Sunday, December 13, 2020

२१ डिसेंबर २०२० रोजी गुरु आणि शनी ग्रहाची अनोखी युती



२१ डिसेंबर २०२० रोजी गुरु आणि शनी ग्रहाची अनोखी युती   

४ मार्च १२२६ नंतर म्हणजेच तब्बल ८०० वर्षानंतर २१ डिसेंबर २०२० रोजी गुरु आणि शनी ग्रहाची अनोखी युती  आकाशा मध्ये सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे रात्री ९ वाजून १५ मिनिटापर्यंत पाहता येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयामध्ये पदार्थ विज्ञान व खगोलशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर यांनी दिली.

श्री. कारंजकर म्हणाले, या दिवशी सूर्य हा आयनिक वृत्तावरून फिरताना जास्तीत जास्त दक्षिणेकडे सरकतो .उत्तर गोलार्धात या दिवशी सर्वात मोठी रात्र तर दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो आणि २१ किंवा २२ डिसेंबर ला सूर्याचे उत्तरायण चालू होते.अशा दोनी गोष्टींचा समस्त खगोल प्रेमीसह नागरिकांना आनंद घेता येणार आहे.

श्री. कारंजकर म्हणाले, आपल्या सूर्य मालेतील पाचवा व सगळ्यत मोठा ग्रह गुरु आणि सहावा ग्रह शनी हे आप्पापल्या कक्षेत सूर्याभोवती फिरत असतात. गुरु ग्रहाला सूर्यभोवती फिरण्यासाठी पृथ्वीच्या ११ पूर्णांक ८६ वर्षे लागतात व स्वतः भोवती फिरण्यासाठी ९ तास ५५ मिनिटे व २९ सेकंद एवढा वेळ लागतो.शनी ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यसाठी पृथ्वीच्या २९ पूर्णांक ४६ वर्ष एवढा कालावधी तर स्वतः भोवती फिरण्यास १० तास ३९ मिनिटे व २२ सेकंद एवढा वेळ लागतो .हे दोनी ग्रह सूर्याभोवती फिरत असताना ते एका वेळेस अशा ठिकाणी येतात कि पृथ्वीवरून पाहताना ते दोन ग्रहांच्या ऐवजी एक ग्रह अथवा दोन ग्रहांची जोडी असल्यासारखे वाटतात. इंग्रजी मध्ये याला कॉन जंकशन असे म्हणतात.असे जरी असले तरी ते ग्रह एकमेकांपासून फार लांब अंतरावरती असतात.गुरुचे पृथ्वी पासूनचे अंतर यावेळेस ५ पूर्णांक ९२ अस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढे असणार आहे तर शनीचे अंतर १० पूर्णांक ८२ अस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढे असणार आहे.म्हणजेच ते एकमेकांपासून ४ पूर्णांक ९० अस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढे अंतर लांब आहेत. एक अस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे १४ कोटी ९५ लाख ९७ हजार ८७१ किलोमीटर. १५ डिसेंबर पासून संध्याकाळी सूर्य मावल्यानंतर हे दोन्ही ग्रह  पश्चिमे कडे रात्री ९वाजून १५ मिनिटापर्यंत आपण पाहू शकता. वरच्या बाजूला असणारा ग्रह शनी तर त्याच्या खालच्या  बाजूला असणारा ग्रह गुरु आहे .२१डिसेंबर ला ते एकमेकांच्या जवळ म्हणजेच ते एकमेकां पासून 0.1 डीग्री म्हणजेच आपल्या चन्द्राच्या व्यासाच्या १ पंचमांश पट अंतर एवढे शेजारी असल्यासारखे दिसणार आहेत.या तारखे नंतर मात्र ते पश्चिम दिशेला  एक्मेखापासुन लांब जाताना दिसणार आहेत यावेळी मात्र त्यांचं क्रम बदलनार  आहे.यानंतर असाच सोहळा बगण्यासाठी आपणाला १५ मार्च २०८० सालापर्यंत वाट बगावी लागणार आहे.या तारखेला याच्यापेक्षा जास्त चांगली स्थीती पूर्वे दिशेला पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी पाहावयास मिळणार आहे.

Join  and Like Our Page इये मराठीचिये नगरी for updates and Details...

https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari/


इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पाहण्याची संधी...

 इंटरनॅशनल स्पेस स्टेशन  पाहण्याची संधी...

आयएसएस म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन डोळ्यांनी काही मिनिटांकरिता पाहावयास मिळणार आहे, अशी माहिती कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयातील खगोल शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर यांनी दिली. 

श्री. कारंजकर म्हणाले, हे स्पेस सेन्टर पृथ्वी भोवती ९० मिनिटामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करीत असते .त्याचा वेग एका तासाला १७ हजार ५०० मैल म्हणजे २८ हजार किलोमीटर एवढा असतो. स्पेससेंटर वरती पडणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाचे परावर्तन होत असल्याने हे स्पेस सेंटर पाहावयास मिळणार आहे. हे बघत असताना विमान अथवा मोठा तारा आकाशामधून जात आहे, असे दिसते. याची क्षितिजावरून असणारी उंची डिग्री अथवा इलेव्हशनमध्ये मोजली जाते, असे श्री. कारंजकर यांनी सांगितले.

या दिवशी यावेळी दिसणार स्पेस स्टेशन...

१४ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजून २२ मिनीटांपासून  ५ मिनिटाकरिता पश्चिम वायव्य दिशेकडून ११ डिग्री उंचीवरून दक्षिणदिशे कडे १० डिग्री उंचीकडे जाणार आहे.

१७ डिसेंबरला सकाळी ६ वाजून ७ मिनिटांपासून सहा मिनिटाकरता दक्षिण नैऋत्य दिशेकडून १० डिग्री उंचीवरून  पूर्व ईशान्य दिशेकडे १० डिग्री उंचीवरून जाणार आहे.

१८ डिसेंबरला पहाटे ५ वाजून २० मिनटापासून एक मिनिट करिता  १० डिग्री उंचीवरून दक्षिण आग्नेय दिशेकडून १० डिग्री उंची वरून आग्नेय दिशेकडे १४ डिग्री उंचीवरून जाणार आहे.

१९ डिसेंबर ला पहाटे ६ वाजून ८ मिनटापासून सहा मिनिटांकरिता १० डिग्री उंचीवरून पश्चिम नैऋत्य दिशेकडून उत्तर ईशान्य दिशेकडे ११ डिग्री उंचीवरून जाणार आहे .

२० डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजून २४ मिनिटांपासून ३ मिनिटांकरिता पूर्व आग्नेय दिशेकडून हे स्पेस सेंटर ११ डिग्री उंचीवरून ईशान्य दिशेकडे जाणार आहे,

Join  and Like Our Page इये मराठीचिये नगरी for updates and Details...

https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari/


Saturday, December 12, 2020

अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

कोल्हापूरः  गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाच्यावतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत.  लेखक, प्रकाशक यांनी 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व अल्पपरिचय 20 जानेवारी 2021 पर्यंत पोचतील, अशा रितीने पाठवावीत. कथा, कादंबरी, कविता, आत्मकथन आणि बालसाहित्य (गद्य, पद्य दोन्ही ) या साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जातील. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, गौरवपत्र असे असेल.  पहिल्या अक्षरसागर साहित्य संमेलनाध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. 

संपर्क - राजन कोनवडेकर (अध्यक्ष)  9822226458,  प्रा. डाॅ. अर्जुन कुंभार (उपाध्यक्ष) 9890156911, डाॅ. मा. ग. गुरव (सदस्य)  9421114262   

पुस्तके पाठवणेचा पत्ता -  बा. स. जठार, सचिव,  अक्षरसागर साहित्य मंच, विद्यासागर निवास, शिंदेवाडी रोड, गारगोटी. ता. भुदरगड, जि. कोल्हापूर - 416209. मो. 9850393996,    9403466256   

डॉ. के. एम. गरडकर यांची महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस फेलो पदी निवड


 डॉ. के. एम. गरडकर यांची महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस फेलो पदी निवड

शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. के. एम. गरडकर यांची महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस फेलो पदी निवड केली आहे. महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेस ही राज्यातील नामांकित संस्था असून फेलोच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यातील तसेच राज्याबाहेरील शास्त्रज्ञांचा त्यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाच्या कामगिरीच्या आधारे निवड केली जाते. या यादीमध्ये सन २०२० यावर्षासाठी शिवाजी विद्यापीठातून प्रा. गरडकर यांची एकमेव निवड झाली आहे.

प्रा. गरडकर हे नॅनोमटेरिअल्स या क्षेत्रात काम करीत असून त्यांनी पाण्यातील रंगद्रव्यांचे विघटन सूर्यप्रकाशाच्या मदतीने करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही रंगद्रव्य फक्त अर्ध्यातासामध्ये जवळपास ९५ टक्के नष्ट केली आहेत. तसेच त्यांची राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय स्तरावर एकूण १५० शोधपत्रिका प्रकशित झाल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी मिळाली असून सध्या ८ विद्यार्थी नॅनोमटेरिअल्स या विषयावर कार्य करीत आहेत. सध्या ते डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल केमिस्ट्रीचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

प्रा. गरडकर यांना संशोधनासाठी भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीची २०१८ सालीची शिष्यवृत्ती देखील मिळाली होती. तसेच ते अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेच्या संपादकीय मंडळात संपादक व परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची कामातील तत्परता पाहून अमेरिकन केमिकल सोसायटी सारख्या अनेक नामवंत प्रकाशकांनी त्यांना उत्कृष्ट परीक्षक म्हणून गौरविण्यात आले आहे. संशोधनातील उत्तम गुणवत्ता मूल्यांकन हे एच इंडेक्स, आय-१० इंडेक्स, व सायटेशन यांच्या आधारे केले जाते. त्यानुसार प्रा. गरडकर यांच्या संशोधनाचा एच इंडेक्स ३५ , आय-१० इंडेक्स ८५, व सायटेशन्स ३७०० इतकी आहेत.

Friday, December 11, 2020

स्त्रीचे प्रेम



स्त्रीचे प्रेम 

स्त्री जसे आपले माहेर प्रेम विसरत नाही. तसे आपण सो ऽ हमचे स्वर विसरता कामा नये. त्यावर आपण आपले प्रेम ठेवायला हवे. 

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406 

नाना गाय चरे डोंगरी । परि चित्त बांधिले वत्सें घरीं । 

तैसें प्रेम एथिचें करी । स्थानपती ।। 635।। अध्याय 11 वा 

ओवीचा अर्थ ः अथवां गाय डोंगरात चरत असते परंतु तिचें सर्व लक्ष घरी आपल्या वासरावर अडकून राहीलेले असते त्याप्रमाणे या विश्वरुप ठिकाणाचे तू आपले प्रेम मालक कर. 

स्त्री लग्नानंतर सासरी जाते, पण तेथे माहेरच्याच गोष्टींचे गोडवे गात राहाते. माझ्या माहेरात हे आहे. माझ्या माहेरात ते चांगले आहे. जरी अठराविश्व दारिद्य माहेरात असले तरी तिच्या मनात माहेर विषयी आपुलकी असते. तिच्या मनात माहेर कायमचे घर करून राहीलेले असते. हे मातृप्रेम आहे. ही मायेची ओढ आहे. हा जिव्हाळा आहे. माहेरची माया ती कधीही विसरू शकत नाही. सासरी ऐश्वर्य जरी असले तरी माहेरच्या प्रेमातच त्या स्त्रीचे मन गुंतलेले असते. हे प्रेम का असते ? ही ओढ का असते ? प्रेमाच्या ठिकाणी, मायेच्या ठिकाणी आपले मन ओढले जात असते. ते आपण कधीही विसरू शकत नाही. पैसा, संपत्ती अमाप मिळाली, ऐश्वर्य ओसंडून जरी वाहत असले तरी प्रेमाने मिळालेली चादर, आधार  केव्हाही आपल्या मनातून दूर जात नाही. ती आठवण कायमची स्मरणात असते. म्हणूनच स्त्री कधीही माहेर विसरू शकत नाही. कारण त्या प्रेमात ती गुंफलेली असते. आजकाल स्त्रिया सुद्धा पुरूष्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कामानिमित्त त्या कोठेही असल्यातरी त्यांचे लक्ष घरातील तान्हुल्याकडे कायम असते. पाळणाघरात तिचे संगोपन योग्यप्रकारे होत असले तरीही त्या मायेच्या मनात मात्र त्या तान्हुल्याची ओढ असते. इतकेच काय बाहेर बाजारात खरेदीसाठी गेल्या तरी त्यांच्या मनात घरास कुलुप निट लावले आहे का? घरातील गॅस बंद केला आहे का ? असे विविध प्रश्न सुरु असतात. इतक्‍या छोट्या छोट्या गोष्टीही त्यांच्या मनात घर करून राहीलेल्या असतात. त्यांची घराची ओढ ही कायम असते. गाय चरायला डोंगरावर गेली तरी तिचे लक्ष चरतानाही गोठ्यातील वासराकडे असते. हे मातृप्रेम आहे. पक्षी सुद्धा तिच्या पिलाला खाद्य आणण्यासाठी बाहेर गेला तरी पंख न फुटलेल्या घरट्यातील पिलाकडेच मन असते. ही ओढ कायम असते. हे प्रेम कायम असते. अध्यात्मात सद्‌गुरुंना अशाच प्रेमाची अपेक्षा आहे. कुठेही बाहेर गेलात तरी भगवंताचे स्मरण नित्य असायला हवे. त्याच्याकडे अशी ओढ असायला हवी. येणाऱ्या अनुभुतीकडे अवधान असायला हवे. मन सतत भगवंताकडे ओढलेले असावे. मनात साधनेचा विचार असायला हवा. कारण साधना ही नित्य सुरु असते. फक्त आपले लक्ष त्याकडे नसते. मन सदैव त्यामध्ये गुतलेले असावे. सो ऽ हमचा स्वर नित्य सुरु असतो. पण आपले लक्ष त्याकडे नसते. त्यामध्ये मन गुंतवायला हवे. सो ऽ हमचा स्वर सतत स्मरणात असायला हवा. त्याचे ध्यान सतत सुरू असायला हवे. तो ऐकायला हवा. तरच आपण आत्मज्ञानाकडे ओढले जाऊ. सद्‌गुरुंच्या कृपेने आपणास आत्मज्ञानी होता येते. यासाठी तशी ओढ साधनेत कायम असायला हवी. स्त्री जसे आपले माहेर प्रेम विसरत नाही. तसे आपण सो ऽ हमचे स्वर विसरता कामा नये. त्यावर आपण आपले प्रेम ठेवायला हवे. स्त्रीची ओढ माहेरी जशी असते तशी अध्यात्माकडे आपली ओढ असायला हवी. 

  ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासह आता शेती, ग्रामीण विकास, विविध चळवळी, मनोरंजन, सत्ता संघर्ष, पर्यटन आदी विविध विषय वाचण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. यासाठी http://t.me/IyeMarathichiyeNagari  येथे क्लिक करा.  

Wednesday, December 9, 2020

सोन्याचा डोंगर, प्रेमाचा डोंगर ( एकतरी ओवी अनुभवावी)

 


सोन्याचा डोंगर, प्रेमाचा डोंगर ( एकतरी ओवी अनुभवावी) 

प्रेमाने दिलेल्या भेटवस्तूंचा स्वीकार करणे हा धर्म आहे. या भेटवस्तूचे काय करायचे? मला याची गरज तरी काय ? असे म्हणून त्याचा त्याग केला तर देणाऱ्याला दुःख होणार. दुसऱ्याला सुखी करणे, समाधानी करणे. हा धर्म आहे.

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरू ।

ऐसे म्हणो नि अव्हेरू । करणें घडे ।। 625 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ ः एखाद्या मनुष्यास सोन्याचा डोंगर प्राप्त झाला असता हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर आपल्याला घेता येत नाही असे म्हणून सोन्याच्या डोंगराचा त्याग करणे घडेल काय ?

आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टींची प्राप्ती होत असते.  कधी ती धनाच्या स्वरुपात असते तर कधी स्थावर मालमत्तेच्या स्वरुपात असते. फुकट मिळालेल्या गोष्टीचे मोल आपणाला फारसे नसते. पण योग्यवेळी एखाद्या गोष्टीचा लाभ झाला तर ती गोष्ट आपणासाठी अनमोल ठरते. या वस्तू आपणास भेट स्वरुपात मिळतात. कोणी प्रेमाने देतात. तर कोणी मदत म्हणून देत असतात. त्यातही त्याची आपल्याबद्दल आपुलकी असते. आई वडील मुलांना त्यांच्या वाढदिवसादिवशी भेटवस्तू देतात. सद्गुरु सुद्धा प्रेमाने शिष्याला अशा भेट वस्तू देत असतात. मित्र मैत्रिणीसुद्धा आपणास प्रेमाने भेट वस्तू देत असतात. आपण या भेट वस्तू स्वीकारतो. कारण आपले प्रेम असते. एक मैत्रीचे, जिव्हाळ्याचे भावनिक नाते असते. प्रेमापोटी आपण या वस्तू स्वीकारतो. याचा त्याग केला तर देणाऱ्याला याचे निश्चितच दुःख होईल. विश्वरुप दर्शनात तर भगवंत अर्जुनाला संपूर्ण राज्य तुझ्याकडे चालुन आले आहे. असे सांगत आहेत. याचा त्याग करून चालणार नाही ते शोभणारही नाही. याचा त्याग करून युद्धभुमी सोडून गेलास तर अर्जुन आम्हाला भिऊन पळून गेला असे शत्रू म्हणतील. यासाठी याचा त्याग करणे अयोग्य आहे. असे भगवंत अर्जुनाला समजावून सांगत आहेत. कारण मिळाले आहे त्याचा स्वीकार करणे हाच धर्म आहे.  

प्रेमाने दिलेल्या भेटवस्तूंचा स्वीकार करणे हा धर्म आहे. या भेटवस्तूचे काय करायचे? मला याची गरज तरी काय ? असे म्हणून त्याचा त्याग केला तर देणाऱ्याला दुःख होणार. दुसऱ्याला सुखी करणे, समाधानी करणे. हा धर्म आहे.  प्रेमाचा अनादर करणे हे धर्माला शोभणारे नाही. सद्गुरु सुद्धा इच्छा नसतानाही भक्तांच्या प्रेमापोटी त्यांनी दिलेल्या वस्तूंचा स्वीकार करत असतात. उपयोग नाही म्हणून त्याचा त्याग करत नाहीत. प्रेमाने अनेक गोष्टी साध्य होतात. चार प्रेमाचे शब्दही जीवनात मोठा बदल घडवू शकतात. मग प्रेमाने दिलेली भेट वस्तू तुमचे जीवन का बदलवू शकणार नाही ? दुष्टाच्या मनातील दुष्टपणाही प्रेमाने नष्ट करता येतो. दुरावलेल्यांना प्रेमाने जवळ करता येते. यासाठी बोलण्यात, वागण्यात प्रेमाचे चार शब्द असावेत. 

प्रेम ही भक्तीची महत्त्वाची पायरी आहे. अध्यात्मिक विकासातही त्याला महत्त्व आहे. साधनेमध्ये मन स्थिर ठेवण्यास प्रेमाची मोठी मदत होते. प्रेमामुळे मनाचा उत्साह कायम राहातो. सद्गुरुंच्याजवळ तर प्रेमाचा सागरच असतो. या सागरात आपण डुंबायला शिकले पाहीजे. प्रेमाने आंघोळ करून मन स्वच्छ करायला हवे. मनाची स्वच्छता ही अध्यात्मिक विकासासाठी गरजेची आहे. साधना करताना भक्ताला अनेक अनुभव येतात. प्रेमाने सद्गुरु हे शिष्याला शिकवत असतात. साधनेतून आत्मज्ञानाचा लाभ झाला तर त्याचा त्याग करून कसे जालेल. 

एखादी गोष्ट आपणास त्रास देत असेल. कटकटीची असेल तर ती आपण सोडून दिली पाहीजे असे वाटते. पण त्याचा त्याग केला तर ती कटकट कायमची मिटते असे होत नाही. ती कटकट कधी ना कधी त्रासदायक ठरते. यासाठी त्याग न करता आहे त्याचा स्वीकार करून त्यातून मार्ग काढणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. यासाठी त्याग कशाचा करायचा या अभ्यास करायला हवा. त्याग केल्याने समस्या सुटतात असे होत नाही. त्या बळावतात. यासाठी ती समस्या सोडवण्याकडे आपला कल असायला हवा. सोन्याचा डोंगर मिळाला. कदाचित हा त्रासदायकही ठरू शकतो. यातून सोने काढता येणे शक्यही नाही. मग हा घेऊन आपण काय करायचे असे म्हणून आपण त्याचा त्याग केला तर आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार आहे. जे मिळाले आहे त्याचा स्वीकार करून त्यातून विकास करायला शिकले पाहीजे. अध्यात्मिक प्रगती ही टप्प्याने होत असते. सोन्याचा डोंगर मिळाला म्हणजे सर्व काही मिळाले असे होत नाही. आत्मज्ञान झाले तरी त्याचा वापर कसा करायचा याचे ज्ञान असायला हवे. यासाठी मिळाले आहे त्याचा स्वीकार करून वाटचाल करायला हवी. 

   ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

श्री ज्ञानेश्वरी निरूपण..एकतरी ओवी अनुभवावी... ज्ञानेश्वरी चिंतन मनन अध्ययन यासह आता शेती, ग्रामीण विकास, विविध चळवळी, मनोरंजन, सत्ता संघर्ष, पर्यटन आदी विविध विषय वाचण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. यासाठी http://t.me/IyeMarathichiyeNagari  येथे क्लिक करा. 

Tuesday, December 8, 2020

ध्यानरुपी संपत्ती


सकारात्मक विचारानेच अध्यात्मिक प्रगती होत राहाते. प्रत्येकाला होणारा लाभ वेगळा आहे. यासाठी आपल्या समाधानासाठी तो लाभ मिळतो. म्हणून ध्यानधारणा नित्य करायला हवी. ध्यारुपीसंपत्तीचा लाभ, ध्यानाची अनुभुती यावी यासाठी अवधान ठेऊन प्रत्येकाने आपले प्रयत्न सुरु ठेवायला हवेत. 

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406 

आजि ध्यानसंपत्ती लागी । तूंचि एकू आथिला जगी । 

हें परमभाग्य आंगी । विरंचीही नाहीं ।। 622 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ - आज ध्यानरुप संपत्तीकरिता जगांत तूच एक संपन्न आहेस. असले श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याही अंगी नाही. 

ध्यानामध्ये अनुभुती येते. हे भाग्य एखाद्यालाच सद्गुरुकृपेने भेटते. सद्गुरु हजारो शिष्यांना अनुग्रह देतात. पण प्रत्येक शिष्याला लाभ मात्र वेगवेगळा मिळतो. जो जे वांछिल तो ते लाहो ज्याला जे हवे ते त्याला मिळावे असे पसायदान अर्थात प्रसाद माऊलीने सद्गुरुंकडे मागितला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या इच्छेनुसार त्याला त्याचे फळ मिळत असते. ध्यानामध्ये कोणाला अनुभुती येते. कोणाला स्वप्नातून अनुभुती येते. हाताची पाचही बोटे सारखी नाहीत. तशी प्रत्येक माणसाची विचारसरणी ही भिन्न आहे. प्रत्येकाची इच्छाही वेगवेगळी असते. कोणाला नोकरीत प्रमोशन हवे असते. तर कोणाला अमाप संपत्ती हवी असते तर कोणाला सुख समाधान हवे असते. प्रत्येकाची साधना एकच आहे पण विचारामुळे फळ मिळते. मनाची शांती मिळावी यासाठी जो प्रयत्न करतो. सद्गुरुकृपेने त्याला ते फळ प्राप्त होते. विश्वरुप दर्शन हे अर्जुनाला झाले. संजयालाही झाले पण अर्जुनासाठी भगवंतांनी हे रूप प्रकट केले. हे भाग्य केवळ अर्जुनालाच मिळाले. अन्य व्यक्तीला याचा लाभ झाला नाही. प्रत्येक व्यक्तीची इच्छा वेगळी असते त्यानुसार त्याला लाभ मिळतो. सद्गुरुकृपेने हा लाभ होतो. सद्गुरु हजारोंना अनुग्रहीत करतात पण एखादाच आत्मज्ञानाचा लाभार्थी होतो. परंपरा पुढे नेणारा एखाद-दुसराच असतो. हे भाग्य सद्गुरुकृपेने लाभावे यासाठी ध्यानधारणा आहे. ध्यानरुपी संपत्तीचा हकदार होण्यासाठी नित्यनेमाने साधना करायला हवी. कारण त्या हजारोमधील लाभार्थी आपणही असू शकतो. हाच भाव मनात ठेऊन साधना करायला हवी. ते मिळणार नाही असा नकारार्थी विचार सोडून द्यायला हवा. सकारात्मक विचारानेच अध्यात्मिक प्रगती होत राहाते. प्रत्येकाला होणारा लाभ वेगळा आहे. यासाठी आपल्या समाधानासाठी तो लाभ मिळतो. म्हणून ध्यानधारणा नित्य करायला हवी. ध्यानरुपीसंपत्तीचा लाभ, ध्यानाची अनुभुती यावी यासाठी अवधान ठेऊन प्रत्येकाने आपले प्रयत्न सुरु ठेवायला हवेत. ते परमभाग्य आपणाला निश्चित मिळेल असा विश्वास मनात ठेऊन वाटचाल करायला हवी. तरच अध्यात्मिक प्रगती होईल.