Friday, April 10, 2020

इथेच आहे पण दिसत नाही, असे का ?


मारुन मुरगुटून कोणी हे ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही. कारण तसे ते शक्‍य नाही. विचाराचे स्वातंत्र्य सर्वानाच आहे. हे ओळखूनच हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग आपण निवडायचा आहे. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

कां कमलकंदा आणि दुर्दरी । नांदणूक एकेची घरी ।
परी परागु सेविजे भ्रमरीं । जवळिलां चिखलुचि उरे ।। 58 ।। अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - किंवा कमलकंद आणि बेडूक यांची वस्ती एके ठिकाणीच असते. परंतु कमलांतील परिमळ (दूरचें) भुंगे येऊन, सेवन करून जातात व जवळच असलेल्या बेडकाला मात्र चिखलच शिल्लक राहातो.

आपल्याजवळच असते, पण आपणास त्याची कल्पना होत नाही. असे बऱ्याचदा घडते. अनेक गोष्टी आपल्या सानिध्यात असतात. या सर्वांचा बोध, माहिती आपल्याला होतेच असे नाही. यासाठी सर्वत्र आपली नजर असायला हवी. ही नजर केव्हा येते? यासाठी आपले अवधान असायला हवे. ते असेल तर शक्‍य आहे. म्हणूनच अवधानाला महत्त्व आहे. आत्मा आपल्या शरीरात आहे. पण त्याची जाणिव आपणास नसते. आपले प्रेम देहावरच जास्त असते. देहामुळे आपणास त्याची जाणिव होत नाही. मोह, माया या गोष्टीत आपण अडकलो आहोत. मायाजाळाचा पडदा इतका गडद आहे की, देहातला आत्मा आपणास समजतच नाही. जरी आपणास याची जाणिव झाली तरी हे समजले तरी आपण त्यात गुंतत नाही. असे का घडते? हे घडते म्हणून आपण दुःखी व्हायचे नाही. त्याचा त्रास, त्रागा आपण करून घ्यायचा नाही. आत्मज्ञानाची ओढ सर्वानाच असते नाही. सर्वांनी याकडे वळावे असे आपणास वाटते. पण तसे घडत नाही. काही नास्तिक असतात. म्हणून आपण त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. त्यांना हे का समजत नाही? असे आपणास निश्‍चित वाटत असेल. पण याकडे दुर्लक्ष करायचे. कारण कमळाजवळ असूनही बेडकाला कमळातील मध चाखता येत नाही. कमळ आणि बेडूक चिखलातच असतो. दोघेही एकाच ठिकाणी वास करतात तरीही बाहेरचा भुंगा सुगंधामुळे कमळाकडे येतो त्यातील मध चाखतो. बेडकाला मात्र चिखलच राहातो. असेच नास्तिकाचे आहे. त्याच्याजवळ आहे पण त्याला ते समजत नाही. त्याची जाणिव होत नाही. त्याला जाणिव करून देण्याचा प्रयत्न केला तरी ती त्याला होत नाही. म्हणून असाकडे दुर्लक्ष करायचे असते. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या विचारानुसार वागण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याला ते आवडते, हे आवडत नाही हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. जबरदस्ती करून आत्मज्ञान प्राप्तीकडे वळवता येत नाही. तो येत नाही. म्हणून आपणही या गोष्टीचे दुःख करायचे नाही किंवा जबरदस्तीही करायची नाही. बेडकासारख्या डरकाळी फोडायच्या की भुंगा होऊन मध खायचा हे आपणच ठरवायचे. त्यानुसार आपण आपली निवड करायची. भक्ती आणि प्रेमाने येथे ज्ञानप्राप्ती होते. मारुन मुरगुटून कोणी हे ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही. कारण तसे ते शक्‍य नाही. विचाराचे स्वातंत्र्य सर्वानाच आहे. हे ओळखूनच हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग आपण निवडायचा आहे. 


। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment