Friday, December 28, 2018

नैसर्गिक स्वाद



कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा ।
मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ।। 198 ।। अध्याय 3

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यांच्या उपयोगी पडत नाही त्याप्रमाणे हा विचार मूर्खांना रुचणार नाही.

चंद्राचा प्रकाश हा शीतल असतो. त्याचा त्रास होत नाही. त्यामध्ये दाहकता नसते. पूर्वी घराघरांत वीज नव्हती. अशावेळी रात्रीचा हा चंद्राचा शीतल प्रकाश हवाहवासा वाटायचा. पण आता चंद्र उगवतो कधी आणि मावळतो कधी हे सुद्धा लक्षात येत नाही. विजेच्या क्रांतीमुळे चंद्राचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. मानवाला आता त्याची गरज वाटत नाही. कृत्रिम पर्याय उपलब्ध झाल्याने आता नैसर्गिक गोष्टींचे अस्तित्व जाणवेणासे झाले आहे. तंत्रज्ञानाची प्रगती ही कृत्रिम आहे. यामुळे सगळे जीवनच कृत्रिम होत आहे.. भावनाही कृत्रिम होऊ लागल्या आहेत. स्तुतीही कृत्रिम वाटत आहे. यामध्ये जिवंतपणा वाटत नाही. जिवंतपणा हा नैसर्गिक असतो. अंतःकरणातून येतो. तो वरवरचा नसतो. कृत्रिम जिवंतपणा मात्र अद्याप संशोधकांना आणता आलेला नाही. कृत्रिम मानव त्यांनी तयार केला आहे. रोबोट तयार केला आहे. तो माणसाची सर्व कामे करू शकतो. पण त्याला भावना नाहीत. त्याला विचार नाही. त्याला मन नाही. नैसर्गिकपणा नाही. त्यामुळे नैसर्गिक चव काय असते हे नव्या पिढीला अनुभवता येत नाही. कृत्रिम जगाचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला आहे. नैसर्गिक जगाची ओळख नव्या पिढीला करून देण्याची गरज भासू लागली आहे. निसर्गाचा आस्वाद घ्यायला त्यांना शिकवावे लागणार आहे. इतकी ही नवी पिढी कृत्रिम होत आहे. कृत्रिम जगाला नैसर्गिक जगाची ओळख ही एखादा प्रकोप झाल्यानंतरच होते. त्सुनामी, भूकंप, प्रलय, महापूर अशा घटनांतून त्यांना निसर्गाची ओळख होते. निसर्ग त्यांना भयानक वाटू नये यासाठी निसर्गातील गोडी, चव चाखण्याचीही सवय त्यांना लावण्याची गरज भासणार आहे. अध्यात्म हे सुद्धा नैसर्गिक आहे. कृत्रिम नाही. आत्मज्ञान ही सत्‌ पुरुषांना मिळालेली निसर्गाची देणगी आहे. ही नैसर्गिक देणगी त्यांनी अभ्यासाने आत्मसात केली आहे. तसे निसर्गाचा स्वादही नव्यापिढीला आत्मसात करायला शिकवायला हवे. यामुळे निसर्गाचे भय त्यांच्यामध्ये राहणार नाही. निसर्ग जपण्यासाठी त्यांच्यामध्ये जागृती करण्याची गरज आहे. संकरित बियाण्यामुळे आज नैसर्गिक गोडवा नष्ट झाला आहे. ती नैसर्गिक गोडी जपण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिकपणा जोपासायला हवा. कृत्रिम गोष्टी ह्या क्षणिक असतात. विजेची निर्मिती केली जाते. ही वीज क्षणिक आहे. त्याची निर्मिती बंद केल्यानंतर ती आपणास उपलब्ध होऊ शकत नाही. पण चंद्राचा प्रकाश हा नैसर्गिक आहे. कृत्रिम प्रकाशाची झापड डोळ्यावर आल्याने हा प्रकाश आता आपणास दिसेनासा झाला आहे. त्याची गोडीही मनाला भावत नाही. आत्मज्ञानाचेही असेच आहे. कृत्रिम ज्ञानाचा प्रभाव वाढल्यानेच नैसगिक आत्मज्ञानामध्ये रस वाटेनासा झाला आहे. कृत्रिमपणाच्या आहारी गेलेल्यांना या आत्मज्ञानाची गोडी रूचणारी नाही. यासाठी नैसर्गिक गोष्टींचा स्वाद नव्या पिढीस सांगायला हवा.


Thursday, December 27, 2018

विकारांवर उपाय


सांगे श्रवणीं ऐकावे ठेलें । की नेत्रींचें तेज गेलें ।
हें नासारंध्र बुझाले । परिमळु नेघे ।।

धकाधकीच्या जीवनामुळे माणसांची झोपच उडाली आहे. यामुळे अनेक विकार, विकृती मानवामध्ये दिसून येऊ लागल्या आहेत. लहरीपणा, चिडचिडेपणा वाढत चालला आहे. अती आवाजामुळे, ध्वनी प्रदुषणामुळे श्रवणशक्ती कमी होताना आढळत आहे. डोळ्यांना विश्रांती न मिळाल्याने अंधत्व येण्याचे प्रमाणही वाढत आहे. दुर्गंधीमुळे सुगंधाचा वासही नाकाला झोंबू लागला आहे. बदलत्या जीवनशैलीचा हा परिणाम आहे. नियोजनच कोलमडल्याने हे प्रकार वाढत आहेत. पुर्वीच्याकाळी हे विकार उतारवयात होत असत, पण ऐन तारुण्यात वृद्धत्वाच्या विकारांचा सामना नव्यापिढीला करावा लागत आहे. यावर औषध उपचारांचाही परिणाम फारसा दिसून येत नाही. मनाची शांतीच मनुष्य हरवून बसला आहे. यावर उपाय आपल्या संस्कृतीत सांगितले आहेत. पण पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे त्याला हे साधेसोपे उपायही समजेनासे झाले आहेत. अशाने मनाला शांती मिळते. समाधान मिळते. हेच मुळात पटेणासे झाले आहे. पैशाने सर्व खरेदी करता येते याच भ्रमात मनुष्य वावरत आहे. मनशांती ही पैशाने विकत मिळत नाही. ती आपल्याला मिळवावी लागते. योगा, व्यायाम यामुळेही क्षणिक मनशांती लाभते. ताजेतवाने होता येते. पण कायमस्वरूपी मनशांती मिळवायची असेल तर त्यासाठी आपण नियोजनबद्ध जीवनशैली आत्मसात करावी लागते. नियोजनाला जीवनात खूप महत्त्व आहे. या नियोजनात काही काळ हा मनाला विश्रांतीसाठी द्यावा लागतो. दररोज तासभर मनाला शांतीसाठी अध्यात्मात मन रमवायला हवे. त्याचा अभ्यास करायला हवा. त्यामध्ये सांगितलेले साधनेचे उपाय योजायला हवेत. साधनेने मनाचा थकवा दूर होतो. मनाला नवी उभारी मिळते. मनातील विचार शांत होतात. मन प्रसन्न होते. यासाठी साधना ही आवश्‍यक आहे. कमीत कमी पाच मिनिटे तरी साधना करायला हवी. पण यासाठी मानवाला वेळच नाही. शांत बसून मन एकाग्र करायला हवे. मनाची एकाग्रता वाढली की, विचार शक्ती वाढते. मनाला चांगल्या कामाची सवय लागते. चांगले विचार मनात घोळू लागतात. साहजिकच मन प्रसन्न होते. अध्यात्मिक ग्रथांच्या पारायणाने मनाला सतविचारांची सवय लागते. हळुहळु मन त्यामध्ये रमु लागते. शांत झोप लागते. यामुळे होणाऱ्या विकारावर हा एकमेव उपाय आहे. याचा विचार करायला हवा. औषधाने जे साध्य होत नाही ते यामुळे निश्‍चितच साध्य होते. यासाठी प्रयत्न करायला हवा.


Sunday, December 16, 2018

कृषी पर्यटनात येत आहेत नवे ट्रेंड



कोल्हापुरात कृषी पर्यटनासाठी भरपूर संधी आहेत. जिल्ह्याचा विचार करता पश्‍चिम घाटमाथ्यातील वनराई व तेथील पारंपारिक रुढी-परंपरा हा पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे. याचाच विचार करून गेल्या दहा वर्षांत येथे काही शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन विकासासाठी प्रयत्न केले. दसऱ्यानंतर कोल्हापुरात गुऱ्हाळघरे सुरू होतात. ती चार ते पाच महिने चालतात. गुऱ्हाळघरावरील ग्रामीण जीवनाचा आनंद घेण्यासाठी शहरातील तरुणाई येथे आकर्षित होऊ शकते, याचा विचार करून काही शेतकऱ्यांनी याला पर्यटनाची जोड दिली. स्वतःच गूळ निर्मितीचा आनंद घेण्याची संधी काही शेतकरी उपलब्ध करून देतात. हा हंगामी व्यवसाय असल्याने कायमस्वरूपी पर्यटनाची जोड मात्र याला देता येणे अशक्‍य झाले आहे.
 

कणेरी मठावर अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर महाराज यांनी ग्रामीण जीवनाचे चित्र मांडणारी भव्य सृष्टी निर्माण करून एक प्रकारे कृषी पर्यटनास प्रोत्साहन दिले आहे. याचाच आदर्श घेऊन काही शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाला अध्यात्माची जोड देण्याचाही नवा ट्रेन्ड आता विकसित होऊ पाहात आहे. काही निसर्गप्रेमींचाही कृषी पर्यटनाकडे ओढा दिसून येत आहे. कोडोली (ता. पन्हाळा) येथील महेश देशमुख यांनी निसर्ग संवर्धनाच्या छंदाला कृषी पर्यटनाची जोड दिली आहे. जैवविविधता जोपासण्याची जागृती समाजात करण्याच्या उद्देशाने त्यांनी दोन एकरावर नक्षत्र गार्डन विकसित केले आहे. फुलपाखरांचे उद्यानही विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. 

27 नक्षत्रे आणि देवता व त्यांचे वृक्ष अशी कल्पना मांडून त्यांनी उद्यान विकास प्रकल्प राबविला आहे. पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेत आपल्या आवडत्या नक्षत्राच्या ठिकाणी, देवतेच्या ठिकाणी असणाऱ्या वृक्षाखाली साधना करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. वृक्षांची वाढ होण्यास लागणारा कालावधी विचारात घेता त्यांचा हा प्रकल्प सध्या विकसित होण्याच्या मार्गावर आहे. पण त्याच्या या नवा ट्रेंडचा विचार करता पर्यटकांना मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. त्यांनी याबरोबरच पारंपरिक खेळ विटी-दांडू, खो-खो, मल्लखांब, कुस्ती यांचीही संधी उपलब्ध करून दिली आहे. या खेळांबरोबर त्यांची ओळखही नव्या पिढीला व्हावी, निसर्गाची आवडही त्यांच्यात जोपासली जावी असा हा नवा ट्रेंड त्यांनी विकसित करण्याचा ध्यास घेतला आहे.
 

आजच्या धकाधकीच्या जीवनात मनाच्या शांतीसाठी ग्रामीण भागाकडे शहरी लोकांचा ओढा असतो. याचाच विचार करून कृषी पर्यटनाकडे आज अनेकजण आकर्षित होत आहेत. स्वच्छता, पाहुणचार, ग्रामीण जीवनाचा आनंद देऊ शकणारी ठिकाणे कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिह्यात होऊ घातली आहेत. झुणका-भाकरी, खरडा, लोणी, तूप, दही, दुधाचा आस्वाद देत ग्रामीण जीवनाची ओळख करून देण्याचा उद्देश कृषी पर्यटनामध्ये मुख्यत्वे पाहायला मिळतो. कोकणामध्ये सावंतवाडी तालुक्‍यातील चराटे येथे अमृता पाडगावकर यांनी सुमारे बारा एकरावर कृषी पर्यटनाचा प्रकल्प राबविला आहे. सिंधुदुर्गातील काही पर्यटनस्थळांचा आधार घेत त्यांनी ग्रामीण जीवन व कोकणी जेवणाचा आस्वाद व आनंद देणारे असे हे केंद्र विकसित केले आहे. सुरुवातीला त्यांनी दोन रूमवर सुरू केलेला हा प्रकल्प आता विस्तारला आहे. स्वतःच स्वतःच्या हाताने जेवण करा, आमराईत स्वतःच्या हाताने आंबे, काजू तोडा, प्रक्रिया प्रकल्पांना भेट देऊन व्यवसायाची माहितीही घ्या, असे उपक्रम राबवत त्यांनी या पर्यटनाला चालना दिली आहे. कोकणातील संस्कृतीची ओळख करून देत त्यांनी समर फ्रुट फेस्टिव्हलसारखे उपक्रम राबवून पर्यटनासह प्रशिक्षण हा नवा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे.

महाराष्ट्रात कृषी पर्यटन 400 ठिकाणी चालते. पश्‍चिम महाराष्ट्रात सुमारे 100 कृषी पर्यटन केंद्रे आहेत. मराठवाडा व विदर्भ भागात याचे जास्त प्रमाण आहे. कोकणात सुमारे 30 कृषी पर्यटन स्थळे आहेत. सध्या याकडे लोक आकर्षित होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता सध्या पाच ते सात पर्यटन केंद्रे सुरू आहेत व 10 ते 12 केंद्रे नव्याने सुरू होण्याच्या स्थितीत आहेत. शाहूवाडी, पन्हाळा या पश्‍चिम घाटमाथ्याच्या कुशीत कृषी पर्यटनास अधिक संधी उपलब्ध आहेत.
- बी. के. डोंगळे, संचालक,
महाराष्ट्र राज्य ग्रामीण कृषी पर्यटन महासंघ (मार्ट)

Tuesday, December 11, 2018

ज्ञानदेवांची ज्ञानेश्‍वरी


ज्ञानेश्‍वरी तु ज्ञानाचा सागर,
तुझ्या तत्त्वाला विज्ञानाचा आधार
प्रारंभ केले अंधश्रद्धा निमुर्लनाचे कार्य
भूतलावर प्रकट केले विश्‍वाचे आर्त

नको योग. नको देहास यातना,
नको हटयोग, नको मांत्रिकीपना,
भक्तीचा सहजयोग सांगे मना
साधनेतील अवधानाने करी ब्रह्मसंपन्ना

हिचा प्रसाद तो जगावेगळा
दुष्टपणा घालवून करी दुष्टास सज्जन पुतळा
हिच्या आशिर्वादे होई नराचा नारायण
ऐसे अद्‌भुत सामर्थ्य देई सर्व जना

हिच्या वाचनाने आत्मज्ञान लाभे जीवा
हिच्या श्रवनाने मोक्ष लाभे जीवा
मऱ्हाठीचेया नगरी अवतरला हा ब्रह्मदिप
अखंड तेवतो नाथ परंपरेचा हा ज्ञानदिप

विश्‍वाचे आर्त प्रकटले मनी



सदैव सोऽहम.. सोऽहम...नादात
द्र ते अनाथांचे नाथ
दिसले पंचगंगेच्या तिरी
बाहेरुनच झाली नजरा नजरा
पण मनी राहीली ती सदैव आठवण
होत गेली मग मनी प्रेमाची साठवण

पावसच्या निसर्गरम्य वातावरणात
आंबा मोहोराच्या सुवासात
परंपरेच्या कृपेने झाला साक्षात्कार
स्वरुपानंदाच्या संजीवन मंदिरी
नजरा नजर होता त्यांच्या प्रतीमेची
खरी ओळख झाली या नाथांची

पुढे मग मुनींद्र विश्‍वनाथांनी
धाडले मज माधवनाथा चरणी
घ्यावी त्यांची खबर, राहावे स्वागतास
आणावे त्यांना रुकडीत पारायण सेवेस
सांगावे त्यांना आमचा संदेश
परंपरेचे बीज फुलण्या बसावे पारायण सेवेस

विश्‍वनाथांच्या आर्शिवादाने झाला साक्षात्कार
पाटगावच्या मौनीबाबांच्या चरणी झाला चमत्कार
माधवनाथांनी पेरले अध्यात्माचे बीज
बोलले ऐकावा सदैव सोऽहमचा आवाज
करावे ज्ञानेश्‍वरीचे दररोज पारायण
ज्ञानदेव-देवनाथांच्या कृपेने व्हाल ब्रह्मसंपन्न

स्वतःच स्वतःस करावे मग समर्थ
शांती, सुख, संपन्नतेने व्हावे समर्थ
ज्ञानेश्‍वरीचा ध्वज घ्यावा हातात
मग तो साऱ्या विश्‍वात

Saturday, December 8, 2018

टिळा लावला नामाचा....



   टिळा लावला सोऽहम सोऽहम नामाचा
प्रकाश पडला आत्मज्ञानाचा

"सोऽहम', "सोऽहम' च्या नादात
रमले मन अंतरंगात
विसरल्या अंतरिच्या यातना
विसावल्या विषयांच्या भावना
थांबली विचारांची कलकल
उमलले भावशुद्धीचे कमळ

कपाळीचे आज्ञाचक्र झाले जागृत
दगडासम देहीच्या पेशी झाल्या शाश्‍वत
चक्रांचे भवरे उठले पाठीवरती
ते स्थिरावले मग टाळुवरती
नजर झाली नासाग्रपिठी स्थिर
कर्नात गुंजला "सोऽहम' "सोऽहम' स्वर

टिळा लावला सोऽहम सोऽहम नामाचा
प्रकाश पडला आत्मज्ञानाचा


Thursday, December 6, 2018

माती विना शेती



शेती आणि माती हे एक समीकरणच आहे. माती शिवाय शेती होऊ शकते हा विचारही न पटणारा आहे. पण शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी हे करून दाखवले. हे करत असताना त्यांनाही हे शक्‍यच नाही असे अनेकांनी म्हटले. उगाच वेळ आणि पैसा वाया घालवत आहात, असेही म्हटले गेले. पण करण्याची हिम्मत, जिद्द असेल तर यश निश्‍चित मिळते. असेच यश गणपतराव पाटील यांनी मिळवले. त्यांच्या या प्रयोगाविषयी...

गणपतराव पाटील यांची कोंडिग्रे येथे शेती आहे. माळरान, निव्वळ खडकाळ जमीन या जमिनीत शेती करणे महाकठीण होते. पूर्ण अभ्यासानंतर त्यांनी तेथे ग्रीन हाऊन उभारले. द्राक्ष बाग फुलवली. नदी काठची माती आणून त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला. पण मातीसाठीही मर्यादा होती. यातूनच त्यांनी माती विना शेती करण्याचा निर्णय घेतला.

१९९८ साली त्यांनी माती विना शेतीचा प्रयोग सुरू केला. या प्रयोगासाठी त्यांना सुमारे एक लाख कुंड्याची आवश्‍यकता होती. पण इतक्‍या मोठ्या प्रमाणात कुंड्या मिळणार कोठे? हा मोठा प्रश्‍न होता. त्यांनी स्थानिक कुंभारांना विचारले, पण त्यांनी इतक्‍या कुंड्या तयार करणे अशक्‍य असल्याचे सांगितले.
कुंड्यांसाठी माहिती गोळा करत असताना बेळगाव जिल्ह्यातील खानापूरात कुंड्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात, अशी माहिती त्यांना मिळाली. खानापूरला जाऊन त्यांनी चौकशी केली. पण, तेथील कुंभार त्यांना विश्‍वासात घेत नव्हते. शेवटी गणपतराव यांनी त्याच्या या प्रयोगाविषयी कुंभारांना सांगितले. तेव्हा तर त्यांनी हा प्रयोग यशस्वी होणे अशक्‍य आहे, असेच सांगितले. तरीही गणपतराव यांनी जिद्द सोडली नाही. काहीही करून एक दोन कुंभारांना विश्‍वासात घेऊन कुंड्या मिळवायच्याच असे त्यांनी ठरवले. अखेर एक वयस्कर कुंभार महिलेने त्यांच्यावर विश्‍वास दाखवला व कुंड्या देण्याचे कबूल केले. सहा रुपयांना एक कुंडी या प्रमाणे त्यांनी तीन महिन्यात एक लाख कुंड्या देण्याचे मान्य केले. या महिलेने त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने प्रत्येक आठवड्याला चार-पाच हजार कुंड्या देत तीन महिन्यात एक लाख कुंड्या दिल्या. 
माती विना शेती या प्रयोगात माती ऐवजी कोकोपीटचा वापर केला जातो. कुंड्यामध्ये कोकोपीट भरून त्यामध्ये रोपांची लागवड केली जाते. गणपतराव यांनी प्रथम गुलाबाची लागवड यामध्ये केली. ती यशस्वीही झाली. पण या कुंड्यातील रोपांना खते, पाणी देण्यात अडचण होती. ठिबक सिंचन केले होते तरीही योग्य प्रमाणात त्याचा पुरवठा होत नसल्याने रोपांवर याचा परिणाम जाणवत होता. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी गणपतराव यांनी हॉलंडच्या शास्त्रज्ञाची मदत घेतली. या संशोधकाने खत व पाणी नियत्रणात पुरवठा करणारे ईसीपीएच या मशिनची माहिती दिली. हे  मशिन साडेचार लाख रुपयांना होते.
बागेची आवश्‍यकता लक्षात घेऊन गणपतराव यांनी कर्ज काढून ईसीपीएच मशीन खरेदी केले. या मशीनद्वारे पूर्ण नियंत्रणात खते व पाणी कुंडीतील रोपास देता येणे शक्‍य झाले. त्यामुळे उत्पादनावर याचा मोठा परिणाम जाणवला. माती विना शेतीमध्ये गुलाबाच्या उत्पादनात मिळालेले यश पाहून गणपतराव यांनी जरबेरा व सिमला मिरचीच्या लागवडीचाही प्रयोग सुरू केला व त्यात मोठे यशही मिळवले. 
सेंद्रिय खत वापरास प्रोत्साहन
दत्त कारखान्याच्या कार्यक्षेत्रात माती परीक्षण केंद्र आहे. कारखान्याकडूनही माती परीक्षण करण्यात येते. त्यानुसार रासायनिक खतांचा वापर होत होता, पण उत्पादनात फारसा फरक जाणवत नव्हता. उलटे उत्पादनात घटच होताना आढळत होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गणपतराव यांनी कृषी अधिकारी, ऊस विकास अधिकारी, तज्ज्ञ यांची बैठक बोलावली. या वेळी माती परीक्षणाचे अहवाल निरखून पाहताना, असे लक्षात आले की मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अत्यल्प आहे.
काही ठिकाणी ०.३० टक्के इतके कमी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असल्याचे आढळले. प्रत्यक्षात पाच टक्के इतके सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मातीमध्ये असायला हवे असते, पण तितके नसल्याने याचा परिणाम निश्‍चितच उत्पादकतेवर होत होता. कमीत कमी एक ते दोन टक्के तरी सेंद्रिय कर्ब जमिनीत असायला हवे. यासाठी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने गणपतराव यांनी साखर कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न केले. पाचट कुजवणे, हिरवळीची खते, ताग ढेंच्या याचा वापर करण्यात शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यानंतर आता या भागातील शेतीमध्ये एक टक्‍क्‍यांच्यावर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण गेले आहे. या प्रयोगामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. शेणखताचा वापरही वाढवला आहे. देशी गायीच्या गोमूत्राचा वापर करण्यासही काही शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. यामुळे काही ठिकाणी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तीन टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. याचा फायदा असा की पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढली आहे. कमी पाणी झाले, जास्त पाणी झाले तरीही पिकाच्या वाढीवर याचा फारसा परिणाम होत नाही. असे निदर्शनात येत आहे.
या चळवळीला प्रोत्साहन मिळण्यासाठी गणपतराव यांनी सेंद्रिय उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस प्रथम गाळप करण्याचा निर्णय घेतला. यंदा दोन दिवस सेंद्रिय ऊस गाळप करण्यात आले. यातून सेंद्रिय साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. साखरेचे उत्पादन घेताना यामध्ये गंधकाचा वापरही केला नाही. फक्त चुन्याचा वापर केला आहे.
ग्रीन हाऊसमध्ये मातीवर केलेल्या लागवडीतून मिळालेल्या उत्पादनापेक्षा माती विना शेतीमध्ये मिळालेले उत्पादन हे २० टक्‍क्‍यांनी अधिक आहे. पण माती विना शेतीला मर्यादा आहे. फक्त गुलाब, जरबेरा, सिमला मिरची यांचेच उत्पादन आपण यामध्ये घेऊ शकतो. तसे छोट्या प्रमाणात गच्चीवर भाजीपाला व इतर फळ पिके घेतली जाऊ शकतात. पण मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन घेणे अशक्‍य आहे. यातून हवा असलेला नफाही मिळवणे शक्‍य नाही.
- गणपतराव पाटील, 

चेअरमन, दत्त साखर कारखाना, शिरोळ 
जरबेरा
 एका वर्षात एका स्केअर मीटरमध्ये - २५०  फुले 
 त्यासाठी लागणारा खर्च - १ रुपये ८० पैसे
 फुलांची विक्री - ३ रुपये
गुलाब
 एका वर्षात एका स्केअर मीटरमध्ये - १५०  फुले 
 त्यासाठी लागणारा खर्च - १ रुपये ९० पैसे
 फुलांची विक्री - ३ रुपये
कोकोपिट
 चेन्नई, बंगळुरू येथून विकत घेतले जाते. 
 सरासरी नऊ रुपये किलो दराने मिळते.
 

Wednesday, December 5, 2018

ब्रह्मीचें स्वराज्य


तैसें रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मीचें स्वराज्य आलें ।
तो भोगी सुख आपुलें । आपणचि ।। 271 ।। अध्याय 3 रा

ओवीचा अर्थ - तसे कामक्रोध जर निःशेष गेले, तर ब्रह्मप्राप्तिरूप स्वराज्य मिळाले असे समज. मग तो पुरूषच आपणच आपलें सुख उपभोगितो.

ब्रह्मसंपन्नता मिळावी ही साधना करणाऱ्या प्रत्येक साधकाची अपेक्षा असते. तो मज भेटावा, तो मिळावा, त्याची अनुभूती यावी असे मनोमन प्रत्येकाला वाटत असते. तसे ते प्रत्येक साधकाचे स्वप्न असते. या स्वप्नात तो जगत असतो. पण हे कसे हस्तगत होते ? यासाठी कशाची गरज असते ? हे मात्र माहीत नसते. ते जाणून घेण्याचा प्रयत्न साधक करत असतो. हळूहळू ही प्रक्रिया घडत असते. पण त्यासाठी दृढसंकल्प, मनाची तयारी ही हवी असते. मनात राग उत्पन्न होऊ नये. कोणाचाही द्वेष आपल्याकडून होऊ नये. असा बदल आपल्यात घडवावा लागतो. हा दृढसंकल्प केला आणि तो पाळला तर ब्रह्म मिळण्याची वाट सुकर होते. राग येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. राग दाबून मनातील राग घालवता येत नाही. यासाठी मनमोकळे करावे लागते. मनाला राग येऊ नये यासाठी मौन व्रत हा एक उपाय आहे. कोणी रागाने बोलले तर त्यावर मौन पाळायचे. त्याकडे दुर्लक्ष करायचे. प्रतिक्रियाच द्यायची नाही. दुसऱ्याने व्यक्त केलेल्या रागाने आपले मन बिघडणार याची काळजी घ्यायची. हसतमुखाने त्याच्या रागाचा स्वीकार करायचा. एखाद्या घटनेत आपणासही राग येतो. त्यावेळी आपण तो राग व्यक्त करायचा नाही. मनाला आवर घालायची. मनात राग उत्पन्न होणार नाही, याची काळजी घ्यायची. तसा बदलच आपल्या स्वभावात करून घ्यायचा. आपणच आपल्यात हा बदल घडवायचा आहे. हा बदल घडविता आला तर, आपणाला आपल्या मनाची स्थिरता साधता येणे सहज शक्‍य होणार आहे. राग-द्वेष नाहीसे झाले तर, मनाची स्थिरता सहजच साधता येते. मन स्थिर झाले की साधनेतही स्थिरता साधता येते. साधनेत मन रमण्यास मदत होते. यासाठी स्वतःच्या मनातील राग-द्वेष यांचा त्याग करायला हवा. छोट्या छोट्या गोष्टीतून होणारी मनाची चिडचिड दूर करायला हवी. एखाद्या गोष्टीत स्वतःचे मन गुंतवायला हवे. त्यात इतके गढून जायला हवे की मग राग-द्वेषाचा विसर पडायला हवा. राग आल्यानंतर लगेच मन दुसऱ्या कामात गुंतविण्याचा प्रयत्न करावा. अशाने मनातील द्वेष सहज दूर होतो. रागाचा विसर होण्यासाठी आपल्या आवडत्या कामात लगेच मन रमवायला शिकावे. यातून सहजच राग नाहीसा होतो. आपण राग आणि द्वेषावर नियंत्रण मिळवू शकलो तर साधनेत मन रमवू शकू. साधनेत त्याचा बोध निश्‍चितच होऊ लागेल. साधना करताना राग-द्वेष याची मनात कालावाकालव सुरू असते. अनेक विचार डोळ्यासमोर घोंघावत असतात. यातून मन बाजूला काढून मन सो ऽ हम मध्ये गुंतवायला हवे. सो ऽ हमचा स्वर मनाने, कानाने ऐकायला हवा. यासाठी मनाची स्थिरता साधायला हवी. हे मिळवता आले तर ब्रह्मीचे स्वराज्य सहज हस्तगत होते.

Sunday, December 2, 2018

जिवाच्या वाढीची मर्यादा



म्हणौनि ब्रह्मेशानापरौतें । वाढणें नाहीं जीवातें ।
तेथूनि मग वरौतें । ब्रह्मचि कीं ।। 203 ।। अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ - म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पलीकडे जीवांना वाढणे नाहीं. मग तेथून तर केवळ ब्रह्मच आहे.

विश्‍वातील प्रत्येक गोष्टीला काही - ना - काही मर्यादा आहे. जिवांची वाढ किती होते हे त्यातील जनुकीय घटक ठरवतात. उत्पादित धान्याची चव, वास, रूप हे त्यात आढळणाऱ्या जनुकीय संरचनेवर आधारित असते. जनुकीय संरचनेत बदल करून सुवासिक जातीची धान्ये तयार करता येतात. पण त्यालाही मर्यादा असते. मर्यादे पलीकडे जाऊन काही करता येत नाही. कमाल मर्यादा गाठण्याचा संशोधकांचा प्रयत्न असतो. झाडाची उंचीही त्या झाडाचे जनुकीय घटक ठरवतात. वडाच्या झाडाचा विस्तार कितीही मोठा असला तरी त्यालाही काही मर्यादा आहेत. एखाद्या वस्तूकडे एक टक पाहणे किती वेळ शक्‍य असते. श्‍वास रोखून धरणे, किती वेळ शक्‍य असते किंवा आपणास उभे राहणे किती काळ शक्‍य आहे. मर्यादा पाहूनच हे सर्व करावे लागते. मर्यादेपलीकडे जाऊन काहीच करणे शक्‍य नसते. तसेच अध्यात्माचे आहे. ब्रह्मदेव आणि शंकर ही देवत्वाची कमाल मर्यादा आहे. त्यांच्या पलीकडे जिवांची वाढ नाही. ब्रह्माचा साक्षात्कारानंतर केवळ आणि केवळ ब्रह्मच आहे. ब्रह्माच्या पलीकडे वाढ नाही. ही कमाल मर्यादा आपणास गाठण्याचा प्रयत्न करायचा आहे. साधक आणि संशोधक हे सारखेच आहेत. संशोधक त्याच्या शोधातील कमाल मर्यादा शोधत असतो. सर्वप्रकारे, सर्वदिशांनी त्याचा अभ्यास सुरू असतो. सखोल ज्ञान शोधण्याचा त्याचा प्रयत्न असतो. साधकानेही हेच करायचे आहे. ब्रह्मज्ञानाचा सखोल अभ्यास करायचा आहे. ते मिळविण्यासाठी आवश्‍यक सर्व पायऱ्या अभ्यासायच्या आहेत. ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर आता पुढे जाणणे नाही. कारण जाणण्यासाठी काही शिल्लकच राहात नाही. ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे. जिवाची वाढ ही तेथे पर्यंतच आहे. त्यापुढे जिवाची वाढ नाही. हे जाणून घेण्यासाठी साधकाने संशोधकवृत्ती अंगी जोपासायला हवी. अंतिम ध्येय गाठेपर्यंत शोध हा सुरूच ठेवला पाहिजे. संशोधनातून आपला विकास साधायचा आहे. चांगल्या झाडाच्या फांद्यातूनच नवी झाडे पुन्हा रुजवली जातात. ब्रह्मज्ञानाचा विस्तारही असाच आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीकडूनच ब्रह्मज्ञानाचा विस्तार होतो. यासाठी जीवनाचे अंतिम सत्य शोधण्याचा प्रयत्न साधकाने करायला हवा. ब्रह्माच्या अनुभूतीतून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायला हवी. याच्या अभ्यासात सातत्य ठेवले, तर ते सहज शक्‍य आहे. दृढनिश्‍चयाने जीवनाचे अंतिम ध्येय गाठायला हवे. त्या पलीकडे जगाचा विस्तार नाही. हे जाणून घेऊन जीवन सार्थकी लावायला हवे. ध्येय असावे सुंदर त्यातच चालत राहावे. असा जीवनाचा प्रवास हवा. तरच आनंदी जीवनाचा आस्वाद चाखायला मिळेल.