Thursday, January 12, 2017

ज्ञानेश्‍वरी परंपरा आणि देवनाथांचा शोध

भारतात अनादि कालापासून भक्तीची परंपरा आजतागायत अस्तित्वात आहे. आदिनाथ भगवान शंकरापासून गुरुशिष्याची ही भक्ती परंपरा सुरू झाली. नराचा नारायण करणारी ही गुरु-शिष्य परंपरा आहे. ब्रह्मसंपन्न, आत्मज्ञानी गुरुंकडून ज्ञानदान यात केले जाते. ज्ञानदानाचा हा वारसा अनुवंशिक नाही. याला जातीचे, वयाचे, उच्च-नीचतेचे बंधनही नाही. कोणीही व्यक्ती या ज्ञानाचा लाभार्थी होऊ शकतो. भक्तीने ते ज्ञान मिळवता येते. अनादी कालापासून आत्मज्ञानी गुरु-शिष्याची सुरु असलेली ही भक्तीची परंपरा... 
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति । 
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्मम्‌ ।। 

एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । 
भावातीतं त्रिगुणरहितं सद्‌गुरुं तं नमामि ।। 

गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्‍वराः । 
गुरुःसाक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।। 

अखण्ड मण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम्‌ । 
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ।। 

प्रल्हाद नारद पराशर पुण्डरीक व्यासाम्बरीष । 
शुकशौनक-भीष्मदाल्भ्याम ।। 

रुक्‍मांगदार्जुन वसिष्ठ बिभीषणादी पुण्यानिमान्‌ 
परम भागवतान्‌ स्मरामि ।। 

आदिनाथं च मच्छिंद्र गोरक्षं गहिनीं तथा । 
निवृत्तिं ज्ञानदेवाय देव-चूडामणे नमः ।। 

अखण्ड आनंदरुपाय समज्ञानप्रदायने 
भवभ्रान्तिर्विनाशाय श्रीगुण्डाख्य रामचन्द्र महादेव 

रामचन्द्र श्री सद्‌गुरु विश्‍वनाथाय श्रीसद्‌गुरु गोविंदनाथाय 
श्री सद्‌गुरु माधवनाथाय नमः ।। 

धर्मरक्षणार्थ प्रकट 
त्या त्या कालातील परिस्थितीनुसार विविध सामाजिक, धर्मरक्षणाची कार्ये या परंपरेकडून केली गेली. भक्त प्रल्हादाच्या काळाचा विचार केला तर त्यांचे जन्मदातेच त्याचे विरोधक होते. राक्षसी विचारांचा वाढता प्रभाव नष्ट करण्यासाठी देवाने (गुरूने) भक्तांच्या आग्रहापोटी अवतार घेतल्याचे अनेक ठिकाणी स्पष्ट होते. प्रल्हादासाठी नृसिंहाने अवतार घेतला. कौरवांच्या विनाशासाठी कृष्णाचा अवतार झाला. पण येथे या भक्तीचे स्वरुप गीतेच्या रुपातून प्रकट झाले. हे ज्ञान संजयाच्या वाणीतून धृतराष्ट्राला समजले. 

ब्रह्मविद्येचा सुकाळ 
नंतरच्या काळात नाथांच्या परंपरेतून या ज्ञानाचा प्रसार झाला. आदिनाथापासून मच्छिंद्र-गोरक्ष-गहिनी अशी ही परंपरा विस्तारत गेली. पण काळाच्या ओघात या ज्ञानावर हक्क सांगितला जाऊ लागला. काहींना यापासून वंचित ठेवण्याचे प्रकार बळावले. संन्यासाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ लागला. हा प्रकार थांबला जावा, या ज्ञानावर सर्वांचा अधिकार आहे. हे ज्ञान सर्व विश्‍वात पसरले जावे. सर्वांना मिळावे या उद्देशाने मराठी प्रांतात संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्‍वरीच्या रुपाने हे ज्ञान सर्वांसाठी उघड करून सांगितले. ज्ञानेश्‍वरीच्या माध्यमातून हे ब्रह्मज्ञान मराठी भाषेत प्रकट झाले. भाषेचाही या ज्ञानातून विस्तार झाला. त्यातून मराठी भाषेला अमरत्व प्राप्त झाले. भक्तीची ही परंपरा महाराष्ट्रात विस्तारली. सर्व सामान्यांना हे ब्रह्मज्ञान सहज हस्तगत करता येऊ लागले. ज्ञानप्राप्तीसाठी असणारा योगाचा बिकट मार्ग दूर करुन ज्ञानेश्‍वरांनी सहजयोग सांगितला. भक्तीचा सोपा मार्ग सांगितला. भक्तीची बीजे या मराठी नगरीत रुजवली. या परंपरेत मग संत नामदेव शिंपी, संत गोराकुंभार, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत तुकाराम असे विविध जातींचे संत झाले. यातून हे ज्ञान सर्व मानवजातीसाठी आहे याचा बोध झाला. नाथ परंपरेतील विविध संतांनी ग्रंथ रूपाने त्याचा विस्तार केला. आजही तो होत आहे व यापुढेही तो होत राहील. 

ज्ञानेश्‍वरांचे शिष्य देवनाथांचा शोध 
काळाच्या ओघात अनेक संतांची, ऋषींची कार्ये काळाच्या पडद्याआड गेली. त्यांचा शोध बोध घेण्याचा प्रयत्नही आजच्या काळातील संत घेत आहेत. कोल्हापुरातील दादा माधवनाथ सांगवडेकर यांनी संत ज्ञानेश्‍वरांचे शिष्य देवनाथ महाराज यांचा शोध घेतला. त्यांची पैठण येथील समाधी दादांनी शोधून काढली. त्यांनी देवनाथ महाराज यांच्यावर केलेल्या भक्तीतूनच हे शक्‍य झाले. 1990 मध्ये दादा माधवनाथ महाराज यांना देवनाथ महाराज यांनी दृष्टांत दिला. त्यानंतर त्यांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यांनी भक्तीतूनच देवनाथ महाराज यांचे चित्र जनार्दन सुतार यांच्याकडून रेखाटून घेतले. मधुकर कुलकर्णी (हंसगीत) यांच्याकडून देवनाथांच्या समाधी शोधासाठी दादांनी आरती लिहून घेतली. त्यांच्या या भक्तीतूनच पैठण येथे 2001 साली देवनाथ महाराज यांची समाधी त्यांना मिळाली. 

मंगलाचरणात उल्लेख 

पावसच्या स्वामी स्वरुपानंदांच्या मंगलाचरणातील पाचव्या ओवीमध्ये ज्ञानदेवांचे शिष्य देवनाथ महाराज असा उल्लेख सापडतो. 

ज्ञानदेव- शिष्य देव, चूडामणि । 
पुढे झाले मुनि गुंडाख्यादि ।। 5 ।। 


संत दासगणू व दादांनी सांगितलेला देवनाथांचा परिचय 
देवनाथ महाराज हे मूळचे गुजरातचे. बलसाड जवळच्या गावात ते राहात होते. त्यांचे नाव शिवदेव भगत असे होते. गिरनारची अंबा आणि द्वारकेचा कृष्ण हे त्यांचे कुलदैवत. देवनाथ यांचे आजोबा गोरक्षनाथांचे अनुग्रहीत होते. तर आई-वडील दोघेही शंकराचे भक्त होते. पण देवनाथ महाराज सात वर्षांचे असतानाच त्यांचे आई-वडील गेले. देवनाथ महाराज यांच्या मामांनी महाराष्ट्राच्या सीमेजवळील मुलीशी त्यांचे लग्न लावून दिले. पण देवनाथ कृष्णभक्तीत रमू लागल्याने त्यांचे मन संसारात रमेना. ते जगदंबेचे उपासक होते. जगदंबेने दिलेल्या दृष्टांतानुसार देवनाथ महाराजांनी आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वरांच्या समाधीस्थळी जाऊन साधना केली. माऊलीचा अनुग्रह मिळावा यासाठी त्यांनी एका पायावर उभे राहून अनुष्ठान केले. 21 दिवस अहोरात्र अनुष्ठान केल्यानंतर माऊली प्रसन्न झाली. त्यांनी अनुग्रह दिला व परंपरा पुढे प्रवाहित करण्याचा अधिकारही दिला. त्यांना ज्ञानेश्‍वरीही भेट दिली व नेवासा येथे जाऊन पारायण करण्यास सांगितले. देवनाथ महाराज यांनी संत ज्ञानेश्‍वरांची ज्ञानदानाची परंपरा पुढे चालवली. देगलूरच्या चुडामणी महाराज यांना अनुग्रह देऊन देवनाथ महाराज यांनी पैठण येथे समाधी घेतली. 

श्री भक्तिसारामृतमध्ये उल्लेख 
श्री संत दासगणू यांनी श्री भक्तिसारामृतात श्री सद्‌गुरु देवनाथ महाराज यांचे चरित्र लिहिले आहे. या चरित्रात त्यांनी देवनाथ महाराज यांनी समाधी कधी घेतली व त्यांची समाधी कोठे आहे याची माहिती नसल्याचे म्हटले आहे. 

सिद्ध देवनाथ । महादयाळू प्रज्ञावंत । 
तयां माझा दंडवत । वारंवार असो हा ।। 266 ।। 

यांचा समाधीकाळ मशी । ठाऊक नाही निश्‍चयेशी । 
वा तत्समाधीस्थलासी । मी न जाणे श्रोते हो ।। 267 ।। 


श्री भक्तिसारामृत अध्याय 10 वा 

पण सद्‌गुरु दादा महाराज सांगवडेकर यांनी भक्ती व साधनेतून 2001 मध्ये देवनाथ महाराज यांच्या समाधीचा शोध घेतला. गोदावरी नदीच्या तीरावर गणेशघाट, तारकेश्‍वर मंदिराजवळ, जुनानगर रोड, पैठण जि. औरंगाबाद येथे ही समाधी आहे. दादा महाराज यांचे शिष्य आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांनी देवनाथांच्या या समाधीचा जिर्णोध्दार केला असून तेथे आनंदभवन बांधण्यात आले आहे. 

पारायणातून भक्तिविस्तार 

ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या आदेशानुसारच देवनाथ महाराज यांनी ज्ञानेश्‍वरी परंपरेची शाखा पुढे चालवली. विस्तारासाठी देगलूरच्या चूडामणी महाराज यांना त्यांनी ज्ञानेश्‍वरी दिली. त्याचाही उल्लेख श्री भक्तिसारामृतच्या दहाव्या अध्यायात आहे. 

पूर्वेस देगलूर प्रांतात । चूडामणी माझा भक्त । 
आहे तो तू करून छात्र । संप्रदाय वाढवी ।। 262 ।। 

ज्ञानेश्‍वरी ही त्यास द्यावी । आमुची आठवण ठेवावी । 
वृत्ती अभेद असावी । सर्व ठाई राजसा ।। 263 ।। 


श्री भक्तिसारामृत अध्याय 10 वा 

700 वर्षांनंतर आजही ज्ञानेश्‍वरीच्या पारायणातून या ज्ञानाचा प्रसार-प्रचार होतो आहे. देवनाथ महाराज यांनी नेवाशात पारायण केले. पारायणातून त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. चुडामणी, गुंडा महाराज (देगलूर), रामचंद्र महाराज बुटी (नागपूर), महादेवनाथ महाराज (चिंचणी), रामचंद्र महाराज (विजापूर), विश्‍वनाथ महाराज (रुकडी), गणेशनाथ महाराज (बाबा वैद्य, पुणे), स्वामी स्वरुपानंद (पावस), गोविंदनाथ महाराज (रुकडी), दादा महाराज (कोल्हापूर) यांनी पारायणातून ब्रह्मसंपन्नता मिळवली. सामुदायिक ग्रंथ पारायणातून, वारीच्या माध्यमातून ही भक्ती परंपरा महाराष्ट्रात रुजवली जात आहे. या परंपरेने माणसाचे आचार-विचार घडवले आहेत. माणसातील माणूसकी टिकवून ठेवली. भक्तीच्या या परंपरेनेच खऱ्या अर्थांने माणुसकीची शिकवण दिली आहे. नराचा नरकासूर होऊ नये तर नारायण व्हावा हेच व्रत या भक्ती परंपरेने जोपासले आहे. सर्व विश्‍वाला हे ज्ञान हस्तगत व्हावे यासाठी ही भक्तीची पताका आजही फडकत आहे. गुरु-शिष्याची ही भक्ती परंपरा अनादि कालापासून अखंड भारत वर्षात सुरूच राहणार आहे. 

निष्कर्ष ः 
अनादि कालाच्या या परंपरेचा विस्तार हा भक्तितूनच होत आहे. भक्तितूनच ज्ञानाची प्राप्ती होते. योगाचा खडतर मार्गापेक्षा भक्तिचा सहज सोपा असा मार्ग अवलंबून आत्मज्ञानी व्हायला हवे. संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीच्या पारायणातून ज्ञान प्राप्तीचा मार्ग दाखवला आहे. या परंपरेचे आपणही स्वामी होण्यासाठी भक्तिचा हा मार्ग आत्मसात करायला हवा. आत्मज्ञानी सद्‌गुरूंच्या मार्गदर्शनाने आपणही आत्मज्ञानी व्हायला हवे व संतांचा हा वारसा पुढे चालवायला हवा. 

संदर्भ - 

1. विश्‍वपंढरी मासिक - ऑगस्ट 2014 अंक 8 वा, लेख - तपसाधना लेखक - संगीता सांगवडेकर पृष्ठ क्रमांक 8 ते 26, संपादक - राममाया कुलकर्णी 

2. श्रीमत संजीवनी गाथा - स्वामी स्वरुपानंद, लेखनकाल - शके 1867, पान नं. 1, प्रकाशक - देसाई बंधू पावस 

3. वानरगीता - मधुकर कृष्ण कुलकर्णी तथा हंसगीत, प्रकाशक - मुनींद्र विश्‍वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट, कोल्हापूर 

4. श्री भक्तीसारामृत अध्याय 10 वा - श्री संत दासगणु विरचित देवनाथ महाराज चरित्र, मुनींद्र सद्‌गुरू विश्‍वनाथ महाराज रुकडीकर स्मृतिग्रंथ 1993, पृष्ठ क्र. 123 ते 130, प्रकाशक - अध्यक्ष, अमृत महोत्सव स्मृतिग्रंथ समिती, श्री सद्‌गुरु विश्‍वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट, कोल्हापूर.