Saturday, December 12, 2015

चला पंचगंगा वाचवुया....

आज सकाळी पंचगंगा नदीवर सकाळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. एकदिवसाच्या या उपक्रमाने पंचगंगेचा घाट स्वच्छ झाला. याबाबत आता जनमानसात जागृतीची गरज आहे. राजकर्त्यांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणिव करुन देण्याची गरज आहे. यासाठी या निमित्ताने.....

भारतीय जनता पक्षाने सत्तेवर येण्यापूर्वी नद्यांचे प्रदुषण रोखण्याचे आश्‍वासन दिले होते. गंगा नदीची स्वच्छता सुरु झाली असेल पण देशातील इतर नद्यांचे काय? इतर नद्यांच्या प्रदुषणाबाबत सरकार कोणती भूमिका घेणार याबाबत अद्याप कोणतीच चर्चा होताना दिसत नाही. नद्यांच्या प्रदुषणात वाढच होत आहे. निवडणूकांपूर्वी आश्‍वासने द्यायची निवडणुका झाल्या की प्रश्‍नांकडे डोळे झाक करायची हा सर्वच पक्षांचा अजेंडा आहे. त्यात नवे काही नाही. कॉंग्रेस असो वा भाजप वा जनता दल हे सर्वच पक्ष आत्तापर्यंत हेच करत आले आहेत. सत्तेच्या राजकारणात हे पर्यावरणाचे प्रश्‍न मात्र गंभीर होत आहेत. देशातील जंगल नष्ट होत आहे. दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनाचा प्रश्‍न गंभीर होताना दिसत आहे. जंगलाचे क्षेत्र घटू लागल्याने वन्य प्राणी नागरी वस्त्यात आलेले पाहायला मिळत आहे. यात त्यांचा बळी जातोय. याबरोबरच शेतकऱ्यांचेही यामध्ये नुकसान होत आहे. पर्यावरणाच्या प्रश्‍नांकडे सरकारने गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. विदेशात जाऊन पर्यावरण संवर्धनाच्या गप्पा मारायच्या. चर्चा करायच्या, देशाचे नाव उंचावेल असे भाषण ठोकायचे. पण देशात येऊन काहीच करायचे नाही. हेच आत्तापर्यंत सर्वच पक्षाच्या राजकर्त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हेच करतील असे वाटत नसले तरी त्यांनी तसे करू नये यासाठी आपणच आता जागरुक होण्याची वेळ आली आहे. पत्रकारांनी जागल्याची भूमिका नेहमीच बजावायला हवी. राजकर्त्यांनी आश्‍वासने पाळावीत यासाठी पहारा देण्याचे काम करायलाच हवे. हे समाजकार्य वृत्तपत्रांनी करायला हवे. सौर उर्जेवर आंतरराष्ट्रीय उपक्रम राबविण्याचा पंतप्रधानांचा विचार उत्तम आहे. पण याबरोबरच देशात दिलेली आश्‍वासनेही पाळणे गरजेचे आहे. राजकर्त्यांच्या आश्‍वासनांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही. पर्यावरणाच्या प्रश्‍नांकडे राजकारण बाजूला ठेऊन पाहायला हवे. यासाठी सामाजिक संघटनांना बळकटी देण्याची गरज आहे. तरच देशातील नद्यांच्या प्रश्‍न मार्गी लागू शकेल. नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रत्येक नदीचा आराखडा तयार होण्याची गरज आहे. आता असे आराखडे शासकिय पातळीवर झालेही असतील पण त्याला लोक सहभागाने राबविण्यासाठी सरकारने पाऊले उचलायला हवीत. तरच देशातील नद्यात शुद्ध पाणी पाहायला मिळेल. अन्यथा वाढत्या लोकसंख्येने या प्रदुषणात भर होऊन मोठी गटारगंगा होण्यात वेळ लागणार नाही. लोकसहभागाने व राजकारण बाजूला ठेऊनच हे कार्य केल्यास देशातील सर्वच गंगा शुद्ध होतील. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष विचारात घेता त्याच्या शुद्धतेसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. धरणातील पाणी साठेही अशुद्ध होऊ शकतात. ठराविक वर्षांच्या कालावधीनंतर हे साठे वापरण्यायोग्य राहात नाहीत. यासाठी अशा साठ्यांच्या पुढील काळातील प्रश्‍नावरही विचार होण्याची गरज आहे. दुरदृष्टी ठेऊन विचार होण्याची गरज आहे. नेमके हेच होताना दिसत नाही. म्हणून पर्यावरणाच्या प्रश्‍नांचे आता राजकारण थांबवायला हवे. या प्रश्‍नाने आरोग्याचे प्रश्‍नही उभे राहात आहेत. यासाठी आता वेळीच तोडगा निघायला हवा. 

Friday, December 11, 2015

शेतकऱ्यांची नाडी जाणणारा राजा

माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त.....

माननिय शरद पवार यांच्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराबरोबरच भारताचे पहिले पंतप्रधान नेहरुंच्याही विचारांचा मोठा पगडा आहे. जवाहरलाल नेहरु यांनी म्हटले होते की सर्व काही थांबेल पण शेती कधीच थांबू शकत नाही. हेच त्यांचे विचार पवार यांना प्रभावित करत राहीले. त्यांनी शेतीवर अधिक भर दिला. त्यांच्या आचारात, विचारात एक शेतकरी दडला आहे. राजकारणामध्ये ते बोलतात एक आणि करतात एक असे जरी त्यांच्या विषयी म्हटले जात असले तरी शेतीमध्ये पवारसाहेब हे नेहमी जे बोलतात तेच करून दाखवतात. 

एकदा ते बोलता बोलता म्हणाले होते की लहानपणी ते स्वतः दौंडला जाऊन फळे, भाजी विकायचे. फळे, भाजीची विक्री करताना शेतकऱ्याला काय यातना होतात त्या त्यानी स्वतः अनुभवल्या आहेत. शेतकऱ्याच्या शेतमालाला दर मिळतो का? हे त्यांनी स्वतः अनुभवले आहे. ठेच लागल्यानंतरच शहाणपण येते. पवारसाहेबांनी त्यांच्या लहानवयातच हे कष्ट सोसले. त्यांना शेतकऱ्यांची दुःखे माहीत आहेत. त्यांच्या कृतीमध्ये त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर कळवळा दिसून येतो. या अनुभवातूनच शेतकऱ्यांसाठी त्यांनी विविध योजना राबविल्या. शेतकऱ्यांची आर्थिक नाडी जाणणारा माणूसच शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना राबवू शकतो. तशी योजना तयार करतो. विकास कसा साधायचा हे त्यालाच समजते. 
पवार यांच्या बारामतीमध्ये केवळ आठ इंचच पाऊस पडतो. जवळपास 70 टक्‍क्‍याहून अधिक जमीन ही कोरडवाहू आहे. दुष्काळी पट्ट्यात मोडते. असे असूनही या जिल्ह्यात बारा साखर कारखाने उभे आहेत. येथे पिकणारी द्राक्षे परदेशात पाठवली जातात. फळांच्या ज्यूसचे आंतरराष्ट्रीय बॅंड येथेच उत्पादीत केले जातात. अशा अनेक विकासाचे प्रकल्प याच पट्ट्यात आहेत. हे केवळ पवार यांच्यामुळेच शक्‍य झाले आहे. बारामतीच्या विकासाचा हा पॅटर्न देशभर गाजतोय. अनेकांना प्रेरणा देतोय. 
राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी पवार यांनी 90 च्या दशकात रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीची योजना आणली. फळझाडांच्या लागवडीसाठी 100 टक्के अनुदान जाहीर केले. कोरडवाहू पट्ट्यात यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. या योजनेचा लाभ घेत अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांनी फळबागा फुलविल्या. उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला. फळे विकली गेली नाहीत तर तो शेतकरी स्वतः फळे खाऊन जगू शकतो. उपाशी राहणार नाही. कुपोषण तरी थांबेल. या योजनेमागे हा दृष्टीकोन शरद पवार यांचा असावा. त्यांच्या या योजनेमुळे अनेक पडीक जमीनी लागवडीखाली आल्या. ओसाड माळरानावर डाळींबे, अंजीराच्या बागा फुलल्या. कोकणात आंबा, काजूच्या बागा फुलल्या. फळांचे उत्पादन तर वाढलेच. याशिवाय ग्रामीण भागात फळावर प्रक्रिया करणारे छोटे-मोठे उद्योगही उदयास आले. अल्पभूधारक शेतकरी बागायतदार झाला. शरद पवार यांनी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती माहीत असल्यानेच त्यांनी ही योजना आखली. शेतकरी काम करू इच्छितो. उत्पादन घेण्याचीही त्याची तयारी आहे. कष्ट करण्यासाठी तो मागेपुढे पाहात नाही. पण त्याच्याजवळ भांडवल नाही. फळबागा फुलवायच्या आहेत पण त्याच्या हातात पैसा नाही. शेतकऱ्यांची ही आर्थिक नाडी पवारसाहेबांनी ओळखली होती. भांडवल नसेल तर धंदा कसा उभा राहणार. पैसा नसेल तर शेतकरी काय करणार? शेतात तो बी पेरतो पण त्याला खत-पाणी देण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसा नाही. असा हा शेतकरी जमीनीत फळबागा कशा फुलविणार? हे शेतकऱ्यांचे दुःख शरद पवार यांनी ओळखले. त्याला भांडवल उपलब्ध करून दिले तर तो निश्‍चितच प्रयत्न करेल. यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शरद पवार यांनी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर फळबागा फुलविण्याची संधी दिली. पवारांच्या या योजनेने राज्यभरात पडीक रानावर फळबागा फुलल्या. झाडे लावा, झाडे जगवा पर्यावरण सुधारा असा प्रचारही येथे करण्याची वेळ आली नाही. पवार साहेबांची ही योजना पर्यावरणालाही साथ देणारी ठरली. या योजनेच्या सुरवातीनंतर अवघ्या सात-आठ वर्षात राज्यातील फळांचे उत्पादन झपाट्याने वाढले. कोकणातील व्यक्तींना ही योजना फारच लाभदायक ठरली. 
शरद पवार यांचे वैशिष्ठ म्हणजे ते योजना आणताना विकास डोळ्यासमोर ठेवतात. राजकारण बाजूला ठेवतात. योजनेतून राजकीय लाभ काय मिळेल हे पाहात नाहीत. त्यांच्या विकासाच्या प्रत्येक योजनेच्या कृतीत हा दृष्टीकोन पाहायला मिळतो. 
सध्याच्या राजकारण्यांचे दृष्टीकोन वेगळेच असतात. प्रथम ते स्वतःचा स्वार्थ पाहतात आणि मग इतरांचा विचार करतात. अशा या त्यांच्या वृत्तीमुळेच ते राजकारणात मागे पडत आहेत. दुरदृष्टीचा अभाव त्यांच्याकडे आहे. राजकारणी व्यक्ती आणि पुस्तके वाचण हे गणित तर आता दूरच राहीले आहे. नव्या पिढीतील किती राजकारणी पुस्तके वाचतात सांगा ना? पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमांना तरी ते हजर राहतात का? हा मोठा संशोधनाचा विषय होऊ शकतो. पुस्तके वाचत नाहीत तेथे लिखाण तर कोठे करणार? सध्याच्या तरूण राजकर्त्यांनी शरद पवार यांचा पुस्तक वाचनाचा छंद जरी जोपासला तरी ते राजकारणात तग धरून राहतील. अन्यथा पाच वर्षांचा कालावधीही ते पूर्ण करू शकतील का? याबाबत शंका वाटते. शरद पवार यांचा प्रत्येक गोष्टीचा गाढा अभ्यास आहे. यासाठी ते सतत विविध विषयांची पुस्तके वाचतात. जुन्या पिढीतील राजकर्त्ये व चळवळीचे राजकर्त्ये सोडले तर पुस्तक वाचन हा विषयच सध्याच्या तरूण राज्यकर्त्यांना माहीत नाही. चळवळीच्या व्याख्यांनाना आता वेगळेच स्वरूप त्यामुळे प्राप्त झाले आहे. अभ्यास नसल्याने बेताल वक्तव्ये केली जात आहेत. विकास हा विचारच त्यांच्या डोक्‍यात येत नाही. त्यांना केवळ स्वतःचाच विचार डोक्‍यात येतो. रस्त्याची योजना आहे ना? इतका निधी त्यासाठी मंजूर झाला आहे. ठिक आहे. निवडणुका सहा महिन्यात आहेत. सहा महिने टिकतीय अशा पद्धतीचे रस्त्ये तयार झाले तरी त्यांना चालते. सहा महिन्यानंतर निवडणूका जिंकल्यावर रस्तावरील खड्डे हे पुढच्या निवडणूकीच्या आधी सहा महिने बुजविले जातात. तोपर्यंत त्या रस्त्यांचे काहीही होऊ या राजकर्त्यांचा संबंधच नसतो. अशी विचारसरणी सध्याच्या नव्या पिढीतील राज्यकर्त्यांची आहे. योजनाही ते अशाच पद्धतीने राबवितात. नव्या योजनाही आखताना ते असाच विचार करतात. अशा या कृतीने विकास ठप्प झाला आहे. 
शरद पवार यांचे आदर्श या नव्या राजकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेऊन कार्य करायला हवे. जनचेचे दुःख जाणून घेऊन योजना आखायला हव्यात. जनतेच्या मतांची नाडी तपासून विकास होत नाही. जनतेच्या दुःखाची नाडी ओळखता यायला हवी. ही नाडी सापडली तरच त्यांच्या दुःखावर औषध देता येईल. पवारसाहेबांनी नाडी कशी तपासली हे त्यांच्याकडून जाणून घ्यायला हवे. शेतकऱ्यांची नाडी त्यांनी ओळखली म्हणूनच ते शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना राबवू शकले. त्यांच्या योजनांनी शेतकऱ्यांचा मोठा विकास झाला आहे. त्यांच्या कार्यकालात धान्य उत्पादन कित्येक पटींनी वाढले. धान्य साठविण्यासाठी गोदामे कमी पडली इतके धान्य उत्पादन झाले. शेतकरी समृद्ध झाला. देश समृद्ध झाला. धान्य उत्पादनाचे उच्चांक त्यांच्या कार्यकालात घडले आहेत. विकास हा असा करायचा असतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ या समस्यांनी ते डगमगले नाहीत. यासाठी त्यांनी विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांचे दुःख पुसण्याचे प्रयत्न केले. दुष्काळ दौरा करताना त्यांनी त्यांच्या प्रकृतीचीही काळजी कधी केली नाही. दुष्काळसाठी विशेष पॅकेज केंद्राकडून मिळावे यासाठी ते प्रयत्नशील राहीले. जगात सर्व उद्योग बंद पडू शकतात पण कृषी हा असा उद्योग आहे जो कधीही बंद पडू शकत नाही. हा उद्योग संपला तर या जगात माणूस जगूच शकणार नाही. यासाठी शेतीचा विकास हेच ध्येय पवारसाहेबांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेण्याची वक्तव्ये केली तरी शेतीतून निवृत्ती घेण्याचे वक्तव्य ते कधीही करणार नाहीत याची मला खात्री आहे. 

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, 157, साळोखेनगर, कोल्हापूर 416007 
र्ल ः 9011087406

Tuesday, December 1, 2015

कारदगा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

कारदगा हे कर्नाटकतील चिक्कोडी तालुक्यातील गाव. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागात असणाऱ्या या गावात मराठी भाषीकांची संख्या अधिक आहे. कर्नाटकात गेलो म्हणून काय झाले आम्हाला आमच्या मातृभाषेवर प्रेम आहे. कोठेही जाऊ कोठेही राहू पण मराठी आमची मायबोली आम्ही कायम ठेऊ हा निर्धार या गावच्या ग्रामस्थांनी केला आहे. यामुळेच या गावात गेली वीस वर्षे न चुकता साहित्य संमेलन होत आहे. यंदाही हे संमेलन झाले. या संमेलनास 89 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस उपस्थित होते. मराठीचा या गावात होणारा गजर पाहून ते भारावून गेले. ग्रामीण भागात मराठी विषयी असणारी आपुलकी आपलेपणा, मराठीचा हा बाणा पाहून मराठी किती समृद्ध आहे याचीच प्रचिती येथे येते. जात, पंथ, धर्म बाजुला ठेऊन सर्वचजण या व्यासपीठावर एकत्र येतात. मराठी भाषेबद्दल असणारे हे त्यांचे प्रेम पाहून कोणीही भारावून जाईल असेच येथील वातावरण असते. 
वारकरी संप्रदायाने मराठीची पताका उंच फडकावली. मग या संमेलनात वारकऱ्यांची आठवण होणार नाही असे घडणारच नाही. सकाळी काढलेल्या ग्रंथ दिंडीत वारकरी वेशात बालगोपालांचा सहभाग, तालात, सुरात त्यांनी केलेला मराठीचा गजर, भजन, कीर्तन मराठीची खरी ओळख करुन दिल्याशिवाय राहात नाही. नऊवारीत- सहावारीत नटलेल्या मुलींमधून मराठी संस्कृती विषयी असणारी आपली आपुलकी, मराठी विचाराशी असणारे आपले प्रेम ओसंडून वाहताना दिसत होते. पारंपारिक वाद्यांच्या गजरात महिलांच्या उत्स्पुर्त प्रतिसादात निघालेली ग्रंथदिडी सीमाभागात मराठीचा हा ताठर बाणा कायम राखेल असाचा विश्वास दाखवत होती. संमेलनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या दिंडीचे कौतुक करताना श्री. सबनीस म्हणाले बळीचे राज्य, बहुजन श्रमिकांचे राज्य आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम या दिंडीत पाहायला मिळाला. पण त्याचबरोबरच दुष्काळाची जाणीव करुन देणारे वास्तवाचे भानही पाहायला मिळाले. यावरून या गावाची वैचारिक, सामाजिक समृद्धता लक्षात येते. येथील ग्रामीण साहित्यात विठ्ठल आणि भक्ती केंद्रस्थानी आहे. धुमान साहित्य संमलेनाने संत नामदेवांना राष्ट्रीय पातळीवर नेले तर कारदगा संमेलनाने धर्मनिरपेक्षतेचे सूत्र बांधले.
सीमाभागात मराठीच्या गौरवाचा आदर्श इतर गावांनीही व महाराष्ट्राने घ्यायला हवा. मराठीच्या समृद्धीसाठी, मराठी संस्कृती जोपासण्यासाठी मराठी विषयीचे आपले प्रेम, आपुलकी कायम ठेवण्यासाठी अशा साहित्याच्या गावांना भेट द्यायला हवी. नेहमी यावे नेहमी नांदावे असे हे गाव मराठीचा एक वेगळा बाणा कायम ठेवत आहे याबद्दल संमेलन आयोजकांचे मनापासून आभार मानावेत असे वाटते.
श्री सबनीस सरांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात माझा कृषि ज्ञानेश्वरी या पुस्तकाचा गौरव केला शेणाला सोन्याचा भाव आला आहे इतके शेणाचे महत्त्व आहे जमीन उत्तम तर शेतकरी उत्तम हे ओळखून सेद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहनही त्यांनी केले ज्ञानेश्वरीतील शेती विषयक ओव्यावर आधारित या पुस्तकाचा गौरव केला याबद्दल सबनीससरांचे आभार मानायलाच हवेत
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
श्री अथर्व प्रकाशन, साळोखेनगर, कोल्हापूर

Saturday, November 28, 2015

फळझाडांनी माळरान झाले हिरवेगार

डॉ. प्रभू यांनी पंधरा एकरांवर फुलवली वनराई

निसर्ग आणि शेतीच्या प्रेमापोटी कोल्हापुरातील प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. संतोष प्रभू यांनी 25 वर्षांपूर्वी स्वकमाईतून करनूर (जि. कोल्हापूर) गावामध्ये शेती खरेदी केली. या जागेत वनस्पतींची जैवविविधता जोपासण्यासाठी डॉ. प्रभू यांनी पंधरा एकरांत वनराई उभारली. या ठिकाणी विविध फळझाडांची लागवड तसेच वनीकरण केल्याने परिसर हिरवागार झाला आहे.

राजेंद्र घोरपडे

सिमेंटच्या जंगलांनी डोळ्यांची रखरख वाढते. ही रखरख मनाचा आनंद हिरावून घेते. पण वृक्षांची हिरवळ त्याच डोळांना गारवा देते, मनाला नवी उभारी देते. आत्मिक शांती देते. यातून मनाला पर्यावरण संवर्धनाची आवड व छंद जडतो. कोल्हापुरातील प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. संतोष प्रभू यांनीही शेती आणि पर्यावरण संवर्धनाचा छंद जोपासला. निसर्गाच्या प्रेमापोटी डॉ. प्रभू यांनी 25 वर्षांपूर्वी स्व-कमाईतून महाराष्ट्र - कर्नाटक सीमेलगतच्या करनूर (ता. कागल, जि. कोल्हापूर) गाव शिवारात 22 एकर शेती खरेदी केली. या जागेत त्यांनी वनस्पतींची जैवविविधता जोपासण्याच्या उद्देशाने 15 एकरात वनराई उभारली. यामध्ये त्यांनी विविध फळझाडे, फुलझाडे, त्याचबरोबरीने सागवान, निलगिरीसह विविध उपयुक्त वनस्पतींची लागवड केली. उर्वरित सहा एकरांमध्ये ऊस आणि हंगामानुसार विविध भाजीपाला पिकांची लागवड केली जाते.
सुमारे वीस वर्षांपूर्वी कृषितज्ज्ञ डॉ. भवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रभू यांनी सुरवातीच्या काळात ऊस, केळी, भाजीपाला, फुलशेती लागवडीचे प्रयोग केले. काही क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीनेही पीक व्यवस्थापन केले. केळी, फुलशेतीमध्ये काटेकोर व्यवस्थापन लागते, सातत्याने पीक वाढीवर लक्ष द्यावे लागते. याचबरोबरीने विक्री व्यवस्था, बाजारपेठेतील चढ उतार पाहावे लागतात. मात्र डॉक्‍टरी व्यवसायातून याकडे त्यांना फारसे लक्ष देता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी केळी, फूलशेतीऐवजी फळबाग लागवड, वनशेतीकडे लक्ष दिले. शेतीचा व्यावसायिक दृष्टिकोन थोडासा बाजूला ठेवून आपल्या आवडीनुसार पिकांची निवड आणि लागवडीचे नियोजन त्यांनी केले. उपलब्ध लागवड क्षेत्राचा विचार करता त्यांनी फळबागेतून माळ परिसर हिरवागार करण्यावर भर दिला. केवळ एकाच प्रकारच्या फळपिकाची लागवड करण्याऐवजी विविध फळझाडांच्या लागवडीचे त्यांनी नियोजन केले. पहिल्या टप्प्यात शेतीचे नियोजन करताना दर शनिवारी डॉ. प्रभू कागलमधील शेती अधिकारी के. एल. पाटील तसेच कोल्हापुरातील कृषितज्ज्ञ श्री. दप्तरदार यांना सोबत घेऊन शेतावर जात. प्रत्यक्ष शेतावर शनिवार - रविवार तज्ज्ञांशी चर्चा करून नेमक्‍या कोणत्या पिकांची लागवड करायची याचे नियोजन त्यांनी केले. याचबरोबरीने परिसरातील शेतकरी तसेच कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांशीही संपर्क ठेवला. त्यातून नवनवीन माहिती त्यांना मिळत गेली.
सुमारे पंधरा एकरांवर विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, तसेच उपयुक्त वनस्पतींची लागवड डॉ. प्रभू यांनी केली आहे. याबाबत ते म्हणाले की, एखादी वनस्पती, फळझाड आवडले की ते मी लगेच आणून स्वतःच्या शेतात लागवड करतो. काही मित्रांनीदेखील विविध फळझाडे, फूलझाडांची रोपे भेट दिली आहेत. सध्या माझ्या शेतपरिसरात विलायती चिंच, आवळा, काजू, करवंद, जांभूळ, डाळिंब, तुती, नीरफणस, शेवगा याचबरोबरीने गुलमोहर, बहावा अशी विविध प्रकारची झाडे-झुडपे, फुलझाडे लावली आहेत. यातून शेतपरिसरात छोटे वन तयार झाले. सध्या माझ्या शेतात आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, पेरू अशी सुमारे तीनशेच्या वर फळझाडे आहेत. काही क्षेत्रांवर बांबू तसेच सागवानाची लागवड केली आहे. शेतीला निलगिरी आणि सुरूच्या झाडांचे कुंपण केले आहे. नफ्यातोटाचा विचार न करता या माळरानावर "ग्रीन स्पेस' तयार करण्यावरच माझा भर आहे.

कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फळबाग आणि वनशेती ः
फळबाग लागवडीबाबत डॉ. प्रभू म्हणाले की, मी पहिल्यांदा विविध फळझाडांची माहिती घेतली. त्यातील लागवड तंत्र समजावून घेतले. यासाठी मला दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. नाडकर्णी यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले होते. मुरमाड लाल मातीत लागवडीसाठी फळपिकांच्या नेमक्‍या कोणत्या जाती निवडाव्यात याची माहिती डॉ. नाडकर्णी यांनी दिली. त्यांच्या सल्ल्यानुसार मी वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्रातून नारळाची बाणावली, आंब्याची हापूस, रत्ना, पायरी, केसर या जातींची कलमे खरेदी केली. वनीकरणाची आवड असल्याने मी वेंगुर्ले आणि कागल येथील रोपवाटिकेतून सागवानाची रोपे खरेदी केली. आत्तापर्यंत हलक्‍या जमिनीत मी सुमारे चारशेच्या वर सागवानाची रोपे लावलेली आहेत. वनराईत मी सिट्रोनेलाची ठिकठिकाणी लागवड केली आहे.
शेतीच्या देखभालीसाठी मी शेतावर दोन कुटुंबे ठेवली आहेत. गेली दहा वर्षाहून अधिक काळ ते शेतीची देखभाल करत आहेत. शेतातून येणाऱ्या उत्पन्नातूनच शेतीसाठी लागणारा सर्व खर्च भागविण्याची जबाबदारी या कुटुंबावर मी टाकलेली आहे. यामुळे आता मला शेती व्यवस्थापनासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही. गरजेनुसार रोजंदारीवर मजूर घेऊन फळबागेला खते देणे तसेच गरजेनुसार शेती मशागतीची कामे केली जातात. शेतावरील या कुटुंबांनी गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या पाळल्या आहेत. यातून फळबागेला पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खत उपलब्ध होते. शेतीची सर्व देखभाल ही दोन्ही कुटुंबे पाहात असल्याने मला फारसे व्यवस्थापनात लक्ष द्यावे लागत नाही. त्यामुळे मी शेतीमधील नवीन लागवड प्रयोगाबाबत विचार करतो.

फळबागेत मोरांचा वावर
वाढत्या वसाहतवादाने गावपरिसरातही पक्ष्यांचा निवारा नष्ट झाला आहे. पक्ष्यांची संख्या घटत आहे. परंतु करनूर गावाच्या परिसरात डॉ. प्रभू यांनी तयार केलेल्या या वनराईत विविध पक्ष्यांना निवारा मिळाला. वनराईने नटलेल्या परिसरात वृक्ष्यांच्या गार सावलीमुळे पशुपक्ष्यांचा वावर वाढला. या वनात आता मोरही दिसू लागले आहेत. विविध प्रकारच्या पशुपक्ष्यांसाठी निवारा निर्माण केल्याचे एक वेगळेच समाधान डॉ. प्रभू यांना आहे.

कूपनलिका, विहीर पुनर्भरणाने शाश्‍वत पाणी
शेतीला बारमाही पाण्याचा पुरवठा असेल तरच बागायती शेती करणे शक्‍य होते. याचा विचार करून पाण्याच्या सुयोग्य वापराचे नियोजन डॉ. प्रभू यांनी केले. माळ जमीन असल्याने डॉ. प्रभू यांना उन्हाळ्यात फळबाग आणि वनशेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवत होती. यावर मात करण्यासाठी डॉ. प्रभू यांनी विहीर पुनर्भरणाचा प्रयोग केला. त्यांच्या शेतातून ओढा जातो. या ओढ्याला पावसाळ्यात पाणी असते. हे पाणी डॉ. प्रभू यांनी विहीर आणि कुपनलिकेमध्ये सोडून पुनर्भरणाचा प्रयोग केला. गेल्या काही वर्षात सातत्याने जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी मुरल्याने शेत परिसरातील भूजलाचा स्तर वाढून उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर त्यांना मात करता आली. उपलब्ध पाण्याच्या योग्य वापरासाठी त्यांनी फळबागेत ठिबक सिंचन केले आहे. फळझाडे आणि वनीकरणामुळे उन्हाळ्यातही शेतीचा परिसर हिरवागार झाला आहे.

मित्र आणि कर्मचाऱ्यांना फळांचे वाटप
फळबागेतून डॉ. प्रभू यांना आंबा, चिकू, नारळ, काजू या फळांचे उत्पादन मिळते. शक्‍य होईल तितक्‍या फळांची विक्री कागलच्या बाजारपेठेत केली जाते. शेतातील सर्वच फळांची विक्री देखभालीसाठी ठेवलेल्या कुटुंबाना गावातच करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे जास्तीच्या फळांचे मोफत वाटप डॉ. प्रभू कोल्हापूरातील मित्र परिवार तसेच स्वतःच्या हॉस्पिटलमधील दोनशेच्या वर कर्मचाऱ्यांना करतात.

सौर ऊर्जेचा वापर
डॉ. प्रभू यांनी कोल्हापूर शहरातील हॉस्पिटलच्या परिसरात छोटीशी बाग फुलवली आहे. या बागेस पाण्याचा व खतांचा योग्य वापर होण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसवली आहे. ही यंत्रणा सौर ऊर्जेवर कार्यरत आहे. निसर्गातील उपलब्ध शक्तीचा पुरेपूर वापर करून नैसर्गिकरीत्या हिरवळ निर्माण करण्यावरडॉ. प्रभू यांना विशेष रस आहे.

संपर्क ः डॉ. संतोष प्रभू ः 0231-2644881 

Monday, November 2, 2015

मराठी पाऊल पडते पुढे....

'रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे' इतकी टोकाची भूमिका बेळगावच्या युवकांनी घेतली आहे. एक नोव्हेंबर हा दिवस कर्नाटकातील मराठी भाषिक काळा दिवस म्हणुन पाळतात. काळ्या दिनाच्या निमित्ताने ही युवाशक्ती एकवटली. बेळगावसह 865 मराठी बहुल गावे महाराष्ट्रात यायला हवीत यात दुमत नाही यासाठी अनेक शहिदही झाले आहेत हा प्रश्न आता सर्वोच्य न्यायालयात आहे सर्वानाच या प्रश्नाच्या निकालाची उत्सुकता आहे. आता हा प्रश्न चिघळु नये याची दखल घ्यायला हवी. कानडी लोक मराठीचा द्वेश करतात असेही नाही तसे असते तर राज्योत्सवाच्या मिरवणुकीत शांताबाईचा ठेका कानडींनी धरला नसता यापुर्वीही शिंदे बंधुंच्या पोपटाने कानडी लोकांना नाचवले आहे याचा विचार करुन मराठी लोकांनी आता आंदोलनाची दिशा ठरवायला हवी. मराठी माणसाने गनिमी काव्यानेच युद्धे जिंकली आहेत हा इतिहास लक्षात ठेवायला हवा आंदोलनाच्या रणनितीत मात्र याचा अभाव दिसतो. नुसते पेटुन उठणे हा मराठी बाणा नव्हे. मराठीची छाप पडेल असे कार्य व्हायला हवे. आमच्यावर अन्याय होतो म्हणुन रडायचे हे मराठी मानसाला शोभणारे नाही अश्रु हे कोणाचे लक्षण आहे हे तरी धान्यात ठेऊन यापुढे मराठीचा खराखुरा बाणा दाखवायला हवा तशी तयारी आता ठेवायला हवी. एकवटलेल्या युवाशक्तीची ताकद आता मराठीची गुढी सीमाभागात कशी उभारेल हेच आता पहायला हवे. चला तर मग मराठीच्या पताका उंच फडकवुया
- राजेंद्र घोरपडे

Saturday, August 22, 2015

शेती म्हणजे उत्साहाचे टॉनिक

कोल्हापूरातील निहाल शिपूरकर यांनी प्रिटिंग प्रेसचा व्यवसाय सांभाळत आवडीतून शेतीकडेही लक्ष दिले आहे. जमीन, पाणी, खताचे योग्य व्यवस्थापन करीत त्यांना अडसाली उसाचे एकरी 60 टन उत्पादन मिळते. सुटीच्या दिवशी शेतात दिवसभर राहिल्याने कामाचा थकवा जातो, मनाला उत्साह मिळतो. त्यामुळे व्यवसायाबरोबरीने शेतीचीही प्रगती होते, असा त्यांचा अनुभव आहे.

राजेंद्र घोरपडे

कोल्हापूर शहरात निहाल सुरेश शिपूरकर यांचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. वडिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय आता निहाल सांभाळतात. निहाल यांचे वडील सुरेश शिपुरकर हे निसर्गप्रेमी. शेती, पर्यावरण संवर्धनासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. प्रत्यक्ष कृतीतून, अनुभवातून समाज प्रबोधन हा त्यांचा आदर्श आहे. सन 1982 मध्ये त्यांनी सुरू केलेली निसर्गमित्र ही संस्था आजही चांगल्याप्रकारे कार्यरत आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी विविध प्रयोग सुरू असतात. याच आवडीतून त्यांनी मित्रांसोबत कोल्हापूरपासून आठ किलोमीटरवरील पाचगावमध्ये दीड एकर शेती खरेदी केली. सुरवातीची काही वर्षे भागाने शेती केली, परंतु, प्रिंटिंग प्रेसच्या व्यवसायातून त्यांना शेतीकडे पाहण्यास पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे पंधरा वर्षे ही जमीन तशीच पडून होती.
निहाल यांनी सन 2007 मध्ये घरची जमीन विकण्यापेक्षा टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला. तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील उद्यानपंडित बाळासाहेब चव्हाण हे निहाल यांचे सासरे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निहाल यांनी शेती करण्याचे ठरवले. निहाल यांचे मेहुणे प्रयोगशील शेतकरी विश्‍वास चव्हाण यांनीही त्यांना शेतीच्या नियोजनासाठी सहकार्य केले. व्यवसाय सांभाळून शेती करणे तितके सोपे नाही, हे निहाल यांना ठाऊक होते. पण जिद्द आणि आवड असेल तर कोणत्याही कामात यश निश्‍चित मिळते, यावर विश्‍वास असल्याने त्यांनी योग्य नियोजनातून शेती किफायतशीर करण्याचा प्रयत्न सुरू केला.

शेती विकासाच्या दिशेने...
सुरवातीला निहाल शिपुरकर यांनी शेती भागाने लावण्याचा विचार झाला. शेतावर घर बांधून तेथे शेती नियोजनासाठी कुटुंब ठेवण्याचाही प्रयत्न केला. परंतु, या कुटुंबाने वर्षाला 75 हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे हा विचारही मागे पडला. त्यानंतर मात्र निहाल यांनी स्वतःच शेतात उतरण्याचा निर्णय घेतला. पीक व्यवस्थापनाची निहाल यांना पुरेशी माहिती नव्हती, परंतु, अभ्यास आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्याने त्यांनी शेतीचे नियोजन केले. त्यानुसार 2007 मध्ये त्यांनी शेती करण्यास प्रारंभ केला. निहाल यांची माळजमीन होती. या ठिकाणी केवळ गवतच उगवायचे. पीक लागवडीच्या दृष्टीने निहाल यांनी सुमारे दीड लाख रुपये खर्चून जमिनीचे सपाटीकरण केले. जमीन लागवडीस योग्य केली. शेतातच छोटेसे घर उभारले. या सर्व सोयीसुविधांसाठी निहाल यांनी तीन लाख रुपये खर्च केले. पिकाला पाणी द्यायचे तर शेतावर वीज हवी. वीजेच्या जोडणीसाठी पाच खांब टाकून त्यांनी वीज जोडणी केली. यासाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च झाले. वीज जोडणीची परवानगी मिळविण्यासाठी वीज मंडळाकडे चकरा माराव्या लागल्या. मोठा संघर्षही त्यांना करावा लागला. नंतर मात्र एका योजनेअंतर्गत हा खर्च त्यांना परत मिळाला. निहाल यांच्या शेतात पूर्वी एक कूपनलिका खोदलेली होती. यास पाणी कमी असल्याने त्यांनी ठिबक सिंचनावर शेती करण्याचा निर्णय घेतला. सध्या निहाल एकूण अडीच एकराचे नियोजन करीत आहेत.

ठिबकमुळेच शेती शक्‍य
सध्या अडीच एकरापैकी दोन एकरावर ऊस लागवड आहे. संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन केले आहे. अडीच एकराला पुरेसे पाणी मिळण्यासाठी शेताचे भाग केले आहेत. प्रत्येक भागाला जास्तीत जास्त चार तास पाण्याचा पुरवठा केला जातो. हिवाळ्यात पाणी कमी लागते. त्या वेळी तीन तास पाण्याचा पुरवठा केला जातो. एकावेळी तीन भागांना पाणी दिले जाते. ठिबकने पाणी द्यावे लागत असल्याने फक्त मोटर चालू-बंद करणे इतकेच काम असते. त्यासाठी एका मजूर त्यांनी नेमला आहे. यासाठी मजुराला महिना पाचशे रुपये दिले जातात. इतरवेळी परिसरातील शेतकऱ्यांच्या बरोबरीने चर्चा करून पिकाच्या गरजेनुसार कामापुरते मजूर घेतले जातात.

शिफारशीनुसार पीक नियोजनावर भर ः
  • सध्याच्या काळात पुरेसे शेणखत उपलब्ध होत नाही. त्यामुळे शिपूरकर मळीपासून तयार करण्यात आलेले सेंद्रिय खत जमीन तयार करताना मिसळतात. 
  • सध्या अडीच एकरापैकी दोन एकरावर उसाच्या को-86032 या जातीची लागवड आहे. लागवड एक एकर आणि एक एकर खोडवा आहे. साडेतीन फुटाची सरी करून ऊस लागवड केलेली आहे. एक आड एक सरीतून ठिबक सिंचनाची लॅटरल टाकली आहे. दहा गुंठ्याची मिश्र फळबाग आहे. 
  • अडसाली ऊस व खोडव्यास रासायनिक खताची मात्रा ठिबक सिंचनाने दिली जाते. तज्ज्ञांच्या सल्यानुसार निहाल यांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये व विद्राव्य खतांचे नियोजन केले आहे. त्यानुसार खते वेळेवर दिली जातात. 
  • ऊस लागवड करताना निहाल यांना सुरवातीच्या टप्प्यात अधिक खर्च करावा लागला. वाढता खर्च कमी करण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले आहेत. ठिबक सिंचन करताना खते देण्यासाठी त्यांनी व्हेंच्युरीऐवजी जयसिंगपूर येथील प्रयोगशील शेतकरी श्री. मोटके यांनी विकसित केलेली विद्राव्य खत देण्यासाठीची यंत्रणा वापरली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून अगदी सुलभ व सहजरीत्या खते पाण्यात मिसळतात. गेल्या सात वर्षांहून अधिक काळ निहाल ही यंत्रणा वापरत आहेत. 
  • जमिनीत दरवर्षी पुरेशी शेणखताची मात्रा देणे शक्‍य नसल्याने निहाल यांनी पाचट कुजविण्यावर भर दिला आहे. उसाचा पाला ते कधीही काढत नाहीत, पाला शेतात जाळतही नाहीत. एक सरी आड पाचट शेतात पसरून गाडले जाते. यामुळे जमीन भुसभुशीत आणि सुपीक झाली आहे. याचा ऊस उत्पादनासाठी फायदा होत आहे. 
  •  निहाल यांना अडसाली उसाचे एकरी सरासरी 60 ते 65 टन उत्पादन मिळते. खोडव्याचेही 45 ते 50 टनापर्यंत उत्पादन मिळते. यातून खर्च वजा जाता वर्षाला एक लाख रुपये मिळतात. 
  • दर सोमवारी निहाल शिपुरकर यांच्या प्रिंटिंग प्रेसला सुटी असते. त्या वेळी ते दिवसभर शेतावर जाऊन मजुरांच्या साहाय्याने पुढील एक आठवड्याचे नियोजन करतात. परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा करतात. शेती कामाच्या गरजेनुसार काही वेळा पहाटे लवकर शेतावर जावे लागते. शेतातील काम उरकून ते पुन्हा नऊ वाजता प्रेसमध्ये हजर रहातात. 

"ऍग्रोवन' ठरला दिशादर्शक
शेती करताना अनेक प्रश्‍नांची उत्तरे निहाल यांना "ऍग्रोवन'मधूनच मिळाली. "ऍग्रोवन'मधील पीक निहाय माहितीचा त्यांनी संग्रह केला आहे. "ऍग्रोवन'मधील तांत्रिक लेख आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथेमधून पीक व्यवस्थापनाचे गणित समजते, असे निहाल सांगतात. येत्या काळात निहाल यांनी सागवान आणि बांबू लागवडीचे नियोजन केले आहे.

परसबागेत रमते कुटुंब
निहाल शिपुरकर यांनी शेतावरील घरासमोर दहा गुंठे जागेत तसेच बांधावर नीरफणस, आंबा, केळी, नारळ अशा 30 फळझाडांची लागवड केली आहे. परसबागेत हगांमनिहाय दोडका, अळू, कोथिंबीर, विविध वेलीवर्गीय फळभाज्यांची लागवड ते करतात. या परसबागेतून हंगामानुसार घरापुरता भाजीपाला आणि ताजी फळे मिळतात. कुटुंबातील सदस्य परसबागेत आनंदाने काम करतात. याचा एक वेगळाच आनंद असतो. पत्नी तनुजा यांचीही शेती नियोजनात मदत मिळते.

संपर्क ः निहाल शिपूरकर, 9011169691



Tuesday, July 14, 2015

रानभाज्यांची चवच न्यारी....

पूर्वीच्या काळी शेतीत नुकसान झाले तर शेतकरी कधी खचत नव्हते. समस्यांना तोंड देण्यासाठी ते नेहमीच तत्पर असत. विविध पर्यायही त्यांनी यासाठी योजले होते. पावसाळ्यात अती पावसामुळे बऱ्याचदा नुकसान होई. अशा परिस्थितीत काय खायचे हा मोठा प्रश्‍न असायचा? विशेषतः पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले तर मोठी समस्या भेडसावत होती. जेवनात भाजी नसेल तर जेवन खाणार काय? दरवर्षीच ही समस्या भेडसावत असे. नेहमीच भेडसावणाऱ्या या समस्यावर त्यांनी विविध उपायही योजून ठेवले होते. उन्हाळ्यातच मुरांबे, पापड, शेवया तयार करून पावसाळ्यात गरजेच्या वेळी त्या उपयोगात आणत असत. उपासमारीवर केलेली त्यांनी उपाययोजना खरचं त्यांच्या कामातील दूरदृष्टी दाखवते. शेतात सर्व भाजीपाला नुकसान झाला तरी ते कधी खचून जात नसत. अशा काळात ते पातरी, घोळ आदी पेरणी न करता उगवणाऱ्या राणभाज्यांचा वापर ते करून जीवन जगत असत. कोणत्याही गोष्टीची ते तमा बाळगत नसत. प्राप्त परिस्थितीशी धैर्याने ते सामोरे जात असत. मानसिकता ढळू देत नसत. यामुळेच पूर्वीच्या काळी आत्महत्या होत नसत. आता आपण मात्र वेगळीच प्रतिष्ठा जपत आहोत. तणे भाज्या म्हणून खाण्यात आपणास कमीपणाचे वाटते. पण त्याची पौष्टीकता कधी आपण विचारातच घेतली नाही. पूर्वीच्याकाळी हेच खाऊन ते धष्टपुष्ट जीवन जगत होते हा विचारच आपल्या मनात येत नाही.
यासाठी आता या राणभाज्या आपल्या भोजनात कशा येतील याचा विचार आपण करायला हवा. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
पर्वाच कोल्हापूरातील "निसर्ग मित्र'ने राणभाज्याचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्याला भेट देण्याचा योग आला. तेथे त्यांनी विविध पाककृती तयार करुन ठेवल्या होत्या. त्यात नीरफणसापासून तयार केलेली पाककृतीही होती. इतकी सोपी पाककृती आहे. हे समजल्यावर तर आश्‍चर्यच वाटलं. विशेष म्हणजे याचा स्वाद उत्कृष्ट होता. आपल्या आसपास इतकी फळे आहेत पण त्यांचा स्वाद आपण कधी घेत नसतो. हेही यावेळी माझ्या लक्षात आले. यासाठी राणभाजांचा अभ्यास आपण करायलाच हवा.

नीरफणसापासूनची पाककृती
नीरफणसाचे काप तयार करून घ्यायचे. या कापास हळद, रवा, तिखट, मीठ, हिंग पावडर लावून हा काप तव्यावर तेलात दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावा. इतका स्वादिष्ट पदार्थ आहे, हे खाल्ल्याशिवाय आपणास कसे लक्षात येईल. यासाठी याचा आस्वाद घ्याच.

ओव्याच्या पानाची भजी
आता तेथे जाऊन भाज्यांचा आस्वाद घेतल्यावर स्वतः करण्याचा मोह होणार हे निश्‍चितच? तेथेच समजले. ओव्याची जाड पाने भजीमध्ये वापरुन भजी करता येतात. घरात परसात ओव्याचे रोप आहे. त्याला आलेली पाने तोडून भजी करून पाहिली. अप्रतिम झाली. त्या पानांचा स्वाद त्या भज्यामध्ये उतरतो. त्यामुळे भजी स्वादिष्ट होतात. आता ही सुद्धा भजी तुम्ही करून बघाच.....

Saturday, June 27, 2015

"निसर्ग मित्र' जपतेय पर्यावरण संवर्धनाचा वसा

कोल्हापुरातील "निसर्ग मित्र' ही संस्था प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करीत आहे. यामुळे प्रबोधन होतेच, त्याचबरोबरीने पर्यावरण संवर्धनाला हातभारही लागतो. ग्रामीण आणि सांस्कृतिक वसा जपत या संस्थेने गाव परंपरेचा अभ्यास करत त्या जपल्या जाव्यात, यासाठी राबविलेले उपक्रम ग्रामविकासाला मार्गदर्शक आहेत. 

राजेंद्र घोरपडे

सन 1980 च्या प्रारंभी पक्षी निरीक्षण, जंगल भ्रमण, वृक्षारोपण, परसबाग आदींच्या छंदातून कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील व्यक्ती एकत्र आल्या. यात अनेकांनी पर्यावरणाच्या संवर्धनाचा विचार मांडला. यातूनच "निसर्ग मित्र' या संस्थेची संकल्पना सुचली. सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, डॉ. सुभाष आठले यांनी 1982 मध्ये ही संस्था स्थापन केली. या संस्थेमध्ये डॉ. जय सामंत, वसंतराव शिरगावकर, डॉ. पुष्पा बेर्डे, वनस्पती तज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन, डॉ. विजय करंडे, आदम मुजावर, शेखर पडळकर आदींचा सहभाग होता. सन 1998 मध्ये डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुणांनी निसर्ग मित्रतर्फे विविध उपक्रम सुरू केले. संस्थेतर्फे रंकाळा बचाव, पंचगंगा प्रदूषणाबाबत जागृती, सह्याद्री बचाव, पर्यावरणपूरक गणपती उत्सव, वृक्ष दत्तक उपक्रम, नैसर्गिक रंग निर्मिती प्रकल्प, देवराया वाचविण्यासाठी मोहीम आदी विविध चळवळी राबविल्या जातात. अशा विविध उपक्रमांतून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली जाते. केवळ गप्पा नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून प्रबोधन हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. या संस्थेमध्ये कोल्हापूर महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती, जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन समिती, हरितसेना, कोल्हापूर जिल्हा बांबू मिशन हे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

रानभाज्यांचे बीजसंवर्धन ः
पावसाच्या पाण्यावरच रानभाज्या येतात. पण केवळ पावसावर रानभाज्या येतात की त्याची लागवडही केली जाऊ शकते, याबाबत निसर्ग मित्रतर्फे विविध प्रयोग सुरू आहेत. यासाठी परसबाग कार्यशाळा संस्थेतर्फे घेण्यात आली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या 30 कुटुंबांना 30 प्रकारच्या रानभाज्यांचे बियाणे देण्यात आले. भारंगी, टाकाळा, काटेमाठ, राजगिरा, कुरडू, घेटूळी (पूनर्नवा), वाघाटी, केना, आघाडा, तांदळी, वायवर्णा, चांगेरी (आंबुशी), रानउडीद, घोळ, भोकर, गुळवेल आदी रानभाजांचा यामध्ये समावेश आहे. या भाजांची लागवड परसबागेत, टेरेसवर करून त्याचे उत्पादित बीज इतर 29 कुटुंबांना वाटले जाते. जेणेकरून सर्वांकडे या रानभाज्यांच्या बीजाचे संवर्धन होते. बचत गटाच्या माध्यमातूनही रोपवाटिका करून रानभाज्यांच्या बीजसंवर्धनाचेही संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.

देशी वृक्षांचे बीज संकलन
वसुंधरा दिनाच्या निमित्ताने (22 एप्रिल) दरवर्षी वनौषधी बिया, स्थानिक पारंपरिक जातीची बियाणे जमा करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येते. बेल, शेंद्री, जांभूळ, बकुळ, कडिपत्ता, रिठा, सीताअशोक, जारुळ, बहावा, पारिजातक, सोनचाफा अशा विविध सुमारे 40 प्रकारच्या वृक्षांचे बीज गोळा केले जाते. बीज गोळा करण्याबाबत शास्त्रीय माहिती संस्थेतर्फे देण्यात येते. यंदाच्या वर्षी सुमारे तीन लाख बिया गोळा झाल्या. या बिया विविध गटांमध्ये वाटून त्याची रोपे तयार करण्यात आली. उर्वरित बियाणे सामाजिक वनीकरण विभागाकडे संवर्धनासाठी दिले जाते. या उपक्रमातून स्थानिक जैवविविधता जोपासली जात आहे.

नैसर्गिक रंगाची निर्मिती
रंगपंचमीमध्ये नैसर्गिक रंग वापरले जावेत, यासाठी त्यांची निर्मिती आणि प्रबोधन संस्थेतर्फे केले जाते. संस्थेने पळस, काटेसावर, पांगिरा, बेल, पारिजातक, बहावा, मेहंदी, शेंद्री, हिरडा, बेहडा, झेंडू, गुलाब, खैर, नीलमोहर, जास्वंद अशा 23 झाडांचा अभ्यास केला. यांच्या फुलापासून नैसर्गिक रंगही तयार केले. निर्माल्यातून तसेच हार विकणाऱ्यांच्याकडून टाकाऊ फुलातूनही नैसर्गिक रंग तयार करण्यात आले आहेत. वनस्पतीजन्य रंग निर्मितीसाठी आदर्श बचत गटाच्या माध्यमातून हे काम हाती घेतले आहे.

सौरऊर्जेवर चूल
संस्थेचे सदस्य पराग केमकर यांनी सौरऊर्जेच्या चुलीचे विविध प्रकार तयार केले आहेत. गिफ्ट पेपर आणि पुठ्ठ्याच्या मदतीने ही सौर चूल करता येते. या सौर चुलीसाठी अन्न शिजविण्यासाठी दोन डबे लागतात. साधारणपणे पाचशे रुपयांत ही चूल तयार होऊ शकते. गिफ्ट पेपरऐवजी रेडियम पेपर व फायबरचा पुठ्ठाही वापरून टिकाऊ चूल तयार करता येऊ शकते. सौर चूल तयार करण्यासाठी साधनसामग्रीनुसार सुमारे 100 ते 1200 रुपये खर्च येतो. वर्षातील दोनशे दिवस ही चूल वापरून खाद्यपदार्थ शिजविता येतात. यामुळे सिलिंडरचा खर्च वाचतो, पर्यावरणाचे संरक्षण होते. ही चूल फ्लोडिंगची असल्याने कोठेही नेता येऊ शकते. प्रकाशवर्षाच्या निमित्ताने या चुलीचा प्रसार करण्याचे कार्य निसर्गमित्र संस्थेने हाती घेतले आहे. ही चूल तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाते. आत्तापर्यंत सुमारे सातशे जणांनी ही सौर चूल तयार करून वापरही सुरू केला आहे.

संस्थेचे विविध उपक्रम ः
  •  दिवाळीत प्रदूषण रोखण्यासाठी फटाके उडवू नका? हा संदेश दिला जातो. तसेच या सुटीमध्ये फटाके न उडविणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी निसर्ग सहलीचे आयोजन केले जाते. फटाक्‍यांवर होणाऱ्या वायफळ खर्चातून ही सहल होते. 
  • जलप्रदूषण रोखण्यासाठी नैसर्गिक रंगाने रंगविलेल्या शाडूच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याचा उपक्रम गेल्या 12 वर्षांपासून संस्था राबवीत आहे. 
  • "कचरा व्यवस्थापन' याविषयी जागृती करण्यासाठी शिवछत्रपती यांच्या कचराविषयीच्या आज्ञापत्राची आकर्षक पत्रके करून शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे, तरुण मंडळे यांना देऊन प्रबोधन केले जात आहे. 
  • कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण. 
  • कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती आणि खतनिर्मितीबाबत मार्गदर्शन. 

देवराया वाचवूया उपक्रम ः
संस्थेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील देवराया संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यासाठी जिल्ह्यातील 250 च्यावर देवरायांचा अभ्यास संस्थेने केला. या देवरायांची वैशिष्ट्ये जाणून घेतली. देवराईमध्ये असणाऱ्या जैवविविधतेची माहितीही स्थानिकांना दिली जाते. "देवराया वाचवूया, श्रद्धावने तयार करूया' या उपक्रमाअंतर्गत देवरायातील वृक्षांचे बी गोळा केले जातात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या रोपांची लागवड परिसरात केली जाते. भारतीय संस्कृतीतील विविध सणांसाठी लागणारे वड, आपटा, बेल, कडुलिंब आदी वृक्षांची लागवड केली जावी, यासाठी प्रबोधनाबरोबरच प्रयत्नही केले जातात.

वैशिष्ट्यपूर्ण देवराया ः
  • पाल देवराई ः भुदरगड तालुक्‍यातील पाल येथील देवराईमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. येथील वृक्षांचा विस्तार मोठा असल्याने परिसरात गारवा राहतो. या वृक्षांच्या डोलीत घुबड, वेडाराघू, ससाणे, दयाळ आदी पक्षांचे वास्तव्य आहे. 
  • आंबेश्‍वर देवराई ः शाहूवाडी तालुक्‍यातील आंबा येथे पाच एकरांत ही देवराई आहे. येथे कासा, सोनचाफा, आंबा, पिंपर्णी, वड, किंजळ, बांबू, सातवीण, कदंब, कुंकुफळ असे विविध वृक्ष आहेत. ही देवराई वनौषधीने बहरलेली आहे. 
  • कुरकुंभेश्‍वर देवराई ः यात्रेमध्ये कोंबडे देण्याची प्रथा अनेक गावांत असते. पण आजरा तालुक्‍यातील पेरणोली येथील करकुंभेश्‍वर देवराईमध्ये मात्र जिवंत कोंबडे सोडण्याची प्रथा आहे. या देवराईमध्ये असणाऱ्या वन्यप्राण्यांना खाद्य म्हणून गावकरी कोंबडे सोडतात. वन्यप्राणी भक्षासाठी गावात प्रवेश करू नयेत, हा या मागचा हेतू आहे. 

शेवगा महोत्सव ः
शेवगा खाल्ल्याने क्षारधर्म वाढतो. यासाठी पावसाच्या सुरवातील शेवग्याची भाजी खावी असे शास्त्र आहे. याबाबत प्रबोधनासाठी दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात (मृग नक्षत्राच्या प्रारंभी) शेवगा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये शेवग्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखवली जातात. शेवग्याचे सूप, भजी, कढी, आमटी, वडी, थालीपीठ, झुणका, शेवगा फ्राय, चटणी, कटलेट, अशा विविध 63 प्रकारच्या पाककृती या महोत्सवात दाखविल्या जातात.


संपर्क ः 9423858711 अनिल चौगुले (कार्यवाह, निसर्ग मित्र)



Saturday, June 6, 2015

आनंद'दायी शेतीतून मिळतेय समाधान

शहरातील धकाधकीच्या जीवनात आनंदासाठी आठवड्यातून एकदा तरी निसर्गाच्या सान्निध्यात जावे, असे सर्वांनाच वाटते. पर्यटन केंद्रावर जाण्यापेक्षा घरच्या शेतावरच जाऊन निसर्गाचा आनंद का घेऊ नये? या उद्देशाने कोल्हापूरातील डॉ. आनंद गुरव यांनी वडिलोपार्जित शेतीशी नाते जोडून घेतले. यामुळे दैनंदिन कामातून थकवा दूर होतो आणि काही प्रमाणात उत्पन्नही मिळते.
राजेंद्र घोरपडे

कोल्हापूर शहरातील रंकाळा रोडवर डॉ. आनंद गुरव यांचा दवाखाना आहे. डॉ. गुरव हे बालरोगतज्ज्ञ असून, 2005 मध्ये त्यांनी कोल्हापुरात दवाखान्यास सुरवात केली. गगनबावडा तालुक्‍यातील असंडोली हे डॉ. गुरव यांचे मूळगाव. वडिलोपार्जित शेतीतील चार एकर शेती डॉ. आनंद यांच्या वाट्याला आली. घरची शेती विकली तर गावाशी असलेली ओळखच नाहीशी होईल, या हेतूने त्यांनी स्वतःची शेती जोपासण्याचा निर्णय घेतला; पण वैद्यकीय व्यवसायातून वेळ कसा मिळणार, हाच मोठा प्रश्‍न होता. यासाठी त्यांनी शेती भागाने लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतीचे नियोजन सोपे गेले. त्याचबरोबरीने शेती विकासाच्या नवनवीन कल्पना राबविण्याची संधीही मिळाली. असंडोली परिसरातील जांभळी नदीच्या काठावर डॉ. आनंद यांची शेती आहे. निसर्गरम्य परिसर आणि कोदे येथील पाटबंधारे प्रकल्पामुळे पाण्याची मुबलकता या भागात आली आहे. यामुळे बागायती शेत विकण्याचा विचारही त्यांच्या मनात कधी डोकावला नाही. उलट विविध पीक पद्धतीचे नियोजन त्यांच्या डोक्‍यात येऊ लागले.
या परिसरातील स्वच्छ हवा, बाराही महिने हिरवागार निसर्ग सर्वांना खुणावत राहतो. शहरातील धकाधकीच्या जीवनात थोडीशी विश्रांती आणि कामाचा ताण कमी करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस तरी अशा निसर्गाच्या सान्निध्यात जावे, असे डॉ. आनंद यांना मनोमन वाटते. यातूनच त्यांनी शेतीच्या नियोजनात लक्ष घातले. घरच्या चार एकरांच्या शेतीत डॉ. आनंद ऊस, उन्हाळी भुईमूग, भात, सूर्यफूल, मका, काही प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करतात. त्यातून शेती व्यवस्थापनाचा मेळ घातला जातो.
कोल्हापूर शहरापासून 25 किलोमीटरवर असंडोली हे गाव आहे, त्यामुळे दररोज वैद्यकीय कामकाजातून शेतावर जाणे त्यांना शक्‍य होत नाही. त्यामुळे डॉ. गुरव यांनी वाटेकऱ्याच्या साथीने शेतीचे नियोजन केले आहे. दर आठ ते दहा दिवसांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन वाटेकऱ्याबरोबरीने पीक व्यवस्थापनाचे नियोजन डॉ. गुरव करतात. गरजेनुसार पीक पद्धती ठरविली जाते. शेतीसाठी लागणारा निम्मा खर्च डॉ. आनंद करतात, निम्मा खर्च वाटेकरी करतो. येणाऱ्या उत्पन्न निम्मे- निम्मे वाटून घेतले जाते. त्यामुळे पीक उत्पादन वाढीवर सातत्य ठेवले जाते.

पीक व्यवस्थापनाचे नियोजन ः
- नदीकाठावर जमीन असल्याने ऊस हेच मुख्य पीक आहे. चार एकर शेतात तीन एकरांवर ऊस घेतला जातो. एका एकरात अन्य पिके घेतली जातात. पिकांच्या फेरपालटासाठी नियोजन डॉ. गुरव करतात.
- उसाची आडसाली लागवड असते. खोडवाही ठेवला जातो. त्यामुळे खर्चात काही प्रमाणात बचत होते. पूर्वी पारंपरिक पद्धतीने उसाची लागवड होत होती. आता दोन वर्षांपासून रोप पद्धतीने ऊस लागवड केली जाते. परिसरातील साखर कारखान्यातून उसाच्या को-86032 जातीची रोपे खरेदी केली जातात. परिसरातील शेतकरी आणि ऊस तज्ज्ञांच्या सल्ल्याने पीक व्यवस्थापन केले जाते. उसामध्ये काही प्रमाणात मका, भुईमुगाचे आंतरपीक घेतले जाते.
- ऊस रोप लागवडीमुळे पिकाचा एक ते दीड महिन्याचा कालावधी वाचतो. लागवड कमी वेळेत पूर्ण होते. उसाची जोमदार वाढ होते. संख्याही योग्य राखली जाते. लागवडीस मजूरही कमी लागतात. सुमारे पाच हजार रुपये खर्चात बचत होते.
- सध्या उसाचे एकरी 35 टन उत्पादन मिळते. ऊस लागवड, रोपे, खत, पाणी आणि मजूर व्यवस्थापनासाठी त्यांना एकरी साधारणपणे 45 ते 50 हजार रुपये खर्च येतो. वाटेकरी आणि सर्व खर्च वजा जाता एकरी 20 हजार रुपये मिळतात.
- दर दोन वर्षांनी माती परीक्षण करून त्यानुसार पीक निहाय सेंद्रिय आणि रासायनिक खतमात्रेचे नियोजन केले जाते.
- शेताच्या बांधावर देशी केळी तसेच आंब्याची कलमे लावली आहेत.
- दर वर्षी भाताची एक एकरावर लागवड असते. भाताच्या जया जातीची चारसूत्री पद्धतीने लागवड केली जाते. त्यामुळे उत्पादनात सातत्य आहे. गगनबावडा परिसरात पाऊस अधिक पडत असल्याने येथे भाताची रोप लावणी केली जाते. पिकांच्या फेरपालटीमध्ये उन्हाळी भुईमूग लागवड केली जाते. त्यामुळे कुटंबास वर्षभर पुरेल इतके भात आणि भुईमुगाचे उत्पादन मिळते.
- वर्षभरात चार एकर शेतीतून सर्व खर्च वजा जाता सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. उत्पन्नापेक्षा शेतीमध्ये आनंदाने जाणारा वेळ आणि नवनवीन पीक पद्धतीतून शेतीमध्ये होणारा बदल डॉ. गुरव यांना महत्त्वाचा वाटतो.

शेतीमधील प्रयोगांना चालना
शेती वाटेकरी करतो म्हणून केवळ उत्पन्न घ्यायलाच जायचे, हे डॉ. आनंद यांना पटत नाही. त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासही प्रारंभ केला आहे. बांधावर फळबाग लागवड, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचा शेतीत अवलंब, पाणी व्यवस्थापनाच्या नवीन तंत्राबाबत डॉ. गुरव माहिती घेत असतात. या भागात विजेची अनियमितता आहे. त्यामुळे नदीमध्ये पाणी उपलब्ध असूनही पिकाला पाणी देताना अडचणी येतात. काही वेळा पिकाला गरजेच्या वेळी पाणी देता येत नसल्याने उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन डॉ. गुरव पाणीपुरवठ्याच्या पंपावर मोबाईल स्टार्टर बसविणार आहेत. मोबाईलवरून मिसकॉल दिला की मोटर सुरू होते आणि परत मिसकॉल दिला की मोटर बंद होते, त्यामुळे ज्यावेळी वीज असेल त्या वेळी लगेचच मोटार सुरू करणे शक्‍य होणार आहे.

संपर्क ः डॉ. आनंद गुरव ः 9822187049

Monday, June 1, 2015

जाणून घ्या सेंद्रिय शेतीच्या योजना

केंद्रातील मोदी सरकारही सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहे. यापूर्वीच्या कॉंग्रेस सरकारनेही सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना तयार केल्या होता. गेल्या दहा वर्षात देशातील सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात वाढ होता आहे. कीडनाशके व रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम पाहाता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन हे मिळायलाच हवे. आरोग्याच्या वाढत्या समस्या ह्या निकृष्ट अन्नामुळे आहेत. खाद्यपदार्थात कीडनाशकांचे प्रमाण पाहाता. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे व विषमुक्त अन्नाची निर्मिती करायला हवी, ही आता काळाची गरज झाली आहे.
हे ओळखूनच सरकारने विशेष पाऊले उचलली आहेत. परंपरागत कृषि विकास योजने अंतर्गत 2015-16 आर्थिक वर्षासाठी केंद्राने सेंद्रिय शेतीसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये 50 शेतकऱ्यांचा एक गट करून त्यांना सेंद्रिय शेतीसाठी निधी देण्यात येणार आहे. 50 शेतकरी प्रत्येकी एक एकरावर सेंद्रिय शेती करतील. या प्रत्येक शेतकऱ्याला तीन वर्षांसाठी एकरी 20 हजार रुपये दिले जाणार आहेत. 50 शेतकऱ्यांचे असे दहा हजार गट तयार केले जाणार आहेत. यामुळे तीन वर्षात पाच लाख एकर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली येणार आहे. या योजनेतून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळेल अशी आशा सरकारला वाटते. 2003-04 मध्ये देशात 42 हजार हेक्‍टरवर सेंद्रिय शेती केली जात होती. गेल्या दहा वर्षात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 17 पटीने वाढ झाली आहे. 2013-14 मध्ये 7.23 लाख हेक्‍टरव वर सेंद्रिय शेती करण्यात आली आहे. 2001 पासून देशात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. उत्तराखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तमिळनाडू, केरळ, नागालॅंड, मिझोरम, सिक्किम या राज्यात सेंद्रित शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. परंपरागत कृषि विकास योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना, एकात्मिक उद्यानविद्या विकास प्रकल्प, राष्ट्रीय तेलबिया आणि पामतेल प्रकल्प, आयसीएआरचा सेंद्रिय शेती नेटवर्क प्रकल्प या योजनेतून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. 

Sunday, May 24, 2015

ब्रॅंडनेम

कोल्हापूर शहरापासून 10 किलोमीटवरवर रामूचा गाव. पंचगंगा नदीच्याकाठी असल्याने बागायती शेतीने सधन. ऊस आणि भाजीपाला अमाप, पण गेल्या काही वर्षात शेतमालाला दर नसल्याने येथील शेतीचे चित्र पालटलेले होते. दहा वर्षापूर्वी गावच्या रस्त्यावर बघाल तिकडे गुऱ्हाळ होती. पण आता एखादेच गुऱ्हाळ सुरू आहे. रस्त्यावर वाहनांपेक्षा जनावरेच दिसायची. पण आता एखादे जनावरं जरी आडव आलं तरी वाहनांच्या रांगा लागतात. इतकी परिस्थिती बदलली आहे. विकास झाला, पण कुणाचा? हे सांगणेच आता कठीण आहे. कच्चे रस्ते होते. ते पक्के झाले. पाण्याची सुविधा नव्हती. आता तर बघेल तिकडे पाणीच पाणी आहे. हाफ चड्डीवर फिरणारा शेतकरी आता फुलपॅंडमध्ये दिसतो आहे. बाहेरगावचा पाहुणा कधी भेटला तर जेवल्याशिवाय गावातून सोडत नव्हते. पण आता स्मार्टफोनवर जेवलास काय हे विचारायलाही वेळ नाही. इतकी परिस्थिती बदलली आहे. शेतमालाला दर मिळत नसल्यापासून शेतकरी काही समाधानी दिसत नव्हता. गुळाला दर मिळत नाही. भाजीला दर नाही. यामुळे नुकसानात पडलेला शेतकरी गुऱ्हाळ बंद करून बसला आहे. शेतात पिकतयं म्हणून कुटुंब तरी खाऊन पिऊन सुखी आहेत. मुलांना शिकवायचे नोकरीत धाडायचं शेतात मात्र आणायचं नायं हाच विचार आता शेतकऱ्यांच्या डोक्‍यात घुमु लागलाय.
गावची पोरं आता पुण्या-मुंबईत शिकायला आहेत. तसे रामूचाही मुलगा पुण्याला शिकायला होता. त्याला भेटायला म्हणून रामू पुण्याला गेला. घरच्यांनी जाताना सांगितले, येताना बाकरवडी आणायला विसरू नका. चितळ्यांची बाकरवडी खूप प्रसिद्ध आहे. मुलाला भेटून घरी जाण्यासाठी रामू निघाला. जाताना बाकरवडी घ्यायचे हे त्याच्या डोक्‍यात पक्क होत. बाकरवडी खरेदीसाठी रामू चितळ्यांच्या दुकानात गेला. पाहतो तर काय? पावकिलो बाकरवडीसाठी भलीमोठी रांग. बाकरवडी प्रसिद्ध आहे. हे माहित होते, पण खरेदीसाठी इतकी मोठी रांग पाहून रामू हबकलाच. अर्धा तास रांगेत थांबून बाकरवडी रामूने खरेदी केली. रांगेत थांबून रामू थकला होता. रेशनला सुद्धा आजकाल इतकी गर्दी नसते. बाकरवडीसाठी येथे रांगा लागतात. याचेच आश्‍चर्य त्याला वाटत होते. बाकरवडी खरेदी करून रामू बाहेर आला. पाहतो तर काय? वडापाव खरेदीसाठीही गर्दी. येथे काही पदार्थांच्या खरेदीसाठी झुंबड लागते. हे पाहून रामुला खूप आश्‍चर्य वाटले. चहा प्यायचा, तर अमृततुल्य मध्येच. पण त्या चहाची चवच न्यारी असते. हे ही खरे. रामू कोल्हापूरला परतताना एसटीत हाच विचार त्याचा मनात घोळत होता. पदार्थाची प्रत चांगली असेल तर त्याला मागणी असते. लोक रांगाकरून तो पदार्थ खरेदी करतात. खरेदीसाठी चढाओढ असते. यातून त्या पदार्थाचे बॅंडनेम तयार होते. कोठेही जा? तशी प्रत, ती चव मिळतच नाही. मालाला मागणी हवी असेल तर प्रत उत्तम असावी लागते. प्रत उत्तम राखली, तर मालाला बाजारपेठही मिळते आणि प्रसिद्धीही मिळते. बेळगावचा कुंदा, नृसिंहवाडीचे कवठाची बर्फी, लोणावळ्याची चिक्की हे जसे प्रसिद्ध आहे. तसे आपण आपला गूळ का प्रसिद्ध करू नये. शेतमालासाठी असा दर्जा निर्माण केला तर....रामूच्या मनात वीज चमकली.
रामू घरी परतला. पण वेगळा विचार घेऊन आला. या विचाराने रामूचे जीवनच बदलले. बाजारात पत फक्त कर्ज घेण्यासाठी नको, तर मालाच्या प्रतीचीही पत हवी. माल फक्त नावावर जायला हवा. असे उत्तम प्रतीचे उत्पादन व्हायला हवे. मार्केटिंगचा हाच तर नियम आहे. चांगले उत्पादन असेल, तर ग्राहक किंमतीचाही विचार करत नाही. शेतमालही असाच तयार करायचा. गुळाची प्रतही अशीच ठेवायची. कोणीही विचारले गूळ कुणाचा? तर "रामूचा गूळ' असा सहज उच्चार व्हायला हवा. नावावर भाजी खरेदी व्हायला हवी. तशी प्रत आपण राखायला हवी. तसे उत्पादन करायला हवे.
विचारात आले ते कृतीत आणण्यात रामू पटाईत होता. रामूने यावर अभ्यास सुरू केला. गुळाची प्रत राखण्यासाठी त्याने सर्व तांत्रिकबाबी अभ्यासल्या. त्यानुसार त्याने योग्य ते बदल केले. सेंद्रिय गुळाचे उत्पादन तो घेऊ लागला. विषमुक्त अन्ननिर्मितीचा त्याने ध्यासच घेतला. रासायनिक खतांचा वापर बंद करून त्याने सेंद्रिय पद्धतीने उसाची लागवड सुरू केली. गुळामध्येही रसायनांचा वापर त्याने थांबवला. स्वतःचा गूळ उत्तम प्रतीचा, खराब होणार नाही याची हमी देणारा, पौष्टिकता जपणारा हा वेगळाच ब्रॅंड रामूने विकसित केला. यामध्ये विविध प्रकारही त्याने तयार केले. मोदकाचा आकार, गुळाच्या स्लेट असे विविध प्रकारही त्याने तयार केले. रामुच्या गुळाचा ब्रॅंड अल्पावधीत परिचित झाला. भाजीपालाही सेंद्रिय पद्धतीने करून त्यांने भाजीपाल्याचीही प्रत सुधारली. सेंद्रिय भाजीपाला, सेंद्रिय गूळ आदी सेंद्रिय उत्पादने घेणारा शेतकरी म्हणून आता रामू परिचित झाला. वाशीच्या मार्केटमधून भाजीला मागणी होऊ लागली. अल्पावधीतच त्याच्या उत्पादनांना देशभरातून मागणी होऊ लागली. थेट विक्रीही होऊ लागल्याने रामूच्या नफ्यात भर पडली. त्याचा हा व्यवसाय पाहण्यासाठी देशभरातून शेतकरी येऊ लागले. फक्त एका बॅंडने हे सर्व घडवले. उत्पादन असे घ्या, त्याचा ठसा उमटायला हवा. त्याची एक वेगळी ओळख निर्माण व्हायला हवी. शेती उत्पादनातही आपण वेगळा बॅंड करू शकतो. हेच रामूने करून दाखवले. 

Sunday, May 17, 2015

कातळाला फुटला पाझर

कोकणातील खेड्यात राहणारा रामु आयएएस झाला. त्याचे स्वप्न आता सत्यात उतरले होते. गावच्या लोकांनाही त्याच्याबद्दल आदर होता. त्याचा सत्कार गावकऱ्यांनी केला. वाटलं होत तो आता गावचा विकास करेल पण आता ते शासकीय अधिकारी झाला होता. रामूला ग्राम विकासाने झपाटले होते. आता त्याचे ध्येय होते ग्रामीण विकास योजना राबविण्याचे. बिहारमधील एका भागात तो नोकरीत रुजू झाला. सुरवातीची एक-दोन वर्षे काम समजून घेण्यातच गेली. वरिष्ठ अधिकारी असल्याने रामूला अनेक अधिकार होते. पण अद्याप त्याने याचा वापर कधी केला नव्हता. आता त्याला त्याची गरज वाटू लागली. ग्राम विकासाच्या योजना सत्यात उतरविण्यासाठी तो नियोजन करू लागला. बिहारमधील गाव विकासाचे आराखडे त्याने तयार केले. शहराकडे येणारे लोंढे कमी व्हावेत या दृष्टीने त्याने प्रयत्न सुरू केले. गावातील लोकांना गावातच रोजगाराच्या संधी देण्याच्या योजना त्याने आखल्या. त्याची अंमलबजावणी रामूने सुरू केली. रोजगारासाठी मधमाशापालन, कुकुटपालन आदी शेतीवर आधारित जोडधंद्यांना चालना देण्यास सुरवात झाली. शासनाच्या अनुदानाच्या योजना गावात राबविण्याचे प्रयत्न सुरू झाले. याची खबर गावच्या ठाकुरांना लागली. कामगारांअभावी त्यांचे उद्योग बंद पडण्याची भीती त्यांना वाटली. त्यांनी रामूला दम दिला. गावात याल तर याद राखा मुडदे पाडू अशी धमकीही दिली. सर्वगावातील ठाकुरांची एकी झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर रोज मोर्चे येऊ लागले. रामू विरोधात वातावरण निर्माण झाले. पाटणा, दिल्लीपर्यंत रामूच्या तक्रारी गेल्या. प्रत्यक्षात रामूने कोणतीही कारवाई केली नव्हती तरी त्याच्या विरोधात रान उठले. दिल्लीतील नेत्यांनी रामूला बोलावून घेतले. रामूच्या योजनांची वरिष्ठापर्यंत माहिती होती. त्यांच्या कामाबद्दल ज्येष्ठ नेत्यांनाही आदर होता. धडाडीचा अधिकारी म्हणूनही त्याची ख्याती होती. विकासपुरूष म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जायचे. पण दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांकडे रामूच्या आलेल्या तक्रारींनी तेही चक्रावून गेले. राजकारणातील मुरब्बी नेते शेवटी त्यांनी रामुलाच खडसावले. सर्व राजकीय नेते एकाच माळेचे मणी. सरकार कोणाचेही असो खाद्य खाण्यासाठी ते एकत्रच जमतात. खाद्य मिळाले की त्यांचे विचार बदलतात. पांढऱ्याच काळे करण्याचा त्यांच्या तर हातखंडाच आहे. रामूच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या. कामापेक्षा दिल्लीच्या सरकारी कागदपत्रांचीच उठाठेव वाढली. रामूने आवाज उठवला तर साथ देणारे कोणी नव्हते. शेवटी तो तेथे परका माणूस. ज्येष्ठ नेत्यांनीही रामूला सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. पण रामूच तरुण रक्त ते मान्य करायला तयार नव्हते. तसे या प्रकरणाने रामू दिल्ली दरबारी चांगलाच परिचित झाला होता. माणूस चांगला, काम चांगले, विकासाचे स्वप्न पण साथ नसेल तर काय उपयोग? एका हाताने टाळी वाचत नाही. रामू या राजकीय पद्धतीला वैतागला. अखेर त्याने राजीनामा ठोकला आणि तडक कोकणातला गाव गाठला. 
रामूने आता स्वतःच्या गावाच्या विकासाचा ध्यास घेतला. रामू आता माजी अधिकारी असला तरी गावात त्याला मान होता. कोकणाला त्याचा चांगला परिचय होता. त्याच्यावर विश्‍वास होता. गावाने रामुला सरपंचपदी निवडले. बिनविरोध निवडून दिल्याने त्याला कामात उत्साह वाढला. पदाचा फायदा घेत त्याने गावाच्या विकासाच्या आराखडा तयार केला. कोकणात पाऊस जरी अधिक पडत असला तरी जानेवारीनंतर पाण्याची टंचाई भासतेच. मार्च ते मे महिन्यात याची तीव्रता वाढते. गावच्या विकासासातील हा सर्वांत मोठा अडसर होता. पाऊस असूनही नित्याची पाणी टंचाईवर मात करण्यासाठी त्याने विविध उपाय योजले. शासनाच्या योजनांचा फायदा घेत वनराई बंधारे, डोंगर उतारात पाणी अडवा पाणी जिरवा, छोटे छोटे बांध बांधून पाण्याचा साठा केला. या बांधबदिस्तीमुळे गावात असणाऱ्या आडाच्या पाण्यातही वाढ झाली. विहिरींना पाणी वाढले. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याची समस्या मिटली. पण आता आव्हान उभे राहिले ते पाणी पुरवठा योजनेचे. बाराही महिने पाणी पुरवठा करावा लागल्याने आता विजेचे बिल अव्वाच्या सव्वा आले. हे बिल भरणार कसे. याचा बोजा ग्रामपंचायतीवर पडला. साहजिकच याचा बोजा करावर पडला. ग्रामपंचायतीचे विविध कर वाढविणे भाग पडले. पाणी पट्टी वाढली. विकास केला तर हे तोटे वाढले. यामुळे ग्रामस्थांत नाराजीचा सुर उमटू लागला. रामू या समस्येने वैतागला. विकास केला तर इतरही अनेक समस्या वाढतात हे त्याच्या लक्षातच आले नाही. विकासाने प्रगती व्हायला हवी अशा योजना राबविण्याचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. गावच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी गावातीलच साधन संपत्तीचा कसा वापर करता येईल याचा विचार तो करू लागला.
कोकणातील गावे ही डोंगर कपारीत आहेत. या डोंगर कपारीत नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत. उन्हाळ्यातही ते आटत नाहीत. गावात पाणी टंचाई भासू लागल्यावर याच स्रोतांतून पाणी आणले जायचे. गावापासून तीन चार किलोमीटर उंच भागात असणाऱ्या या स्रोतांचा अभ्यास रामूने केला. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत हे पाणी नेता आले तर गावाला बाराही महिने पाणी मिळेल उलट सायफनने पाणी पुरवठा झाल्याने विजेचे बिलही येणार नाही. महिलांना कूपनलिकेचे पाणी खेचावे लागणार नाही. दारात चौविस तास पाण्याचा पुरवठा होईल. अनेक समस्या मिटतील. हा विचार त्याने गावकऱ्यांनाही सांगितला गावानेही या योजनेला पाठिंबा दिला. पण डोंगरातील या स्रोतांतून पाणी आणण्यासाठी पाइपचा खर्च कोण करणार. इतका पैसा येणार कोठून? तो कसा उभा करायचा. पाणी पट्टी द्यायला ग्रामस्थ तयार नाहीत तेथे लाखाची योजना राबविण्यासाठी कसे पैसे येणार. या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांची मानसिकता होती. पण मुख्य प्रश्‍न होता तो पैशाचा? शेवटी शासनाकडे ग्रामसभेतून प्रस्ताव गेला. शासनाने एकात्मिक गाव विकास योजनेतून निधी मंजूर केला. यातून आवश्‍यक ते साहित्य खरेदी करण्यात आले. पण ते बसविण्यासाठी लागणारी मजूरी देण्यासाठी पैसा नव्हता. गावकऱ्यांची बैठक झाली. श्रमदानातून पाइप लाइन टाकायचे असे ठरले. गावातच पाइप लाइन करणारे कामगार होते. त्यांनी श्रमदानातून पाइप जोडून देण्याचे निश्‍चित केले. खड्डेही श्रमदानातून खोदण्यात आले. गावाच्या टाकीत अखेर पाणी पडले. उन्हाळा असो वा पावसाळा आता गावात बाराही महिने चोवीस तास पाणी मिळते. या पाण्याने गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. पाणी पट्टीही आकारली जात नाही. शून्य पाणी पट्टी आकारणार गाव म्हणून गावाचा राज्यभर लौकिकही झाला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच आता गावच्या जमिनीही बागायती झाल्या आहेत. कातळ पडीक जमीनीत आता हिरव्यागार झाल्या आहेत. बाराही महिने त्यावर पिके दिसत आहेत. गावात एसटी शिवाय वाहन येत नव्हते आता प्रत्येकाच्या दारात मोटार गाड्या दिसत आहेत. एका पाणी प्रश्‍नाच्या सोडवणूकीने इतका विकास झाला आहे. या विकासाची चर्चा आता देशभरात होत आहे. बिहारमध्येही याची चर्चा झाली. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आता रामूच्या विकासाचे आराखडे पुन्हा मागवले आहेत. रामूला विकासाच्या योजना राबविण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्याचे मार्गदर्शन आता तेथे घेतले जात आहे. दिल्लीवारीवर पाठविणारे ठाकूर आता रामूच्या विचारांनी गावाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जिद्द असेल, ध्यास असेल तर कातळालाही पाझर फुटू शकतो. फक्त विचार विकासाचा हवा, ध्यास विकासाचा हवा. रामूनेही करून दाखवले आहे. शून्य पाणी पट्टी भरणारा मराठी गाव आता देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर नोंदविला गेला आहे.

Saturday, May 16, 2015

शेततळे

डोंगराच्या पायथ्याशीच रामूचे शेत होते. नदीपासून शेत दूर असल्याने फक्त कोरडवाहूच पिके होत. पावसाच्या पाण्यावर येणारे भात आणि हरभरा यावरच रामूचा चरितार्थ चालायचा. वाढत्या महागाईत इतक्‍या कमी उत्पन्नात घर कसे चालवायचे, हाच मोठा प्रश्‍न रामूला होता. पाच एकर डोंगर उतारात शेत असूनही मोठी अडचण होती. पाण्याची सोय झाली असती तर बागायती पिके घेऊन उत्पन्न वाढवता येणे शक्‍य होते. विहीर खोदून किंवा कूपनलिका मारून पाणी लागेलच याची शाश्‍वती नाही. कर्ज काढून विहीर खोदायची आणि पाणी लागलेच नाही तर काय? कर्जात बुडायचे. यामुळे रामू अस्वस्थ होता.
रामूने पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा ध्यास घेतला. वारंवार तो पंचायतीमध्ये चकरा मारू लागला. पण फारसे यश त्याला येत नव्हते. काही पर्यायही सुचत नव्हते. विचारात डुंबलेला रामू चावडीवर हताश होऊन बसला होता. तेवढ्यात त्याचे समोर लावलेल्या जाहिरातीकडे लक्ष गेले. शेततळ्याच्या योजनेची जाहिरात होती. कृषी विभागाच्यावतीने ही योजना होती. विहिरी ऐवजी अनुदानावर शेततळे खोदले तर...रामूच्या डोक्‍यात प्रकाश पडला. शेततळे खोदण्याचे त्याने मनावर घेतले. शेततळ्याला फारशी जागाही लागत नाही. अर्ध्या एकरात शेततळे होऊ शकते. खर्चही फारसा नाही. ठराविक आकाराचा खड्डा खोदायचा. त्यावर प्लास्टिक शीट अंथरायचं. त्यात पाणी साठवायचे. पावसाळ्यात पाणी साठवायचे असल्याने पाणी लागले नाही. त्यामुळे श्रम वाया गेले ही भीतीही नाही. हिवाळ्यातले एक पीक जरी पाण्यावर आले तरी उत्पन्नात भर पडेल या उद्देशाने रामूने शेततळ्याचा निर्णय घेतला. डोंगराच्या पायथ्याशी शेत असल्याने रामूने वरच्या भागात तळे खोदायचा निर्णय घेतला. आश्‍चर्य म्हणजे तळाच्या दहा फुटावरच पाण्याचे झरे त्याला लागले. उन्हाळ्यात पाण्याचे उमाळे पाहून रामूलाही हायसे वाटले. पावसाळ्यात पाणी साठवायचीही गरज नाही. उन्हाळ्यात झरे फुटले होते. शेततळ्याच्या पाहणीसाठी येणारे अधिकारीही उमाळे लागलेले पाहून खूष झाले. त्यांनी प्लास्टिक शीटही न अंथरण्याचा सल्ला दिला. रामूचा तोही खर्च वाचला. अनुदानावरच त्याचे शेततळे झाले. पाण्याची सोयही झाली. पावसाळ्यात शेततळे भरले. भाता बरोबरच तो आता जनावरांच्या चाऱ्याची पिके घेऊ लागला. उसाचीही लागवड त्याने केली. बारमाही पिके शेतात डोलू लागल्याने उन्हाळ्यात ओसाड असणारा परिसर हिरवाईने फुलला होता. अनेक प्रकारची फळझाडेही आता बांधावर डोलू लागली होती. बारमाही उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला. एका शेततळ्याने रामूला आर्थिक संपन्नता दिली होती.
पाण्याची सोय झाल्याने विविध प्रकारची पिके घेऊन उत्पन्न वाढविण्याचा खटाटोप रामूने सुरू केला. कृषी महाविद्यालयातील शेतकरी शास्त्रज्ञ मंच्यामध्येही तो सहभागी झाला. तेथे त्याला शेतीतील नवनवे तंत्रज्ञान समजू लागले.
एका एकरात 100 पिके ती सुद्धा सेंद्रिय पद्धतीने घेता येऊ शकतात. असे तंत्रज्ञान करणारे शेतकरीही त्याला शास्त्रज्ञ मंच्यात भेटले. घरात लागणारे सर्व धान्य शेतातच पिकवायचे. विकत काहीही आणायचे नाही. विषमुक्त अन्न निर्मिताचा हा विचार रामूलाही पटला. त्यानेही एका एकरात सेंद्रिय पद्धतीने 100 वर पिके घेण्याचा निर्णय घेतला. ही पिके कशी पिकवली जातात याचे तंत्र त्याने आत्मसात केले. यासाठी त्याने चार देशी गायीही पाळल्या. शेततळ्याच्या शेजारीच त्याने गोठा बांधला. शास्त्रोक्त पद्धतीने पिकांचे नियोजन केले. वाऱ्याची दिशा पाहून पिकांचे नियोजन केले. उंच पिके पश्‍चिमेकडे लहान उंचीची पिके पूर्वेकडे असे नियोजन त्याने केले. शेतात उत्तम सूर्यप्रकाश राहील अशा पद्धतीने त्याने आखणी केली. शेतातील विजेच्या खांबाशेजारीही वाया जाणाऱ्या जागेत त्याने पिके घेण्याचे नियोजन केले. विजेच्या खांबाभोवती उंच मातीचा ढिगारा रचून त्यावर कंदवर्गीय रताळी आदी पिके त्याने घेतली. भाजीपाल्याचेही नियोजन त्याने केले. एका एकरात भात, गहू, तूर, भाजीपाला, अशी जवळपास 100 वर पिके त्याने घेतली. घरात दररोज ताजा भाजीपालाही मिळू लागला. सेंद्रिय पद्धतीने पिकवल्याने रासायनिक खतांचा खर्च वाचला. कीडनाशकासाठी फवारण्याही सेंद्रिय पद्धतीनेच होऊ लागल्याने विषमुक्त अन्न निर्मितीही होऊ लागली. घराच्या आरोग्या बरोबरच हे अन्नपदार्थ खाणाऱ्यांचेही आरोग्य जोपासले जात असल्याने त्याचेही पुण्य त्याचा पदरी पडले. विविध पिकांचा त्याचा अभ्यास झाला. बियाणे संवर्धनाचाही उपक्रम त्याने राबविला. देशी उत्तम प्रकारचे बियाणे त्याने साठविले. शेतात लागणारे सर्व बियाणे तो स्वतः उत्पादित करू लागला. यामुळे देशी बियाण्यांचे संवर्धनही त्याच्याकडून होऊ लागले. एका एकरात पाच माणसांचे कुटुंब चालवता येऊ शकते हा विचार त्याने प्रत्यक्षात करून दाखवला होता.
उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचा खटाटोप मात्र त्याचा सुरूच होता. शेतात असणाऱ्या शेततळ्यात त्याने मत्स्यसंवर्धन केले. पावसाळ्यात ऑगस्टमध्ये शेततळ्यात मासे सोडून एप्रिल मे मध्ये त्यांचे उत्पन्नही त्याला मिळू लागले. अवघ्या नऊ महिन्यात त्याला मत्स्यसंवर्धनातून काहीही न करता लाखोंची कमाई होऊ लागली. माशांना लागणारे खाद्यही शेतातच पिकत होते. त्याचाही खर्च नव्हता. केवळ उत्पन्नच उत्पन्न मिळू लागले. पाच वर्षात त्याने शेततळ्याच्या जोरावर केलेली भरभराट पाहण्यासाठी आता आसपासचे शेतकरीही येऊ लागले. राज्यभरात त्याच्या या प्रगतीची चर्चा सुरू होती. अवघ्या एका शेततळ्याने त्याला इतके संपन्न केले होते.

Tuesday, May 12, 2015

समर्थांचा धर्मवीरास बहुमोल सल्ला

इतिहास ही काही कथा नाही. कादंबरीकारांनी इतिहासाचे कथानक केले. यातून खरा इतिहासही झाकला गेला. याबरोबरच अनेक वादाचे प्रसंग उभे राहिले. अशा वादात न पडता. इतिहासातून आपण चांगल्या गोष्टी शिकायला हव्यात. इतिहासातील थोर पुरुषांकडून आपण आदर्श घ्यायला हवा. त्यांचे व्यक्तीमत्व अभ्यासायला हवे. त्यांनी दिलेले सल्ले अभ्यासायला हवेत. आपण सल्ला कोणाला देतो ? जो आपला लाडका आहे. आपला जवळचा आहे. ज्याच्याबद्दल आपणाला आपुलकी वाटते. अशा व्यक्तीलाच आपण सल्ला देतो. समर्थ रामदास स्वामी यांनी संभाजीराजे यांना त्याच तळमळीने सल्ला दिला. समर्थांनी संभाजीराजे यांना पाठवलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श संभाजीराजांनी पाळावा. त्यानुसार त्यांनीही तडाखेबाज राज्य करावे. नावलौकीक मिळवावा, हीच तळमळ व्यक्त केली आहे. शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकत राज्यकारभार करावा, यासाठी समर्थांनी केलेला हा प्रयत्न निश्‍चितच मार्गदर्शक आहे. आजच्या काळातही आजचा राजकर्त्यांसाठी तो मार्गदर्शक असाच सल्ला आहे.
संभाजीराजे हे धार्मिकवृत्तीचे होते. पण त्यांच्या ताठर आणि रागीट स्वभावामुळे अनेक माणसे दुखावली गेली. शिवरायांच्यानंतर राज्य सांभाळताना त्यांना या स्वभावाचा तोटा झाला. राजाचे व्यक्तीमत्व कसे असावे? त्याने कसे वागावे? कसा कारभार करावा? कोणत्या चुका होत आहेत? त्यावर कशी मात करायला हवी. याबाबत समर्थ रामदास स्वामी यांनी संभाजीराजांना सल्ला दिला होता. हा सल्ला आजच्या काळातही राज्यकारभार करणाऱ्यासाठी उपयुक्त आहे. इतिहासात काय घडले, यापेक्षा इतिहासातून आपण काय शिकलो. हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रपुरुषांच्या व्यक्तीमत्त्वातून हेच शिकायला हवे. त्यांचे घेण्यासारखे विचार आपण आत्मसात करायला हवेत. रामदास स्वामी शिवरायांना भेटले होते का? यापेक्षा त्यांनी शिवरायांच्या व्यक्तीमत्त्वातील कोणते पैलू मांडले आहेत. त्यांचा कोणता आदर्श त्यांनी सांगितला आहे? हे इतिहासातून शिकायला हवे. यावर अधिक विचार व्हायला हवा. शिवरायांचा पराक्रम जरी आठवला तरी खचलेल्या मनाला संजिवनी मिळते. मराठी भाषेचे हेच तर सामर्थ्य आहे. रांगडी भाषा असा लौकिक इतर कोणत्या भाषेत आहे सांगा ना? दगडालाही पाझर फोडण्याचे सामर्थ्य या भाषेत आहे. समर्थांनी संभाजीराजांना लिहिलेल्या पत्रातून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. सध्याच्या राज्यकर्त्यांनी यातून बहुमोल सल्ला घ्यायला हवा. राज्यकारभार करताना राग, द्वेष बाजूला ठेऊन राज्य कारभार करावा. हा आदर्श जरी घेतला, तर आज आंदोलनात होणारे सर्वसामान्यांचे, शासनाच्या वास्तूंचे, बस-गाड्यांचे नुकसान टळू शकेल. दहशत माजवली म्हणजे राज्य हस्तगत होते हा गैरसमज आहे. दहशतीने प्रश्‍न सुटत नाहीत उलट बिघडतात. मिळालेले राज्यही जाऊ शकते. यासाठी राज्य कारभार करताना सावधान असावे लागते. चिंतन, मननासाठी एकांताची आवश्‍यकता आहे. दुरदृष्टीचा विचार अंमलात आणण्यासाठी साधनेची गरज आहे. क्षमा, शांतीने कारभार करायला हवा. जनतेच्या भावना ओळखायला हव्यात. जनतेच्या गरजा समजून घ्यायला हव्यात. त्यांचे प्रश्‍न अभ्यासायला हवेत. जनतेचे संघटन महत्त्वाचे आहे. एकीमध्ये ताकद आहे, हे ओळखून सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करायला हवा. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आदर्श जोपासायला हवा. ही जनसेवा आहे. सेवेचा धर्म जोपासायला हवा. सेवा सोडली, तर तो व्यापार होतो. झोकून देऊन काम करायला हवे. वेळप्रसंगी त्यागासही सामोरे जायला हवे. ही शिकवण, हा छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श व्यक्तीमत्व आपण इतिहासातून शिकायला हवा. राजे राज्यकारभार करताना कसे बोलायचे, कसे वागायचे, कसा व्यवहार करायचे हे आजच्या पिढीसाठी निश्‍चितच आदर्श आहे. त्यांचे हे व्यवस्थापन निश्‍चितच मार्गदर्शक आहे. 

Sunday, May 3, 2015

अभ्यास

म्हणोनि अभ्यासासि कांही । सर्वथा दुष्कर नाहीं ।
यालागीं माझां ठायीं । अभ्यासें मिळ ।। 113।। अध्याय 12 वा 


अध्यात्माचा अभ्यास हा सुद्धा एक भक्तीचा प्रकार आहे. साधना करायला जमत नाही. मन साधनेत रमत नाही. काही हरकत नाही. त्यात निराश होण्याचे काहीच कारण नाही. आत्मज्ञान प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. योगाचा मार्ग कठीण आहे. शरीराला यामुळे यातना होतात. त्यासहन कराव्या लागतात. अशाने कधीकधी दुःखच पदरी पडते. मग अशा कठीण मार्गाने जाच कशाला? आत्मज्ञान प्राप्तीचे अनेक सोपे मार्ग आहेत. साधना हा सुद्धा सोपाच मार्ग आहे. पण सध्याच्या बदलत्या काळात साधना करायला ही वेळ नाही. चोवीस तास काहींना काही तरी मनात सुरु असते. अशाने मन शांत कसे होईल. घरात आले तर टि. व्ही. सुरु असतो. तो पाहायचे नाही म्हटले तर फोनवर व्हॉट्‌स अप, फेसबुक सुरू होते. फोन तर मिनिटा मिनिटाला वाजतो. जेवतानाही फोन वाजतो. अशाने जेवनाकडे लक्ष कमी फोनकडेच लक्ष अधिक असते. अशा या बदलत्या परिस्थितीत मनच शांत होणे कठीण आहे. या मनाला शांत करण्यासाठी साधना करायचे म्हटले तरी तो मार्ग कठीण वाटतो. कारण डोळे मिटल्यावर डोक्‍यात विचारांचा खेळ सुरू होतो. विचार थांबतच नाहीत. हे करायचे आहे. ते करायचे आहे. मग डोळे मिटून कसे चालेल. झाले साधना भंग झाली. मन शांतच होत नाही. झोपत सुद्धा विचार घोळत असतात. अशाने मानसाला आता अनेक विचार जडले आहेत. याचाही विचार करायला मानसाला वेळ नाही. इतका माणूस कार्यमग्न झाला आहे. अशा परिस्थितीत साधना कशी होणार? पण साधना होत नाही म्हणून निराश होण्याची काहीच गरज नाही. आत्मज्ञान प्राप्ती केवळ अभ्यासानेही साध्य होते. अध्यात्माचा केवळ अभ्यास करूनही आत्मज्ञान हस्तगत करता येते. ज्ञानेश्‍वरी वाचन हा सोपा मार्ग आहे. त्यात सांगितलेल्या ओव्यांचा अभ्यास करणे हा सुद्धा भक्तीचा मार्ग आहे. अध्यात्माचा अभ्यास करूनही आत्मज्ञान प्राप्ती होऊ शकते. सद्‌गुरुंची कृपा असेल तर अभ्यासानेही ज्ञान प्राप्ती होते. अभ्यासाने सद्‌गुरूंशी एकरूपता साधली तर आत्मज्ञान प्राप्ती होऊ शकते. बदलत्या काळात हा सोपा मार्ग नव्या पिढीने आत्मसात करायला हवा. 

Sunday, April 26, 2015

भास-अभास

अथवा नावें हन जो रिगे । तो थडियेचें रुख जातां देखे वेगें । 

तेंचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ।। 97 ।। अ. 4 था 

विहिरीच्या काठावर उभे राहून विहिरीत पाहिले, तर आपलेच प्रतिबिंब आपणास दिसते. ते आपले प्रतिबिंब असते. आपण स्वतः तेथे नसतो. म्हणजे तो आणि मी वेगळे आहोत. याची जाणीव आपणास असायला हवी. मडक्‍यात पाणी भरून मडके बाहेर ठेवले तर त्यात आकाश दिसते. मडक्‍यातही ते आकाश सामावते. पण ते मडके फुटले तर ते आकाशही नाहीसे होते. याचा अर्थ मडक्‍यात असणारे आकाश हे खरे नव्हते. त्या आकाशाची ती प्रतिमा होती. नावेमध्ये किंवा रेल्वेतून प्रवास करताना आपणास बाहेरची झाडे मागे मागे पळत जात आहेत असे वाटते. प्रत्यक्षात झाडे आहेत तिथेच असतात आपण पुढे जात असतो. त्यामुळे आपणास तसा भास होतो. आपणाला जे भासते ते खरे नसते. खरे काय आहे हे ओळखायला हवे. दृष्टीभासाची अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतात. यातून सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की सत्य परिस्थिती काय आहे हे ओळखायला हवे. आपण म्हणजे कोण आहोत? आपले नाव म्हणजे आपण आहे का? नाही, कारण एकाच नावाची अनेक माणसे असू शकतात. मग आपण कोण आहे? हे नाव शरीराला दिले आहे. मग आपण म्हणजे शरीर आहोत का? पृथ्वी, आप, वायू, तेज, गगन या पंच महाभूतांनी हा देह, हे शरीर तयार झाले आहे. ते आपण आहोत का? नाही कारण आपण मेल्यानंतर हे शरीर पंचत्वात विलीन होते. विविध रसायनांनी युक्त असणारे हे शरीरही आपण नाही. कारण या शरीरात जो पर्यंत जीव आहे तोपर्यंत हे शरीर जिवंत आहे. तो जीव गेला की शरीराची क्रिया संपते. त्या शरीराला मग किडा मुंगा लागतात त्या लागू नयेत यासाठी ते शरीर जाळले जाते. किंवा त्यापासून रोगराई पसरू नये यासाठी ते जमिनीत गाढतात. म्हणजे शरीर हे नष्ट होते. मग या शरीरात असणारा जीव आपण आहोत का? हा जीव, हा आत्मा म्हणजे मी आहे का? मी आत्मा आहे. हे खरे आहे. पण प्रत्येकाच्या शरीरात आहे. शरीराची नावे वेगळी असली तरी आत्मा हा एकच आहे. सर्वांच्या ठायी असणारा आत्मा हा एकच आहे. सबका मालिक एक हे यासाठीच म्हटले आहे. हा आत्मा अविनाशी आहे. तो ओळखायला हवे. शरीरात आल्यामुळे तो आपणास वेगळा वाटत नाही. प्रत्यक्षात शरीर आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत. हे ओळखायला हवे. हे ज्याने ओळखला तोच आत्मज्ञानी होतो. 

Monday, April 13, 2015

स्वधर्म

म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील ।
चोरु म्हणूनि हरील । सर्वस्व तयाचें ।। 112 ।। अध्याय 3 रा ज्ञानेश्‍वरी


स्वधर्म कोणता? हे येथे जाणून घेणे आवश्‍यक आहे. स्वधर्म म्हणजे स्वतःचा आचरण करावयाचा धर्म. आपण कसे वागायाचे? कसे बोलायचे? कसे संवांद साधायचे? कोणती क्रिया करायची? हे सर्व स्वधर्मामध्ये मोडते. प्राप्त परिस्थितीमध्ये स्वतःकडून करावी लागणारी कृती यालाच स्वधर्म म्हणतात. विद्यार्थ्यांने विद्यार्थी दशेत अभ्यास करणे हा त्याचा धर्म आहे. सतत अभ्यास मग्न राहाणे हे त्याचे कर्तव्य आहे. यातच त्याची प्रगती आहे. सैनिकांनी सीमेवर सतत सावध राहाणे हा त्यांचा धर्म आहे. या सेवेत कसर पडली तर स्वतःचे प्राण गमवावे लागतात. आईचा धर्म कोणता? मुलांचा, कुटुंबाचा सांभाळ करणे हा आईचा धर्म आहे? घरात शांती, सुख-समाधान नांदायचे असेल तर आईने सर्वांना सांभाळूण घेणे गरजेचे असते. सावलीसारखे आपल्या कुटूंबास छत्र उभा करणे हा तिचा धर्म आहे. कुटूंब व्यवस्थेतील तो एक स्तंभ आहे. खूर्चीला चार पाय असतात. एक पाय जरी मोडला तरी खूर्चीवर नीट बसता येत नाही. घराचा एक खांब जरी ढासळला तर घर कोसळू शकते याची जाणिव असायला हवी. शिक्षकाचा धर्म कोणता? अध्यापन करणे हा शिक्षकाचा धर्म आहे. ज्ञानदान हा गुरुचा धर्म आहे. विद्यार्थ्यांना-शिष्यांना ज्ञानी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. गुरुदक्षिणेची अपेक्षा न ठेवता हे ज्ञानदान करावे. पण सध्याच्या बदलत्या युगात ज्ञानाची मंदिरे ही आता नोटा तयार करण्याचे कारखाने झाले आहेत. शिक्षण संस्था ह्या पैसा कमावण्याचा उद्योग झाला आहे. असे असले तरी कोणती संस्था टिकते. ज्ञानदानाचे कार्य उत्कृष्टपणे करणारी संस्थाच टिकू शकतो. हा धर्म संस्थेने पाळला नाही तर थोड्याच कालावधीत ती संस्था मोडकळीस निघते हे विसरता कामा नये. म्हणून स्वधर्म कोणता याचा विचार, चिंतन, मनन हे करायला हवे. तो सोडला तर अस्तित्व संपते हे विचारात घ्यायला हवे. स्वधर्म चुकला की शिक्षा ही आहेच. यासाठी स्वधर्माचे पालन होणे आवश्‍यक आहे. साधकाचा स्वधर्म कोणता? सद्‌गुरुंनी पेरलेल्या बीजाची जोपासणा करणे हा साधकाचा धर्म आहे. दिलेल्या मंत्राची साधना करणे हा त्याचा धर्म आहे. तरच त्याची प्रगती होऊ शकेल. आध्यात्मिक प्रगतीसाठी या सर्व गोष्टी आवश्‍यक आहेत. स्वधर्म पालन हे यासाठीच गरजेचे आहे. 

श्री अथर्व प्रकाशनची पुस्तके 
  • इये मराठीचिये नगरी..............80 रुपये 
  • अनुभव ज्ञानेश्‍वरी..................50 रुपये 
  • कृषि ज्ञानेश्‍वरी....................100 रुपये 
  • संपर्क ः राजेंद्र घोरपडे मोबाईल....................9011087406

Saturday, February 28, 2015

ग्रामीण जनतेचे स्वावलंबन हेच "स्वयंसिद्धा' चे ब्रीद

आई उद्योजक झाली तर पुढची पिढीही उद्योजक होईल. यासाठी फावल्यावेळेत महिलांनी उद्योग करून स्वतःला स्वयंपूर्ण करावे या उद्देशाने कोल्हापूरातील "स्वयंसिद्धा' ही संस्था कार्य करते. सामुदायिक उद्योग, बचतगट, सामुदायिक शेती, कंत्राटी शेती, श्रमदानातून विकासकामे यातून ग्रामीण विकासाला डॉ. व्ही. टी. फाऊंडेशनने वाहून घेतले आहे. संघटन-सहकार्य-सद्‌भाव या त्रिसुत्रीने ग्रामीण जनतेला स्वावलंबी करणे हेच या दोन्ही संस्थेचे उद्दिष्ट आहे. श्रीमती कांचन परुळेकर संचलित या संस्थांच्या कार्या विषयी थोडक्‍यात.....
- राजेंद्र घोरपडे

देशाच्या विकासासाठी महिलांनी पुढाकार घ्यायला हवा. यासाठीच प्रथम महिलांचा विकास व्हायला हवा. त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हायला हवी. महिला अर्थकारणात सबळ झाल्या पाहिजेत. तरच त्या स्वतःच्या घराचा विकास करु शकतील. साहजिकच त्या देशाच्या विकासाचे नेतृत्वही करु शकतील. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन 1992 मध्ये डॉ. व्ही. टी. पाटील यांनी स्वयंसिद्धा ही संस्था स्थापन केली. स्त्री शिक्षणासाठी अविरत श्रम घेणाऱ्या डॉ. व्ही. टी. पाटील यांचे स्मारक संस्थेच्या रुपाने उभे राहावे या उद्देशाने कांचनताईंनी 1994 मध्ये डॉ. व्ही. टी. पाटील फाऊंडेशनची स्थापना केली. कोल्हापूर शहरासह राज्यातल्या ग्रामीण भागातही या दोन्ही संस्थेनी विविध उपक्रम राबवून महिलांना स्वयंपूर्ण करण्याचा वसा घेतला आहे.

संस्थेची उद्दिष्ट्ये ः
  • ग्रामीण जनतेला स्वावलंबी करण्यासाठी अनौपचारिक शिक्षणाची व्यवस्था करणे.
  •  स्वयंनिर्भयतेसाठी संघटना, कमावतं साधन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक भान यासाठी आधारसेवा उपलब्ध करून देणे.
  • मनुष्यबळाचा सर्वांगीण विकास, महिला सबलीकरण यासाठी योगदान.
  • विकासोन्मुख अशी ग्रामीण पुनर्रचना करणे.

संस्थेचा विस्तार....
  •  2500 महिला उद्योजिका
  • 150 ट्रेनर्स
  • 50 स्वयंसेवी कार्यकर्त्ये कार्यरत
  • गेली दहा वर्षे राधानगरी, चंदगड तालुक्‍यात कार्य
  • गेली तीन वर्षे शाहुवाडी तालुक्‍यात कार्य

प्रबोधनाचे वेगळे फंडे
  • पाहा पाहण्यामध्ये दिसणे येऊ दे या उद्देशाने सीडीच्या माध्यमातून विविध उद्योगांची माहिती दिली जाते. गाणी. मनोरंजन यातून उद्योजकते वळावे यासाठी मनाची तयारी केली जाते. माहिती व ज्ञान हे सोपे करून सांगणे हाच यातील मुख्य उद्देश आहे.
  •  मुलींसाठी माहेरची झाडी ः बायफ संस्थेने तयार केलेल्या वृक्षारोपन संदर्भातील सिडीद्वारे प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्या मुलीला एक झाड भेट दिले जाते. हे झाड त्या मुलीने स्वतःच्या घराच्या अंगणात लावायचे. लग्नानंतरही माहेरच्या या वृक्षाची जोपासणा त्या मुली करतात. यातून पर्यावरण व निसर्ग प्रेमाचे संवर्धन
  •  विक्री योग्य वस्तु उत्पादनाचे प्रशिक्षण ः करवंद, केळी, दुध, नाचणी, तांदूळ, आंबा, काजू आदी शेतमालावर प्रक्रियेचे प्रशिक्षण, फराळ, लोणची, पापड आदी खाद्य पदार्थासह शिवण, लोकरीपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण.
  •  उत्पादित मालाला बाजारपेठ कशी मिळवायची यासाठी प्रशिक्षण, बोलायचे कसे मालाची विक्री कशी करायची. स्पॉट सेल, प्रदर्शने आदी.
  • विविध संस्थांना भेटी देऊन प्रबोधन
  •  आंबा येथे कृषि पर्यटन वाढीसाठी प्रशिक्षण
  • ग्रामीण कलांचे संवर्धन ः चाळणवाडी येथे तेथील गावातील प्रसिद्ध जाखडी नृत्य व गजनृत्यांची परंपरा जोपासण्यासाठी प्रयत्न
  • शाळा मध्येच सोडलेल्या मुलांना अनौपचारिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न

स्वयंनिर्भयतेसाठी आठवडी बाजार
फावल्यावेळेत महिला हळद पावडर, जॅम, लोणची, पापड, पान मसाला, शेगदाणे लाडू, चिक्की, चकली आदी विविध प्रकारची उत्पादने तयार करू शकतात. पण त्यांची विक्री ही सर्वात मोठी समस्या असते. त्यासाठी महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर शहरातील साईक्‍स एक्‍सटेंन्शनमधील स्वयंसिद्धाच्या जागेमध्ये आठवडी बाजार भरविला जातो. दर बुधवारी दुपारी एक ते तीन या वेळेमध्ये हा बाजार भरतो. शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिला येथे त्यांनी उत्पादित केलेली उत्पादने घेऊन येतात आणि त्याची विक्री करतात.

मल्लेवाडीत सामुदायिक शेती
नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने शहरात राहणाऱ्या अनेक व्यक्तींची शेती मल्लेवाडीत पडीक होती. ही शेती स्वयंसिद्धा गटामार्फत सामुदायिकरित्या केली जाते. या शेतात भुईमुग, भाजीपाला पिके, भात आदी पिके घेतली जातात. यामध्ये बियाणे व खताचा खर्च शेत मालकातर्फे केला जातो. गटातील महिला नांगरट, भांगलणीपासून उत्पादन घेण्यापर्यंत एकत्रितपणे काम करतात. आलेल्या उत्पादनाचा अर्धा हिस्सा शेत मालकाला व अर्धा हिस्सा महिला गटात विभागला जातो. गटाच्या या कार्यामुळे पडिक जमीनींचा विकासही होतो व गावातील सर्वसामान्य कुटूंबाना उपजिविकेसाठी उत्पन्नही मिळते.

जे टिकते त्यावर प्रक्रिया
शेतीमध्ये उत्पादित होणारा माल हा नाशवंत असतो. यासाठी वेळीच त्यावर प्रक्रिया होणे गरजेचे असते. प्रक्रियेच्या अनेक पारंपारिक पद्धती आजही गावामध्ये आहेत. या पद्धतींना आधुनिकतेची जोड देण्याचे काम संस्थेतर्फे केले जाते. महिलांचे संघटन करून बजत गटांना याबाबत मार्गदर्शन केले जाते. फळपिकांपासून लोणची, जॅम, ज्यूस आदी विविध प्रकारची उपउत्पादने घेतली जातात. हे पदार्थ करून त्याची विक्री कशी करायची याबाबतही संस्थेतर्फे मार्गदर्शन करण्यात येते.

महामार्गावर स्टॉलसाठी सहाय्य
शाहुवाडी तालुक्‍यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. पण महाबळेश्‍वरमधील स्ट्रॉबेरी जेव्हा बाजारात येते तेव्हा स्ट्रॉबेरीचा दर अचानक कोसळतो. अशावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान होऊ नये यासाठी येथील स्ट्रॉबेरी उत्पादकांचे गट तयार करण्यात आले. या गटांना स्ट्रॉबेरीवरील प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. येथील अनेक शेतकरी आता विविध उपपदार्थांची निर्मिती करून त्याची विक्री करत आहेत. मलकापूर-निळेपासून आंबाघाटापर्यंत 22 स्टॉलवर स्ट्रॉबेरी तसेच विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री केली जाते. या गटांना संस्थेमार्फत प्लास्टीकचे टेबल, उन्हापासून संरक्षणासाठी छत्री व दोन खुर्च्या दिल्या आहेत. तसेच त्या शेतकऱ्यांना विक्रीबाबतचे प्रशिक्षणही संस्थेने दिले आहे. स्ट्रॉबेरीच्या हंगामात चार महिने हे स्टॉल कार्यरत असतात.

शहरात मोक्‍याच्या ठिकाणी प्रदर्शने
  • स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून दर महिन्याला दोन प्रदर्शने भरविण्यात येतात.
  • स्वयंसिद्धा मार्फतही शहरात विविध ठिकाणी दोन प्रदर्शने भरविली जातात.
  • चार दिवसांच्या एका प्रदर्शनासाठी जवळपास 60 ते 70 हजार रुपये खर्च होतो. यामध्ये 15 लाखांच्या आसपास उलाढाल होते.

प्रयोगापुरते बियाणे वाटप 
पश्‍चिम घाटमाथ्यावरील शेतकरी पाण्याची सुविधा नसल्याने पावसाळी भातानंतर कोणतेही पिक घेत नाही. आठ महिने रान तसेच पडून राहते. ही समस्या विचारात घेऊन संस्थेने विविध प्रयोग केले. यामध्ये आरकेल जातीच्या वाटाणा बियाण्याचे वाटप यशस्वी ठरला. संस्थेतर्फे राधानगरी व शाहुवाडी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना फक्त एकदाच प्रयोगापुरते आरकेल जातीच्या वाटाण्याचे बी पुरविले जाते. हा वाटाणा भात कापणीनंतर उपलब्ध असणाऱ्या ओलाव्यावर व हिवाळ्यात पडणाऱ्या धुक्‍यावर सहज वाढतो. यातून वर्षभर घराला पुरेल इतके उत्पन्न त्यांना मिळते. पाण्याची उपलब्धता असेल तर भरघोस उत्पन्नही मिळू शकते. शेतकऱ्यांना एकदा बियाणे वाटप केल्यानंतर ते शेतकरी आता दरवर्षी भातानंतर वाटाण्याचे पिक घेत आहेत.

शाळांमध्ये गांडूळ खत निर्मिती
शालेय विद्यार्थ्यांना गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. वालूर, सांबू, ऐनवाडी, माळेवाडी या गावातील शाळामध्ये याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जाते. या गावातील शाळेच्या परसबागेतच गांडळू खत निर्मितीचा प्रयोग केला आहे. या शाळेतील हे विद्यार्थी आता घरातील परसबागेतही गांडूळ खताची निर्मिती करत आहेत.

अंदाजे दहा वर्षापूर्वी आम्हाला "स्वयंसिद्धा'कडून पाच हजार रुपयांचे गांडूळ कल्चर युनिट मिळाले. यातून आमच्या कुटूंबाने हा उद्योग सुरु केला. शेणखताच्या उपलब्धतेनुसार दरवर्षी पाच ते दहा टन गांडूळ खत आम्ही तयार करतो. या खताची खरेदी इंडॉल कंपनीकडूनही केली जाते. शेतकरीही खताची खरेदी करतात. 60 रुपये किलोने खताची खरेदी होते. गांडूळ कल्चरचीही विक्रीही आम्ही करतो. खताच्या विक्रीतून वर्षाला खर्च वजा जाता 40 ते 50 हजार रुपये तर कल्चरमधून अंदाजे 10 ते 15 हजार रुपये मिळतात. या व्यतिरिक्त घरच्या शेतीलाही सेंद्रिय खत उपबद्ध होते. रासायनिक खतासाठी लागणारा हजारो रुपयांचा खर्चही वाचला आहे. स्वयंसिद्धामुळेच आम्ही शेतीमध्ये स्वयंसिद्ध झालो आहोत.
- शीतल पाटील, मल्लेवाडी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर

स्वयंसिद्धा संस्था, फोन ः 0231-2525129

Friday, January 23, 2015

कृषी विकासाचा सिद्धगिरी पॅटर्न

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठाने धार्मिक कार्याबरोबरच आता सेंद्रिय शेती, कृषी पर्यटन, देशी गाईंचे संवर्धन असे उपक्रम राबविले आहेत. मठाचे प्रमुख श्री काडसिद्धेश्‍वर अदृश्‍य स्वामींच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्य सुरू आहे. भारतात आढळणाऱ्या 33 देशी गाईंपैकी 20 प्रकारच्या गाईंचे संवर्धन येथे केले आहे. यातून आरोग्यास उपयुक्त असणारी विविध प्रकारची उत्पादनेही घेतली जातात. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा लखपती शेतीचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला आहे. विज्ञानाची कास धरून आध्यात्मिक प्रसाराचे, संस्कृतीचे संवर्धन करणारा हा मठ निश्‍चितच सर्वांसाठी एक आदर्श असा आहे.
- राजेंद्र घोरपडे

देशी गाय ही दूध कमी देते. तिचा संगोपन खर्च हा परवडणारा नाही. अशा विविध कारणांनी देशी गाईंचे संगोपन शेतकरी करण्याचे टाळतात. संकरित गाईंचे वाढते संगोपन यामुळे देशी गाईंची संख्या झपाट्याने कमी झाली. अशाने देशी गाय दुर्मिळ होत आहे. हे लक्षात घेऊन मठाने त्यांच्या संवर्धनासाठी गोशाळा उभारली. देशभरातून या गाई मठाने गोळा केल्या. कोणताही व्यापारी हेतू न ठेवता दुर्मिळ होत चाललेल्या 20 जातींच्या देशी गाईंचे संवर्धन मठाने केले आहे. आज सुमारे 700 गाई, बैल, वासरे येथील गोशाळेत आहेत.

संगोपन केलेल्या गाईच्या जाती
साहिवाल (राजस्थान-गंगानगर), गीर (गुजरात), कॉंक्रिज (गुजरात- कच्छ, मेहसा), देवणी (लातूर, परभणी, नांदेड), लाल कंधारी (नांदेड), डांगी (नाशिक, नगर), थारपारकर (बारमेर, राजस्थान), ओंगली, राठी (नेलोरी, गुंटूर आंध्र प्रदेश), अमृतमहाल (हसन, चिकमंगळूर), हळ्ळीकर( म्हैसूर), कोकण गीड, खिल्लारी कोशी (सांगली, सातारा), खिल्लारी कजरी (सांगली, कोल्हापूर), वेच्चुर (कोट्टायम), पोंगनुर (चित्तूर), उमलचेरी (तंजावर), बारगुर (इरोडे, पेरियार), कंगायम (तमिळनाडू), गावठी गाय (वंश माहिती नसलेली गाय)

सेंद्रिय तुपास मोठी मागणी
गोशाळेत दररोज एक हजार लिटरवर दूध उत्पादन होते. यापासून तूप, ताक याची निर्मिती केली जाते. सेंद्रिय उत्पादन असल्याने तुपाला मोठी मागणी आहे, तर येणाऱ्या पर्यटकांना ताक विकले जाते. याशिवाय पंचगव्यापासून विविध उपपदार्थ तयार केले जातात. गोमूत्रापासून विविध औषधेही तयार केली जातात. याशिवाय सेंद्रिय साबण, धूप याचीही निर्मिती केली जाते. या उपपदार्थांनाही मोठी मागणी आहे. विविध असाध्य व्याधींवर उपचारासाठी देशी गाईंचे हे उपपदार्थ उपयुक्त आहेत.

गोबर गॅस प्रकल्पातून इंधननिर्मिती
गोठ्याच्या ठिकाणीच गोबर गॅसचा प्रकल्प आहे. दररोज तीस अश्‍वशक्ती ऊर्जा तयार होते. दिवसाला पाच ते सहा तास त्याचा वापर केला जातो. गोठ्याशेजारीच असणारे सिद्धगिरी इस्पितळ, गुऱ्हाळघर यांना इंधन म्हणून त्याचा उपयोग केला जातो; तसेच गोबरगॅस प्रकल्पातील टाकावू शेणखतापासून गांडूळ खताचीही निर्मिती केली जाते. या गांडूळ खतासही मोठी मागणी आहे.

सेंद्रिय गुळाचे उत्पादन
मठाच्या शंभर एकरावरील शेतीमध्ये ऊस, चारा पिके, आंबा, भात, भुईमूग आदी पिके घेतली जातात. उसापासून सेंद्रिय गुळ, काकवी आदी उत्पादने घेतली जातात.

सेंद्रिय शेती प्रसाराचे कार्य
मठातर्फे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले जाते. यामध्ये गांडूळ खतनिर्मिती, सेंद्रिय पद्धतीने कीडनाशक, बुरशीनाशके तयार करण्याचे तंत्र शिकविले जाते. अगदी सोप्या पद्धतीने व कमी खर्चात उत्पादित करता येणारी ही उत्पादने शेतीच्या उत्पादनास लाभदायक तर आहेतच; पण त्याबरोबरच विषमुक्त अन्नाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणारीही आहेत. जमिनीचा बिघडत चाललेला पोत सुधारण्याचेही कार्य यातून केले जाते. दोन महिन्यांतून एकदा मोफत या कार्यशाळेचे मठावर आयोजन केले जाते. यामध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचे सेंद्रिय शेतीतज्ज्ञ नारायण रेड्डी तसेच राज्यातील सेंद्रिय उत्पादक शेतकरी मार्गदर्शन करतात. त्यांचे विविध अनुभव सांगतात.

लखपती शेतीचा प्रयोग
एका एकरात वर्षभरात विविध प्रकारची 188 पिके सेंद्रिय पद्धतीने घेऊन पाच व्यक्तीच्या कुटुंबाचा चरितार्थ यशस्वीपणे करता येऊ शकतो, हे दाखविणारा "लखपती शेती'चा प्रयोग येथ करण्यात आला आहे. पिकांचे नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यास खर्च वजा जाता सव्वा लाखांचे उत्पादन एका एकारात घेणे शक्‍य आहे. विशेष म्हणजे हे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतले जाऊ शकते. पौष्टिक, ताजा आहार देणारी ही उत्पादने असल्याने आर्थिक प्रगती बरोबरच आरोग्यही सुदृढ ठेवले जाते.

लखपती शेतीतील पीक नियोजन
वारा पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. याचा विचार करून पश्‍चिमेला उंज वाढणारी म्हणजे उसासारखे पीक 15 गुंठ्यात घेतले जाते. त्यानंतर क्रमशः कमी कमी उंचीची पिके घेतली जातात. यामुळे वादळी वाऱ्यांने पिकांचे संरक्षण होते. नुकसान कमी होते. पिकांना सूर्य प्रकाश अधिक मिळाल्याने उत्पादनातही याचा परिणाम दिसून येतो. पिकांमध्ये व्यापारी पिके, धनधान्याची पिके, मसाला पिके, फळझाडे, कडधान्ये, सर्व प्रकारच्या डाळीचे नियोजन केले जाते. जेणेकरून कुटुंबाची वार्षिक गरज यातून भागू शकेल असे नियोजन असते. वैरणीसाठीही हत्तीगवत, मेथीघास, कडवळही पाच गुंठ्यात घेतले जाते. चाळीस गुंठ्यात इंच इंच जागेचा प्रभावी वापर केला जातो. शेताच्या सीमेवर तुरीचे पिके घेतले असून दोन तुरीमध्ये गवतीचहा, अननस, कडीपत्ता अशी अनेक प्रकारची पीकरचना केलेली आहे. भाजीपाला पिके आठ गुंठ्यात तर भात, भुईमूग, ज्वारी खरीपात व गहू, हरभरा, वाटाणा रब्बी हंगामात नऊ गुंठे जागेवर घेतला जातो. एका एकाराच्या याच जागेत तीन गुंठ्‌यात घर, तीन देशी गाईंसाठी गोठा, संडास बाथरूम, गोबरगॅस, परसबाग, गोबरगॅस आदी बांधण्यात आले आहे.

विजेच्या खांबाभोवतीही पिके
शेतात विजेचा खांब असेल तर त्या परिसरातील जागा ही वाया जाते. त्या ठिकाणी नांगरट योग्य प्रकारे होत नाही; तसेच तेथे पीकही योग्य प्रकारे वाढत नाही; पण या लखपती शेतात त्या जागेचाही सुयोग्य वापर करण्यात आला आहे. खांबाच्या भोवती गोलाकार पद्धतीने मातीचा ढीग करून त्यावर रताळीची लागवड येथे केली आहे. कंदवर्गीय पिके घेऊन या जागेचा योग्य वापरही या लखपती शेतीच्या प्रयोगात केला आहे.


माझ्या बालपणी घरात लागणारे धान्य घरातच पिकविले जायचे. सर्व भाजीपाला घरातील शेतातच पिकवला जायचा. बाजारात जाऊन धान्य, भाजीपाला विकत आणण्याची कधी गरजच भासली नाही. छोट्या शेतातही कुटुंब सुखात जगायचे. आजकाल शेती परवडत नाही ही ओरड ऐकताना तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांचा विचार करता खरच शेती तोट्याची झाली आहे का? यासाठी प्रयोग म्हणून हा लखपती शेतीचा प्रयोग आम्ही येथे केला आहे. एका एकरात पाच माणसांच्या एका कुटुंबाला लागणारे सर्व धान्य, भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने घेता येणे शक्‍य आहे. हे या प्रयोगातून आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. ही संकल्पना पाहून शेतकऱ्यांनीही प्रोत्साहित होऊन शेतीकडे पाहावे. आपले शेत, कुटुंब सधन, स्वयंपूर्ण, आरोग्यसंपन्न करावे हाच या प्रयोगा मागचा आमचा उद्देश आहे. देशी गाईंचे संवर्धन, सेंद्रिय शेतीला चालना व ग्राहकांना विषमुक्त अन्न या घटकांसाठी आम्ही गोशाळेचा उपक्रम सुरू केला आहे.

- श्री काडसिद्धेश्‍वर अदृश्‍य महाराज, कणेरी