Monday, December 31, 2012

सेवा

जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा ।
तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ।।

सेवा म्हणून काम करण्याची प्रथा आता लोप पावत आहे. यावरून मानसाचा स्वभाव किती बदलत चालला आहे हे समजते. आर्थिक गणितांमुळे माणूस बदलतो आहे. समिकरणे बदलत चालली आहेत. जीवन जगणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उद्या पोट कसे भरायचे याची काळजी त्यांना लागून राहिली आहे. अशा या संकटांतच शेतकरी नुकसानीमुळे आत्महत्या करू लागले आहेत. नुकसान पटविण्याची ताकद आता त्याच्यामध्ये राहिलेली नाही. या बदलत्या काळात सेवाधर्म महत्त्वाचा ठरणार आहे. सेवेमुळे मनुष्यास आधार भेटतो. सेवेमुळे मनुष्य सुखावतो. सेवेमुळे मनुष्यचा बोजा हलका होतो. संकटात सापडलेल्या, खचलेल्या मनांना सेवेने दिलासा मिळतो. यासाठी माणसांमध्ये सेवाभाव उत्पन्न करण्याची गरज आहे. एकमेकांमध्ये हा भाव उत्पन्न झाल्यास खचलेली मने दुभंगणार नाहीत. त्यांच्या हातून गैरकृत्य होणार नाही. सेवेचा गैरफायदा घेणारेही असतात. पण सेवा हा धर्म माणणाऱ्या व्यक्तींनी निःस्वार्थी भावाने सेवा केल्यास गैरफायदा घेणाऱ्यांचीही मने बदलू शकतात. त्यांच्यामध्येही हा सेवाभाव उत्पन्न करण्याचे सामर्थ यामध्ये आहे. याचा विचार करून ही सेवा करायला हवी. प्रत्येक मानवामध्ये भगवंत आहे असे समजून सेवा करायला हवी असे अध्यात्म सांगते. दुसऱ्याला सुख देण्याने स्वतःला सुख मिळते. दुसऱ्याचे दुःख पुसायला शिकले पाहिजे. यामध्ये सेवा हा भाव असायला हवा. जेथे सेवा आहे तेथे प्रेम आहे. जिव्हाळा आहे. आपुलकी आहे. सेवेचे भाव संपतो तेव्हा तेथे व्यापार होतो. व्यापारात मी तू हा भाव येतो. त्याचे मोजमाप होते. उचनिच हा भाव येतो. तेथे आपुलकी, प्रेम, जिव्हाळा राहात नाही. दुःख नांदते. अशाने मनाला उभारी मिळत नाही. मन खचते. यासाठी सेवा हा भाव जोपासून व्यवहार करायला हवेत. त्याचा व्यापार होता कामा नये. ही काळजी घ्यायला हवी. अध्यात्मातही सेवा हा भाव ठेवूनच सेवा करायला हवी. अन्यथा तोही व्यापार होतो.

Sunday, December 30, 2012

शेतकरी आंदोलनाची दिशा बदलायला हवी

28 नोव्हेंबरला संध्याकाळी कळंबा कारागृहा बाहेर मोठी गर्दी झाली होती. आजपर्यंत एकदाही एवढी गर्दी कधी कारागृहासमोर पाहायला मिळाली नाही. 15-20 आलिशान गाड्यांचा ताफाच उभा होता. अहो नुसते कारागृहासमोरील रस्त्यावर गाडी उभी केली तर पोलिस चौकशीला येतो. पण त्याचदिवशी काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले. उत्सुकता म्हणून थोडी चौकशी केली तर समजले की शेतकरी संघटनेच्या 72 कार्यकर्त्यांना कळंबा कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांना जामिनावर सोडण्यात येत आहे. उसाला तीन हजार दर मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन केले म्हणून त्यांना कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यांची दिवाळीही कारागृहातच साजरी झाली. यामुळे निराश झालेले त्यांचे कुटुंबीय त्यांना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहात होते.

12 नोव्हेंबरला पुणे जिल्ह्यात खासदार राजू शेट्टी यांना अटक करण्यात आल्यानंतर आंदोलन चिघळले. दगडफेक, तोडफोड, जाळपोळ झाली. या कारणांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. राज्यभर ही धरपकड सुरू होती. काही ठिकाणी हवेत गोळीबारही करण्यात आले. सांगलीत तर गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाला. तेव्हापासून हे सर्व कार्यकर्त्ये कळंबा कारागृहात होते.

दरासाठीच आंदोलन सुरू करताना आता बारामती, इंदापूरकर सम्राटांची दिवाळी गोड करू देणार नाही. अशी घोषणा केली होती. पण झाले उलटेच दिवाळीचा सण शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कारागृहात साजरा करावा लागला. पण इतके करूनही तीन हजार रुपयांचा दरही उसाला मिळालाच नाही. सुरवातीला 2300 चा दर कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांसाठी निश्‍चित झाला होता. पण हा दर शेतकरी संघटनेने फेटाळत आंदोलन अधिक तीव्र केले. हिंसक मार्गाचा अवलंब केला. अनेक ठिकाणी तोडणीच्या ठिकाणी अडथळे आणण्यात आले. गाड्यांचे टायर फोडण्यात आले. ऊस तोड बंद पाडण्यात आली. पण हे सर्व करताना हे कोणाचे करत आहोत हे शेतकरी संघटनेने विचारात घ्यायला हवे होते. ज्यांची तोड रोखली तेही शेतकरीच होते, परके नव्हते. आपलेच बांधव होते काही ठिकाणी कारखान्याच्या संचालकांची तोड रोखण्यात आली, तेथेही अशीच तोडाफोडी करण्यात आली. पण हे संचालक कोणी दुसरे आहेत का? त्यांना निवडून कोण देतो? हे शेतकरी सभासदच ना? संचालकांच्या मालकीचा कारखाना आहे का? तसेही नाही, मग त्यांचे नुकसान करून स्वतःच रोष का ओढवून घेतला गेला.

या सर्व गोष्टींचा विचार केला तर असे दिसते की आंदोलनाची ही दिशा निश्‍चितच चुकीची होती. निवडलेला मार्ग चुकीचा होता. आजकाल काहीही झाले की दंगे केले जातात. जनतेला वेठीस धरले जाते. बस, एसटी या नेहमीच फोडल्या जातात. हे आता नेहमीचेच झाले आहे. सरकारला आता हीच भाषा समजते असा चुकीचा समज झाल्याने यासाठी आता आंदोलनेही अशीच होत आहेत. जाळपोळीच्या घटना घडल्यावरच सरकार जागे होते. पण यावेळी सरकारने यात भागच घेतला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दर कारखान्यांनी ठरवावा सरकार यात हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केले. सरकारचेही थोडे चुकले. सरकारने प्राथमिक बोलणी करायला हवी होती चर्चेतून पळवाट काढल्यानेच शेतकरी चिडले. पण सरकार तरी काय करणार म्हणा? दर शेवटी कारखानाच ठरवतो. मग शेतकऱ्यांनीही दहशतीचा मार्ग अवलंबला. पण अशाने हे आंदोलन म्हणजे चळवळ आहे असे यंदा कोठेच वाटले नाही. शेट्टी यांनी यापूर्वी अनेक आंदोलने केली आहेत. पण त्यामध्ये चळवळ आहे. असे वाटत होते. तो एक शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारलेला लढा आहे असे वाटत होते. पण यंदा मात्र हे चित्र दिसले नाही. यामध्ये राजकीय हितच पाहायला मिळाले. पाण्यासाठी शेट्टी यांनी काढलेली यात्रा गांधीजींच्या दांडी यात्रेची आठवण करून देणारी होती. पण आता शेट्टी यांची ही चळवळ बदललेली आहे. अहिंसेचा मार्ग हिंसेत रूपांतरित झाला आहे. अशी
दहशत पसरवून दर देण्यासाठी सरकारला. कारखानदारांना भाग पाडायचे हे एखाद्या चळवळीच्या संघटनेला शोभणारे निश्‍चितच नाही. नेमकी ही चूक का झाली. शेतकरी नेमका का भडकला? यालाही कारणे असतीलही पण थोडा संयम बाळगायला हवा होता.

शेतकरी आंदोलने यापूर्वीही झाली. पण शेतकऱ्यांनी जाळपोळ करून दहशत माजवल्याचे फारसे ऐकण्यात, पाहण्यात आले नाही दगडफेकीच्या घटना या होत असतात, पण त्यातही मर्यादा असते. मर्यादा ओलांडण्याच्या घटना फारच क्वचित पाहायला मिळतात. शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत संयमाने आंदोलने केली आहेत. पोलिसांचा लाठीमार खाल्ला आहे. पण त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांच्या गाड्या जाळल्याच्या घटना प्रथमच घडल्या आहेत एकंदरीत पाहता पूर्वीच्या आंदोलनात दहशत पसरविणे हा भाग नव्हता. दहशत पसरवून फारसे काहीही हातीही लागत नाही दहशत बसविणे म्हणजे वचक बसविणे असे होत नाही दहशत आणि वचक यामध्ये निश्‍चितच फरक आहे दहशतीने कायमची वचक बसते हा गैरसमच आहे वचक बसविण्यासाठी योग्य मार्ग अवलंबिणे गरजेचे होते आपला देश आज स्वातंत्र्यात आहे हे सरकार आपणच निवडून दिलेले आहे, स्वातंत्र्यात जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी आंदोलन हे जरूर केले पाहिजे पण त्याचा मार्ग हिंसेचा, दहशतीचा असेल तर तो निश्‍चितच चुकीचा आहे,

साखर कारखाने हे सहकारी आहेत. सहकारात एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे ब्रीद वाक्‍य आहे. सध्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे कारखाने हे सहकारी राहिले नाहीत असेच वाटते. सहकार आता संपला आहे का? कारखाने काढणारे कोणी व्यापारी नाहीत. शेतकरीच आहेत. यामध्ये सभासदही सर्व शेतकरीच आहेत. व्यापारी नाहीत. मग कारखान्यावर निवडून गेलेले संचालकही शेतकरीच आहेत आणि ते शेतकऱ्यांनीच निवडून दिलेले आहेत. मग ते संचालक झाल्यानंतर स्वतः कारखान्याचे मालक असल्यासारखे व्यवहार करतात का? त्यांची वागणूक व्यापाऱ्यासारखी लूटीची असते का? अशा शंका आता डोकावू लागतात. सर्वच संचालक असे असतात असे नाही

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले तीनचार दशके एकाच व्यक्तीची सत्ता कारखान्यावर राहिलेली आहे अशी अनेक उदाहरणे आहेत. कारखान्याचे संस्थापकही तेच आहेत. विशेष म्हणजे हे साखर कारखाने योग्य प्रकारे सुरू असून प्रगतीही करत आहेत, तसे त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत

2009 मध्ये शेतकऱ्यांनी असेच दरासाठी आंदोलन केले. त्यावेळी कारखानदार व शेतकरी संघटना यांच्यात तडजोड होऊन कोल्हापूर जिल्ह्यासाठी 2600 रुपये अंतिम दर ठरविण्यात आला. पण जिल्ह्यातील कागलचा शाहू कारखाना वगळता इतर कोणताही कारखाना इतका दर देऊ शकलेला नाही. गेल्या दोन वर्षात कारखान्यांनी अंतिम बिले अद्यापही अदा केलेली नाहीत. आंदोलने करूनही बिले कोठे दिली गेली आहेत. आंदोलन यशस्वी झालेच नाही. यासाठी आंदोलन यशस्वी होण्यासाठी व आपला उद्देश साध्य होण्यासाठी आंदोलनाची दिशा निश्‍चित करायला हवी. हिंसेच्या मार्गाने काहीच मिळत नाही. उलट नुकसानच होते. आंदोलक शेतकऱ्यांचा ऊसही कारखाने उचलताना राजकारण करणार. यात नुकसान कुणाचे? शेवटी शेतकरीच यात भरडला जातोय. यासाठी आंदोलनाची दिशा ही अहिंसेच्या मार्गाने असावी व कारखान्याच्या मर्मावर बोट ठेवणारी असावी. तरच यापुढील काळात शेतकऱ्यांना फायदा होईल. हिंसक आंदोलनामुळेच कारखाने दर देतात असे आत्तापर्यंत कधीच घडलेले नाही. कारखानदार पळवाटा शोधून शेतकऱ्यांची फसवणूक करतात आणि वेळ गेल्यावर शेतकरी मिळाले त्यात समाधान मानून आंदोलनामुळे इतके तरी मिळाले असे म्हणत समाधान मानतात. पण यापूर्वी कोठे आंदोलने झाली होती. त्यावेळी दर व्यवस्थित दिले जात होतेच ना? मग आता आंदोलनामुळे कारखान्यावर वचक बसला आहे. असे होतच नाही.

कारखान्यावर अहिंसक मार्गाने वचक ठेवायला हवी. समोरासमोरच्या लढाईत आपलेच नुकसान अधिक होते. यासाठी गनिमीकावा करायला हवा. आत्तापर्यंत झालेली युद्धे ही गनिमीकाव्यामुळेच जिंकता आली आहेत. आंदोलनेही गनिमीकाव्यानेच जिंकायला हवीत. यासाठी अहिंसेचा मार्ग अवलंबून कारखान्यावर वचक ठेवण्यासाठी गनिमीकावा करायला हवा.

कारखान्याच्या संचालकांना कोंडीत पकडायला हवे. यासाठी कारखान्याच्या कारभारात पारदर्शकता आणण्याची गरज आहे. गाळप, साखर उत्पादन किती होते. ही आकडेवारी जाहीर केली जाते. पण त्याबरोबरच इतर उत्पादनांचीही माहिती द्यायला हवी. कारखान्याचा सर्व आर्थिक व्यवहार हा पारदर्शक करण्यासाठी लढा उभारायला हवा. यामुळे टेंडरमध्ये होणारे घोटाळे, पोत्यामागे केलेली लूट, साखरेला मिळालेला दर व प्रत्यक्षात दाखवलेले दर, उसाच्या वजनात केलेली तफावर (काटामारी) या सर्व घोटाळ्यावर प्रकाश टाकता येईल. कारखान्याच्या प्रत्येक सभासदाला याची सखोल माहिती पुरविण्याची व्यवस्था कारखान्याने करावी. यासाठी कारखान्यावर दबाव आणायला हवा. तरच हे सर्व शक्‍य होणार आहे. सध्या ऑनलाइन सर्व माहिती दिली जाऊ शकते. पारदर्शकता आणण्यासाठी सर्व आकडेवारी ऑनलाइन उपलब्ध करून दिल्यास घोटाळे आपोआपच बाहेर येतील. यामुळे कारखान्यावर वचक बसेल. उसाचा दर ठरवताना यामुळे शेतकऱ्यालाच याचा आपणाला किती दर कारखाना देऊ शकेल याची कल्पना येईल. संचालक मंडळाला असे कोंडीत पकडून दर देण्यास भाग पाडता येऊ शकेल. साखरेच्या दराच्या प्रमाणात उसाला दर देताना कोणत्या अडचणी येतात हे सभासद शेतकऱ्यांना लक्षात आल्यानंतर हे प्रश्‍न कसे सोडवता येतील यावर खुली चर्चाही होऊ शकते. यामुळे शेतकरी स्वतःच्या फायद्यासाठी कारखान्याचा फायदा कसा होईल याला निश्‍चितच प्राध्यान्य देतील. कारखाना कसा तोट्यात आले हेही यातून स्पष्ट होईल. खरेचित्र स्पष्ट झाल्यानंतर त्यावर विचारविनिमयातून विविध मार्ग सुचविले जाऊ शकतात. कारखान्याच्या कारभारात पारदर्शकता आणली तर कारखान्याचा विकास होईल. यातूनच शेतकऱ्यांना योग्य दर निश्‍चितच मिळू शकेल. यासाठी संचालकांना कोंडीत पकडणारा गनिमीकावा शेतकरी संघटनेने करायला हवा. आंदोलनाची ही दिशा निश्‍चितच शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरू शकेल. हिसेने सर्व समस्या कधीच सुटत नसतात. युद्धेही जिंकता येत नाहीत. मात्र गनिमीकाव्याने यश निश्‍चितच मिळू शकेल.

चौकट
आंदोलनाच्या घटनेतून हे शिकायला हवे. शेतकऱ्यांनीही या मागण्या लावून धरायला हव्यात...

- कारखान्याकडे नोंदविली जाणारी ऊस लागवडीची तारीख व तोडणीची तारीख ऑनलाइन पाहता यावी यासाठी सुविधा उपलब्ध केली जावी. यामुळे तोडणीमध्ये होणाऱ्या राजकारणावर आळा बसेल. ऊस वेळेवर तोडला गेल्याने वजनात होणारी घटही थांबेल, शेतकऱ्यांचे नुकसानही थांबेल. वेळेवर तोडणी झाल्याने कारखान्याच्या साखर उत्पादनातही चांगलाच फरक दिसेल.
- कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस दर कसा ठरवला जातो याची इत्थंभूत माहिती कारखान्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. यामुळे शेतकऱ्यांना कारखान्याच्या कारभारावर शेतकऱ्यांचा विश्‍वास बसेल. अशाने काही स्वार्थी राजकीय मंडळींकडून शेतकऱ्यांची होणारी दिशाभूल संपेल.
- कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्याने त्यांचे आर्थिक व्यवहार सभासद शेतकऱ्यांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावेत.
- शेतकऱ्याचे उसाचे एकरी उत्पादन वाढावे यासाठी त्याला सुधारित तंत्रज्ञान, सल्ले हे सर्व संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावे. तसेच मोबाईलवरही एसएमएसच्या माध्यमातून त्याला वारंवार सल्ले दिले जावेत. जेणेकरून तो जागरूक राहून तंत्रज्ञानाचा अवलंब करेल. उत्पादनवाढीसाठी त्याला प्रोत्साहन मिळेल. त्यांची मानसिकता सुधारेल. कारखान्याचा सभासद म्हणून त्या शेतकऱ्याला या सर्व गोष्टी हक्काने मिळायला हव्यात. तशी वातावरण निर्मितीही करायला हवी. असे केल्यास भरकटलेली शेतकऱ्यांची मने नियंत्रणात राहतील. त्याला सुविधा उपलब्ध झाल्याने तो सुखावेल.
- कारखान्याला ऊस घालणे, हप्ता घेणे, साखर घेणे एवढ्यापुरतेच शेतकऱ्यांशी संबंध मर्यादित न ठेवता त्याला इतर सुविधाही कारखान्याने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पाहायला हवे. आजकाल आजारपणाचा खर्चही वाढला आहे. यासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. औषधोउपचारात सवलती उपलब्ध करून द्यायला हव्यात. कारखान्याने देणग्या देऊन उभारलेल्या संस्थांमध्ये सभासद शेतकऱ्यांना विशेष सवलती मिळायला हव्यात. शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी कारखान्याने काही सवलती, सुविधा, योजना राबवायला हव्यात. यामुळे शेतकऱ्याचा कारखान्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलेल.
- ऊस शेतापर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित रस्त्ये नसतात. यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो. या समस्या कारखान्याने सोडवायला हव्यात. उसाच्या प्रत्येक शेतापर्यंत कारखान्याने रस्त्ये करून द्यायला हवेत.
- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा असे नुसते सल्लेच दिले जातात. प्रत्यक्ष हे तंत्रज्ञान वापरण्यात अनेक अडचणी येतात. इतकी महागडी यंत्रे शेतकरी खरेदी करू शकत नाही. यासाठी शेतकऱ्यांना ठिबक संच आदी उपकरणे खरेदी करण्यासाठी विशेष अनुदान योजना राबवव्यात. शासनाच्या अनुदाना व्यतिरिक्त हे अनुदान असावे.
- रासायनिक खताचे भडकलेले दर, सेंद्रीय खताचा होत असलेला कमी वापर याचा विचार करून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कारखान्याने गांडुळ खत निर्मितीसारखे प्रकल्प राबवून शेतकऱ्यांना याचा लाभ करून द्यायला हवा. कीडनाशकांच्याही भडकलेल्या किमतींचा विचार करून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे कार्यक्रम राबवायला हवेत. एकंदरीत शेतकऱ्याला शेतीतील खर्च कसा कमी होईल यावर कारखान्याने भर देऊन सभासद शेतकऱ्यांसाठी विशेष योजना सुरू करायला हव्यात. शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ करून देण्यासाठी शेतकरी संघटनांनी चळवळ उभी करायला हवी.

फळसूचक कर्म

वांचूनि देतें घेतें आणिक । निभ्रांत नाहीं सम्यक ।
एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ।।

वास्तवाला धरून तत्त्वज्ञान असावे. तरच ते मनाला भावेल. अन्यथा ते निष्क्रिय ठरेल. आत्मज्ञान हे अमरत्वाकडे नेणारे ज्ञान आहे. पण हे सांगताना वास्तवाचे भान ठेवायला हवे. तरच ते या नव्या पिढीला समजेल. वास्तवाशी सुसंगत उदाहरणे त्यामध्ये द्यायला हवीत. बदलत्या जीवनपद्धतीत हे तत्त्वज्ञान कसे मार्गदर्शक आहे. हे पटवून द्यायला हवे. तरच नवी पिढी याकडे आकर्षित होईल. अन्यथा ते व्यर्थ आहे असेच म्हणून त्याकडे दुर्लक्ष करेल. जगात वावरायचे असेल तर कर्म हे केलेच पाहीजे. पोटा पाण्याचा व्यवसाय सोडून जपमाळा ओढून कोणी जेवनाचे ताट दारात आणून ठेवणार नाही. जो व्यवसाय आहे, तो करावाच लागतो. गोरा कुंभार मडकी वळत वळतच आत्मज्ञानी झाले. त्यांनी त्यांचे कर्म सोडले नाही. सर्व संत पोटा पाण्यासाठी आवश्‍यक असणारे कर्म करतच होते. शांततेच्या शोधात सर्व संसाराचा त्याग करून हिमालयात गेले तरी पोटासाठी कर्म करावेच लागणार. पोटातील अग्नी थंड केल्याशिवाय मनाला शांती मिळणार नाही. मारून मुरगुटून कोणी साधना करू शकत नाही. साधनेची सक्ती करूनही साधना होत नाही. त्यासाठी मनाची तयारी असावी लागते. मनात नसेल तर प्रत्यक्षात कधीच प्रकट होणार नाही. यासाठी कर्म हे मनात यावे लागते. वास्तवात पुढे आलेले कर्म हे टाळता येणारे नाही. ते करावेच लागणार. हे कर्मच फळ देणार आहे. अशी भावना प्रकट व्हायला हवी. गोरा कुंभार माती मळत होते. माती पायाने मळली जात होती. पण मनात विठ्ठलाचे ध्यान सुरू होते. कर्म होत होते. येथे दोन्ही कामे सुरू होती. रोजचा पोटा पाण्याचा व्यवसाय सुरू होताच आणि दुसरीकडे विठ्ठलाची आराधनाही सुरू होती. भक्ती अशी करायची असते. नित्यकर्म सुरू असतानाही भक्ती करता येते. सद्‌गुरूंनी दिलेल्या मंत्राचे फक्त ध्यान करायचे असते. कर्मातही ते आहेत हा भाव मनात प्रगट झाला की ते कर्म सहज होते. भक्तीत मन रमले की ज्ञान प्रकट होते. हे कर्मच फळसूचक आहे. रोज कामावर जाणे आहेच. नेमुन दिलेले काम करणे आहेच. हे कर्म करताना मनाची एकाग्रता वाढावी, यासाठी सद्‌गुरूंचे स्मरण आवश्‍यक आहे. कर्मावर मन एकाग्र व्हावे. सद्‌गुरू स्मरणाने ही एकाग्रता येते. हे कर्म सहज होत राहाते. हे कर्मच मनामध्ये एकाग्रता उत्पन्न करते आणि वाढवते. मन विचलीत न झाल्याने योग्य फळ आत्मसात होते. यासाठीच नित्य कर्मावर मनाची एकाग्रता वाढवायला हवी. त्यातच रममान व्हायला हवे. तेच आपणास आत्मज्ञानाचे फळ देणार आहे.

Thursday, December 27, 2012

गटशेतीतून भाजीपाला शेती केली यशस्वी

- राजेंद्र घोरपडे
सांगवडेवाडीतील शेतकऱ्यांचे यश 

सांगवडेवाडी (जि. कोल्हापूर) येथील शेतकऱ्यांनी राज्य कृषी विस्तार योजना "आत्मा'अंतर्गत गावात तीन स्वयंसहायता गटांची सुरवात केली. या गटांतील शेतकरी प्रामुख्याने वांगी, टोमॅटो, काकडी या पिकांची लागवड करतात. एकत्रित नियोजन, समन्वय आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग सापडला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी गटशेतीमुळे अनेक समस्या सुटण्यास मदत झाली आहे. 

कोल्हापूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगवडेवाडी येथील 70 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. सिंचनाची सुविधा असल्याने बऱ्यापैकी शेती बागायती आहे; मात्र कमी क्षेत्रातील शेतीमध्ये आव्हाने अधिक आहेत. गाव शहराजवळ असल्याने येथील शेतकऱ्यांनी ऊस पिकाऐवजी भाजीपाला पिकांना प्राधान्य दिले आहे. गेली सात वर्षे येथील शेतकरी भाजीपाला लागवड करतात. 

भाजीपाला उत्पादन करताना बाजारभावातील चढ-उतार, खताची टंचाई, खतासाठी लिंकिंग, वाढता उत्पादन खर्च, कीड- रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट असे प्रश्‍न त्यांना भेडसावू लागले. लहान क्षेत्र आणि कमी आर्थिक ताकदीवर मात करण्यासाठी एकत्र येण्याची गरज त्यांना भासू लागली. त्यांच्या या विचाराला करवीर तालुका कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिले आणि गावात शेतकऱ्यांनी गटांची स्थापना केली. 

आज सांगवडेवाडीत श्री गणेश, श्री जयादेवी, बळिराजा असे तीन स्वयंसहायता गट आहेत. श्री गणेश गटामध्ये 18, श्री जयादेवी गटामध्ये 21, तर बळिराजा गटामध्ये 23 शेतकरी आहेत. हे शेतकरी प्रत्येकी अर्ध्या ते एक एकराच्या क्षेत्रात पावसाळी - उन्हाळी वांगी, टोमॅटो, काकडीची लागवड करतात. हा सर्व भाजीपाला कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड व कपिलतीर्थ मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो.

असे असते पिकांचे नियोजन-

दर्जेदार वांग्याला चांगली मागणी

संजय खोत यांची एकूण पाच एकर शेती आहे. त्यातील 15 ते 20 गुंठे क्षेत्रावर गेल्या दहा वर्षांपासून ते वांग्याचे उत्पादन घेतात. या वर्षी त्यांनी 16 गुंठे वांगी लागवड केली आहे. गटामुळे त्यांना शेतीतील भेडसावणारे प्रश्‍न सोडवण्यास मदत झाली. प्रत्येक महिन्याचा पंधरा तारखेला गटाची बैठक होते. यामध्ये विविध प्रश्‍नांवर विचारविनिमय होतो. त्यातून अडचणी सोडविल्या जातात. शेतीतील नवनव्या तंत्रज्ञानाची देवाण- घेवाण केली जाते. पुढील कामांचे नियोजन केले जाते. फवारणी, एकात्मिक कीड नियंत्रण, ठिबक सिंचन, लागवडीच्या पद्धती आदींवर चर्चा होते. यातूनच त्यांनी वांग्याला ठिबक सिंचन केले आहे. किडींच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावले आहेत.
यंदा खोत यांनी वीस गुंठ्यांवर मांजरी गोटा या जातीची लागवड केली आहे. एकत्रित कामाच्या पद्धतीमुळे मजुरांच्या टंचाईवर काही प्रमाणात मात करणे शक्‍य झाले. पूर्वी सरी- वरंबा पद्धतीने वांग्याची लागवड केली जायची, यंदा मात्र गटातील चर्चेतून त्यांनी पाच फूट रुंद गादीवाफ्यावर झिकझॅक पद्धतीने तीन फुटांवर वांग्याची रोपे लावली आहेत. गटशेतीमध्ये झालेल्या फायद्याबाबत खोत म्हणाले, की एकत्रित लागण, तोडणी आणि वाहतुकीचे नियोजन करता आले. मजुरांच्या समस्येवर मात करता आली.

वांगी लागवडीचा खर्च (क्षेत्र 16 गुंठे)
- पूर्वमशागत- 1000 रुपये
- रोपे तयार करण्याचा खर्च ः 800 रुपये
- तरू लावण : 700 रुपये
- आंतरमशागत : 3200 रुपये
- आळवणी, फवारणी खर्च : 4500 रुपये
- खतासाठी खर्च : 5000 रुपये
- 20 तोडणीचा एकत्रित खर्च : 10,000 रुपये
- वाहतुकीचा खर्च : 2000 रुपये

एकूण............................. 27,200 रुपये

वांग्याचे उत्पादन-
सध्या सहा तोडण्या झाल्या आहेत. एकूण वीस तोडण्या होणे अपेक्षित आहे. त्यातून साधारणपणे 100 ते 150 पाट्या उत्पादन होते. एका पाटीत साधारणपणे 40 किलो माल बसतो. अंदाजे पाच महिन्यांच्या कालावधीत पाच टन वांगी उत्पादन होते. यंदा दहा किलो वांग्याचा दर 100 ते 300 रुपयांच्या दरम्यान आहे. सरासरी दर 150 रुपये विचारात घेता 75 हजार रुपये मिळू शकतील. खर्च वजा जाता 47 हजार 800 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

संपर्क-संजय खोत, 7798537232

पीक व्यवस्थापन खर्चात झाली बचत... 

राम भेंडवडे यांची एकूण दोन एकर शेती आहे. त्यातील एक एकरावर यंदा त्यांनी टोमॅटो लागवड केली आहे. एक एकरासाठी त्यांना 5500 रोपे लागली. गटशेतीबाबत भेंडवडे म्हणाले, की एका रोपवाटिकेतून गटाद्वारे एकत्रित खरेदी केल्याने रोपे स्वस्त मिळाली.
गटातील चर्चेनुसार, टोमॅटोच्या दोन सरींतील अंतर साडेचार फूट आणि ओळींतील अंतर दीड फूट ठेवले. रोपांची संख्या कमी बसली तरी झाडांचा विस्तार चांगला होऊन चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

टोमॅटोचा एकरी खर्च
........... खर्च 1000 रुपये
पेरणी 3000 रुपये
खते 8000 रुपये
रोपांचा खर्च 4500 रुपये
बांधणीचा खर्च 3000 रुपये
अपेक्षित तोडणी ( 20 ते 25 ) 12, 500 रुपये
वाहतुकीचा खर्च 5000 रुपये
अन्य खर्च 4000 रुपये

एकरी खर्च 41,000 रुपये

अपेक्षित उत्पन्न- एका तोडणीत सर्वसाधारण 50 किलोच्या दहा पाट्या उत्पादन मिळते. एकरी सरासरी दहा टन उत्पादन मिळते. टोमॅटोला दहा किलोला सरासरी 50 ते 200 रुपये दर मिळतो. विक्रीतून साधारणपणे एक लाख रुपये मिळतात. खर्च वजा जाता 50 ते 60 हजार रुपये तीन महिन्यांत मिळतात.
संपर्क- राम श्रीपाल भेंडवडे, 9970690451

असा आहे गटशेतीचा फायदा... 

बांधावरच मिळाली खते
गटशेतीमुळे बांधावरच खते उपलब्ध झाली आहेत. यंदाच्या वर्षी गटातर्फे दोन ट्रक खत खरेदी केले. महाराष्ट्र शासनाच्या गोकुळ शिरगाव आणि मार्केट यार्डातील बफर स्टॉकमधून एकाच वेळी खत खरेदी केल्यामुळे पोत्यामागे 40 ते 50 रुपयांची बचत झाली. खत थेट बांधावर उपलब्ध झाल्याने कृषी सेवा केंद्रांतून होणारी लिंकिंग आदीच्या समस्येपासून सुटका झाली.
- सुकमार खोत, टोमॅटो उत्पादक, 9763242534

प्रक्रियाही शिकलो आम्ही
गटामार्फत कृषी विभागाच्या सहकार्याने विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. यामध्ये भाजीपाला, फळे यावर प्रक्रिया कशी केली जाते याचे तंत्र शिकविले जाते. टोमॅटोपासून सॉस, जाम आदीचे महिलांना प्रशिक्षण मिळाले आहे. टोमॅटोचे दर घसरल्यावर प्रक्रिया करून नुकसान टाळण्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे; तसेच विटा आणि वाळूच्या साहाय्याने घरगुती फ्रिज तयार करून त्यामध्ये टोमॅटो कसे सुरक्षित ठेवायचे, हेसुद्धा शिकलो. यामध्ये काही दिवसांसाठी टोमॅटो साठवता येतात.
- उषा जयपाल चौगुले, टोमॅटो उत्पादक

तीन ते चार फवारण्या झाल्या कमी
गटातील शेतकऱ्यांना आत्मा योजनेअंतर्गत जैविक कीड नियंत्रणासाठी प्रशिक्षण देण्यात आले; तसेच शेतकऱ्यांना कामगंध सापळे, ट्रॅप्स अनुदानावर देण्यात आले. यामुळे यंदा तुडतुडे, मावा, पांढरी माशी, रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. साहजिकच फवारणीचा खर्च कमी झाला आहे. जवळपास तीन ते चार फवारण्या कमी झाल्याने खर्चात बचत झाली आहे.
- राजेंद्र चौगुले, वांगी उत्पादक, 9850619494

तोडणीचे करतो नियोजन
गटामुळे पिकाच्या तोडणीचे नियोजन करता येते. गावातील तीनही गटांमध्ये यावर चर्चा होते. एकाच दिवशी सर्वांची तोडणी येणार नाही यासाठी प्रयत्न केले जातात. एकाच दिवशी सर्वांनी तोडणी केल्यास मालाची आवक वाढल्याने दर कमी मिळण्याचा धोका असतो. यासाठी तोडणीचे नियोजन केले जाते. गटांनी विक्रीसाठी एकच व्यापारी ठरवला आहे, त्यामुळे दर योग्य मिळतो, फसवणूक टळते, तसेच तोड केलेल्या सर्वच शेतकऱ्यांनी मालाबरोबर विक्रीसाठी जाण्याची गरज भासत नाही. मालासोबत एक- दोघेजण जाऊन रक्कम आणतात. यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांचा विक्रीसाठी लागणारा वेळ, खर्च वाचतो.
- राजेंद्र हुजरे, टोमॅटो उत्पादक, 8275272527

रोपांची खरेदी झाली स्वस्तात
गटातील शेतकरी रोपांची खरेदी एकाच वेळी एकाकडे करतात, यामुळे रोपे स्वस्त मिळतात. एका रोपाला एक रुपया इतका दर यंदा होता; पण गटामुळे हे रोप 80 पैशांना मिळाले. एकरी हजार रुपये तरी सहज वाचतात. तसेच, एकत्रित वाहतुकीमुळेही बचत होते.
- रावसाहेब दादू चौगुले, वांगी उत्पादक

Friday, December 21, 2012

ज्ञानाचा हक्क

देवी लक्ष्मी येवढी जवळिक । तेहीं न देखे या प्रेमाचे सुख ।
आजि कृष्णस्नेहाचे पिक । यातेंचि आथी ।।

डॉक्‍टरचा मुलगा डॉक्‍टर, क्रिकेटरचा मुलगा क्रिकेटर, शिक्षकाचा मुलगा शिक्षक, संपादकाचा मुलगा संपादक होतोच असे नाही. याचा अर्थ हाताची पाच बोटे जशी सारखी नसतात. तशा व्यक्तीही सारख्या नसतात. दोन व्यक्ती दिसायला एक सारख्या असतील पण त्यांची कर्मे, ज्ञान ग्रहणाची क्षमता वेगवेगळी असते. प्रत्येकाची आवड निवडही वेगळी असते. यामुळेच हा फरक दिसून येतो. वारसा हक्काने ज्ञान संपादन होत नाही. यामुळे शिक्षकाचा मुलगा त्याचा शिक्षकीपेशा पुढे चालवेलच असे नाही. पुजापाठ करणारे भडजी मात्र त्यांच्या मुलालाच त्याचा हा हक्क देतात. तो हक्क ते सोडत नाहीत. ज्ञानदान, ज्ञान ग्रहणाचा हक्क सर्वांना आहे. कोणीही कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेऊ शकतो. कोणी कशातही पारंगत होऊ शकतो. तसे भडजी सुद्धा सर्वांना होता येते. पण काही कर्मठ ज्ञानीपंडीतांनी हा हक्क केवळ आमचाच आहे असा हेका धरला. यासाठी ही परंपरा राजर्षी शाहू महाराजांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. यातून वादही झाले. गुरू-शिष्य ही परंपरा जातीपाती, वारस, नातीगोती यावर अवलंबून नसते. गुरू-शिष्याचे नाते हे ज्ञान दानाचे, ज्ञान ग्रहनाचे नाते असते. यामध्ये या गोष्टी आड येत नाहीत. कृष्ण आणि अर्जुन यांचेही नाते असेच दृढ होते. कृष्णाचे राधेवर खूप प्रेम होते. पण ज्ञानाचे गुह्य त्यांनी त्यांच्या पत्नीला न सांगता केवळ त्यांनी त्यांचा खरा भक्त अर्जुनालाच सांगितले. गुरू-शिष्यातील नात्याचा हा महत्त्वाचा भाग आहे. प्रेमामुळे, स्नेहामुळे, नातलगांमुळे हे ज्ञान आदानप्रदानाचे कार्य चालत नाही. या ज्ञानावर सर्वांचा हक्क आहे. आत्मज्ञान हे सर्वांना मिळवता येते. यासाठी खरा भक्त होण्याची गरज आहे. खरी सेवा करण्याची गरज आहे. गुरूकृपेने हे ज्ञान प्राप्त होते. यामध्ये भेदभाव नाही. उच्चनिच हा भेद नाही. यामुळे सर्वजातीधर्मातील वारकरी परंपरेमध्ये पाहायला मिळतात. संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत एकनाथ, संत बहिणाबाई, अशी विविध जाती धर्मातील व्यक्ती आत्मज्ञानी झाली. ही गुरू-शिष्य परंपरा आहे. गुरू ज्ञानदान करताना. त्याची जात, वारसा हे पाहात नाहीत. तर त्याची भक्ती पाहतात. घेणारा उत्सुक असेल तर देणाऱ्यालाही स्फुर्ती येते. यासाठी दोघांचे ऐक्‍य हे गरजेचे आहे. तरच हा ज्ञानसोहळा समृद्ध होतो. ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार, ज्ञान ग्रहन करण्याच्या क्षमतेनुसार ही प्रक्रिया सुरू असते. येथे आरक्षण नाही. येथे वशीला नाही. श्रीमंती पाहीली जात नाही. येथे फक्त गुणाला महत्त्व आहे. गुणानुसार पात्रता ठरते. ही पात्रता गुरू ठरवितात. तो हक्क गुरूंना आहे. आत्मज्ञानी गुरू योग्य शिष्याची निवड करतात. त्यालाचा हा आत्मज्ञानाचा लाभ होतो.

Tuesday, December 18, 2012

नैसर्गिक स्वाद


कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा ।

मुर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ।। 198 ।। अध्याय 3


चंद्राचा प्रकाश हा शीतल असतो. त्याचा त्रास होत नाही. त्यामध्ये दाहकता नसते. पूर्वी घराघरांत वीज नव्हती. अशावेळी रात्रीचा हा चंद्राचा शीतल प्रकाश हवाहवासा वाटायचा. पण आता चंद्र उगवतो कधी आणि मावळतो कधी हे सुद्धा लक्षात येत नाही. विजेच्या क्रांतीमुळे चंद्राचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. मानवाला आता त्याची गरज वाटत नाही. कृत्रिम पर्याय उपलब्ध झाल्याने आता नैसर्गिक गोष्टींचे अस्तित्व जाणवेणासे झाले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगती ही कृत्रिम आहे. यामुळे सगळे जीवनच कृत्रिम होत आहे.. भावनाही कृत्रिम होऊ लागल्या आहेत. स्तुतीही कृत्रिम वाटत आहे. यामध्ये जिवंतपणा वाटत नाही. जिवंतपणा हा नैसर्गिक असतो. अंतःकरणातून येतो. तो वरवरचा नसतो. कृत्रिम जिवंतपणा मात्र अद्याप संशोधकांना आणता आलेला नाही. कृत्रिम मानव त्यांनी तयार केला आहे. रोबोट तयार केला आहे. तो मानसाची सर्व कामे करू शकतो. पण त्याला भावना नाहीत. त्याला विचार नाही. त्याला मन नाही. नैसर्गिकपणा नाही. त्यामुळे नैसर्गिक चव काय असते हे नव्या पिढीला अनुभवता येत नाही. कृत्रिम जगाचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला आहे. नैसर्गिक जगाची ओळख नव्या पिढीला करून देण्याची गरज भासू लागली आहे. निसर्गाचा आस्वाद घ्यायला त्यांना शिकवावे लागणार आहे. इतकी ही नवी पिढी कृत्रिम होत आहे. कृत्रिम जगाला नैसर्गिक जगाची ओळख ही एखादा प्रकोप झाल्यानंतरच होते. त्सुनामी, भूकंप, प्रलय, महापूर अशा घटनांतून त्यांना निसर्गाची ओळख होते. निसर्ग त्यांना भयानक वाटू नये यासाठी निसर्गातील गोडी, चव चाखण्याचीही सवय त्यांना लावण्याची गरज भासणार आहे. अध्यात्म हे सुद्धा नैसर्गिक आहे. कृत्रिम नाही. आत्मज्ञान ही सत्‌ पुरुषांना मिळालेली निसर्गाची देणगी आहे. ही नैसर्गिक देणगी त्यांनी अभ्यासाने आत्मसात केली आहे. तसे निसर्गाचा स्वादही नव्यापिढीला आत्मसात करायला शिकवायला हवे. यामुळे निसर्गाचे भय त्यांच्यामध्ये राहणार नाही. निसर्ग जपण्यासाठी त्यांच्यामध्ये जागृती करण्याची गरज आहे. संकरित बियाण्यामुळे आज नैसर्गिक गोडवा नष्ट झाला आहे. ती नैसर्गिक गोडी जपण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिकपणा जोपासायला हवा. कृत्रिम गोष्टी ह्या क्षणिक असतात. विजेची निर्मिती केली जाते. ही वीज क्षणिक आहे. त्याची निर्मिती बंद केल्यानंतर ती आपणास उपलब्ध होऊ शकत नाही. पण चंद्राचा प्रकाश हा नैसर्गिक आहे. कृत्रिम प्रकाशाची झापड डोळ्यावर आल्याने हा प्रकाश आता आपणास दिसेनासा झाला आहे. त्याची गोडीही मनाला भावत नाही. आत्मज्ञानाचेही असेच आहे. कृत्रिम ज्ञानाचा प्रभाव वाढल्यानेच नैसगिक आत्मज्ञानामध्ये रस वाटेनासा झाला आहे. यासाठी नैसर्गिक गोष्टींचा स्वाद नव्या पिढीस सांगायला हवा.

Monday, December 17, 2012

सेवाभाव


म्हणऊनि निजवृत्ति हे न संडावी । इंद्रिये बरळों नेदावी ।
ऐसें प्रजांतें शिकवी । चतुराननु ।।

कितीही कठीण प्रसंग आले तरी सेवाभाव हा धर्म आपण सोडता कामा नये. राज्यकर्त्यांनी सेवा हा धर्मच सोडल्यामुळे सत्तेची गणिते चुकत आहेत. पुर्वीच्याकाळी एकमुखी सत्ता असायची. त्याला कारण त्या राजकर्त्यांमध्ये सेवाभाव होता. सेवा हाच त्यांचा धर्म होता. यामुळे जनतेमध्ये त्यांना विरोधकच नसत. तसे धाडसही कोणी करायचे नाही. केले तर ते फार काळ टिकायचेही नाही. कायमस्वरूपी सत्तेसाठी सेवा हा धर्म राज्यकर्त्यांनी जोपासायला हवा. हा धर्म सुटला की आसन निश्‍चितच डळमळीत होते. साधकांनीही सेवाभाव अंशी जोपासायला हवा. याचा फायदा मनशांत ठेवण्यामध्ये होतो. सेवेतून समाधान मिळते. मनाला शांती मिळते. हे काम खालच्या दर्जाचे आहे. हा भाव काम करताना ठेवता कामा नये. सेवा हाच धर्म माणून ते कमा करायला हवे. यामध्ये सर्व कामाची सवय लागते. विशेष म्हणजे वेळ प्रसंगी आपणास एखादे खालच्या दर्जाचे काम करावे लागले तरी मनाला त्याची सल टोचत नाही. मन विचलित होत नाही. मनाची शांती टिकून राहते. साहजिकच याचा परिणाम चांगला होतो. अयोग्य काम करण्याचे मात्र टाळायला हवे. योग्य तेच स्वीकारायला हवे. ही सवय अंगी लागावी यासाठीच वारकरी संप्रदायामध्ये काही नियम तयार केले आहेत. हा मोठा, हा लहान, हा श्रीमंत, हा गरीब हा भेदभाव मनातून जावा यासाठीच हे नियम आहेत. विना घेण्याची पद्धत संप्रदायात आहे. हा विना घेताना समोरच्या व्यक्तीला वाकून नमस्कार करूनच तो विना घ्यायचा असतो. हा नियम याचसाठी आहे. एखाद्या लहान व्यक्तीने हा विना घेतलेला असेल तर त्याच्याकडून घेतानाही हा नियम पाळावा लागतो. विना घेणारा कितीही मोठा, गर्भश्रीमंत असला तरीही हा नियम येथे आहे. अशा या नियमामागे भेदभाव दूर व्हावा हेच उद्देश आहेत. विशेष म्हणजे असे काही नियम हे यासाठीच तयार केले आहेत. सेवाभाव निर्माण व्हावा यासाठी या सवयी अंगी लागाव्यात हा या मागचा उद्देश आहे. अहंकार जावा, अहंभाव जावा हे उद्देश आहेत. अहंकाराने मानसाचे मोठे नुकसान होते. मीपणामुळे, हेखेकोरपणामुळे स्वतःचे नुकसान का करून घ्यायचे हा विचार करायला हवा. पण हा अहंकार, मीपणा सहज जात नाही. हे जावेत यासाठीच काही नियमांचे पालन हे करायला हवे. यामुळे आपणाला या गोष्टींची सवय लागते. धकाधकीच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी काही सवयी ह्या आवश्‍यक आहेत. तसे आता या सवयींचे पालन करणे सध्याच्या परिस्थितीत अशक्‍य वाटत असले तरी हाच खरा धर्म आहे. याचे आचरण हे आवश्‍यक आहे. सेवावृत्तीच अनेकांचे भले करते. अमरत्व प्राप्त करून देते. याचा विचार करायला हवा. स्वतःच्या स्वार्थासाठी सेवेचा त्याग करणे हे मुर्खपणाचे आहे.

Sunday, December 16, 2012

विकारांवर उपाय



सांगे श्रवणीं ऐकावे ठेलें । की नेत्रींचें तेज गेलें ।
हें नासारंध्र बुझाले । परिमळु नेघे ।।

धकाधकीच्या जीवनामुळे माणसांची झोपच उडाली आहे. यामुळे अनेक विकार, विकृती मानवामध्ये दिसून येऊ लागल्या आहेत. लहरीपणा, चिडचिडेपणा वाढत चालला आहे. अती आवाजामुळे, ध्वनी प्रदुषणामुळे श्रवणशक्ती कमी होताना आढळत आहे. डोळ्यांना विश्रांती न मिळाल्याने अंधत्व येण्याचे प्रमाणही वाढत आहे. दुर्गंधीमुळे सुगंधाचा वासही नाकाला झोंबू लागला आहे. बदलत्या जीवनशैलीचा हा परिणाम आहे. नियोजनच कोलमडल्याने हे प्रकार वाढत आहेत. पुर्वीच्याकाळी हे विकार उतारवयात होत असत पण ऐन तारुण्यात वृद्धत्वाच्या विकारांचा सामना नव्यापिढीला करावा लागत आहे. यावर औषध उपचारांचाही परिणाम फारसा दिसून येत नाही. मनाची शांतीच मनुष्य हरवून बसला आहे. यावर उपाय आपल्या संस्कृतीत सांगितले आहेत. पण पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे त्याला हे साधेसोपे उपायही समजेनासे झाले आहेत. अशाने मनाला शांती मिळते. समाधान मिळते. हेच मुळात पटेणासे झाले आहे. पैशाने सर्व खरेदी करता येते याच भ्रमात मनुष्य वावरत आहे. मनशांती ही पैशाने विकत मिळत नाही. ती आपल्याला मिळवावी लागते. योगा, व्यायाम यामुळेही क्षणिक मनशांती लाभते. ताजेतवाने होता येते. पण कायमस्वरूपी मनशांती मिळवायची असेल तर त्यासाठी आपण नियोजनबद्ध जीवनशैली आत्मसात करावी लागते. नियोजनाला जीवनात खूप महत्त्व आहे. या नियोजनात काही काळ हा मनाला विश्रांतीसाठी द्यावा लागतो. दररोज तासभर मनाला शांतीसाठी अध्यात्मात मन रमवायला हवे. त्याचा अभ्यास करायला हवा. त्यामध्ये सांगितलेले साधनेचे उपाय योजायला हवेत. साधनेने मनाचा थकवा दूर होतो. मनाला नवी उभारी मिळते. मनातील विचार शांत होतात. मन प्रसन्न होते. यासाठी साधना ही आवश्‍यक आहे. कमीत कमी पाच मिनिटेतरी साधना करायला हवी. पण यासाठी मानवाला वेळच नाही. शांत बसून मन एकाग्र करायला हवे. मनाची एकाग्रता वाढली की विचार शक्ती वाढते. मनाला चांगल्या कामाची सवय लागते. चांगले विचार मनात घोळू लागतात. साहजिकच मन प्रसन्न होते. अध्यात्मिक ग्रथांच्या पारायणाने मनाला सतविचारांची सवय लागते. हळुहळु मन त्यामध्ये रमु लागते. शांत झोप लागते. यामुळे होणाऱ्या विकारावर हा एकमेव उपाय आहे. याचा विचार करायला हवा. औषधाने जे साध्य होत नाही ते यामुळे निश्‍चितच साध्य होते. यासाठी प्रयत्न करायला हवा.

Saturday, December 8, 2012

शून्य मशागत तंत्राने भातशेती केली फायद्याची

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांचे विना नांगरणी अर्थात शून्य मशागत तंत्र कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी अवलंबत आहेत. ऊस तोडणीनंतर त्या शेतात पावसाळ्यामध्ये या तंत्रज्ञानाने भातशेती केली जाते. कमी खर्चासह उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांत या तंत्राबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. हसुरदुमाला (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील संतोष रामचंद्र पाटील गेल्या चार वर्षांपासून हे तंत्र वापरत आहेत. राजेंद्र घोरपडे
शेतीत सतत विविध प्रयोग करून सकारात्मक विचारांची मनाला सवय लावून घ्यायला हवी. कोल्हापूर जिल्ह्यातील हसुरदुमाला येथील संतोष पाटील यांनी हेच विचार जोपासून शेतीचे नवे तंत्र अवलंबत आपला विकास साधला.

बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1989 पासून संतोष शेतीत आहेत. वडिलोपार्जित त्यांची 30 एकर शेती आहे. भोगावती नदीकाठीच शेती असल्याने सुपीकता तसेच पाणीही मुबलक. तरीही वाढत्या उत्पादन खर्चामुळे उत्पन्नाचा मेळ घालावाच लागतो. उपलब्ध स्रोतांचा योग्य वापर करीत जास्तीत जास्त नफा कसा घेता येईल या दृष्टीने संतोष यांनी शेतीतील नवे तंत्र अभ्यासण्यास सुरवात केली. कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील प्रा. अजय देशपांडे यांनी त्यांना ठिबक सिंचनाबाबत मार्गदर्शन केले. सन 1992 मध्ये मांजरीच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रशिक्षण कार्यक्रमात संतोष यांनी भाग घेतला. कृषी महाविद्यालयाच्या शेतकरी- शास्त्रज्ञ मंचातही ते सहभागी झाले.

चिपळूणकरांचे मार्गदर्शन भातशेती करताना संतोष यांना अनेक समस्या जाणवत होत्या. अनेक ठिकाणी उगवण होत नव्हती. उत्पादन समाधानकारक नव्हते. खुरपणी, कोळपणीसाठी मजुरांची टंचाई होती. नांगरट, फळी मारणे आदी कामे वेळेवर होत नसल्याने पेरणीस विलंब व्हायचा. नदीकाठी शेत असल्याने पुरात भाताचे नुकसान व्हायचे. या समस्येवर मात करण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाच्या शोधात संतोष होते. दरम्यान कोल्हापूरचे प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांचा परिचय शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या निमित्ताने झाला. शून्य मशागत तंत्राद्वारे त्यांची शेती सुरू होती. संतोष यांनी चिपळूणकर यांच्या शेतास भेट दिली, त्यांचे तंत्र अभ्यासले व ते वापरण्याचे ठरविले.

चिपळूणकर तंत्राचा वापर गेल्या चार ते पाच वर्षांपासून विना नांगरणी अर्थात शून्य मशागत तंत्रज्ञान संतोष वापरत आहेत. मार्चमध्ये ऊस तुटून गेल्यानंतर खोडवी शेतात राखायची. दरम्यान, वळवाचा पाऊस झाला व ऊस उगवून आला तर शेतात मेंढरे चरायला सोडायची. यानंतरही तणे किंवा गवताळ वाढ आढळल्यास ग्लायफोसेट तणनाशक फवारून ते नियंत्रित करायचे. पाण्याचा ताण पडल्याने खोडव्याच्या उसाची वाढ थांबते.

पावसाळ्यात खोडवी कुजून त्याचे खत तयार होते. रोहिणी नक्षत्रात भाताची टोकणी 10 x 10 इंचावर करायची. एका जागी दोन बिया वापरायच्या. यामुळे बियाणे कमी लागते. एकरी साडे चार किलो बियाणे लागते. त्यातील चार किलो बियाण्याची टोकणी करायची व उरलेल्या अर्धा किलो बियाण्याची रोपे तयार करायची. उगवण होत नाही अशा ठिकाणी ही रोपे लावायची. गेल्या वर्षी संतोष यांनी सुमारे 135 दिवसांत तयार होणाऱ्या जातींची लावण केली. साधारणपणे हादगा झाल्यानंतर काढणी होते. भातात लावणीनंतर सुमारे दीड महिन्यांनी मेटसल्फ्युरॉन मिथाईल तणनाशकाची फवारणी होते.

भातशेतीतील नव्या- जुन्या लागवड पद्धतीतील अंदाजे जमाखर्च (एकरी) - जुनी पद्धत (खर्च) नवी पद्धत (खर्च)
पूर्वमशागत- 8000 रुपये बियाणे 4000 रुपये
आंतरमशागत 2000 रुपये पेरणी 1200 रुपये
बियाणे 4000 रुपये खत, कीडनाशके 4300 रुपये
पेरणी 1200 रुपये इतर खर्च 500 रुपये
खते, कीडनाशके 4300 रुपये
.................................................. ...................................................
एकूण 19,500 रुपये एकूण अंदाजे 10 हजार रुपये

यंदा संतोष यांनी तीन एकरावर भात लागवड केली. एकरी 40 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. क्विंटलला 1150 रुपये दर मिळाला. खर्च वजा जाता एकरी 35 हजार रुपये नफा मिळाला. हे तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी भाताचे उत्पादन एकरी 20 क्विंटलपर्यंत मिळत होते.

शून्य मशागत तंत्राचा फायदा - उत्पादन खर्चात बचत
- मजूरटंचाईवर मात
- मशागतीसाठी ट्रॅक्‍टर आदींची अवलंबिता नाही
- पेरणी वेळेवर होत असल्याने पिकाची जोमदार वाढ

पाण्यावर तरंगता मोटारपंप नदीकाठच्या शेतकऱ्यांना नदीतील पाण्याची पातळी विचारात घेऊन मोटारपंप सतत खालीवर करावा लागतो. धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर पाण्यात पंप बुडण्याची शक्‍यता असते. पाणी खाली गेल्यानंतर ते खेचताना अडचणी येतात. पावसाळ्यात विहिरीत पाण्याची पातळी वाढेल तसा मोटारपंप वरती बसवावा लागतो. ही काढणी- जोडणी जोखमीची असते. मनुष्यबळही लागते. हा विचार करून संतोष यांनी पाण्यावर तराफा करून त्यावर मोटारपंप बसविली. पाण्याची पातळी कमी झाली किंवा वाढली तरी त्याचा फटका पंपास बसत नाही. सन 2005 पासून त्यांनी 10 अश्‍वशक्तीचे दोन पंपसेट पाण्यावर तरंगणाऱ्या तराफ्यावर बसविले आहेत.

संतोष यांना झालेला फायदा पाहून यंदा हसुरदुमालातील कृषी विज्ञान मंडळाच्या काही शेतकऱ्यांनी भातासाठी शून्य मशागत तंत्र वापरले. त्यांचे उत्पादन असे -
शेतकरी क्षेत्र सरासरी उत्पादन 1) उत्तम पुंडलिक पाटील 35 गुंठे 30 क्विंटल
2) उत्तम पुंडलिक पाटील 35 गुंठे 21 क्विंटल
3) उत्तम पुंडलिक पाटील 30 गुंठे 21 क्विंटल
4) विलास विठ्ठल खराडे 50 गुंठे 36 क्विंटल
5) काशिनाथ रामजी पाटील 10 गुंठे सात क्विंटल
6) अण्णासाहेब रामचंद्र देशपांडे 80 गुंठे 48 क्विंटल
7) केशव भाऊ खराडे 18 गुंठे 10 क्विंटल
8) हिंदुराव दत्तात्रय कानुगडे 10 गुंठे 10 क्विंटल
9) वसंत भिकू पाटील 25 गुंठे 16 क्विंटल
10) नामदेव हिंदुराव भोईटे 4 गुंठे 4 क्विंटल
11) ज्ञानदेव हिंदुराव भोईटे 7 गुंठे 6 क्विंटल
12) श्रीपती दिनकर पाटील 15 गुंठे 10 क्विंटल
13) कृष्णात शंकर तोडकर 15 गुंठे 10 क्विंटल


सुपीकता वाढविणारे तंत्रज्ञान... विना नांगरणीचे तंत्र नक्कीच उपयोगाचे आहे. खोडवे आणि उसाच्या मुळांचे जाळे जमिनीत कुजून त्याचे सेंद्रिय खत पिकास मिळते. यामुळे सेंद्रिय खताची टंचाई भासणाऱ्यांना हे तंत्र निश्‍चितच उपयुक्त आहे. सेंद्रिय खतामुळे रासायनिक खताची कार्यक्षमता वाढते. मनुष्यबळाचा वापर कमी लागतो. या तंत्राने उसाच्या पूर्वमशागतीचा खर्च एकरी 250 ते 300 रुपये येतो. या तंत्रामुळे जादा खर्च न करता जमिनीची सुपीकता वाढत जाते.

- प्रताप चिपळूणकर, प्रयोगशील शेतकरी, कोल्हापूर

संतोष पाटील- 7588171257
हसुरदुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर

Thursday, December 6, 2012

औषध



देखे रोगातें जिणावें । औषध तरी देयावें ।

परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसे ।।



औषध गोड नसते. ते कडू असते. पण त्याचा परिणाम हा मधुर असतो. सल्ला हा औषधासारखा असतो. तो गोड कधीही वाटत नाही. बऱ्याचदा तो मनाला पटतही नाही. पण हा कडवटपणा आपणास स्वीकारावा लागतो. तो स्वीकारल्यानंतर अनुभव हे गोड असतात. जीवनात अनेक कठीण प्रसंगीही असेच अनुभव येतात. उतारवयात बऱ्याचदा शरीर औषधांना साथ देत नाही. त्यावेळी डॉक्‍टर आपल्या शरीराची प्रयोगशाळाच करतात. विविध प्रयोग त्यांचे सुरू असतात. शरीराला साथ देणारी औषधेच घ्यावी लागतात. तरच त्याचा परिणाम दिसून येतो. शरीराप्रमाणे मनाचे, स्वभावाचेही असेच आहे. वय वाढेल तसे स्वभाव बदलत राहातो. तारुण्यात मन तरूण असते. एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीचा पटकण राग येतो. अन्याया विरुद्ध मन पेटून उठते. हळूहळू वय वाढेल तसे मनाला, स्वभावाला याची सवय होते. मग मन त्यावर पर्यायी मार्ग निवडते. देहबोली, हालचालीमध्येही फरक पडतो. पोरकटपणा कमी होतो. तारुण्यात पेटून उठणारे मन मात्र इथे शांतपणे मार्ग निवडत असते. त्यावर योग्य उपाय योजत असते. हा बदल वयोमानानुसार होतो. तरूणपणी सल्ले मनाला रूचत नाहीत. पण हे सल्ले स्वीकारावे लागतात. त्याचा योग्य परिणामही दिसून येतो. उतारवयात मात्र मन हे सल्ले स्वीकारण्यास पटकण मन तयार होत नाही. बळजबरीने ते स्वीकारले जातात. त्यामुळे याचा परिणाम फारसा चांगला दिसून येत नाही. कित्येकदा काही सल्ले मनाला न पटल्याने स्वभाव चिडचिडा होतो. हा शरीर, मनाचा, स्वभावाचा गुणधर्म आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. पण शरीर निरोगी राहण्यासाठी काही उपाय आहेत. सर्व रोग हे मनात दडलेले असतात. मन शांत असेल तर हे सर्व रोग शांत असतात. मनाची चलबिचलता सूरू झाली की रोगांचीही चलबिचलता सुरू होते. हळूहळू रोग डोकेवर काढतात. यासाठी मनाची स्थिरता ही महत्त्वाची आहे. मन स्थिर ठेवणे हे रोगावर अत्यंत उपयुक्त औषध आहे. तरच शरीराला औषधे साथ देतात. अन्यथा औषधांचा परिणाम दिसून येत नाही. मनाच्या स्थिरतेसाठी सांगितलेले उपाय यासाठी योजने गरजेचे आहे. मनाची स्थिरता ही उतारवयात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्वात उपयुक्त असे औषध आहे.