Saturday, December 8, 2012

शून्य मशागत तंत्राने भातशेती केली फायद्याची

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांचे विना नांगरणी अर्थात शून्य मशागत तंत्र कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी अवलंबत आहेत. ऊस तोडणीनंतर त्या शेतात पावसाळ्यामध्ये या तंत्रज्ञानाने भातशेती केली जाते. कमी खर्चासह उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांत या तंत्राबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. हसुरदुमाला (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील संतोष रामचंद्र पाटील गेल्या चार वर्षांपासून हे तंत्र वापरत आहेत. राजेंद्र घोरपडे
शेतीत सतत विविध प्रयोग करून सकारात्मक विचारांची मनाला सवय लावून घ्यायला हवी. कोल्हापूर जिल्ह्यातील हसुरदुमाला येथील संतोष पाटील यांनी हेच विचार जोपासून शेतीचे नवे तंत्र अवलंबत आपला विकास साधला.

बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1989 पासून संतोष शेतीत आहेत. वडिलोपार्जित त्यांची 30 एकर शेती आहे. भोगावती नदीकाठीच शेती असल्याने सुपीकता तसेच पाणीही मुबलक. तरीही वाढत्या उत्पादन खर्चामुळे उत्पन्नाचा मेळ घालावाच लागतो. उपलब्ध स्रोतांचा योग्य वापर करीत जास्तीत जास्त नफा कसा घेता येईल या दृष्टीने संतोष यांनी शेतीतील नवे तंत्र अभ्यासण्यास सुरवात केली. कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील प्रा. अजय देशपांडे यांनी त्यांना ठिबक सिंचनाबाबत मार्गदर्शन केले. सन 1992 मध्ये मांजरीच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या प्रशिक्षण कार्यक्रमात संतोष यांनी भाग घेतला. कृषी महाविद्यालयाच्या शेतकरी- शास्त्रज्ञ मंचातही ते सहभागी झाले.

चिपळूणकरांचे मार्गदर्शन भातशेती करताना संतोष यांना अनेक समस्या जाणवत होत्या. अनेक ठिकाणी उगवण होत नव्हती. उत्पादन समाधानकारक नव्हते. खुरपणी, कोळपणीसाठी मजुरांची टंचाई होती. नांगरट, फळी मारणे आदी कामे वेळेवर होत नसल्याने पेरणीस विलंब व्हायचा. नदीकाठी शेत असल्याने पुरात भाताचे नुकसान व्हायचे. या समस्येवर मात करण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाच्या शोधात संतोष होते. दरम्यान कोल्हापूरचे प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांचा परिचय शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या निमित्ताने झाला. शून्य मशागत तंत्राद्वारे त्यांची शेती सुरू होती. संतोष यांनी चिपळूणकर यांच्या शेतास भेट दिली, त्यांचे तंत्र अभ्यासले व ते वापरण्याचे ठरविले.

चिपळूणकर तंत्राचा वापर गेल्या चार ते पाच वर्षांपासून विना नांगरणी अर्थात शून्य मशागत तंत्रज्ञान संतोष वापरत आहेत. मार्चमध्ये ऊस तुटून गेल्यानंतर खोडवी शेतात राखायची. दरम्यान, वळवाचा पाऊस झाला व ऊस उगवून आला तर शेतात मेंढरे चरायला सोडायची. यानंतरही तणे किंवा गवताळ वाढ आढळल्यास ग्लायफोसेट तणनाशक फवारून ते नियंत्रित करायचे. पाण्याचा ताण पडल्याने खोडव्याच्या उसाची वाढ थांबते.

पावसाळ्यात खोडवी कुजून त्याचे खत तयार होते. रोहिणी नक्षत्रात भाताची टोकणी 10 x 10 इंचावर करायची. एका जागी दोन बिया वापरायच्या. यामुळे बियाणे कमी लागते. एकरी साडे चार किलो बियाणे लागते. त्यातील चार किलो बियाण्याची टोकणी करायची व उरलेल्या अर्धा किलो बियाण्याची रोपे तयार करायची. उगवण होत नाही अशा ठिकाणी ही रोपे लावायची. गेल्या वर्षी संतोष यांनी सुमारे 135 दिवसांत तयार होणाऱ्या जातींची लावण केली. साधारणपणे हादगा झाल्यानंतर काढणी होते. भातात लावणीनंतर सुमारे दीड महिन्यांनी मेटसल्फ्युरॉन मिथाईल तणनाशकाची फवारणी होते.

भातशेतीतील नव्या- जुन्या लागवड पद्धतीतील अंदाजे जमाखर्च (एकरी) - जुनी पद्धत (खर्च) नवी पद्धत (खर्च)
पूर्वमशागत- 8000 रुपये बियाणे 4000 रुपये
आंतरमशागत 2000 रुपये पेरणी 1200 रुपये
बियाणे 4000 रुपये खत, कीडनाशके 4300 रुपये
पेरणी 1200 रुपये इतर खर्च 500 रुपये
खते, कीडनाशके 4300 रुपये
.................................................. ...................................................
एकूण 19,500 रुपये एकूण अंदाजे 10 हजार रुपये

यंदा संतोष यांनी तीन एकरावर भात लागवड केली. एकरी 40 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. क्विंटलला 1150 रुपये दर मिळाला. खर्च वजा जाता एकरी 35 हजार रुपये नफा मिळाला. हे तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी भाताचे उत्पादन एकरी 20 क्विंटलपर्यंत मिळत होते.

शून्य मशागत तंत्राचा फायदा - उत्पादन खर्चात बचत
- मजूरटंचाईवर मात
- मशागतीसाठी ट्रॅक्‍टर आदींची अवलंबिता नाही
- पेरणी वेळेवर होत असल्याने पिकाची जोमदार वाढ

पाण्यावर तरंगता मोटारपंप नदीकाठच्या शेतकऱ्यांना नदीतील पाण्याची पातळी विचारात घेऊन मोटारपंप सतत खालीवर करावा लागतो. धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर पाण्यात पंप बुडण्याची शक्‍यता असते. पाणी खाली गेल्यानंतर ते खेचताना अडचणी येतात. पावसाळ्यात विहिरीत पाण्याची पातळी वाढेल तसा मोटारपंप वरती बसवावा लागतो. ही काढणी- जोडणी जोखमीची असते. मनुष्यबळही लागते. हा विचार करून संतोष यांनी पाण्यावर तराफा करून त्यावर मोटारपंप बसविली. पाण्याची पातळी कमी झाली किंवा वाढली तरी त्याचा फटका पंपास बसत नाही. सन 2005 पासून त्यांनी 10 अश्‍वशक्तीचे दोन पंपसेट पाण्यावर तरंगणाऱ्या तराफ्यावर बसविले आहेत.

संतोष यांना झालेला फायदा पाहून यंदा हसुरदुमालातील कृषी विज्ञान मंडळाच्या काही शेतकऱ्यांनी भातासाठी शून्य मशागत तंत्र वापरले. त्यांचे उत्पादन असे -
शेतकरी क्षेत्र सरासरी उत्पादन 1) उत्तम पुंडलिक पाटील 35 गुंठे 30 क्विंटल
2) उत्तम पुंडलिक पाटील 35 गुंठे 21 क्विंटल
3) उत्तम पुंडलिक पाटील 30 गुंठे 21 क्विंटल
4) विलास विठ्ठल खराडे 50 गुंठे 36 क्विंटल
5) काशिनाथ रामजी पाटील 10 गुंठे सात क्विंटल
6) अण्णासाहेब रामचंद्र देशपांडे 80 गुंठे 48 क्विंटल
7) केशव भाऊ खराडे 18 गुंठे 10 क्विंटल
8) हिंदुराव दत्तात्रय कानुगडे 10 गुंठे 10 क्विंटल
9) वसंत भिकू पाटील 25 गुंठे 16 क्विंटल
10) नामदेव हिंदुराव भोईटे 4 गुंठे 4 क्विंटल
11) ज्ञानदेव हिंदुराव भोईटे 7 गुंठे 6 क्विंटल
12) श्रीपती दिनकर पाटील 15 गुंठे 10 क्विंटल
13) कृष्णात शंकर तोडकर 15 गुंठे 10 क्विंटल


सुपीकता वाढविणारे तंत्रज्ञान... विना नांगरणीचे तंत्र नक्कीच उपयोगाचे आहे. खोडवे आणि उसाच्या मुळांचे जाळे जमिनीत कुजून त्याचे सेंद्रिय खत पिकास मिळते. यामुळे सेंद्रिय खताची टंचाई भासणाऱ्यांना हे तंत्र निश्‍चितच उपयुक्त आहे. सेंद्रिय खतामुळे रासायनिक खताची कार्यक्षमता वाढते. मनुष्यबळाचा वापर कमी लागतो. या तंत्राने उसाच्या पूर्वमशागतीचा खर्च एकरी 250 ते 300 रुपये येतो. या तंत्रामुळे जादा खर्च न करता जमिनीची सुपीकता वाढत जाते.

- प्रताप चिपळूणकर, प्रयोगशील शेतकरी, कोल्हापूर

संतोष पाटील- 7588171257
हसुरदुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर

2 comments:

  1. असे प्रयोग व त्यांची माहिती खेडोपाडी पोहोचली पाहिजे.

    ReplyDelete
  2. Prashna asa nirman hoto ki dhaanache ropte jaminiwar alyawar honarya tanasathi kay karayche??

    ReplyDelete