Thursday, April 30, 2020

पक्षी सुद्धा विचार करतो, पण माणूस...


अहिंसेचा विचार मागे पडत आहे. अहिंसेच्या विचारावर आधारित नियोजनच केले जात नाही. हा विचार कालबाह्य मानला जात आहे. पण जीवन चक्रच खंडित केले जात असल्याने भावी काळात अनेक समस्या उत्पन्न होणार आहेत.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

देखे उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबे जैसा ।
सांगे नरु केवीं तैसा । पावे वेगां ।। 41 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 3 रा

ओवीचा अर्थ - हे पाहा, ज्याप्रमाणें पक्षी उड्डाणाबरोबर फळाला बिलगतो त्याप्रमाणें मनुष्याला त्या वेगानें ते फळ कसे प्राप्त करुन घेतां येईल ? सांग बरे.

पूर्वीच्या काळी प्रत्येक गोष्टीची बारीक निरीक्षणे केली जात होती. पक्ष्यांचे गुण काय आहेत? तो कसा वागतो? तो कसा बोलतो? तो कसा चालतो? तो कसा विचार करतो? तो कोठे राहातो? तो कसा राहतो? स्वतःचे स्वतः कसे उपचार करतो? समुहाने राहतो की एकटा राहातो? त्याचे स्थलांतर? आदी सर्व गोष्टींचा अभ्यास केला जात होता. अशा या निरीक्षणातूनच पक्षांचे संरक्षण व पिकाचे पक्षांपासून संरक्षण यावर उपाय निश्‍चित केले होते. जगा व जगू द्या हा विचार जोपासला जात होता. आता हा विचार मागे पडला आहे. पिकांचे पक्षांपासून संरक्षण करताना गोफण वापरली जायची. शेतात बुजगावणे उभे केले जायचे. हे उपाय हे निरीक्षणातूनच शोधले गेले होते. यामध्ये पक्षाला कोठेही इजा होणार नाही याची दक्षता घेतली गेलेली आढळते. गोफणीने फक्त पक्षी हुसकावून लावले जायचे. पक्षी पिकांकडे येणार नाहीत यासाठी बुजगावणे उभारले जायचे. काही ठिकाणी गोंगाट केला जायचा. आवाजामुळे पक्षी पळून जावेत हा त्यामागचा उद्देश होता. ढोल, टिमकी वाजवली जायची. यामध्ये पक्षी ठार मारण्याचा कोणताही उपाय नव्हता. फळे खातात, पिकातील दाणे खातात म्हणून थेट त्यांना ठार मारा असा कोणताही उपाय येथे नव्हता. पण सध्याच्या युगात असा विचार मांडला जात नाही. उपाय योजताना हा विचार केलाच जात नाही. नुकसान होते ना? मग रोखण्यासाठी त्यांना ठार मारणे ही गरज आहे असाच विचार केला जातो. पक्षी असो कीटक असो याचा समुळ नायनाटच केला जात आहे. रसायनांच्या फवारण्यामुळे फक्त कीटकच मरतात. असा दावा केला जातो. पण त्याचे अनेक दुष्परिणाम होत आहेत याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर विचारही आता बदलत चालले आहेत. अहिंसेचा विचार मागे पडत आहे. अहिंसेच्या विचारावर आधारित नियोजनच केले जात नाही. हा विचार कालबाह्य मानला जात आहे. पण जीवन चक्रच खंडित केले जात असल्याने भावी काळात अनेक समस्या उत्पन्न होणार आहेत. झटपट जीवनशैलीमध्ये दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो. आत्ताची गरजच विचारात घेतली जाते. पुढील काळात त्याचे काय दुष्परिणाम होणार आहेत याचा विचारच केला जात नाही. पक्षाला फळ दिसले, तर तो लगेचच फळाकडे धाव घेत नाही. एका फांद्यावरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहातो. सर्व बाजूंनी फळाचे निरीक्षण करतो. कोणी आहे का नाही याची खात्री करून घेतो. हळूहळू फळाकडे धाव घेतो. पण माणूस मात्र झटपट फळाची अपेक्षा करतो. पक्षाला विचार आहे, पण मानवाला हा विचार जोपासता येत नाही. हे दुर्दैव्यच म्हणावे लागेल. प्रयत्न करत राहिले तर यश मिळते. झटपट यशाची अपेक्षा ठेवू नये. 


। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Tuesday, April 28, 2020

देखें अग्निमाजीं घापती । तियें बीजें जरी विरुढती ।


जमीन शेकविण्याऐवजी वाढलेले तण फुलोऱ्यावर येणाआधीच ते जमीनीत गाढण्यात येते. उसामध्ये पाचट कुजवून पिकांमध्ये सेंद्रिय खत तयार केले जात आहे. जमीनीला आवश्‍यक सेंद्रिय कर्ब उपलब्ध होत नसल्याने आता हा प्रयोग अनेक शेतकरी करत आहेत. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

देखें अग्निमाजीं घापती । तियें बीजें जरी विरुढती ।
तशी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ।। 346।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - पाहा, विस्तवात घातलेले (भाजलेले) बी जर उगवेल, तर शांतिहीन पुरुषाला सुखप्राप्ति होऊ शकेल.

पावसाळ्यानंतर डोंगरावर वाढलेले गवत वाळते. या गवताला आग लावली तर त्या धगीमध्ये अनेक वृक्ष, रोपे नष्ट होतात. गवताचे बीजही करपून निघते. अशा या वनव्यामुळे अनेक ठिकाणी डोंगर ओसाड होताना पाहायला मिळत आहेत. आगीत भाजलेले बी अंकुरत नाही. हाच विचार घेऊन शेतजमीनी भाजण्याचाही प्रयोग अनेक शेतकरी करतात. शेतात तणांचा प्रादुर्भाव अधिक वाढला असेल तर, उन्हाळ्यामध्ये शेत जमीन भाजून घेतात. नांगरट करून सूर्याच्या धगीत जमीन शेकवली जाते. पिकाचे उरलेले अवशेष पाला पाचोळा शेतात जाळून जमीन शेकवली जाते. या धगीत तणांचे बी शेकले जाते. भाजलेले हे बी अंकुरत नाही. कीड - रोगांचेही बीजांडे नष्ट होतात. साहजिकच तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. मोठ्या प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात ही पद्धत वापरली जाते. शेतात आग केल्याने जमिनीतील आवश्‍यक जिवाणूही नष्ट होतात. यामुळे आता जमिन भाजण्याची किंवा शेकण्याची पद्धत आता वापरली जात नाही. त्याऐवजी तण कुजविण्याची पद्धत रूढ झाली आहे. जमीन शेकविण्याऐवजी वाढलेले तण फुलोऱ्यावर येणाआधीच ते जमीनीत गाढण्यात येते. उसामध्ये पाचट कुजवून पिकांमध्ये सेंद्रिय खत तयार केले जात आहे. जमीनीला आवश्‍यक सेंद्रिय कर्ब उपलब्ध होत नसल्याने आता हा प्रयोग अनेक शेतकरी करत आहेत. सेंद्रिय कर्बामुळे जमीनीतील जिवाणूंची कार्यक्षमता वाढते. पिकांच्या वाढीला जोर मिळतो. पीक जोमात असेल तर त्यावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. निरोगी शरीरात जशी रोगप्रतिकारक क्षमता अधिक असते तसेच जोमात वाढलेल्या पिकांमध्येही रोगप्रतिकार शक्ती अधिक असते. तणांचा प्रादुर्भाव असणाऱ्या शेतात भरघोस उत्पन्नाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. पण फुलोरा येण्यापूर्वी हेच तण शेतात कुजविले तर सेंद्रिय घटकांच्या निर्मितीचा पिकाला फायदा होऊ शकेल. ताग, ढेच्या ही हिरवळीची खते जशी शेतात कुजविली जातात तशी तणही कुजविली जाऊ शकतात. ताग, ढेंच्या लवकर कुजतात. त्यामुळे ते कार्यक्षम घटक जमिनीत निर्माण करू शकतात. तसे तण कुजण्यास जरी वेळ लागला तरी त्यातूनही कार्यक्षम घटक तयार होऊ शकतात. तण देई धन हा विचार घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात प्रतापराव चिपळूणकर हे शेतकरी शेती करत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन राज्यात अनेक शेतकऱ्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे. बदलत्या शेतीपद्धतीत सेंद्रिय खताचा तुटवडा जाणवत आहे. जनावरांची संख्या घटल्याने याचा फटका सेंद्रिय खताच्या निर्मितीवर झाला आहे. सेंद्रिय खताचा वापरच शेतामध्ये केला जात नाही. अशाने जमिनी नापिक होण्याचा धोकाही बळावला आहे. शेतांची उत्पादकता झपाट्याने घटताना दिसत आहे. जमिन पिकाऊ राहिली तरच शेती टिकेल. यासाठी ती पिकाऊ ठेवण्यासाठी आवश्‍यक असणारे उपायही योजने गरजेचे आहे. अध्यात्मातही तसेच आहे. भाजलेले बी उगवत नाही. सद्गुरु बीजाची पेरणी शिष्यामध्ये करतात. ते बीज जर भाजले गेले तर उगवणार नाही. यासाठी ते बीज भाजले जाणार नाही याची काळजी शिष्याने घ्यायला  नको का? दिलेल्या मंत्रबीजाची वाढ कशी होईल हे शिष्याने पाहायला नको का? जसे शांतिहिन पुरुषाला सुखप्राप्ती होत नाही. तसे दिलेल्या बीजाचे संगोपन न करणाऱ्या शिष्याला आत्मज्ञानाच्या सुखाची प्राप्ती होत नाही. यासाठी  बीजाची योग्य काळजी घेऊन प्रगती साधायला हवी.

। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Sunday, April 26, 2020

कुडुलिंब कसे आहे कीडनाशक ?


कडुलिंबापासून तयार करण्यात येणारे कीडनाशक हे मानवाच्या शरीराला उपायकारक ठरत नाही. पूर्वीच्या काळात याचा विचार करूनच याला प्राधान्य दिले गेले असावे. सध्या पाश्‍चिमात्य देशात कडुलिंबाचा कीडनाशक म्हणून कसा व कोठे वापर केला जाऊ शकतो यावर संशोधन सुरु आहे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857685

जरी मंत्रेचि वैरी मरे । तरी वायांचि का बांधावी कटारें ।
रोग जाय दुधें सागरे । तरी निंब कां पियावा ।।223 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 4 था

ओवीचा अर्थ - जर मंत्रप्रयोगानेंच शत्रूस ठार करता ं येईल, तर कमरेस कट्यार व्यर्थ का बांधून ठेवावी ? जर दुधानें व साखरेनेंचे रोग नाहीसा होईल तर कडूलिंबाचा रस पिण्याचें काय कारण ?

कडुलिंबात औषधी गुण आहेत. अनेक आजारावर याचा वापर पूर्वीच्या काळी केला जात होता. कडुलिंब कीडनाशक म्हणूनही वापरले जात होते. दोन दशकापूर्वी धान्यांची साठवणूक करताना त्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकला जात होता. या पाल्यामुळे धान्याच्या रासेस कीड लागत नव्हती. धान्याचे संरक्षण होत होते. इतकेच नव्हेतर टोळधाड रोखण्यासाठी याचा वापर त्याकाळात शेतकरी करत होते. सध्या देशात उपलब्ध असणारी कीडनाशके ही शरीराला उपायकारक ठरणारी आहेत. पिकावर, फळावर ही कीडनाशके मारल्यानंतर त्यांचे अंश त्या फळामध्ये तसेच राहतात. अशी फळे खाल्यानंतर ते अंश मानवाच्या शरीरात जात आहेत. प्रमाण कमी असल्याने शरीरावर त्याचा लगेच परिणाम दिसून येत नाही. पण प्रमाण वाढल्यास याचे दुष्परिणाम होऊ शकतात. अनेक आजारांना यामुळे निमंत्रण मिळत आहे. यावर उपाय म्हणजे जैविक कीडनाशकांचा वापर होणे गरजेचे आहे. कडुलिंबापासून तयार करण्यात येणारे कीडनाशक हे मानवाच्या शरीराला उपायकारक ठरत नाही. पूर्वीच्या काळात याचा विचार करूनच याला प्राधान्य दिले गेले असावे. सध्या पाश्‍चिमात्य देशात कडुलिंबाचा कीडनाशक म्हणून कसा व कोठे वापर केला जाऊ शकतो यावर संशोधन सुरु आहे. 1959 मध्ये आफ्रिकेतील सुदान देशात टोळधाड आली होती. त्यावेळी एका जर्मन शास्त्रज्ञाला टोळधाड कडुलिंबाला तोंड लावत नाही असे आढळले. त्याने लगेच यावर संशोधन सुरु केले. कडुलिंबाच्या कीडविरोधी गुणधर्माचे संशोधन त्याने केले. सुमारे दोनशे जातीच्या कीटकावर कडुलिंबाचा परिणाम होतो. बटाटा, तंबाखू, कापूस, कोबी, तांदुळ, कॉफी, सोयाबिन अशा अनेक पिकांवर कडुलिंबाची फवारणी उपयोगी पडते असे संशोधनात आढळले आहे. काही कीटकांच्या प्रजातीच्या जनुकावर कडुलिंबाच्या फवारणीचा परिणाम होते असेही आढळले आहे. प्रजातच नष्ट होत असल्याने कडुलिंब अधिकच परिणामकारक असल्याचे आढळले आहे. कडूलिंबामुळे काही कीटक अपंग बनतात तर काहींची भूकच नष्ट होते असेही आढळले आहे. यामुळे पिकांचे संरक्षण होऊ शकते. 


। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Friday, April 24, 2020

"वुई....द रीडर्स'...आगळावेगळा व्हाॅट्सअप ग्रुप


डॉ. मोहरिल हे इंग्रजीचे प्राध्यापक. अमरावती विद्यापीठात ते कार्यरत आहेत; पण कामाच्या जबाबदारीतून पुस्तक वाचनाची सवय मोडल्याचे डॉ. मोहरिल यांच्या लक्षात आले. यासाठी त्यांनी आपली आवड कायम राहावी व इतरांनाही वाचनाची आवड लागावी, या उद्देशाने त्यांनी ही संकल्पना राबवली. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने दिवसभर अनेकांचे फोन आले. लॉकडाऊनमध्ये लेखकांना वेळ कसा घालवायचा, याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. कारण पुस्तक लिहिण्यासाठी वेळच वेळ त्यांना मिळाला आहे. कदाचित येणाऱ्या कालावधीत अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध झाली किंवा प्रकाशकांकडे आली, तर त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. या पुस्तकांत अनेकजण कादंबरी लेखन करीत असल्याचे चित्र आहे; पण ही पुस्तके वाचणार कोण, असा प्रश्‍नही पडू शकतो.
सध्या पुस्तक वाचणाऱ्यांचेही सोशल मीडियावर ग्रुप आहेत. पुस्तक वाचणाची आवड असणारे फेसबुक आणि व्हॉटस्‌ ऍप ग्रुप पाहायला मिळत आहेत. काहींनी त्यांची नियमावली कडक केली आहे. वाचनाची आवड असेल, तरच त्यामध्ये प्रवेश दिला जात आहे. असाच एक व्हॉटस्‌ ऍप ग्रुप "वुई....द रीडर्स' 27 डिसेंबर 2018 मध्ये डॉ. अविनाश मोहरिल यांनी तयार केला. वर्षात 25 पुस्तके वाचण्याचे उद्दिष्ट ग्रुप सदस्यांना त्यांनी दिले. जानेवारी 2019 पासून तशी नियमावली त्यांनी केली. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये 161 सदस्य आहेत; पण पुस्तक वाचले की नाही हे कोण पाहणार? कोणी खोटी माहिती टाकत असेल, तर असे अनेक प्रश्‍न तुम्हाला पडले असतील; पण या ग्रुपने नियमच असे केले आहेत, की पुस्तकाव्यतिरिक्त कोणताही मेसेज त्यामध्ये टाकायचा नाही. जर टाकलाच तर एकदा दोनदा समज देण्यात येते व त्यांना काढून टाकण्यात येते. 
पुस्तक वाचण्यासाठी सहभागी झालेल्या सदस्याने कोणते पुस्तक वाचनास घेतले आहे, याची प्रथम माहिती द्यावी लागते. तसेच त्या पुस्तकाच्या मुख्य पृष्ठाचे छायाचित्र देऊन लेखक, प्रकाशक, पृष्ठे आदी माहिती द्यावी लागते आणि पुस्तक पूर्ण झाल्यानंतर या पुस्तकाबद्दल थोडक्‍यात माहिती देण्याची अट घातली आहे. यामुळे पुस्तक वाचले की नाही, याचा खुलासा स्पष्ट होतो. अशा या आगळ्यावेगळ्या ग्रुपमध्ये वाचकही तसे सर्व वयोगटातील व विविध विषयांतील आहेत. 12 वर्षांपासून ते 87 वर्षांच्या वृद्धाचाही यात समावेश आहे.
डॉ. मोहरिल यांनी पुस्तक वाचनाची आवड कमी झाली आहे, हे विचारात घेऊन तयार केलेल्या या ग्रुपमध्ये 161 सदस्यांपैकी अमेरिकेतील दोघे, जर्मनीतील एकजण, तर महाराष्ट्राबाहेरील राज्यातील 19 जण आहेत. यामध्ये गुजरात, कर्नाटक, दिल्ली, तमिळनाडू, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील सदस्य आहेत. गेल्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये 161 पैकी 100 सदस्यांनी 25 पुस्तकांचे उद्दिष्ट पूर्ण केले. यंदाच्या वर्षी 140 सदस्य पुस्तक वाचनात सक्रिय आहेत. लॉकडाउनमुळे यामध्ये आणखीन भर पडली आहे. अनेक वाचक सक्रिय झाले आहेत. डॉ. मोहरिल हे इंग्रजीचे प्राध्यापक. अमरावती विद्यापीठात ते कार्यरत आहेत; पण कामाच्या जबाबदारीतून पुस्तक वाचनाची सवय मोडल्याचे डॉ. मोहरिल यांच्या लक्षात आले. यासाठी त्यांनी आपली आवड कायम राहावी व इतरांनाही वाचनाची आवड लागावी, या उद्देशाने त्यांनी ही संकल्पना राबवली. गेल्या काही वर्षांत ती यशस्वी झाली आहे. नव्या तंत्रज्ञानात वाचनाची आवड असणाऱ्यांनी या ग्रुपचा आदर्श घेऊन वाचन चळवळीस प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करण्याची गरज आहे.  

Thursday, April 23, 2020

भक्तांमध्ये नम्रता असते कशी ?

जसा शेतकरी शेतीत प्रयोग करतो तसेच भक्तही छोट्या छोट्या अनुभवातून अध्यात्मिक प्रगती साधत असतो. म्हणूनच अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाची शिदोरी त्याच्याजवळ असते. पण त्या ज्ञानाचे तो अवडंबर कधीच माजवत नाही. तो नम्रपणे हे ज्ञान इतरांनाही देत असतो. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

कां फळलिया तरुची शाखा । सहजें भूमीसी उत्तरे देखा । 
तैसें जीवमात्रा अशेखा । खालवती तें ।। 225 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - अथवा पाहा की, फळभाराने लगडलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते. त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांपुढे ते नम्रपणानें लवतात. 

भक्तांचा स्वभाव कसा असतो ? त्याच्यामध्ये नम्रता कशी असते. ही उत्तम भक्ताची लक्षणे जाणून घेण्याची प्रत्येक शिष्याची इच्छा असते. सर्वत्र सजिव, निर्जिव वस्तूत भगवंत पाहाणे अगदी ब्रह्मदेवापासून ते साध्या लहान चिलटापर्यंत सर्वत्र भगवंताचे स्वरुप पाहायचे. ते अनुभवाचे. त्याचा बोध घ्यायचा. यातूनच भक्ताच्या विचारात, आचारात बदल घडतो. पंढरीच्या वारीत एकदा तरी जाऊन आला तरी या सर्व गोष्टींचा त्याला निश्चितच अनुभव येतो. सहजच त्या गोष्टी समजून येतात. यासाठीच तर एकदा तरी वारी करावी असे सांगितले जाते. भक्त कसा असतो ? भक्तामध्ये नम्रता कशी असते. त्याचा स्वभाव कसा असतो. हे समजण्यासाठी वारी निश्चितच करावी. वारीतली भक्तांची भक्ती पाहून आपणास निश्चितच त्याचा बोध येईल. भक्तांचा भोळपणा पाहून आपणासही निश्चितच भक्तीची ओढ लागेल. वारीतले सगळेच भक्त उच्चशिक्षित नसतात. फारसे शिकलेलेलेही नसतात. पण उच्चशिक्षित व्यक्तीपेक्षाही त्यांचे अध्यात्म ज्ञान, भक्तीचे ज्ञान हे उच्च कोटीचे असते. शेतात राबणारा शेतकरी जसा भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येवर काही ना काहीतरी उपाय शोधत असतो. विविध प्रयोग करून शेतीचा विकास करत असतो. अगदी तसेच भक्त स्वतःची अध्यात्मिक प्रगती साधत असतो. शेतकरी शिकलेला असतोच असे नाही. पण आपल्या अनुभवातून तो शेतीचा विकास साधत असतो. पर्याय शोधणे हे त्याचे प्रथम कर्तव्य असते. झाडावरची फळे तोडण्यासाठी माणसे नाहीत. शेती कामासाठी माणसे नाहीत. म्हणून तो काम सोडत नाही. काही ना काही तरी त्यावर उपाय शोधतोच. फळेतर शेतकऱ्यालाच काढावी लागणार. पण मजूर नाहीत. अशावेळी नुकसान होणार नाही यासाठी योग्य ते तंत्र शोधून तो यावर उपाय शोधतो. अशाने तो नेहमीच शेतीचा विकास साधत असतो. नेहमीच शेतीत वेगवेगळे प्रयोग करणारा शेतकरी हा सर्वाधिक विकास करू शकतो. छोट्या छोट्या प्रयोगातून तो प्रगती करत असतो. जसा शेतकरी शेतीत प्रयोग करतो तसेच भक्तही छोट्या छोट्या अनुभवातून अध्यात्मिक प्रगती साधत असतो. म्हणूनच अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाची शिदोरी त्याच्याजवळ असते. पण त्या ज्ञानाचे तो अवडंबर कधीच माजवत नाही. तो नम्रपणे हे ज्ञान इतरांनाही देत असतो. झाड जसे फांदीला फळे लागल्यानंतर वाकून नम्रपणे भूमीचे आभार मानते तसे भक्तही नम्रपणे गुरुंचे आभार मानत असतो. नम्र भक्तच अध्यात्मिक प्रगती सहज साधतो. 

। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621











Wednesday, April 22, 2020

पाणथळ जागांच्या अभ्यासातून `हे` निष्कर्श


पाणथळ जागांचा अभ्यास हा जैवविविधता जोपासण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. सध्या पाणथळ जागी असणाऱ्या पाण्याचा उपयोग हा शेती आणि पिण्यासाठी केला जातो. या जागांच्या परिसरात पीक पद्धतीत बदल झाला आहे. एरवी एक पीक पद्धती होती; पण या पाणथळ जागांच्या विकासानंतर त्या परिसरात दुबार, तिबार पीक पद्धती वापरली जाऊ लागली आहे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

पाणथळ जागांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. यामध्ये नदी, तलाव, बंधारे, धरणे इत्यादींचा समावेश होतो. हायड्रोफाईट्‌स, हायड्रिक माती, हायड्रिक कन्डिशन या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. वर्षभर पाणी असणाऱ्या पाणथळ जागांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

हे विचारात घेऊन शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम डॉ. लीला भोसले यांनी पाणथळ जागांचा शास्त्रीय अभ्यास केला. त्या ठिकाणी आढळणाऱ्या वनस्पतींची नोंद त्यांनी केली. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आढळणाऱ्या सर्व पाणथळ जागांचा अभ्यास त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे. या पाणथळ जागांचे महत्त्व विचारात घेऊन डॉ. अपर्णा पाटील यांनीही हा विषय संशोधनासाठी निवडला. डॉ. पाटील यांना या संशोधन कामात डॉ. संजय साठे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बेलवळे बुद्रुक, सोनाळी, मुरगूड, करंजवणे, बेनिक्रे येथील पाणथळ जागांचा अभ्यास केला.
या पाणथळ जागांची वैशिष्ट्ये डॉ. पाटील यांनी त्यांच्या संशोधनात मांडली आहेत. या ठिकाणी 108 सूक्ष्म वनस्पतींच्या प्रजातींची नोंद त्यांनी केली आहे. यामध्ये मुख्यतः क्‍लोरोफायसी, बॅसिलोरॅलीफायसी, सायनोफायसी या कुळातील प्रजाती आढळल्या. या प्रजातींचा आकार अत्यंत सूक्ष्म म्हणजे काही मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर इतका आहे. त्यांना हरित नील शैवाल असे म्हटले जाते. 
पाणथळ जागांचा अभ्यास हा जैवविविधता जोपासण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. सध्या पाणथळ जागी असणाऱ्या पाण्याचा उपयोग हा शेती आणि पिण्यासाठी केला जातो. या जागांच्या परिसरात पीक पद्धतीत बदल झाला आहे. एरवी एक पीक पद्धती होती; पण या पाणथळ जागांच्या विकासानंतर त्या परिसरात दुबार, तिबार पीक पद्धती वापरली जाऊ लागली आहे. साहजिकच वर्षभर पिके शेतात डोलू लागली आहेत. या पाणथळ जागांचा उपयोग पूरनियंत्रण करण्यासाठीही होतो. शेती, पिण्यासाठी पाणी यासह मासेमारीसाठीही या जागा आता विकसित केल्या जाऊ शकतात. 
बारमाही पाणी असणाऱ्या पाणथळ जागांचा सलग तीन वर्षे सातत्याने अभ्यास केला, तर त्याची योग्य स्थिती सांगता येऊ शकते. यामध्ये हायड्रोबायोलॉजी आणि इकॉलॉजी यांचा समावेश होतो. प्लॉनटा म्हणजेच प्लवंग या सूक्ष्म शैवालांचा अभ्यास करून पाण्याचा निष्कर्ष काढता येतो. हरित नील शैवालामध्ये (फायटोप्लानटॉन) नायट्रोजन टिकवून ठेवण्याची क्षमता आहे. हे शैवाल माशांचे खाद्य आहे. या पाणथळ जागा पक्ष्यांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. या जागावर जैव शृंखला अवलंबून असते. प्लवंग, कारा, नायटेला, स्पायरोगायरा ही मोठी शैवाले या पाणथळ जागेत आढळतात. यावर शंख तयार करणारे प्राणी अवलंबून असतात. तसेच मासेही या वनस्पती खातात. या माशांना पक्षी आणि मानव खातात, अशी ही शृंखला तयार होते. तसेच थंडीच्या कालावधीमध्ये येणारे परदेशी पक्षीही या पाणथळ जागांची निवड करतात. यासाठीच या जागांचा अभ्यास करण्याची गरज आहे. 
या आहेत संशोधनाच्या संधी 
  • पाणथळ जागांच्या ठिकाणी पाणी प्रदूषण कसे होते, याचा शास्त्रीय अभ्यास होण्याची गरज. 
  • नवनवीन संकल्पना घेऊन पाणथळ जागांच्या ठिकाणचे पक्षी आणि मासे यांचा अभ्यास करण्याची संधी. 
  • नील हरित शैवाल, अझोला यांचे कल्चर तयार करून नायट्रोजनपुरवठा करणारी जैविक खते तयार करण्यासाठी, तसेच माशांची विष्ठा पाण्यात मिसळल्याने होणारे खत अशा पद्धतीने पाणथळ जागांचा अभ्यास करता येणे शक्‍य. 
  • इकोटुरिझमच्या संधी विचारात घेऊनही या जागांचा विचार होण्याची गरज..  

कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें ।


शहरात फेरफटका मारायला जाताना कपडे नीटनेटके घालतो. चेहऱ्याला विविध सौंदर्य प्रसादने लावतो. सुंदर दिसण्यासाठी काळजी घेतो. हे करताना महागाईचा विचार डोक्‍यात येत नाही. शेतात सुधारणा करताना महागाई आडवी येते. सुधारणा केली तर उत्पन्नात वाढ होणार याचा विचार का केला जात नाही? चांगले दिसण्यासाठी खर्च, मग चांगले उत्पादन मिळविण्यासाठी सुक्षेत्र का नको? 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें । 
तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ।। 40 ।। अध्याय 1 ला 

ओवीचा अर्थ - किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणे भारतामध्ये चार पुरुषार्थ प्रफुल्लित झालेले आहेत. 

शेतात टाकले की उगवते. उत्पादन मिळते. जास्त कष्ट करावे लागत नाहीत. पेरले की थेट काढणीलाच शेतात जाणारेही अनेक शेतकरी आहेत. अशाने आता शेती तोट्याची झाली आहे. ही मानसिकता बदलायला हवी. कोकणात तसेच पश्‍चिम घाटमाथ्यावर भाताची कापणी झाल्यानंतर नांगरट करून त्या शेतात हरभरा विस्कटून टाकण्याची पद्धत आहे. काढणीनंतर परतीचा पाऊस पडला, तर हा हरभरा जोमात उगवतो. तीन महिन्यात हरभरा काढणीला येतो. पेरणीनंतर थेट काढणीलाच शेतकरी शेतात जातात. फारसे कष्ट न घेता हरभऱ्याचे उत्पादन हाती लागते. आजही ही पद्धत रूढ आहे. एकरी एक - दोन पोती उत्पादन होते. चार जणांच्या शेतकरी कुटुंबाला वर्षभर हे धान्य पुरते, पण शास्त्रोक्त पद्धतीने हरभरा लागवड केली तर एकरी पाच पोती उत्पादन मिळते. अडीच पट अधिक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल हवा. यात आळस नको. क्षेत्रात लागवड नको तर सुक्षेत्रात लागवड हवी. जमीनीची नांगरट योग्य प्रकारे केलेली असावी. ओळीमध्ये ठराविक अंतरावर पेरणी केलेली असावी. इतकेच नव्हे तर संत ज्ञानेश्‍वरांनी बी पेरताना ते किती खोलीवर पेरावे याचेही शास्त्र सांगितले आहे. पिकाची योग्य निगा राखली जावी. त्याच्यावर पडणाऱ्या कीड-रोगांचा बंदोबस्त करायला हवा. उत्पादन वाढीसाठी आवश्‍यक असणाऱ्या उपाययोजना करायला हव्यात. खते, पाणी वेळेवर द्यायला हवे. बरेच शेतकरी असे म्हणतात. असे करण्यासाठी पैसा लागतो. खर्च वाढतो. उत्पादन आले तरी खर्च वाढतो. सुक्षेत्रात जोमदार पिकात कीड - रोगांचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. याचा विचार कोण करत नाही. यासाठीच याचे अर्थशास्त्र शेतकऱ्यांनी अभ्यासायला हवे. खर्च खरंच किती होतो. उत्पादन किती टक्‍क्‍यांनी वाढते. हे विचारात घ्यायला हवे. जमाखर्च मांडला तरच समजेल शेतीत कोणत्या सुधारणा करायला हव्यात. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते उपाय योजावेत यावर विचार होऊ शकेल. शेती हा जर धंदा आहे तर मग धंदेवाईक दृष्टिकोन का नको ? शहरात फेरफटका मारायला जाताना कपडे नीटनेटके घालतो. चेहऱ्याला विविध सौंदर्य प्रसादने लावतो. सुंदर दिसण्यासाठी काळजी घेतो. हे करताना महागाईचा विचार डोक्‍यात येत नाही. शेतात सुधारणा करताना महागाई आडवी येते. सुधारणा केली तर उत्पन्नात वाढ होणार याचा विचार का केला जात नाही? चांगले दिसण्यासाठी खर्च, मग चांगले उत्पादन मिळविण्यासाठी सुक्षेत्र का नको? यात टंगळामंगळ व्हायला नको. आळस हाच माणसाचा खरा शत्रू आहे. आळसाने कोणतेही काम होत नाही. आळस झटकून देऊन काम करण्याची वृत्ती हवी, तरच प्रगतीच्या वाटा सापडतील.  

। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621




Tuesday, April 21, 2020

जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।।


पिकांच्या मुळाशी पाणी देणे गरजेचे आहे. हे शास्त्र सांगते. ज्ञानेश्‍वरांनी हे शास्त्र बाराव्या शतकात सांगितले, पण मनुष्याच्या आळशीपणामुळे शास्त्रोक्त पद्धती शेतीत वापरल्या जात नाहीत. काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहेत. पिकांच्या मुळाशी पाणी देण्याची ठिबक सिंचनाची पद्धत वापरून भरघोस उत्पादन घेत आहेत, पण अशा शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

म्हणोनी जाण तेन गुरू भजिजे । तेणें कृतकार्या होईजे । 
जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।। 25 ।। अध्याय 1 ला 

ओवीचा अर्थ - एवढ्याकरिता अहो ज्ञाते पुरुषहो, गुरुला भजावे आणि त्या योगाने कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणें झाडांच्या मुळांना पाणी घातले असतां अनायासें फांद्या व पाने यांना टवटवी येते. 

झाडाची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी त्याच्या मुळाशी पाणी द्यावे लागते हा विचार संत ज्ञानेश्‍वरांनी त्या काळात सांगितला. यावरून त्याकाळात झाडांची, रोपांची वाढ कशी होते. त्याला अधिकाधिक फळे लागावीत, उत्पन्न भरघोस यावे यासाठी प्रयत्न हे केले गेले होते. ठिबक सिंचन हे आज प्रगत शेतीचे तंत्रज्ञान समजले जात असले तरी बाराव्या शतकातही हेच तंत्र वापरून शेती केली जात होती. फक्त त्या काळातील सिंचनाची पद्धत वेगळी होती. मडक्‍याच्या तळाशी छोटे छिद्र पाडून ते मडके झाडाच्या, रोपाच्या मुळाशी पुरले जायचे. तेव्हा विद्युत मोटार किंवा पंपही नव्हते. पाणी दुरून आणून घालावे लागत होते. ही पुरलेली मडकी पाण्याने भरली जायची. मडक्‍याच्या छिद्रातून हळूहळू पाणी झाडाच्या मुळापर्यंत झिरपते. अशा पद्धतीने पाणी दिले जायचे थेट झाडाच्या मुळांशी पाणी देण्याची पद्धत त्याकाळात अवगत होती. खतेही याच पद्धतीने दिली जात होती. झाडाच्या भोवती गोलाकार रिंग करून सेंद्रिय खत पेरले जायचे. पुढील काळात मोटेचा शोध लागला. मोटेने पाणी खेचले जाऊ लागले. त्यानंतर पंपाने पाणी खेचण्याचा शोध लागला. वाट्टेल तेवढे पाणी विहिरीतून खेचता येऊ लागले. तसे पाण्याचा वाट्टेल तसा वापर होऊ लागला. अशाने शेतांना मीठ फुटण्याचे प्रकारही घडत आहेत. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्याने त्याचा उत्पादनावरही परिणाम होत आहे, पण तरीही आज पाटानेच पाणी देण्याची पद्धत शेतकरी वापरत आहेत. उत्पादन घट होऊनही, जमीनीचा पोत बिघडला जात असूनही शेतकरी पिकांना पाटानेच पाणी देण्याची पद्धत वापरत आहे. शास्त्रोक्त पद्धतीने आज शेती केलीच जात नाही, याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे. पिकांच्या मुळाशी पाणी देणे गरजेचे आहे. हे शास्त्र सांगते. ज्ञानेश्‍वरांनी हे शास्त्र बाराव्या शतकात सांगितले, पण मनुष्याच्या आळशीपणामुळे शास्त्रोक्त पद्धती शेतीत वापरल्या जात नाहीत. काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहेत. पिकांच्या मुळाशी पाणी देण्याची ठिबक सिंचनाची पद्धत वापरून भरघोस उत्पादन घेत आहेत, पण अशा शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे. दररोज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत व्हावा यासाठी ज्ञान विस्ताराचे कार्य केले जाते. ठिबकचा वापर शेतीत वाढावा यासाठी शासनाचे अनुदानही उपलब्ध आहे, पण तरीही शेतकरी याचा वापर करत नाहीत. आता शेतकऱ्यांनी हा आळस झटकून शास्त्रोक्त पद्धतीने शेती करायला हवी तरच भावी काळात शेती टिकून राहणार आहे. याचा विचार करायला हवा.  

। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621




Monday, April 20, 2020

गाय धड जोडे गोमटी । ते तैंचि पिवों ये किरीटी ।


 शेती कशी करायची याची हातोटी शिकायला हवी. गुरू प्रसन्न आहेत. शिष्यानेही अध्यात्माचा अभ्यास केला आहे. पण आत्मज्ञान कसे प्राप्त होते हेच शिष्य जाणत नसेल तर तो आत्मज्ञानी कसा होईल? 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

गाय धड जोडे गोमटी । ते तैंचि पिवों ये किरीटी ।
जैं जाणिजे हातवटी । सांजवणीची ।। 1483 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - गाय चांगली धड प्राप्त झाली असता तिचे दूध तेव्हांच पिता येते कीं, जेव्हां धार काढण्याची हातवटी कळते.

गाय दुधाळ आहे. कासेला भरपूर दूधही आहे. पण कासेतून दूध कसे काढायचे? याचे तंत्रच अवगत नाही. मग दुधाळ गाय खरेदी करून दूध मिळणार आहे का? जनावरे पाळायची आहेत. मग यासाठी आवश्‍यक ते शास्त्र जाणून घ्यायला नको का? ती कशी पाळायची याचे तंत्र जाणून घ्यायला हवे. जनावरांना चारा किती द्यायचा, पाणी किती द्यायचे कधी द्यायचे. किती प्रमाणात द्यायचे हे सर्व अभ्यासायला हवे. दुधाचे उत्पादन योग्य प्रकार करायचे असेल, तर योग्य ते घटक जनावरांना द्यायला हवेत. त्याची वेळही ठरलेली असते. जनावरांच्या वाढीसाठी आवश्‍यक मुलद्रव्ये द्यायला हवीत. खुराक कसा असावा किती प्रमाणात हवा याचेही नियोजन हवे. तरच दुधाचे उत्पादन योग्य प्रमाणात होऊ शकेल. जनावरे सांभाळताना त्याचे अर्थ शास्त्र जाणून घ्यायला हवे. जनावरांच्या खुराकावर किती खर्च होतो. त्याच्या संगोपनासाठी एकूण खर्च किती येतो. त्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होते का? या उत्पादनातून योग्य तो नफा हाती लागतो का? याचे गणितही मांडता यायला हवे. तोटा सहन करून कोणताही उद्योग चालत नाही. शेती हा एक उद्योग आहे. या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तो करायला हवा. जोडधंदा म्हणून जनावरे पाळली जातात. पण ती पाळताना तोटा सहन करावा लागू नये याची काळजी घ्यायला नको का? जोडधंदा हा मुख्य उद्योगाला हातभार लावण्यासाठी असतो. मुख्य पिकाला फटका बसला तर त्या फटक्‍याची झळ शेतकरी कुटुंबाला बसू नये यासाठी जोडधंदे आहेत. व्यवसाय करताना त्याचा प्रथम अभ्यास करायला हवा. या व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्‍यक ते नियोजन करायला हवे. तसा विचार करायला हवा. शेतात बी पेरले की ते उगवते. पण ते कसे पेरायला हवे. उत्पादन अधिक येण्याच्या दृष्टीने कसे पेरायचे? याचे तंत्र जाणून घ्यायला हवे. केळीचे पीक 40 ते 45 महिने उत्पादन देते. खोडवा, निडवा याचे योग्य व्यवस्थापन करून हा कालावधी कमी करता येतो. विशेष म्हणजे उत्पादनही तेवढेच ठेवून. हे नवे तंत्र आत्मसात करून शेती करायला हवी. तीस महिन्यात केळीचे खोडवा, निडवा घेता आला तर उरलेल्या कालावधीत एखादे पीक सहज घेता येणे शक्‍य आहे. घड कोणत्या बाजूला पडतो त्याच्या विरुद्ध दिशेला पहिल्या पिकाचे घड तयार होण्याआधीच खोडवा ठेवून पिकाचा कालावधी कमी करता येतो. असे नवे तंत्र आत्मसात करायला हवे. तसेच असे नवे तंत्र स्वतः शोधायला हवे. नियोजनातून, अभ्यासातून होणाऱ्या चुका दुरुस्त करत उत्पादन वाढीवर भर दिला तर शेतीमध्ये निश्‍चितच प्रगती होऊ शकेल. शेती कशी करायची याची हातोटी शिकायला हवी. गुरू प्रसन्न आहेत. शिष्यानेही अध्यात्माचा अभ्यास केला आहे. पण आत्मज्ञान कसे प्राप्त होते हेच शिष्य जाणत नसेल तर तो आत्मज्ञानी कसा होईल? यासाठी आत्मज्ञान प्राप्तीचीही हातोटी शिष्याने समजून घ्यायला हवी. तरच तो आत्मज्ञानी होईल. 


। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Sunday, April 19, 2020

सर्वांत पवित्र तीर्थ कोणते माहीत आहे का ? जाणून घेण्यासाठी वाचा



शरीराच्या शुद्धते बरोबरच मनाची शुद्धताही साधनेत महत्त्वाची आहे. शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने केलेली साधना निश्‍चितच आध्यात्मिक प्रगती साधते. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621


कां तीर्थें जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनें ।
ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ।। 26 ।। अध्याय 1 ला

ओवीचा अर्थ - समुद्रस्नानाने त्रैलोक्‍यात जेवढीं तीर्थे आहेत तेवढीं घडतात किंवा अमृतरसाच्या सेवनानें सर्व रसांचे सेवन घडते.

अध्यात्मात प्रगती करण्याचे अनेक मार्ग आहेत. साधनेचेही अनेक प्रकार आहेत. पण प्रत्येकालाच सध्या घाई झाली आहे. अवघड मार्गाने जाण्यात तर कोणालाच रस नाही. सोपा मार्ग प्रत्येकालाच हवा असतो. ज्ञानेश्‍वरीत साधनेचे सर्व सोपे मार्ग सांगितले आहेत. आध्यात्मिक शांतीसाठी अनेक भाविक धार्मिक पर्यटनाला जातात. अनेक तीर्थात डुबकी मारतात. गंगा स्नान करतात. हे तीर्थ पवित्र त्यापेक्षा ते तीर्थ अधिक पवित्र. असा भेदभावही करतात. सर्व शुद्धीसाठी तीर्थाना महत्त्व आहे. याचा अर्थ पूर्वीच्याकाळी स्वच्छतेला अधिक महत्त्व होते. घराचा परिसरही स्वच्छ ठेवण्यावर अधिक भर दिला जात होता. अध्यात्मातही स्वच्छतेला अधिक महत्त्व आहे. स्वच्छ वस्त्रे घालावीत. अंघोळ करून साधना करावी. एकंदरीत साधना व्यवस्थित व्हावी, मन साधनेत रमावे यासाठी स्वच्छतेला महत्त्व आहे. तीर्थात स्नान हे शुद्धीसाठी करायचे आहे. पण सध्या तीर्थातील पाणीच अशुद्ध असते की त्या पाण्यात डुबकी मारण्याची इच्छाही होत नाही. सर्व प्रथम तीर्थात होणारे प्रदूषण रोखण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे. श्रद्धा म्हणून आता अनेकजण या तीर्थात डुबकी मारतात. जीवनात सर्वच तीर्थांना जाता येईल का हे सांगता येणार नाही. सर्वच तीर्थांचा लाभ घेता येईल का हे ही सांगता येणे कठीण आहे. हे तीर्थ घडले. पण हे तीर्थ घडले नाही. ही मनात रुखरुख राहाते. अशाने साधनेवर याचा परिणाम होतो. यासाठी संत ज्ञानेश्‍वरांनी त्रैलोक्‍यातील सर्व तीर्थ घडविण्याचा सोपा मार्ग सांगितला आहे. समुद्रात डुबकी मारा सर्व तीर्थांचे स्नान घडेल. जगभर भटकंती करण्याची काहीच गरज भासणार नाही किंवा एखादे तीर्थ घडले नाही म्हणून नाराज होण्याचेही काही कारण नाही. समुद्र हे असे तीर्थ आहे. ज्यामध्ये सर्व तीर्थे सामावली आहेत. सर्व तीर्थांचे मुळच समुद्र आहे. यासाठी हे सर्वांत पवित्र असे हे तीर्थ आहे. शास्त्राचा विचार करता समुद्राच्या पाण्याची वाफ होते. त्या वाफेला थंड हवा लागल्यानंतर पाऊस पडतो. नदीतून हे पाणी पुन्हा समुद्रालाच मिळते. तीर्थामध्ये असणारे पाणी हे समुद्रातीलच आहे. सर्व तीर्थे ही समुद्रातच सामावलेली आहेत. समुद्रातील पाण्याने अनेक व्याधीही दूर होतात. त्याच्या खारटपणामुळे रोगही जातात. तीर्थातून शरीराची शुद्धी होते. समुद्राच्या पाण्यातूनही शुद्धी होते. शरीराच्या शुद्धते बरोबरच मनाची शुद्धताही साधनेत महत्त्वाची आहे. शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने केलेली साधना निश्‍चितच आध्यात्मिक प्रगती साधते. 


।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Saturday, April 18, 2020

मीच होऊन माझी सेवा करायची म्हणजे काय?



काहीही झाले तरी येथे प्रत्येक मानवाला ब्रह्म संपन्न होण्याचा अधिकार आहे. यासाठी प्रत्येक शिष्यांने गुरुपदी पोहोचण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आत्मज्ञानी होण्याची मार्ग स्वीकारायला हवेत त्यानुसार आचरण करायला हवे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल ८२३७८५७६२१


ऐसे मीच होऊन पांडवा । करिती माझी सेवा ।
परि नवलावो तो सांगावा । असे आइक ।। १९६ ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा

ओवीचा अर्थ - अर्जुना याप्रमाणे मीच होऊन ते माझी सेवा करतात, पण त्यांचा सेवा करण्याचा प्रकार आश्चर्यकारक आहे तो सांगतो ऐक.

मीच होऊन माझी सेवा करायची हे कसे काय? भगवान शंकर स्वतः भगवंत आहेत, पण ते सुद्धा ध्यानात असतात. ते सुद्धा ध्यान करतात भगवंत असूनही ते ध्यान करतात कोणाचे? म्हणजे मीच होऊन माझी सेवा करण्यासारखे आहे ना? सोऽहम चे ध्यान आपण करत नसतो तरीसुद्धा सोऽहमचा जागर सुरूच असतो. नाथ संप्रदाय हा गुरु शिष्य परंपरेवर आधारलेला आहे. आदिनाथांपासून सुरू झालेली ही परंपरा आजही तसेच टिकून आहे. येथे गुरु हा प्रथम शिष्य असतो आणि साधनेने आणि सद्गुरूंच्या कृपेने तो गुरुपदी पोहोचतो. शिष्य असतो तेव्हा तो साधना करतो. गुरु होतो तेव्हाही त्याची साधना सुरूच असते. गुरु शिष्याला स्वतः सारखे करतात. स्वतःच्यापदी बसवतात. म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यातील द्वैत संपते. दोघेही समपातळीत असतात. आता स्वतःच स्वतःची साधना असते. स्वतःतील सोऽहमची साधना असते. एक आहे. काहीही झाले तरी येथे प्रत्येक मानवाला ब्रह्म संपन्न होण्याचा अधिकार आहे. यासाठी प्रत्येक शिष्यांने गुरुपदी पोहोचण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आत्मज्ञानी होण्याची मार्ग स्वीकारायला हवेत त्यानुसार आचरण करायला हवे. द्वैत समजून यायला हवे. आत्मज्ञानी होणे प्रत्येक मानवाचा स्वधर्म आहे. तो त्याने पाळायलाच हवा.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Friday, April 17, 2020

तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ।।



भोग, वासना दूर सारण्यासाठी सद्‌गुरू सो ऽ हम चे शस्त्र सांगतात. सो ऽ हमवर मन नियंत्रित करण्यास सांगतात. मनावर नियंत्रण ठेवणे हे शिष्यांचे कर्तव्य आहे. ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले. विश्‍वाचे आर्त त्यालाच समजते. - राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

तूं गुरू बंधू पिता । तूं आमची इष्ट देवता ।
तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ।। 59 ।। श्री ज्ञानेश्‍वरी अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - तूं आमचा गुरू, बंधु, पिता. तूं आमची इष्ट देवता. संकटसमयी नेहमीं तूंच आमचें रक्षण करणारा आहेस.

साधना करताना अनेक अडथळे येत असतात. पण या अडथळ्यातून सद्‌गुरूच मार्ग दाखवतात. इतकेच काय सद्‌गुरूच साधनेची आठवण करून देतात. प्रत्यक्षात साधनाही सद्‌गुरूच करून घेत असतात. आपण काहीच करत नसतो. आपण फक्त निमित्त मात्र असतो. सद्‌गुरुंच्या समाधीच्या सानिध्यात ही अनुभूती जरूर येते. यासाठीच त्यांची समाधी ही संजीवन आहे, असे म्हटले जाते. सद्‌गुरुंची नेहमीच शिष्यावर कृपा असते. लहान भावाप्रमाणे ते शिष्यावर प्रेम करत असतात. पित्याप्रमाणे ते शिष्याचा सांभाळ करत असतात. फक्त आपली पाहण्याची दृष्टी तशी हवी. आपण त्या नजरेने पाहातच नाही. अर्जुनाच्या रथाचे सारथी कोण होते? स्वतः भगवान कृष्ण होते. शिष्य हा अर्जुनासारखाच असतो. शिष्याच्या रथाचे सारथी हे सद्‌गुरूच असतात. फक्त शिष्याला त्याची अनुभूती यायला हवी. संसाराचा असो की आध्यात्मिक साधनेचा गाडा असो दोन्हीही सद्‌गुरूच हाकत असतात. मग हा रथ चिखलात रुतो किंवा भरधाव वेगाने धावत असो. या रथाची दोरी सद्‌गुरुंच्याच हातात असते. त्यामुळे सर्व चिंता बाजूला ठेवून साधना करायला हवी. मनातील सर्व विचार दूर सारून साधनेला बसायला हवे. भीती मनात ठेवून साधना होत नाही. सद्‌गुरू नित्य आपल्या पाठीशी आहेत. हा भाव मनात ठेवूनच साधना करायला हवी. म्हणजे साधनेत येणारे सर्व अडथळे दूर होऊ शकतात. शस्त्र जवळ असेल तर शत्रूचे भय वाटत नाही. हे शस्त्र भवानी माता देते. यासाठी देवीची आराधना आपण करत असतो. सद्‌गुरू हे देवीसमान आहेत. देवी प्रमाणे साधनेतील सर्व शस्त्रे ते पुरवत असतात. साधनेच्या काळात वासना अधिक बळावतात. या काळात मनावर नियंत्रण ठेवावे लागते. भोगाची इच्छा अधिक तीव्र होत असते. या इच्छेवर ज्याने विजय मिळवला तोच आत्मज्ञानी होण्यासाठी समर्थ होतो. भोग, वासना दूर सारण्यासाठी सद्‌गुरू सो ऽ हम चे शस्त्र सांगतात. सो ऽ हमवर मन नियंत्रित करण्यास सांगतात. मनावर नियंत्रण ठेवणे हे शिष्यांचे कर्तव्य आहे. ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले. विश्‍वाचे आर्त त्यालाच समजते. त्यालाच उकलते. या वासना, मोहातून सद्‌गुरूच रक्षण करत असतात. यासाठी सद्‌गुरुंचे ध्यान करायला हवे. सद्‌गुरुंनी दिलेल्या सो ऽ हम मंत्राने सर्व व्याधी दूर होतात. सर्व दुःखे दूर पळतात. सर्व वासना, मोह यांचा नाश होतो. मग आत्मज्ञानाचा दिप उजळतो.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Thursday, April 16, 2020

सोऽहमचा बोध केव्हा होतो ?


सोऽहमचा नाद सुरू असतो पण मनात वेगळ्याच आनंदाचा विचार असतो. धकाधकीच्या या जीवनात मनात येणारे विचार रोखणे हे महाकठीण काम आहे. शांत बसले की शेजारच्या खोलीत सुरू असणारा टी.व्ही.चा आवाज स्पष्ट ऐकू येतो. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

तैं शरीरभाव नासती । इंद्रिये विषय विसरती ।
जैं सोऽहंभावप्रतिति । प्रगट होय ।। 309 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ ः ज्यावेळी हे ब्रह्म मी आहे असा अनुभव येतो त्या वेळी शरीराचे काम क्रोधादी विकार नष्ट होतात आणि इंद्रिये आपले विषय विसरतात

सोऽहमचा बोध केव्हा होतो ? आपणास त्याची अनुभूती केव्हा येते ? तो येण्यासाठी काय करावे ? हे प्रश्‍न सर्वच साधकांना पडतात. या प्रश्‍नांच्या उत्तराची उत्सुकता सर्वांनाच असते. सोऽहम ही सहज साधना आहे. सद्‌गुरुंच्या कृपेने याचा बोध येतो. पण यासाठी साधकांचेही काही कर्तव्य आहे. सोऽहम च्या साधनेत मन रमावे यासाठी त्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. पण हेच तर शक्‍य होत नाही. मग काय करावे? स्मरण-विस्मरण काय आहे याचा अभ्यास करावा. मी स्वतःला विसरलो. तरच मी कोण आहे याचे स्मरण होईल. हा साधा सोपा विचार आहे. पण मी अहंकारी स्वतःला कसा विसरणार? मनात येणारे विविध विचार कसे रोखणार? साधनेच्या काळात तर भोगाचा अधिकच विचार येतो. मनाला शांत करत असतानाच एखादा आनंदाचा क्षण आठवतो. मग त्या आनंदातच साधना सुुरू असते. सोऽहमचा नाद सुरू असतो पण मनात वेगळ्याच आनंदाचा विचार असतो. धकाधकीच्या या जीवनात मनात येणारे विचार रोखणे हे महाकठीण काम आहे. शांत बसले की शेजारच्या खोलीत सुरू असणारा टी.व्ही.चा आवाज स्पष्ट ऐकू येतो. त्या आवाजाने मन भरकटते. एकांत, शांत जागा आता पाहायलाच मिळत नाही. मंदिरातही दर्शनाची गर्दी असते. मग साधना करायची कोठे? शांत निवांतपणे बसायला जागा नाही. अशी आजची अवस्था झाली आहे. टी. व्ही. पाहण्यातच वेळ जात आहे. एक मालिका झाली की दुसरी मालिका. अशा मालिकांचा कंटाळाच येत नाही. अशातच मन रमत आहे. अशा मनाला सोऽहमची गोडी कशी लागणार. कामाचा वाढता व्याप विचारात घेता सोऽहम कडे लक्ष द्यायलाही वेळ नाही. या सर्व गोष्टींचे विस्मरण झाल्याशिवाय सोऽहमचे स्मरण होणे अशक्‍यच आहे. या सर्व गोष्टी मनातून त्यागने हाच खरा संन्यास आहे. संसारात राहूनही हे करता येणे शक्‍य आहे. हेच प्रथम समजून घ्यायला हवे. याचाच बोध प्रथम यायला हवा. संसार सुरूच असतो. त्याचा त्याग करायचा म्हणजे त्यात अडकून राहायचे नाही. नित्यकर्म करतच राहायचे. पण ते मी केले असा अहंकार ठेवायचा नाही. त्यातील मीपणाचा त्याग करायचा. असे केले तरच मनात येणारे विचार कमी होतील. बाहेरच्या आवाजावर नियंत्रणही आपोआपच घडेल. बाहेरचे आवाज सुरू असतानाच त्यावर लक्ष न देता सोऽहमवर लक्ष केंद्रित करायचे. आपोआपच बाहेरच्या आवाजापासून तुम्ही अलिप्त व्हाल. हा सर्व स्मरण-विस्मरणाचा खेळ आहे. तो खेळ समजून घेऊन खेळायला शिकायचे आहे. बाहेरच्या आवाजाचे विस्मरण जेव्हा होईल तेव्हा सोऽहमचे स्मरण आपोआपच होईल. बाहेरचे विचार थांबले की आतल्या आत्म्याचा आवाज आपोआप ऐकू येऊ लागेल. सोऽहम चा बोध आपोआपच प्रगट होईल.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Wednesday, April 15, 2020

या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।


हा आत्मा सर्वांच्यामध्ये आहे. तो येतो आणि जातो. तो आला म्हणजे प्रकट झाला असे आपण समजतो. तो गेला म्हणजे मृत झाला असे आपणास वाटते. पण प्रत्यक्षात तो प्रकटही होत नाही आणि मृतही होत नाही. तो नाशवंत आहे. तो अमर आहे. ती जी वस्तू आहे. ते जे चैतन्य आहे. तेच तर आपणास ओळखायचे आहे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।। 126 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - या देहादी प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रुपाने आहे. तत्त्व जाणणारे संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात.

तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. माणसाप्रमाणे काम करणारा संगणक केव्हाच संशोधकांनी शोधला आहे. आता तर त्याही पुढे जाऊन तो माणसाशी संवाद करत आहे. माणसाला तो प्रत्येक कार्यात सल्लामसलत करत आहे. माणसाच्या वेदना तो जाणू लागला आहे. नाडी तपासून रोग निदान करणारे वैद्य आहेत. पण आता संगणकही हे काम करू लागला आहे. शरीर पंचमहाभूतांपासून तयार झाले आहे. संगणकही अशाच पंचमहाभूतापासून तयार झाला आहे. शरीरात जसा आत्मा आला आहे, तसा संगणकात आपण प्रोग्रॅम भरला आहे. माणसाला हे दाखवून देत आहे की देहात जसे चैतन्य घातले आहे. तसे ते इतर निर्जीव वस्तूतही घालून त्याला सजीव करता येते. पण हे चैतन्य हा आत्मा हा या देहापासून वेगळा आहे. तो काढला की तो देह निर्जीव होतो. संगणकातील प्रोग्रॅम काढला की संगणकही निर्जीव होतो. तसे हे आहे. देहात आलेले हे चैतन्य ओळखायचे आहे. हे चैतन्य जो जाणतो तो संतपदाला पोहोचतो. संत हे चैतन्यच तेवढे स्वीकारतात. एखाद्याचे हृद्‌य खराब झाले असेल, तर दुसऱ्याचे हृद्‌यही त्या शरीरात बसविता येते. ठराविक कालावधीत हा बदल करता येऊ शकतो. तंत्रज्ञानाने ते शक्‍य झाले आहे. पण हे करताना ज्याचे हृद्‌य बसविले जाते, त्याचा जीव तो वैद्य वाचवू शकतो का? त्याचा कार्यकाल कायम ठेवू शकतो का? तसे तो करू शकत नाही. कारण जीव शरीरात येणे आणि जाणे हे त्याच्या हातात नाही. हा आत्मा सर्वांच्यामध्ये आहे. तो येतो आणि जातो. तो आला म्हणजे प्रकट झाला असे आपण समजतो. तो गेला म्हणजे मृत झाला असे आपणास वाटते. पण प्रत्यक्षात तो प्रकटही होत नाही आणि मृतही होत नाही. तो नाशवंत आहे. तो अमर आहे. ती जी वस्तू आहे. ते जे चैतन्य आहे. तेच तर आपणास ओळखायचे आहे. त्याच्यावरच तर नियंत्रण मिळवायचे आहे. साधनाही त्याचसाठी करायची आहे. एकदा का आपण त्याला ओळखलं. त्याच्यावर नियंत्रण मिळवले. तर आपण आत्मज्ञानी होतो. ते ज्ञान आपल्या सदैव सोबत असते. आपण त्या संतत्वाला पोहोचतो. जीवनात येऊन हेच मुख्य कार्य करायचे आहे. जीवनाचा अर्थ यामध्ये दडला आहे. जीवनाचे हेच मुख्य कार्य आहे. यासाठी आपला जन्म आहे. तो सार्थकी लावण्यासाठी ही साधना आवश्‍यक आहे. चैतन्य ओळखा आणि जीवन समृद्ध करा.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Monday, April 13, 2020

देह आणि आत्मा वेगळे कसे? जाणून घेण्यासाठी वाचा...




दिव्याच्या प्रकाशात घरातील सर्व व्यवहार सुरू असतात, पण तो दिवा 
काहीच करत नाही. अगदी तसेच आहे, देहात सर्व व्यवहार सुरू असतात पण आत्मा त्यापासून वेगळा आहे. आत्मा काहीही करत नाही, पण त्याच्या अस्तित्वात सर्व व्यवहार देहात चालतात.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल ८२३७८५७६२१

तो जैसा का साक्षीभूत । गृहव्यापार प्रवृत्तिहेतु ।
तैसा भूतकर्मी अनासक्तु । मी भूतीं असे ।। १२९।। ज्ञानेश्वरी अध्याय ९

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे तो दिवा घरात साक्षीभूत असून घरातील सर्व व्यापारांच्या प्रवृत्तीला कारण असतो, त्याप्रमाणे सर्व भुतांमध्ये मी असून त्यांच्याकडून होणाऱ्या कर्मामध्ये मी उदासीन आहे.

रात्रीच्या वेळी अंधारात दिव्याच्या उजेडातच काम सुरू असते. हा दिवा नाहीसा केला तर तेथे फक्त अंधार उरतो. या अंधारात काहीच काम करता येत नाही. या मानवी देहाचे सुद्धा असेच आहे. या पंचमहाभूतांच्या देहात आत्माला आहे. तो त्या घरातील दिव्याप्रमाणे प्रकाशमान आहे. तो जोपर्यंत देहात आहे तोपर्यंत त्या देहात सर्व क्रिया सुरू असतात.तो त्या देहातून गेला की, त्या देहाचे सर्व  व्यवहार बंद होतात किंवा थंड पडतात. म्हणजेच दिवा आणि त्या घरात सुरु असणारे कर्म हे जसे स्वतंत्र आहेत. तसे देह आणि त्या देहातील आत्मा हे सुद्धा वेगवेगळे आहेत. दिव्याच्या प्रकाशात कर्म सुरू आहे तसे आत्म्याच्या अस्तित्वात देहाचे कर्म सुरू आहे. हे आपण जाणून घ्यायला हवे. हे समजूनच आपण आपले कर्म सुरू ठेवायला हवे. या देहात आलेल्या आत्म्याची जाणीव ठेवून त्याचा बोध घेऊन आपण आत्मज्ञानी व्हायचे आहे. त्याचे अस्तित्व जाणणे म्हणजेच आत्मज्ञान. त्याचे नित्य स्मरण ठेवणे म्हणजेच आत्मज्ञानी होणे. कारण तो आत्मा हे काम कर, ते काम करू नको असे कधीही सांगत नाही. कर्म देहाकडून केले जात असते. जसे दिव्याच्या प्रकाशात घरातील सर्व व्यवहार सुरू असतात, पण तो दिवा काहीच करत नाही. अगदी तसेच आहे, देहात सर्व व्यवहार सुरू असतात पण आत्मा त्यापासून वेगळा आहे. आत्मा काहीही करत नाही, पण त्याच्या अस्तित्वात सर्व व्यवहार देहात चालतात. पण तो त्या कर्मापासून अलिप्त आहे. वेगळा आहे. त्याला या कर्माशी काहीही घेणे देणे नाही. आत्मा अलिप्त आहे.  देहापासून वेगळा आहे, हेच जाण्यासाठीच सोऽहम साधना आहे. सोऽहम साधनेतून आपण त्याचा बोध घ्यायचा आहे. त्याचे अस्तित्वच जाणून घ्यायचे आहे. या बोधातून आपण आत्मज्ञानी व्हायचे आहे. हेच या मानव जन्माचे कार्य आहे. यासाठीच मानव जन्म आहे. हाच आपला स्वधर्म आहे. हाच धर्म आपण पाळायचा आहे. त्याचे आचरण आपण करायचे आहे. या सोऽहम साधनेचा प्रसार दक्षिण महाराष्ट्रमध्ये खऱ्या अर्थाने परमपूज्य रामचंद्र महाराज तिकोटेकर यांच्यापासून झाला. त्यांची आज पुण्यतिथी. त्यांचे स्मरण करून त्यांच्या सोऽहम साधनेचा बोध आपणास व्हावा, ही साधना त्यांनी आपणाकडून करून घ्यावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.


।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Sunday, April 12, 2020

तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ।।


काही छुल्लक कारणावरून आत्महत्या, खून, मारामाऱ्या हे याचमुळे घडत आहेत. कारण संयम हा प्रकारच नव्या पिढीत कमी होताना दिसत आहे. यासाठी आपण नव्या पिढीच्या हातात काय देत आहोत. त्यांच्यावर कोणते संस्कार व्हायला हवेत याचे भान ठेवायला हवे. कानाला चांगले ऐकण्याची सवय यासाठी लावायला हवी. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

देखे हे शब्दाची व्याप्तिं । निंदा आणि स्तुति । 
तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ।। 114 ।। श्री श्रानेश्‍वरी अध्याय 2 रा 

ओवीचा अर्थ - निंदा आणि स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वारानें जसें निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोभ अंतःकरणांत उत्पन्न होईल. 


नेहमी चांगल्याच्या संगतीत असावे हा संस्कार आपणावर लहानपणापासून केला जातो. आपली मुले बिघडू नयेत. हा त्या मागचा उद्देश असतो. वाईट सवयी पटकन आत्मसात केल्या जातात. पण चांगल्या गोष्टी लवकर आत्मसात होत नाहीत. चांगल्या संगतीत राहिले की, चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. चांगले विचार मनात उत्पन्न होतात. चांगल्या कृती हातून घडतात. त्या विचारांची मग मनाला सवय होते. मन भरकटत नाही. एखाद्याला तंबाखू खाण्याचे व्यसन असेल. तर तो नेहमी तंबाखू खाणाऱ्यांशी संगत करतो. त्यांचा सहवासात, मैत्रीत त्याच व्यक्ती असतात. त्यांची बैठकही एकत्र असते. या बैठकीत एखादा तंबाखू न खाणारा गेला तर त्यालाही तंबाखू खाण्याची सवय लागू शकते. बहुंताशी असेच घडते. आपल्या आसपासच्या विचारांचा आपल्यावर सातत्याने प्रभाव होत असतो. नव्यापिढीस सहसा हा विचार पटताना दिसत नाही. सातत्याने नवे शोध लागत आहेत. बाजारात सातत्याने नवनवीन उपकरणे, गेम्स येत आहेत. संगणकाच्या युगात, मोबाईलच्या जगात आज मनाला खिळवून ठेवणारी अनेक साधणे उपलब्ध आहेत. मन अशा गोष्टीतच गढून गेले आहे. मनमोकळे करायला दोन दिवस परगावी फिरायला गेले तरी प्रवासात ही साधनेच हातात असतात. इतकी त्याची सवय आपणास झाली आहे. निसर्गातील सौंदर्य पाहून मन प्रसन्न करण्याचे भानही त्यांना नसते. मनाला प्रसन्न करणारे खेळही आता या इलेक्‍ट्रॉनिकच्या जगात उपलब्ध आहेत. इतके खेळ आले आहेत की ते नुसते पाहायचे म्हटले तरी तितका वेळ पुरेसा होत नाही. तास -न - तास त्यात वाया घालवत आहोत याचे भानही या नव्यापिढीला नसते. पण त्यातून मिळणाऱ्या आनंदावर ही पिढी प्रगती करत आहे. विकास करत आहे. पण हा विकास कधीही, कोणत्याहीक्षणी जीवन संपवू शकतो. याचे भान त्यांनी ठेवायला हवे. या नव्या उपकरणांचा योग्य वापर करण्याची सद्‌बुद्धी जागरूक असायला हवी. काही छुल्लक कारणावरून आत्महत्या, खून, मारामाऱ्या हे याचमुळे घडत आहेत. कारण संयम हा प्रकारच नव्या पिढीत कमी होताना दिसत आहे. यासाठी आपण नव्या पिढीच्या हातात काय देत आहोत. त्यांच्यावर कोणते संस्कार व्हायला हवेत याचे भान ठेवायला हवे. कानाला चांगले ऐकण्याची सवय यासाठी लावायला हवी. आध्यात्मिक प्रगतीसाठीही हाच नियम आहे. कानाला सोऽहमचा नाद ऐकण्याची सवय हवी. हा स्वर आपल्या मनावर अनेक चांगले संस्कार करतो. मनाची स्थिरता ठेवतो. सातत्याने हा स्वर ऐकला तर मनाचा संयम वाढतो. एकाग्रता वाढवतो. सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी याची गरज आहे. 

। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Friday, April 10, 2020

इथेच आहे पण दिसत नाही, असे का ?


मारुन मुरगुटून कोणी हे ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही. कारण तसे ते शक्‍य नाही. विचाराचे स्वातंत्र्य सर्वानाच आहे. हे ओळखूनच हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग आपण निवडायचा आहे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

कां कमलकंदा आणि दुर्दरी । नांदणूक एकेची घरी ।
परी परागु सेविजे भ्रमरीं । जवळिलां चिखलुचि उरे ।। 58 ।। अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - किंवा कमलकंद आणि बेडूक यांची वस्ती एके ठिकाणीच असते. परंतु कमलांतील परिमळ (दूरचें) भुंगे येऊन, सेवन करून जातात व जवळच असलेल्या बेडकाला मात्र चिखलच शिल्लक राहातो.

आपल्याजवळच असते, पण आपणास त्याची कल्पना होत नाही. असे बऱ्याचदा घडते. अनेक गोष्टी आपल्या सानिध्यात असतात. या सर्वांचा बोध, माहिती आपल्याला होतेच असे नाही. यासाठी सर्वत्र आपली नजर असायला हवी. ही नजर केव्हा येते? यासाठी आपले अवधान असायला हवे. ते असेल तर शक्‍य आहे. म्हणूनच अवधानाला महत्त्व आहे. आत्मा आपल्या शरीरात आहे. पण त्याची जाणिव आपणास नसते. आपले प्रेम देहावरच जास्त असते. देहामुळे आपणास त्याची जाणिव होत नाही. मोह, माया या गोष्टीत आपण अडकलो आहोत. मायाजाळाचा पडदा इतका गडद आहे की, देहातला आत्मा आपणास समजतच नाही. जरी आपणास याची जाणिव झाली तरी हे समजले तरी आपण त्यात गुंतत नाही. असे का घडते? हे घडते म्हणून आपण दुःखी व्हायचे नाही. त्याचा त्रास, त्रागा आपण करून घ्यायचा नाही. आत्मज्ञानाची ओढ सर्वानाच असते नाही. सर्वांनी याकडे वळावे असे आपणास वाटते. पण तसे घडत नाही. काही नास्तिक असतात. म्हणून आपण त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. त्यांना हे का समजत नाही? असे आपणास निश्‍चित वाटत असेल. पण याकडे दुर्लक्ष करायचे. कारण कमळाजवळ असूनही बेडकाला कमळातील मध चाखता येत नाही. कमळ आणि बेडूक चिखलातच असतो. दोघेही एकाच ठिकाणी वास करतात तरीही बाहेरचा भुंगा सुगंधामुळे कमळाकडे येतो त्यातील मध चाखतो. बेडकाला मात्र चिखलच राहातो. असेच नास्तिकाचे आहे. त्याच्याजवळ आहे पण त्याला ते समजत नाही. त्याची जाणिव होत नाही. त्याला जाणिव करून देण्याचा प्रयत्न केला तरी ती त्याला होत नाही. म्हणून असाकडे दुर्लक्ष करायचे असते. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या विचारानुसार वागण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याला ते आवडते, हे आवडत नाही हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. जबरदस्ती करून आत्मज्ञान प्राप्तीकडे वळवता येत नाही. तो येत नाही. म्हणून आपणही या गोष्टीचे दुःख करायचे नाही किंवा जबरदस्तीही करायची नाही. बेडकासारख्या डरकाळी फोडायच्या की भुंगा होऊन मध खायचा हे आपणच ठरवायचे. त्यानुसार आपण आपली निवड करायची. भक्ती आणि प्रेमाने येथे ज्ञानप्राप्ती होते. मारुन मुरगुटून कोणी हे ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही. कारण तसे ते शक्‍य नाही. विचाराचे स्वातंत्र्य सर्वानाच आहे. हे ओळखूनच हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग आपण निवडायचा आहे. 


। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Thursday, April 9, 2020

नॅनो बायो विषयावर दुसरी आंतरराष्ट्रीय ट्विटर परिषद


न्यू कॉलेज मार्फत आयोजन
कोल्हापूर: नॅनो बायो विषयावरील भारतातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय ट्विटर परिषदेचे आयोजन न्यू कॉलेज, दादा पाटील महाविद्यालय कर्जत आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यावतीने सोमवार (ता. 13) ते  बुधवार (ता.15) एप्रिल या दरम्यान करण्यात आलेले आहे.  

कोरोना विषाणूच्या पार्श्वभमीवर विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र शासनाच्या वर्क फ्रॉम होमने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आणि कोरोना विषाणूला नियंत्रित करण्याच्या विषयावर पोस्टरच्या माध्यमातून सादरीकरण होणार आहे. ही परिषद online असल्याने प्रत्यक्ष भेटी गाठी ऐवजी घरात बसून सहभागी होता येणार आहे. 

21 दिवसाच्या लॉकडाऊन काळात होणारी एकमेव परिषद आहे. या परिषदेमध्ये आत्तापर्यंत जगभरातून 175 च्या वर संशोधकांनी सहभाग नोंदवला असून या परिषदेचे उदघाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्याचे नियोजन केले आहे. न्यू कॉलेज मार्फत या दुसऱ्या ट्विटर परिषदेमध्ये जास्तीत जास्त संशोधकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेचे चेअरमन व न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी केले आहे. सहभागासाठी संपर्क 9860282394 या नंबर वर करावा.

मनशुद्धीचां मार्गी । जैं विजयी व्हावें वेगी ।



लैंगिक विचार आपली ऊर्जा मोठ्या प्रमाणात नष्ट करत आहेत. कामाची हाव आपली शक्ती व्यर्थ घालवत आहे. शरीरात असणारी ही ऊर्जा साठवणे म्हणजेच ब्रह्मचर्य पाळणे होय. यासाठी ब्रह्मचर्याचा विचार हा उपयोगात आणायला हवा. संसारात राहूनही ब्रह्मचर्य पाळता येते.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8237857621


मनशुद्धीचां मार्गी । जैं विजयी व्हावें वेगी ।
तै कर्म सबळालागी । आळसु न कीजे ।। 139 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - मनाची शुद्धता होण्याच्या मार्गात आपण लवकरच विजयी व्हावें असें वाटत असेल, तर चित्त शुद्ध करण्याच्या कामीं समर्थ असणारें जे कर्म, तें आचरण करण्याच्या कामीं आळस करू नये.

साधनेत मन रमण्यासाठी, आत्मज्ञान प्राप्तीसाठी अंगी ऊर्जा असावी लागते. पण ही ऊर्जा येते कशी? ऊर्जा उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. ऊर्जा ही एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाते. हा ऊर्जेचा नियम आहे. याचा अर्थ ऊर्जा ही आपल्या शरीरातच असते. शरीरातील या ऊर्जेचा वापर आपण योग्य पद्धतीने करायला हवा. ही ऊर्जा योग्य कामासाठी उपयोगात आणायला हवी. यासाठी उपलब्ध ऊर्जेचे संवर्धन हे गरजेचे आहे. संवर्धनासाठी मनशुद्धी हवी. मनात चांगले विचार, आचार असतील तरच ऊर्जेचे संवर्धन होते. मनशुद्धीचे विविध मार्ग आहेत. समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेले मनाचे श्‍लोक जरी आठवले तरी मन शुद्ध होते. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. भक्ती हा मनशुद्धीचा उत्तम मार्ग आहे. भगवंताची भक्ती, सद्‌गुरुंची भक्ती यातून मनाचे पावित्र्य वाढते. पण येथे तर भक्तीतच मन लागत नाही. मग मन शुद्ध कसे होणार? साधनेतच मन रमत नाही. हे मन रमण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मन स्थिर होण्यासाठी शरीरात शांती उत्पन्न होईल, असा आचार ठेवायला हवा. तसा विचार करायला हवा. राग आला तर तो गिळायचा नाही, तो विसरायचा. गिळालेला राग पुन्हा वर येऊ शकतो. पण विसरलेला राग पुन्हा येण्याची शक्‍यता फारच कमी असते. दुसऱ्याचा द्वेष करण्याआधी स्वतःमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न करायला हवा. द्वेषामध्ये ऊर्जा खर्च करण्याऐवजी आपण चांगले काही तरी करून मोठे कार्य करण्यात ऊर्जा वापरायला हवी. मनशुद्धीसाठी मनाला असे वळण लावायला हवे. मन बदलले तर सर्व काही बदलू शकते. ऊर्जेच्या संवर्धनाचा विचार मनात जोपासायला हवा. अशी व्यर्थ जाणारी ऊर्जा आत्मज्ञान प्राप्तीसाठी वापरायला हवी. सध्या टिव्हीमुळे मनोरंजन होते. पण हे मनोरंजन आपल्या जीवनात, आचरणात बदल घडवते. याकडे लक्ष द्यायला हवे. लैंगिक विचार आपली ऊर्जा मोठ्या प्रमाणात नष्ट करत आहेत. कामाची हाव आपली शक्ती व्यर्थ घालवत आहे. शरीरात असणारी ही ऊर्जा साठवणे म्हणजेच ब्रह्मचर्य पाळणे होय. यासाठी ब्रह्मचर्याचा विचार हा उपयोगात आणायला हवा. संसारात राहूनही ब्रह्मचर्य पाळता येते. मुले कोणाला नको आहेत? सर्वांनाच हवी आहेत. पण गरजे पुरतेच याकामी उर्जा खर्ची घालायला हवी. त्याचा वापर करायला हवा. इतर वेळी तो विचार मनात आणून ऊर्जा नष्ट करू नये. ही ऊर्जा साठवायला हवी. काही संतांच्या मते ही ऊर्जा अगदी सहजपणे आत्मज्ञान प्राप्ती करून देऊ शकते. ही ऊर्जा ज्याने साठवली तो सहज आत्मज्ञानी होऊ शकतो. सहजसमाधी साध्य तो करू शकतो. यासाठी ब्रह्मचर्य हवे. ब्रह्मचर्याने मनाची शुद्धी होते. यासाठीच ब्रह्मचर्य पाळण्यात आळस करू नये.

। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Wednesday, April 8, 2020

तो भंगलिया आपैसे । स्वरुपचि ।।



मठ जसा फुटल्यावर आकाशाचे खरे रुप समजते तसे हा देह संपल्यानंतरच आपणास त्याची प्रचिती येते. देहात आहे तोपर्यंत त्याची माहिती घेण्याची आपण तस्तीही घेत नाही. त्यामुळे आपले खरे स्वरुप आपणास समजत नाही.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, 

मोबाईल 8237857621
ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरलें असे ।
तो भंगलिया आपैसे । स्वरुपचि ।। 142 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - ज्या प्रमाणे आकाश हें मठात मठाच्या आकाराचें झालेले दिसते पण तो मठ मोडल्यावर तें आकाश सहजच आपल्या मूळ रूपाने राहाते.

स्वतःचे रुप कसे आहे. कोण काळा असतो. कोण गोरा असतो. कोणी सावळे असते. हे बाह्यरुप आहे. बाह्यरुपात कोणी सुंदर असते तर कोण दिसायला कुरुप असते. पण हे रुप आहे ते देहाचे आहे. हा आकार अनुवंशीक रचनेनुसार ठरतो. विज्ञानाने आता सुंदर मुलांचीही निर्मिती केली जात आहे. अनुवंशीक रचनेत योग्य ते बदल करून आकार बदलता येऊ शकतो. रंग बदलला जाऊ शकतो. धान्याच्याही अशाच पद्धतीने जाती विकसित केल्या जात आहेत. उत्पादन वाढीचे जनुक घालून त्यांचे उत्पादन वाढविले जात आहे. विविध कीड रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता उत्पन्न केली जात आहे. पण या नव्या जाती फारश्‍या टिकावू नसतात. सुरवातीचे दोन तीन पिढ्यांमध्ये या जाती उत्तम उत्पादन देतात. त्यानंतर मात्र त्यांची गुणवत्ता राहात नाही. यावरुन मानवांमध्ये केले जात असलेल्या बदलावरही असाच परिणाम दिसणार हे निश्‍चित आहे. पण तरीही असे प्रयोग केले जात आहेत. भावी काळात नऊ महिने गर्भाशयात जीव वाढविण्याचे प्रकारही बंद होतील. असे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. पण याचे दुःष्परिणामही विचारात घ्यायला हवेत. सध्या दुःष्परिणामांचा विचारच केला जात नसल्याने अनेक गंभीर समस्या उभ्या राहण्याची शक्‍यता आहे. केवळ सध्यस्थितीचाच विचार केला जात आहे. सध्या फायदा मिळतो ना. मग पुढचा विचारच होत नाही. अशा दुरदृष्टीच्या अभावानेच सर्वत्र गंभीर समस्या उभ्या राहात आहेत. तापमानवाढ असो किंवा पर्यावरणाचा ह्यास असो किंवा सध्या विकसित होत असलेले नवे तंत्रज्ञान असो. केवळ त्यामध्ये वरवरचा व सध्यस्थितीचाच विचार दिसून येत आहे. बाह्यरंगालावरच सर्व भुलले जात आहेत. अंतरंगात डोकावण्याचा कोणी विचारच करत नाही. अशामुळेच खरे स्वरुप प्रकट होत नाही. खरे स्वरुप हे अंतरंगात सामावलेले आहे. पाण्याने भरलेल्या मठात आकाश दिसते. आपण सध्या मठातील आकाशच पाहात आहोत. पण हे आकाश खरे नाही. हा मठ फुटल्यानंतरच खरे त्याचे स्वरुप स्पष्ट होते. मठ म्हणजे देह आहे. आपण देहालाच खरे स्वरुप समजू लागलो आहोत. बाह्यरुपालाच खरे स्वरुप समजत आहोत. पण हे खरे स्वरुप नाही. मानवाचे खरे स्वरुप हे आत्मा आहे. या देहाच्या अंतरंगामध्ये असणारा आत्मा हेच मानवाचे खरे स्वरुप आहे. पण त्याकडे पाहण्यास आपणास वेळच नाही. मठ जसा फुटल्यावर आकाशाचे खरे रुप समजते तसे हा देह संपल्यानंतरच आपणास त्याची प्रचिती येते. देहात आहे तोपर्यंत त्याची माहिती घेण्याची आपण तस्तीही घेत नाही. त्यामुळे आपले खरे स्वरुप आपणास समजत नाही.

। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

Tuesday, April 7, 2020

लॉकडाऊनच्या काळात ११३ सायबर गुन्हे दाखल

    

मुंबई - सध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर  सर्वत्र लॉकडाऊनच्या असताना राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या  आदेशानुसार महाराष्ट्र सायबर विभागाने कडक पावले उचलली असून राज्यात 113 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी समाज माध्यम बाबत अधिक सतर्क राहून महाराष्ट्र सायबर विभागाला सहकार्य करावे असे आवाहन   विशेष पोलीस महानिरीक्षक सायबर विभाग यांच्यावतीने करण्यात येत आहे.

     या गुन्हेगारांना व समाजकंटकांवर  गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर  सायबर विभाग समन्वय साधून काम करत आहे. या करिता विभाग  टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  चालणाऱ्या गैरप्रकारांवर अचूक लक्ष ठेवून आहे.  
    
राज्यातील गुन्हे
महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये  ६ एप्रिल २०२० पर्यंत ११३  गुन्हे दाखल झाले आहेत .त्यामध्ये बीड १५, पुणे ग्रामीण ११, मुंबई ९, सातारा ७, जळगाव ७ , नाशिक ग्रामीण ६ , नागपूर शहर ४ ,नाशिक शहर ४, ठाणे शहर ४, नांदेड ४, गोंदिया ३, भंडारा ३ , रत्नागिरी ३, जालना ३, परभणी २, अमरावती २, नंदुरबार २, लातूर १, नवीमुंबई १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे .

बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल  गुन्ह्यांमध्ये आरोपींनी फेसबुक किंवा व्हाट्सअँप वर पोस्ट टाकून किंवा शेअर करून त्याद्वारे कोरोना महामारीला जातीय रंग देऊन, त्या द्वारे धार्मिक तेढ व समाजात अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे.अशाच प्रकारच्या  एका गुन्ह्याची नोंद लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देखील करण्यात आली .सदर आरोपी ने आपल्या फेसबुक प्रोफाइलवर कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकली, ज्यामुळे त्या परिसरात अशांतंता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो . 
         
आवाहन
   महाराष्ट्र सायबर मार्फत असे आवाहन करण्यात येते की, जर आपणास कोणी अपरिचित व्यक्तीने किंवा आपण ज्या व्हाट्सअँप ग्रुप्सवर आहात त्यावर कोणी परिचित , अपरिचित व्यक्तीने असे विडिओ, फोटोज ,मेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स ज्यामुळे धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण होऊ शकते, असे मेसेज पाठवत असेल , तर लगेच त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये द्यावी .तसेच आपण असे विडिओ, फोटोज ,मेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स कोणालाही पाठवू नयेत व त्वरित काढून टाकावी.
   
 आपण जर  व्हाट्सअँप ग्रुपचे निर्माते ,ऍडमिन असाल तर चुकीच्या पोस्ट्स अथवा अफवा पसरवणारे मेसेजेस व विडिओ ग्रुपवर येणार नाहीत याची खबरदारी घेणे तुमचे कर्तव्य आहे . तसे न केल्यास *तुमच्यावर पण गुन्हा दाखल केला जाऊ शकतो*. त्यासाठी आपण group सेटिंग मध्ये only admin असे setting करावे.
     
संपर्क साधावा
   महाराष्ट्र सायबर सर्व नागिरकांना आवाहन करते की कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या whatsapp  किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media)पसरवू नयेत, तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नये . काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशन कडे संपर्क साधावा. सायबर गुन्ह्यांबाबतची  माहिती www.cybercrime.gov.in वर पाठवावी. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे व महाराष्ट्र सायबर विभागाला सहकार्य करावे.
      

म्हणोनियां देवा। जळो जळो झुंज ।


दिवसातील काही क्षणजरी तू दिलेस तरी तुझा विजय निश्‍चित आहे. सोऽहम, सोऽहम चा अखंड स्वर हा सुरूच आहे. तो फक्त तुला तुझा कानांनी ऐकायचा आहे. मनाने तुला तो अनुभवायचा आहे. त्या स्वरावर तुला तुझे मन नियंत्रित करायचे आहे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

म्हणोनियां देवा। जळो जळो झुंज । माने ना हें मज। कांही केल्या ।। 335 ।।
स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी

ही झुंज कोणाशी आहे ? स्वतःच स्वतःशी ही झुंज आहे. पण मी पणामुळे ही झुंज नकोशी झाली आहे. हे माझं आहे? ते माझं आहे? या मोहाने लढण्याची इच्छाच नष्ट होऊ लागली आहे. धकाधकीच्या जीवनात साधना करायला वेळच नाही. एक-एक मिनिट मोलाचा झाला आहे. एक मिनिटात आपण साऱ्या जगभरात संदेश पोहोचवू शकतो. विकासाने इतका वेग घेतला आहे. विकासाच्या या वेगासोबत आपणाला राहावे लागणार आहे. हा वेग पकडला तरच उज्ज्वल भवितव्य घडणार आहे. हा वेग पकडण्यातच सगळा वेळ जात आहे. दैनंदिन जीवनात थांबायलाही वेळ नाही. अशी स्थिती उत्पन्न झाली आहे. अशावेळी साधनेसाठी वेळ कसा देता येऊ शकेल. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी झुंज देण्यास वेळच नाही. दररोजच्या रोजी-रोटीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. अशावेळी आत्मज्ञानाचा विचार कसा येईल. ताज्या घडामोडीतच सगळा वेळ जात आहे. विश्रांती म्हणून फिरायला गेले तरीही तेथेही तेच सुरू होते. मोबाईल फोनमुळे सारे जीवनच व्यस्त झाले आहे. रेल्वेतून जाताना खिडकीतून डोकावायलाही वेळ नाही. निसर्गाचा स्वाद घेऊन मन मोकळे करायलाही वेळ नाही. जेवतानाही टिव्हीत डोकावतच जेवन होते. जेवनही त्याच विचारात होते. अशा धकाधकीच्या जीवनात साधनेचा विचार कसा येऊ शकेल. इतके व्यस्त जीवन झाले आहे. आत्मज्ञानासाठी झुंजण्याचा विचारच नकोसा झाला आहे. आत्मज्ञानी होऊन करायचे तरी काय? तिन्ही जगाचे ज्ञान घेऊन काय मिळवायचे? यापेक्षा नको ते आत्मज्ञान रोजचे जीवन धकाधकीचे असले तरी सुंदर आहे. सुखी आहे. या मोहाने आता आपण ग्रस्त झालो आहोत. जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यास आपणास वेळच नाही. समजून घेऊन तरी काय करणार? अशा विचाराने आता लढण्याचे सामर्थ्यही उरलेले नाही. अशा विचाराने आपण आत्मज्ञानी होऊ ही आशाच आता संपली आहे. अशा या ग्रस्तव्यक्तिला स्वामीनी सल्ला दिला. स्वामी म्हणाले अरे तुला कोण लढायला सांगते, फक्त निमित्त मात्र तर तुला व्हायचे आहे. लढाई तर तू लढतच आहेस. फक्त या लढाईकडे तुला लक्ष द्यायचे आहे. तु नको म्हणालास तरी ही तुझी लढाई सुरूच आहे. सुरूच राहणार आहे. फक्त तुझे अवधान हवे आहे. श्‍वासाची ही लढाई थांबली तर तुझे जीवनच संपणार आहे. फक्त सुरू असणाऱ्या या लढाईकडे अवधान दे. दिवसातील काही क्षणजरी तू दिलेस तरी तुझा विजय निश्‍चित आहे. सोऽहम, सोऽहम चा अखंड स्वर हा सुरूच आहे. तो फक्त तुला तुझा कानांनी ऐकायचा आहे. मनाने तुला तो अनुभवायचा आहे. त्या स्वरावर तुला तुझे मन नियंत्रित करायचे आहे. त्या स्वरात डुंबायला शिक. म्हणजे तुझा आत्मज्ञानावर विजय निश्‍चित आहे. या लढाईत फक्त तु निमित्त मात्र हो.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621