Thursday, October 31, 2019

ज्ञान - अज्ञान


पक्वता आल्यावर ज्ञानही बाहेर पडते, पण पक्वता यायला हवी. ज्ञान पक्व व्हायला हवे. तरच अज्ञान दूर होईल.

ऐसी कोण्ही एकी दशा । तिये वादु अज्ञान ऐसा ।
तया गुंडलिया प्रकाशा । क्षेत्रज्ञु नांव ।। 79 ।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - अशी कोणी एक अवस्था आहे, तिला अज्ञान असें म्हणतात आणि त्या अज्ञानानें गुंडाळलेला जो चितप्रकाश, त्याला क्षेत्रज्ञ असे नांव आहे.

रात्र नाही व दिवसही नाही त्या वेळेला सांजवेळ म्हटले जाते. त्याप्रमाणे विपरीत ज्ञान नसते किंवा स्वरूपज्ञान नसते तेव्हा ते केवळ अज्ञान असते. अज्ञानात ज्ञान गुरफटलेले आहे. फळाच्या आतमधील गर खाण्यास योग्य असतो. साल टाकून द्यावी लागते. ती साल काढावी लागते तरच आतला गर खाता येतो. सालीसकट गर खाल्ला तर त्याची चव वेगळी लागते. गराची गोडी जाते. चवीचे खाणारा असतो तो साल काढून गर तेवढाच खातो. तसे ज्ञान हे अंतर्मनात असते. ते हस्तगत करण्यासाठी अज्ञानाचे पडदे दूर करायला हवेत. अज्ञानासकट ज्ञान हस्तगत करता येत नाही. यासाठी अज्ञान दूर करायला हवे. प्रकाश जिथे आहे तिथे अंधार हा सापडत नाही. तसे ज्ञान जिथे आहे तेथे अज्ञान नसते. फळ कच्चे असताना त्याच्या सालीचा रंग वेगळा असतो. सालीच्या रंगावरून फळाची परिपक्वता समजते. फळ पक्व झाल्यावर सालीचा रंग वेगळा असतो. तसे ज्ञान पक्व झाल्यावर त्या व्यक्तीमध्ये बरेच बदल झालेले दिसतात. त्या व्यक्तीच्या बोलण्यात, वागण्यात एक पक्वता असते. त्याच्या व्यवहारातही फरक जाणवतो. ही पक्वता आल्यानंतर त्याने अज्ञानाची झापड दूर करावी लागते. तरच खऱ्या ज्ञानाचा आस्वाद घेता येतो. अज्ञानामुळे त्या ज्ञानाची गोडी कमी होते. पक्वता आल्यावर फळे सुद्धा आपोआप फुटतात व त्यातून बिया बाहेर येतात. गर बाहेर येतो. पक्वता आल्यावर ज्ञानही बाहेर पडते, पण पक्वता यायला हवी. ज्ञान पक्व व्हायला हवे. तरच अज्ञान दूर होईल. ज्ञानाच्या पक्वतेची जाणीव, तो बोध व्हायला हवा. सद्‌गुरू कृपेने ही पक्वता येते. जाणीव होते. त्याचा बोध होतो. त्या अनुभूतीने अज्ञान आपोआप दूर सारले जाऊन ज्ञानाची वाट सुकर होते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Tuesday, October 29, 2019

भस्मास जागतिक मान्यता मिळावी यासाठी हवे संशोधन


भस्म तयार करण्याची आधुनिक पद्धत आणि पूर्वीच्या काळी असलेली पद्धत या दोन्हीची सांगड या संशोधनात घालण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळी रूढ असलेली पद्धती शास्त्रोक्त होती. त्यामध्ये रसायनशास्त्राचे काही नियम काटेकोरपणे पाळले जायचे.
-  राजेंद्र घोरपडे,  डॉ. डी. एस. भांगे

काळाच्या ओघात अनेक चांगल्या पद्धती लुप्त होताना दिसत आहेत. त्याला अनेक कारणे आहेत. काही आधुनिक पद्धती विकसीत झाल्याने तर काही नैसर्गिक आपत्तीमुळे लुप्त होऊ लागल्या आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर पूर्वी हळद पेवामध्ये साठवली जात असे. ही हळद कित्येक वर्षे टिकून राहायची तसेच त्याचे नैसर्गिक गुणधर्मही टिकूण राहायचे. पण काळाच्या ओघात व नैसर्गिक आपत्तीमुळे पेव आता दिसेनासे झाले आहेत. आधुनिक पद्धतीत किडनाशकांचा मारा केला जातो. तसेच ओलसरपणा राहीला तर हळद काळी पडते. पेवाच्या साठवणूक पद्धतीत ना फवारणी ना ओलसरपणा राहातो. प्राणवायूच राहात नसल्याने जीवजंतूही तयार होत नाहीत. अशी साठवणूक पद्धत आता लुप्त होताना पाहायला मिळत आहे. याचे तोटे आपण पाहातोच आहे. आधुनिक पद्धतीत तो नैसर्गिक स्वाद हळदीत टिकवला जात नाही हे ही तितकेच खरे आहे. आयुर्वेदातील अशाच अनेक पद्धती आता मागे पडू लागल्या आहेत. या मागे पडणाऱ्या आयुर्वेदकीय पद्धतीवर संशोधन करून जागतिक पातळीवर प्रमाणीत केलेल्या औषधांचीनिर्मिती करण्यावर भर देण्याची गरज आहे.

आयुर्वेदात खनिज पदार्थांचा औषधे तयार करण्यासाठी वापर केला जातो त्यास रसशास्त्र म्हणून ओळखले जाते. रस म्हणजे पारा आणि त्यापासून मिळवलेली खनिजे. या खनिजांचा मानवी शरीरासाठी असणारे महत्त्व रसशास्त्रामध्ये विषद केले आहे. तसेच त्याचे मुळ व भस्मामध्ये रुपांतर याचाही त्यामध्ये समावेश आहे. ही पद्धती सुमारे 500 वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये विकसित झाली आहे. पण ही औषधे भारताबाहेर विकली जात नाहीत. युरोपसह अनेक देशांनी त्यावर बंदी घातली आहे. मात्र भारतामध्ये या औषधांचा वापर नियमितपणे केला जातो. तसे त्याचे चांगले गुणही पहायला मिळतात. विशेष म्हणजे ही औषधे योग्य प्रमाणात घेतल्यास त्याचे दुष्परिणामही पाहायला मिळत नाहीत.

भस्मामध्ये लोह, कॉपर, चांदी, शिसे, सोने, जस्त या जड धातूंचा नियमित वापर केला जातो. तर भस्म तयार करण्यासाठी पारा आणि अर्सेनिक यांचा वापर केला जातो. मुख्यतः हे सर्व धातू विषारी आहेत. यामुळेच या औषधांवर अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. यासाठी भस्म तयार करण्याच्या पद्धतीवर संशोधन करून त्याला जागतिक पातळीवर मान्यता मिळवून देण्याची मोठी संधी आहे.

भस्म तयार करण्याची आधुनिक पद्धत आणि पूर्वीच्या काळी असलेली पद्धत या दोन्हीची सांगड या संशोधनात घालण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळी रूढ असलेली पद्धती शास्त्रोक्त होती. त्यामध्ये रसायनशास्त्राचे काही नियम काटेकोरपणे पाळले जायचे. उदाहरण द्यायचे झाल्यास सुवर्णवंग भस्माचे देता येईल. सुवर्ण वंग भस्म तयार करण्याच्या पद्धतीमध्ये पारा (रस), गंधक आणि कथील याचा वापर होतो. हे भस्म कुपीपक्व (बाटलीमध्ये) पद्धतीने तयार केले जायचे. ज्यामध्ये भस्माच्या अन्य घटकामध्ये पारा आणि कथील धातू समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण बाटलीमध्ये भरून साधारणपणे 350 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत तापवले जायचे. अशा पद्धतीने तयार केलेले भस्म एक्‍स रे डिफ्रेक्‍शन आणि एक्‍स रे फ्लोरेसेन्स या रासायनिक पृथ्थकरणाच्या आधुनिक साधनांनी तपासले असता असे आढळले की त्यामध्ये पाऱ्याचे प्रमाण नगण्य दिसून आले. कारण पारा उच्च तापमानास पटकण वायूरूप होऊन निघून जातो. या रासायनिक पद्धतीत पाऱ्याचे कार्य हे कथील विरघळवण्यासाठी आहे. सध्य परिस्थितीत पारा विरहीत सुवर्ण वंग भस्म तयार करण्याच्या पध्दतीस चालना मिळू शकते. कथील विरघळवणारे पदार्थ उपलब्ध असल्याने भस्म तयार करण्याची पद्धती वातावरणासी अनुरूप आणि पारा विरहीत होऊ शकते.

दुसऱ्या एका उदाहरणामध्ये रससिंदूर आणि कज्जलीचा उहापोह करू शकतो. रससिंदूर तयार करताना समप्रमाणात पारा व गंधक घेतले जातात. पारा व गंधकावर वेगवेगळे हर्बल किंवा दुधाचे उपचार केले जातात व नंतर गोठवून गाढे मिश्रण तयार केले जाते. त्याचा रंग काळा असल्यामुळे त्यास कज्जली असेही म्हटले जाते. कज्जलीचे उच्च तापमानास ( 600 ते 650 अंश सेल्सिअस) रससिंदूर किंवा सिंदूरमध्ये रूपांतर होते. सध्या अस्तित्त्वात असलेल्या शास्त्रिय ज्ञानाच्या आधारे आपण असे अपेक्षीत करू शकतो की पारा हा उच्च तापमानास वायू रूप होऊन मिश्रणातून हवेत निघून जातो. तसेच पारा जर हवेत तापवला तर ऑक्‍सिजनबरोबर संयोग पावून त्याची ऑक्‍साईडची संयुगे तयार होतात. यासाठी रससिंदूर तयार करण्याच्या पद्धतीमध्ये कज्जली केळीच्या पानात व बाहेरून चिखलाचा लेप लावून भट्टीत भाजली जाते. त्यामुळे पारा वायूरूप होऊन हवेत उडून जात नाही. तसेच ऑक्‍सिजनशी संपर्क होत नसल्याचे त्याचे संयुगही तयार होत नाही. यामुळे पारा गंधकासोबत (एचजीएस) राहातो. परिणामी रससिंदुर तयार होते. यात असे स्पष्ट होते की पूर्वीच्या काळी निष्क्रिय वातावरणातील अभिक्रिया बंद पध्दतीने घडवून आणण्याचे कसब ज्ञात होते.

भस्म तयार करण्याच्या पद्धतीचा आंधुनिक तत्राने सखोल अभ्यास केल्यास आपणास भस्माच्या तत्कालिन पद्धतीमागच्या रासायनिक क्रिया समजू शकतील. तसेच समकालीन तंत्रज्ञानाची सांगड घातल्यास त्यामध्ये नवनवे बदल करता येतील आणि त्यास जागतिक पातळीवरही नेता येईल. खरंतरं यासाठी भारतात काही प्रयत्नच झाले नाहीत. त्यालाही काही कारणे आहेत. मुख्य म्हणजे भस्म तयार करण्याची प्रक्रिया खुपच मोठी आहे. काही दिवस व काही महिने ही प्रक्रिया करावी लागते. वेळखाऊ तर ही पद्धती आहेच पण त्या बरोबरच महागडीही आहे. कच्चा माल तसेच कज्जली सारखी रासायनिक प्रक्रिया ही महागडी आहे. तर कॅलसिनेशन प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात इंधन लागते. भस्म तयार करण्याच्या पद्धतीत लोह, जस्त, गंधक, चांदी, कॉपर, सोने यांचा वापर केला जातो. तसेच पारा आणि अर्सेनिक सारखे विषारी धातूही भस्माच्या प्रक्रियेत वापरले जातात. जनावरांपासून उपलब्ध होणारे ताजी उत्पादने, हर्बल उत्पादने असा ठराविक कच्चा माल प्रक्रियेसाठी लागतो. ही आवश्‍यक उत्पादने उपलब्ध होऊ शकत नाहीत. यासाठी आवश्‍यक असणाऱ्या पर्यायी पदार्थांचे मुल्पमापन होण्याची गरज आहे.

भस्म तयार करण्याच्या काही पद्धतीचे स्पष्ट शास्त्रोक्त कारण दिले जात नाही. हाच कच्चा माल का वापर जातो किंवा हीच रासायनिक प्रक्रिया का केली जाते. तसेच वेळखाऊ प्रक्रियेबाबतही स्पष्टीकरण दिले जात नाही. तसेच प्रक्रियेच्या प्रमाणीकरणाची कमतरता आणि गुणवत्ता नियंत्रण नसल्याने समजण्यास कठीण जाते. अशा विविध कारणांसाठी भस्मला जागतीक पातळीवर मान्यता देण्याचे संशोधकांपुढे आव्हान आहे. यासाठी यातील प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास होण्याची गरज आहे. नव्या तंत्रज्ञानाने या पद्धतींचा अभ्यास करून याचे प्रमाणीकरण केल्यास निश्‍चितच भस्माला जागतिक बाजारपेठ मिळू शकेल.

संदर्भ - प्रिपरेशन ऍन्ड फिजिओ केमिकल कॅरेक्‍टरायझेशन ऑफ द भस्मा.., यावरील महेश भागवत यांनी सादर केलेला शोधनिबंध


जे माझिया नित्यता । तेणें नित्य ते पंडुसुता ।



एखाद्या कामात नित्यपणा असेल, तर तुमच्या स्पर्धकांवर सुद्धा तुम्ही सहज मात करू शकता. तुमच्या नित्यपणामुळे तुमचा शत्रूही त्रस्त होऊन शत्रुत्व सोडू शकतो. अपयश आले म्हणून थांबायचे नाही. अपयश एकदा येईल, दोनदा येईल, तिसऱ्यांदा यश निश्‍चितच मिळते. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685



जे माझिया नित्यता । तेणें नित्य ते पंडुसुता ।
परिपूर्ण पूर्णता । माझियाची ।। 52 ।। अध्याय 14 वा

ओवाचा अर्थ - अर्जुना, जी माझी नित्यता आहे, त्या नित्यतेनें ते (पुरूष) नित्य आहेत व माझ्याच परिपूर्णतेनें ते परिपूर्ण आहेत.

एखाद्या गोष्टीत पारंगत व्हायचे असेल तर त्याचा ध्यास घ्यावा लागतो. नित्य ध्यासाने त्या गोष्टीत परिपूर्णता साधता येते. झोकून देऊन काम करण्याची वृत्ती पाहिजे. विचारात चांगुलपणा असेल आणि कामात नित्यता असेल, तर यश सुद्धा त्याच्यापुढे लोटांगण घालते. संत गोरा कुंभार यांच्या नित्य ध्यासामुळेच विठुराया त्यांची मडकी वळायचा. सद्‌गुरूंच्या नित्य ध्यासाने सद्‌गुरू मदतीला धावून येतात. कधी ते कुणाची घरकामे करतात, तर कधी ते कुणाचे दळण दळतात. कधी कुणाच्या रथाचे सारथी होतात. सध्याच्या युगात अशा गोष्टी मनाला पटणे कठीण आहे. नव्या पिढीला या गोष्टी समजणे कठीण आहे; पण एखाद्या कामात नित्यपणा असेल, तर तुमच्या स्पर्धकांवर सुद्धा तुम्ही सहज मात करू शकता. तुमच्या नित्यपणामुळे तुमचा शत्रूही त्रस्त होऊन शत्रुत्व सोडू शकतो. अपयश आले म्हणून थांबायचे नाही. अपयश एकदा येईल, दोनदा येईल, तिसऱ्यांदा यश निश्‍चितच मिळते. प्रयत्न सोडायचे नाहीत. क्रिकेटमध्ये प्रत्येक कसोटी सामन्यात फलंदाज शतक ठोकू शकत नाही. काही वेळेला तर तो सतत शून्यावरही बाद होतो, पण परिश्रमाने, प्रयत्नाने त्याच्यात सातत्य येते. नेहमी चांगल्या धावा करण्याकडे त्याचा कल राहतो. खेळाचे जसे आहे तसेच जीवनाचेही आहे. व्यवसायात रोज भरघोस उत्पन्न होईल, असे नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला नेहमीच चांगला भाव मिळतो असे नाही, पण यासाठी शेतकऱ्याने शेती सोडून देणे किंवा व्यावसायिकाने व्यवसाय सोडून देणे योग्य नाही. चुका कशा होतात, का होतात, याचा अभ्यास केला पाहिजे. त्या सुधारता आल्या पाहिजेत. एखादी गोष्ट समजत नाही तर ती मनमोकळेपणाने सांगितली पाहिजे. दुःख व्यक्त केल्याने मन हलके होते. थोडा आधार होतो. कामातील नित्यतुेळे खचलेल्या मनाला पुन्हा उभे करण्याचे सामर्थ्य निर्माण होऊ शकते. ध्यानाचेही असेच आहे ध्यान लागत नाही म्हणून ते सोडून द्यायला नको. त्यात कोणते अडथळे येतात. कोणत्या समस्या आहेत. याचा अभ्यास करून त्या सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रश्‍न सुटले की साध्य कर्म सोपे होते. सततच्या ध्यासानेच नराचा नारायण होतो.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Sunday, October 27, 2019

मग मी संसरेन तेणें । करीन संतासी कर्णभूषणे ।




स्वतःच्या साधनेचा जप स्वतःच्या कानांनी ऐकायला शिकले पाहिजे. म्हणजे मन साधनेवर हळूहळू स्थिर होईल. स्वतःचाच जप स्वतःच्या कानांनी ऐकणे ही कर्णफुले संतांना वाहावीत. 

- राजेेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

मग मी संसरेन तेणें । करीन संतासी कर्णभूषणे ।
लेववीन सुलक्षणें । विवेकाची ।। 18 ।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - मग मी त्या योगाने सांवरेन आणि विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णभूषणें करून ती संतांना घालीन.

साधना करण्यासाठी मनाची तयारी व्हावी लागते. हळूहळू मन साधनेत रमते. शांत जागी साधना करताना मन जर साधनेत लागले तर दूरचे आवाजही स्पष्ट ऐकू येतात. साधनुेळे श्रवणशक्तीत सुधारणा होते. असे साधनेचे अनेक फायदे आहेत. यातील हा एक फायदा आहे, पण दूरच्या या आवाजांनी मन विचलित होऊ देऊ नये. मनाला सोहम्‌च्या ठिकाणीच स्थिर करणे गरजेचे आहे. हळूहळू प्रगती होत राहते. एकदम झटकी पट सर्वच मिळते, असे नाही. सध्याच्या युगात झटपट गोष्टी मिळविण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. लोकांना अशाच गोष्टीत अधिक रस वाटू लागला आहे. जुन्या पिढीत असे नव्हते. जुन्या पिढीत सहनशीलता खूप होती. वृत्तपत्रात आपणास नेहमीच असे वाचायला मिळते कीे कर्जबाजारीपणा आणि अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीतून पिकाचे नुकसान झाले. शेतमाल उत्पादकांमध्ये नैराश्‍याचे वातावरण निर्माण झाले. मालाला दर नाही आणि निसर्गामुळे नुकसान यातूनच काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण युवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर त्याच्या वडिलांची प्रतिक्रिया खूपच बोलकी असल्याचेही काही ठिकाणी पाहायला मिळाले. ते म्हणाले की, सध्याच्या पिढीला झटपट यश मिळविण्याची हाव लागली आहे. 1985 मध्ये त्यांनी एक एकर द्राक्षबागेच्या उत्पन्नातून दीड एकर शेती विकत घेतली होती. असे यश मुलाला कमवायचे होते, पण सध्याची परिस्थिती बिकट आहे. यात असे यश झटपट मिळणार नाही. थोडी सहनशीलता ठेवायला हवी. धीर धरायला हवा. हा विचार आताच्या पिढीत नाही. एक - दोन वर्षाच्या नुकसानीतून इतके निराश होण्याची काहीच गरज नाही. निराशा त्याने बोलूनही दाखवली नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्‍त केली. झटपट श्रीमंत होण्याचा लोभ नव्या पिढीला कसा लागला आहे आणि तो किती धोकादायक आहे, हे यातून स्पष्ट होते. कोणत्याही गोष्टीत धीर धरायला हवा. अध्यात्माचेही तसेच आहे. काय मिळते या साधनेतून...असे म्हणून काहीजण याकडे दुर्लक्ष करतात. तर कित्येक वर्षे काहीच मिळाले नाही म्हणून देवाला नावे ठेवतात. साधनेतून काय मिळते हा प्रश्‍न सर्वांचाच असतो. साधनेत सुद्धा मन सुरवातीला रमत नाही. म्हणून निराश होऊ नये. मन साधनेत कसे रमवायचे, हे समजून घ्यायला हवे. यासाठी स्वतःच्या साधनेचा जप स्वतःच्या कानांनी ऐकायला शिकले पाहिजे. म्हणजे मन साधनेवर हळूहळू स्थिर होईल. स्वतःचाच जप स्वतःच्या कानांनी ऐकणे ही कर्णफुले संतांना वाहावीत.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Thursday, October 24, 2019

जय जय सर्व विसांवया । सोहं भाव सुहावया ।




सद्‌गुरू शिष्याला योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशा दाखवतात. प्रगतीच्या वाटा सांगतात. आध्यात्मिक अनुभव देतात. असे हे सद्‌गुरू जगासाठीही विश्रांतीचे स्थान असतात.

- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685
 

जय जय सर्व विसांवया । सोहं भाव सुहावया ।
नाना लोक हेलावया । समुद्रा तूं ।।2।। अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ - तुम्ही सर्व जगास विश्रांतिस्थान आहात. मी ब्रह्म आहे अशा भावनेस सेवन करविणारे (तुम्ही आहांत) तुम्ही अनेक लोकरूपी लाटांचे समुद्र आहांत, तुमचा जयजयकार असो.

अनुभवाशिवाय बोलू नये, असे म्हटले जाते. नोकरीमध्ये सुद्धा अनुभव पाहिला जातो व त्यानुसार तुमची पात्रता ठरविली जाते. आत्मज्ञानी संतांकडे गेल्याशिवाय, त्यांना भेटल्याशिवाय त्यांच्याविषयी बोलणे हे व्यर्थ आहे. अध्यात्म हे अनुभवण्याचे शास्त्र आहे. अनुभवातून शिकण्याचे शास्त्र आहे. यातूनच येथे प्रगती साधता येते. आत्मज्ञानी सद्‌गुरू शिष्यांना अनुभव देतात. ते मनकवडे असतात. ते भक्तांच्या मनातील इच्छा, आकांक्षा जाणतात. त्यांना भूत-भविष्याचे ज्ञान असते. ते शांतीचे सागर आहेत. त्यांच्या दर्शनानेही मनाला शांती, समाधान वाटते. ते समाधिस्थ झाले, तरीही ते भक्तांना मार्गदर्शन करत असतात. अनुभव देत असतात. भक्तांचे दुःख ते दूर करत असतात. संकटकाळी मनाला त्यांचाच आधार असतो. पुरात सापडलेल्या व्यक्तीला एखादा लाकडी ओंडका मिळाला तर तो तरू शकतो. तो बुडण्यापासून वाचू शकतो. तसे सद्‌गुरू संकटकाळात लाकडी ओंडका होतात. शिष्याला संकटकाळात आधार देतात. त्यांचे जीवन तारतात. संकटात तरलेले भविष्यात फार मोठी कामगिरी करू शकतात. कारण त्यांनी दुःख पचवायला शिकलेले असते. दुःखावर मात करायला ते अनुभवलेले असतात. अनुभवामुळे भविष्यात चुका होत नाहीत. प्रगती होत राहते. वाट सापडते. वेगवेगळे मार्ग सुचतात. सद्‌गुरू शिष्याला योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशा दाखवतात. प्रगतीच्या वाटा सांगतात. आध्यात्मिक अनुभव देतात. असे हे सद्‌गुरू जगासाठीही विश्रांतीचे स्थान असतात. त्यांच्याजवळ आनंद ओसंडून वाहत असतो. खचलेल्या मनात चैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ या आनंदात आहे. सद्‌गुरू शिष्याला त्याची खरी ओळख करून देतात. मी ब्रह्म आहे याचा अनुभव ते सतत शिष्याला देत राहतात. यासाठी त्यांच्या संगतीत जाऊन तो अनुभव घ्यायला हवा. संकटकाळीच लोक देवाकडे जातात पण जे नियमित जातात त्यांना अनुभवाने देवपण प्राप्त होते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Tuesday, October 22, 2019

तेथ सुगरणी उदारे । रसज्ञ आणि जेवणारे ।


गायकास रसिकांची दाद मिळाली, तर त्यालाही स्फुरण चढते. तसे आत्मज्ञानी सद्‌गुरूंकडे ओसंडून वाहणाऱ्या या ज्ञानरसात मनमुराद डुंबणारे शिष्य भेटले, तर तेही तृप्त होऊन जातात. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

तेथ सुगरणी उदारे । रसज्ञ आणि जेवणारे ।
मिळती मग अवतरे । हातु जैंसा ।। 1149 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - जेथें उत्तम स्वयंपाकीण असून जेवणारे भोक्ते मिळाले आहेत, तेथें मग जेवण्यास व वाढण्यास हात जसा पुढें सरसावतो.

सिंहगडावर मिळणारी झुणका - भाकरी कधी खाल्ली आहे का? लोट्यातून दहीही मिळते. त्याची गोडी काही औरच असते. एखाद्याच्या हातचा गुणच वेगळा असतो. प्रत्येकाला ते जमत नाही. एखाद्या ठिकाणचे पदार्थही वेगळ्याच गोडीचे असतात. सध्या धान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याची चवही कशी सुधारता येईल, हेही पाहिले जात आहे; पण या संकरित जाती फार काळ टिकत नाहीत. पारंपरिक जातीमध्ये जे गुण होते ते गुण या संकरित जातीत आढळत नाहीत. यासाठी धान्याच्या पारंपरिक जाती जतन करण्याची गरज आहे, पण या जातींचे उत्पादन कमी असते. यामुळे या जाती नष्ट होत आहेत. सध्या नव्याने अनेक संकरित जाती येत आहेत. जैवतंत्रज्ञानाने तर यामध्ये क्रांतीच केली आहे. उत्पादनवाढीचा उच्चांक गाठणाऱ्या जाती विकसित केल्या आहेत, पण या जाती खाण्यास योग्य आहेत का? याचे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात, याबाबत संशोधकांतही एकमत नाही. बीटी वांगे यामुळेच चर्चेत आहे. वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी उत्पादनवाढीची गरज आहे. 2050 पर्यंत देशाच्या कृषी उत्पादनात 70 टक्‍क्‍यांची वाढ अपेक्षित आहे, म्हणून कशाही प्रकारे उत्पादन घेऊन चालणारे नाही. आरोग्याचीही काळजी आवश्‍यक आहे. उत्पादन वाढीबरोबरच त्याची उत्तमता, प्रत, गोडी तसेच आरोग्यास लाभदायक असे गुण टिकवणे हे आव्हान संशोधकांसमोर आहे. नुसतेच भरघोस उत्पन्न घेऊन चालणार नाही. त्याने समाधान होणार नाही. त्याला गोडीही असेल तरच मागणी राहते. भरघोस उगवते, गोडीही आहे आणि शिजवलेही उत्तम जाते, मग याच्या ग्रहणाने तृप्ती ही निश्‍चितच येणार. मनाला तृप्ती आली की चेहराही तजेलदार होतो. कीर्तनकारास प्रेक्षकांची साथ मिळाली तर, कीर्तन सांगणाऱ्यासही जोर चढतो. गोडीने ऐकणारे असल्यावर सांगणाऱ्यासही गोडी वाटते. संगीताचेही तसेच आहे. गायकास रसिकांची दाद मिळाली, तर त्यालाही स्फुरण चढते. तसे आत्मज्ञानी सद्‌गुरूंकडे ओसंडून वाहणाऱ्या या ज्ञानरसात मनमुराद डुंबणारे शिष्य भेटले, तर तेही तृप्त होऊन जातात. सद्‌गुरूंच्या ज्ञानरसाने शिष्यही तृप्त होऊन जातो. मनाची तृप्ती अनुभवतो. खाणारा आवडीने खात असेल तर भरवणाराही आवडीने भरवतो.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


राजहंस





राजहंसासारखे ओळखायला व टिपायला शिकले पाहिजे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातील फरक, देह आणि आत्मा यातील फरक ओळखायला हवा. हे ज्ञान दृष्टीने जे जाणतात तेच खरे राजहंस.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685


तें परमतत्त्व पार्था । होती ते सर्वथा ।
जे आत्मानात्मव्यवस्था- । राजहंसु ।। 1142 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, असें जें परब्रह्म, तें जे सत्पुरूष, अनात्मा व आत्मा यास विचारानें वेगळे जाणण्यांत राजहंसाप्रमाणे असतात, ते पूर्ण होतात.

दुधात पाणी मिसळले तर दूध पातळ होते, पण राजहंस हा असा पक्षी आहे, जो त्यातील फक्त दूधच पितो व पाणी शिल्लक ठेवतो. इतके चातुर्य त्याच्याकडे आहे. आपणास आवश्‍यक ती गोष्टच तो घेतो. राजहंसाप्रमाणे आपणही या मोहमयी जगातील केवळ चांगल्या गोष्टींचे ग्रहण करायला शिकले पाहिजे. या मोहजालात न अडकता यातून योग्य काय व अयोग्य काय, हे ओळखायला शिकले पाहिजे. यासाठी राजहंसासारखी दृष्टी हवी. मनाच्या स्थिरतेसाठी अशी दृष्टी गरजेची आहे. साधनेत मन रमण्यासाठी स्थिरता ही आवश्‍यक आहे. चांगल्या गोष्टीतून मनाला आनंद होतो. त्या गोष्टीच सतत ग्रहण करत राहिले तर स्थिरता आपोआप येते. दुष्ट विचारांनी मन चलबिचल होते. मनाची चलबिचलता दूर करण्यासाठी सन्मार्गाची सवय लावायला हवी. वाईट आणि चांगले यातील केवळ चांगल्या गोष्टी उचलायला हव्यात. आत्मा व देह वेगवेगळे आहेत. दुधात जसे पाणी मिसळले आहे तसे देहात आत्मा आला आहे. देहापासून आत्मा वेगळा आहे, हे जाणण्यासाठी राजहंसासारखी दृष्टी हवी. देहाचा क्षणभंगूरपणा ओळखायला हवा. आत्म्याचे अमरत्व अनुभवायला हवे. आत्म्याची अनुभूती यायला हवी. सद्‌गुरू त्यांच्या अनुभवातून ही अनुभूती शिष्याला देत असतात. शिष्याने फक्त जागरूक असायला हवे. राजहंसासारखे ओळखायला व टिपायला शिकले पाहिजे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातील फरक, देह आणि आत्मा यातील फरक ओळखायला हवा. हे ज्ञान दृष्टीने जे जाणतात तेच खरे राजहंस. तेच आत्मज्ञानाचे लाभार्थी होतात. तेच त्या परमपदाला पोहोचतात.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।



Monday, October 21, 2019

देह आणि आत्मा





क्षणिक सुखाच्या मागे माणसे धावत आहेत. देहाचा मोह त्यांना असतो. अशा या देहाचा नाश व्हायला क्षणही लागत नाही, पण या देहात आलेला आत्मा हा अमर आहे.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

या देहाची हे दशा । आणि आत्मा तो एथ ऐसा ।
पैं नित्य सिद्ध आपैसा । अनादिपणें ।। 1106 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - या देहाची अशी अव्यवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे की अनादिपणामुळे तो आत्मा स्वभावतः नित्य व सिद्ध आहे.

देहात आत्मा आला आहे, पण तो देहापासून अलिप्त आहे. देह हा पंचमहाभूतापासून बनलेला आहे. यामुळे तो क्षणात नाशही पावणारा आहे. मृत्यूनंतर देहाला अग्नी दिला तर त्याची राख होते आणि उघड्यावर पडला तर तो सडून जाईल किंवा कुत्री, मांजरे, गिधाडे यांचे भक्ष्य होईल. किड्यांचा ढीगही साचेल इतकी वाईट अवस्था या देहाची आहे. यासाठी या देहाचा मोह नको. सौंदर्य सुद्धा टिकून राहात नाही. तारुण्यातले सौंदर्य म्हातारपणापर्यंत तसेच टिकून राहात नाही. यासाठी या सौंदर्याचा गर्व असणेही योग्य नाही. जे टिकत नाही ते टिकवून ठेवण्यात सध्या माणसाची खटपट सुरू आहे. सौंदर्यप्रसाधनावर किती मोठा खर्च होतो, हे सांगण्याची मला गरज वाटत नाही. साबणाच्याच किती जाहिराती दूरदर्शनवर झळकतात ! अमूक एक साबण वापरला तर तुमचा चेहरा अधिक उजळेल. तजेलदार होईल, अशा या जाहिरातींचा प्रचार सुरू असतो. साबणाचा वापर शरीरावरील कीटक, घाण घालवण्यासाठी होतो, ही सांगणारी अपवादाने एखादीच जाहिरात असते. अशा साबणाला मागणीही तितकी कमी असते. खरे तर साबणाचा वापर हा स्वच्छतेसाठी केला जातो. त्याने सौंदर्य क्षणिकच वाढवले जाते, पण आपण त्याच्याकडेच आकर्षित होतो. क्षणिक सुखाच्या मागे माणसे धावत आहेत. देहाचा मोह त्यांना असतो. अशा या देहाचा नाश व्हायला क्षणही लागत नाही, पण या देहात आलेला आत्मा हा अमर आहे. त्याचा नाश होत नाही. त्याला देहाप्रमाणे आकार नाही. त्याचे देहाप्रमाणे प्रकारही नाहीत. काळा, गोरा असा भेदभाव त्यामध्ये नाही. देहात आल्यामुळे तो युक्त नाही, पण तो बद्धही नाही. सृष्टीच्या निर्मितीमुळे तो तयार झाला, असेही नाही किंवा सृष्टीचा विनाश झाला तर तो नाश पावणाराही नाही. त्याचे मोजमापही करता येत नाही. इतका मोठा, इतका लहान, असे वर्णनही करता येत नाही. देहाच्या ठिकाणी असून तो देहापासून अलिप्त आहे. अशा या आत्म्याला ओळखणे म्हणजेच आत्मज्ञानी होणे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 



Sunday, October 20, 2019

ब्रह्मसंपन्नता





सूर्यापासून निघणारी किरणे कधी सोनेरी, कवडशातून कधी लख्ख पांढरी अशी वेगवेगळी वाटत असली तरी ती सर्व किरणे ही एकच असतात. ही किरणे प्रिझममधून गेली तर ती सप्तरंगी होऊन बाहेर पडतात, पण ही सप्तरंगी किरणे ही एकाच किरणापासून तयार होतात. या सातही रंगांत एकच किरण सामावलेला आहे.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

एऱ्हवी तैचि अर्जुना । होईजे ब्रह्मसंपन्ना ।
जैं या भूताकृती भिन्ना । दिसती एकी ।। 1083।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - सहज विचार करून पाहिलें तर अर्जुना, ज्यावेळी या भिन्न आकारांची भूतें एक आहेत असा बोध होईल, त्याचवेळी ब्रह्मसंपन्न होता येईल.

अग्नीतून निघणारी प्रत्येक ठिणगी जरी वेगळी दिसत असली तरी त्या सर्व ठिणग्या एकच असतात. सूर्यापासून निघणारी किरणे कधी सोनेरी, कवडशातून कधी लख्ख पांढरी अशी वेगवेगळी वाटत असली तरी ती सर्व किरणे ही एकच असतात. ही किरणे प्रिझममधून गेली तर ती सप्तरंगी होऊन बाहेर पडतात, पण ही सप्तरंगी किरणे ही एकाच किरणापासून तयार होतात. या सातही रंगांत एकच किरण सामावलेला आहे. प्रत्येक देहात असणारा आत्मा हा वेगवेगळा वाटत असला तरी तो एकच आहे. हे जो जाणतो तोच खरा ज्ञानी. हे जाणणे हेच खरे ज्ञान. आत्म्याला जाणणे म्हणजेच आत्मज्ञानी होणे. हे जो जाणतो तोच ब्रह्मज्ञानी होतो. ब्रह्मसंपन्न होतो. सद्‌गुरू ब्रह्मत्वास स्वरूपाच्या ठायी स्थिर करून, धारण करून, स्वात्मबोधी व ब्रह्मबोधी होतात. ते ब्रह्मबोधाचे सुख, सद्‌गुरू स्वतः आपल्या शिष्याच्या ठायी ओतत असतात. या क्रियेने स्वाभाविकच शिष्य हा गुरूरूप होतो. गुरूचे गुरुत्व हे त्यांच्या आकाराने विसर्जित होऊन शिष्याच्या आकाराने मंडित होते. ब्रह्मसंपन्नता आल्यावर गुरू-शिष्य हा भेद राहात नाही. त्या शिष्यातून ती ब्रह्मसंपन्नता, ते ज्ञान ओसंडून वाहू लागते. यासाठी गुरूंकडून मिळत असलेल्या ज्ञानात, आनंदात डुंबायला शिकले पाहिजे. ते सतत ओतत असलेल्या ज्ञानाचा आस्वाद घ्यायला शिकले पाहिजे. प्रत्येकजण ब्रह्मसंपन्न होऊ शकतो. येथे ना जातीची अट आहे, ना गरिबी-श्रीमंतीचे बंधन आहे. प्रत्येक जीव ब्रह्मसंपन्न होऊ शकतो. फक्त त्याने प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकाला सारखाच हक्क आहे. कोणताही भेदभाव नाही. यासाठी आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायला हवा. ते ज्ञान आत्मसात करायला शिकले पाहिजे. मी एक आत्मा आहे याचा बोध यायला हवा. ज्याने यावर विजय मिळवला तोच आत्मज्ञानी. मनाचा तसा निग्रह करायला हवा. मन यावर स्थिर करायला हवे. जो हे करतो तोच खरा गुरूंचा शिष्य असतो. गुरूकृपेनेच तो ब्रह्मसंपन्न होतो.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Thursday, October 17, 2019

महाशून्य

शून्याची बेरीज व वजाबाकी शून्यच येते. शून्याला भागच नाहीत त्यामुळे त्याचा भागाकार होत नाही आणि गुणाकार केला तर उत्तर शून्यच येते. विचारांचा गुणाकार केला तर विचार पटीत वाढतात, पण विचाराला शून्याने गुणले तर विचार शून्यच होईल. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

नभाचे शून्यत्व गिळून । गुणत्रयातें नुरवून ।
ते शून्यतें महाशून्य । श्रुतिवचन संत ।। 925 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - आकाशाचें शून्यत्व गिळून, सत्त्वादि तिन्ही गुणांचा नाश करून जे शून्य असतें, तेंच महाशून्य होय, अशाबद्दल वेदवचन प्रमाण आहे.

गणितात शून्याला महत्त्व आहे. आलेखात शून्य हा केंद्रस्थानी असतो. शून्यापासूनच चढत्या किंवा उतरत्या क्रमांकाची सुरवात होते. शून्य समही नाही,  विषमही नाही. जीवनात चढउतार असतात, पण स्थिरतेला महत्त्व आहे. शून्य अवस्थेला अध्यात्मात खूप महत्त्व आहे. विचार शून्य व्हायला हवेत. सध्याच्या युगात हे कसे शक्‍य आहे? विचार शून्य व्हायला हवेत म्हणजे विचार थांबायला हवेत. त्यामध्ये स्थिरता यायला हवी. मन स्थिर व्हायला हवे. विचार शून्य कसे होतात? विचार कसे थांबतात? खरे तर विचार हे येतच राहतात. त्यांना थांबवणे अशक्‍य असते. आज यावर विजय मिळवला तर उद्या काय त्याच्याकडून पराभूत झालो. यातून सुख - दुःखे उत्पन्न होत असतात. विजयाने आनंद तर पराभवाने दुःख होते, पण विजय मिळाला म्हणून हुरळून जायचे नाही व दुःखाने खचून जायचे नाही. यासाठी उदास व्हायला हवे. मी कोण आहे? हे जाणणे हाच खरा विजय आहे. आत्मज्ञान प्राप्ती हेच ध्येय असावे. त्यानंतर सर्व आनंदी आनंद आहे. दुःख नाहीच. मनाला या खऱ्या आनंदाची ओढ लावायला हवी. आपल्याकडे अमाप गोष्ट असते तेव्हाच आपण त्यातील थोडी दुसऱ्याला वाटू शकतो. आपल्याकडे अमाप आनंद असेल तरच आपण दुसऱ्याला आनंदी करू शकू. आत्मज्ञानी व्यक्तीकडे आनंद ओसंडून वाहत असतो. त्याच्या ज्ञानातून वाहणाऱ्या या आनंदात डुंबायला शिकायला हवे. मनाला या आनंदाची गोडी लागली की आपोआप स्थिरता येते. विचार शून्य होतात. शून्याची बेरीज व वजाबाकी शून्यच येते. शून्याला भागच नाहीत त्यामुळे त्याचा भागाकार होत नाही आणि गुणाकार केला तर उत्तर शून्यच येते. विचारांचा गुणाकार केला तर विचार पटीत वाढतात, पण विचाराला शून्याने गुणले तर विचार शून्यच होईल. शून्याची ही अवस्था जाणून घ्यायला हवी. त्याची व्यापकता जाणून घ्यायला हवी. आकाशाची पोकळी किती मोठी आहे! अनंत विस्तार असणाऱ्या या आकाशाचे मोजमाप अद्याप कोणालाही करता आले नाही. कारण ते एक शून्य आहे. शून्याचे मोजमापच होत नाही. शून्याचे मोजमाप शून्यच आहे. हे महाशुन्य जाणून घ्यायला हवे. मग विचार आपोआपच शून्य होतील.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 

Wednesday, October 16, 2019

अज्ञानवेली


अज्ञान सुद्धा एक परोपजीवी तणच आहे. यामुळे ज्ञानाची वाढ खुंटते. ज्ञानाची वाढ जोमाने होण्यासाठी अज्ञानाच्या तणाची खुरपणी ही व्हायलाच हवी. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

तया शरीर जे जालें । तें अज्ञानाचें बी विरूढलें ।
तयाचें वित्पत्तित्त्व गेलें । अज्ञानवेली ।। 840 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - त्याला शरीर जे प्राप्त झाले, तें अज्ञानाच्या बीजाचा अंकुर होय, आणि त्याची विद्वत्ता ही अज्ञानाचा वेल होय.

ज्वारीचे बी पेरले की ज्वारीचेच पीक येते. आंब्याचे बी पेरले की, आंब्याचे रोपच उगवते. तसे अज्ञानाचे बी रुचले, की तेथे अज्ञानाचाच वेल उगवतो. ज्याचे आपण बी पेरतो त्याचेच रोपटे उगवते. अफूचे बी पेरल्यावर अफूच उगवणार. यासाठी शेती कशाची करायची, हे आपण ठरवायचे असते. पेरणी ही आपणालाच करावी लागते. ज्ञानाची पेरणी केली की निश्‍चितच तेथे ज्ञानाचे रोपटे उगवेल. तणाचे बी पेरावे लागत नाही, ते आपोआपच उगवते. तणांचा नाश केला तरी शेतात तण हे उगवतेच. असेच अज्ञानाचे आहे. अज्ञानाचे बी एकदा शेतात पडले तर त्याचा फैलाव जोरदार होतो. त्याचा समूळ नाश करावा लागतो. शेतीचे उत्पन्न वाढवायचे असेल तर तणांचा नाश करावा लागतो. शेतातील तणे काढून टाकावी लागतात. तरच पिकाची वाढ जोमदार होते. तणे शेतीतील अन्नद्रव्ये शोषतात. तणांची वाढ जोरात होते, पण ती फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच जमिनीत गाढली तर ती कुजल्यानंतर त्याचे खत होते. याचा उपयोग पिकाच्या वाढीला होतो. यासाठी अज्ञान फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच गाढावे. म्हणजे ते कुजून त्याचे खत होऊन ज्ञानाचे रोप जोमात वाढेल. अज्ञान वाढू न देण्यातच ज्ञानाची प्रगती आहे. काही तणे ही परोपजीवी असतात. यामुळे मुख्य पिकाची वाढ खुंटते. अज्ञान सुद्धा एक परोपजीवी तणच आहे. यामुळे ज्ञानाची वाढ खुंटते. ज्ञानाची वाढ जोमाने होण्यासाठी अज्ञानाच्या तणाची खुरपणी ही व्हायलाच हवी. अज्ञानाचे तण न काढताच खते टाकली तर ज्ञानाच्या पिकापेक्षा अज्ञानाच्या तणांची वाढ जोमाने होईल. पुन्हा त्या शेतात ज्ञानाच्या पिकाची पेरणीही करणे शक्‍य होणार नाही. यासाठी अज्ञानाच्या तणांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Monday, October 14, 2019

संस्कार


एकतर्फी प्रेम, अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध, लग्न न करताच स्त्री-पुरुषांनी एकत्र राहण्याची नवी पद्धत, असे अनेक प्रश्‍न सध्या समाजात भेडसावत आहेत. यासाठी समाजात योग्य संस्कारांची गरज आहे. समाजात शांती नांदावी असे जर वाटत असेल, तर कुटुंब व्यवस्था ही टिकायलाच हवी. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

चित्त आराधीं स्त्रियेचें । स्त्रियेचेनि छंदे नाचे ।
गारुडियाचे । जैसे होय ।। 792 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - ज्या प्रमाणें गारूड्याचे माकड गारूड्याच्या छंदाप्रमाणे वागणारें असतें, तसा जो स्त्रीच्या चित्तानें आराधन करतो व जो स्त्रीच्या छंदाने नाचतो.

सध्या सर्वच क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. स्त्री-पुरुष असा भेदभावही संपला आहे. पुरुषप्रधान संस्कृती आता मागे पडत आहे. आर्थिक संपन्नतुेळे सामाजिक बदलही झाला आहे. चंगळवादी संस्कृती सध्या पाय रोवू लागली आहे. याचा कुटुंब व्यवस्थेला मोठा धोका पोहोचू शकतो. संपन्नतेने शांती येतेच, असे नाही. उलट शांती कमी होताना दिसते. एकतर्फी प्रेम, अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध, लग्न न करताच स्त्री-पुरुषांनी एकत्र राहण्याची नवी पद्धत, असे अनेक प्रश्‍न सध्या समाजात भेडसावत आहेत. यासाठी समाजात योग्य संस्कारांची गरज आहे. समाजात शांती नांदावी असे जर वाटत असेल, तर कुटुंब व्यवस्था ही टिकायलाच हवी. बदलत्या परिस्थितीनुसार स्त्री-पुरुष नातेसंबंधात बदलत होत आहे. किरकोळ कारणांनी मोठे वाद होतात, लगेचच घटस्फोट. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. तू नाही तर लगेच दुसरा किंवा दुसरी, अशी अवस्था आज संसाराची झाली आहे. चंगळवादाने अशा समस्या उद्‌भवत आहेत. तसे पाहता पूर्वीच्या काळीही असे प्रश्‍न होते, पण त्यांचे प्रमाण कमी होते. समाजाच्या चौकटीत अशांना मान नव्हता. त्यामुळे असे प्रकार कमी घडत असत. स्त्रियांच्या प्रश्‍नांवर चर्चाही केली जाते, पण स्त्री-स्वातंत्र्यामुळे उलट त्यांच्या सुरक्षेचाच प्रश्‍न मोठा झाला आहे. बलात्कार, लैंगिक शोषण असे अनेक प्रकार डोके वर काढत आहेत. या प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन विचार करायला हवा तरच हे प्रश्‍न सुटतील. सामाजिक संस्कारांचे महत्त्व जनतेला पटवून द्यायला हवे. धर्माध्ये स्त्रियांवर टीका केली आहे म्हणून तो सोडून देणे योग्य नाही. टीका ही का केली आहे, याचा प्रथम विचार करायला हवा. टीकेमागचा हेतू जाणून घ्यायला हवा. भारतीय संस्कृती मनावर नियंत्रण कसे ठेवायचे, हे शिकवते. यासाठी काही नियम केले आहेत. यामुळे ही टीका मुळात टीका नसून मन नियंत्रणात ठेवण्यासाठी सांगितलेले उपदेश आहेत. स्त्री-पुरुषांनी समाजात वावरताना कोणती कर्तव्य पाळावीत, हे त्यामध्ये सांगितले आहे. हे शांती, समृद्धीसाठी सांगितले आहे. चंगळवादी संस्कृतीवर मात करण्याचे सामर्थ्य या विचारात आहे. यासाठी याचा अभ्यास करायला हवा.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Sunday, October 13, 2019

सन्मार्गाची कास


वाईट मार्गाने कमविलेली संपत्ती फार काळ टिकत नाही. तेव्हा वाईट गोष्टींचा मोह धरू नये. तो टाळणे यातच खरे हित आहे. मोह माणसाला आवरता यायला हवा. यासाठी सन्मार्गाची कास धरायला हवी. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

तरि वाघाचिये अडवे । चरोनि एकवेळ आला दैवें ।
तेणें विश्‍वासें पुढती धांवे । वसू जैसा ।। 763 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - तर वाघाच्या अरण्यांतून दैवयोगानें एक वेळ (सुरक्षितपणे) बैल चरून आला, तर त्या विश्‍वासानें जसा तो बैल पुन्हा त्या अरण्यांत धावतो.

जंगलात गेलेला बैल वाघासमोरून एकदा चरून आला, पण दैवयोगाने वाघाने त्याला कोणतीही हानी पोचविली नाही. यामुळे त्या बैलाचा विश्‍वास बळावला. वाघाबाबतची भीती त्याच्या मनातून गेली व तो बैल पुन्हा तेथेच चरायला गेला. काय झाले असेल? वाघाने त्याचा फरशा पाडला. चोराची एक चोरी यशस्वी झाली की तो लगेचच दुसरी चोरी करण्याचा विचार करतो. त्याला चोरी करण्याचे व्यसन लागते. माणसाचे मनावर नियंत्रण नसते. सतत ते विषयांच्या मागे धावत असते. दहशतवादी कृत्येही अशाच अज्ञानातून वाढत आहेत. एखादे गैरकृत्य पचले की पुढे दुसरा गैरप्रकार करण्याची वृत्ती होते. यातून गैरकारभार करण्याची सवयच लागते. माणूस त्याच्या आहारी जातो. त्याचे मनावर नियंत्रण राहात नाही. सध्या अनेक राजकारण्यांना सुद्धा हीच सवय लागली आहे. एखादा गैरकारभार केला, तो पचला की लगेच दुसरा करायचा. अशाने भ्रष्टाचार वाढला आहे. लोकांना तो आता शिष्टाचार वाटू लागला आहे. नियंत्रण सुटलेले आहे; पण आपण एकदा सापडलो तर कायमचे बाद, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. ठेच लावल्याशिवाय भान येत नाही म्हणतात ना ते हेच ! राजकारणात अशी बाद झालेली अनेक घराणी आहेत. चुकांची सुद्धा एक मर्यादा असते. मर्यादेबाहेर गेल्यावर सुधारण्यासाठीही संधी मिळत नाही. एकदा चुकल्यानंतर ती लगेच सुधारणे व पुन्हा अशी चूक न करणे यातच खरा शहाणपणा आहे, पण तसे होत नाही. ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खायचा नसतो. वाईट सवयीचे व्यसन लगेचच लागते, पण ते जडू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवा. तरच खरे यश संपादन करता येईल. वाईट मार्गाने कमविलेली संपत्ती फार काळ टिकत नाही. तेव्हा वाईट गोष्टींचा मोह धरू नये. तो टाळणे यातच खरे हित आहे. मोह माणसाला आवरता यायला हवा. यासाठी सन्मार्गाची कास धरायला हवी. व्यसन असावे, पण ते चांगल्या गोष्टीचे असावे. वाईटाचे व्यसन हे आपणासाच खाऊन टाकते, हे विसरता कामा नये.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 

Saturday, October 12, 2019

मनोरथांचिया धारसा । वाहणें जयाचिया मानसा ।


पुरात पडलेला भोपळा प्रवाहात वाहत जातो तसे मन भरकटते, पण ते संकल्पावर स्थिर करणे आवश्‍यक आहे. आलेल्या अडथळ्यांवर मात करीत पुढे चालत राहावे. नियोजनबद्ध कार्यक्रम कधीही अपयशी ठरत नाही. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

मनोरथांचिया धारसा । वाहणें जयाचिया मानसा ।
पूरीं पडिला जैसा । दुधिया पाहीं ।। 687 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - पुरात पडलेला भोपळा जसा पाण्याच्या ओघाबरोबर हवा तिकडे वाहात जातो, त्याप्रमाणे मनोरथांच्या ओघानें त्याचें मन भटकत असते, असें समज.

संकल्प, मनोरथ, कशाचा करायचा, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. संकल्पाशिवाय प्रगती होत नाही. तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रयत्न केले जातात. रात्रंदिवस झटतो. मन त्यातच गुंतते. कधी तरी तो पूर्ण होतो. कधी पूर्णही होत नाही; पण आपण पूर्ण होईल, या आशेने त्यामध्ये कार्यरत असतो. मनोरथ पूर्ण झाले नाही, तरी मन समाधानी असावे. आशा सोडायची नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असे समजून त्यामध्ये प्रयत्न करत राहायचे. वादळे ही होतच राहतात. जीवनात चढ - उतार हे येतच असतात. प्रवासात कधी डोंगर आडवा येतो, तर कधी खोल दरी येते, पण प्रवास मध्येच सोडून देता येत नाही. अपेक्षित ठिकाण गाठण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात ही करावीच लागते. वादळ आले तर सुरक्षित जागा शोधावी लागते. यासाठी संकल्प करतात. योग्य ते नियोजनही आवश्‍यक आहे. म्हणजे येणाऱ्या अडचणींवर सहजपणे मात करता येईल. उद्दिष्ठ गाठता येईल. कामात नियोजनाचा अभाव असेल तर, अपयश येण्याची शक्‍यता असते. यासाठी योग्य ती तयारी करणे आवश्‍यक आहे. नुसते प्रयत्न करून चालत नाहीत. नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत राहिल्यास प्रगती होत राहते. निराशा येत नाही. काळजी, भीती वाटत नाही. दूरगामी विचार करून नियोजन करावे म्हणजे संकल्पात येणारे अडथळे कमी होतील. मनाचा दृढ संकल्प हा उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी ठरतो, हे विसरता कामा नये. लक्ष्य साधताना मनाची स्थिरता ही आवश्‍यक आहे. मन भरकटता कामा नये. पुरात पडलेला भोपळा प्रवाहात वाहत जातो तसे मन भरकटते, पण ते संकल्पावर स्थिर करणे आवश्‍यक आहे. आलेल्या अडथळ्यांवर मात करीत पुढे चालत राहावे. नियोजनबद्ध कार्यक्रम कधीही अपयशी ठरत नाही.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Friday, October 11, 2019

गुरूसेवका नांव पहा हो । सूर्य जैसा ।।


 सद्‌गुरू सुद्धा गुरूभक्तच आहेत. तेही या त्यांच्या गुरूंची साधना करत असतात. खरा गुरूभक्त हा सूर्यासारखा असतो. तेजस्वी असतो. त्यांच्यातून तेज ओसंडून वाहत असते. यामुळेच अनेकांच्या जीवनात प्रकाश पडतो. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

आतां गुरूभक्तांचे नांव घेणे । तेणे वाचे प्रायश्‍चित्त देवो ।
गुरूसेवका नांव पहा हो । सूर्य जैसा ।। 674 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - म्हणून आतां गुरूच्या भक्ताचें नामस्मरण करूं व त्या योगाने वाचेस प्रायश्‍चित्त देऊं. गुरूभक्ताचें नाव म्हणजे जणू काय सूर्यच आहे असे समजा.

मानवाच्या स्वभावानुसार भक्तांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. काहींचा स्वभाव सज्जन असतो. काहींचा कपटी असतो. मानवाचा स्वभाव केव्हा बदलेल, त्यांच्या मनात कोणता विचार येईल, हे काही सांगता येत नाही. सद्‌गुरूंना मात्र त्यांच्या भक्तांचे सर्व गुण माहीत असतात. ते सर्व जाणत असतात. ते मनकवडे असतात. भक्तांच्या चुकांकडे ते कानाडोळा करत असतात. असेच काही भक्त सद्‌गुरूंचा वापर चुकीच्या पद्धतीने करून घेत असतात. सद्‌गुरूंच्या अशा स्वभावाचा ते फायदा करून घेत असतात. विद्या घेऊन त्यांच्यावरच उलटतात, असा माज त्या भक्तांना असतो. अशा अज्ञानी भक्तांची लक्षणेही जाणून घेणे गरजेचे आहे. तसे अशा भक्तांविषयी बोलणे म्हणजे वाचेस प्रायचित्त करण्यासारखे आहे. आंबलेले, नासलेले पदार्थ खाल्ल्यानंतर जशी तोंडाची चव जाते तशी या अज्ञानी भक्तांच्या विचारांनी स्थिती होते; पण याचाही अनुभव, माहिती असणे गरजेचे आहे. कारण अज्ञानी लक्षणे जाणता आली तर, आपल्या होणाऱ्या चुका आपल्या लक्षात येतील. चुका जाणून घेणे व त्या सुधारणे हा सुद्धा ज्ञानी होण्याचा मार्गच आहे. चुकातूनच प्रगती साधली जात असते. यासाठी आपल्या चुकांकडे सद्‌गुरू कानाडोळा करत असतात. एक दिवस हा सुधारेल, ही भावना त्यांच्या मनात असते. असेच समजून ते आपणाला मदत करत असतात. प्रेरणा देत असतात. ज्ञानाचा वर्षाव करत असतात. काही चुका या मानवी स्वभावामुळे होत असतात. या चुका सुधारण्यासाठी मानवी स्वभावात योग्य ते बदल घडवून आणण्याची गरज आहे. स्वभाव बदलायला हवा. सद्‌गुरू सुद्धा गुरूभक्तच आहेत. तेही या त्यांच्या गुरूंची साधना करत असतात. खरा गुरूभक्त हा सूर्यासारखा असतो. तेजस्वी असतो. त्यांच्यातून तेज ओसंडून वाहत असते. यामुळेच अनेकांच्या जीवनात प्रकाश पडतो. तेजस्वी गुरूभक्ताच्या तेजाने आपल्यालाही जीवन प्रकाशमान करून घ्यायला शिकलं पाहिजे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 


अधिक वाचा
आंधळे नि हातीं दिवा । घेऊनि काय करावा ।
तरी परमात्मा ऐसें । जें एक वस्तु असे ।
Mouni Maharaj Guru of Raje Shivaji 

Thursday, October 10, 2019

आंधळे नि हातीं दिवा । घेऊनि काय करावा ।

 ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा उपयोग करायला शिकले पाहिजे. नुसते ज्ञान असूनही काही उपयोग नाही. आज अनेकांकडे संगणक आहे. इंटरनेट सुविधा आहे, पण त्याचा वापर कसा करायचा, हेच माहीत नाही. याचा योग्य कामासाठी उपयोग करून घेता येणे आवश्‍यक आहे. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

आंधळे नि हातीं दिवा । घेऊनि काय करावा ।
तैसा ज्ञाननिश्‍चयो आघवा । वायां जाय ।। 626 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेतला, तरी त्याचा त्याला काय उपयोग? त्याप्रमाणें आपल्यास झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवूं शकलें नाही, तर ते ज्ञेयाचे ज्ञान म्हणून जे जे काही ते हेंच असा ज्याचा निश्‍चय असतो त्याचा तो असा निश्‍चय सर्व व्यर्थच जातो.

जगात भौतिक प्रगतीचा वेग प्रचंड आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. शहरात प्रचंड प्रगती होत आहे. ग्रामीण भागातही आता विकासाची चक्रे फिरू लागली आहेत. तंत्रज्ञानाने तेथीलही जीवन बदलवले आहे. प्रगतीच्या वाटा आहेत, पण त्यांना मार्गदर्शन करणारा, त्यांची प्रगती साधणारा असा जिवाभावाचा कोणी साथीदार त्यांच्याकडे नाही. यामुळे विकासात अडथळे येत आहेत. विकासामुळे शहरातील जीवन हे धकाधकीचे झाले आहे, हेही तितकेच खरे आहे. आठवड्याची सुटी आता सुटी वाटत नाही. निवांतपणा हा राहिलेलाच नाही. अनेक कामे बाकी राहिलेलीच असतात. अशाने शांती ही नाहीच. देहाच्या सुखासाठी ही सारी धडपड सुरूच आहे; पण हे सुख क्षणभंगूर आहे, हे लक्षातही घ्यायला वेळ नाही. क्षणिक सुखाच्या मागे धावणारा हा वर्ग आता कायमस्वरूपी सुखापासून दुरावत चालला आहे. अशाने आगामी काळात शांती शोध घेऊनही मिळणे कठीण होईल, असे वाटू लागले आहे. कर्म हे करावेच लागणार आहे. ते चुकणार नाही. टाळताही येणार नाही. स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेतून प्रगती होते, हेही खरे आहे, पण ही स्पर्धा कोणाशी करायची व कशाची करायची, हे समजून घेणे आवश्‍यक आहे. जीवघेणी स्पर्धा ही स्पर्धा नव्हे. सांगण्याचा हेतू इतकाच, की या नव्या युगात आंधळ्यासारखा व्यवहार नको. आंधळ्याच्या हाती दिवा जरी दिला तरी त्याला वाट शोधता येत नाही. त्याला त्याचा उपयोग होत नाही. यासाठी कोणताही व्यवहार करताना, कर्म करताना ते डोळसपणे करावे. म्हणजे योग्य मार्ग सापडतील. तरच खरी प्रगती साधता येईल. ज्ञान आहे पण त्या ज्ञानाचा उपयोग करायला शिकले पाहिजे. नुसते ज्ञान असूनही काही उपयोग नाही. आज अनेकांकडे संगणक आहे. इंटरनेट सुविधा आहे, पण त्याचा वापर कसा करायचा, हेच माहीत नाही. याचा योग्य कामासाठी उपयोग करून घेता येणे आवश्‍यक आहे. उपलब्ध प्रत्येक साधनाचा योग्य वापर करण्याची बुद्धी असायला हवी. दुरुपयोगात स्वतःचेच नुकसान आहे. यासाठी व्यवहारात डोळसपणा हवा.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 

Tuesday, October 8, 2019

तरी परमात्मा ऐसें । जें एक वस्तु असे ।


आत्मा हा अमर आहे. नित्य, अविनाशी आहे हे जो जाणतो, तो खरा ज्ञानी. आत्म्याचे येणे आणि जाणे हे जो जाणतो तो खरा ज्ञानी. या ज्ञानाच्या अनुभवासाठी जो धडपडतो तो खरा ज्ञानी.
- राजेंद्र घोरपडे

तरी परमात्मा ऐसें । जें एक वस्तु असे ।
तें तया दिसे । ज्ञानास्तव ।। 615 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - तर परमात्मा म्हणून जी एक वस्तु आहे, ती ज्या ज्ञानामुळें अनुभवाला येते.

अध्यात्म ज्ञान हे नित्य आहे. बाकीची जी ज्ञाने आहेत, ते सर्व अज्ञान आहे. आत्मा हा अमर आहे. हे जाणणे हेच खरे ज्ञान आहे. आत्मा कायमस्वरूपी आहे. तो कधीही नष्ट होत नाही. नष्ट केला जाऊ शकत नाही. हा नित्य अनुभव ज्याला असतो तो खरा आत्मज्ञानी. संसारात अनेक चांगल्या-वाईट घटना घडत असतात. त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो, पण आत्मज्ञानी व्यक्ती या प्रश्‍नांनी व्यथित होत नाही. संसारातील सुखाने ती कधीही हुरळून जात नाही किंवा दुःखाने ती कधीही निराश होत नाही. इतकी स्थिरता त्याच्या मनामध्ये असते. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार हे येतच असतात. या सर्वांपासून जो विचलित होत नाही, तो खरा ज्ञानी. आत्मा आणि देह हे वेगवेगळे आहेत. आत्मा हा देहात आला आहे, पण तो देहापासून मुक्त आहे. देह नाशवंत आहे. आत्मा हा अविनाशी आहे. आत्मज्ञान प्राप्तीनंतरच आत्मा तृप्त होतो. तोपर्यंत त्याची धडपड सुरू असते. देहात येणे आणि जाणे हे चक्र सुरू असते. जन्म - मृत्यूच्या या चक्रात तो अडकलेला असतो. आत्मज्ञान प्राप्तीनंतर त्याला या चक्रातून मुक्ती मिळते. देह आणि आत्मा वेगळा आहे. हा अनुभव ज्याला आला तो खरा ज्ञानी. आत्मा हा अमर आहे. नित्य, अविनाशी आहे हे जो जाणतो, तो खरा ज्ञानी. आत्म्याचे येणे आणि जाणे हे जो जाणतो तो खरा ज्ञानी. या ज्ञानाच्या अनुभवासाठी जो धडपडतो तो खरा ज्ञानी. सद्‌गुरू कृपेने, भक्तीने जो हे ज्ञान हस्तगत करतो तो आत्मज्ञानी. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर पुन्हा जन्म - मरण नाही. म्हणूनच संतांची समाधी ही संजीवन आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Sunday, October 6, 2019

कर्माचा त्याग



 प्रत्यक्षात राबायचे आपण आणि ते देवाला अर्पण करायचे हे कसे काय शक्‍य होईल? पण नेके या मागचा हेतू जाणून घेणे  गरजेचे आहे. यश मिळाले तर अहंकार वाढू नये व अपयश पदरी आले म्हणून नैराश्‍य येऊ नये, ही यामागची खरी भूमिका आहे. नैराश्‍यामुळे मन खचते आणि यशाचा अहंकार कधी कधी माणुसकीच विसरतो. 

परि हें मिया केलें । कीं हे माझेनि जालें ।
ऐसे नाहीं ठेविलें । वासनोंजीं ।। 526 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - ज्या प्रमाणे हेतूवांचून वायूचा सर्वत्र संचार असतो किंवा सूर्याचें उगवणें असे निरभिमान असतें.

कर्माचा त्याग करायचा म्हणजे नेके काय करायचे, हेच अनेकांना समजत नाही. याचा अर्थ कर्मच करायचे नाही, असा चुकीचा लावतात. दिवस बदलले आहेत. काम केले नाही तर जगणेही मुश्‍कील होईल. अध्यात्मात कर्माचा त्याग म्हणजे नेके काय, याचा खरा अर्थ समजून घेणे आवश्‍यक आहे. दैनंदिन जीवनात कर्म हे करावेच लागते. कर्माचा त्याग म्हणजे जे काही कर्म तुम्ही करता ते सद्‌गुरूंना, भगवंतांना अर्पण करणे. हे कर्म त्यांच्या कृपाशीर्वादाने झाले, असे मानणे. तसा भाव मनात प्रकट करणे. हाच कर्म त्याग आहे. यामध्ये स्वतःचा मी पणा, अहंकार नष्ट होतो. ही या मागची भूमिका आहे, हे जाणून घ्यायला हवे. नव्या पिढीला हे विचार पटणे कठीण आहे. कर्म स्वतः करायचे आणि ते त्यांच्या कृपेने झाले असे म्हणायचे. आपण परिश्रम घ्यायचे आणि ते त्यांना अर्पण करायचे हे कसे शक्‍य आहे? अशामुळेच अहंकार, मी पणा नव्या पिढीत वाढला आहे. पूर्वीचे लोक देवाच्या कृपेला महत्त्व देत. देव कोपल्यानेच यंदा ओला दुष्काळ पडला व त्यामुळे शेतीचे नुकसान झाले, असे लोक म्हणत. एखाद्या वर्षी भरघोस उत्पन्न मिळाले तर ते त्याच्याच कृपेने मिळाले, असे म्हणत. तसे पाहता निसर्गावरच शेतकऱ्याचे जीवन अवलंबून असते त्यामुळे त्यांच्याबाबत हे विचार योग्य वाटतात. ही श्रद्धा योग्य वाटते, पण इतर व्यवहारांत ते शक्‍य वाटत नाही. मनाला पटत नाही. प्रत्यक्षात राबायचे आपण आणि ते देवाला अर्पण करायचे हे कसे काय शक्‍य होईल? पण नेमके या मागचा हेतू जाणून घेणे गरजेचे आहे. यश मिळाले तर अहंकार वाढू नये व अपयश पदरी आले म्हणून नैराश्‍य येऊ नये, ही यामागची खरी भूमिका आहे. नैराश्‍यामुळे मन खचते आणि यशाचा अहंकार कधी कधी माणुसकीच विसरतो. कर्मत्यागामागची ही भूमिका जाणून घ्यायला हवी. तसे पाहता आपला सर्व व्यवहार हा देवाच्या कृपेनेच सुरू आहे. कारण श्‍वास थांबला तर सर्व थांबते. श्‍वास सुरू ठेवण्याची शक्ती आपल्यात नाही. ते चालविणारे दुसरे कोणी तरी आहे, हे विसरता कामा नये. सद्‌गुरू त्यावरच तर नियंत्रण मिळवायला शिकवतात. तेच आत्मज्ञान हस्तगत करायला सांगतात.आत्मज्ञानी व्हायला सांगतात.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Wednesday, October 2, 2019

हे अनाक्रोश क्षमा । जयापाशीं प्रियोत्तमा ।



 प्रकाशाचे वाटप करताना सूर्य याला कमी, त्याला जास्त असा भेदभाव करत नाही. परिस्थितीनुसार प्रत्येकाला असा भेदभाव झाल्याचे वाटते. सद्‌गुरूही प्रत्येक भक्तावर असेच ज्ञानाचा अखंड वर्षाव करत असतात, पण भक्ताला त्याच्या स्थितीनुसार भेदभाव वाटतो. सद्‌गुरू सर्वांना समान लेखतात.
- राजेंद्र घोरपडे

हे अनाक्रोश क्षमा । जयापाशीं प्रियोत्तमा ।
जाण तेणें महिमा । ज्ञानासि गा ।। 352।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - हे प्रियोत्तमा अर्जुना, दांतओठ न चावतां स्वभावतःच असलेली ही क्षमा ज्याच्या ठिकाणी असते, त्या पुरूषाच्या योगानें ज्ञानास मोठेपण प्राप्त होते असे समज.

दुष्टाला शासन हे व्हायलाच हवे. नाहीतर जगात शांतीच नांदणे कठीण होऊन बसेल. दुष्ट कृत्य करणाऱ्यावर वचक हा असायला हवा, पण दुष्टांच्या मनातील दुष्टपणाच काढून टाकता आला तर! माणसांची मने बदलता आली पाहिजेत. कायद्याचा वचक हा हवाच, पण दुष्टांना सुधारण्याची संधी देऊन क्षमाही करायला हवे. अनेक लोक लोभाने, लालसेने भरकटतात. वाट चुकतात. मनावर नियंत्रण न राहिल्यानेही चुका होतात. चुकीचे मार्ग पकडले जातात, पण त्यांच्या चुकांना सुधारण्याची संधी द्यायला हवी. प्रत्येक गोष्ट ही कायद्याने सुटतेच, असे नाही. काही गोष्टी तडजोडीने सोडविल्या जाऊ शकतात. चुकीला शासन हे व्हायलाच हवे, पण त्यांच्याकडून चूक का झाली, याचाही विचार व्हायला हवा. पुन्हा अशा चुका होणार नाहीत, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. कारण या चुका इतरांकडूनही होऊ शकतात. यासाठी दुसऱ्यांकडून ही चूक पुन्हा होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. असे प्रयत्न झाले तर, निश्‍चितच समाजात सुख-शांती नांदेल. नुसते कायदे कडक करून किंवा त्यांच्या कडक अंलबजावणीने सुख-शांती नांदते, असे नाही. एखाद्याने जर स्वतःवर हल्ला केला तर त्याच्यावर प्रती हल्ला करून प्रश्‍न सुटत नाही. तो हल्ला त्याने का केला, याचा विचार व्हायला हवा. समाजातील आर्थिक असमानतुेळे अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. चोऱ्या, दरोड्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. फसवणुकीचे प्रकारही वाढत चालले आहेत. नुसते कायदे करून हे प्रकार कमी होणार नाहीत. या प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन विचार करायला हवा. ही आर्थिक असमानता कशामुळे निर्माण होते, यावर विचार व्हायला हवा. सर्वांना समान अधिकार कसे देता येतील, हे पहायला हवे. प्रकाशाचे वाटप करताना सूर्य याला कमी, त्याला जास्त असा भेदभाव करत नाही. परिस्थितीनुसार प्रत्येकाला असा भेदभाव झाल्याचे वाटते. सद्‌गुरूही प्रत्येक भक्तावर असेच ज्ञानाचा अखंड वर्षाव करत असतात, पण भक्ताला त्याच्या स्थितीनुसार भेदभाव वाटतो. सद्‌गुरू सर्वांना समान लेखतात. दुष्टांनाही ते क्षमा करतात. दुष्टांच्या मनातील दुष्टपणा कसा काढता येईल, यासाठी ते प्रयत्न करतात. सुधारला तर तोही आत्मज्ञानी होऊ शकतो.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।



Tuesday, October 1, 2019

कां कमळावरी भ्रर । पाय ठेविती हळुवार ।



रस शोषताना भुंगा सुद्धा कमळाला इजा होणार नाही, इतक्‍या हळुवारपणे त्यावर पाय ठेवतो. इतकी सात्त्विक वृत्ती त्याच्यामध्ये असते. मग माणसामध्ये ही वृत्ती का वाढू नये? 
- राजेंद्र घोरपडे

कां कमळावरी भ्रर । पाय ठेविती हळुवार ।
कुचंबैल केंसर । इया शंका ।। 247 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - अथवा भ्रमर जसे कमळावर, कमळांतील बारीक तंतु चुरगळतील या शंकेने नाजूक रीतीने पाय ठेवतात.

माणसाच्या मनातील राग, द्वेषातून हिंसा घडते. स्वार्थ, लोभामुळे मन अस्थिर होते. या अस्थिरतेतूनच मन भरकटते. नव्या पिढीत अस्थिर मनामुळे हिंसेचे प्रमाण वाढत आहे. दहशतवाद, नक्षलवाद यासारख्या हिंसक प्रवृत्ती वाढत चालल्या आहेत. समाजातील असमानताही यासाठी तितकीच कारणीभूत आहे. असमातेतून होणारे शोषणाने हिंसक वृत्ती बळावत आहे, पण या हिंसेवर अहिंसेच्या मार्गानेच मात करता येते. सात्त्विक विचारांची बैठक मनातील हिंसक प्रवृत्ती शांत करू शकते. यासाठी समाजात सात्त्विक वृत्ती वाढविण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. धर्माची बैठक ही अहिंसेवर आधारित आहे; पण सध्या धर्मातच हिंसा सांगितली आहे, असे सांगून माणसांची मने भ्रमित केली जात आहेत. यासाठी संतांच्या विचारांचे चिंतन, मनन, अभ्यास करायला हवा. धर्मात कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत, हे जाणून घ्यायला हवे. आत्मज्ञानी संतांचे यासाठी मार्गदर्शन आवश्‍यक आहे. रस शोषताना भुंगा सुद्धा कमळाला इजा होणार नाही, इतक्‍या हळुवारपणे त्यावर पाय ठेवतो. इतकी सात्त्विक वृत्ती त्याच्यामध्ये असते. मग माणसामध्ये ही वृत्ती का वाढू नये? यासाठी प्रयत्नच केला नाही, तर कसे शक्‍य होईल? भरकटलेली मने बदलायला हवीत. मने बदलूनच हिंसेवर विजय मिळवता येईल. भ्रष्टाचारी, गुंड वृत्तीच्या लोकांना शासन हे व्हायलाच हवे, पण त्याबरोबर त्यांच्यातील दुष्ट प्रवृत्तीही नष्ट करायला हवी. मनातील दुष्ट विचार नाहीसे झाले, तर हिंसक घटना निश्‍चितच कमी होतील. समाजात सुख-शांती नांदेल. साधनेसाठीही मन स्थिर असणे आवश्‍यक असते. अस्थिर मनाला अहिंसेच्या विचारांनी स्थिर करायला हवे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।