Saturday, June 29, 2013

धरणांचे आर्थिक गणित मांडणारा लेखाजोखा

पुस्तक परिचय
.................................
पुस्तक ः इकॉनॉमिक्‍स ऑफ रिव्हर फ्लो
संपादक ः डॉ. भरत झुनझुनवाला
प्रकाशक ः कल्पाज पब्लिकेशन, सी-30, सत्यवतीनगर, दिल्ली 110052
........
धरणांचे आर्थिक गणित मांडणारा लेखाजोखा
राजेंद्र घोरपडे
.................
भारतात दिवसेंदिवस धरणांची संख्या वाढत आहे. परंतु अमेरिकेत मात्र मोठ्या प्रमाणात धरणांचा बीमोड करण्यावर भर देण्यात येत आहे. नैसर्गिक पाण्याचा प्रवाह रोखल्याने पर्यावरणाची मोठी हानी होते. तसेच धरणांवर दुरुस्तीसाठी होणारा खर्चही वाढतो, आदी आर्थिक व पर्यावरणीय कारणांसाठी धरणे नष्ट करण्याची मोहीम अमेरिकेत सुरू करण्यात आली आहे. याबाबत या पुस्तकात तज्ज्ञांचे लेख डॉ. भरत झुनझुनवाला यांनी संपादित केले आहेत. हे पुस्तक इंग्रजी भाषेत आहे.
पुस्तकात पाच भागात तज्ज्ञांचे लेख देण्यात आले असून पहिल्या भागात अमेरिकेत धरणे नष्ट करण्यामागची कारणे दिलेली आहेत. तेथील अनेक धरणांची कालमर्यादा संपल्याने त्यावर डागडुजी करण्यापेक्षा ती नष्ट करणे अधिक फायदेशीर असल्याचे मत मांडण्यात आले आहे. धरणे नष्ट करण्याला धरण क्षेत्रातील व्यक्तींचा विरोध आहे. कारण धरण क्षेत्रातील जमिनींचे भाव गडगडतील अशी भीती त्यांना वाटत आहे. पण तरीही अमेरिकेने सुरक्षेचे कारण पुढे करून धरणे नष्ट करण्यावरच अधिक जोर दिला आहे. दुसऱ्या भागात अमेरिकेतील नष्ट करण्यात येत असलेल्या धरणांची काही उदाहरणे देण्यात आली आहेत. लोअर स्नेक रिव्हरवरील चार धरणे, इल्वाह धरण, एडवर्ड धरण, एम्बेरी धरण या नष्ट करण्यात आलेल्या धरणांचा आढावा यात घेण्यात आला आहे. तिसऱ्या भागात जलविद्युत धरण प्रकल्पावर होणार खर्च आणि त्यापासूनचा फायदा याची तुलना करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या धरणे फायदेशीर असल्याचे आढळत नाही. जलविद्युत प्रकल्पाऐवजी अमेरिका औष्णिक, अणुऊर्जा, सौर ऊर्जा आदी ऊर्जेच्या स्रोतांना अधिक महत्त्व देत आहे. जलविद्युत प्रकल्पांचे नूतनीकरण करता येत नाही, आदी मुद्द्यांवर या भागात प्रकाश टाकण्यात आला आहे. चौथ्या भागात धरणावरील जलविद्युत प्रकल्पाचा पर्यावरणावर होणारा परिणाम याची माहिती देण्यात आली आहे. पाणी प्रदूषण, प्रवाही नद्यांचा विचार, वन्य कायदा आदींवर या भागात चर्चा करण्यात आली आहे. पाचव्या भागात नद्यांतील पाण्याच्या मुक्त प्रवाहाचे आर्थिक महत्त्व सांगण्यात आले आहे. भारतात जलविद्युत प्रकल्पावर होणारा खर्च विचारात घेतला जात नाही. उलट यापासून मिळणारे फायदेच अधिक जोर देऊन मांडले जातात. या सर्व गोष्टींचा विचार करून अमेरिकेच्या धरणे नष्ट करण्याच्या मोहिमेपासून भारतानेही बोध घ्यावा, असे या पुस्तकातून झुनझुनवाला यांना सुचवायचे आहे. धरणांचे आर्थिक फायदे तोटे व पर्यावरणाची हानी आदींचा अभ्यास करण्याऱ्यांसाठी हे पुस्तक अधिक उपयुक्त आहे.

Friday, June 14, 2013

छंदातून उभारला बांबूच्या सुमारे 350 कलाकृतींचा व्यवसाय

कोल्हापुरातील अशफाक मकानदार यांचा उपक्रम
बांबूपासून सुमारे साडेतीनशे प्रकारच्या विविध कलाकृती तयार करून, त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न कोल्हापूर येथील अशफाक मकानदार यांनी केला आहे. बदलत्या जमान्यानुसार ग्राहकांची मागणी लक्षात घेत त्यांनी आपल्या राज्यासोबतच परराज्यांतही विविध वस्तूंना बाजारपेठ तयार करीत या व्यवसायाची क्षमता सिद्ध केली आहे.
राजेंद्र घोरपडे

बांबूवर आधारित वस्तूंचा वापर ही सध्याची "फॅशन' आहे. घराच्या सजावटीमध्ये त्यांचा वापर केला जातो. कोल्हापूर शहरातील जैबुन्निसा मकानदार यांना अशा वस्तूनिर्मितीचा छंद होता. पोलिओने अपंगत्व आलेल्या जैबुन्निसा यांनी याच छंदाचे रूपांतर पुढे व्यवसायात केले. सन 1985 मध्ये सुरू झालेला हा व्यवसाय त्यांच्या पश्‍चात त्यांचा मुलगा अशफाक सांभाळत आहे.

इंजिनिअर होऊनही नोकरी न करता आईच्या या व्यवसायात त्यांनी वृद्धी केली आहे. सन 2003 पासून पूर्णवेळ ते या व्यवसायात आहेत. बदलत्या जमान्यात बांबूच्या उत्पादनांची मागणी, ग्राहकांची गरज लक्षात घेऊन त्यात नवे बदल वा मूल्यवर्धन करून बाजारपेठेत त्यांची मागणी वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जुन्या वस्तूंना "मॉडर्न टच' दिला. व्यवसायासाठी त्यांनी पंतप्रधान रोजगार हमी योजनेमार्फत 15 लाख रुपयांचे 13 टक्के व्याजदराने कर्ज घेतले. या रकमेत 15 टक्के अनुदान मिळाले.

बांबूपासून अशफाक बनवतात या विविध वस्तू! फ्लॉवर पॉट, पेन स्टॅंड, ज्वेलरी बॉक्‍स, बर्ड हाऊस, विंड चाईम, डायनिंग सेट, बांबूच्या खुर्च्या, आरामखुर्च्या, सोफा सेट, डायनिंग टेबल, बेड, चटई, पडदे, फ्लोरिंग पार्टिशन्स, फ्रूट बास्केट, टोप्या, आकाशदिवे, झुले, टॉवेल होल्डर, फाउंटन्स, फ्लोअर लॅम्प, झुंबर, वॉल लॅम्प, बॅंगल्स, हेअर क्‍लिप, ट्रे, कॅंडल डीनर स्टॅंड, बांबूची विविध स्ट्रक्‍चर्स.
- या वस्तूंमध्ये विविध प्रकारची कलाकुसर असते.

- बाजारपेठेतील मागणीनुसार ही उत्पादने घेतली जातात.
- बांबूपासून सुमारे 15 प्रकारचे आकाश कंदील, पन्नास प्रकारचे फ्लॉवरपॉट, तर दहा प्रकारचे ज्वेलरी बॉक्‍स तयार करतात. या कलाकृती तयार करण्यासाठी बहुला, बिजली, मकल, कळक, मेसकाठी (कागदी चिवा), टल्ला आदी प्रकारच्या बांबूंचा वापर अशफाक करतात. बांबूंची खरेदी मुख्यतः कोल्हापुरातील टिंबर मार्केटमधूनच होते. आवश्‍यकतेनुसार उत्पादने घेत असल्याने तेवढ्याच कच्च्या मालाची खरेदी करावी लागते, यामुळे महाग असूनही कच्चा माल मिळेल त्या दरात खरेदी करतात. अशफाक यांना पत्नी नाझनीन, वडील बादशहा यांची व्यवसायात मोलाची मदत होते. कलाकुसरी करण्यासाठी पाच महिला कामगार आहेत, त्यांच्या सोबत नाझनीन स्वतःही राबतात.

काही वस्तूंविषयी -

इंटिरिअर लॅम्प याच्या निर्मितीसाठी कळक जातीचा बांबू लागतो. 14 फूट लांबीचा बांबू लागतो. एका बांबूची किंमत अंदाजे 40 ते 100 रुपये असते. आकार व लांबीनुसार विविध दर असतात. बांबूवरील गाठी काढून घेऊन तो घोळून घेतला जातो, त्याला पॉलिश करून आवश्‍यकतेनुसार विविध आकार तयार केले जातात. त्याला कीड- रोग लागू नये यासाठी प्रक्रिया केली जाते. पॉलिश किंवा गरजेनुसार रंग दिला जातो. वर्षभरात अंदाजे एक हजार लॅम्प तयार करतात. ते तयार करण्यासाठी वीज, मजुरी, पॉलिश, रसायन आदी साहित्य, वाहतूक असा अंदाजे सात लाख रुपयांचा खर्च येतो. प्रति नग 650 ते 1500 रुपयांपर्यंत दर मिळतो. खर्च वजा जाता अंदाजे तीन लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो.

आकाश कंदील यासाठी मेसकाटी (कागदी चिवा) प्रकारचा बांबू वापरण्यात येतो. दोन इंच जाडीचा व 24 फूट लांबीचा चिवा अंदाजे 60 रुपये दराने विकत घेतात. चिवा फोडून पट्ट्या तयार केल्या जातात. गरजेनुसार आकार करून त्यावर प्रक्रिया केली जाते. चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी असे सुमारे 35 प्रकारचे आकाश कंदील वर्षभरात अंदाजे सहा हजार संख्येने तयार करतात. चार ते साडेचार लाख रुपये खर्च येतो. खर्च वजा जाता दीड लाख रुपये मिळतात.

विंड चाईम आकाश कंदील तयार करताना शेंड्याकडील शिल्लक राहिलेल्या चिव्याचा उपयोग विंड चाईम तयार करण्यासाठी केला जातो. सुमारे 20 प्रकारचे विंड चाईम तयार करतात. वाऱ्याची झुळूक येताच घरात अडकवलेल्या या विंड चाईममधून मधुर ध्वनी निर्माण होतो.

बांबूचे बेड कळक बांबूपासून विविध क्षेत्रफळांचे बेड तयार करतात. एका बेडसाठी अंदाजे 20 बांबू लागतात.

उत्पादनांना बाजारपेठ लग्नसराईत रुखवतात सजावटीसाठी बांबूच्या विविध वस्तूंचा वापर होतो. दीपावलीच्या काळात आकाश कंदिलांना मागणी असते. सध्या मुंबई, बंगळूर, दिल्ली, अहमदाबाद, पुणे, गोवा या शहरांतील मॉल्स, मोठे स्टोअर्स येथे बांबूची उत्पादने अशफाक यांनी विकली आहेत. अनेक ठिकाणी विक्रीवृद्धीसाठी प्रयत्न सुरू आहेत. उत्पादनांची आगाऊ मागणी नोंदवूनच उत्पादन घेतले जाते. रेस्ट हाऊस, रिसॉर्ट, पर्यटन स्थळावरील हॉटेल्स, रेस्टॉरंट, टेंट हाऊस, फार्म हाऊस, पर्णकुटी (बांबू हाऊस) आदींकडूनही सजावटीसाठी या उत्पादनांना मागणी असते. उत्पादनांच्या विक्रीसाठी "डेव्हलपमेंट कमिशन ऑफ हॅन्डिक्राफ्ट'कडून विविध प्रदर्शनांमध्ये मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले जातात.

वार्षिक उलाढाल - वर्षभरात अंदाजे साडेतीनशे प्रकारच्या वस्तू अशफाक तयार करतात. यातून सुमारे 50 लाख रुपये किमतीची उलाढाल होते. उत्पादन खर्च, मार्केटिंग (त्यासाठी वेगळी टीम आहे), वाहतूक आदीचा खर्च वजा जाता पंधरा लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो. त्यात मागणीनुसार चढ- उतार राहतात.

अशफाक यांच्या व्यवसायाची वैशिष्ट्ये - स्व-उत्पादित मालाची किंमत अशफाक स्वतः ठरवतात, यामुळे विक्रीनंतरचा नफा निश्‍चित असतो.
- व्यवसायवृद्धीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर, नवनवीन सजावटी- आराखडे करून सातत्याने उत्पादनात बदल, त्यामुळे मालाचे मूल्य व बाजारातील मागणी कायम ठेवतात.
- इंटरनेटच्या माध्यमातून लाकडाच्या विविध उत्पादनांची "डिझाईन्स' बांबूमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात.
- काही कामे जलद होण्यासाठी यंत्रांचा वापर वाढविला आहे.
- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी "डिझाईन'च्या स्पर्धा ते भरवितात. यातून नव्या पिढीसाठी आकर्षक वाटणारी डिझाईन्स विचारात घेऊन तशा पद्धतीचा उत्पादनात बदल करण्याचा प्रयत्न करतात.
- बांबू विषयातील संकेतस्थळ सुरू करून विक्रीवृद्धीसाठी प्रयत्न केले आहेत.

अशफाक मकानदार - 9028525410
साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर

व्यवसायातील जोखीम वा समस्या - बांबूच्या उत्पादनांना लाकडी वस्तूंच्या तुलनेत ग्राहकांकडून त्वरित पसंती मिळणे कठीण असते,
त्यामुळे ग्राहकांना चांगल्या प्रकारे पटवून द्यावे लागते.
- या उत्पादनांच्या किमतीही ग्राहकांना महाग वाटतात.
- बांबूची उत्पादने दीर्घकाळ टिकतात का याबाबत ग्राहक शंका घेतात.
अशफाक म्हणाले, की बांबूच्या वस्तू पंधरा वर्षे टिकतात. जंगलतोडीच्या आजच्या युगात इकोफ्रेंडली बांबूच्या वस्तू अधिक फायदेशीर आहेत. आम्ही बांबूचे महत्त्व व्यवसायाच्या माध्यमातून वाढवत आहोत.