Tuesday, January 29, 2019

नामांतर


या नर देहाचा नारायण होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. नामामध्ये हे सामर्थ आहे. नामानेच हे नामांतर घडते. यासाठी सतत नामस्मरणात राहायला हवे.

तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।
जेविं दूधचि जाहलिया दहीं । नामरूप जाय ।। 170 ।। अध्याय 8 वा

ओवीचा अर्थ - तेथें त्या साम्यावस्थेंत सम (एकासारखे एक) विषम (एकाहून एक भिन्न) हे कांही दिसत नाही. म्हणून (त्या साम्यावस्थेस) भूतें असें म्हणतां येत नाहीं. ते कसे तर, ज्याप्रमाणे दूध हें दही झाल्यावर त्याचे दूध हे नांव व पातळपणाचें स्वरूप ही जातात.

शुन्य समही नाही, विषमही नाही. त्यामुळे त्याला भार नाही. सम अंक ऋण किंवा उणे असू शकतो. पण शुन्य दोन्हीही नाही. स्थिर आहे. मध्य आहे. अशी ही शुन्यावस्था आहे. येथे विचार थांबलेले असतात. अस्थिरता, चलबिचलता नसते. कमी-जास्तपणा नसतो. उच-निच भेद नसतो. ही अवस्था नेहमीपेक्षा वेगळी आहे. एकदा या अवस्थेला पोहोचल्यानंतर पुन्हा माघारी येणे नाही. दूध नाशवंत आहे. ते एकदोन दिवस उत्तम प्रकारे राहु शकते. त्यानंतर मात्र ते उत्तम राहील का? हे सांगता येत नाही. यासाठी ते वेगळ्याप्रकारात रुपांतरीत करणे गरजेचे असते. दुधाचे विरजण लावून त्यापासून दही केले जाते. दूधाचे दही झाले. अवस्था बदलली. तसे त्याचे नावही बदलले. आता दह्याला कोणी दुध म्हणेल का? उसाच्या रसापासून साखर तयार केल्यानंतर पुन्हा साखरेपासून ऊस तयार करता येत नाही. ही रासायनिक प्रक्रिया आहे. एखाद्या घटकाचे रुपांतरन दुसऱ्या घटकात झाल्यानंतर पुन्हा पहिल्या घटकात त्यांचे रुपांतर करता येत नाही. पहिलीची परिक्षा पास झाल्यानंतर दुसरीच्या वर्गात जाता येते. नापास झाला तर मात्र पहिलीच्या वर्गातच ठेवले जाते. पण एकदा दुसरी, तिसरी, चौथीत गेल्यानंतर पुन्हा कोणी पहिलीमध्ये बसवेल का? तसे होत नाही. कारण त्या सर्व इयत्ताचा अभ्यास त्याने योग्य प्रकारे पूर्ण केलेला असतो. म्हणूनच पुढच्या इयत्तात प्रवेश दिला जातो. तसेच अध्यात्माचे आहे. एक-एक इयत्ता पास व्हायचे असते. सद्‌गुरू परिक्षा घेत असतात. त्यातून पास होत राहायचे असते. गुरूच प्रश्‍न करतात, गुरूच उत्तर देतात. हळुहळु साधकामध्ये ते विकास घडवत असतात. नराचा नारायण ते करतात. मग एकदा ब्रह्मत्वाला पोहोचलेल्या व्यक्तीला सर्वसामान्य कोणी म्हणेल का? कारण त्या व्यक्तीची अवस्था बदललेली असते. त्याचा विकास झालेला असतो. तो त्या पदाला पोहाचलेला असतो. आता तेथून पुन्हा माघारी येता येत नाही. वाल्ह्याकोळीचा वाल्मिकी झाल्यानंतर आता त्यांना वाल्ह्याकोळी कोणी म्हणते का? उलट त्यांना वाल्मिकी ऋषी म्हटले जाते. योग्य तो मान-सन्मान दिला जातो. हे सर्व सद्‌गुरूंच्याकृपेने होते. यासाठी कृपा होणे गरजेचे आहे. कृपेने अवस्थेत बदल होतो. ते भक्ताला त्यांच्या अवस्थेत आणतात. अवस्था बदलल्यानंतर त्यांचे नामांतर हे होतेच. विशेष पदवी प्राप्त केल्यानंतर नावापुढे त्या पदवीचा उल्लेख होतो ना? डॉक्‍टरेट मिळाल्यानंतर डॉक्‍टर हे विशेषण नावापुढे जोडले जाते ना? यासाठी या नर देहाचा नारायण होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. नामामध्ये हे सामर्थ आहे. नामानेच हे नामांतर घडते. यासाठी सतत नामस्मरणात राहायला हवे.

Sunday, January 27, 2019

ध्यान







मृत्यू शय्येवर पडलेल्या वृद्ध व्यक्तीजवळ धर्म ग्रंथांची पारायणे करण्याची पद्धत होती. त्या वृद्ध व्यक्तीला मोक्ष मिळावा, हाच या मागचा उद्देश होता. त्या वृद्धाला अंतिम समयी भगवंताचे स्मरण राहावे व त्याला मोक्ष मिळावा. हेच यातून साध्य करायचे असते.

डोळां जें देखावें । कां कानीं हन ऐकावें ।
जें भावावें । बोलावें वाचें ।। 76।। अध्याय 8 वा

ओवीचा अर्थ - डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानांनी जे ऐकावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीनें जें बोलावें

ध्यान करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात? ध्यान कसे करावे? हे प्रश्‍न नित्याचे असतात. संत ज्ञानेश्‍वरांनी ओव्यातून या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. हे समजावून सांगताना विविध उदाहरणेही त्यांनी सांगितली आहेत. भगवंताचे नामस्मरण सतत असावे. सद्‌गुरूंनी दिलेला गुरू मंत्र सतत जपला जावा. अनेक भक्त सतत नामस्मरण करतात. पण यातून काहीच साध्य झाले नाही. अशी त्यांची तक्रार असते. अशाने त्याचे मन विचलित होण्याचीही शक्‍यता असते. काही वेळेला या अध्यात्मावरचा विश्‍वासही उडतो. पण ध्यान करताना आवश्‍यक घटक आपण पाळले का? याचा विचार कधीही केला जात नाही. ध्यानामध्ये डोळे जरी मिटलेले असले तरी ते डोळे मनाने उघडे असतात. मनात अनेक घटना घडत असतात. ते मन सद्‌गुरूच्या रुपावर स्थिर करावे. त्या मनाच्या डोळ्यांनी सद्‌गुरूंचे रूप पाहावे. संत तुकाराम महाराज विठ्ठलाचा जप करताना डोळ्यांनी विठ्ठलाचे रूप पाहात. साक्षात विठ्ठल त्यांना दर्शन देत असे. ध्यानामध्ये सतत सद्‌गुरूंचे दर्शन घडणे हा सुद्धा साक्षात्कारच आहे. सद्‌गुरूंनी दिलेला मंत्र जपताना त्याचा नाद कानांनी ऐकावा. सोऽहमचे स्वर ऐकावेत. ध्यान योग्यप्रकारे लागले तर हे स्वर सहज कानाला ऐकू येतात. यामध्ये रममान होता येते. ध्यानामध्ये मनाची एकाग्रता वाढते. यामुळे श्रवणशक्ती वाढते. याचे विकारही दूर होतात. यासाठी मनात सद्‌गुरू भाव प्रकट व्हायला हवा. भक्तीमय भावातून मनाला प्रसन्नता लाभते. मन आनंदी होते. उत्साह वाढतो. साहजिकच आपल्या शारीरिक आचार-विचारातही फरक पडतो. आरोग्यही सुधारते. बोलण्यातही मृदुपणा येतो. गोडवा येतो. यासाठी ध्यान हे योग्य प्रकारे व्हायला हवे. ध्यान करताना या गोष्टींचा विचार जरूर करायला हवा. जप जपतानाही उच्चार स्पष्ट असायला हवा. ज्ञानेश्‍वरी वाचन करतानाही या गोष्टी जरूर पाळायला हव्यात. यामुळे आपल्या वाचन, श्रवण, स्मरण या शक्ती सुधारतात. उतार वयात ध्यान नित्य नेमाने करत राहिल्यास आरोग्यही उत्तम राहाते. शेवटच्या क्षणापर्यंत सतत ध्यानात रममान व्हायला हवे. देह ठेवतानाही सद्‌गुरूंचे, भगवंताचे स्मरण ठेवले तरीही मोक्षाचा लाभ होतो. यासाठी पूर्वीच्या काळी अंतिम घटका मोजणाऱ्या, मृत्यू शय्येवर पडलेल्या वृद्ध व्यक्तीजवळ धर्म ग्रंथांची पारायणे करण्याची पद्धत होती. त्या वृद्ध व्यक्तीला मोक्ष मिळावा, हाच या मागचा उद्देश होता. त्या वृद्धाला अंतिम समयी भगवंताचे स्मरण राहावे व त्याला मोक्ष मिळावा. हेच यातून साध्य करायचे असते.



Saturday, January 26, 2019

म्हातारपण




प्रेमाने वागण्यात केलेला हा बदल आयुष्याच्या उतारवयात अनेक व्याधींपासून दूर ठेवतो. मन प्रसन्न ठेवता आले तर अनेक आजारापासून मुक्ती मिळते. कारण अनेक व्याधी ह्या मनातील रागातून उत्पन्न होतात. शरीरावर त्याचा अनिष्ट परिणाम होत असतो. यासाठी क्रोध, राग, द्वेष यापासून दूर राहून मन प्रसन्न ठेवण्यावर अधिक भर दिला तर, आरोग्यही उत्तम राहाते.
 
 

आता वृद्धाप्याचिया तरंगा । माजीं मतिभ्रंशाचा जरंगा ।
तेणें कवळिजताती पै गा । चहूंकडे ।। 86 ।। अध्याय 7 वा

ओवीचा अर्थ - आतां म्हातारपणरूपी लाटेमध्ये असणाऱ्या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्यानें ते चोहोंबाजूंनी व्यापले जातात.

निवृत्तीनंतर करायचे काय हा प्रश्‍न अनेकांना पडतो. काहीजण नोकरीत कंटाळलेले असतात. त्यामुळे निवृत्तीचा त्यांना आनंद वाटतो. पण प्रत्यक्षात निवृत्तीनंतर एक-दोन महिने बरे वाटते. त्यानंतर मात्र सुट्टी नकोशी वाटू लागते. काहीजणांना पुस्तके वाचनाचा छंद असतो. ते विविध पुस्तके वाचनात वेळ घालवतात. विविध छंदात मन रमवणे याशिवाय दुसरे पर्याय दिसत नाहीत. काहीजण निवृत्तीनंतर देवदर्शनासाठी जातात. विविध गोष्टीत मन रमविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मन रमत नसेल, तर मग मात्र मनात चिडचिडेपणा वाढतो. एकाकीपणानेही मनाची स्थिरता ढळते. घरात बसलेतर घर खायला उठते. फिरायला गेलेतर विविध विषयांच्या चर्चेने त्रास होतो. मनाचा हा त्रागा शांत करायला हवा. वृत्तपत्रातील बातम्या वाचूनही मनाला त्रास वाटू लागतो. जगातील विविध प्रश्‍नांनी मनास त्रास करून घेण्यापेक्षा विरंगुळा म्हणून वाचन करायला हवे. मनास प्रसन्न ठेवणारे साहित्यच वाचायला हवे. त्यातच मन रमवायला हवे. ज्ञानेश्‍वरी वाचन करून अध्यात्माचा अभ्यास करायला हवा. आयुष्याच्या उतारवयात तरी इतरांना त्रास होणार नाही, असे वागायला हवे. आचरणात केलेला फरकही मनाला आनंद देतो. दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यात स्वतःला आनंद मिळतो हे लक्षात घ्यायला हवे. त्यानुसार दुसऱ्यांना आनंद देत राहावे. घरातील सर्वांना प्रेम दिले तर, उतारवयात हे सर्वही तुमच्यावर निश्‍चितच प्रेम करतील. काही वेळेला हे प्रेम मुलांना नकोसे वाटते. मनाला खटकते, पण म्हणून तुम्ही तुमचे प्रेम लपवू नये. प्रेमाने वागण्यात केलेला हा बदल आयुष्याच्या उतारवयात अनेक व्याधींपासून दूर ठेवतो. मन प्रसन्न ठेवता आले तर अनेक आजारापासून मुक्ती मिळते. कारण अनेक व्याधी ह्या मनातील रागातून उत्पन्न होतात. शरीरावर त्याचा अनिष्ट परिणाम होत असतो. यासाठी क्रोध, राग, द्वेष यापासून दूर राहून मन प्रसन्न ठेवण्यावर अधिक भर दिला तर, आरोग्यही उत्तम राहाते. पिढीतील अंतरामुळे नातवंडावर संस्कार करण्यात तुम्ही कमी पडत असाल. पण तरीही त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यात, त्यांच्या आनंदात रमण्यातच खरा आनंद आहे. विचारांची ही तफावत पाहून मनास त्रास करून घेऊ नये. आपण आपले आचरण चांगले ठेवले तर त्यांच्यावरही चांगले संस्कार होऊ शकतात. प्रेमाने जग जिंकता येते. सर्वावर प्रेम करून त्यांच्यावर विजय मिळवावा.

Friday, January 25, 2019

वाफसा




अध्यात्मात सातत्याला महत्त्व आहे. यासाठी आवश्‍यक प्रयत्न हे हवेत. प्रयत्नामुळेच ही मनास वाफसा येतो. सद्‌गुरू बिजाची पेरणी करताना हीच स्थिती पाहतात. गुरूमंत्र वाया जाणार नाही, यासाठी भक्तांच्या मनाचा वाफसा तपासतात. तो यावर दृढ आहे की नाही, हे पाहतात. पण ही स्थितीही त्यांच्या आर्शिवादानेच येते.

वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनयाऐसा ।
म्हणोनि पेरावया धिंवसा । निवृत्तीसी ।। 491 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - आणखी सोन्यासारखा अवधानरूपी वाफसा मिळाला, म्हणून श्री निवृत्तीनाथांस पेरण्याची इच्छा झाली.

जमिनीत वाफसा असेल, तर शेतात पेरणी होऊ शकते. दलदल किंवा कठीण जमिनीत पेरणी होऊ शकत नाही. धूळ पेरणी करतानाही जमीनीची योग्य मशागत झालेली असणे आवश्‍यक असते. बियाण्यांची पेरणी करताना जमिन पेरणी योग्य आहे का नाही याची पाहणी केली जाते. जमीन पेरणी योग्य नसेल तर, पेरणी केली जात नाही. पेरणी अयोग्य असणाऱ्या जमीनीत पेरणी केली तर त्यातून योग्य उत्पन्न येईल याची शाश्‍वती देता येत नाही. अशा जमीनीत बियाणे उगविण्याचीही शक्‍यता नसते. यासाठी केलेली पेरणी वाया जाणार नाही याची काळजी घेऊनच शेतकरी शेतात पेरणी करतो. सद्‌गुरूही अनुग्रह देण्यापूर्वी भक्ताची हीच स्थिती तपासतात. भक्त गुरूमंत्राच्या बीज पेरणीस योग्य आहे की नाही, त्यामध्ये ती पात्रता आहे की नाही. हे पाहतात. जर भक्त बीज पेरणी योग्य नसेल तर त्यास अनुग्रह प्राप्ती होत नाही. यासाठी भक्तांनी स्वतःचा विकास पेरणी योग्य करून घ्यायला हवा. याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मनात झालेली विषयांची दलदल दूर करायला हवी. वाईट विचार काढून टाकायला हवेत. मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी आवश्‍यक आचरण करायला हवे. रागाचा चढलेला पारा उतरवायला हवा. कामाचा मोह टाळायला हवा. मनाची स्थिती सुधारायला हवी. पण असे करूनही अनेकदा अनेकांना अनुग्रह प्राप्ती होत नाही. असे का होते? तर ही स्थिती म्हणजे वाफसा नव्हे. वाफसा येण्यासाठी आवश्‍यक असणारे हे घटक आहेत. या घटकांचे ऐक्‍य हवे. मन त्यावर नियंत्रित व्हायला हवे. वाफशाची स्थिती कायम रहायला हवी. यासाठी अवधान हवे. जागरूकता हवी. वाफसा आला आणि गेला असे नको. ती स्थिती नित्य राहायला हवी. त्यात सातत्य हवे. अध्यात्मात सातत्याला महत्त्व आहे. यासाठी आवश्‍यक प्रयत्न हे हवेत. प्रयत्नामुळेच ही मनास वाफसा येतो. सद्‌गुरू बिजाची पेरणी करताना हीच स्थिती पाहतात. गुरूमंत्र वाया जाणार नाही, यासाठी भक्तांच्या मनाचा वाफसा तपासतात. तो यावर दृढ आहे की नाही, हे पाहतात. पण ही स्थितीही त्यांच्या आर्शिवादानेच येते. त्यांच्या सामर्थ्यामुळेच प्राप्त होते. पण भक्ताचे यासाठी अवधान असायला हवे. सैनिक नेहमी सावधान स्थितीत असतात. विश्रामातही ते सावध असतात. भक्तही असा असायला हवा. विश्रामातही सावध असायला हवा. सद्‌गुरू भक्तांच्या याच स्थितीची परीक्षा घेतात आणि यामध्ये जो पास होतो त्यास सद्‌गुरूंची कृपा होते.

स्मरण गणेशाचे (व्हिडिओ)


आत्मरूप गणेशु स्मरण।  सकळ विद्यांचे अधिकरण। 
तेचि वंदू श्री चरण।  श्रीगुरूंचे ।। 1।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - सर्व विद्यांचे आश्रयस्थान जें आत्मरूप गणेशाचे स्मरण, तेच श्री गुरूंचे श्री चरण होत त्यास नमस्कार  करू. 

अभ्यास






ज्ञानेश्‍वरीच्या ओव्या पाठ असतात. त्याचे अर्थ पाठ असतात. पण त्यावर विचार केला नाही तर ज्ञान प्राप्ती कशी होणार? आत्मज्ञान प्राप्तीसाठी ओव्या पाठ असण्याची गरज नाही. त्याचे अर्थही पाठ असून नुसते उपयोग नाही. तर ती ओवी तुमच्याशी बोलायला हवी. ती ओवी अनुभवायला हवी. त्यांची प्रचिती यायला हवी. अनुभवातूनच ज्ञान प्राप्ती होते.


इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरवसेंनि ब्रह्मत्वा येती ।
हे सांगतियाचि रीती । कळलें मज ।। 330।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - दृढनिश्‍चयाने जे अभ्यास करतात, ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात. हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजले.

एखादे लक्ष्य साध्य करायचे असेल, तर त्याचा अभ्यास हा करायला हवा. नुसती घोकमपट्टी, पाठांतर म्हणजे अभ्यास नव्हे. अभ्यास म्हणजे त्या गोष्टीचा सर्वांगाने केलेला विचार आहे. परीक्षेत विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर पाठ करून दिले. पैकीच्या पैकी मार्क मिळाले. पण तो विषय समजला नसेल तर त्यात काहीच अर्थ नाही. परीक्षेत मार्क जरूर मिळवावेत पण तो विषय सर्वार्थाने समजावून घेतलेला असावा. त्या विषयाच्या सर्व बाजू, त्याचे सर्व पैलू अभ्यासले जावेत. उदाहरण सांगायचे तर रासायनिक समिकरणांची पाठ करून उत्तरे बरोबर देता येतात. एच अधिक ओटू बरोबर एचओटू म्हणजे पाणी हे सांगता येते. पण ही रासायनिक प्रक्रिया नेमकी कशी झाली, ती कशी घडते, याचा सखोल विचार करायला हवा. तसे प्रश्‍न पडायला हवेत. मनाला अशा प्रश्‍नांची सवय लावायला हवी. प्रश्‍न पडू लागले की उत्तरे शोधण्याची सवय आपोआपच लागते. यासाठी अभ्यास करताना त्या विषया संदर्भात प्रश्‍न, शंका मनात उपस्थित व्हायला हव्यात. ते प्रश्‍न सोडविण्यासाठी मन पेटून उठायला हवे. प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यामध्ये मन रमायला हवे. या सवयीमुळे परीक्षेत दिलेले प्रश्‍न सहज सोडविता येतात. त्याची भीती मनात राहात नाही. मनमोकळेपणे उत्तरे देता येतात. पाठांतराने प्रश्‍नाचे उत्तर अचूक लिहिले जाते खरे पण त्यावर विचार होत नाही. लहानपणी पाठांतराने चांगले मार्क मिळतात. पण विचार करण्याची कुवत त्यामध्ये उत्पन्न होत नाही. उच्चशिक्षण घेताना मग याचा तोटा होतो. वैचारिक पातळीतील कमकुवतपणा असल्याने तेथे आपण मागे पडतो. विचार करण्याची क्षमताच नसल्याने उत्तरे देता येत नाहीत. उत्तरेच सापडत नाहीत. यासाठी लहानपणापासून केवळ पाठांतर नको तर तो विषय सर्वांगाने समजून घेण्याची सवय लावायला हवी. अध्यात्मातही असेच आहे. ज्ञानेश्‍वरीच्या ओव्या पाठ असतात. त्याचे अर्थ पाठ असतात. पण त्यावर विचार केला नाही तर ज्ञान प्राप्ती कशी होणार? आत्मज्ञान प्राप्तीसाठी ओव्या पाठ असण्याची गरज नाही. त्याचे अर्थही पाठ असून नुसते उपयोग नाही. तर ती ओवी तुमच्याशी बोलायला हवी. ती ओवी अनुभवायला हवी. त्यांची प्रचिती यायला हवी. अनुभवातूनच ज्ञान प्राप्ती होते. यासाठी ध्यान, साधना करायला हवी. तरच ज्ञानाची अनुभूती येईल. यासाठीच याचा अभ्यास करायला हवा. त्यावर सर्वांगाने विचार करायला हवा. पाठांतर म्हणजे अभ्यास नव्हे. तो विषय समजून घेऊन ज्ञान संपादन करायला हवे.

Thursday, January 24, 2019

कृष्णार्जुनसंवादु



तो कृष्णार्जुनसंवादु। नागरीं बोली विशदु।
सांगोनि दाऊं प्रबंधु। वोवियेचा।। ।। अध्याय वा

ओवीचा अर्थ - ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो कृष्णार्जुनाचा संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर शब्दांनी स्पष्ट सांगून दाखवू.

गीता हा कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे. गुरू आणि शिष्य यांच्यात झालेला संवाद आहे. हा संवाद आपल्या आयुष्यातही मार्गदर्शन करणारा असा आहे. युद्ध न करण्याचा निर्णय अर्जुनाने रणभूमीवर घेतला. लढायची मानसिकता तो गमावून बसला. अशावेळी त्याला त्याचे कर्म, धर्म समजावून सांगण्याचे कर्तव्य श्रीकृष्णाने येथे केले. तसेच त्यांनी जीवनाचे सारच रणभूमीवर अर्जुनास सांगितले. युद्धापासून परावृत्त झालेल्या अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचे काम श्रीकृष्णाने केली. जीवनाच्या युद्ध भूमीवर आपलीही अशीच अवस्था बऱ्याचदा होत असते. आपणही असेच अनेकदा वैतागून जात असतो. अर्जुनाने जसे गांडीव खाली ठेवून नकारात्मक विचार सुरु केला. तसाच विचार आपणही जीवनात बऱ्याचदा करत असतो. अशा अवस्थेमुळे आपणास अनेकदा अपयशही पदरी पडते. पण अशा अवस्थेतून बाहेर पडून यशस्वी कसे व्हायचे, हा मार्ग आपणास गीता व ज्ञानेश्वरी वाचनातून निश्‍चितच मिळतो. यासाठीच गीता, ज्ञानेश्‍वरी ही आपणासाठी मार्गदर्शक आहे. जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर गीतेचा अभ्यास हा करायलाच हवा. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीका आहे. गीता संस्कृतमध्ये आहे, पण सर्वसामान्य माणसाला संस्कृत येतेच असे नाही. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य माणसाच्या उद्धारासाठी ती सोप्या भाषेत सांगितली. उदाहरण देऊन सांगितले की एखादी गोष्ट समजालया सोपी जाते. ती पटकन लक्षात राहते. म्हणून अनेक उदाहरणे देऊन संत ज्ञानेश्‍वरांनी गीतेचे सार पटवून सांगितले. हा कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे, हे वारंवार सांगण्यासही माऊली विसरली नाही. गुरु आणि शिष्य हे नाते कसे श्रेष्ठ आहे हे सांगताना कृष्णाने हे गुह्य आपल्या प्रिय राधेसही सांगितले नाही. केवळ आपला शिष्य अर्जुनाला हे गुह्य सांगितले. गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते किती श्रेष्ठ असते हे यावरून स्पष्ट होते. गुरू शिष्याला सर्व समस्यांतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करतो. पण त्याबरोबरच तो जीवनाचे मर्म सांगतो. शिष्याच्या मनातील शंका दूर करण्यासाठी, त्याच्या मनातील जळमटे दूर करण्यासाठी गुरूची धडपड असते. जीवनाचा खरा अर्थ सांगून त्याला ज्ञानी करणे व त्याला आपल्या पदांवर बसवणे हे गुरूचे मुख्य ध्येय असते. आपल्याप्रमाणे त्यालाही आत्मज्ञानी करणे हेच खऱ्या गुरुचे लक्षण आहे. यासाठी गुरू आणि शिष्यात वारंवार संवाद होणे गरजेचे असते. हा संवाद स्मरणातूनही होऊ शकतो. आपली योग्यता असेल तर स्मरणातही गुरू आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांची समाधी ही संजीवन आहे. ते समाधीस्थ अवस्थेतही खऱ्या शिष्याला मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाने शिष्याला धीर येतो. कृष्ण आणि अर्जुनातील हा संवाद श्री ज्ञानेश्‍वरांनी उघड करून जगासमोर मांडला आहे. हा संवाद सर्वांसाठी मार्गदर्शन आहे.

Wednesday, January 23, 2019

मठ

 


मठ, मंदीर, शिवालयाचे उद्देश टिकवालया हवेत. मने जोडणारी, प्रसन्नता वाढवणारी ही ठिकाणे आहेत याचा विचार करून त्यानुसार तेथे आचरण हे ठेवायला हवे. सहसा साधनेसाठी उत्तम असणारी ही ठिकाणी सहजपणे दृष्टीस पडत नाहीत. सहसा त्या ठिकाणी फारशी गर्दीही नसते. अशी ठिकाणेच साधनेसाठी निवडावीत.  


परि आवश्‍यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा ।
तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ।। 179 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - परंतु अर्जुना, असलें स्थान जरूर शोधून ठेवावें. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावें.

सद्‌गुरू कोणत्याही साधनाने लाभत नाहीत. पण जे निष्कामभावानें, साम्यबुद्धीने सद्‌गुरूंची प्रार्थना करतात. आत्मज्ञान लाभावे अशी इच्छा करतात, त्यांना सद्‌गुरूंच्या इच्छेने या आत्मज्ञानाचा लाभ होतो. सध्या वाढत्या शहरीकरणात साधना, ध्यान-धारणा करण्यासाठी योग्य ठिकाणे सापडणे कठीण झाले आहे. पण ही ठिकाणे शोधली तर सहज सापडतात. पुणे शहराच्या गजबजलेल्या मध्यवर्ती ठिकाणीही अशी ठिकाणे आहेत. जंगली महाराज रोड हा सदैव गजबजलेला. गोंगाट असणारा रस्ता. पण या रस्त्यावरच जंगली महाराजांचा मठ आहे. रस्त्यावर गाड्यांचा गोंगाट असला तरी मठामध्ये शांतता आहे. झाडीमध्ये असणारे हे ठिकाण गारवा देणारे, मनाला शितलता, प्रसन्नता देणारे असे आहे. शेजारीच पाताळेश्‍वर मंदीर आहे. या दगडी मंदीरात साधनेसाठी उत्तम वातावरण आहे. धकाधकीच्या या जीवनात अशी ठिकाणे निश्‍चितच मनाला प्रसन्नता देणारी आहेत. मठ किंवा शिवालय हे अध्यात्माची पाठशालाच आहे. येथे आत्मज्ञानाच्या विकासासाठी आवश्‍यक वातावरण असते. मठामध्ये समाधी अवस्थेत सद्‌गुरुंचे नित्य वास्तव्य असते. यासाठी अशा ठिकाणी नित्य साधना करावी. कितीही मोठे शहर असले तरी त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी देवालय, शिवालय किंवा मठ हे असतेच. नगरांची रचना करताना पूर्वीच्याकाळी तशी उपाययोजना केली जात होती. विस्कटलेली मने येथे घडवली जात होती. गावांमध्येही मंदीरामध्ये तंटे, वादविवाद सोडविले जात होते. अशी ठिकाणे ही मने जोडणारी असतात. पण बदलत्या संस्कृतीमध्ये ही ठिकाणे मने जोडण्याऐवजी तोडण्याची ठिकाणे झाली आहेत. धर्माच्या नावावर, मंदीराच्या नावावर मने भडकवली जात आहेत. ज्या ठिकाणे मने जोडण्याचे काम चालायचे तेथे मने दुखवायची कृत्ये केली जात आहेत. अशाने अनेक मंदीरे ओस पडत आहेत. मंदीरांचा उद्देशच नष्ट होत चालला आहे. यामुळे त्या ठिकाणची ओढ कमी होत आहे. मंदीर दिसले तरी दोन मिनिटे थांबून नमस्कार केला जायचा. पण आता थांबायलाही वेळ नाही. मग नमस्कार कधी करणार अशी स्थिती झाली आहे. मठ, मंदीर, शिवालयाचे उद्देश टिकवालया हवेत. मने जोडणारी, प्रसन्नता वाढवणारी ही ठिकाणे आहेत याचा विचार करून त्यानुसार तेथे आचरण हे ठेवायला हवे. सहसा साधनेसाठी उत्तम असणारी ही ठिकाणी सहजपणे दृष्टीस पडत नाहीत. सहसा त्या ठिकाणी फारशी गर्दीही नसते. अशी ठिकाणेच साधनेसाठी निवडावीत. मनाला प्रसन्नता देणारी ही ठिकाणे आत्मज्ञानाच्या प्रगतीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरतात.


परि आवश्‍यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा ।
तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ।। 179 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - परंतु अर्जुना, असलें स्थान जरूर शोधून ठेवावें. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावें.

सद्‌गुरू कोणत्याही साधनाने लाभत नाहीत. पण जे निष्कामभावानें, साम्यबुद्धीने सद्‌गुरूंची प्रार्थना करतात. आत्मज्ञान लाभावे अशी इच्छा करतात, त्यांना सद्‌गुरूंच्या इच्छेने या आत्मज्ञानाचा लाभ होतो. सध्या वाढत्या शहरीकरणात साधना, ध्यान-धारणा करण्यासाठी योग्य ठिकाणे सापडणे कठीण झाले आहे. पण ही ठिकाणे शोधली तर सहज सापडतात. पुणे शहराच्या गजबजलेल्या मध्यवर्ती ठिकाणीही अशी ठिकाणे आहेत. जंगली महाराज रोड हा सदैव गजबजलेला. गोंगाट असणारा रस्ता. पण या रस्त्यावरच जंगली महाराजांचा मठ आहे. रस्त्यावर गाड्यांचा गोंगाट असला तरी मठामध्ये शांतता आहे. झाडीमध्ये असणारे हे ठिकाण गारवा देणारे, मनाला शितलता, प्रसन्नता देणारे असे आहे. शेजारीच पाताळेश्‍वर मंदीर आहे. या दगडी मंदीरात साधनेसाठी उत्तम वातावरण आहे. धकाधकीच्या या जीवनात अशी ठिकाणे निश्‍चितच मनाला प्रसन्नता देणारी आहेत. मठ किंवा शिवालय हे अध्यात्माची पाठशालाच आहे. येथे आत्मज्ञानाच्या विकासासाठी आवश्‍यक वातावरण असते. मठामध्ये समाधी अवस्थेत सद्‌गुरुंचे नित्य वास्तव्य असते. यासाठी अशा ठिकाणी नित्य साधना करावी. कितीही मोठे शहर असले तरी त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी देवालय, शिवालय किंवा मठ हे असतेच. नगरांची रचना करताना पूर्वीच्याकाळी तशी उपाययोजना केली जात होती. विस्कटलेली मने येथे घडवली जात होती. गावांमध्येही मंदीरामध्ये तंटे, वादविवाद सोडविले जात होते. अशी ठिकाणे ही मने जोडणारी असतात. पण बदलत्या संस्कृतीमध्ये ही ठिकाणे मने जोडण्याऐवजी तोडण्याची ठिकाणे झाली आहेत. धर्माच्या नावावर, मंदीराच्या नावावर मने भडकवली जात आहेत. ज्या ठिकाणे मने जोडण्याचे काम चालायचे तेथे मने दुखवायची कृत्ये केली जात आहेत. अशाने अनेक मंदीरे ओस पडत आहेत. मंदीरांचा उद्देशच नष्ट होत चालला आहे. यामुळे त्या ठिकाणची ओढ कमी होत आहे. मंदीर दिसले तरी दोन मिनिटे थांबून नमस्कार केला जायचा. पण आता थांबायलाही वेळ नाही. मग नमस्कार कधी करणार अशी स्थिती झाली आहे. मठ, मंदीर, शिवालयाचे उद्देश टिकवालया हवेत. मने जोडणारी, प्रसन्नता वाढवणारी ही ठिकाणे आहेत याचा विचार करून त्यानुसार तेथे आचरण हे ठेवायला हवे. सहसा साधनेसाठी उत्तम असणारी ही ठिकाणी सहजपणे दृष्टीस पडत नाहीत. सहसा त्या ठिकाणी फारशी गर्दीही नसते. अशी ठिकाणेच साधनेसाठी निवडावीत. मनाला प्रसन्नता देणारी ही ठिकाणे आत्मज्ञानाच्या प्रगतीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरतात.

Tuesday, January 22, 2019

विज्ञानात्मक भाव




विषयांचे ज्ञान ते विज्ञान. आत्माचे ज्ञान ते आत्मज्ञान. विषयांचे ज्ञान आणि आत्मज्ञान यातील फरक आपण जाणायला हवा. आपल्या दैनंदिन गरजेच्या हव्यासापोटी आपण विविध विषयांच्या मागे धावत आहोत. जगात वावरायचे तर याची गरज झाली आहे. पण ही गरज वाईट परिणाम घडवत असेल तर त्याच्या मर्यादा ओलांडता कामा नये
 
जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विवरितां जाहला वावो ।
लागला जंव पाहों । तंव ज्ञान तें तोचि ।। 88 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - अनुभवाला येणारें जें हें दृश्‍य जगत्‌ त्याचा विचार करतां, तें त्याच्या दृष्टीनें मिथ्या ठरले व मग आपण कोण आहे असें जेंव्हा तो पाहावयास लागला तेंव्हा ज्ञान तेंच आपण आहोंत असें त्यास कळलें.

विज्ञानाच्या प्रगतीने अनेक अंधश्रद्धा दूर झाल्या. खरे तर विज्ञानात्मक भावानेच अध्यात्माची प्रगती होते. हा पंचमहाभूताचा देह आहे. हा देह विविध रासायनिक मुलद्वव्याने तयार झालेला आहे. दात, हाडामध्ये कॅल्शियम आहे. कार्बन आणि त्यांच्या संयुगामुळे शरीराची कातडी तयार झाली आहे. देहातील प्रत्येक घटकांत ही मुलद्रव्ये आहेत. विविध रसायनांनी युक्त असा या देहात जेव्हा आत्मा येतो. तेव्हा त्याला जिवंत स्वरूप प्राप्त होते. आत्मा देहातून गेल्यानंतर हा केवळ रासायनिक घटकांचा सांगाडा आहे. आत्मा देहात येतो आणि जातो. पण प्रत्यक्षात तो जन्मतही नाही साहजिकच तो मृतही होत नाही. विज्ञानामुळे हे सर्व स्पष्ट होते. या गोष्टी समजण्यासाठी विज्ञानात्मक दृष्टी असण्याची गरज आहे. कोणतेही ज्ञान झाल्यानंतर त्याचा उपयोग हा योग्य गोष्टींसाठी व्हायला हवा. विज्ञानाने अणु-रेणुंचा शोध लागला. पण त्यापासून बॉंम्ब तयार करून जनतेमध्ये अशांती निर्माण केली जात असेल तर ते ज्ञान योग्य आहे का? कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. चांगली आणि वाईट. त्यातील कोणती निवडायची हे आपण ठरवायचे असते. विज्ञानाचा उपयोग चांगल्यासाठी करायला हवा. अध्यात्मातील प्रत्येक गोष्ट ही विज्ञानावर आधारलेली आहे. विविध विषयांची शास्त्रे आहेत. भौतिक, रसायन, जैविक असे विविध विषयांची ही शास्त्रे आहेत. या शास्त्राचा उपयोग आपण जीवनात करतो. शास्त्राला मर्यादा आहेत. ती मर्यादा ओलांडली तर ते शास्त्र फायदेशीर न ठरता नुकसानकारक ठरते. याचा विचार करून त्या शास्त्राचा उपयोग करायला हवा. इंधनासाठी लाकडाचा उपयोग होतो. म्हणून सरसकट वृक्षतोड केली तर चालणार आहे का? नाही ना? त्याचेच दुष्परिणाम आपण सध्या भोगतो आहोत. प्रदूषणाची पातळी आपण ओलांडली आहे. जागतिक तापमानवाढीचे चटके आपण सोसत आहोत. विज्ञानाच्या मर्यादा ओलांडल्याचाच हा परिणाम आहे. विषयांचे ज्ञान ते विज्ञान. आत्माचे ज्ञान ते आत्मज्ञान. विषयांचे ज्ञान आणि आत्मज्ञान यातील फरक आपण जाणायला हवा. आपल्या दैनंदिन गरजेच्या हव्यासापोटी आपण विविध विषयांच्या मागे धावत आहोत. जगात वावरायचे तर याची गरज झाली आहे. पण ही गरज वाईट परिणाम घडवत असेल तर त्याच्या मर्यादा ओलांडता कामा नये. विषयांच्या ज्ञानाने आत्मज्ञान जाणून घ्यायला हवे. आत्मज्ञान हे स्वतःचे ज्ञान आहे. ते म्हणजेच आपण आहोत. हे जाणून घ्यायला हवे.

Sunday, January 20, 2019

आत्मज्ञानी सूर्य









 
सृष्टीचा शोध घेण्यासाठी जगातील सर्वांत मोठा संशोधन प्रकल्प राबविण्यात आल्या. एक भला मोठा स्फोट घडविण्यात आला. यामध्ये शोधण्यात आलेल्या कणाला शेवटी गॉडपार्टीकल असे संबोधले गेले. सूर्यामध्ये अगणित स्फोट घडत असतात. असाच एक स्फोट या प्रयोगात घडविण्यात आला. सूर्याच्या या शक्तीचा शोध या संशोधकांना घ्यायचा होता. विश्वाचे आर्त जाणण्यासाठी त्यांना सूर्याच्या या शक्तीचा अभ्यास करावा लागला. या शक्तीचा आधार घ्यावा लागला तसे आत्मज्ञानाचा शोध घेतानाही आत्मज्ञानी सूर्याचे, आत्मज्ञानी सद्‌गुरूंचे मार्गदर्शन घेणेच योग्य ठरते.


जे जया वाटा सूर्य जाये । तेउतें तेजाचें विश्व होये ।
तैसें तया पावे तें आहे । तोचि म्हणउनि ।।86।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - कारण की, सूर्य ज्या मार्गाने जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होतो. त्याप्रमाणे त्याला जें जें प्राप्त होते, ते त्यांचेच स्वरुप आहे.

विश्वाच्या पोकळीचा अंत अद्याप सापडलेला नाही. सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे हे ग्रह, तारका या व्यतिरिक्त या विश्वात आणखी काय काय दडलेले आहे. याचाही शोध अद्याप लागलेला नाही. जीव सृष्टी फक्त पृथ्वीवरच अस्तित्वात आहे. इतर ग्रहावर आहे का नाही याचा शोध अद्याप सुरू आहे. साधक हा सुद्धा एक संशोधकच असतो. आत्मज्ञान प्राप्ती हे त्याचे ध्येय आहे. यासाठी आवश्‍यक गोष्टींचा शोध तो घेतो. यापूर्वी यावर कोणी कोणी संशोधन केले आहे. कोण यामध्ये यशस्वी झाले आहे. अशा आत्मज्ञानी सद्‌गुरूंचा शोध तो प्रथम घेतो. त्यानंतर त्यांनी केलेल्या प्रयोगाच्या मार्गाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची ही पी. एचडी सुरू असते. येथे पी. एचडी. विद्यापीठ देत नाही तर स्वतः सद्‌गुरूच देतात. गुरूंच्या आर्शिवादा शिवाय ही आत्मज्ञानाची पी. एचडी मिळत नाही. पण गुरू फक्त त्याला त्याची वाट दाखवतात. मार्ग सांगतात. उपदेश करतात. बाकीचा सर्व प्रयोग हा साधकालाच करायचा असतो. सद्‌गुरूंनीं याच मार्गाने आत्मज्ञानाची पी. एचडी. मिळवलेली आहे. यापूर्वी हा शोध त्यांनी लावलेला आहे. साधक फक्त पुन्हा हा शोध स्वतःसाठी करत असतो. विज्ञानातील संशोधकही सूर्याच्या मालिकांचा शोध घेत आहेत. सूर्याचा जन्म केव्हा झाला असेल याचे अनुमान ते लावतात. काही गणिती तत्त्वज्ञान ते मांडतात. पण त्यांच्या या संशोधनाला मर्यादा राहिल्या आहेत. ठराविक मर्यादेच्या पलीकडे ते जाऊ शकलेले नाहीत. त्याच्यापलीकडे काय आहे याचा शोध घेण्यात त्यांना अद्यापही यश आलेले नाही. या कारणानेच ते सूर्याच्या या शक्तीचे उपासक होतात. तेथे ते नतमस्तक होतात. शेवटी एक शक्ती आहे. त्यालाच देवस्वरूप देण्यात आले आहे. या सृष्टीचा शोध घेण्यासाठी काही कणांचा शोध घेण्याचा जगातील सर्वांत मोठा संशोधन प्रकल्प राबविण्यात आल्या. एक भला मोठा स्फोट घडविण्यात आला. यामध्ये शोधण्यात आलेल्या कणाला शेवटी गॉडपार्टीकल असे संबोधले गेले. हे याचमुळे असावे. सूर्यामध्ये अगणित स्फोट घडत असतात. असाच एक स्फोट या प्रयोगात घडविण्यात आला. सूर्याच्या या शक्तीचा शोध या संशोधकांना घ्यायचा होता. विश्वाचे आर्त जाणण्यासाठी त्यांना सूर्याच्या या शक्तीचा अभ्यास करावा लागला. या शक्तीचा आधार घ्यावा लागला तसे आत्मज्ञानाचा शोध घेतानाही आत्मज्ञानी सूर्याचे, आत्मज्ञानी सद्‌गुरूंचे मार्गदर्शन घेणेच योग्य ठरते.



समाधी



संत समाधी अवस्थेतही भक्तांना अनुभव देत राहतात. भक्तांना मार्गदर्शन करत राहतात. म्हणूनच त्यांची समाधी ही संजीवन समाधी आहे असे संबोधले जाते. आपल्या भक्तांनाही अशी अवस्था प्राप्त व्हावी यासाठीच त्यांचे निरंतर प्रयत्न सुरू असतात. 

- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406

जेथ पुढील पैस पारुखे । मागील स्मरावें तें ठाके ।
ऐसिये सरिसीये भूमिके । समाधि राहे ।। 60।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ती बंद पडून मागील कशाचेंही स्मरण होत नाही, अशा या ऐक्‍याच्या भूमिकेवर समाधी राहातें.

समाधी ही एक अवस्था आहे. या अवस्थेत साधक अनाहताचा नाद सहज ऐकू येतो. यात तो गर्क झालेला असतो. या अवस्थेत पाठीमागच्या तसेच पुढच्या सर्व गोष्टींचे विस्मरण त्याला झालेले असते. अशी अवस्था ध्यानाला बसल्यानंतर त्याला लगेच प्राप्त होते. यासाठी अभ्यास करावा लागतो. साधनेने हे सहज शक्‍य होते. मग सद्‌गुरूच्या कृपेने अशा अवस्थेत साधकाला आत्मज्ञान प्राप्ती होते. योगाभ्यासाची अंतिम अवस्था भाव. म्हणजे निर्बीज वा "निर्विकल्प समाधि' होय. तिचे प्राप्तव्य गुरूकृपेने शिष्याला सहज झालेले असते. गुरूंच्या कृपेनेच या सहज समाधी अवस्थेत संत असतात. ते चालत असले, बोलत असले, निवांत असले तरी ते या अवस्थेत निरंतर असतात. यामुळे त्यांच्या निर्वाणानंतरही ते या अवस्थेत असतात. यामुळेच ते भक्तांना अनुभव देत राहतात. यासाठीच निर्वाणानंतर संतांचे अंतिमसंस्कार जेथे केले, तेथे त्यांची स्मृती स्मारके उभी केली जातात. अशा या स्मारकांना समाधी म्हटले जाते. कारण संद्‌गुरूंचे समाधी अवस्थेतील वास्तव्य सदैव तेथे असते. त्यांच्या समाधी अवस्थेत ते तेथे नेहमी प्रकट असतात. अतिंमसंस्कार हे नदीकाठी केले जात असल्याने त्याठिकाणी अनेक संतांच्या अशा समाध्या पाहायला मिळतात. काही संतांच्या समाध्या ह्या नदी संगमावर आहेत. त्यांच्या या वास्तवाने ही स्थाने पवित्र झाली आहेत. ती क्षेत्रे आता तीर्थस्थाने झाली आहेत. संत समाधी अवस्थेतही भक्तांना अनुभव देत राहतात. भक्तांना मार्गदर्शन करत राहतात. म्हणूनच त्यांची समाधी ही संजीवन समाधी आहे असे संबोधले जाते. आपल्या भक्तांनाही अशी अवस्था प्राप्त व्हावी यासाठीच त्यांचे निरंतर प्रयत्न सुरू असतात. यासाठी ते भक्तांना अनुभव देत राहतात. अडचणीच्या काळात त्यांच्या स्मरणाने ते भक्तांच्या प्रश्‍नांना उत्तरे देतात. दूरदेशी असले तरीही त्यांचे मार्गदर्शन सुरू राहते. फक्त भक्तामध्ये तसा भाव असायला हवा. भक्तीची ओढ त्याला लागावी, त्याला समाधीवस्था प्राप्त व्हावी, यासाठी त्यांचे हे प्रयत्न असतात. देहात असूनही विदेही व विदेही असूनही देही, असा विलक्षण व अवर्णनीय अवस्थेत भक्तांचा जीवनक्रम गुरूकृपेने सुरू असतो. साखरेची गोडी जशी साखर खाल्यानंतर कळते. तसे समाधीची ही अवस्था अनुभवाविना वर्णन करणे अशक्‍यच आहे.

Friday, January 18, 2019

मराठी भाषेचा विकास






अजरामर साहित्यामध्ये विकास केला नाही तर मग मात्र ते साहित्य तसेच पडून राहील. बदलत्याकाळानुसार त्यामध्ये योग्य तो विकास करायला हवा. विविध तंत्रज्ञानाचे प्रकार यामध्ये यायला हवेत. ई बुक, मोबाईल बुक असा प्रकार मराठीमध्येही उपयोगात यायला हवा. उलट मराठी भाषा आता इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहोचली आहे. तिचा विकास होत आहे. यासाठी सुंदर साहित्य निर्मितीने तिचे अमरत्व शाश्‍वत होत आहे.                        

  - राजेंद्र घोरपडे  मोबाईल 901108746

माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजासीं जिंके ।
ऐसीं अक्षरें रसिकें । मिळवीन ।। 14 ।। अध्याय 6 वा

ओवीचा अर्थ - माझे हे प्रतिपादन मराठी भाषेत आहे हें खरें परंतु लीलेनें अमृतालाहि प्रतिज्ञापूर्वक जिंकील अशा तऱ्हेची रसयुक्त शब्दरचना मी करीन.

मराठी भाषा फार काळ टिकणार नाही. आता तिला उतरती कळा लागली आहे. तंत्रज्ञानाच्या विकासात इंग्रजी आणि इतर पाश्‍चात भाषांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या वाढत्या आक्रमणामुळे मराठी माणूसच मराठीपासून दूर गेला आहे. अशाने या भाषेचे भवितव्य कसे टिकेल. अशी भीती सध्या व्यक्त होत आहे. पण भाषेचा विस्तार हा त्यामध्ये निर्माण झालेल्या साहित्यकृतीवर अवलंबून असतो. त्या भाषेत चांगले, लोकोपयोगी, ज्ञानभांडार संपन्न साहित्य वारंवार येत राहिल्यास त्या भाषेचा विस्तार हा निश्‍चितच होत राहतो. इंग्रजीचा विस्तार हा तंत्रज्ञानाच्या विकासाने झाला आहे. तसे साहित्य त्या भाषेत आल्याने ज्ञान विस्तारासाठी ती भाषा विकसित झाली. मराठीमध्ये तसे झाले नाही. मुळात आपल्याकडे असणारे ज्ञान मुळी इतरांना वाटलेच नाही. मग आपल्या भाषेचा विस्तार होणार तरी कसा? यासाठी तसे साहित्य या भाषेत यायला हवे. भाषेचे सौंदर्य हे त्यामध्ये निर्माण झालेल्या सुंदर साहित्यावर अवलंबून आहे. अजराअमर असे साहित्य मराठी भाषेत निर्माण झाले आहे. त्यामुळे मराठी भाषा ही अमर आहे. या साहित्यासाठी मराठीचा विस्तार हा होतच राहणार. पण अजरामर साहित्यामध्ये विकास केला नाही तर मग मात्र ते साहित्य तसेच पडून राहील. बदलत्याकाळानुसार त्यामध्ये योग्य तो विकास करायला हवा. विविध तंत्रज्ञानाचे प्रकार यामध्ये यायला हवेत. ई बुक, मोबाईल बुक असा प्रकार मराठीमध्येही उपयोगात यायला हवा. उलट मराठी भाषा आता इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहोचली आहे. तिचा विकास होत आहे. यासाठी सुंदर साहित्य निर्मितीने तिचे अमरत्व शाश्‍वत होत आहे. हा विश्‍वास जागृत ठेवायला हवा व तसा सकारात्मक विचार विकसित करायला हवा. नकारात्मक विचारांनी विकास होत नाही. तर उलट अधोगतीच होते. नकारात्मक विचारांनी आपल्यातील कमकुवतपणा जगासमोर येतो. तसा कमकुवतपणाचा विस्तार होतो. त्यामुळे विचाराचेही खच्चीकरण होते. यासाठी सकारात्मक विचाराची कास धरायला हवी. नकारात्मक विचार हे विकासास बाधक ठरतात. यासाठी मराठीमध्ये नवे काय आले? नवे काय येऊ शकते? नव्या पण उत्तम कल्पनांना कसा वाव देता येईल? भाषेची समृद्धी टिकविण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. साहित्य खपविण्यासाठी काही वादग्रस्त विधाने आज केली जात आहेत. अशाने साहित्याचा खप वाढतो जरूर पण वादग्रस्तमुळे ते साहित्य फार काळ टिकत नाही. याचाही विचार करायला हवा. संत ज्ञानेश्‍वरांनी बाराव्या शतकात ज्ञानेश्‍वरी लिहीली. पण आजही ती टिकूण आहे. कारण त्यामध्ये अमृताहाली प्रतिज्ञापूर्वक जिंकणारी अशी शब्द रचना आहे. अमृताने अमर होता येते असे म्हणतात. तशी ही ज्ञानेश्‍वरी अमरत्वाला पोहोचली आहे. त्यामुळे मराठी भाषाही अमर झाली आहे. ज्ञान भाषा कधीही नष्ट होत नाही. ज्ञानाच्या विस्ताराबरोबर तिचाही विस्तार होत राहातो. तसा मराठीचा विस्तार आणि विकास निश्‍चितच होत राहील.




कृषी विकासाचा सिद्धगिरी पॅटर्न



कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठाने धार्मिक कार्याबरोबरच आता सेंद्रिय शेती, कृषी पर्यटन, देशी गाईंचे संवर्धन असे उपक्रम राबविले आहेत. मठाचे प्रमुख श्री काडसिद्धेश्‍वर अदृश्‍य स्वामींच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्य सुरू आहे. भारतात आढळणाऱ्या 33 देशी गाईंपैकी 20 प्रकारच्या गाईंचे संवर्धन येथे केले आहे. यातून आरोग्यास उपयुक्त असणारी विविध प्रकारची उत्पादनेही घेतली जातात. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा लखपती शेतीचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला आहे. विज्ञानाची कास धरून आध्यात्मिक प्रसाराचे, संस्कृतीचे संवर्धन करणारा हा मठ निश्‍चितच सर्वांसाठी एक आदर्श असा आहे. 
- राजेंद्र घोरपडे 

देशी गाय ही दूध कमी देते. तिचा संगोपन खर्च हा परवडणारा नाही. अशा विविध कारणांनी देशी गाईंचे संगोपन शेतकरी करण्याचे टाळतात. संकरित गाईंचे वाढते संगोपन यामुळे देशी गाईंची संख्या झपाट्याने कमी झाली. अशाने देशी गाय दुर्मिळ होत आहे. हे लक्षात घेऊन मठाने त्यांच्या संवर्धनासाठी गोशाळा उभारली. देशभरातून या गाई मठाने गोळा केल्या. कोणताही व्यापारी हेतू न ठेवता दुर्मिळ होत चाललेल्या 20 जातींच्या देशी गाईंचे संवर्धन मठाने केले आहे. आज सुमारे 700 गाई, बैल, वासरे येथील गोशाळेत आहेत.

संगोपन केलेल्या गाईच्या जाती 
साहिवाल (राजस्थान-गंगानगर), गीर (गुजरात), कॉंक्रिज (गुजरात- कच्छ, मेहसा), देवणी (लातूर, परभणी, नांदेड), लाल कंधारी (नांदेड), डांगी (नाशिक, नगर), थारपारकर (बारमेर, राजस्थान), ओंगली, राठी (नेलोरी, गुंटूर आंध्र प्रदेश), अमृतमहाल (हसन, चिकमंगळूर), हळ्ळीकर( म्हैसूर), कोकण गीड, खिल्लारी कोशी (सांगली, सातारा), खिल्लारी कजरी (सांगली, कोल्हापूर), वेच्चुर (कोट्टायम), पोंगनुर (चित्तूर), उमलचेरी (तंजावर), बारगुर (इरोडे, पेरियार), कंगायम (तमिळनाडू), गावठी गाय (वंश माहिती नसलेली गाय)

सेंद्रिय तुपास मोठी मागणी 
गोशाळेत दररोज एक हजार लिटरवर दूध उत्पादन होते. यापासून तूप, ताक याची निर्मिती केली जाते. सेंद्रिय उत्पादन असल्याने तुपाला मोठी मागणी आहे, तर येणाऱ्या पर्यटकांना ताक विकले जाते. याशिवाय पंचगव्यापासून विविध उपपदार्थ तयार केले जातात. गोमूत्रापासून विविध औषधेही तयार केली जातात. याशिवाय सेंद्रिय साबण, धूप याचीही निर्मिती केली जाते. या उपपदार्थांनाही मोठी मागणी आहे. विविध असाध्य व्याधींवर उपचारासाठी देशी गाईंचे हे उपपदार्थ उपयुक्त आहेत.

गोबर गॅस प्रकल्पातून इंधननिर्मिती 
गोठ्याच्या ठिकाणीच गोबर गॅसचा प्रकल्प आहे. दररोज तीस अश्‍वशक्ती ऊर्जा तयार होते. दिवसाला पाच ते सहा तास त्याचा वापर केला जातो. गोठ्याशेजारीच असणारे सिद्धगिरी इस्पितळ, गुऱ्हाळघर यांना इंधन म्हणून त्याचा उपयोग केला जातो; तसेच गोबरगॅस प्रकल्पातील टाकावू शेणखतापासून गांडूळ खताचीही निर्मिती केली जाते. या गांडूळ खतासही मोठी मागणी आहे.

सेंद्रिय गुळाचे उत्पादन 
मठाच्या शंभर एकरावरील शेतीमध्ये ऊस, चारा पिके, आंबा, भात, भुईमूग आदी पिके घेतली जातात. उसापासून सेंद्रिय गुळ, काकवी आदी उत्पादने घेतली जातात.

सेंद्रिय शेती प्रसाराचे कार्य 
मठातर्फे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले जाते. यामध्ये गांडूळ खतनिर्मिती, सेंद्रिय पद्धतीने कीडनाशक, बुरशीनाशके तयार करण्याचे तंत्र शिकविले जाते. अगदी सोप्या पद्धतीने व कमी खर्चात उत्पादित करता येणारी ही उत्पादने शेतीच्या उत्पादनास लाभदायक तर आहेतच; पण त्याबरोबरच विषमुक्त अन्नाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणारीही आहेत. जमिनीचा बिघडत चाललेला पोत सुधारण्याचेही कार्य यातून केले जाते. दोन महिन्यांतून एकदा मोफत या कार्यशाळेचे मठावर आयोजन केले जाते. यामध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचे सेंद्रिय शेतीतज्ज्ञ नारायण रेड्डी तसेच राज्यातील सेंद्रिय उत्पादक शेतकरी मार्गदर्शन करतात. त्यांचे विविध अनुभव सांगतात.

लखपती शेतीचा प्रयोग 
एका एकरात वर्षभरात विविध प्रकारची 188 पिके सेंद्रिय पद्धतीने घेऊन पाच व्यक्तीच्या कुटुंबाचा चरितार्थ यशस्वीपणे करता येऊ शकतो, हे दाखविणारा "लखपती शेती'चा प्रयोग येथ करण्यात आला आहे. पिकांचे नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यास खर्च वजा जाता सव्वा लाखांचे उत्पादन एका एकारात घेणे शक्‍य आहे. विशेष म्हणजे हे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतले जाऊ शकते. पौष्टिक, ताजा आहार देणारी ही उत्पादने असल्याने आर्थिक प्रगती बरोबरच आरोग्यही सुदृढ ठेवले जाते.

लखपती शेतीतील पीक नियोजन 
वारा पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. याचा विचार करून पश्‍चिमेला उंज वाढणारी म्हणजे उसासारखे पीक 15 गुंठ्यात घेतले जाते. त्यानंतर क्रमशः कमी कमी उंचीची पिके घेतली जातात. यामुळे वादळी वाऱ्यांने पिकांचे संरक्षण होते. नुकसान कमी होते. पिकांना सूर्य प्रकाश अधिक मिळाल्याने उत्पादनातही याचा परिणाम दिसून येतो. पिकांमध्ये व्यापारी पिके, धनधान्याची पिके, मसाला पिके, फळझाडे, कडधान्ये, सर्व प्रकारच्या डाळीचे नियोजन केले जाते. जेणेकरून कुटुंबाची वार्षिक गरज यातून भागू शकेल असे नियोजन असते. वैरणीसाठीही हत्तीगवत, मेथीघास, कडवळही पाच गुंठ्यात घेतले जाते. चाळीस गुंठ्यात इंच इंच जागेचा प्रभावी वापर केला जातो. शेताच्या सीमेवर तुरीचे पिके घेतले असून दोन तुरीमध्ये गवतीचहा, अननस, कडीपत्ता अशी अनेक प्रकारची पीकरचना केलेली आहे. भाजीपाला पिके आठ गुंठ्यात तर भात, भुईमूग, ज्वारी खरीपात व गहू, हरभरा, वाटाणा रब्बी हंगामात नऊ गुंठे जागेवर घेतला जातो. एका एकाराच्या याच जागेत तीन गुंठ्‌यात घर, तीन देशी गाईंसाठी गोठा, संडास बाथरूम, गोबरगॅस, परसबाग, गोबरगॅस आदी बांधण्यात आले आहे.

विजेच्या खांबाभोवतीही पिके 
शेतात विजेचा खांब असेल तर त्या परिसरातील जागा ही वाया जाते. त्या ठिकाणी नांगरट योग्य प्रकारे होत नाही; तसेच तेथे पीकही योग्य प्रकारे वाढत नाही; पण या लखपती शेतात त्या जागेचाही सुयोग्य वापर करण्यात आला आहे. खांबाच्या भोवती गोलाकार पद्धतीने मातीचा ढीग करून त्यावर रताळीची लागवड येथे केली आहे. कंदवर्गीय पिके घेऊन या जागेचा योग्य वापरही या लखपती शेतीच्या प्रयोगात केला आहे.


माझ्या बालपणी घरात लागणारे धान्य घरातच पिकविले जायचे. सर्व भाजीपाला घरातील शेतातच पिकवला जायचा. बाजारात जाऊन धान्य, भाजीपाला विकत आणण्याची कधी गरजच भासली नाही. छोट्या शेतातही कुटुंब सुखात जगायचे. आजकाल शेती परवडत नाही ही ओरड ऐकताना तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांचा विचार करता खरच शेती तोट्याची झाली आहे का? यासाठी प्रयोग म्हणून हा लखपती शेतीचा प्रयोग आम्ही येथे केला आहे. एका एकरात पाच माणसांच्या एका कुटुंबाला लागणारे सर्व धान्य, भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने घेता येणे शक्‍य आहे. हे या प्रयोगातून आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. ही संकल्पना पाहून शेतकऱ्यांनीही प्रोत्साहित होऊन शेतीकडे पाहावे. आपले शेत, कुटुंब सधन, स्वयंपूर्ण, आरोग्यसंपन्न करावे हाच या प्रयोगा मागचा आमचा उद्देश आहे. देशी गाईंचे संवर्धन, सेंद्रिय शेतीला चालना व ग्राहकांना विषमुक्त अन्न या घटकांसाठी आम्ही गोशाळेचा उपक्रम सुरू केला आहे. 

- श्री काडसिद्धेश्‍वर अदृश्‍य महाराज, कणेरी

Thursday, January 17, 2019

शेततळे



डोंगराच्या पायथ्याशीच रामूचे शेत होते. नदीपासून शेत दूर असल्याने फक्त कोरडवाहूच पिके होत. पावसाच्या पाण्यावर येणारे भात आणि हरभरा यावरच रामूचा चरितार्थ चालायचा. वाढत्या महागाईत इतक्‍या कमी उत्पन्नात घर कसे चालवायचे, हाच मोठा प्रश्‍न रामूला होता. पाच एकर डोंगर उतारात शेत असूनही मोठी अडचण होती. पाण्याची सोय झाली असती तर बागायती पिके घेऊन उत्पन्न वाढवता येणे शक्‍य होते. विहीर खोदून किंवा कूपनलिका मारून पाणी लागेलच याची शाश्‍वती नाही. कर्ज काढून विहीर खोदायची आणि पाणी लागलेच नाही तर काय? कर्जात बुडायचे. यामुळे रामू अस्वस्थ होता. 
रामूने पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा ध्यास घेतला. वारंवार तो पंचायतीमध्ये चकरा मारू लागला. पण फारसे यश त्याला येत नव्हते. काही पर्यायही सुचत नव्हते. विचारात डुंबलेला रामू चावडीवर हताश होऊन बसला होता. तेवढ्यात त्याचे समोर लावलेल्या जाहिरातीकडे लक्ष गेले. शेततळ्याच्या योजनेची जाहिरात होती. कृषी विभागाच्यावतीने ही योजना होती. विहिरी ऐवजी अनुदानावर शेततळे खोदले तर...रामूच्या डोक्‍यात प्रकाश पडला. शेततळे खोदण्याचे त्याने मनावर घेतले. शेततळ्याला फारशी जागाही लागत नाही. अर्ध्या एकरात शेततळे होऊ शकते. खर्चही फारसा नाही. ठराविक आकाराचा खड्डा खोदायचा. त्यावर प्लास्टिक शीट अंथरायचं. त्यात पाणी साठवायचे. पावसाळ्यात पाणी साठवायचे असल्याने पाणी लागले नाही. त्यामुळे श्रम वाया गेले ही भीतीही नाही. हिवाळ्यातले एक पीक जरी पाण्यावर आले तरी उत्पन्नात भर पडेल या उद्देशाने रामूने शेततळ्याचा निर्णय घेतला. डोंगराच्या पायथ्याशी शेत असल्याने रामूने वरच्या भागात तळे खोदायचा निर्णय घेतला. आश्‍चर्य म्हणजे तळाच्या दहा फुटावरच पाण्याचे झरे त्याला लागले. उन्हाळ्यात पाण्याचे उमाळे पाहून रामूलाही हायसे वाटले. पावसाळ्यात पाणी साठवायचीही गरज नाही. उन्हाळ्यात झरे फुटले होते. शेततळ्याच्या पाहणीसाठी येणारे अधिकारीही उमाळे लागलेले पाहून खूष झाले. त्यांनी प्लास्टिक शीटही न अंथरण्याचा सल्ला दिला. रामूचा तोही खर्च वाचला. अनुदानावरच त्याचे शेततळे झाले. पाण्याची सोयही झाली. पावसाळ्यात शेततळे भरले. भाता बरोबरच तो आता जनावरांच्या चाऱ्याची पिके घेऊ लागला. उसाचीही लागवड त्याने केली. बारमाही पिके शेतात डोलू लागल्याने उन्हाळ्यात ओसाड असणारा परिसर हिरवाईने फुलला होता. अनेक प्रकारची फळझाडेही आता बांधावर डोलू लागली होती. बारमाही उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला. एका शेततळ्याने रामूला आर्थिक संपन्नता दिली होती. 
पाण्याची सोय झाल्याने विविध प्रकारची पिके घेऊन उत्पन्न वाढविण्याचा खटाटोप रामूने सुरू केला. कृषी महाविद्यालयातील शेतकरी शास्त्रज्ञ मंच्यामध्येही तो सहभागी झाला. तेथे त्याला शेतीतील नवनवे तंत्रज्ञान समजू लागले. 
एका एकरात 100 पिके ती सुद्धा सेंद्रिय पद्धतीने घेता येऊ शकतात. असे तंत्रज्ञान करणारे शेतकरीही त्याला शास्त्रज्ञ मंच्यात भेटले. घरात लागणारे सर्व धान्य शेतातच पिकवायचे. विकत काहीही आणायचे नाही. विषमुक्त अन्न निर्मिताचा हा विचार रामूलाही पटला. त्यानेही एका एकरात सेंद्रिय पद्धतीने 100 वर पिके घेण्याचा निर्णय घेतला. ही पिके कशी पिकवली जातात याचे तंत्र त्याने आत्मसात केले. यासाठी त्याने चार देशी गायीही पाळल्या. शेततळ्याच्या शेजारीच त्याने गोठा बांधला. शास्त्रोक्त पद्धतीने पिकांचे नियोजन केले. वाऱ्याची दिशा पाहून पिकांचे नियोजन केले. उंच पिके पश्‍चिमेकडे लहान उंचीची पिके पूर्वेकडे असे नियोजन त्याने केले. शेतात उत्तम सूर्यप्रकाश राहील अशा पद्धतीने त्याने आखणी केली. शेतातील विजेच्या खांबाशेजारीही वाया जाणाऱ्या जागेत त्याने पिके घेण्याचे नियोजन केले. विजेच्या खांबाभोवती उंच मातीचा ढिगारा रचून त्यावर कंदवर्गीय रताळी आदी पिके त्याने घेतली. भाजीपाल्याचेही नियोजन त्याने केले. एका एकरात भात, गहू, तूर, भाजीपाला, अशी जवळपास 100 वर पिके त्याने घेतली. घरात दररोज ताजा भाजीपालाही मिळू लागला. सेंद्रिय पद्धतीने पिकवल्याने रासायनिक खतांचा खर्च वाचला. कीडनाशकासाठी फवारण्याही सेंद्रिय पद्धतीनेच होऊ लागल्याने विषमुक्त अन्न निर्मितीही होऊ लागली. घराच्या आरोग्या बरोबरच हे अन्नपदार्थ खाणाऱ्यांचेही आरोग्य जोपासले जात असल्याने त्याचेही पुण्य त्याचा पदरी पडले. विविध पिकांचा त्याचा अभ्यास झाला. बियाणे संवर्धनाचाही उपक्रम त्याने राबविला. देशी उत्तम प्रकारचे बियाणे त्याने साठविले. शेतात लागणारे सर्व बियाणे तो स्वतः उत्पादित करू लागला. यामुळे देशी बियाण्यांचे संवर्धनही त्याच्याकडून होऊ लागले. एका एकरात पाच माणसांचे कुटुंब चालवता येऊ शकते हा विचार त्याने प्रत्यक्षात करून दाखवला होता. 
उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचा खटाटोप मात्र त्याचा सुरूच होता. शेतात असणाऱ्या शेततळ्यात त्याने मत्स्यसंवर्धन केले. पावसाळ्यात ऑगस्टमध्ये शेततळ्यात मासे सोडून एप्रिल मे मध्ये त्यांचे उत्पन्नही त्याला मिळू लागले. अवघ्या नऊ महिन्यात त्याला मत्स्यसंवर्धनातून काहीही न करता लाखोंची कमाई होऊ लागली. माशांना लागणारे खाद्यही शेतातच पिकत होते. त्याचाही खर्च नव्हता. केवळ उत्पन्नच उत्पन्न मिळू लागले. पाच वर्षात त्याने शेततळ्याच्या जोरावर केलेली भरभराट पाहण्यासाठी आता आसपासचे शेतकरीही येऊ लागले. राज्यभरात त्याच्या या प्रगतीची चर्चा सुरू होती. अवघ्या एका शेततळ्याने त्याला इतके संपन्न केले होते. 

Wednesday, January 16, 2019

अंतर्ज्ञानी



सद्‌गुरू हे अंतर्ज्ञानी असतात. त्यांना भक्त कोणते प्रश्‍न घेऊन आला आहे. त्याच्या समस्या काय आहेत. या सर्वांचे ज्ञान असते. असे सद्‌गुरूच भक्तांना योग्य मार्ग देऊ शकतात
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल ९०११०८७४०६

म्यां जें कांही विवरूनि पुसांवें । तें आधींचि कळिलें देवें ।
तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करुनि ।।

ओवीचा अर्थ - मी जें कांही विचार करून तुम्हांस विचारावें तें देवा आपण आधीच जाणलें तरी आपण जें बोलला तेंच स्पष्ट करून सांगा.

सद्‌गुरूंना अनेक भक्त व्यक्तिगत प्रश्‍न विचारतात. एका भक्ताने सद्‌गुरूंना प्रश्‍न विचारण्यासाठी वेळ मागून घेतली. त्या भक्ताने सद्‌गुरूंना वाकून नमस्कार केला आणि प्रश्‍न विचारण्यासाठी उठला. तेवढ्यात सद्‌गुरू त्याला म्हणाले, 'अरे काय पत्रिका घेऊन आला आहेस? पण मी काय पत्रिका पाहून भविष्य सांगणारा ज्योतिषी नाही. बरं काय लिहिले आहे पत्रिकेत? तुझा जन्म अमुक अमुक..' असे सांगून सद्‌गुरूंनी त्याला त्याची पत्रिका न पाहताच सांगितली. भक्त आश्‍चर्यचकित झाला. अरे ही पत्रिका माझ्या खिशात आहे. त्यातील अक्षर आणि अक्षर या सद्‌गुरूंना माहिती आहे. हे कसे शक्‍य आहे. मुळात मी पत्रिका घेऊन आलो आहे, हे सद्‌गुरूंना कसे माहीत? असे अनेक प्रश्‍न त्या भक्ताच्या मनात घोंघाळू लागले. सद्‌गुरू हे अंतर्ज्ञानी असतात. त्यांना भक्त कोणते प्रश्‍न घेऊन आला आहे. त्याच्या समस्या काय आहेत. या सर्वांचे ज्ञान असते. असे सद्‌गुरूच भक्तांना योग्य मार्ग देऊ शकतात. एकदा एका भक्ताचे घड्याळ चोरीला गेले होते. तो भक्त सद्‌गुरूंच्या जवळ आला आणि त्याने चोराचा पत्ता विचारला. आश्‍चर्य म्हणजे सद्‌गुरूंनी त्या चोराच्या ओळखीच्या खुणा सांगितल्या. त्याने चोरी कशी केली तेही सांगितले. तसेच त्याने चोरी करून ते घड्याळ कोठे लपवून ठेवले आहे. याचीही माहिती सद्‌गुरूंनी दिली. सद्‌गुरू हे सर्व सांगू शकतात. अंतर्ज्ञानाचा उपयोग ते समाजासाठी करू इच्छितात. समाजातील दुष्ट दूर व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. यासाठी येणाऱ्या भक्तांना ते सन्मार्गाला लावतात. त्यांच्यामध्ये अध्यात्माची आवड ते निर्माण करतात. भक्ताला सुद्धा त्यांच्याप्रमाणे आत्मज्ञानी, आंतरज्ञानी करण्याकडे त्यांचा ओढा असतो. यासाठी भक्ताच्या समस्या जाणून त्याची प्रगती करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. यासाठी वेगवेगळे अनुभव ते भक्तांना देतात. विविध प्रकारे ते भक्तांना मदत करतात. त्याच्या कार्यात त्यांचा मोठा हातभार असतो. भक्ताच्या विजयी रथाचे सारथी ते स्वतः असतात. दुष्ट विचाराने आलेल्या भक्ताला ते सन्मार्ग शिकवतात. त्याच्यातील खल, दुष्टपणा ते काढून टाकण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. गुंडवृत्तीचे लोक अनेकदा सद्‌गुरूंच्या दर्शनास येतात. सद्‌गुरू मात्र त्यांच्यातील ही दुष्टप्रवृत्ती घालविण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच वाल्याचा वाल्मिकी झाला. अंतर्ज्ञानी सद्‌गुरू समाज हितासाठी त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग करतात. म्हणूनच ते समाजात संत, महात्मे म्हणून ओळखले जातात.


Tuesday, January 15, 2019

सागर



सागरात प्रवेश केल्यानंतर वादळ, वारे ही येत असतात. तसे या सागरातही अडीअडचणी येत राहणार. त्यांचा सामना करत, मार्गक्रमण करावे लागणार. वाट दाखवणारे सद्‌गुरू असल्यानंतर या वादळ, वाऱ्यात बुडण्याची भीती कसली
- राजेंद्र घोरपडे मोबाईल ९०११०८७४०६

आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर । 
क्रमोनि हे पार । पातले ते ।। 159 ।। अध्याय 5 वा 

ओवीचा अर्थ - आणि यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते ह्या पलीकडच्या तीराला (ब्रह्मत्वाला) पोचले. 

विशाल, अथांग अशी उपमा सागरास दिली जाते. सागराची खोली, लांबी, रुंदी मोजता येते, पण त्याचे स्वरूप हे विशाल आहे. अशा या महाकाय सागरात प्रवेश करताना त्याचा पूर्ण अभ्यास असणे आवश्‍यक आहे. किनाऱ्यावरही पोहताना सागराच्या खोलीचा अंदाज येत नाही. सतत लाटांची होणारी आदळ आपट यामुळे कोठे खड्डे पडले आहेत याची कल्पनाही करता येत नाही. यामुळे पोहायला गेलेले अनेकजण बुडाल्याच्या घटना या वारंवार घडत असतात. पट्टीचा पोहणाराही येथे गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा भयाण सागरात प्रवेश करताना, हा सागर पार करताना योग्य नियोजन हवे. तरच हा सागर आपण पार करू शकणार आहे. त्याचे मार्ग अभ्यासणे गरजेचे आहे. कोलंबस सागरीमार्गाने भारताचा शोध घेण्यासाठी निघाला, पण तो पोहोचला अमेरिकेत. जायचे होते एका तीरावर, पोहोचला दुसऱ्याच तीरावर. यासाठी सागराच्या या विशालतेचा योग्यप्रकारे अभ्यास हवा. जहाज समुद्रात गेल्यानंतर जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसते. पण या पाण्यातून मार्ग शोधून निश्‍चित लक्ष गाठायचे असते. निसर्गात रस्ता चुकविणारे भूलभुलैया आहेत. पण त्यातून मार्ग सांगणारे उपायही अस्तित्वात आहेत. फक्त त्यांचा शोध घ्यायला हवा. दिशा दाखविणाऱ्या होकायंत्राचा शोध यातूनच लागला. येथे ते निश्‍चितच उपयोगी ठरते. आपण कोणत्या दिशेला जात आहोत यातून समजते. मार्ग चुकू नये यासाठी आवश्‍यक ते टप्पे माहीत करून घ्यावे लागतात. अध्यात्माच्या या महासागरात प्रवेश केल्यानंतरही असेच नियम आहेत. योग्य मार्ग शोधायचे असतात. आत्मज्ञानाचा तीर गाठण्यासाठी त्यातील टप्पे अभ्यासायला हवेत. मार्ग दाखविणारे होकायंत्र शोधायला हवे. गुरू हे होकायंत्र आहेत. सर्व प्रथम त्यांचा शोध घ्यायला हवा. होकायंत्रात चुंबक हवा. नुसती क्षणिक चुंबकीय शक्ती असणारी फसवी होकायंत्र नको. आत्मज्ञानाचा शोध घेतानाही गुरू हा आत्मज्ञानी असायला हवा. तरच तो आपणास योग्य मार्ग दाखवेल. गुरू आत्मज्ञानी नसेल, तर आत्मज्ञानाचा तीर जवळ असूनही गाठता येणार नाही. क्षणिक मनकवडेही आज पाहायला मिळतात. यांच्यापासून दूर राहायला हवे. क्षणिक मार्ग दाखविणाऱ्या विद्यांनी मार्ग सापडत नाहीत. व्यर्थ भटकंती मात्र होईल. आत्मज्ञानी गुरूंनी दिलेल्या मार्गाने आत्मज्ञानाचा तीर सहज गाठता येतो. त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप नियमित करायला हवा. त्यामध्ये मन रमवायला हवे. सागरात प्रवेश केल्यानंतर वादळ, वारे ही येत असतात. तसे या सागरातही अडीअडचणी येत राहणार. त्यांचा सामना करत, मार्गक्रमण करावे लागणार. वाट दाखवणारे सद्‌गुरू असल्यानंतर या वादळ, वाऱ्यात बुडण्याची भीती कसली. तारणारे तर तेच आहेत. फक्त आपण त्यांनी दिलेल्या मार्गाने जायला हवे.

Sunday, January 13, 2019

विवेकाचे गाव




आत्मज्ञान प्राप्तीसाठी शरीराच्या गावात विवेक जागा करा. ऐक्‍य आपोआपच साधले जाईल. एकीने अनेक प्रश्‍न सुटतात. मनाचा ढळलेला तोल सावरता येतो. खचलेल्या मनाला उभारी मिळते. मनाला आधार वाटतो. साधनेत मनाचे ऐक्‍य साधले तर विकास निश्‍चित आहे.

- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406

ते विवेकाचे गाव । की परब्रह्मीचे स्वभाव ।
नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ।। 139 ।। अध्याय 5 वा

ओवीचा अर्थ - ते विवेकाचे मुळ वसतीस्थान आहेत. किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणू काय मूर्तिंमंत ब्रह्मविद्येचे सजविलेले अवयवच आहेत.

राज्यात निर्मल ग्राम, आदर्श गाव, इको व्हिलेज, पर्यावरण समृद्ध गाव आदी योजना राबविण्यात येतात. सर्व योजनात श्रमदानास महत्त्व दिले आहे. गावाच्या एकीतून विकास साधला जातो. एकीच्या बळाची ताकद त्यातून स्पष्ट होते. पण सर्वच गावांमध्ये हे शक्‍य होत नाही. प्रश्‍न गंभीर होऊ लागले की ऐक्‍य वाढते. भीती पोटी ऐक्‍य येते. अडीअडचणीच्या काळातच देवाचे स्मरण होते. इतरवेळी देव भेटला तरी दर्शन घेण्याची बुद्धी होत नाही. यामुळेच आज अनेक शहरातील जुनी मंदीरे ओस पडलेली पाहायला मिळतात. पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी गाव एकत्र येतो. पण गावात विवेक जागा असेल तरच प्रश्‍न सुटतो. अन्यथा हे प्रश्‍न वर्षानुवर्षे तसेच पडून राहतात. प्रश्‍नाचे स्वरूप गंभीर झाल्यानंतर मात्र माघारी शिवाय पर्याय नसतो. अहंकार बाजूला ठेवून प्रश्‍न सोडविण्यासाठी एकत्र यावेच लागते. विकासासाठी अहंकार, अहंपणा बाजूला ठेवावा लागतो. तंटे, वाद, राग, द्वेष यांचा त्याग करावा लागतो. तरच विकासाची वाट सुकर होते. अनेक गावांनी विकासासाठी हेच मुद्दे अवलंबले आणि श्रमदानातून विकास साधला. दारूबंदी, चराईबंदी, वृक्षतोड बंदी, लोटाबंदी, उघड्यावर शौच्छास बंदी असे अनेक उपक्रम राबवून गावात विवेक जागृत केला. अशा या योजनांमुळे गावाचे आरोग्य, स्वच्छता राखली गेली. जनजागृती करून पाणलोट विकासातून पाणी प्रश्‍न सोडविला. काही डोंगरकपारीतील गावांनी नैसर्गिक जलस्त्रोत्रांचे संवर्धन करून सायफनने थेट पाइपलाइनने पाणी आणून कायमचा प्रश्‍न मिटविला. ना वीज बिलाची झंजट ना पाणी बिलाचा तगादा. बारमाही पाण्याचा स्त्रोत गावाच्या वाड्यावस्त्यात आणून महिलांचे श्रम वाचवले. हे सर्व विवेकाने, ऐक्‍याने शक्‍य झाले. एकीमुळेच देशास स्वातंत्र्य मिळाले. आत्मज्ञाना प्राप्तीचा मार्ग सुद्धा असाच आहे. शरीराच्या गावात विवेक जागृत ठेवायला हवा. राग, द्वेष, मत्सर, अहंकार, अंहपणाचा त्याग करून विवेकाने विकास साधावा लागतो. गावात जशी स्वच्छता साधली जाते तशी मनाची स्वच्छता येथे होते. आरोग्यही सुधारते. विकासासाठी मनाचे ऐक्‍य गरजेचे आहे. साधनेत श्‍वासावर ऐक्‍य साधून विकास होतो. अध्यात्माच्या विकासाची हीच पायरी आहे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी शरीराच्या गावात विवेक जागा करा. ऐक्‍य आपोआपच साधले जाईल. एकीने अनेक प्रश्‍न सुटतात. मनाचा ढळलेला तोल सावरता येतो. खचलेल्या मनाला उभारी मिळते. मनाला आधार वाटतो. साधनेत मनाचे ऐक्‍य साधले तर विकास निश्‍चित आहे. ब्रह्मविद्येचा विकास तेथे निश्‍चित होईल.

Friday, January 11, 2019

त्यागाची भावना म्हणजे संन्यास

   
 
  आत्मज्ञान हे सद्‌गुरूंच्या कृपेने मिळते. यासाठी शरीराला कष्ट देण्याची, पिडा करण्याची गरज नाही. केवळ क्षणभर स्मरणानेही कृपा होऊ शकते. फक्त त्यात भक्तीचा भाव असावा. यासाठी प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा.                           - राजेंद्र घोरपडे     मोबाईल 9011087406
आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण ।
पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ।। 20 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 5 वा

ओवीचा अर्थ - आणि ज्यांच्या अंतःकरणामध्यें मी आणि माझे यांचे स्मरणच राहिलें नाहीं, अर्जुना, तो सदोदित सन्यासीच आहे, असे तूं जाण.

संन्यास म्हणजे घरदार सोडायचे. एकांतात जाऊन भगवंताचे स्मरण करायचे. हिमालयात, जंगलात जायचे असाच समज आहे. बारा वर्षांचे तप केल्यानंतर आत्मज्ञान प्राप्त होते असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात किती संन्यासी आत्मज्ञानी झाले आहेत. अनेकांनी संन्यास घेतला, पण आत्मज्ञानाचा लाभ एखाद्यालाच झाला किंवा तेही घडत नाही. असे का? आज भारतात अनेक थोर संतांचे मठ आहेत. तेथेही आत्मज्ञान प्राप्तीसाठी शिक्षण दिले जाते. अनेकजण घरा-दाराचा त्याग करून तेथे जातात. पण तेथेही एखाद्यालाच आत्मज्ञानाचा लाभ होतो किंवा तेही नाही. असे का घडते? कारण आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्‍यक असणाऱ्या गोष्टीचा त्यांनी संन्यासच केला नाही. आत्मज्ञान प्राप्तीमध्ये घरदार सोडणे म्हणजे संन्यास होत नाही. यासाठीच आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्‍यक गोष्टींचा अभ्यास प्रथम करायला हवा. मी पणाच गेला नाही तर घरदार सोडूनही आत्मज्ञान होत नाही. स्वतःतील मीचा विसर हाच खरा संन्यास आहे. हे मी केले. हे माझ्यामुळे झाले. हा मी पणा, हा अहंकार सोडायला हवा. त्याचा त्याग करायला हवा. हे सोडण्यासाठी घरदार, संसार सोडण्याची गरज नाही. बारा वर्षांच्या संसार त्यागाने जे प्राप्त झाले नाही, ते मी पणा सोडण्याने केवळ एका क्षणात प्राप्त होऊ शकते. बारा वर्षांच्या तपाने ज्ञान प्राप्त होऊ शकते. काही मठामध्ये दहा- बारा वर्षांच्या तपानंतर आचार्य, संत अशी पदवी दिली जाते. पण हे पुस्तकी, पंडिती ज्ञान म्हणजे आत्मज्ञान नव्हे. अशी आचार्य प्राप्त व्यक्ती आत्मज्ञानी असेलच असे नाही. हे ज्ञान सद्‌गुरूंच्या कृपार्शिवादाने प्राप्त होते. यासाठी सद्‌गुरूंनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. ज्ञानेश्‍वरीमध्ये संसार करता करताही परमार्थ साधता येतो. असा मार्ग सांगितला आहे. संसारात राहूनही मोक्ष मिळविण्याचा मार्ग सांगितला आहे. मी पणा ज्याने सोडला तो खरा सन्याशी. यासाठी संसाराचा त्याग करण्याची गरज नाही. आत्मज्ञान हे सद्‌गुरूंच्या कृपेने मिळते. यासाठी शरीराला कष्ट देण्याची, पिडा करण्याची गरज नाही. केवळ क्षणभर स्मरणानेही कृपा होऊ शकते. फक्त त्यात भक्तीचा भाव असावा. यासाठी प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. हे सर्व कार्य भगवंत आपणाकडून करवून घेतात. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. असा विचार प्रकट व्हायला हवा. तशी समर्पणाची, त्यागाची भावना मनात उत्पन्न व्हायला हवी. ही त्यागाची, समर्पणाची भावना म्हणजेच संन्यास. 

Thursday, January 10, 2019

शेतीची धोरणे ठरवताना हवा सखोल विचार

 
 सहवीजनिर्मिती, इथेनाँल, बगॅस, सेंद्रिय खते अशी उत्पादने घेऊन साखर कारखान्यांचे उत्पादन वाढविण्यात आले. अशा या उपाययोजनांमुळे कारखान्यांना ऊसाला दर देणे शक्य झाले. हा विचार या आंदोलनामुळे आला. पण यासाठी आंदोलन करावे लागते या इतके मोठे दुर्दैव्य नाही.
- राजेंद्र घोरपडे
157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007
मोबाईल - 9011087406 
 
 
शेतीवरचा बोजा कमी करण्यासाठी शासनाचे धोरण नेहमीच आहे. औद्योगिकीकरण अनेक नव्या व्यवसायातून रोजगार निर्मिती यावर सर्वच पक्षांच्या सरकारने नेहमीच प्रयत्न केले आहेत. यातून सध्या शेतीवरच बोजा कमी झाला आहे. पण त्यामुळे शेतीचे प्रश्न सुटलेच नाहीत. उलट ते वाढतच गेले. मुख्य म्हणजे रोजगारासाठी मजूर बाहेर गेले. शेतमजूरांची टंचाई भासू लागली. शेतीत काम करणारे हात कमी झाले. 
 
यांत्रिकिकरणाने त्याला हातभार जरूर लागला पण प्रत्यक्षात शेतीवरील खर्चात वाढ झाली. योग्यवेळी योग्य कामे न केल्याने शेतीच्या अडचणी वाढल्या. साहजिकच नव्या तंत्राचा अवलंब करत शेतीमध्ये नैसर्गिकपणा जाऊन कृत्रिमता आली. उत्पादनवाढीसाठी हे सर्व उपाय केले जाऊ लागले. या सर्वात शेतीची अवस्था बिकट होत गेली. याकडे सर्वानीच दुर्लक्ष केले. याचाच फटका आज आपणास बसतो आहे. योग्य नियोजन आणि बदल केले असते तर आज शेतीमध्ये अशी अवस्था आली नसती. 
 
शेतमजूर कमी झाले तर त्याला पर्याय यांत्रिकणाराचा केला पण शासनाची यामध्ये मदत खूपच तटपूंजी राहीली. प्रत्यक्षात ती शेतकऱ्यांपर्यंत किती पोहोचली हा सुद्धा मुद्दा विचार करण्यासारखाच आहे. सर्वांगिण विचार करून धोरणे न ठरवल्यानेच समस्या वाढत आहेत. कोणतेही धोरण ठरवताना समतोल असायला हवा. तो आता साधला जात नाही. अशा या असमतोल धोरणामुळेच आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 
 
यांत्रिकिकरणाने काय झाले
यांत्रिकिकरणाने काय झाले तर जनावरांची संख्या कमी झाली. भाकड जनावरे कोण पाळणार. बैलाचा उपयोग कमी झाला साहजिकच गोठ्यातून बैल गेला. दुभत्या जनावरांची संख्या वाढविण्याचा विचार शेतकऱयांनी जोपासला पण त्यांचा चारा-पाणी याचा प्रश्न उभा राहीला साहजिकच शेतकऱयांच्या गोठ्यातून आता दुभती जनावरेही कमी होऊ लागली आहेत. पूर्वी गावात घरटी चार-चार, पाच-पाच जनावरे असायची. गावात हिंडताना जनावरेच रस्त्यावर दिसायची पण आता गोठ्यात एखादेच दुभते जनावर दिसते. किंवा त्याचाही सांभाळ करणे अशक्य झाल्याने त्याचीही संख्या आता रोडावली आहे. 
 
पशुधनात घट
पूर्वी ज्वारी घेतली जायची त्यामुळे कडबा असायचा. पण आता ऊस असल्याने चाऱ्याचा प्रश्न उभा राहीला आहे. ऊसाच्या वाड्यामुळे जनावरांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. साहजिकच जनावरे पोसण्याची मानसिकता कमी होऊ लागली आहे. जनावरे पाळायची तर त्याची योग्य प्रकारे निगा राखली पाहीजे तसे होत नाही. अशाने गेल्या वीस वर्षात जनावरांच्या संख्येत घट झाली आहे. आकडेवारीत सांगायचे तर 2012च्या जनगणनेनुसार राज्यात सुमारे 325 लाख पशुधन आहे. पण 2007 च्या तुलनेत त्यामध्ये 9.7 टक्क्यांनी घट झाली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ही घट 23.2 टक्के इतकी आहे. घटत्या पशुधनाचा परिणाम शेतीवर मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण शेतीसाठी लागणारे सेंद्रिय खत, जमिनाचा पोत राखण्यासाठी मिसळले जाणारे हे खत सध्या उपलब्धच नाही. अशी स्थिती कित्येक गावात आहे. हे खत विकत घेण्याची वेळ काही शेतकऱ्यांवर आली आहे. काहीजण याचा वापर न करताच शेती करत आहेत. कारण सेंद्रिय खत जनावरांच्या शेणापासून तयार केले जाते. जनावरेच नाहीत तर खत कोठून आणणार.  
 
सरकारने उपाययोजना करण्याची गरज
देशी गायी पाळू नका असा प्रचार केला जातो. पण या देशी गायी शेण व गोमुत्र देतात विशेष म्हणजे हे शेण आणि गोमुत्र किटकनाशकाप्रमाणे काम करते. काहीं शेतकऱ्यांना हा विचार पटला आहे. त्यांनी गोठ्यामध्ये एक तरी देशी गाय पाळण्यास सुरवात केली आहे. मोठ्या संख्येने जनावरे पाळणारे शेतकरीही देशी गायी पाळताना दिसत आहेत. हा बदल दिसतो आहे खरा पण सर्वांनाच हे शक्य होत नसल्याने यावर उपाय योजना सरकारने करायला हवी. 
 
सेंद्रिय खतावर संशोधनाची गरज
सरकारने शहरातील कचऱ्यापासूनही सेंद्रिय खत तयार करण्याचा विचार सुरु केला आहे. पण हे खत शेतीसाठी वापरण्यास योग्य आहे का यावर संशोधन होण्याची गरज आहे. कारण भाजीपाला व फळ भाज्यांना या खताचा वापर मारक ठरण्याची शक्यता आहे. त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित राहू शकतो. असा भाजीपाला खाण्यास योग्य आहे का यावरही संशोधन होण्याची गरज आहे. आरोग्याचे प्रश्न उपस्थित राहू शकतात. हे सेंद्रिय खत फुल झाडे किंवा अन्य शेतीच्या उत्पादनाना योग्य ठरू शकेल. पण यावर सखोल संशोधन होण्याचीही गरज आहे. 
 
सेंद्रिय खत उत्पादनाची आकडेवारीही हवी
सरकारने सेंद्रिय शेती करणाऱ्याची संख्या आकडेवारी मांडणे सुरु केले आहे. पण शेतात सेंद्रिय खत किती टक्के वापरले जाते. राज्यात सेंद्रिय खताची निर्मिती किती टक्के होते याचीही आकडेवारी मांडण्याची गरज आहे. भावी काळात जमिनीचा पोत टिकवायचा असेल तर याची गरज आहे. रासायनिक खते ही पिकासाठी टाँनिक आहेत. टाँनिक खाऊन आपण जगु शकत नाही. यासाठी मुख्य आहार हा गरजेचा आहे. सेंद्रिय खत हा पिकाचा मुख्य आहारच आहे. तो बंद कसा करून चालेल. यासाठी सेंद्रिय खताची आकडेवारी ठेवण्याचा विचार सरकारने करायला हवा. 
 
आंदोलन करण्याची वेळ येतच कशाला ?
आजकाल आंदोलनाशिवाय काही मिळत नाही. असाच प्रघात पडला आहे. उसाच्या दरासाठी आंदोलन करावे लागते. शेतमालाला भाव मिळावा यासाठी नेहमीच शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागते. उसाच्या दराच्या आंदोलनाने शेतकऱ्यांना दर मिळाला. हे जरी खरे असले तरी हा दर देण्यासाठी उपाययोजना कराव्या लागल्या त्याची दखल यापूर्वी घेता आली असती तर अशी वेळ आली नसती. उसाला दर देण्यासाठी त्यापासून उत्पादित होणाऱ्या साखरे व्यतिरिक्त अन्य उत्पादनावर भर दिला गेला. कारखाने स्वयंपूर्ण कसे होतील याकडेही लक्ष देण्यात आले. सहवीजनिर्मिती, इथेनाँल, बगॅस, सेंद्रिय खते अशी उत्पादने घेऊन साखर कारखान्यांचे उत्पादन वाढविण्यात आले. अशा या उपाययोजनांमुळे कारखान्यांना ऊसाला दर देणे शक्य झाले. हा विचार या आंदोलनामुळे आला. पण यासाठी आंदोलन करावे लागते या इतके मोठे दुर्दैव्य नाही. साखर कारखाना हा उद्योग म्हणून विकसित करण्याचा विचार संचालकांनी केलाच नाही. केवळ राजकारणासाठीच याचा वापर होत राहीला अशाने हा तोटा झाला तो शेतकऱ्यांचाच. यामुळे अशी आंदोलने आता हिंसक होऊ लागली आहेत. आंदोलनांचे स्वरूप बदलू लागले आहे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. विकास धोरण ठरवताना याचा विचार जरूर केला जावा. आंदोलन चिरडून टाकण्यासाठी विकासाच्या गाजराची पुंगी वाजवणे सरकारने बंद करायला हवे.  धोरण ठरवतानाचा शेती व शेतकऱ्याचा विकास कसा होईल यावर भर द्यायला हवा. 
 
शेतमालाच्या दराचा प्रश्न नेहमीचाच
सरकारकडे शेती विकासाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. रोजगार निर्मिती अन्य क्षेत्रासह शेतीमध्येही करता येणे शक्य आहे. हा रोजगार शाश्वत करणेही शक्य आहे. शेतीतील उत्पादन वाढले आहे. तुकड्या तुकड्यांची शेती असली तरीही शेतीतील उत्पन्न वाढत आहे. अन्नधान्याचे उत्पादन वाढले आहे. पण त्याला दर नाही. यावर उपाय योजने जात नाहीत मग शेतकरी आंदोलन करणारच. गेल्या कित्येक वर्षापासून ही समस्या आहे. कधी कांदा नाकाला झोंबतो, तर कधी टोमॅटो लाल होतो. तर कधी आंबा तुरट होतो. तुरडाळही शिजेनाशी होते.  भाजीपाला टाकून देण्याची वेळ येते तर कोंथबिरीचा वासच जातो. केळी, पोपईने शेतकरी पार रसातळाला जातो. शेतीत निर्सगाच्या संकटापेक्षाही मोठे संकट हे दराचे आहे. ही समस्या कित्येक वर्षापासूनची आहे. यावर आंदोलनेही उपाय योजले जात नाहीत. कधी या उत्पादनाना दर मिळवून देता येईल अशी उपाययोजनाही केलेली दिसत नाही. 
 
प्रकिया उद्योगांची गरज
आपल्याकडे गोदामांची संख्या कमी आहे. त्याप्रमाणात ती उपलब्ध नसल्यानेही दराचा प्रश्न सोडवणे कठीण जाते. साखर कारखान्यांनी जसे अन्य उत्पादनाचे मार्ग वापरले तसे यामध्ये करता येणे शक्य आहे पण ते केले जात नाही. माल नाशवंत आहे. तर मग तो प्रक्रिया करून साठवला जावा अशी योजना सरकार करताना दिसत नाही. टोमॅटोवर प्रक्रिया करणारे उद्योग वाढवणे गरजेचे आहे. पण कधीकधी याच उद्योगामुळे दर पडल्याचेही प्रकार घडण्याची शक्यताही असते. पण याकडे कोणीही लक्ष देत नाही. अशा कारखान्यांनी अचानक माल उचलला नाही तर तो माल बाजारपेठेत आणल्याने दर पडू शकतात. यासाठी प्रक्रिया उद्योगांची संख्या व उत्पादित मालाचे नियोजन योग्य आहे की नाही हे तपासणे यावर लक्ष ठेवणे सरकारचे काय आहे. तुरडाळीचा लाभ व्यापाऱयांना होतो शेतकऱयांना होत नाही. साठवणूक केली जाते. योग्यवेळी दर मिळाल्यावर ती बाहेर काढली जाते. सर्वसामान्य शेतकरी साठवणूक करू शकत नाही अशा या गोष्टीचा फायदा उठवून शेतकऱ्यांना लुटले जाते.  हे प्रश्न काही आत्ताचे नाहीत. हे पूर्वीही घडत होते. यातूनच सहकाराचा जन्म झाला अशा या सहकाराने शेतकरी सुधारला आता राजकारणाने सहकार पोखरला आहे. यासाठी आता नव्या युक्त्या योजन्याची गरज आहे. प्रक्रिया करणारे मोठे उद्योग उभारले जावेत यासाठी सरकारने ठोस पाऊले उजलायला हवीत. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाते. मग कर्जच काढण्याची वेळ शेतकऱ्यावर येऊ नये यासाठी असाच पैसा सरकारने मोठ्या उद्योग उभारण्यासाठी दिल्यास शेतकरी स्वयंपूर्ण का होणार नाही. कर्जमाफी हा तात्पुरता उपाय आहे. पण प्रक्रिया उद्योग उभारणी हा कायम स्वरुपी उपाय आहे, असे सरकारला का वाटत नाही. तसे प्रयत्न होताना दिसत नाही. असे प्रयत्न झाले तर रोजगार निर्मितीही वाढेल. 
 
 पिकते पण विकत नाही
महाराष्ट्रात पश्चिम घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात फणसाची झाडे आहे. उन्हाळ्यात फणस लागतात. काही प्रमाणात त्याची तोड होते. पण अनेक ठिकाणी हे फणस तसेच पडून राहतात. शेवटी हे फणस कुजून जाताता. मोठ्या प्रमाणात अशी अन्नधान्य, फळांची नासाडी होत आहे. या फणसाचे गरे शहरातील मोठमोठ्या हाँटेलमध्ये विकले जाऊ शकतात. पण त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणाच आपल्याकडे उपलब्ध नाही. म्हणजे आपल्याकडे पिकत नाही असे नाही. अनेक गोष्टी आपल्याकडे पिकतात पण त्याचा योग्य उपयोग होत नसल्याने त्याची नासाडी होते आहे. यावर आता प्रबोधन करण्याची गरज भासणार आहे. अन्नधान्य, फळे यांची नासाडी रोखण्यासाठी सरकारने काही ठोस पाऊले उचलल्यास रोजगार निर्मितीही होऊ शकेल व वाया जाणारे हे घटकही वाचवता येणे शक्य होईल. बेरोजगार शेती पदवीधरांचा गट करून त्यांना याबाबत प्रशिक्षण देऊन योग्य मार्गदर्शन व सहकार्य करून अशी होणारी नासाडी रोखता येणे शक्य होऊ शकेल. त्याबरोबर शेतमालाला योग्य भाव देणेही शक्य होईल. यातूनही फळे कुजल्यास त्यापासून अल्कहोल, इथेनाँल तयार करून त्याचा इंधनासाठीही वापर करता येणे शक्य आहे. एकंदरीत नासाडी रोखणे यावर ठोस धोरण ठरविण्याची गरज आहे.  तंत्रशिक्षणाप्रमाणेच शेतमाल प्रक्रिया शिक्षणास प्राधान्य दिल्यास व ठोस रोजगार मिळवून देणारा उद्योग विकास केल्यास हे शक्य आहे. यावर सरकारने अधिक भर द्यायला हवा. असे उपाय योजल्यास आत्महत्येची समस्याही सुटू शकेल. 
 
स्वयंपूर्ण शेतकरी याच आत्महत्या रोखण्यावर उपाय
शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती, स्वयपूर्ण शेतकरी हा उपाय आत्महत्या रोखण्यावर योग्य ठरणार आहे. त्या दृष्टीने शासनाची धोरणे असायला हवीत. केवळ आंदोलन होत म्हणून ते रोखण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी हा काही समस्येवरील उपाय नव्हे. समस्येच्या मुळाशी जाऊन त्या सोडविण्याचे प्रयत्न सरकारने करायला हवेत तरच शेतीतील समस्या सुटणार आहेत. यासाठी दुरदृष्टीच्या उपाययोजना व धोरणे ठरवताना सखोल विचार यांची गरज आहे.

Tuesday, January 8, 2019

ज्ञानखड्‌ग



 
 यशस्वी व्हायचे असेल तर ही ज्ञानाची तलवार हाती असणे आवश्‍यक आहे. पण तलवार ही धारदार असावी. तिला गंज चढलेला नसावा. ती वापरण्यास योग्य असावी. ज्ञान आहे पण अद्ययावत नसेल तर काय उपयोग. सध्याच्या युगात, काळात उपयोगी असणारे ज्ञान आवश्‍यक आहे. सध्याच्या युगात चालणारी ज्ञानाची तलवार आत्मसात करायला हवी.  ऐसा जरी थोरावे । तरी उपाये एके आंगवे ।
जरी हातीं होय बरवे । ज्ञानखड्‌ग ।।207।। अध्याय 4 था

ओवीचा अर्थ - एवढा जरी वाढला तरी जर त्याच्या हाती चांगले ज्ञानरुप खड्‌ग असेल तर या एका उपायाने तो जिंकतां येतो.

कोणताही उद्योग करताना त्याचे सर्वांगीण ज्ञान असणे आवश्‍यक आहे. तरच त्यामध्ये यश येते. शेतकऱ्याला पीक घेताना त्या पिकाची सर्व माहिती असायलाच हवी. रब्बीतील गहू खरिपात घेतला तर काय होते? कोणत्या हंगामात कोणती पिके येतात. उत्पन्न वाढीसाठी कोणत्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. आजकाल हरितगृहांमुळे कृत्रिम वातावरणाची निर्मिती करून पिके घेतली जात आहेत. उत्कृष्ट दर्जाची उत्पादने घेण्यासाठी कोणते तंत्रज्ञान आवश्‍यक आहे. हे जाणणे गरजेचे आहे. यामुळे तो तोट्यात जाणार नाही. सध्यस्थितीत नेमके हेच घडत नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारावर शेती केली जात आहे. पारंपरिक शेतीतून शेतकरी अद्यापही बाहेर पडलेला नाही. कष्ट करण्याची त्याची मानसिकता नाही. तसे प्रयत्नच केले जात नाहीत. यामुळे उत्पन्न म्हणावे तसे मिळत नाही. उपलब्ध साधनांच्या मदतीने जास्तीत जास्त नफा कसा कमविता येईल. हे अभ्यासणे आवश्‍यक आहे. विचार, चिंतन, मनन हे होतच नाही. गुडघ्यात मेंदू ठेवून शेती करून कसे चालेल. जग बदलले आहे. झपाट्याने बदलत्या या जगात तरायचे असेल तर, यशस्वी व्हायचे असेल तर ही ज्ञानाची तलवार हाती असणे आवश्‍यक आहे. पण तलवार ही धारदार असावी. तिला गंज चढलेला नसावा. ती वापरण्यास योग्य असावी. ज्ञान आहे पण अद्ययावत नसेल तर काय उपयोग. सध्याच्या युगात, काळात उपयोगी असणारे ज्ञान आवश्‍यक आहे. सध्याच्या युगात चालणारी ज्ञानाची तलवार आत्मसात करायला हवी. संरक्षणासाठीची शस्त्रे बदलली. काळानुरूप त्यामध्ये बदल झाला. आता अण्वस्त्रे आली आहेत. ही अस्त्रे ज्याच्याकडे तो देश बलाढ्य समजला जात आहे. पुढील काळात आणखी नवी शस्त्रे, अस्त्रे येतील. व्यवहारातील प्रगतीसाठी जसे ज्ञान हवे. तसे अध्यात्मिक प्रगतीसाठीही सर्वांगीण ज्ञानाची गरज आहे. आत्मज्ञानाची ही तलवार आत्मसात करायला हवी. यासाठी आवश्‍यक असणारे चिंतन, मनन, ध्यान याचा अभ्यास करायला हवा. विचारमंथन, पारायणे करायला हवीत. ते ज्ञान काय आहे हे जाणून घ्यायला हवे. अंधश्रद्धेने कोणत्याही गोष्टी करू नयेत. फसवणूक होऊ नये यासाठी हे सर्व गरजेचे आहे. शस्त्रांनी देशाची बलाढ्यता सिद्ध होते. पण आत्मज्ञानाचे मानव देहाची बलाढ्यता सिद्ध होते.


Monday, January 7, 2019

मनुष्यजात



देखें मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनशीळ ।
जाहलें असे केवळ । माझां ठायीं ।। 67।। अध्याय 4 था

ओवीचा अर्थ - हे पाहा, जेवढें म्हणून मनुष्यप्राणी आहेत, तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो.

भारतात अनेक जाती, पंथ, परंपरा आहेत. दुसऱ्या देशातही तशाच जाती, परंपरा आहेत. प्रत्येकाला त्याच्या जातीचा, धर्माचा, देशाचा स्वाभीमान असतो. आपण बाहेर गेल्यानंतर आपण मराठी आहे याचा टेंभा मिरवतो. कोणी कानडी असेल तर तो कानडी असल्याचा तोरा मिरवतो. हे स्वाभाविक आहे. त्यात गैर असे काहीच नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आपण श्रेष्ठ आहोत हे दाखविण्यातच आपले महत्त्व असते. यासाठी स्वाभीमान असायला हवा. आज प्रत्येक वृत्तपत्र त्यांचा खप, प्रत्येक चॅनेल त्यांचा टीआरपी कसा जास्त आहे. आपण इतरांपेक्षा कसे चांगले आहोत हेच दाखविण्याचा प्रयत्न करते. आज त्याची गरज झाली आहे. महाराष्ट्राबाहेरही मराठी कशी श्रेष्ठ आहे हे दाखविण्याचे प्रयत्न होतात. मुळात आपणास दूर गेल्यानंतरच आपल्या संस्कृतीची ओढ लागते. त्याचे श्रेष्ठत्व समजते. जाती व्यवस्था जगात सर्वत्र आहे. याला विशेष महत्त्व आहे. कारण यामुळे मनुष्य संघटित राहातो. त्याची सुरक्षितता वाढते. त्याचे कुटुंब, नातेसंबंध यांच्यात ऐक्‍य असते. यामुळे गरजेच्यावेळी त्याला मदतीला अनेकजण धावून येतात. यासाठी या जातींचे महत्त्व आहे. एकलकोंडेपणा राहात नाही. आज शहरात एकलकोंडेपणा वाढला आहे. कोणाकडे जाणे नाही, येणे नाही. अशाने माणसाची मानसिकता ढळत चालली आहे. मुळात हीच स्थिती खरी अध्यात्माची ओढ वाढविणारी आहे. पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने तो भरकटत आहे. अनेकजण त्याच्या या एकाकीपणाचा फायदा घेत आहेत. असे होऊ नये यासाठी जागरूकता महत्त्वाची आहे. प्रत्येक मनुष्यजातीचा भगवंताकडे ओढा असतो. हा मुळात त्याचा स्वभावता गुण आहे. पण गोंधळलेल्या मानसिक स्थितीमुळे तो भरकटत आहे. भगवंताचे भजन, चिंतन, मनन हा स्वभावधर्म आहे. प्रत्येक जातीधर्मात हेच सांगितले आहे. म्हणून मनुष्यजातीचा हा धर्म पाळायला हवा. भगवंताच्या चरणी लीन व्हायला हवे. गर्वाने, तमोगुणाने मनुष्य भरकटला जात आहे. त्याचा हा अहंकारच त्याला संपवत आहे. हा अहंकार जागृत करण्याचा प्रयत्न काही मंडळीकडून होत आहे. यामुळे तर जातीय तणाव वाढत आहे. अहंकाराने तो भ्रमिष्ठ होत आहे. त्याचाच क्रोध वाढत आहे. क्रोधावर नियंत्रण कसे ठेवायचे याचे उपाय धर्मात सांगितले आहेत. धर्म हा शांतीचा मार्ग सांगतो. त्यामुळे तेथे क्रोधाचा मार्ग कधीच असू शकत नाही. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. पण देव संरक्षणासाठी क्रोधीत जरूर होतो. स्वातंत्र्य कोणी हिरावून घेत असेल तर तो अधर्म आहे. तो अधर्म नष्ट करण्यासाठी त्याला क्रोध हा आवश्‍यक आहे. हा तर मनुष्यजातीचा स्वभाव आहे.