Thursday, July 26, 2018

जागृती


सायंकाळची वेळ होती. रामू कृषी पदवीधर होऊन गावाकडे परतला होता. एस.टी.तून उतरताना त्याचा मित्र सुनिल त्याला भेटला.
काय रे राम्या, कसं येण झालं ? गावकडची आठवण बिठवण कशी काय आली ? 
अरे सुनिल, खूप गावाची खूप आठवण येते रे. सह्याद्रीच्या डोंगरकपारीत वसलेलं आपुला हा गाव खूपच सुंदर आहे रे. येथून जाण्याची इच्छाच होत नाही. तु कसा आहेस ? 
"बरा आहे. पण काय र समदा बदलाईस बर का? आवाजात सुद्धा शहरी बाज आलाय तुझा. पण काय रे समद्या सामानासह तू कसा काय परतलाय?'
"अरे माझे शिक्षण पूर्ण झाले. आता मी कृषी पदवीधर झालो आहे. वाटत आता गावाच्या विकासातच लक्ष घालाव. गावातील शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान शिकवाव व प्रगतीशील शेतकरी बनवाव'
" अर पण तु गावात राहून करणार काय? सगळी शिकल्याली पोर शहराकडे जायची भाषा करतात. त्यासाठी आईबापाशी भांडतात. अन तू शिकून इथ येऊन गावात या खोपटात बसतान मांडणार?'
" हो, मी इथेच येणार गावातील आपल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देणार आहे. फळबाग लागवड, पोल्ट्री उद्योग, फळ प्रक्रिया उद्योग उभे करणार आहे.'
"बरं बाबा मी चलतो. आपण उद्या चावडीच्या पारावर भेटू'
बऱ्यांच दिवसांनी रामू आपल्या गावच्या वाड्यात प्रवेश करतो. रामूचे वडील शाळेत मुख्याद्यापक आहेत. पण कामानिमित्त ते बाहेरगावीच असतात. आठवड्यातून घरी येतात. आई घरकाम पाहात शेती पाहाते. 
दुसऱ्या दिवशी रामू गावच्या चावडीच्या पारावर जातो. सगळी शेतकरी मंडळी नेहमी प्रमाणे राजकिय गप्पात रंगलेली असतात. वृत्तपत्राची पाने चाळत त्यांच्या राजकिय गप्पा अधिकच रंगत असतात. 
"काय पाव्हन, कनच्या गावच'
" आबा, तुम्ही ओळखल नाही मला. मी मुख्याद्यापकांचा मुलगा'
" आरं, रामू किती मोठा झालास. वळखलाच नाहीस किंर. कसा आहीस. बर चाललय नव्ह'
"हो ठिक चाललय. आबा आपल्या गावात सोसायटी होती ना?'
" हो व्हती बाबा पण समद बंद पडलय आता. कर्जाच्या ओझ्यान सगळ बुडाल. मधमाशापालनाचा व्यवसायही गेल्या तीन चार वर्षापासून बंद पडलाल. समद राजकारणात बुडाल रे"
"काय म्हणता काय?'
"तू त्यात पडू नक बाबा शाहण्याच काम नव्ह ते. ते समद घाणेरड राजकारण हाय. समद्यांची वाट लागलीया. पतसंस्था बुडाली. त्यात गोरगरीबांची पुंजी अडकलीया'
हे ऐकून रामू नाराज होतो. गावाचा फेर मारण्यासाठी आणि गावात आणखी काय बदल झालेत हे पाहण्यासाठी तेथून बाहेर पडतो. 
दुसऱ्या दिवशी रामू असाच गावचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला. गाव कामगार पाटलाच्या लिंबूच्या बागेत त्याला लोकांची गर्दी दिसली. गर्दी कसली जमली आहे या उत्सूकतेने तो तेथे गेला. पण त्यांने पाहीले की लिंबावरील "लिफ मायनर' या किडीची पुजा गावकरी करीत आहेत. यामध्ये गावातील प्रतिष्ठीत सुशिक्षित महिलाही आहेत. हे पाहून तो आश्‍चर्यचकीत झाला. 
"काय कसली पुजा चालली आहे.'
" अरं रामू पाटलांच्या लिंबावर नागाच्या छटा उमटल्यात. त्याची पुजा चाललीया'
रामू हे पाहून हसू लागला. त्यांने गावकऱ्यांना ही पानावरील किड असल्याचे समजाविण्याचा प्रयत्न केला. पण गावकऱ्यांनी त्यालाचा खुळ्यात काढले. 
"अहो, माझ समजून घ्या. ही किड लिंबूवर्गीय फळझाडाची नंबर एकची शत्रू आहे. या किडीची अळी कोवळी पाने पोखरून पानातील हरितद्रव्य खात पुढे जाते. त्यामुळे तिच्यामागे पानावर पारदर्शक नागमोडी पोखरलेली चंदेरी पट्टे पडत जातात. यालाच तुम्ही नागछटा म्हणून पुजा करत आहात. ही सगळी अंधश्रद्धा आहे.'
पण गावकऱ्यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. अशा घटनांना रामू नाराज झाला. त्यांने गाव सोडून शहरात नोकरी करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांना समजावणे तितके सोपे नाही. असे त्याला वाटते. जाताना तो गावच्या चावडीच्या फळावर या किडीबाबत माहिती मात्र लिहीतो.
पानातील हरितद्रव्य हे झाडाचे अन्न तयार करण्याचे मूळ साधन आहे. तेच ही किड खावून नाहीसे करते. त्यामुळे किड लागलेली पाने आकाराने लहान होतात व चुरगळली जातात. पाने आखडतात. सुकतात. गळून पडतात. झाडाची वाढ खुंटते. असा मजकूर तो फलकावर लिहीतो.
काही दिवसांनी गावकामगार पाटलाची बाग सुकल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात येते. रामू सांगत होता. ते खरे आहे. हे लक्षात येते. शेवटी सगळा गाव एकत्र येतो. व रामूला गावात बोलावून घेता. 
रामू आता गावात सुधारणा करू लागला आहे. पाण्याची समस्या त्याने सोडवली आहे. सिंचनाखालील क्षेत्रात वाढ केली आहे. फळावर प्रक्रिया करणारे उद्योग त्यांने सहकारातून उभारले आहेत. आज तो गावातील एकटाच प्रगतशील शेतकरी नाही तर सारा गावच त्यांने प्रगतशील शेतकऱ्यांचा केला आहे.

गुरुपौर्णिमा


गुरू असतो तरी कसा
गुरू शोधावा तरी कसा
गुरू करावा तरी कसा
गुरू ओळखावा तरी कसा

मनकवडा, आत्मज्ञानी ही लक्षणे त्याची
पहिल्याच भेटीत येते प्रचिती याची
सद्गुरू जवळ असो किंवा नसो
अनुभूतीतून लाभतो त्याचा सहवास

असा गुरू मज भेटावा, मज भेटावा
त्याचा सहवास मज लाभावा, मज लाभावा
ही आस असते प्रत्येक साधकास
पण भेटीत गुरू देतो तरी काय प्रत्येकास

सतत घेतो साधकाची परीक्षा
सावध करण्यासाठी देतो दीक्षा
जीवनात भावार्थ सांगतो अनुभूतीने
साधक होतो आय्मज्ञानी त्या ज्ञानाने

असा गुरू शोधावा स्व-सामर्थ्याने
देही व्हावी ज्ञानाची पौर्णिमा गुरूकृपेने

Wednesday, July 25, 2018

विकारांवर उपाय

सांगे श्रवणीं ऐकावे ठेलें । की नेत्रींचें तेज गेलें । 

हें नासारंध्र बुझाले । परिमळु नेघे ।।

धकाधकीच्या जीवनामुळे माणसांची झोपच उडाली आहे. यामुळे अनेक विकार, विकृती मानवामध्ये दिसून येऊ लागल्या आहेत. लहरीपणा, चिडचिडेपणा वाढत चालला आहे. अती आवाजामुळे, ध्वनी प्रदुषणामुळे श्रवणशक्ती कमी होताना आढळत आहे. डोळ्यांना विश्रांती न मिळाल्याने अंधत्व येण्याचे प्रमाणही वाढत आहे. दुर्गंधीमुळे सुगंधाचा वासही नाकाला झोंबू लागला आहे. बदलत्या जीवनशैलीचा हा परिणाम आहे. नियोजनच कोलमडल्याने हे प्रकार वाढत आहेत. पुर्वीच्याकाळी हे विकार उतारवयात होत असत पण ऐन तारुण्यात वृद्धत्वाच्या विकारांचा सामना नव्यापिढीला करावा लागत आहे. यावर औषध उपचारांचाही परिणाम फारसा दिसून येत नाही. मनाची शांतीच मनुष्य हरवून बसला आहे. यावर उपाय आपल्या संस्कृतीत सांगितले आहेत. पण पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे त्याला हे साधेसोपे उपायही समजेनासे झाले आहेत. अशाने मनाला शांती मिळते. समाधान मिळते. हेच मुळात पटेणासे झाले आहे. पैशाने सर्व खरेदी करता येते याच भ्रमात मनुष्य वावरत आहे. मनशांती ही पैशाने विकत मिळत नाही. ती आपल्याला मिळवावी लागते. योगा, व्यायाम यामुळेही क्षणिक मनशांती लाभते. ताजेतवाने होता येते. पण कायमस्वरूपी मनशांती मिळवायची असेल तर त्यासाठी आपण नियोजनबद्ध जीवनशैली आत्मसात करावी लागते. नियोजनाला जीवनात खूप महत्त्व आहे. या नियोजनात काही काळ हा मनाला विश्रांतीसाठी द्यावा लागतो. दररोज तासभर मनाला शांतीसाठी अध्यात्मात मन रमवायला हवे. त्याचा अभ्यास करायला हवा. त्यामध्ये सांगितलेले साधनेचे उपाय योजायला हवेत. साधनेने मनाचा थकवा दूर होतो. मनाला नवी उभारी मिळते. मनातील विचार शांत होतात. मन प्रसन्न होते. यासाठी साधना ही आवश्‍यक आहे. कमीत कमी पाच मिनिटेतरी साधना करायला हवी. पण यासाठी मानवाला वेळच नाही. शांत बसून मन एकाग्र करायला हवे. मनाची एकाग्रता वाढली की विचार शक्ती वाढते. मनाला चांगल्या कामाची सवय लागते. चांगले विचार मनात घोळू लागतात. साहजिकच मन प्रसन्न होते. अध्यात्मिक ग्रथांच्या पारायणाने मनाला सतविचारांची सवय लागते. हळुहळु मन त्यामध्ये रमु लागते. शांत झोप लागते. यामुळे होणाऱ्या विकारावर हा एकमेव उपाय आहे. याचा विचार करायला हवा. औषधाने जे साध्य होत नाही ते यामुळे निश्‍चितच साध्य होते. यासाठी प्रयत्न करायला हवा.

Saturday, July 21, 2018

भगवंतपण


किती वाढविसी या उग्ररूपा । आंगीचें भगवंतपण आठवीं बापा ।
नाहीं तरी कृपा । मजपुरती पाही ।। 443 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ -
या उग्र रूपाला तूं किती वाढवीत आहेस ? देवा, आपल्या स्वतःच्या अंगी असलेले भगवंतपण आठव नाही तर माझ्यापुरती तरी कृपा कर.

भगवंतांनी अर्जुनाला विश्‍वरूप दर्शन दाखवले. भगवंताचे हे उग्ररुप पाहून अर्जुन घाबरला. यासाठी त्याने भगवंताकडे त्याच्या मुळ रूपात येण्यासाठी प्रार्थना केली. भगवंताने अर्जुनालाच फक्त विश्‍वरूप दाखवले. पण भगवंत प्रत्येक भक्ताला त्याचे हे विश्‍वरूप दाखवत असतो. आजकाल आपल्या सभोवती अनेक चांगल्या-वाईट घटना घडत असतात. त्यातून आपल्या मनात भीतीही उत्पन्न होते. या घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना या भगवंताचे उग्ररूप आहे. कोठे पुर येतो. पुरात मोठे नुकसान होते. पुरात अनेकजण व्हावून जातात. सुनामी येते. सुनामीच्या तडाख्याने क्षणात होत्याचे नव्हते होऊन जाते. समुद्राच्या लाटांनी किनारपट्टीचे मोठे नुकसान होते. भुकंपाने उभ्या इमारती कोसळतात. त्यात हजारोंची हाणी होते. मुंगीचे वारूळ नष्ट व्हावे तसे मानवाचा हा संसार कोलमडून पडतो. काही क्षणातच सारे नष्ट होते. निसर्गाचा हा रुद्रावतार भगवंताचेच उग्ररुप आहे. याकडे बारकाईने पाहिले तर भगवंताने दाखवलेले हे विश्‍वरूपच आहे. असे मानायला काहीच हरकत नाही. मुंगीसारखे आपणही या विश्‍वात एक सुक्ष्मजीव आहोत. याचीच जाणीव यातून करून दिली जाते. मानव जरी स्वतःला फार मोठा समजत असला तरी त्याने त्याचे खरे रूप ओळखावे. जन्माचा अर्थ समजून घ्यावा. त्याच्यामध्ये असणारा अहंकार नष्ट व्हावा, हाच भगवंताचा या मागचा उद्देश असतो. अहंकार, गर्वामुळे मानव उद्धट होऊन अनेक दुष्कृत्ये करत आहे. भगवंताचे हे उग्ररुप भक्ताला भीती दाखवण्यासाठी नाही. तर भक्तातील अहंकार, गर्व नष्ट करण्यासाठी आहे. अहंकार, गर्व गेल्याशिवाय भक्तीचा मार्ग सुकर होत नाही. बऱ्याचदा आपणास खूप आजारी पडल्यानंतर भगवंताची आठवण होते. इतर वेळी आपण देवाकडे ढुंकुणही पाहात नाही. पण संकटाच्यावेळी आपणास देव आठवतो. ही संकटे ही भगवंताची उग्ररुपे आहेत असे समजण्यास काहीच हरकत नाही. आपल्यातील अहंकार, गर्व जावा आपल्या मनाला भक्तीची ओढ लागावी व आपल्यामध्ये भगवंतपण जागृत व्हावे यासाठीच भगवंत अशी रुपे घेत असावेत. अंगी भगवंतपण येण्यासाठी भगवंताच्या भक्तीचा मार्ग भक्ताने स्वीकारावा. भक्तीतून मुक्ती मिळवावी. भक्तीतून सर्वज्ञ व्हावे. आत्मज्ञानी व्हावे व भक्तीची ही परंपरा पुढे अशीच जागृत ठेवण्यासाठी झटावे. सर्व विश्‍व भगवंतमय करावे हाच अध्यात्माचा खरा उद्देश आहे.

Sunday, July 15, 2018

कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे...

कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे... 
अभ्यासकांची भावना; अष्टावधानी व्यक्तिमत्त्वाच्या विविध रूपांची छाप

- राजेंद्र घोरपडे


कृष्ण विविध रूपात पाहायला मिळतो. प्रेममय, भक्तिमय, खोडकर असे त्याचे व्यक्तिमत्त्व जनसामान्यांना आपलेसे वाटते. वात्सल्य, शृंगार, भक्ती, करुणा अशा रसांचा आविष्कार कृष्णाच्या व्यक्तिमत्त्वात आहे. प्रेम म्हणजे भक्ती या जाणिवेतून त्याच्यावर काव्य रचना झाल्या. संतांनी विठ्ठल रूपात कृष्णाचे वर्णन केले आहे. कारण पंढरीच्या विठ्ठलात शिव आणि विष्णू अशा दोन्ही तत्त्वांची एकरूपता संतांनी पाहिली आहे. असा हा कृष्ण संत साहित्य अभ्यासकांना कसा वाटतो याविषयी... 


श्रीकृष्ण हे अष्टावधान व्यक्तिमत्त्व आहे. राजनैतिक, युद्धकुशल, चतुरंग योद्धा असा तो आहे. प्रसंगी आपल्या मूल्यांसाठी, स्नेहासाठी तो सारथ्यही पत्करतो. बालवयात तो निरागस खोडकर वाटतो. तारुण्यात तो प्रेमभक्तीत रंगलेला असा वाटतो. त्यानंतर चतुरस्र नेतृत्व करणारे असे त्याचे व्यक्तिमत्त्व आहे. संतांनी कृष्णाचे विविध पैलू मांडले आहेत. संत नामदेवांचा कृष्ण निरागस, निर्मळ असा आहे. संत एकनाथांनी रंगवलेला कृष्ण बालक्रीडेत रममाण झालेला आहे. तो रोमॅन्टिकही वाटतो. संत तुकारामांनी कृष्णाच्या बालक्रीडेवर अभंग रचले. त्यांच्या अभंगातून तो भक्तीचे दैवत म्हणून पाहायला मिळतो. पंडित कवींनी लोकांचे रंजन करणारा, चांगल्या मूल्यांची जपणूक करणारा कृष्ण रंगवला आहे. शाहिरांनी शृंगारप्रधान असे त्याचे चित्र उभे केले आहे. एकूणच कृष्ण जसा पाहाल तसा तो आहे.
- ल. रा. नसिराबादकर,
संत साहित्याचे अभ्यासक

भगवद्‌गीतेतील कृष्ण कर्मयोगी, ज्ञानयोगी, भक्तियोगी असा तीन प्रकारचा आहे. अर्जुनाला शिकवण्याचे केवळ निमित्त आहे. त्यामुळे आजच्या जीवनातही त्यातील तत्त्वज्ञान लागू पडते. या तीन गोष्टींनी जीवन आनंदी होते. कर्माच्या मोबदल्यात काय मिळाले याचाच विचार होतो. ते आवश्‍यक असले तरी सध्याच्या पिढीला कर्म करण्याआधीच फळ हवे आहे. श्रद्धेने कर्म केले तर यश जरूर मिळते. परमार्थ करताना व्यवहार ज्ञानही आवश्‍यक आहे. याची सांगड घातली तरच प्रपंच सफल होतो.
- यशवंत पाठक,
संत ज्ञानदेव अध्यासन प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

भगवद्‌गीता म्हणजे कृष्णाने अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेला ग्रंथ आहे. यावर अनेक मतमतांतरे आहेत. भगवद्‌गीता कृष्णाने सांगितलीच नाही, असे म्हणणारेही लोक आहेत. पण हिंदू धर्मात तीन ग्रंथ पवित्र मानले जातात. त्यात भगवद्‌गीतेचा समावेश आहे. कृष्णाचे जगणे हे भगवद्‌गीतेसारखे आहे. यासाठी भगवद्‌गीता समजल्याशिवाय कृष्ण चरित्र समजत नाही व कृष्ण चरित्र समजल्याशिवाय भगवद्‌गीताही समजत नाही.
- डॉ. सदानंद मोरे,
संत साहित्याचे गाढे अभ्यासक 

Wednesday, July 11, 2018

आनंदवारी



आषाढी वारी 
पायी जातो वारकरी पंढरपुरी
मुसळधार पावसाच्या सरी
आनंदी आनंद भक्तांच्या दारी

हिरवा गार शालू पसरला भूमीवरी
नागमोडी लालसर नदीची नथनी नाकावरी
नटली भुमाता, स्वागत करी वारकरी
प्रसन्न मनाने भक्ती करी शेतकरी

भक्तीचा मळा फुलला दारोदारी
विठ्ठल नामाचा गजर घरोघरी
सोहम सोहम च्या माळा भक्तांच्या घरी
आत्मज्ञानाचा फुलला फुलोरा देहमंदिरी

विठ्ठल पाहतो हा सोहळा पंढरपुरी
दूर असूनही त्याला महती कळते सारी
विचारतो वारकऱ्या पाहतोस का ही आनंदवारी
आता तरी हो एकाग्र या मनमंदिरी

Monday, July 9, 2018

आली आषाढी




आली आषाढी आषाढी
जडली भाव भक्तीची कडी

दुमदुमु लागला विठ्ठल विठ्ठलाचा नाद
वारी वाटेवर गुंफला नामजपाचा निनाद

पावसाच्या सरींनी केले साफ मन
शुद्ध भक्तीची बीजे रोवली ध्यानात

नाभी एकवटली, टक स्थिरावली भूस्थानी,
कुंडलीनी झाली जागृत, झाले विठ्ठलाचे दर्शन

राजेंद्र घोरपडे

Sunday, July 8, 2018

अक्षर नक्षीकामातील अवलिया...


सध्या संगणकाच्या युगात कागद आणि पेनाचा वापरच कमी झाला आहे. अशा या बदलत्या परिस्थितीत कॅलिग्राफी ही कला टिकवूण ठेवणे हे मोठे आव्हानच आहे. कोल्हापूरातील प्राद्यापक राजेंद्र बापुसो हंकारे यांनी ही कला नव्या पिढीत रुजविण्याचा विडाच उचलला आहे. यासाठी ते रोड शोच्या आयोजनातून कॅलिग्राफीबाबत समाजात जागृती करत आहेत. नुकताच त्यांनी रंकाळा तलाव येथे रोड शोच्या माध्यमातून छत्रीवर (अब्रेला) कॅलिग्राफी करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यांच्या या कलेविषयी....


कॅलिग्राफीची आवड कशी निर्माण झाली ?
राजेंद्र हंकारे - आमचे वडील बापुसो सखाराम हंकारे हे प्राथमिक शिक्षक होते. त्यांचे हस्ताक्षर सुंदर होते. त्यांना सुंदर रेखीव अक्षरे कोरण्याचा छंद होता. त्यांच्या हा छंद आम्हालाही लागला. वडीलांकडूनच सुंदर हस्ताक्षराची ही देणगी मिळाली आहे. वडीलच आमचे या मागचे प्रेरणास्थान आहेत. वडीलांच्या या सुंदर हस्ताक्षराच्या छंदास आम्ही नवेरुप दिले. यामध्ये नवनवीन शोध घेतले. नवी निर्मिती केली. अक्षरे लिहिण्याचे वेगवेगळे प्रकार आम्ही विकसित केले. यातूनच या कॅलिग्राफीचा उदय झाला.


कॅलिग्राफीबद्दल थोडक्‍यात...
राजेंद्र हंकारे - कॅलिग्राफी हा ग्रीक शब्द आहे. कॅली म्हणजे सुंदर कळी आणि ग्राफी म्हणजे मांडणी. सुंदर अक्षरांची मांडणी असा याचा सरळ साधा अर्थ आहे. मराठीत आपण याला चित्रलिपी म्हणू शकतो. पुर्वीच्याकाळी टाक, बोरू यांनी अक्षरे लिहीली जायची. जवळपास 19 व्या शतकांपर्यंत तरी टाक, बोरूचा वापर होत होता. आमचे वडील 1940 मध्ये शाळेत दौत आणि टाक घेऊन जात असत. त्यानंतर पेनाचा शोध लागला तसा टाक आणि बोरूचे महत्त्व कमी झाले. पण कॅलिग्राफीसाठी टाक, बोरू यांचाच वापर केला जाऊ लागला.

सध्या बोरु कॅलिग्राफी, ब्रश कॅलिग्राफी, स्टील ब्रश क्रलिग्राफी केली जाते. पण आर्टिस्टीक कॅलिग्राफीमध्ये विविध साधनांचा वापर करून कॅलिग्राफी केली जाते. उदाहरणार्थ स्पंज, झाडू, कंगवा, फणी, टुथब्रश, स्पंज रोलर याचा वापर करूनही सुंदर अक्षरे काढली जातात.


कॅलिग्राफीच्या प्रकाराबद्दल....
राजेंद्र हंकारे - विविध देशात कॅलिग्राफी केली जाते. नेपाळीज कॅलिग्राफी, तिबेटीयन कॅलिग्राफी, इस्लामिक कॅलिग्राफी, पारसियन कॅलिग्राफी, अरेबिक कॅलिग्राफी, जापनिज कॅलिग्राफी, चायनिज कॅलिग्राफी, देवनागरी कॅलिग्राफी, रोमन क्रॅलिग्राफी, मोडी कॅलिग्राफी असे विविध प्रकार पाहायला मिळतात. अरेबिक, पारसियन, इस्लामिक कॅलिग्राफी उजवीकडून डावीकडे केली जाते. देवनागरी, रोमन कॅलिग्राफी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. तर जापनीज आणि चायनिजमध्ये वरून खाली (टॉप टू बॉटम) उभी कॅलिग्राफी केली जाते.

देवनागरी कॅलिग्राफी आता मागे पडू लागली आहे. सम्राट अशोकाच्या काळातील "अ' हे अक्षर आणि आत्ताचे "अ' यामध्ये फरक आहे. त्याकाळात ब्राम्ही लिपी होती. पण काळानुसार अक्षरातील ठेवन बदलत गेली. लोकांना बदल हवा असतो. आम्ही दिल्लीतील भारतीय संग्रहालयात मांडलेली ब्राम्हीलिपी पाहिली. त्यानुसार आता या जुन्या लिपीला संजिवनी देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कॅलिगाफी शिकण्यासाठी प्राथमिक लिखानाची ठेवण जाणून घेणे गरजेचे आहे. तरच तुम्ही उत्तम कॅलिग्राफी करू शकतो.

देवनागरी लिहिताना उजव्या बाजूस 45 अंशात कापलेले पेनाचे टोक आवश्‍यक आहे. अशा पेनाच्या टोकाने सुंदर, योग्य जाडीचे, रेखीवपणा असलेले अक्षर उमटते.

रोमन कॅलिग्राफीमध्ये डाव्याबाजूस 45 अंशात कापलेले पेनाचे टोक वापरले जाते. पेनाचे टोक ब्रॉड असेल तर अक्षरातील उठावदारपणा, बारकावे यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. अक्षरे सहजरित्या सुंदर उमटतात.
कॉपर प्लेट कॅलिग्राफी या प्रकारात पेनाचे टोक हे तिरकस (ऑब्लिकहोल्डर) असते. टाकाप्रमाणे हे टोक शाईमध्ये बुडवून अक्षरे काढली जातात. अक्षरे लिहिताना पेनावर कमी जास्त दाब देऊन सुंदर रेखीव अक्षरे काढली जातात. करस्यु रायटिंग हा प्रकार यातूनच आला आहे.


आपल्या कॅलिग्राफीबद्दल थोडक्‍यात...
राजेंद्र हंकारे - मी स्वतः कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयात रसायनशास्त्राचा प्राद्यापक म्हणून काम करतो. माझा भाऊ संजय हंकारे हे मुंबईमध्ये इंग्रजीचे प्राद्यापक म्हणून काम करतात. आम्ही दोघांनी नोकरी सांभाळत ही कला जोपासली आहे. कॅलिग्राफीवर आम्ही काही पुस्तके प्रकाशित केली आहेत. रोमन कॅलिग्राफीमध्ये दोन पुस्तके आहेत. इंडियन कॅलिग्राफी लर्निग बुक अशी पुस्तके आहेत. अक्षरामध्ये विविधता आणत विविध फॉन्ट स्वतः विकसित केले आहेत. मासळीच्या आकारातील अक्षरे (फिश फॉन्ट), गुलाबाच्या आकारातील अक्षरे (रोज फॉन्ट), ग्राफिक क्रिएटिव्ह फॉन्ट, फ्युजन लेटर, ज्वेलरी डिझाईन लेटर्स, पाळण्याच्या आकारातील अक्षरे (कॅडल फोॅर्मेशन फॉन्ट) आम्ही विकसित केले आहेत.

जागतिक स्तरावरही आमच्या कामाची दखल घेतली गेली आहे. आम्ही 2012 मध्ये वॉशिंग्टन येथे झालेल्या कॅलिग्राफर्स ग्लुईड युएसए या पोस्टकार्ड साईज स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तसेच लंडन येथील केंट ब्रिटीश कॉन्फरन्स लायब्रीमध्ये भारताची प्रतिज्ञा सादर करण्याची संधी आम्हाला मिळाली.

कॅलिग्राफीचा वापर कोठे होतो?
राजेंद्र हंकारे - तीच तीच अक्षरांची रचना पाहून कंटाळा येतो. यामुळे अक्षरातील बदलास महत्त्व आहे. सुंदर सुबक अक्षर नेहमीच हवे हवेसे असते. अशी सुंदर अक्षरे अनेक ठिकाणी वापरली जाऊ शकतात. अनेक वस्तूवर याचा वापर केला जाऊ शकतो. जाहिरातींचे फलक असोत किंवा लोगो असो तेथे अक्षरातील वेगळेपण हे हवे असते. पाण्याच्या बॉटलवर, पोस्ट कार्डवर, चहाच्या कपावरही अशी सुंदर अक्षरे लिहिली जाऊ शकतात. शर्ट, ओढणी, साडी ड्रेस आदी कपड्यावरही याचा वापर केला जातो. इतकेच काय दप्तर, बॅग, छत्री सुंदर दिसावी यासाठी त्यावरही अक्षरे लिहून त्याचे सौंदर्य वाढवले जाऊ शकते. घरामध्ये वॉलपेंटींगमध्येही कॅलिग्राफी केली जाते. इंटेरिअर डेकोरेशनसाठी सध्या बरीच मागणी आहे.


Tuesday, July 3, 2018

अहिंसा


कां कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार ।
कुचंबैल केंसर । इया शंका ।।

माणसांच्या मनातील राग, द्वेषातून हिंसा घडते. स्वार्थ, लोभामुळे मन अस्थिर होते. या अस्थिरतेतूनच मन भरकटते. नव्या पिढीत अस्थिर मनामुळे हिंसेचे प्रमाण वाढत आहे. दहशतवाद, नक्षलवाद यासारख्या हिंसक प्रवृत्ती वाढत चालल्या आहेत. समाजातील असमानताही यासाठी तितकीच कारणीभूत आहे. असमातेतून होणारे शोषणाने हिंसकवृत्ती बळावत आहे. पण या हिंसेवर अहिंसेच्या मार्गानेच मात करता येते. सात्त्विक विचारांची बैठक मनातील हिंसक प्रवृत्ती शांत करू शकते. यासाठी समाजात सात्त्विक वृत्ती वाढविण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. धर्माची बैठक ही अहिंसेवर आधारित आहे. पण सध्या धर्मातच हिंसा सांगितली आहे असे सांगून माणसांची मने भ्रमित केली जात आहेत. यासाठी संतांच्या विचारांचे चिंतन, मनन, अभ्यास करायला हवा. धर्मात कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत हे जाणून घ्यायला हवे. आत्मज्ञानी संतांचे यासाठी मार्गदर्शन आवश्‍यक आहे. रस शोषताना भुंगा सुद्धा कमळाला इजा होणार नाही इतक्‍या हळुवारपणे त्यावर पाय ठेवतो. इतकी सात्त्विक वृत्ती त्याच्यामध्ये असते. मग माणसामध्ये ही वृत्ती का वाढू नये? यासाठी प्रयत्नच केला नाही तर कसे शक्‍य होईल ? भरकटलेली मने बदलायला हवीत. मने बदलूनच हिंसेवर विजय मिळवता येईल. भ्रष्टाचारी, गुंड वृत्तीच्या लोकांना शासन हे व्हायलाच हवे पण त्याबरोबर त्यांच्यातील दुष्टप्रवृत्तीही नष्ट करायला हवी. मनातील दुष्ट विचार नाहीसे झाले तर हिंसक घटना निश्‍चितच कमी होतील. समाजात सुख शांती नांदेल. साधनेसाठीही मन स्थिर असणे आवश्‍यक असते. अस्थिर मनाला अहिंसेच्या विचारांनी स्थिर करायला हवे.