Friday, January 31, 2020

मुळावर घाव





ज्ञानेश्‍वरीच्या पारायणासोबत साधनाही आवश्‍यक आहे. ज्ञानेश्‍वरी साधनाच करायला सांगते. मनावर विजयी होण्याचा तो उत्तम मार्ग आहे. 
- राजेंद्र घोरपडे

जैसी वरिवरी पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे ।
तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ।। 305 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची वरवरची पालवी खुडून टाकली पण मुळाला पाणी घातले, तर त्या झाडाचा नाश कशा होणार ?

एखादी गोष्ट नष्ट करायची झाल्यास त्याच्या मुळावर घाव घालावा लागतो. वरवर नुसती पाने तोडून काहीच साधत नाही. मूळ जोपर्यंत जिवंत आहे, तो पर्यंत त्या झाडाची वाढ होतच राहणार. पालवी येतच राहणार. मूळ मरत नाही, तोपर्यंत त्यात जिवंतपणा राहणारच. तसेच दोषांचे आहे. दोष नष्ट करायचे असतील तर त्याच्या मुळाशी जायला हवे. तो दोष कसा उत्पन्न झाला, याचा विचार करायला हवा. याचे उत्तर मिळाले तरच तो दोष नष्ट करता येईल. काहींना सिगारेट, तंबाखूचे व्यसन असते. ते सोडायचे आहे, पण सुटत नाही. कितीही प्रयत्न केला तरी ही सवय काही जातच नाही, पण सोडण्याची तीव्र इच्छा मात्र असते. असे का होते? व्यसनातून मुक्ती मिळविण्यासाठी काय करायला हवे, तर या व्यसनाच्या दुष्परिणामांची जाणीव त्याला व्हायला हवी. एकदा का त्याची जाणीव झाली की, हळूहळू व्यसनापासून दूर जाण्याची मानसिकता तयार होऊ लागते. यातच या व्यसनाचा आर्थिक फटका कसा बसतो, याचा विचारही पटवून द्यायला हवा. अरेरे, या व्यसनावर आपण दिवसाला इतके खर्च करतो. महिन्याभरात इतका खर्च यावर होतो. हे व्यसन सुटले तर आपले इतके पैसे वाचतील असे विचार याच कालावधीत त्या व्यक्तीच्या मनावर बिंबवायला हवेत, पण असे करूनही व्यसन सुटतेच असे नाही. कारण या व्यसनाचे मूळ अद्यापही जिवंत आहे. मुळात हे व्यसन कशामुळे लागले, त्याचा शोध घेण्याची गरज आहे. धनसंपन्न असूनही अशी व्यसने असतात. मग पैसा हे कारण नाही, तर मानसिक शांती, समाधान हे त्यामागचे कारण आहे. मन शांत व नियंत्रणात ठेवता यायला हवे. मनातच व्यसन सोडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न व्हायला हवी. यासाठी तणावातून सुरू झालेले हे व्यसन सुटू शकेल. तणावमुक्ती हे व्यसनावरील उत्तम औषध आहे. तणावातून मुक्त होण्यासाठी अध्यात्माची कास धरायला हवी. मनावर नियंत्रण ठेवण्याचे उपाय अध्यात्मात सांगितले आहेत, पण हे पुस्तकी ज्ञान आत्मसात करून मनावर नियंत्रण ठेवता येत नाही. यासाठी ज्ञानेश्‍वरीच्या पारायणासोबत साधनाही आवश्‍यक आहे. ज्ञानेश्‍वरी साधनाच करायला सांगते. मनावर विजयी होण्याचा तो उत्तम मार्ग आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Thursday, January 30, 2020

एकाग्रता मनाची





एकाग्रतेने मन विचलित होत नाही. मनाला या गोष्टीची सवय लागली तर मनाची प्रसन्नता कायम राहते. सदैव मन आनंदी ठेवावे. राग, द्वेष, मत्सर, लोभ नसावा. मन प्रसन्न ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. 
- राजेंद्र घोरपडे

अर्जुना तुझे चित्त । जऱ्ही जाहले द्रवीभूत ।
तऱ्ही हें अनुचित । संग्रामसमयीं ।। 183 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - अर्जुना, तुझे चित्त जरी दयेनें विरघळून गेले, तरी तें तसें होणें या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाही.

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. सीमेवर लढणाऱ्या शिपायाची हीच अवस्था असते. सदैव त्यांना सतर्क राहावे लागते. कोठून गोळी येईल, याचा नेम नाही. डोळ्यांत तेल घालून पहारा करावा लागतो. डोळा जराही लागला तरी काहीही घडू शकते. सतर्कता ठेवावी लागते. जो झोपला, तो संपला. हे जसे सीमेवर पहारा देणाऱ्या शिपायाचे जीवन आहे तसे प्रत्येकाच्या जीवनातही अशी जागरूकता असावी लागते. डोळे उघडे ठेवून काम करावे लागते. गाडी मारणाऱ्या चालकाचा ताबा सुटला तर अपघात घडू शकतो. प्रत्येकाने त्याच्या जीवनात सतर्कता ठेवावी लागते. यासाठीच साधना आहे. ही सतर्कता, जागरूकता ध्यानातून येते. माणसाच्या मनाला यामुळे उभारी मिळते. मन प्रसन्न राहते. सतर्क राहण्यासाठी प्रसन्न असणे गरजेचे आहे. मनाला जर गंज चढला तर तो उतरविणे महाकठीण असते. यासाठी मनाला गंज येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. गंज येऊ नये यासाठी वस्तूला तेल, ग्रीस लावावे लागते. तसेच मनाचे आहे. मनाला गंज येऊ नये यासाठी मन चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवावे लागते. मनाला शांतता ही गरजेची आहे. ध्यानामध्ये मन रमले तर मनाला आनंद मिळतो. मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. एकाग्रतेने मन विचलित होत नाही. मनाला या गोष्टीची सवय लागली तर मनाची प्रसन्नता कायम राहते. सदैव मन आनंदी ठेवावे. राग, द्वेष, मत्सर, लोभ नसावा. मन प्रसन्न ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. दैनंदिन जीवनात असे वागण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला तर प्रत्येकाचे जीवन आनंदाने फुलून जाईल. यासाठी तसे विचार आत्मसात करावे लागतील. विचाराने माणसात बदल घडतो. मनात प्रसन्नतेचा विचार घुसला तर बदल निश्‍चितच घडेल. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मन खचू देता कामा नये. ते प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. मन प्रसन्न राहिले तर जीवनात सहज विजय संपादन करता येऊ शकतो. यासाठीच ध्यानधारणा आहेत.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Friday, January 24, 2020

जन्म लावा सार्थकी





मनाला एकदा जर याची सवय झाली तर सारे जीवनच आनंदी होऊन जाईल. आपल्या वागण्याचा इतरांवरही प्रभाव पडेल. असे वागणे नेहमीच फायद्याचे ठरू शकेल. 
- राजेंद्र घोरपडे

ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसे ।
हे जन्ममरण तैसे । अनिवार जगीं ।। 160 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - अथवा, उदय आणि अस्त हे आपोआप ज्याप्रमाणें निरंतर होत असतात, त्याप्रमाणें जन्ममृत्यू हे जगांत चुकवितां येणारे नाहीत.

जन्माला आल्यानंतर त्याला मरण हे आहेच. प्रत्येक सजीव वस्तूचा हा गुणधर्म आहे. वयोनानुसार त्याची रूपेही बदलणार. ते बदलणे मानवाच्या हातात नाही. हे बाह्यगुण आहेत. सूर्य उगवताना सुंदर दिसतो. मनाला मोहून टाकणारा प्रकाश त्याच्यातून ओसंडून वाहत असतो. त्याच्या ह्या सौदर्यांने मन प्रसन्न होते. लहान मुलेही असेच मनाला आनंद देतात. ती हवीहवीशी वाटतात. त्यांच्यासोबत बागडताना मनाचा थकवा दूर होतो, पण जसजसा दिवस वर येऊ लागतो तसे त्याची धगही जाणवू लागते. उन्हाळ्यात सूर्याची धग असह्य होते. मानवाचेही तसेच आहे. जसेजसे त्याचे वय वाढेल तसे त्याचा प्रपंच वाढत राहतो. अनेक गोष्टींचा त्रास वाढतो, पण त्या सहन कराव्या लागतात. उन्हाची धगही आवश्‍यकच आहे. यामध्ये अनेक कीड, रोग नष्ट होतात, पण ही धग ठराविक मर्यादेतच हवी. तसेच मानवाचे आहे. मानवाच्या रागात अनेकांची मने दुखावली जातात. यासाठी रागाची धग किती असावी, यालाही मर्यादा आहेत. यासाठी नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायला हवा. मन नेहमी आनंदी ठेवायला हवे. धग किती असावी, याचे नियंत्रण आपल्या मनावर अवलंबून आहे. या धगीत दुसऱ्याला त्रास होणार नाही अशी मृदुता असायला हवी, तरच आपण नेहमी आनंदी राहू शकू. मनाला तशी सवय लावून घ्यायला हवी. मनाला एकदा जर याची सवय झाली तर सारे जीवनच आनंदी होऊन जाईल. आपल्या वागण्याचा इतरांवरही प्रभाव पडेल. असे वागणे नेहमीच फायद्याचे ठरू शकेल. मृत्यूनंतरही आपली आठवण इतरांच्या हृद्‌यात कायम राहील. झालेला जन्म यामुळे निश्‍चितच सार्थकी लागेल.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Thursday, January 23, 2020

योग्य तेच स्वीकारा





काशी, मथुरेची वारी करूनही जे हस्तगत होत नाही ते एका जागी शांत बसून ध्यान करण्याने मिळते. प्रत्यक्ष जाऊन नमस्कार करण्याऐवजी मनाने केलेला नमस्कार देवाजवळ लगेच पोहोचतो. यासाठी मनामध्ये तो भाव असायला हवा. 
- राजेंद्र घोरपडे


या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।।126।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - या देहादि प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रुपाने आहे. तत्त्व जाणणारें संत तें ओळखून त्याचेंच ग्रहण करतात.

चांगल्या गोष्टी निवडण्याची सवय हवी. यामुळे सकारात्मक विचारसरणी होते. मनाला नकाराची सवय लागली तर विचारसरणीही नकारात्मक होते. हे नको, ते नको असे करता करता काहीच करायला नको, असा मतप्रवाह होतो. नेहमी नाकारत राहिले तर इतरही तुम्हाला नाकारतात, हे लक्षात घ्यायला हवे. यासाठीच विचार सकारात्मक असायला हवेत. यामुळे मन आशावादी राहते. उत्साही राहते. नकारात्मक विचाराने मन खिन्न, दुःखी होते. निराशवादी बनते. यातूनच मग आत्महत्या घडतात.नव्या पिढीमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. कौटुंबिक वाद, नैराश्‍य, कर्जबाजारीपणा, अपयश ही यामागची कारणे सांगितली जातात, पण आत्महत्या हा जीवनाचा शेवटचा पर्याय नाही. संघर्षय जीवनाची अखेर आत्महत्येत असू नये. धीर सुटता कामा नये. वाळूचे कणही रगडता तेल गळे तसे सतत संघर्ष करत राहिले तर निश्‍चितच त्यात यश मिळते. यासाठी सतत सकारात्मक विचार करत राहायला हवे. आज हे साध्य झाले नाही, पण उद्या ते मी हस्तगत करेन, अशी आशा बाळगायला हवी; पण यासाठी निवडलेला मार्ग हा सत्याचा असेल, हेही विसरता कामा नये. उद्दिष्ट साध्य होत नाही म्हणून अनैतिक मार्ग स्वीकारणे योग्य नाही. अयोग्य मार्ग कधीही योग्य होऊ शकत नाही. त्याची सवय लागते. आज भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे, असे म्हटले जात आहे, पण तो मार्ग शेवटी अयोग्यच आहे. एकदा का त्यात सापडला तर सर्व जीवन निरर्थक होते. यासाठीच मार्ग निवडतानाच योग्य ती काळजी घ्यायला हवी. चुकीचे पाऊल पडले तर वेळीच सुधारायला हवे. मांत्रिक, तांत्रिक काही सोपे मार्ग सांगतात, पण ते मार्ग अयोग्य आहेत. चुकीचे आहेत. अशा गोष्टी ह्या अंधश्रद्धेच्या आहेत. खरा मार्ग कोणता आहे, याचा विचार करायला हवा. खरे संत माणसामध्ये दडलेले चैतन्य स्वीकारतात. त्यालाच परमेश्‍वर मानतात. त्याचाच ध्यास करतात. काशी, मथुरेची वारी करूनही जे हस्तगत होत नाही ते एका जागी शांत बसून ध्यान करण्याने मिळते. प्रत्यक्ष जाऊन नमस्कार करण्याऐवजी मनाने केलेला नमस्कार देवाजवळ लगेच पोहोचतो. यासाठी मनामध्ये तो भाव असायला हवा.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।



Sunday, January 19, 2020

सत्याची कास


अयोग्य गोष्टीपासून चार हात लांब राहायला शिकवणारी, कोणत्याही गोष्टीत धीर खचू न देणारी, अपयशाचा वासही नसणारी अशी आपली संस्कृती आपण का विसरतो आहोत, याचा विचार व्हायला हवा. 
- राजेंद्र घोरपडे

तू अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न सांडिसी ।
तुझेनि नामें अपयशीं । दिशा लंघिजे ।। 8 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - एऱ्हवी तूं अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीस, कधीहिं धीर सोडीत नाहीस, तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडी पळून जावें.

व्यक्तिमत्त्व कसे असावे? व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही जण शिक्षण घेतात. आजकाल त्याची गरज झाली आहे. लोकांशी कसे बोलावे? कसे वागावे? समोरच्या व्यक्तीवर प्रभाव कसा पाडावा? यासाठी शिक्षण दिले जाते. व्यवसायात प्रगती करायची असेल, तर हे सर्व गरजेचे आहे. सर्वच गुण अंगभूत असतात, असे नाही. काही गोष्टी ह्या शिकाव्याच लागतात. सर्वांना या गोष्टी जमतात, असे नाही. पूर्वीचे ग्रंथ पाहिले तर, यामध्ये हेच शिकवले गेले आहे. मनाचे श्‍लोक काय सांगतात? आपणास काय शिकवतात? याचा विचार करायला नको का? मन स्थिर कसे ठेवावे, मनावर नियंत्रण कसे ठेवायचे, हेच तर सांगतात ना. व्यक्तिमत्त्व विकासात याची गरज वाटत नाही का? चांगले शिक्षण, संस्कारच यातून शिकवले जातात ना. मग आजकाल हे श्‍लोक ऐकायला कोठेच मिळत नाहीत? असे का? गणेश उत्सवात, नवरात्रामध्ये कोणते संस्कार शिकवले जातात, याचा विचार करायला नको का? संस्कृती कोणती याचा विचार व्हायला नको का? गणेश उत्सवात, नवरात्र या सणांध्ये असे श्‍लोक शिकवले गेले तर व्यक्तिमत्त्व विकास होणार नाही का? असे वाटत नाही का? मग या गोष्टींचा विचार ज्येष्ठांनी तसेच तरुण पिढीने करायला नको का? योग्य ते संस्कार करण्यासाठी असे सण आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. हे विचारात घ्यायला हवे. पैशाच्या जोरावर दंगामस्ती करणारी आपली चंगळवादी भारतीय संस्कृती नाही हे लक्षात घ्यायला हवे. पैशाचा योग्य विनियोग कसा करायचा, हे आपल्या संस्कृतीत शिकविले जाते. अयोग्य गोष्टीपासून चार हात लांब राहायला शिकवणारी, कोणत्याही गोष्टीत धीर खचू न देणारी, अपयशाचा वासही नसणारी अशी आपली संस्कृती आपण का विसरतो आहोत, याचा विचार व्हायला हवा. जग कितीही बदलले तरी सत्य बदलत नाही. सत्याचा नेहमीच विजय होतो. या सत्याची कास धरायला शिकले पाहिजे, तर केव्हाच आपल्या पदरी अपयश येणार नाही.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Monday, January 13, 2020

नास्तिकवाद




नास्तिकांना आस्तिक करणे अवघड आहे, पण त्यांच्यातील नास्तिकता न स्वीकारने, हे तर आपल्याच हातात आहे यावर एकमत व्हायला हवे. आपोआप बदल होईल.

तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला ।
कीं तेथही पावला । नास्तिकवादु ।। 451 ।। अध्याय 16 वा

ओवीचा अर्थ - तरी माशांच्या लोभानें ब्राह्मण कोळ्यांच्या जातीत शिरला. तों त्या कोळ्यांच्या जातींतही त्याला, असला नास्तिक आम्हांला नको म्हणून घेईनात. याप्रमाणें तो आपल्या जातीस व परक्‍या जातीसही मुकला.

नास्तिक, मग तो कोणत्याही जातीतील असो, शेवटी तो नास्तिकच असतो. पापीच असतो. एखाद्या नास्तिकाने धनाच्या, संपत्तीच्या मोहाने परजातीचा स्वीकार केला, तरी त्या जातीतील लोक त्याचा स्वीकार करतीलच असे नाही. कारण जात बदलल्याने त्याचे नास्तिकपण धुतले जात नाही. त्याने केलेली पापे धुतली जात नाहीत. जागतिकीकरणाने जातीय व्यवस्थेला फारसे महत्त्व राहिलेले नाही. जातपात आता मानली जात नाही, पण सध्याच्या युगात जातीय व्यवस्थेला उच्च - नीच या भेदभावांनी घेरलेले होते. यामुळे जातीय व्यवस्थेचा मूळ उद्देशच नष्ट झाला होता. आपल्या देशात समाजात एकोपा नांदावा, सुख, शांती नांदावी या उद्देशाने जातीय व्यवस्थेची रचना करण्यात आली. यामध्ये उच्च - नीच असा भेदभाव कधीही नव्हता, पण काळाच्या ओघात काही स्वार्थी राजकीय मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी हा भेदभाव निर्माण केला. पैशाच्या लोभाने, लालसेने, स्वार्थी वृत्तीमुळे हा वाद, भेदभाव निर्माण केला. जातीय व्यवस्थाही मुळात सर्वांना समान हक्क देणारी आहे. सर्वांना त्यामध्ये समान वागणूक दिली जात होती. शांतता नांदावी हा मुख्य उद्देश त्यामध्ये होता, पण स्वार्थामुळे हा उद्देशच नष्ट केला गेला. मूळ रचनेत भेदभाव नाही. शांतीसाठी उभारलेल्या गोष्टीमध्ये अशांती कशी असेल ! स्वार्थी मंडळींनी ही अशांती घुसडली आहे, पण आता काळ खूपच पुढे गेला आहे. सध्याच्या काळात वाद निर्माण करणारे हेच आहेत आणि वाट मिटवणारेही हेच आहेत. यामुळेच सत्तेत वारंवार बदल होत आहेत. एखादे नाटक फार काळ टिकत नाही. त्याचाही कालावधी असतो. स्थिर सरकार ही कल्पनाही आता मागे पडली आहे. देशात स्थिर सरकार नांदावे असे वाटत असेल, तर स्वार्थी राज्यकर्त्यांची ही फळी मोडून काढायला हवी, पण याविरुद्ध आवाज कोण उठवणार ? माणसांना सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी माणसे सुधारतील, याची शाश्‍वती देता येत नाही. काही जण सुधारतातही. सर्वच बदलतात, असे होत नाही. मग नेमके याविरुद्ध लढणार कसे? नास्तिकांना आस्तिक करणे अवघड आहे, पण त्यांच्यातील नास्तिकता न स्वीकारने, हे तर आपल्याच हातात आहे यावर एकमत व्हायला हवे. आपोआप बदल होईल.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।



Wednesday, January 8, 2020

एक शिष्य एक गुरू । हा रुढला साच व्यवहारु ।





प्रेमाचे चार शब्दही दुसऱ्याच्या मनातील राग वितळवू शकतात. दुसऱ्याला आनंद देऊ शकतात. यासाठी वक्तव्यात सुधारणा करायला हवी. तशी सवय आपल्याला लावून घ्यायला हवी. 
-  राजेंद्र घोरपडे

एक शिष्य एक गुरू । हा रुढला साच व्यवहारु ।
तो मत्प्रातिकारु । जाणावया ।। 1226 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - एक शिष्य व एक गुरु हा जो संप्रदाय खरोखरच प्रसिद्धीस आला आहे, तो माझ्या प्राप्तीचा प्रकार जाणण्याकरितां आहे.

पहिली गुरू ही आई असते. कितीही थोर व्यक्ती झाली तरी त्याच्या या यशामागे आईचे प्रेम, माया निश्‍चितच कारणीभूत असते. हे प्रेम, माया त्याला यशाच्या शिखरावर नेण्यास कारणीभूत ठरते. जगात सर्व काही विकत मिळू शकते, अगदी प्रेमही विकत मिळते, पण आईची माया, प्रेम विकत घेता येत नाही. ती नशिबानेच मिळते. असे म्हटलेही जाते की, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. आईच्या कुशीत शांती असते. आनंद असतो. गोडवा असतो. हे ज्याला मिळाले तो निश्‍चितच तृप्त झाला. आईच्या संस्कारामुळेच तो थोर होतो. आत्मज्ञान प्राप्तीसाठीही आत्मज्ञानी गुरूची गरज असते. आत्मज्ञानी गुरू हे आईसारखेच असतात. तीच गोडी, तेच प्रेम त्यांच्यातून ओसंडून वाहत असते. त्या प्रेमात, त्या गोडीत समरस व्हायला शिकले पाहिजे. त्यामध्ये मनमुराद डुंबायला पाहिजे. आत्मज्ञानी संतांच्या या प्रेमामुळेच त्यांना आईची उपमा दिली गेली आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्‍वर महाराज यांना माऊली असे म्हटले गेले आहे. संतांची समाधी ही संजीवन असते. त्यांच्या सहवासात प्रेम ओसंडून वाहत असते. यामुळेच सातशे वर्षांनंतरही आळंदीत भक्तीचा मळा आजही जोत फुलतो आहे. या मळ्यात विसावा घ्यायला हवा. त्या कुशीचा अनुभव घ्यायला हवा. माऊली आपल्या मुलाला प्रेमाने समजावते. त्याचे अपराध आपल्या पोटात घेते. त्याच्या चुका सुधारते. संतही असेच असतात. ते भक्ताचे अपराध पोटात घेतात. त्याला कवटाळतात. त्यांच्या या प्रेमानेच भक्तामध्ये आमूलाग्र बदल घडतो. प्रेमाच्या अनुभूतीने भक्ताला आत्मज्ञानाची गोडी लावतात. प्रेमाने युद्धही जिंकता येते. यासाठी बोलण्यात गोडवा हवा. वागण्यात गोडवा हवा. आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला ही गोडी लावायला शिकले पाहिजे. प्रेमाचे चार शब्दही दुसऱ्याच्या मनातील राग वितळवू शकतात. दुसऱ्याला आनंद देऊ शकतात. यासाठी वक्तव्यात सुधारणा करायला हवी. तशी सवय आपल्याला लावून घ्यायला हवी. आत्मज्ञानी संतही शिष्याला प्रेमाने शिकवतात. त्याच्यात बदल घडवितात. यासाठी अशा या संतांच्या सहवास राहायला हवे. त्यांना जाणून घ्यायला हवे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Tuesday, January 7, 2020

दुष्ट विचारच नष्ट करणे अधिक सोयीस्कर


सद्‌गुरू तेच करतात. भक्तांच्या मनात सद्विचारांची बीजे पेरतात. त्याला अंकुर फुटतोच. दुष्टांमध्येही सद्विचारांचा अंकुर फुटतो. मन परिवर्तन होते. यातूनच तो भक्त देवत्वाला पोहोचतो.
- राजेंद्र घोरपडे

तैसा मी एकवांचूनी कांही । तया तयाही सकट नाहीं ।
हे चौथी भक्ती पाहीं । माझी तो लाहे ।। 1397 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - त्याप्रमाणें मग मी एकट्यावांचून दुसरें भिन्न भिन्न कांहीच नाही, (असे जें माझें स्वरूप) त्याच्या ठिकाणी तोच मी आहे अशा ज्ञानानें अनन्य हो.

नव्या पिढीला सतत नामस्मरण,चोवीस तास माळांचा जप या गोष्टी न आवडणाऱ्या आहेत. याची टिंगळ टवाळी या पिढीकडून होत आहे. हे खरे आहे. की, मनाने नमस्कार केला तरी तो देवापर्यंत पोहोचतो. यासाठी देवळात जाण्याचीही गरज नाही. नुसते स्मरण ही सुद्धा देवाची भक्ती आहे. चांगल्या विचारांचा आचार ठेवला तरी त्याला देवत्व प्राप्त होते. वाल्हाने राम...राम...ऐवजी मरा...मरा...असा जप केला तरी त्याच्यावर राम प्रसन्न झाला. पापांचा डोंगर उभा करूनही देव त्यांच्याच पाठीशी आहे. ही कसली भक्ती? देव दुष्टांच्या जरूर पाठीशी असतो, पण त्याचा उद्देश त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा असतो. म्हणूनच वाल्हाचा वाल्मीकी झाला. दुष्टांना मृत्युदंड ही शिक्षा नाही. यामुळे दुष्ट नष्ट होतात, दुष्टत्व संपत नाही. दुष्टत्व हे मनात असते. देव या दुष्टांची मने बदलू इच्छित आहे. मन परिवर्तन हा देवाचा मुख्य उद्देश आहे. दुष्टांच्यातील दुष्टत्व नष्ट करणे, त्याला सदाचारी बनवणे, त्या वाटेवर तो पुन्हा फिरकणार नाही, असा बदल त्याच्यात घडवतो. सद्‌गुरूही हेच करत असतात. दुष्टांचे मन परिवर्तन झाले, तरच खऱ्या अर्थाने शांती नांदेल. मृत्युदंडाच्या शिक्षेने एक दुष्ट मारला जाईल. दोन दुष्ट तुम्ही मारू शकाल. असे किती दुष्ट तुम्ही मारत बसणार. दररोज तोच उद्योग करावा लागेल. यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवावी लागेल. त्यावर मोठा खर्चही होईल. हा खर्च वाढतच जाईल. कारण एकाला मारले की, उद्या तिथे दुसरा कोणीतरी निर्माण होतो. हे न संपणारे चक्र आहे. त्या ऐवजी दुष्ट विचारच नष्ट करणे अधिक सोयीस्कर आहे. सद्‌गुरू तेच करतात. भक्तांच्या मनात सद्विचारांची बीजे पेरतात. त्याला अंकुर फुटतोच. दुष्टांमध्येही सद्विचारांचा अंकुर फुटतो. मन परिवर्तन होते. यातूनच तो भक्त देवत्वाला पोहोचतो. यासाठी केलेली पापे विसरा आणि आता सद्विचारांचा मार्ग धरा. देव तुच्याच पाठीशी आहे. तुमच्यातही देवत्व जागृत होऊ शकते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।



Monday, January 6, 2020

ते शांति पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा ।





सद्विचारांनीच दुष्ट विचारावर नियंत्रण ठेवता येते. यासाठी सद्विचारांची सवय मनाला लावायला हवी. यातूनच मनाला प्रसन्न ठेवता येते. समाधानी मनाने शरीरात शांती नांदते. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

ते शांति पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा ।
तैं ब्रह्म होआवयाजोगा । होय तो पुरुष ।। 1086 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - हे भाग्यवत अर्जुना, ती शांति जेंव्हा संपूर्ण त्याच्या अंगी येते, तेंव्हा तो पुरूष ब्रह्म होण्याला योग्य होतो.

देशात शांती नांदली, तर विकासाला निश्‍चितच प्रोत्साहन मिळते. घरात शांती असेल, तर घरातील वातावरण प्रसन्न राहते. समाधानामुळे प्रगती होते. घरात भरभराट होते. यासाठी मन समाधानी असायला हवे. समाधानानेच शांती येते. लोभ, क्रोध, माया, मोह आदींमुळे शांती लोप पावते. शांतीचा विनाश होतो. यासाठी यावर नियंत्रण ठेवायला हवे, पण ते जमत नाही. सध्याच्या चंगळवादी युगात तर हे आता अशक्‍यच वाटत आहे. प्रत्येक जण लोभी होताना दिसत आहे. स्पर्धेमुळे एकमेकाचे उणेदुणे काढण्यातच समाधान मानले जात आहे. अशानेच शांती लोप पावत आहे. एकमेकामध्ये दुरावा वाढत आहे. यासाठी विचारसरणीच बदलायला हवी. माणसांना बदलता येत नाही. यासाठी आपणच आपल्या प्रगतीसाठी आपल्या विचारात बदल करायला हवा. चांगल्या गोष्टींचा मोह करायला हवा. लोभ करायला हवा. अशाने चांगले विचार आपोआपच मनात उत्पन्न होतील. आपोआपच सत्कर्म घडेल. चांगल्या विचारांची सवय मनाला लावायला हवी. दुष्ट विचार करून स्वतःला व साहजिकच आसपासच्या सर्वांना त्रस्त करण्याऐवजी चांगल्या विचाराने इतरांची मने जिंकायला हवीत. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाच्या आवडी - निवडीही वेगळ्या असतात. काळ - वेळेनुसार आवडही बदलते. घरातच पाहिले तर आईला दोडका तर वडिलांना वांगे, भावाला कारले तर बायकोला मेथी आवडते. स्वतःची आवड याहून वेगळी असते. आवड - निवड सारख्या असणाऱ्या व्यक्तींची मने जुळतात असे म्हणतात, पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. हे क्षणिक असते. प्रत्येकाची विचार करण्याचीही पद्धतही वेगळी असते. मोहाने आवड निर्माण होते. वासनेमुळे त्याला प्रोत्साहन मिळते. वासनेने एकत्र आलेली मने भोगासाठी एकत्र असतात. भोगानंतर पुन्हा दुरावा येतो. यासाठी वासनेवर नियंत्रण ठेवायला हवे. सद्विचारांनीच दुष्ट विचारावर नियंत्रण ठेवता येते. यासाठी सद्विचारांची सवय मनाला लावायला हवी. यातूनच मनाला प्रसन्न ठेवता येते. समाधानी मनाने शरीरात शांती नांदते. शरीरात तसा बदल घडतो. आत्मज्ञानप्राप्तीसाठी हा बदल आवश्‍यक आहे. ठराविक स्थिती प्राप्त झाल्यानंतरच ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Sunday, January 5, 2020

कुंडलिनी जागृती





मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपुरी चक्र, ह्रदयचक्र, विशुद्ध चक्र, तालुचक्र, आज्ञाचक्र (तेजचक्र), ललाट चक्र, सहस्राधार चक्र आदी चक्रांची माहिती करून घेणे गरजेचे आहे. 
- राजेंद्र घोरपडे

कुंडलिनी जागवूनि । मध्यमा विकासूनि ।
आधारादि भेदूनि । आज्ञावरी ।।1038 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - कुंडलिनी जागी करून, सुषम्मा नाडीचा विकास करून व आधारचक्रापासून तो आज्ञाचक्रापर्यंत चक्रांचे भेदन करून

आजकाल कोणत्याही गोष्टीत प्रथम फायदा - तोटा पाहिला जातो. गोष्ट फायद्याची असेल, तर तिचा स्वीकार पटकन्‌ केला जातो. यासाठी अध्यात्माचा फायदा नेमका काय आहे, याबाबत सध्याच्या युगात जागृती करण्याची गरज आहे; पण याचा फायदा मिळायला अनेक वर्षे लागतात. यासाठी तसा त्यागही करावा लागतो. गुरुकृपा झाली तर मात्र पटकन्‌ लाभ होतो, पण यासाठी साधना करावी लागते. नित्य साधनेने आत्मज्ञानप्राप्ती सहज शक्‍य आहे. ध्यान, साधना याचे फायदे काय आहेत, यासाठीच याचे फायदे प्रथम जाणून घेण्याची गरज आहे. फायद्याच्या गोष्टी दिसल्या तर नव्या पिढीला अध्यात्माची गोडी निश्‍चितच लागेल. ध्यानाने मन स्थिर होते. मनातील दुष्ट विचार नाहीसे होतात. त्यावर नियंत्रण बसते. ध्यानधारणेच्या प्रक्रियेत कुंडलिनी जागृतीला महत्त्व आहे. सतत नामस्मरणाने, भक्तीने कुंडलिनी सहज जागृत होते. सद्‌गुरूंनी दिलेल्या मंत्राची नित्य साधना केल्यास गुरुकृपा होऊन कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी जागृतीस शास्त्रीय आधार आहे. विज्ञान युगातील पिढीने हे शास्त्र जाणून घेण्याची गरज आहे. अध्यात्म हे विज्ञानावर आधारित आहे. येथे चमत्कार, जादू यांना थारा नाही. चमत्कार, जादू ही फसवणूक आहे. जे चमत्कार करून दाखवतात, जादू करून दाखवतात ते स्वतःला व इतरांनाही फसवत असतात. यासाठी कुंडलिनी जागृतीचे शास्त्र अभ्यासणे गरजेचे आहे. शरीरातील शक्तिकेंद्रे जाणून घ्यावीत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपुरी चक्र, ह्रदयचक्र, विशुद्ध चक्र, तालुचक्र, आज्ञाचक्र (तेजचक्र), ललाट चक्र, सहस्राधार चक्र आदी चक्रांची माहिती करून घेणे गरजेचे आहे. कुंडलिनी नावाची तेजःशक्ती - निजाशक्ती जेव्हा सर्व दोषांचा नाश करते तेव्हा मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास होण्यास प्रतिबंधक असलेली कारणे नष्ट होऊन त्याला सूक्ष्म व शुद्ध बोधव्य लाभते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।