Tuesday, April 28, 2020

देखें अग्निमाजीं घापती । तियें बीजें जरी विरुढती ।


जमीन शेकविण्याऐवजी वाढलेले तण फुलोऱ्यावर येणाआधीच ते जमीनीत गाढण्यात येते. उसामध्ये पाचट कुजवून पिकांमध्ये सेंद्रिय खत तयार केले जात आहे. जमीनीला आवश्‍यक सेंद्रिय कर्ब उपलब्ध होत नसल्याने आता हा प्रयोग अनेक शेतकरी करत आहेत. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

देखें अग्निमाजीं घापती । तियें बीजें जरी विरुढती ।
तशी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ।। 346।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - पाहा, विस्तवात घातलेले (भाजलेले) बी जर उगवेल, तर शांतिहीन पुरुषाला सुखप्राप्ति होऊ शकेल.

पावसाळ्यानंतर डोंगरावर वाढलेले गवत वाळते. या गवताला आग लावली तर त्या धगीमध्ये अनेक वृक्ष, रोपे नष्ट होतात. गवताचे बीजही करपून निघते. अशा या वनव्यामुळे अनेक ठिकाणी डोंगर ओसाड होताना पाहायला मिळत आहेत. आगीत भाजलेले बी अंकुरत नाही. हाच विचार घेऊन शेतजमीनी भाजण्याचाही प्रयोग अनेक शेतकरी करतात. शेतात तणांचा प्रादुर्भाव अधिक वाढला असेल तर, उन्हाळ्यामध्ये शेत जमीन भाजून घेतात. नांगरट करून सूर्याच्या धगीत जमीन शेकवली जाते. पिकाचे उरलेले अवशेष पाला पाचोळा शेतात जाळून जमीन शेकवली जाते. या धगीत तणांचे बी शेकले जाते. भाजलेले हे बी अंकुरत नाही. कीड - रोगांचेही बीजांडे नष्ट होतात. साहजिकच तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. मोठ्या प्रमाणात तणांचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात ही पद्धत वापरली जाते. शेतात आग केल्याने जमिनीतील आवश्‍यक जिवाणूही नष्ट होतात. यामुळे आता जमिन भाजण्याची किंवा शेकण्याची पद्धत आता वापरली जात नाही. त्याऐवजी तण कुजविण्याची पद्धत रूढ झाली आहे. जमीन शेकविण्याऐवजी वाढलेले तण फुलोऱ्यावर येणाआधीच ते जमीनीत गाढण्यात येते. उसामध्ये पाचट कुजवून पिकांमध्ये सेंद्रिय खत तयार केले जात आहे. जमीनीला आवश्‍यक सेंद्रिय कर्ब उपलब्ध होत नसल्याने आता हा प्रयोग अनेक शेतकरी करत आहेत. सेंद्रिय कर्बामुळे जमीनीतील जिवाणूंची कार्यक्षमता वाढते. पिकांच्या वाढीला जोर मिळतो. पीक जोमात असेल तर त्यावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. निरोगी शरीरात जशी रोगप्रतिकारक क्षमता अधिक असते तसेच जोमात वाढलेल्या पिकांमध्येही रोगप्रतिकार शक्ती अधिक असते. तणांचा प्रादुर्भाव असणाऱ्या शेतात भरघोस उत्पन्नाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. पण फुलोरा येण्यापूर्वी हेच तण शेतात कुजविले तर सेंद्रिय घटकांच्या निर्मितीचा पिकाला फायदा होऊ शकेल. ताग, ढेच्या ही हिरवळीची खते जशी शेतात कुजविली जातात तशी तणही कुजविली जाऊ शकतात. ताग, ढेंच्या लवकर कुजतात. त्यामुळे ते कार्यक्षम घटक जमिनीत निर्माण करू शकतात. तसे तण कुजण्यास जरी वेळ लागला तरी त्यातूनही कार्यक्षम घटक तयार होऊ शकतात. तण देई धन हा विचार घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात प्रतापराव चिपळूणकर हे शेतकरी शेती करत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन राज्यात अनेक शेतकऱ्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे. बदलत्या शेतीपद्धतीत सेंद्रिय खताचा तुटवडा जाणवत आहे. जनावरांची संख्या घटल्याने याचा फटका सेंद्रिय खताच्या निर्मितीवर झाला आहे. सेंद्रिय खताचा वापरच शेतामध्ये केला जात नाही. अशाने जमिनी नापिक होण्याचा धोकाही बळावला आहे. शेतांची उत्पादकता झपाट्याने घटताना दिसत आहे. जमिन पिकाऊ राहिली तरच शेती टिकेल. यासाठी ती पिकाऊ ठेवण्यासाठी आवश्‍यक असणारे उपायही योजने गरजेचे आहे. अध्यात्मातही तसेच आहे. भाजलेले बी उगवत नाही. सद्गुरु बीजाची पेरणी शिष्यामध्ये करतात. ते बीज जर भाजले गेले तर उगवणार नाही. यासाठी ते बीज भाजले जाणार नाही याची काळजी शिष्याने घ्यायला  नको का? दिलेल्या मंत्रबीजाची वाढ कशी होईल हे शिष्याने पाहायला नको का? जसे शांतिहिन पुरुषाला सुखप्राप्ती होत नाही. तसे दिलेल्या बीजाचे संगोपन न करणाऱ्या शिष्याला आत्मज्ञानाच्या सुखाची प्राप्ती होत नाही. यासाठी  बीजाची योग्य काळजी घेऊन प्रगती साधायला हवी.

। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment