Tuesday, January 8, 2019

ज्ञानखड्‌ग



 
 यशस्वी व्हायचे असेल तर ही ज्ञानाची तलवार हाती असणे आवश्‍यक आहे. पण तलवार ही धारदार असावी. तिला गंज चढलेला नसावा. ती वापरण्यास योग्य असावी. ज्ञान आहे पण अद्ययावत नसेल तर काय उपयोग. सध्याच्या युगात, काळात उपयोगी असणारे ज्ञान आवश्‍यक आहे. सध्याच्या युगात चालणारी ज्ञानाची तलवार आत्मसात करायला हवी.  ऐसा जरी थोरावे । तरी उपाये एके आंगवे ।
जरी हातीं होय बरवे । ज्ञानखड्‌ग ।।207।। अध्याय 4 था

ओवीचा अर्थ - एवढा जरी वाढला तरी जर त्याच्या हाती चांगले ज्ञानरुप खड्‌ग असेल तर या एका उपायाने तो जिंकतां येतो.

कोणताही उद्योग करताना त्याचे सर्वांगीण ज्ञान असणे आवश्‍यक आहे. तरच त्यामध्ये यश येते. शेतकऱ्याला पीक घेताना त्या पिकाची सर्व माहिती असायलाच हवी. रब्बीतील गहू खरिपात घेतला तर काय होते? कोणत्या हंगामात कोणती पिके येतात. उत्पन्न वाढीसाठी कोणत्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. आजकाल हरितगृहांमुळे कृत्रिम वातावरणाची निर्मिती करून पिके घेतली जात आहेत. उत्कृष्ट दर्जाची उत्पादने घेण्यासाठी कोणते तंत्रज्ञान आवश्‍यक आहे. हे जाणणे गरजेचे आहे. यामुळे तो तोट्यात जाणार नाही. सध्यस्थितीत नेमके हेच घडत नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारावर शेती केली जात आहे. पारंपरिक शेतीतून शेतकरी अद्यापही बाहेर पडलेला नाही. कष्ट करण्याची त्याची मानसिकता नाही. तसे प्रयत्नच केले जात नाहीत. यामुळे उत्पन्न म्हणावे तसे मिळत नाही. उपलब्ध साधनांच्या मदतीने जास्तीत जास्त नफा कसा कमविता येईल. हे अभ्यासणे आवश्‍यक आहे. विचार, चिंतन, मनन हे होतच नाही. गुडघ्यात मेंदू ठेवून शेती करून कसे चालेल. जग बदलले आहे. झपाट्याने बदलत्या या जगात तरायचे असेल तर, यशस्वी व्हायचे असेल तर ही ज्ञानाची तलवार हाती असणे आवश्‍यक आहे. पण तलवार ही धारदार असावी. तिला गंज चढलेला नसावा. ती वापरण्यास योग्य असावी. ज्ञान आहे पण अद्ययावत नसेल तर काय उपयोग. सध्याच्या युगात, काळात उपयोगी असणारे ज्ञान आवश्‍यक आहे. सध्याच्या युगात चालणारी ज्ञानाची तलवार आत्मसात करायला हवी. संरक्षणासाठीची शस्त्रे बदलली. काळानुरूप त्यामध्ये बदल झाला. आता अण्वस्त्रे आली आहेत. ही अस्त्रे ज्याच्याकडे तो देश बलाढ्य समजला जात आहे. पुढील काळात आणखी नवी शस्त्रे, अस्त्रे येतील. व्यवहारातील प्रगतीसाठी जसे ज्ञान हवे. तसे अध्यात्मिक प्रगतीसाठीही सर्वांगीण ज्ञानाची गरज आहे. आत्मज्ञानाची ही तलवार आत्मसात करायला हवी. यासाठी आवश्‍यक असणारे चिंतन, मनन, ध्यान याचा अभ्यास करायला हवा. विचारमंथन, पारायणे करायला हवीत. ते ज्ञान काय आहे हे जाणून घ्यायला हवे. अंधश्रद्धेने कोणत्याही गोष्टी करू नयेत. फसवणूक होऊ नये यासाठी हे सर्व गरजेचे आहे. शस्त्रांनी देशाची बलाढ्यता सिद्ध होते. पण आत्मज्ञानाचे मानव देहाची बलाढ्यता सिद्ध होते.


No comments:

Post a Comment