढत्या रस्त्यांच्या रुंदीकरणांमुळे हे दुतर्फा लावलेले वृक्षही नष्ट झाले. असे मोठे वृक्ष आता कोणी लावतही नाही. एकत्र कुटुंब पद्धती जशी नष्ट होऊ लागली आहे. तसे हे मोठमोठाले विस्तार असणारे वृक्ष जाऊन त्या जागी आता छोटे छोटे वृक्ष उदयास येत आहेत. मोठ्या वृक्षांचे बोन्साय झाले आहे. संसारही आता बोन्साय झाला आहे. पण या वड-पिंपळाच्या वृक्षाप्रमाणे आपला संसार आहे. कुटुंबे छोटी छोटी झाली तरी त्यांचा विस्तार हा वाढतच आहे. पिंपळाला अनेक पारंब्या सुटल्या. तसे ही कुटुंबे तयार झाली आहेत. काही वर्षांनी या पारंबीचाच जसा वृक्ष होतो तसा या कुटुंबाचाही विस्तार वाढत जातो. कुटुंब नियोजनाची वेळ आता आली आहे. हम दो हमारे दो आता हम दो हमारा एक. असे म्हणायची वेळ आली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता ही परिस्थिती आणखीही बिकट होऊ शकते.

प्रगतीचा वेग पकडण्याच्या मागे आता प्रत्येकजण लागला आहे. त्यानुसार त्याचे नियोजन सुरू आहे. त्यात दूरदृष्टीचा अभाव आहे. त्याला विचार करायला वेळच नाही. प्रगतीचा वेग पकडणे हेच आता माणसाचे आद्य कर्तव्य झाले आहे. ज्याने हा वेग पकडला, तोच या संसारात टिकतो. असे आज मानले जाते. हा वेग पकडता न आल्यास भावीकाळात जगणेही मुश्‍किल होणार आहे. ही परिस्थितीही सत्य आहे. ग्रामीण भागातील जीवन वाढत्या महागाईमुळे कठीण होत आहे. मोठ मोठी राने आता तुकड्या तुकड्यात विभागली गेली आहेत. अशा या तुकड्यातून येणारे उत्पन्न हेही तुटपुंजे आहे. यावर एका घराचा संसार चालवणे शक्‍य नाही. पर्यायी स्रोत शोधण्याची गरज आहे. शेतीला जोड धंदे असतील तरच हा व्यवसाय आता टिकणार आहे. उत्पादित मालाच्या मुल्यसंवर्धनाचाही विचार आता शेतकऱ्यांनी करायला हवा.

वड-पिंपळाचा वृक्ष प्रत्येक पारंबीच खोडात रुपांतर करून विस्तार वाढवितो तसा शेतकऱ्यांनी शेतीचा हा विस्तार वाढवत राहायला हवे. तरच हा व्यवसाय फायदेशीर ठरणारा आहे. मुख्य व्यवसायाला पारंब्या फुटल्या तरच हे शक्‍य होणार आहे. प्रत्येक पारंबी खोडात रूपांतरित झाली तर शेतीचा वृक्ष शाश्‍वत होईल. पण सध्या तसे होताना दिसत नाही. वृक्षाचा वटवृक्ष उभा करण्याकडे कल दिसून येत नाही. झपाट्याने प्रगती करताना आवश्‍यक असणारा धीर आता नव्या पिढीत नाही. ध्येय गाठायचे तर कासवाची चालच चालावी लागते. सशाच्या चालीने ध्येय गाठता येत नाही. हळूहळू पण कामात सातत्य ठेवले तरच ते ध्येय गाठता येते. सातत्य नसेल तर ध्येय मध्येच सोडावे लागते.

पारंबी हळूहळू जमिनीच्या दिशेने वाढते. ती जमिनीपर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत तिला हवेतीलच आद्रता शोषून घ्यावी लागते. जमिनीत रुजल्यानंतर हवेतील आद्रतेची तिला गरज भासत नाही. पण जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी पारंबिला कष्ट करावे लागतात. उन्हाळ्यात हवेत आद्रता नसते. वाढ खुंटते या नैसर्गिक आपत्तींचा सामना तिला करावा लागतो. पण ती ध्येय सोडत नाही. सातत्याने जमिनीपर्यंत पोहोचण्याचे तिचे प्रयत्न सुरू असतात. जीवन जगतानाही याचाच विचार करावा. या वृक्षांचा आदर्श घेऊन जीवन जगायला हवे.

शेती ही एक संस्था आहे. या संस्थेचा वटवृक्ष कसा होईल याचा विचार करायला हवा. आध्यात्मिक प्रगती करणाऱ्या साधकासही हाच नियम लागू आहे. साधनेत सातत्य ठेवले तरच साधनेचा वटवृक्ष उभा राहील. सातत्य नसेल तर ध्येय गाठता येत नाही. एकदा जमिनीला पारंबी पोहोचली की मग कितीही कडक उन्हाळा येवो वृक्ष सुकणार नाही. आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर मग उन्हाळा, पावसाळा सर्व सारखेच. त्यांचा सामना करण्यासाठी साधक समर्थ असतो. फक्त तेथेपर्यंत पोहोचणे आवश्‍यक आहे. संसार सुद्धा या वृक्षासारखाच आहे. त्यालाही जमिनीत मुळे आहेत तशी वरती हवेतही मुळे आहेत. त्याचीही वाढ या वड-पिंपळासारखीच आहे. पण आत्मज्ञानाची आस धरणारा साधक या संसारात गुरफटत नाही. संसार वृक्षाला आत्मज्ञान प्राप्तीकडे जाणारी ही पारंबी वाढत ठेवतो. संसारवृक्षाची अनित्यता तो जाणतो. म्हणून तो संसार सोडून पळून जात नाही. मुलांना, बायकोला सोडून तो जात नाही. आत्मज्ञानाकडे जाणारी ही पारंबी त्या संसारवृक्षावरच वाढते. हवेतील आद्रता शोषून ती पारंबी वाढते. श्‍वासावर नियंत्रण मिळवून साधनेत प्रगती साधली जाते. आत्मज्ञानाची जमिनी मिळाल्यानंतर हा आत्मज्ञानाचा वटवृक्ष उभा राहातो.
 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Monday, May 25, 2020

नगरेचिं रचावीं । जळाशयें निर्मावीं ।


आत्माची खरी गरज ऑक्‍सिजन आहे. हा ऑक्‍सिजन श्‍वासोच्छवाव्यतिरिक्त पाण्यावाटेही त्याला मिळतो. शरीरातील पेशीतून तो मिळतो. सध्या प्रदूषण वाढले आहे. हवेतील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे आपणास विविध आजार होत आहेत. प्रदुषणमुक्तीसाठी आपण लढा उभारतो आहोत. जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल ढळू न देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी आवश्‍यक उपाययोजनांची गरज आहे. - राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

नगरेचिं रचावीं । जळाशयें निर्मावीं ।
लावावीं । नानाविधें ।। 233 ।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - शहरेच वसवावीत, जलाशय वैगरे पाण्याचे साठे बांधावेत. नाना प्रकारचे मोठे बगीचे लावावेत.

पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. देह हा विविध पेशींनी तयार झाला आहे. पाण्यामुळे शरीरातील या पेशी जिवंत राहतात. पेशींची संख्या कमी जास्त झाली तर देहावर याचा परिणाम होतो. कधीकधी जीवन प्रवासच संपतो. यासाठी प्रत्येक सजिवासाठी पाणी हा आवश्‍यक घटक आहे. पृथ्वीवर पाणी आहे म्हणूनच तर येथे जीवसृष्टी आहे. इतर गृहावर जीवसृष्टी आहे का नाही हे पाहण्यासाठी तेथे पाणी आहे का हे प्रथम तपासले जाते. मंगळावर पाणी आढळल्याचा दावा केला जातो. पाणी असेल तर तेथे निश्‍चितच जीव असणार. पण पृथ्वी वगळता इतर कोठेही पाणी नाही.

पाणी म्हणजे काय? तर एचटुओ. दोन हायड्रोजनची संयुगे व एक ऑक्‍सिजन मिळूण पाणी तयार होते. हा ऑक्‍सिजनच महत्त्वाचा आहे. हा प्राणवायू आहे. श्‍वास घेतो व सोडतो म्हणजे आपण नेमके काय करतो? ऑक्‍सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बनडायऑक्‍साईड बाहेर सोडतो. श्‍वास हाच आपला प्राण आहे. श्‍वास आहे तर आपण जिवंत नाहीतर देह दगड. श्‍वासोच्छवासाची क्रिया थांबली की जीवन संपते. ही क्रिया हाच आपला आत्मा आहे. देहात श्‍वास येतो आणि बाहेर जातो. आत्मा असे पर्यंत ही क्रिया सुरू राहते. या देहातून आत्मा बाहेर पडला की ही क्रिया थांबते.

आत्माची खरी गरज ऑक्‍सिजन आहे. हा ऑक्‍सिजन श्‍वासोच्छवाव्यतिरिक्त पाण्यावाटेही त्याला मिळतो. शरीरातील पेशीतून तो मिळतो. सध्या प्रदूषण वाढले आहे. हवेतील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे आपणास विविध आजार होत आहेत. प्रदुषणमुक्तीसाठी आपण लढा उभारतो आहोत. जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल ढळू न देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी आवश्‍यक उपाययोजनांची गरज आहे. जीवनात पाण्याचे, ऑक्‍सिजनचे महत्त्व विचारात घेता. पर्यावरणामध्ये हवेचे व पाण्याचे प्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. पाणी आहे तरच आपला विकास आहे.

घर बांधले पण पाणी नसेल तर तेथे राहणार कसे? पाणी आहे तेथेच वस्ती वसते. पाणी नाही त्या वाळवंटात कोणी राहू शकत नाही. नदी पात्रात डोह आहेत त्या ठिकाणी पूर्वी वस्ती उभी राहिली. डोंगरावर, उंच पठारावर पाणी जिथे सापडले तेथे वसाहती निर्माण झाल्या. पाणी असेल तरच शेतकरी पिके घेऊ शकेल ना? पाण्याचे साठे करण्यासाठीच धरणे, जलाशले बांधली गेली. विहिरी, कूपनलिका खोदल्या गेल्या. पाऊस पडला तरच पिके येऊ शकतात. अन्यथा उत्पन्न मिळणार नाही. पावसाचे पाणी जमीनीत मुरवले तरच विहिरी, कूपनलिकांना पाणी येईल. पाणी असेल तरच बागायती शेती करता येईल. अन्यथा पावसावर जितके पिके घेता येतील तितकीच पिके घेणे शक्‍य होईल.

इस्राईलमध्ये खूपच कमी पाऊस पडतो. पण तेथे शेतीचे उत्पन्न आपल्यापेक्षाही अधिक होते. कमी पाण्यावर जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येते. याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले. पाण्याचा योग्य वापर केला तर ते शक्‍य आहे. आपल्याकडे पाऊस मुबलक पडतो पण नियोजन नसल्याने भरघोस उत्पादन होत नाही. गरजेपेक्षा अधिक मिळाले की दुर्लक्ष होते. यात नुकसान होते. गरजेपेक्षा कमी किंवा आवश्‍यक तेवढेच मिळाले तर त्याचा वापर योग्य प्रकारे केला जातो. काटकसर, बचत करण्याची सवय लागते. पावसाचे पाणी वर्षभर पुरविता यावे, यासाठी ते साठविणे गरजेचे आहे. शेतीचा विकास साधण्यासाठी पाणी ही मुख्य गरज आहे. विहीर खोदणे, कूपनलिका खोदणे किंवा शेततळे उभारणे ही गरज आहे. पावसाच्या पाण्यावर फक्त खरीप पिके घेता येणे शक्‍य आहे. बारमाही पिकांसाठी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागते. सध्या शेततळ्याचा वापर करून शेतीतील पाण्याचा प्रश्‍न मिटवला जात आहे.

ग्रीनहाऊस हे तंत्रज्ञान आता अनेक ठिकाणी वापरले जाऊ लागले आहे. पूर्वी पावसाचे पाणी शेतात पडत होते. ते जमिनीत मुरत होते. साहजिकच भूजल पातळी वाढली जात होती. पण आता ग्रीनहाऊसमुळे पाणी थेट जमिनीत मुरत नाही. ते शेतात पडतच नाही. यासाठी आता पाणी जमिनीत मुरवण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज भासू लागली आहे. रेन वॉटर हार्व्हेस्टिंग हे नवे तंत्र नव्या तंत्राने शेती करणाऱ्यांनी वापरणे गरजेचे आहे. इस्राईलमध्ये पाऊस कमी पडतो त्यामुळे तेथे या तंत्राची सक्ती आहे. आपल्याकडे पाऊस मुबलक पडत असल्याने याकडे दुर्लक्ष केले जाते. तसे होता कामा नये. सध्या भूजलपातळी घटण्याची ही प्रमुख कारणे आहेत. मोठ मोठ्या वसाहती उभ्या राहिल्या. या वसाहतीमध्ये चिखल होऊ नये, घाण होऊ नये यासाठी जमिनीवर फरश्‍या बसविल्या गेल्या. स्वच्छता राखण्यासाठी ही सोय केली पण यामुळे पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरण्याची क्रिया थांबली. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला. भूजलसाठे घटले. प्रदूषित झाले. यासाठी मोठ्या वसाहतीमध्ये आता रेन वॉटर हार्व्हेस्टिंगची गरज आहे.

पावसाचे पाणी जमिनीत मुरावे यासाठीच्या उपाय योजनांची सक्ती हवी. पाण्याचे प्रदूषण होणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. नद्यांचे प्रदूषण वाढले आहे. काही शहरात वाहणाऱ्या नद्या ह्या नद्या आहेत की गटारे हे सांगणेही आता कठीण झाले आहे. नदीची गटारगंगा व्हावी ह्या इतके दुर्दैव्य दुसरे कोणते असू शकेल? जीवनासाठी आवश्‍यक घटकांकडे दुर्लक्ष झाले तर जीवनच नष्ट होईल याचा विचार करण्याची गरज आहे. यासाठी संयुक्त लढा, प्रबोधनाची गरज आहे. प्रत्येकाने कर्तव्य म्हणून जीवनात तसा बदल करण्याची गरज आहे. प्रत्येकाने पाणी आणि हवा शुद्ध ठेवण्याचा संकल्प केला आणि त्यानुसार जीवन जगण्याचा निर्धार केला तर ते शक्‍य आहे.

माणसाने काही सवयी लावून घेण्याची गरज आहे. आज नको उद्या बघू असे म्हणत पिढ्यान पिढ्या याकडे दुर्लक्ष होत आहे. आता याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अशी स्थिती उत्पन्न झाली आहे. प्रदूषण कमी करणे ही संयुक्तिक जबाबदारी आहे. हवा शुद्ध ठेवण्यासाठी झाडे लावण्याची गरज आहे. हवेतील ऑक्‍सिजनचे प्रमाण योग्य राखण्यासाठी, शुद्ध ऑक्‍सिजनसाठी प्रयत्न करायला हवेत. तसे वने उभारणे, जलाशयांची निर्मिती करणे, शहरे उभारणे हे राजस गुण आहेत. पण जीवनात हे निर्माण करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. हे उभारतानाच प्रथम पर्यावरणाचा विचार करायला हवा. हवेचे प्रदुषण, पाण्याचे प्रदुषण, आवाजाचे प्रदुषण हे मानवी शरीरावर खूप मोठा परिणाम करते. मानवाचे आरोग्य ठिक राहण्यासाठी याची शुद्धी गरजेची आहे. अध्यात्मात यासाठीच तर शुद्धतेला महत्त्व आहे. शुद्धता मनाच्या प्रसन्नतेसाठी गरजेची आहे. मन प्रसन्न असेल तरच साधनेत मन रमते. यासाठी शुद्धता हवी.

शुद्ध हवा आत घेण्यासाठी परिसर शुद्ध ठेवणे हे याचसाठी गरजेचे आहे. श्‍वासावर नियंत्रण हाच आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग आहे. स्वतःच्या कानांनी श्‍वास ऐकणे हीच साधना आहे. मनाने ऐकल्याने, एकाग्रता वाढविल्याने आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग सुकर होतो.

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Sunday, May 24, 2020

माझें नृसिंहत्व लेणें ।



 काट्याने काटा काढायचा असा निसर्गाचा नियम आहे. तसेच काहीसे साम्य निसर्गताहा या भूतलावर पाहायला मिळते. सृष्टीच्या निर्मितीमध्येही समानता पाहायला मिळते. साम्यावस्था हा निसर्गाचा नियमच आहे. दृष्ट प्रवृत्ती वाढल्या की त्यावर प्रतिबंध बसवण्यासाठी कोणीतरी उत्पन्न होतोच. साम्यावस्था राखली जाते. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621


पाहें पां भक्तीचेनि आथिलेपणें । दैत्यीं देवा आणिलें उणें ।
माझें नृसिंहत्व लेणें । जयाचियें महिमे ।। 450 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना पाहा, भक्तीच्या संपन्नतेनें राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला ज्या प्रल्हादाच्या भक्तिमहात्म्यासाठीं मला नरसिंहरुप अलंकार धारण करावा लागला.

खांबातून नृसिंह प्रकटला, संत ज्ञानेश्‍वरांनी रेड्यामुखी वेद वदवले. अशी उदाहरणे आजच्या घडीला न पटणारी अशीच आहेत. चमत्कारच्या गोष्टी विज्ञानापुढे टिकणे कठीण आहे. पण चमत्काराच्या या प्रकारामागचा भाव मात्र जाणून घ्यायला हवा. त्याचा खरा शोध घ्यायला हवा. वैद्यकिय शोध विचारात घेतले तर या गोष्टी चमत्कार वाटणार नाहीत.

काट्याने काटा काढायचा असा निसर्गाचा नियम आहे. तसेच काहीसे साम्य निसर्गताहा या भूतलावर पाहायला मिळते. सृष्टीच्या निर्मितीमध्येही समानता पाहायला मिळते. साम्यावस्था हा निसर्गाचा नियमच आहे. दृष्ट प्रवृत्ती वाढल्या की त्यावर प्रतिबंध बसवण्यासाठी कोणीतरी उत्पन्न होतोच. साम्यावस्था राखली जाते. वैद्यकीय शास्त्रात एखाद्या रोगावरील उपाय शोधताना कसा अभ्यास केला गेला आहे. हे पाहावे म्हणजे नैसर्गिक नियमांची ओळख आपणास होईल.

गोकर्णाचे फुल कानासारखे दिसते. यावरून ही वनस्पती कानाच्या विकारावर गुणकारी असल्याचे प्रयोग केले गेले. गुळवेल किंवा खाऊचे पान हृद्‌याच्या आकाराचे आहे म्हणजे हे हृद्‌याच्या विकारावर गुणकारी ठरू शकेल. आक्रोडचे फळ हे मेंदुच्या आकाराचे आहे. त्यावरील रेषा मेंदूवरील रेषांशी साम्य करतात. यावरून हे मेंदूच्या विकारावर गुणकारी आहे असे संशोधन करण्यात आले. गुंजीची फळे डोळ्यासारखी आहेत यावरून ही वनस्पती डोळ्यांच्या विकारावर गुणकारी आहे का हे तपासले गेले.

नेचे वर्गीय वनस्पती अनेक वर्षे पाण्याविना जीवंत राहतात. पाणी मिळाले नाही तर त्या मृत होत नाही. त्यातील जीवंतपणा टिकूण राहातो. पाणी मिळाले की पुन्हा त्या टवटवीत होतात. हिरव्यागार दिसतात. यावरून ही वनस्पती कोमातील किंवा बेशुद्धावस्थेत गेलेल्या व्यक्तीवर शुद्धीवर आणण्यासाठी गुणकारी ठरू शकते. असे अनुमानही काही संशोधकांनी मांडले आहे. हे निसर्गाचे चमत्कारच म्हणावे लागतील. निसर्गात साम्यावस्था अशाच प्रकारे राखली गेली आहे.

भक्त प्रल्हाद आणि नृसिंह अवतार याकडेही याच दृष्टीने पाहायला हवे. प्रल्हादाच्या तोंडी सदैव नारायण...नारायण..नारायण हा जप सुरु असायचा. सदैव तो त्यात गुंग होऊन जायचा. आपण भक्त प्रल्हादासारखी साधना करू लागलो तर आपणासाठीही सद्‌गुरु प्रकट होऊ शकतात. विठ्ठल...विठ्ठल..विठ्ठल..चा जप करणाऱ्या वारकऱ्यांना साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाल्याचे अनेक अनुभव आहेत. अशी भक्ती असेल तर आपण आत्मज्ञानी निश्‍चितच होऊ. आपणासही आत्मज्ञानाचा हा ठेवा सद्‌गुरु देणार यात शंकाच नाही. मग तो सद्‌गुरुंचा झालेला नृसिंह अवतारच म्हणावे लागेल ना !

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

आत्मज्ञान प्राप्ती नैसर्गिक क्रिया़; कसे ते घ्या जाणून ?


सद्‌गुरुंची दृष्टीही सर्वत्र समान असते. शत्रू असो किंवा मित्र दोघांच्याही ठिकाणी ते एकच भाव ठेवतात. उपकार, परोपकार याचेही येथे भाष्य नाही. आत्मज्ञान प्राप्ती ही नैसर्गिक क्रिया आहे. सर्वांना याची प्राप्ती होते. यात भेदभाव नाही. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

जो खांडावया घावो घालीं । कां लावणी जयानें केली । 
दोघां एकचि साऊली । वृक्ष दे जैसा ।। 199 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 12 वा 

ओवीचा अर्थ - जो तोडण्याकरितां घाव घालतो किंवा जो लागवड करतो, त्या दोघांना वृक्ष जसा सारखी सावली देतो. 

निसर्ग आपणास अनेक गोष्टी शिकवतो. ते निसर्गाचे नियम आहेत. जीवनात जगताना याचा अवलंब आपण करायला हवा. निसर्गाचे नियम हे अध्यात्मात पाळावे लागतात. पर्यावरणाचे नियम न पाळल्याने प्रदूषण वाढले आहे. निसर्गाचा कोप होताना दिसत आहे. जागतिक तापमानात वाढ होत आहे. याचा मानवी जीवनावर अनिष्ट परिणाम होत आहे. निसर्गाचे नियम न पाळल्याचा हा फटका आहे. 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्‍यक गोष्टींचे पालन हे मानवाने करावेच लागेल. जीवन जगतानाच तसे नियोजन मानवाने करायला हवे. निसर्गाचे नियम मोडणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. अध्यात्मात प्रगती साधताना मात्र निसर्गाचे हे नियम पाळावेच लागतात. तरच प्रगती होते. नियम हा नियमच आहे. जाऊ दे, राहू दे हा स्वभाव येथे उपयोगी नाही. निसर्ग नियम हे सर्वांसाठी आहेत. झाड सावली सर्वांना देते. वृक्षतोड करणाऱ्यासही सावली देते व झाड लावणाऱ्यासही सावली देते. ते यामध्ये भेदभाव करत नाही. यातून आपण काय शिकायचे, तर सर्वांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समान ठेवावा. आपल्या तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे अशा भेद येथे नाही. 

सद्‌गुरुंची दृष्टीही सर्वत्र समान असते. शत्रू असो किंवा मित्र दोघांच्याही ठिकाणी ते एकच भाव ठेवतात. उपकार, परोपकार याचेही येथे भाष्य नाही. आत्मज्ञान प्राप्ती ही नैसर्गिक क्रिया आहे. सर्वांना याची प्राप्ती होते. यात भेदभाव नाही. दुधापासून दही व ताक होणे ही नैसर्गिक क्रिया आहे. पण दुधाचे दही होण्यासाठी त्यात विरजण हे घालावेच लागते. सद्‌गुरू मंत्र, दीक्षा हे विरजणच आहे. या विरजणाशिवाय दही होण्याची प्रक्रिया नाही. दही झाल्यानंतर ताक होण्यासाठी ते घुसळावे लागते. नुसता सद्‌गुरूंचा अनुग्रह झाला म्हणजे झाले. असे नाही. 

दिलेल्या मंत्राचा जप हा करावाच लागतो. साधना ही करावीच लागते. जसे ताक होण्यासाठी दही घुसळावे लागते, तसेच हे आहे. दुधापासून ताक ही निसर्ग क्रिया आहे, तसे आत्मज्ञानप्राप्ती ही सुद्धा निसर्ग क्रियाच आहे. पण या क्रियेत काही प्रक्रियाही करावीच लागते. या प्रक्रियांशिवाय पुढची निर्मिती होत नाही. निसर्गाचे हे नियम समजून घ्यायला हवेत. त्यांचे पालन करायला हवे. वातावरणात प्रदूषण वाढत आहे. निसर्गाचा समतोल ढासळतो आहे. तो ढासळणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अध्यात्मिक प्रगती साधतानाही प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. समतोल ढासळणार नाही हे पहायला हवे. तरच प्रगती होणार आहे.  

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621




Friday, May 22, 2020

स्थिरबुद्धी कशी असते ?


अंगात हे सामर्थ्य येण्यासाठी धीर धरावा लागतो. मनाची तयारी करावी लागते. जीवनात एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी येणाऱ्या गोष्टीचा सामना करण्याचे सामर्थ्य ठेवावे लागते. बुद्धी स्थिर ठेवून कामे करावी लागतात. तरच जीवनात यश संपादन करता येते. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

उन्हाळेनि जो न तापे । हिमवंतीं न कांपे ।
कायसेनिही न वासिपे । पातलेया ।। 346 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - उन्हाळ्याने जो तापत नाही व हिवाळ्याने जो कांपत नाही आणि काही जरी प्राप्त झालें तरी जो भीत नाही.

शेतकऱ्यांची बुद्धी ही स्थिर असते. उन्ह असो थंडी असो त्यांचे कामावरील लक्ष विचलित होत नाही. त्याला या नैसर्गिक गोष्टींचा सामना हा करावाच लागतो. निसर्गावरच शेती अवलंबून असल्याने निसर्गाची अतिक्रमणे ही त्याच्यासाठी नित्याचीच आहेत. किडी- रोगाचा प्रादुर्भाव, वादळी पाऊस, गारपीट, दुष्काळ हा निसर्गाचा कोप नित्याचाच आहे. तसा विचारच त्याला करावा लागतो. तितके कठोर मन होणे गरजेचे आहे. नव्या पिढीमध्ये तितकी कठोरता दिसून येत नाही.

शुराचे पोवाडे जाऊन आता प्रेमाच्या गोष्टींचा मारा त्याचावर होत असल्याने त्याचे मन आता हळवे झाले आहे. सुख-दुःखाच्या गर्तेत तो सापडला आहे. दुःख पचवण्याची क्षमता त्याच्यात दिसून येत नाही. अशा या बदलत्या विचारसरणीमुळेच अनेक समस्या पुढे येऊ लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यामागे हे एक कारणही आहे. उन्हाचा, थंडीचा सामना करण्याची कुवत त्याच्यामध्ये राहिली नसल्यानेच हे प्रश्‍न उभे राहात आहेत. कठीण प्रश्‍नांचा सामना करण्यासाठी मनही तितकेच कठोर असावे लागते.

आध्यात्मिक संतांचे मनही असेच कठोर असावे लागते. तरच आत्मज्ञान प्राप्तीचे मार्ग सुकर होतात. साधना करताना शरीरात अनेक बदल घडतात. साधनेने अंग तापते. कधी कोरडे पडते. कधी मुंग्या येतात. कधी अंग दगडासारखे कठीण होते. अशा सर्व गोष्टींचा सामना करण्याचे सामर्थ्य त्याच्यात असावे लागते. अशा समस्यांनी मन विचलित होता कामा नये. अशा प्रकारांना भिऊन चालत नाही. या गोष्टींचा सामना करण्याची, या गोष्टी पचविण्याची ताकद त्याच्यामध्ये हवी.

अनेकदा चुकीच्या पद्धतीने साधना केल्याने किंवा गुरूंचे मार्गदर्शन न घेता साधना केल्याने त्रास होतो. हा सहजयोग आहे. येथे समाधी ही सहज लागावी लागते. मारून मुरगुटून साधना होत नाही. साधनेसाठी मनाची तयारी असावी लागते. सर्व कठीण प्रसंगांचा सामना करण्याची तयारी ठेवावी लागते. हळूहळू सवयीने या गोष्टींचा सामना करण्याचे सामर्थ्य येते. अंगात हे सामर्थ्य येण्यासाठी धीर धरावा लागतो. मनाची तयारी करावी लागते. जीवनात एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी येणाऱ्या गोष्टीचा सामना करण्याचे सामर्थ्य ठेवावे लागते. बुद्धी स्थिर ठेवून कामे करावी लागतात. तरच जीवनात यश संपादन करता येते.

मनाची एकाग्रता ढळू न देता काम करावे लागते. सुख असो दुःख असो मनाची तोल ढळता कामा नये. सुखाने हुरळून जाऊ नये. दुःखाने मोडून जाऊ नये. सदैव स्थैर्य हवे. जीवनात स्थैर्य असेल तर यश निश्‍चित आहे. साधनेतही स्थैर्य ठेवले तर आत्मज्ञान प्राप्ती निश्‍चित आहे. भिऊन पळू जाणे हे शुराला शोभणारे नाही. साधक हा सुद्धा शूर योद्धा हवा. शेतकरी हा सुद्धा एक योद्धा आहे. येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचे सामर्थ्य त्याने ठेवायला हवे. बुद्धी स्थिर ठेवून कार्यभाग साधायला हवा. तरच प्रगती आहे.

तो थुंकला सार्वजनिक ठिकाणी अन्...


सांगली (जि. मा. का.) : सकाळी शासकीय कार्यालये सुरू होण्याच्या सुमारासच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एक जण आला. कोणाचेही लक्ष नाही असे समजून थुंकला आणि इथेच तो चुकला. त्याच्यामागून निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले बर्डे येत होत्या. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि थुंकणाऱ्यास लागलेच हटकले, कडे बोल सुनावले.आणि जागेवरच महानगरपालिकेच्या सॅनिटरी इन्स्पेक्टरना बोलावून घेऊन 500 रूपयांचा दंड केला. आपल्याला थुंकल्याबद्दल 500 रूपयांचा दंड भरावा लागू शकतो हे सोयीस्करपणे दुर्लक्षित करणारा  या साऱ्या प्रकाराने चांगलाच खजिल झाला.

 सांगली : कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने हा विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणेवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रूपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. असे असताना आजही जे लोक  गार्भियांने या बाबीचे पालन करताना दिसत नाहीत अशांसाठी  हा चांगलाच धडा झाला आहे. यामुळे यापुढे सार्वजनिक ठिकाणी अस्वचछता पसरवणाऱ्यची यापुढे गय केली जाणार नाही हाच संदेश दिला जात आहे .

 सदरची घटना जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना समजतात त्यांनी प्रत्येकानेच सार्वजनिक स्वच्छतेबद्दल सजग राहणे आवश्यक असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या काटेकोर अंमलबजावणीत हातभार लावा व कोरोणा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करा असे आवाहन केले आहे.

Thursday, May 21, 2020

कोल्हापुरात कोरोनाचे २१८ रुग्ण


 कोल्हापूर,दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) - आज दिवसभरात 1448 प्राप्त अहवालापैकी 36 अहवाल पॉझीटिव्ह तर 1411 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 1 नाकारण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 218 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 75 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज दिवसभरात आलेल्या 36 पॉझीटिव्ह अहवालामध्ये आजरा-1, भुदरगड-4, चंदगड-7,  गगनबावडा-2, राधानगरी-1, शाहूवाडी-21 असा समावेश आहे.
  आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 11, भुदरगड- 22, चंदगड- 13, गडहिंग्लज- ५, गगनबावडा- 4, हातकणंगले- 1, कागल- 1, करवीर- 10, पन्हाळा- 13, राधानगरी- 35, शाहूवाडी- 75, शिरोळ- 4, नगरपरिषद क्षेत्र- 7, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-13 असे एकूण 214 आणि पुणे-1, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 218 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. 

लसणाचा वास उग्र, पण हे आहेत फायदे

लसणामुळे तमोगुण वाढतो म्हणून साधना करताना लसूण खाऊ नको, असे सांगितले जाते. पण या लसणाचे आयुर्वेदात अनेक उपयोग सांगितले आहेत. वाताचे विकार कमी करण्यासाठी लसणाचा उपयोग केला जातो. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

लसणातें न सांडी गंधी । का अपथ्यशीळातें व्याधी । 
तैसी केली मरणावधीं । विषादें तया ।। 757 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 18 वा 

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणें लसुणाला घाण कधीच सोडत नाही अथवा पथ्य न करणाऱ्याला रोग सोडीत नाही, त्याप्रमाणें त्या तामसी पुरुषाला मरणाऱ्या वेळेपर्यंत शेद सोडीत नाही. 

लसणाचा वास उग्र असतो. तो कधीही, कशानेही जात नाही. हा उग्रवास औषधी आहे. पूर्वीच्याकाळी आतासारखे दवाखाने नव्हते. लगेच औषधाची सोयही नव्हती. किरकोळ आजार तर अंगावरच काढले जायचे. सर्दी, पडसे हे काही आजार मानलेच जात नव्हते. सर्दी झाल्यावर देशी उपाय केले जायचे. लहानमुलांना सर्दी झाली की आता लगेच दवाखाने गाठले जातात. श्‍वसनास त्रास होतो, त्याला व्यवस्थित झोप लागत नाही, म्हणून लगेच उपचार केले जातात. पूर्वीही अशा आजारावर उपचार केले जायचे. लसणाच्या पाकळ्या लहान मुलांच्या गळ्यात बांधल्या जातात. त्याच्या उग्र वासामुळे व त्यातील उष्णतेमुळे सर्दी नाहीशी होते. इतका हा वास उपयुक्त आहे. 

इतकेच काय पिकांवरील कीड-रोग घालविण्यासाठीही लसणाचा उपयोग केला जातो. लसणापासून कीड व रोग नाशके तयार केली जातात. एक किलो लसूण कुटायचा. कुटताना त्यामध्ये पाणी अजिबात घालायचे नाही. यात एक किलो सेंद्रिय गूळ मिसळायचा. हे मिश्रण छोट्या बाटलीत भरून 10 दिवस ठेवावे. दहा दिवसानंतर यापासून उत्तम बुरशीनाशक तयार होते. हे बुरशीनाशक दोन मिली मिश्रण एक लिटर पाण्यामध्ये मिसळूण पिकावर फवारावे. पिकावरील सर्व बुरशीचे रोग नष्ट होतात. 

लसणापासून उत्तम प्रकारचे कीडनाशकही तयार करता येते. दोन किलो लसूण पाणी न घालता कुटायचा. त्यात 25 मिली केरोसीन (रॉकेल) घालून हे मिश्रण प्लॅस्टिकच्या डब्यात संध्याकाळी सातच्या आत ठेवावे. दुसरेदिवशी सकाळी ही दोन किलो पेस्ट 100 ग्रॅम लाल मिरची पुडीत मिसळावी. त्यात पाच लिटर पाणी घालावे. लगेचच हे मिश्रण फडक्‍याने गाळून घ्यावे. यात 250 लिटर पाणी घालून एक एकरावर फवारावे. शेतातील सर्व प्रकारचे कीटक नष्ट होतात. 

लसणामुळे तमोगुण वाढतो म्हणून साधना करताना लसूण खाऊ नको, असे सांगितले जाते. पण या लसणाचे आयुर्वेदात अनेक उपयोग सांगितले आहेत. वाताचे विकार कमी करण्यासाठी लसणाचा उपयोग केला जातो. बाळंतणीस भाजलेल्या लसणाच्या पाकळ्या खायला दिल्यास तिच्या शरीरातील वाताचे विकार कमी होतात. विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसणाचा धूप केला जातो. विशेषतः बाळंतणीच्या खोलीत हा धूप केला जातो. कान दुखत असेल तर लसणाचा वास घ्यावा. त्यामुळे कानाचे दुखणे थांबते. 

लसणात तामस गुण आहेत. पण त्याचा वापर योग्य कारणासाठी केला तर ते उपकारक आहेत. विकार बरा होण्यासाठी काही पथ्ये सांगितली जातात. ती पथ्ये पाळली नाहीत तर विकार हा बरा होणार नाही. तो बळावत जाणार. लसणाचा वास जसा जात नाही, तसा तामस गुण घालवून जात नाही. लसणाचा वास जसा विकारावर उपयुक्त ठरतो. तसे तामस गुण विकारावर वापरून ते नष्ट करायला हवेत. म्हणजेच ते सात्त्विक गुणात परावर्तित करता यायला हवेत. वाईट सवयी चांगल्या सवयीत बदलायला हव्यात. उत्तम साधनेसाठी याची गरज आहे. 

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Wednesday, May 20, 2020

कां झाडाची साउली । वाटे जातां मीनली ।


आत्महत्या हा काही प्रश्‍नावरचा उपाय नाही. ती पळवाट आहे. भित्रे लोक आत्महत्या करतात. शुरासारखे जीवन जगायला शिकायला हवे. यासाठी शुरांसारखे विचार मनात जोपासायला हवेत. शूर व्यक्ती मृत्यूला कधीही घाबरत नाहीत. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

कां झाडाची साउली । वाटे जातां मीनली ।
घरावरी तेतुली । आस्था नाहीं ।। 594।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - अथवा वाटेनें जात असतां मध्येंच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे (वाटसरुची) आस्था नसते. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचें स्वतःच्या घरावर किंचितही ममत्व नसतें.

झाड आपणास कोणतीही अपेक्षा न ठेवता फळे देते. मग आपण त्या झाडाकडून अपेक्षा का ठेवायची? त्यामध्ये आसक्त का व्हायचे? अशामुळे आपल्या मनामध्ये निराशा उत्पन्न होते. वाटेने जाणाऱ्या वाटसरूची झाडाच्या सावलीवर आस्था नसते. तसे आपणही पिके घेताना त्या पिकावर आस्था ठेवायची नाही. उत्पन्न आले नाही म्हणून निराश व्हायचे नाही.

नैराश्‍य हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. नैराश्‍य वाढत गेले तर ते नैराश्‍य माणसाला खाते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या अशा नैराश्‍यातूनच होत आहेत. नुकसान झाल्याने नैराश्‍य, समाधानकारक उत्पन्न मिळाले नाही म्हणून नैराश्‍य येते. यासाठीचे अपेक्षा न ठेवताच उत्पन्न घेण्याची सवय मनाला लावायला हवी. प्रयत्न हे करायला हवेत. उत्पन्न वाढीसाठी करावे लागणारे उपाय योजायला हवेत. येणारे उत्पन्न हे निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग आपल्या हातात नाही. मोहोर चांगला लागला होता, पण वादळी पाऊस आला आणि सर्व मोहोर गळाला. याला आपण काय करणार? हे काही दरवर्षी घडते असे नाही. कधीतरी एकदाच घडते. नेहमी नुकसान होत नाही, पण प्रयत्न सोडायचे नाहीत. आज तोटा झाला उद्या नफा होईल या आशेने प्रयत्न करत राहायचे.

प्रत्येक गोष्टीत आत्मसंतुष्ट राहायचे. यातून समाधान मिळते. समाधानाने मनाला शांती मिळते. जीवन हे पुढे पुढे जातच असते. वेळ कोणासाठीही थांबत नाही. अशा या संसारात कधी सुख मिळते कधी दुःख. दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुःख मनाला झोंबत. यासाठी दुःखाच्या विचारात मन गुंतवायचे नाही. त्यातून लगेचच बाहेर कसे पडता येईल किंवा त्या वातावरणातून दूर जाण्याचा प्रयत्न करायचा. वातावरण बदलानेही दुःखी विचारांना विश्रांती मिळते. विसर पडतो. बदल हा सकारात्मक असावा. वाईट संगत, व्यसन लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

बऱ्याचदा दुःख विसरण्यासाठी वाईटाची संगत, व्यसनाची साथ केली जाते. अशाने दुःख नाहीसे होत नाही. वाढतच जाते. कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. मग व्यसन करून पुन्हा कर्ज का वाढवायचे? कर्ज कसे कमी करता येईल. पैसा कसा वाचवता येईल. कसा उभा करता येईल असा सकारात्मक विचार करायला हवा. चुकीच्या वाटेने जाऊन पुन्हा निराशाच पदरी पडते. निराशा दूर करण्यासाठी सदैव आशावादी राहायला हवे. मनात धैर्य उभे करायला हवे. आत्महत्या करून कधी प्रश्‍न संपत नसतो.

आत्महत्या हा काही प्रश्‍नावरचा उपाय नाही. ती पळवाट आहे. भित्रे लोक आत्महत्या करतात. शुरासारखे जीवन जगायला शिकायला हवे. यासाठी शुरांसारखे विचार मनात जोपासायला हवेत. शूर व्यक्ती मृत्यूला कधीही घाबरत नाहीत. कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला हवे. प्रयत्न सोडायचे नाहीत. शेती करताना पिकाच्या उत्पादनावर कधीही आस्था ठेवायची नाही. उत्पन्न मिळो न मिळो श्रम करत राहायचे. चालत राहायचे. सावलीची अपेक्षा ठेवायची नाही. उन्ह लागतंय म्हणून चालणे सोडायचे नाही.
 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Tuesday, May 19, 2020

तरी अनुतापतीर्थी न्हाला ।


संतांना सर्वजण सारखे असतात. राजा असो गुंड असो, सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा भिकारी असो संतांच्याजवळ सर्व व्यक्ती सारख्याच आहेत. कारण या सर्वांच्यातील आत्मा एकच आहे. 
 राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल ८९९९७३२६८५


या लागी दुष्कृती जरी जाहला । तरी अनुतापतीर्थी न्हाला ।
न्हाऊनी मजआंतु आला । सर्वभावें ।। ४२० ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा

ओवी चा अर्थ - याकरिता पूर्वीचा दुराचरण करणारा असला, तरी नंतर त्याविषयींच्या पश्चातापरुपी तीर्थात त्याने स्नान केले, आणि अशाप्रकारेचे स्नान करून सर्व भावांनी तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला.

अनेक दुष्कर्म करणारा वाल्ह्या कोळी पुढे वाल्मिकी ऋषी झाले. त्यांनी रामायण लिहिले. असे अनेक प्रसंग इतिहासात घडले आहेत. पूर्वी दुष्कर्म करत होता, पण नंतर त्याला त्याच्या या कामाचा पश्चाताप झाला व त्यांनी दुष्कर्म सोडून दिले. पुढे समाजात चांगली व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले. काहीजण तर संत झाले. अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतील. यातून सांगायचे हेच आहे. दुष्टांच्या मनातील दुष्टपणा काढण्यास श्री ज्ञानेश्वरी शिकवते. दुष्टांना मारून त्याला शिक्षा करून त्याच्यातील दुष्टपणा जातोच असे नाही पण त्याच्यात योग्य तो बदल घडविणल्यास तो सुधारू शकतो. 

तुरुंगात शिक्षा भोगणारा कैदी पुन्हा बाहेर आल्यावर काहीही करू शकतो. पुन्हा तो त्याच मार्गावर जाऊ शकतो. यामुळे झालेल्या शिक्षेने त्याच्यातील दुष्टपणा गेला असे होत नाही. पण शिक्षेच्या काळात त्याला पश्चाताप झाला अन् सुधारण्याची संधी दिली तर तो सुधारू शकतो. त्याच्या मनातील दुष्टपणा नाहीसा करण्याच्या प्रयत्न शिक्षेच्या कालावधीत व्हायला हवा. जर त्याच्यात बदल झाला तर तो शिक्षा संपल्यानंतर समाजात चांगली व्यक्ती म्हणून पुढे नावारूपाला येऊ शकतो. ठेच लागल्याशिवाय अक्कल येत नाही. 

चुकल्याशिवाय शिकता येत नाही, पण जो झालेल्या चुका सुधारतो तोच जीवनात मोठी प्रगती करतो. चुका कुणाकडून होत नाहीत, पण त्या चुका सुधारून आचरणात फरक करतो तो पुढे जातो. प्रगती करतो. यासाठीच संतांनी दुष्टांना ही तितकेच महत्त्व दिले आहे. त्यांच्यात बदल घडविण्याचे काम संत करतात. 

संतांना सर्वजण सारखे असतात. राजा असो गुंड असो, सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा भिकारी असो संतांच्याजवळ सर्व व्यक्ती सारख्याच आहेत. कारण या सर्वांच्यातील आत्मा एकच आहे. दुष्कृत्य हे त्या व्यक्तीच्या देहाकडून झालेले आहे. त्या दुष्कृत्यांचा जर त्या दुराचारी व्यक्तीला पश्चाताप झाला, तर पश्चाताप आणि त्याच्यातील पापीवृत्ती नष्ट करता येऊ शकते. पश्चातापाने पाप नष्ट करणाऱ्या तीर्थात त्यांने स्नान केले. स्वतःच्या मनात तसा बदल घडवला. दुष्कर्मे सोडून चांगले वागण्याचा त्यांने संकल्प केला, तर तो जीवनात निश्चितच यशस्वी होऊ शकतो. म्हणून मनातील दुष्टपणा, दुष्ट विचार घालवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. त्यातून तो सुधारू शकतो. साधकाने आपल्यातील दुष्टपणा, दुष्ट विचार काढून टाकून स्वतःमध्ये बदल घडविण्यास निश्चितच त्याची अध्यात्मिक प्रगती होऊ शकते.

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621




Sunday, May 17, 2020

माणूसकीचा वृक्ष


झाड काय देते? जाणाऱ्या येणाऱ्यांना सावली देते. उन्हापासून संरक्षणासाठी आसरा देते. श्रमीकांना सावली देते. पत्र, पुष्प, फळ त्यापासून मिळते. मोहोर लागल्यानंतर सुवास देते. वातावरण प्रसन्न करते. पण त्या झाडाला आपण काय देतो. कधी पाणी तरी घालतो का? काही न घेता ते सर्वकाही देते.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

पत्र, पुष्प, छाया । फळें मूळें धनंजया ।
वाटेचा न चुके आलिया । वृक्षु जैसा ।। 86 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, ज्याप्रमाणें वृक्ष वाटेंने येणाऱ्यास पाने, फुले, छाया, फळे, मुळें देण्यास चुकत नाही.

घर कसे असावे? असा प्रश्‍न केला तर आपल्या मनात उत्तर येते बंगला असावा की झोपडी. सध्या जीवनात पैशाला महत्त्व आहे. जीवन पैशावर चालते. आराम पैशावर मिळतो. पैसा असेल तर जीवनात सुख आहे. पैसा नसेल तर जगणार कसा हा मोठा प्रश्‍न आहे. भीक मागूण भीक मिळेल का? हा सुद्धा मोठा प्रश्‍न आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवनच बदलले आहे. यामुळे घर कसे असावे ? या प्रश्‍नाचे उत्तर हे भावनिक न येता आर्थिक घडामोडीवर आधारित उत्तर मिळाले आहे. घर शांत, स्वच्छ आणि इतरांनाही सुख देऊ शकेल असे असावे. मग ती छोटीशी झोपडी जरी असली तरी चालेल. पण ती सुखाची सावली देणारी असावी. टुमदार बंगला आहे पण त्यामध्ये शांत झोप लागत नसेल तर ते घर कसले. झाडाप्रमाणे घर असावे.

झाड काय देते? जाणाऱ्या येणाऱ्यांना सावली देते. उन्हापासून संरक्षणासाठी आसरा देते. श्रमीकांना सावली देते. पत्र, पुष्प, फळ त्यापासून मिळते. मोहोर लागल्यानंतर सुवास देते. वातावरण प्रसन्न करते. पण त्या झाडाला आपण काय देतो. कधी पाणी तरी घालतो का? काही न घेता ते सर्वकाही देते. निरपेक्ष भावनेने ते सर्व देते. उन्हात चालून चालून थकलेल्या व्यक्तीला ते आसरा देते. शेतात कष्ट करणाऱ्या व्यक्तीला आता बांधावर झाडे नकोशी वाटत आहेत. नांगरटीला अडचण होते. झाडाच्या सावलीमुळे पीक चांगले वाढत नाही. अशा अनेक कारणांमुळे बांधावरील झाडे नष्ट झाली. नांगरट ट्रॅक्‍टरने होऊ लागल्याने शेतात नांगर चालवून थकण्याचा आता प्रश्‍नच उरला नाही. यांत्रिकीकरणामुळे कामांत सहजता आली, पण माणसाचे मनही तितक्‍याच सहजतेने बदलले गेले.

बांधावरच्या झाडावर त्याने कुऱ्हाडी चालवल्या. उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीत दररोज प्रयोग केले जातात. पण उत्पन्नाचे स्रोतच यांनी तोडले. झाडाचा पाला पडत होता. जमीन शेकण्यासाठी त्याचा फायदा होत होता. शेताला सेंद्रिय खत मिळत होते. झाडाची फळे चाखायला मिळत होती. तीही बंद झाली. निवांतपणे झाडाखाली बसून आराम करता येत होता. मन प्रसन्न करणारा, थकवा दूर करणारा हा वृक्ष तोडल्याने शेतकऱ्याचे मन भरकटले आहे. शांतीच्या शोधात तो फिरतो आहे. निवांतपणा शोधतो आहे.

वाड्याचा बंगला झाला, शेणाच्या सारवलेल्या जमीनींची जागा आता स्टाईलच्या फरशांनी घेतली आहे. पण या नव्या घरातील गारवाच नाहीसा झाला आहे. उन्हाच्या दाहकतेने पंख्याचा वाराही गरम वाटू लागला आहे. पांढऱ्या मातीच्या विटांतला वाडा त्याच उन्हात नैसर्गिक गारवा देत होता. मग हा सिमेंटचा बंगला का बांधला? अंगदुखीचा त्रास यानेच तर आला. पैसा आला पण गारवा गेला. निवांतपणा गेला. माणसातले माणूसपणही गेले. माणूसकीचा वृक्ष आता पुन्हा लावला, तरच भावी काळात मनुष्य संस्कृती टिकून राहील.
 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621



Saturday, May 16, 2020

किडकांसाठी गुळ हे विष, कसे ?



गुळामुळे अळीची भूक अधिक वाढते. अळी जास्तीत जास्त विषाणूजन्य पदार्थ खाते. विषाणूमुळे अळी रोगग्रस्त होते व मरते. हरभरा पिकावरील घाटे अळी, सोयाबिनवरील पाने खाणारी अळी, लष्करी अळी, गोगलगाय आदीच्या नियंत्रणासाठी या न्युक्‍लिअर पॉलिहैड्रॉसीस व्हायरस हा वापरला जातो. - राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

पैं आघविया जगा जें विख । तें विख कीडिया पीयूख ।
आणि जगा गुळ तें देख । मरण तया ।। 930 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - सगळ्या जगाला जे विष ते विष किंड्यांना अमृत (जीवन) असते. आणि सगळ्या जगाला गूळ जो गोड तो त्या विषातील किड्यांना मारक असतो.

कीड आणि रोग हे पिकाचे सर्वांत मोठे शत्रू आहेत. याचा परिणाम उत्पादन वाढीवर होत असल्याने याचे नियंत्रण हे गरजेचेच आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कीड व रोगांचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. त्यांचे जीवनचक्र आदीचा अभ्यास हा शेतकऱ्यांनी करायलाच हवा. पिकाच्या कोणत्या भागाला कीड इजा करते. किडीची कोणती अवस्था नुकसान करते हे माहित असणे आवश्‍यक आहे. याचा अभ्यास असेल तर किडीवर सहज नियंत्रण मिळवता येते. जगभरात जवळपास 10 कोटी 17 लाख 18 प्रकारचे कीटक आहेत. या सर्वच किडी शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, असेही नाही. काही कीटक इतर कीटकांना खाऊन जगतात. सर्वच कीटक हे मांसाहारी आहेत, असेही नाही. प्रत्येक पिकांवर आढळणारे कीटक हे सुद्धा वेगवेगळे आहेत. कपाशीमध्ये रसशोषणाऱ्या मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण या किडी व अमेरिकन, ठिपक्‍यांची, शेंदरी आदी बोंड अळी यांचा प्रादुर्भाव होतो. उसामध्ये मावा, हुमणी यांचा प्रादुर्भाव होतो. सोयाबीन पिकास पाने खाणाऱ्या अळ्या, खोडमाशी यांचा प्रादुर्भाव होतो. हरभऱ्यामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव होतो. पिकानुसार नुकसान करणारे कीटकही विविध आहेत. याचे नियंत्रण करण्यासाठी किडनाशकांच्या फवारण्या केल्या जातात. पण सध्या हा फवारणीचा खर्च वाढला आहे. साहजिकच उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. अशानेच आज शेती परवडेणाशी झाली आहे. यासाठी वाढता उत्पादन खर्च कसा कमी करता येईल व उत्पादनही उत्तम प्रतीचे कसे घेता येईल यावर अधिक भर देण्याची गरज आहे. किडनाशकांचा मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. किडनाशकांचे अंश मानवाच्या रक्तांमध्ये आढळले आहेत. अशाने आता रासायनिक किडनाशकांच्या फवारण्या करण्यावरही बंदीची गरज आहे. प्रमाणाबाहेर फवारण्या केल्या जात असल्याने हा परिणाम होत आहे. पिकांवरील कीड व रोग हे काही आत्ताच शोधले गेले आहेत असे नाही. पूर्वी ऋषीमुनींनी याचा शोध लावला होता. ते सुद्धा याचा बंदोबस्त करत होते. पण त्याकाळी वापरात असलेल्या तंत्रज्ञानावर अभ्यासच झाला नाही. कश्‍यप ऋषी हे हृदयरोग तज्ञ होते. पोपईच्या पानाच्या देठाने ते हृदयाचे ठोके मोजायचे. इतके प्रगत तंत्र भारतात अस्तित्वात होते. शेतीमध्येही प्रगत तंत्रज्ञान होते. पण काळाच्या ओघात ते मागे पडले. आता त्या काळात वापरण्यात येणाऱ्या तंत्राचा शोध घेण्याची गरज आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी बाराव्या शतकात ज्ञानेश्‍वरीमध्ये जीवसृष्टीतील कीटकांचे गुणधर्म सांगितले आहेत. ते तत्त्वज्ञान आजही उपयुक्त आहे. इतरांसाठी जे विष आहे ते कीटकांचे खाद्य (अमृत) आहे असे ज्ञानदेव म्हणाले. यावर शास्त्रातील अनेक उदाहरणे सांगता येतील. सेंट जॉन्स वर्थ किंवा कलमथ नावाचे तण जनावरांनी खाल्ले तर जनावरे दगावतात. पण या तणावर बिटल तसेच अनेक प्रकारच्या अळ्या, फुलपाखरे, मॉथ, लिफ मायनर आदी कीटक जगतात. ज्या झाडाचे पान, खोड जनावरांसाठी विषारी आहे त्यावरच तर हे कीटक वाढतात. तेच त्यांचे खाद्य आहे. कलमथ तण खाल्याने मेढ्यांची लोकर गळते. दुग्ध जनावरांची दूध उत्पादनाची क्षमता कमी होते. जनावरांचे वजन झपाट्याने घडते. 1944 मध्ये या तणाचा 30 देशामध्ये प्रादुर्भाव झाला होता. जवळपास दहा लाख एकरावर हे तण आढळले होते. ऑस्ट्रेलियामध्ये या तणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 1929 पासून संशोधन सुरू होते. त्यांनी या झाडावर आढळणारे कीटक शोधले. या कीटकांचे उत्पादन करून हे तण नियंत्रणात आणण्याचा प्रयोग केला. 1945-46 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये यावर वाढणाऱ्या बिटलच्या पाच हजार वसाहती सोडल्या. याला यश आल्यानंतर 1950 मध्ये जवळपास तीन हजार बिटल्स गोळा करून सोडण्यात आले. अशा प्रकारे या तणावर जैविक पद्धतीने नियंत्रण मिळविण्यात आले. आता हे तण कॅलिफोर्नियात रस्त्याच्या कडेला पाहायला मिळते. पण ते नियंत्रणात आहे. या तणावर नियंत्रण मिळविल्यानंतर त्या जमिनींचे भाव झपाट्याने वाढले. जैविक तण नियंत्रणाचा उपाय भारतात पूर्वीपासून केला जात असावा. त्यावर ऋषीमुनींनी संशोधनही केले असावे पण काळाच्या ओघात यात आपण मागे पडलो. भारतीयांची संशोधक वृत्तीच कमी झाली आहे. गाजर गवतही असेच एक तण होते. पडीक जमिनीवर भारतात मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यावर जैविक तण नियंत्रणाचे उपाय करून तेही अशाच पद्धतीने नियंत्रणात आणले. तणांच्या बंदोबस्तासाठी जसा किडींचा वापर केला जातो. तसा किडींच्या नियंत्रणासाठी विविध विषाणूंचा वापरही केला जातो. हा विषाणू कीटकाच्या अळीने खाल्ला तर ती आळी मरते. पण ही अळी हा विषाणू खाणार कशी? तिला हा विषाणू खाण्यास भाग पाडणे गरजेचे असते. ही विषाणूजन्य बुरशी अळीने खावी यासाठी अळीला गुळाचे आमिष दाखविले जाते. विषाणूजन्य बुरशीची फवारणी करताना प्रत्येक पंपाला 50 ग्रॅम गुळाचे पाणी यासाठीच त्यामध्ये टाकले जाते. याचे दोन फायदे आहेत. बुरशीला अळी, कीटक जरी मिळाले नाही तरी बुरशी मरत नाही. गुळातील अन्नद्रव्यामुळे ही बुरशी जिवंत राहते. त्या विषांणूची उपासमार होत नाही. दुसरा फायदा म्हणजे गुळामुळे, गोडामुळे कीटकांची अळी आकर्षित होते. साहजिकच गुळाला चिकटलेले विषाणू त्या आळीच्या पोटात जातात. विषाणू अळीच्या पोटात गेल्यानंतर ते झपाट्याने वाढतात. गुळामुळे अळीची भूक अधिक वाढते. अळी जास्तीत जास्त विषाणूजन्य पदार्थ खाते. विषाणूमुळे अळी रोगग्रस्त होते व मरते. हरभरा पिकावरील घाटे अळी, सोयाबिनवरील पाने खाणारी अळी, लष्करी अळी, गोगलगाय आदीच्या नियंत्रणासाठी या न्युक्‍लिअर पॉलिहैड्रॉसीस व्हायरस हा वापरला जातो. घाटे अळी (हेलिकोव्हरपा) ज्वारी, हरभरा, तूर, कपाशी, सूर्यफूल, मका, टोमॅटो, करडई या पिकांचे नुकसान करते. ही अळी रंगाने हिरवट. पिवळसर, तांबूस तपकिरी किंवा काळपट असते. मुख्यतः अळी अवस्था पिकाचे मोठे नुकसान करते. हाती आलेले उत्पन्न जाण्याची शक्‍यता असते. सध्या या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे या कीडीमध्ये कीटकनाशक प्रतिकारक्षमता निर्माण होते. त्यावेळी ही अळी किटनाशकास दाद देत नाही. अशामुळे आता या आळीस न्युक्‍लिअर पॉलिहैड्रॉसिस या विषाणूमुळे मारणे गरजेचे आहे. गुळासोबत हा विषाणू फवारून नियंत्रणाची गरज आहे.

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Friday, May 15, 2020

येर पत्र पुष्प फळ । तें भजावया मिस केवळ ।


शुद्ध मनाने, अंतःकरणाने केलेली साधना निश्चितच फलद्रुप होते. म्हणूनच पान, फुल, फळ मग ते कोणत्याही वृक्षाचे असे तेच सद्गुरु स्वीकारतात. सद्गुरु मंत्रांच्या उर्जेतून शिष्यातील पानांचा विकास होतो. साधना फुलते अन् त्या शिष्यरुपी वृक्षाला आत्मज्ञानरुपी फळे लागतात. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

येर पत्र पुष्प फळ । तें भजावया मिस केवळ । 
वांचूनि आमचा लागे निष्फळ । भक्तितत्त्व ।। 396 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - बाकी पान, फूल, फळ याचे अर्पण करणे ते मला भजण्याचे केवळ निमित्त आहे. वास्तविक पाहिलें तर आम्हांला आवडतें असें म्हटले म्हणजे, 

भक्तांच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्तितत्त्वच होय. गुरुंना फक्त पान, फुल, फळच गुरु दक्षिणा म्हणून दिले जावे. पान मग ते कोणत्याही वृक्षाचे असो. सकलेले असले तरी चालते. फुल, फळ ते मग कोणतेही असो. ते गुरुंना चालते. ते फक्त शुद्ध भावाने अर्पण करावे, असा त्यांचा भाव आहे. शुद्ध भावानें, मनानें ते अर्पण केले तर ते सद्गुरु निश्चितच स्वीकार करतात. त्यांना द्रव्य लागत नाही ना स्थावर, मालमत्ता, पैसा आडका अशी कशाचीही ते अपेक्षा करत नाहीत. मग असे सद्गुरु शिष्यामध्ये पाहतात तरी काय ? शिष्याचा फक्त मनोभाव पाहतात. त्याने शुद्ध मनाने, शुद्ध विचाराने, अंतःकरणाने, शुद्ध भावनेने जर ते दिले तरच ते सद्गुरुंच्यापर्यंत पोहोचते. ते त्याचा स्वीकार करतात. म्हणजेच भक्ताच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्तितत्वच संत पाहातात. पण फक्त पान, फुल, फळच का ? सूर्यप्रकाश पान शोषते. सूर्याची उर्जा पानात साठवली जाते. पानावर प्रकाशसंश्लेषण होते. सूर्याच्या उर्जेचे रुपांतर केले जाते. यातून त्या रोपट्याची वाढ होऊन त्याचे वृक्षात रुपांतर होते. त्याला पुढे फुले आणि मग फळे लागतात. सूर्याची जशी उर्जा फळामध्ये रुपांतरीत होते. तशी सद्गुरुच्या मंत्रात उर्जा असते. सूर्यापासून जशी उर्जा पानाला मिळते तसे त्याचा विकास होतो. तसा सूर्यस्वरुप असणाऱ्या तेजस्वी सद्गुरुंकडून मंत्राच्या रुपातून उर्जा मिळते. त्या उर्जेतून शिष्याचा आध्यात्मिक विकास होतो. रोपटे रुपी शिष्याचा यातून विकास होऊ लागतो. मंत्राची उर्जा हळूहळू फुलते. शिष्याची साधना जशी फुलते तसा त्याचा विकास होऊ लागतो. या साधनेतूनच मग आत्मज्ञानाचे फळ लागते. सद्गुरुंना यासाठी साधनारूपी फुलाची अपेक्षा असते. तेच ते स्वीकारतात. शुद्ध मनाने, अंतःकरणाने केलेली साधना निश्चितच फलद्रुप होते. म्हणूनच पान, फुल, फळ मग ते कोणत्याही वृक्षाचे असे तेच सद्गुरु स्वीकारतात. सद्गुरु मंत्रांच्या उर्जेतून शिष्यातील पानांचा विकास होतो. साधना फुलते अन् त्या शिष्यरुपी वृक्षाला आत्मज्ञानरुपी फळे लागतात. मग ब्रह्मसंपन्न अशी ही साधना फळद्रुप होऊन त्या फळातील बिजातून पुन्हा नवी रोपे उदयाला येतात. ही आत्मज्ञान रुपी फळे परंपरा वाढवतात. 

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Thursday, May 14, 2020

विचारांच्या मळणीची गरज

धान्य स्वतंत्र करण्यासाठी जशी मळणी आवश्‍यक आहे. तसे अध्यात्मात आत्मज्ञानाचे बीज स्वतंत्र करण्यासाठीही साधनेची, सात्त्विक विचारांची मळणी ही करावीच लागते. कणसावरून सात्त्विक विचारांचा ट्रॅक्‍टर हा फिरवावाच लागतो. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685


की भूंस बीज एकवट । उफणितां राहे घनवट ।
तेथ उडे तें फलकट । जाणों आलें ।।130।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - किंवा एकत्र झालेले भूस व धान्य उफणलें असतां धान्य जाग्यावर राहतें व उडून गेलेले ते फोलकट, असें ज्याप्रमाणे समजून येतें.

पिकात दाणे भरल्यानंतर योग्यवेळी त्याची कापणी करावी लागते. कापणी केलेल्या कणसांची मग खळ्यावर मळणी केली जाते. मळलेल्या कणसातून दाणे स्वतंत्र होतात. त्याला वारा देऊन फलकटे व दाणे स्वतंत्र केले जातात. आता यांत्रिकीकरणामुळे एकाचवेळी ह्या सर्व क्रिया करणे शक्‍य झाले आहे. कापलेली कणसे यंत्रात टाकली की दाणे व फलकटे स्वतंत्र होऊन बाहेर पडतात. शेवटी मळणी ही करावीच लागते. दाण्यावरील आवरण हे दूर करावेच लागते. शेंगा फोडाव्या लागतात. तरच आतील दाणे बाहेर येऊ शकतील. उष्णतेने काही फळातील दाणे बाहेर पडतात. पण उष्णतेचीही गरज त्याला भासते. अध्यात्माचेही तसेच आहे. मनातील मरगळ दूर करण्यासाठी, मनावर साचलेला मळ धुण्यासाठी ग्रंथांची पारायणे ही करावीच लागतात. वाचनाने, पारायणाने मनातील अशुद्ध विचार दूर होतात. सात्त्विक विचारांचे दाणे मग आपोआप एकत्र होऊ लागतात. काही फळांची टरफले कठीण असतात. सोलून, बदडूनही ती दूर होत नाहीत. ती दूर करण्यासाठी उष्णतेची गरज भासते. उकळत्या पाण्यात टाकून टरफलाचा टणकपणा कमी करावा लागतो. मनातील काही अशुद्ध विचार पटकन, सहजरीत्या दूर होत नाहीत. ते विचार धुण्यासाठी मग साधनेची गरज भासते. साधनेने मनाची मरगळ दूर होते. मन प्रसन्न होते. शरीराचे तापमान वाढते. साधनेत पाठ शेकली जाते. त्यातून बाहेर पडणाऱ्या या उष्णतेने मनातील कठीणातील कठीण अशुद्ध विचारही जाळून टाकले जातात. दूर होतात. शुद्ध, सात्त्विक विचारांचा झरा मग मनात वाहू लागतो. एकाग्रता वाढते. सर्व टरफले दूर होतात. साधनेने मग आत्मज्ञानाचे बीज आपोआप बाहेर येते. धान्य स्वतंत्र करण्यासाठी जशी मळणी आवश्‍यक आहे. तसे अध्यात्मात आत्मज्ञानाचे बीज स्वतंत्र करण्यासाठीही साधनेची, सात्त्विक विचारांची मळणी ही करावीच लागते. कणसावरून सात्त्विक विचारांचा ट्रॅक्‍टर हा फिरवावाच लागतो. दाणे स्वतंत्र होई पर्यंत फिरवावा लागतो. भाताची धाटे खाटेवर बडवावी लागतात. तसे मनावर सात्त्विक विचारांचा घाव हा घालावाच लागतो. बडवून, बडवून दाणे स्वतंत्र केली जातात. तसे घाव घालून सात्त्विक बीज वेगळे करावे लागते. सात्त्विक वारा देऊन मनावरील फलकटे दूर करावी लागतात. तरच आत्मज्ञानाचे बीज हाती लागेल.
 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Wednesday, May 13, 2020

रामायणातील संजीवनी वनस्पतीचा शोध

के. एम. गणेशाय, आर. वासुदेवा आणि आर. उमाशंकर या संशोधकांनी लक्ष्मणास मर्छिता अवस्थेतून बाहेर काढणारी संजीवनी वनस्पती सिलाजीनेला असल्याचे काही उदाहरणे देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल ८९९९७३२६८५


रामायणातील संजीवनी वनस्पतीचा शोध अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तराखंडमधील आयुष विभागाने संजीवनी बुटीच्या शोधासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. यापूर्वीही या संदर्भात संशोधन झालेले आहे. याच संशोधनाच्या आधारावर सिलाजीनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती रामायणातील संजीवनी बुटी असल्याची शक्‍यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. या वनस्पतीची वैशिष्ट्ये आणि त्याचे उपयोग आणि आढळ विचारात घेता ही वनस्पती रामायणातील संजीवनी बुटी असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. 

डॉ. संदीप पांडे, आरती शुक्‍ला, सुप्रिया पांडे, अंकिता पांडे या संशोधकांच्या गटाने सिलाजीनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती उष्माघात, उष्णतेमुळे झालेले विकार, खोलवर झालेल्या जखमा, सूर्यप्रकाशामुळे त्वचेवरील मृत झालेल्या पेशी, स्त्रियांचे प्रजननासंबंधीचे आजार आदीवर उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.

के. एम. गणेशाय, आर. वासुदेवा आणि आर. उमाशंकर या संशोधकांनी लक्ष्मणास मर्छिता अवस्थेतून बाहेर काढणारी संजीवनी वनस्पती सिलाजीनेला असल्याचे काही उदाहरणे देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. उष्णतेच्या झटक्‍यामुळे किंवा तडाख्यामुळे तसेच बाणातील विषामुळे लक्ष्मण मूर्छीत पडला होता. सिलाजीनेला ही वनस्पती उष्माघात आणि विषामुळे आलेली कोमावस्ता यावरील औषधे तयार करण्यासाठी वापरली जाते. यामुळे ही वनस्पती संजीवनी बुटी असल्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. 

संजीवनी वनस्पतीची वैशिष्ट्ये 

सिलाजीनेला ब्रायोपटेरीस ही वनस्पती फर्न नेचे वर्गीय वनस्पतीमध्ये मोडते. वाढीसाठी पाणी मिळाले नाही तर ही वनस्पती सुकते पण तिच्यातील जिवंतपणा कायम असतो. पुन्हा तिला पाणी मिळाले तर ती पुन्हा फुलते टवटवीत होते. ही वनस्पती मातीत तसेच दगडावरही वाढते. हिमाचल प्रदेशातील कैलास आणि वृषभ पर्वतरांगांमध्ये ही वनस्पती मुख्यतः आढळते. उत्तरांचल भागातील डोंगर रांगांमधील जोशीमठ, कुमिन, गडवाल येथेही तिचा आढळ पाहायला मिळतो. अरवली पर्वत रांगा तसेच मध्य प्रदेशातील सातपुडा, बिलासपूर, होशांगबाद, जबलपूर, अमरकंटक चिंदवाडा, बेतुल, सेहोरे या भागामध्येही वनस्पती आढळते. 


संशोधकांनी शोधलेल्या संजीवनी वनस्पती

स्थानिक भाषेत संजीवनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हजारो वनस्पती आहेत. त्यातील सिलॅजिनेला ब्रायोपटेरीस, क्रेसा क्रिटीका, डेसमोट्रायकम्‌ फिम्ब्रियाटम या तीन वनस्पतीवर संशोधकांनी सखोल अभ्यास केला त्यामध्ये सिलाजीनेला ही वनस्पती रामायणातील संजीवनी बुटी असल्याची संशोधकांनी शक्‍यता व्यक्त केली.  

संत ज्ञानेश्वर म्हणतात उसाची कणसे व्यर्थ (शास्त्रोक्त ज्ञानेश्वरी)


उसाला शेंडे फुटल्यावर गाळप करून योग्य प्रमाणात साखर मिळत नाही, तसे उतारवयात या शेतात आत्मज्ञानाचे पीक योग्य प्रमाणात मिळत नाही. यासाठी बालवयातच नांगर धरायला हवा. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

नाना उंसाचीं कणसें । कां नपुंसके माणुसें । 
वन लागलें जैसें । साबरीचें ।। 576 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 18 वा 

ओवीचा अर्थ - अथवा उसाची कणसे अथवा नपुसक माणसें अथवा सावरीची झाडे ही जशी व्यर्थ असतात. 

उसाच्या रसापासून साखर किंवा गूळ तयार केला जातो. पण याचे अधिकाधिक उत्पादन मिळावे यासाठी उसाचे गाळप योग्यवेळी करावे लागते. योग्य वयाचा ऊस अधिक गोड रस देतो. उसाचे वय जसे वाढेल, तसे त्यातील रसाचे प्रमाण कमी होत जाते. साखरेचे प्रमाणही कमी होते. अधिक वयाचा ऊस निरुपयोगीही ठरतो. कारण त्यामध्ये रस जरी असला तरी त्यात साखर नसते. उसाला शेंडे फुटले, कणसे लागली की समजायचे तो ऊस जून झाला आहे. अशा उसामध्ये रस अधिक नसतो. सध्या साखर कारखाने उसाचे गाळप करताना हेच विचारात घेत नाहीत. उसाला शेंडे फुटायला लागले की ऊस नेतात. अशाने साखरेचे उत्पादन घटते. सहकारी साखर कारखान्यात राजकारण शिरल्याने उसाला शेंडे लागल्यावरच ऊस नेला जातो. अशा या गोष्टींनी त्या शेतकऱ्याचे नुकसान होतेच, पण त्या बरोबरच साखर कारखान्याचेही नुकसान होते. गाळप कमी झाल्याने तोटा हा साखर कारखान्याचाच होतो. खासगी साखर कारखान्याने याचा विचार करून उसाचे गाळप योग्य वेळी करत आहेत. खासगी कारखाने फायद्यात आहेत आणि सहकारी कारखाने तोट्यात. काही तांत्रिक गोष्टी विचारात घेतल्या तर नुकसान टाळता येऊ शकते. पण कारखान्यात राजकारण शिरल्याने कारखाने चालवणे कठीण झाले आहे. स्पर्धा जरूर असावी. पण त्यात खिलाडूपणा असावा. राजकारणात हा खिलाडूपणा आता राहिलेला नाही. खिलाडूवृत्ती खेळात असते, तशी ती राजकारणातही असायला हवी. कुस्तीत डाव करून पाडायचे असते. राजकारणातही असेच डाव असतात. पण येथे खिलाडूपणा नसल्याने हा खेळ न राहता युद्धभूमी झाली आहे. युद्धामध्ये प्रतिस्पर्ध्याचा शेवट झाला, तरी नुकसान दोघांचेही होते. सत्तेच्या स्पर्धेत खिलाडूपणा हवा. ती रणभूमी नाही. अशा या रणभूमीमुळेच शेतकरी नुकसानीत चालला आहे. दरासाठी त्याला संघर्ष करावा लागत आहे. सहकार आता उरलेला नाही. खासगी कारखाने झपाट्याने वाढू लागले आहेत. काही वर्षात पुन्हा सावकारी बळावण्याचा धोका वाढला आहे. खासगी दर देत असतील तर शेतकरी तिकडे वळतील. शेवटी फायदा हा शेतकऱ्यांनी पहायलाच हवा. उसाला कणसे आल्यावरच गाळप होणार असेल तर पर्याय शोधायलाच हवेत. शेतकऱ्यांनीच आता राजकारण सोडून फायद्या-तोट्याच्या गोष्टी ओळखून पाऊले उचलायला हवीत. शेती हा व्यवसाय आहे. त्याकडे व्यवसाय म्हणूनच पाहायला हवे. आर्थिक फटका होणार नाही याचा विचार करायला हवा. अध्यात्म हे सुद्धा एक शेतच आहे. या शेतात आत्मज्ञानाचे पीक साधक घेतो. उसाला शेंडे फुटल्यावर गाळप करून योग्य प्रमाणात साखर मिळत नाही, तसे उतारवयात या शेतात आत्मज्ञानाचे पीक योग्य प्रमाणात मिळत नाही. यासाठी बालवयातच नांगर धरायला हवा. तरच आत्मज्ञानाची अमाप साखर मिळू शकेल. 

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621


Monday, May 11, 2020

संत ज्ञानेश्वरांनी भगवान श्रीकृष्णास ही उपमा दिली आहे ?



अध्यात्मात स्वच्छतेला अधिक महत्त्व आहे. स्वतः स्वच्छ राहून इतरांनाही स्वच्छ ठेवणे, स्वच्छ करणे हे गुण अंगी असणे आवश्‍यक आहे. तसा बदल माणसांमध्ये घडविता यावा लागतो. यासाठी तसे स्वतःमध्ये बदल करणे आवश्‍यक आहे. शरीरातील प्रत्येक घटकांत स्वच्छतेचा हा गुण निर्माण व्हायला हवा. तरच गायीप्रमाणे स्वतःमध्येही पवित्रता येईल.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685


तैसें गीतेंचें हे दुभतें । वत्स करूनि पार्थातें ।
दुभीनली जगापुरतें । श्रीकृष्णगाय ।।1689।।अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - त्याप्रमाणें अर्जुनाला वासरूं बनवून श्रीकृष्णरूपी गायीनें हे गीतेचें दुभते जगाला पुरेल एवढे दिले आहे.

भारतीय संस्कृतीत गायीला देवता मानले जाते. हे देवपण कसे येते? कशाने येते? जिवाचा शिव कसा होतो? नराचा नारायण कसा होतो? हे गुण कसे येतात? देशी गाय आपणास या गोष्टी शिकवते. यासाठी देशी गायीचे गुण विचारात घ्यायला हवेत. गाय स्वच्छतेला अधिक महत्त्व देते. स्वतः व आसपासचा परिसर स्वच्छ असावा या दृष्टीने तिचे प्रयत्न असतात. अनेक जनावरे मातीत लोळतात. चिखलात बसतात. सगळे अंग चिखलाने, मातीने माखलेले असते. त्यांना त्यातच अधिक आनंद वाटतो. पण देशी गाय यामध्ये मोडत नाही. गायींच्या अंगावर असे डाग दिसत नाहीत. देशी गाय स्वच्छ राहण्यावर अधिक भर देते. स्वच्छता हा तिचा स्थायी स्वभाव आहे. मलमुत्र विसर्जनही ती एकदाच सकाळी करते. इतर वेळी ती कधीही मुत्र विसर्जन करत नाही. तिच्या मुत्रामध्ये पर्यावरण शुद्ध करण्याचे गुणधर्म आहेत. म्हणूनच घरामध्ये देशी गायीचे गोमुत्र शिंपडण्याची प्रथा आहे. गायीचे शेण आणि मुत्र हे कीडनाशक म्हणूनही वापरले जाते. शेणाने घर सावरल्याने घरातील कीटक, विषाणू नष्ट होतात. घरात स्वच्छता राहाते. गायीचे दूध हे पचायला हलके असते. लहान मुलांना यासाठी ते देतात. दूध, तुपात अनेक औषधी गुणधर्म आहेत. पाचक शक्ती वाढवितात. इतकी पवित्रता गायीमध्ये नांदते आहे. अध्यात्मात स्वच्छतेला अधिक महत्त्व आहे. स्वतः स्वच्छ राहून इतरांनाही स्वच्छ ठेवणे, स्वच्छ करणे हे गुण अंगी असणे आवश्‍यक आहे. तसा बदल माणसांमध्ये घडविता यावा लागतो. यासाठी तसे स्वतःमध्ये बदल करणे आवश्‍यक आहे. शरीरातील प्रत्येक घटकांत स्वच्छतेचा हा गुण निर्माण व्हायला हवा. तरच गायीप्रमाणे स्वतःमध्येही पवित्रता येईल. देवपण येईल. सद्‌गुरू हे गायी प्रमाणे असतात. स्वतः स्वच्छ राहतात व इतरांना स्वच्छ करण्यासाठी झटतात. यामुळे माऊलीने भगवान श्रीकृष्णानांना गाईची उपमा दिली आहे. गाय जशी तिच्या वासरांवर प्रेम करते. माया करते. त्याप्रमाणे सद्‌गुरूही आपल्या भक्तावर माया करतात. प्रेम करतात. गाय जशी स्वतःच्या वासरांना पोसते तसे सद्‌गुरूही त्यांच्या शिष्यांना पोसतात. पूर्वीच्याकाळी ज्याच्याकडे जास्त गायी तो सर्वांत श्रीमंत समजला जात असे. कारण एक गाईवर एक कुटुंब सहज पोसले जाते. देशी गाय एक लिटर दूध देते. शेतीसाठी खत देते. उत्पादनवाढीसाठी पोषक घटक देते. पर्यावरण शुद्ध करते. मन प्रसन्न ठेवते. शेणीचा धूप घर स्वच्छ, प्रसन्न ठेवतो. अशा गायींची जोपासना आता केली जात नाही हे दुर्दैव्य आहे. अशाने देशी गायींची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. पूर्वी गावात हजारो देशी गायी होत्या पण आता एक गायही मिळणे मुश्‍किल झाले आहे. गायींचे महत्त्व ओळखून शेतकऱ्यांनी एक देशी गाय तरी घरात पोसणे गरजेचे आहे.
 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Sunday, May 10, 2020

पारंपारिक वाणांच्या संवर्धनाची गरज


पोषक ठरणारे पारंपरिक वाण सोडून संकरित बियाण्यांचा वापर किती करायचा, याची उत्पादने किती घ्यायची याचाही विचार करण्याची गरज आहे. जमिनीची खालावलेली प्रत ओळखून शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळला आहे, तसा तो आता पारंपरिक बियाण्यांच्या लागवडीकडेही वळेल. आरोग्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना हे पाऊल उचलावे लागणार आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजीं सामाये । 
ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाति न नशे ।। 59।। अध्याय 17 वा 

ओवीचा अर्थ - बीज नाहीसें होऊन त्याचें झाड होते, झाड नाहीसें होऊन त्याचा बीजांत समावेश होतो, हा क्रम कोट्यावधी कल्पें चालला तरी ( झाडाची ) जात नष्ट होत नाही. 

पिकाच्या पारंपरिक अनेक जाती आता कालबाह्य होत आहेत. पण त्या जातींची चव आजच्या संकरित जातींमध्ये नाही. भाताच्या चंपाकळी, काळा जिरगा, जोंधळा जिरगा, काळी गजरी, घनसाळ, हवळा आदी सुवासिक जाती आहेत. पण या जातींची लागवड फक्त काहीचं शेतकरी करतात. जुन्या जातींचे उत्पादन संकरित बियाण्यांच्या तुलनेत खूपच कमी असते. सध्या वाढत्या लोकसंख्येमुळे, महागाईमुळे अशा बियाण्यांची उत्पादने घेणे आता शेतकऱ्यांना परवडत नाही. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करावी लागत आहे. अशा या परिस्थितीमुळे या पारंपरिक जाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही शेतकरी आवड आणि त्यांचे महत्त्व ओळखून या पिकांची लागवड करत आहेत. अशा शेतकऱ्यांच्यामुळे या बियाण्यांचे संवर्धन होत आहे, ही महत्त्वाची बाब आहे. या जातींची वैशिष्ट्ये शेतकऱ्यांनी ओळखून या जातींच्या संवर्धनाचे कार्य हाती घेण्याची गरज आहे. या जातींचे बियाणे रासायनिक खतांना प्रतिसाद देत नाहीत. सेंद्रिय पद्धतीनेच यांची लागवड करावी लागते. या जातीच्या बियाण्यांची चव, सुवास त्याची प्रत टिकवायची असेल तर सेंद्रिय पद्धतीनेच याची लागवड करणे गरजेचे आहे. संकरित बियाण्यास काही वर्षांनंतर त्याची उत्पादकता, चव, त्याची प्रत नष्ट होते. पण पारंपरिक बियाण्यांची प्रत मात्र टिकून असते. विशेष म्हणजे संकरित बियाणे हे शेतकऱ्यांना दरवर्षी विकत घ्यावे लागते. कारण उत्पादित होणारे दाणे हे वांजोटे आहेत. बीज म्हणून आवश्‍यक गुण त्याच्यामध्ये नाहीत. असे हे वांजोटे उत्पादन सध्या शेतकरी घेत आहेत. बीज म्हणून ते पेरले गेले तर ते उगवत नाही. अशा या संकरित जातींमुळे शेतकऱ्यांची फसवणूकही होत आहे. दरवर्षी संकरित बियाणे तयार करावे लागते. गेल्या काही वर्षातील संकरित जातींचा इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत दर दहा वर्षांनी पिकांच्या नव्याच जाती येताना दिसत आहेत. जुने संकरित वाण टिकून राहात नाही. त्याची गुणवत्ताही टिकून राहात नाही. अशा या बियाण्यांच्या निर्मितीचा उद्योग दरवर्षी करावा लागतो. बदलत्या शेतीच्या या पद्धतीत शेतकऱ्यांनी आरोग्यासाठी उपयुक्त असणारे, पोषक ठरणारे पारंपरिक वाण सोडून संकरित बियाण्यांचा वापर किती करायचा, याची उत्पादने किती घ्यायची याचाही विचार करण्याची गरज आहे. जमिनीची खालावलेली प्रत ओळखून शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळला आहे, तसा तो आता पारंपरिक बियाण्यांच्या लागवडीकडेही वळेल. आरोग्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना हे पाऊल उचलावे लागणार आहे. दरवर्षी बियाणे विकत घेण्याऐवजी पारंपरिक वाणांचे संवर्धन शेतकरी करू लागतील. चांगला वाण, सुवासिक, आरोग्यदायी, चविष्ट अशा या पारंपरिक जातीचे संवर्धन ही काळाची गरज आहे. पारंपारिक वाण टिकून राहणारे आहे. त्याची गुणवत्ता टिकूण राहणारी अशी आहे. 

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621