Monday, April 20, 2020

गाय धड जोडे गोमटी । ते तैंचि पिवों ये किरीटी ।


 शेती कशी करायची याची हातोटी शिकायला हवी. गुरू प्रसन्न आहेत. शिष्यानेही अध्यात्माचा अभ्यास केला आहे. पण आत्मज्ञान कसे प्राप्त होते हेच शिष्य जाणत नसेल तर तो आत्मज्ञानी कसा होईल? 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

गाय धड जोडे गोमटी । ते तैंचि पिवों ये किरीटी ।
जैं जाणिजे हातवटी । सांजवणीची ।। 1483 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - गाय चांगली धड प्राप्त झाली असता तिचे दूध तेव्हांच पिता येते कीं, जेव्हां धार काढण्याची हातवटी कळते.

गाय दुधाळ आहे. कासेला भरपूर दूधही आहे. पण कासेतून दूध कसे काढायचे? याचे तंत्रच अवगत नाही. मग दुधाळ गाय खरेदी करून दूध मिळणार आहे का? जनावरे पाळायची आहेत. मग यासाठी आवश्‍यक ते शास्त्र जाणून घ्यायला नको का? ती कशी पाळायची याचे तंत्र जाणून घ्यायला हवे. जनावरांना चारा किती द्यायचा, पाणी किती द्यायचे कधी द्यायचे. किती प्रमाणात द्यायचे हे सर्व अभ्यासायला हवे. दुधाचे उत्पादन योग्य प्रकार करायचे असेल, तर योग्य ते घटक जनावरांना द्यायला हवेत. त्याची वेळही ठरलेली असते. जनावरांच्या वाढीसाठी आवश्‍यक मुलद्रव्ये द्यायला हवीत. खुराक कसा असावा किती प्रमाणात हवा याचेही नियोजन हवे. तरच दुधाचे उत्पादन योग्य प्रमाणात होऊ शकेल. जनावरे सांभाळताना त्याचे अर्थ शास्त्र जाणून घ्यायला हवे. जनावरांच्या खुराकावर किती खर्च होतो. त्याच्या संगोपनासाठी एकूण खर्च किती येतो. त्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होते का? या उत्पादनातून योग्य तो नफा हाती लागतो का? याचे गणितही मांडता यायला हवे. तोटा सहन करून कोणताही उद्योग चालत नाही. शेती हा एक उद्योग आहे. या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तो करायला हवा. जोडधंदा म्हणून जनावरे पाळली जातात. पण ती पाळताना तोटा सहन करावा लागू नये याची काळजी घ्यायला नको का? जोडधंदा हा मुख्य उद्योगाला हातभार लावण्यासाठी असतो. मुख्य पिकाला फटका बसला तर त्या फटक्‍याची झळ शेतकरी कुटुंबाला बसू नये यासाठी जोडधंदे आहेत. व्यवसाय करताना त्याचा प्रथम अभ्यास करायला हवा. या व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्‍यक ते नियोजन करायला हवे. तसा विचार करायला हवा. शेतात बी पेरले की ते उगवते. पण ते कसे पेरायला हवे. उत्पादन अधिक येण्याच्या दृष्टीने कसे पेरायचे? याचे तंत्र जाणून घ्यायला हवे. केळीचे पीक 40 ते 45 महिने उत्पादन देते. खोडवा, निडवा याचे योग्य व्यवस्थापन करून हा कालावधी कमी करता येतो. विशेष म्हणजे उत्पादनही तेवढेच ठेवून. हे नवे तंत्र आत्मसात करून शेती करायला हवी. तीस महिन्यात केळीचे खोडवा, निडवा घेता आला तर उरलेल्या कालावधीत एखादे पीक सहज घेता येणे शक्‍य आहे. घड कोणत्या बाजूला पडतो त्याच्या विरुद्ध दिशेला पहिल्या पिकाचे घड तयार होण्याआधीच खोडवा ठेवून पिकाचा कालावधी कमी करता येतो. असे नवे तंत्र आत्मसात करायला हवे. तसेच असे नवे तंत्र स्वतः शोधायला हवे. नियोजनातून, अभ्यासातून होणाऱ्या चुका दुरुस्त करत उत्पादन वाढीवर भर दिला तर शेतीमध्ये निश्‍चितच प्रगती होऊ शकेल. शेती कशी करायची याची हातोटी शिकायला हवी. गुरू प्रसन्न आहेत. शिष्यानेही अध्यात्माचा अभ्यास केला आहे. पण आत्मज्ञान कसे प्राप्त होते हेच शिष्य जाणत नसेल तर तो आत्मज्ञानी कसा होईल? यासाठी आत्मज्ञान प्राप्तीचीही हातोटी शिष्याने समजून घ्यायला हवी. तरच तो आत्मज्ञानी होईल. 


। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment