Tuesday, May 19, 2020

तरी अनुतापतीर्थी न्हाला ।


संतांना सर्वजण सारखे असतात. राजा असो गुंड असो, सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा भिकारी असो संतांच्याजवळ सर्व व्यक्ती सारख्याच आहेत. कारण या सर्वांच्यातील आत्मा एकच आहे. 
 राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल ८९९९७३२६८५


या लागी दुष्कृती जरी जाहला । तरी अनुतापतीर्थी न्हाला ।
न्हाऊनी मजआंतु आला । सर्वभावें ।। ४२० ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा

ओवी चा अर्थ - याकरिता पूर्वीचा दुराचरण करणारा असला, तरी नंतर त्याविषयींच्या पश्चातापरुपी तीर्थात त्याने स्नान केले, आणि अशाप्रकारेचे स्नान करून सर्व भावांनी तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला.

अनेक दुष्कर्म करणारा वाल्ह्या कोळी पुढे वाल्मिकी ऋषी झाले. त्यांनी रामायण लिहिले. असे अनेक प्रसंग इतिहासात घडले आहेत. पूर्वी दुष्कर्म करत होता, पण नंतर त्याला त्याच्या या कामाचा पश्चाताप झाला व त्यांनी दुष्कर्म सोडून दिले. पुढे समाजात चांगली व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले. काहीजण तर संत झाले. अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतील. यातून सांगायचे हेच आहे. दुष्टांच्या मनातील दुष्टपणा काढण्यास श्री ज्ञानेश्वरी शिकवते. दुष्टांना मारून त्याला शिक्षा करून त्याच्यातील दुष्टपणा जातोच असे नाही पण त्याच्यात योग्य तो बदल घडविणल्यास तो सुधारू शकतो. 

तुरुंगात शिक्षा भोगणारा कैदी पुन्हा बाहेर आल्यावर काहीही करू शकतो. पुन्हा तो त्याच मार्गावर जाऊ शकतो. यामुळे झालेल्या शिक्षेने त्याच्यातील दुष्टपणा गेला असे होत नाही. पण शिक्षेच्या काळात त्याला पश्चाताप झाला अन् सुधारण्याची संधी दिली तर तो सुधारू शकतो. त्याच्या मनातील दुष्टपणा नाहीसा करण्याच्या प्रयत्न शिक्षेच्या कालावधीत व्हायला हवा. जर त्याच्यात बदल झाला तर तो शिक्षा संपल्यानंतर समाजात चांगली व्यक्ती म्हणून पुढे नावारूपाला येऊ शकतो. ठेच लागल्याशिवाय अक्कल येत नाही. 

चुकल्याशिवाय शिकता येत नाही, पण जो झालेल्या चुका सुधारतो तोच जीवनात मोठी प्रगती करतो. चुका कुणाकडून होत नाहीत, पण त्या चुका सुधारून आचरणात फरक करतो तो पुढे जातो. प्रगती करतो. यासाठीच संतांनी दुष्टांना ही तितकेच महत्त्व दिले आहे. त्यांच्यात बदल घडविण्याचे काम संत करतात. 

संतांना सर्वजण सारखे असतात. राजा असो गुंड असो, सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा भिकारी असो संतांच्याजवळ सर्व व्यक्ती सारख्याच आहेत. कारण या सर्वांच्यातील आत्मा एकच आहे. दुष्कृत्य हे त्या व्यक्तीच्या देहाकडून झालेले आहे. त्या दुष्कृत्यांचा जर त्या दुराचारी व्यक्तीला पश्चाताप झाला, तर पश्चाताप आणि त्याच्यातील पापीवृत्ती नष्ट करता येऊ शकते. पश्चातापाने पाप नष्ट करणाऱ्या तीर्थात त्यांने स्नान केले. स्वतःच्या मनात तसा बदल घडवला. दुष्कर्मे सोडून चांगले वागण्याचा त्यांने संकल्प केला, तर तो जीवनात निश्चितच यशस्वी होऊ शकतो. म्हणून मनातील दुष्टपणा, दुष्ट विचार घालवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. त्यातून तो सुधारू शकतो. साधकाने आपल्यातील दुष्टपणा, दुष्ट विचार काढून टाकून स्वतःमध्ये बदल घडविण्यास निश्चितच त्याची अध्यात्मिक प्रगती होऊ शकते.

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621




No comments:

Post a Comment