शहरातील
धकाधकीच्या जीवनात आनंदासाठी आठवड्यातून एकदा तरी निसर्गाच्या सान्निध्यात जावे,
असे सर्वांनाच वाटते. पर्यटन केंद्रावर जाण्यापेक्षा घरच्या शेतावरच जाऊन निसर्गाचा
आनंद का घेऊ नये? या उद्देशाने कोल्हापूरातील डॉ. आनंद गुरव यांनी वडिलोपार्जित
शेतीशी नाते जोडून घेतले. यामुळे दैनंदिन कामातून थकवा दूर होतो आणि काही प्रमाणात
उत्पन्नही मिळते. राजेंद्र घोरपडे कोल्हापूर शहरातील रंकाळा रोडवर डॉ. आनंद गुरव यांचा दवाखाना आहे. डॉ. गुरव हे बालरोगतज्ज्ञ असून, 2005 मध्ये त्यांनी कोल्हापुरात दवाखान्यास सुरवात केली. गगनबावडा तालुक्यातील असंडोली हे डॉ. गुरव यांचे मूळगाव. वडिलोपार्जित शेतीतील चार एकर शेती डॉ. आनंद यांच्या वाट्याला आली. घरची शेती विकली तर गावाशी असलेली ओळखच नाहीशी होईल, या हेतूने त्यांनी स्वतःची शेती जोपासण्याचा निर्णय घेतला; पण वैद्यकीय व्यवसायातून वेळ कसा मिळणार, हाच मोठा प्रश्न होता. यासाठी त्यांनी शेती भागाने लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतीचे नियोजन सोपे गेले. त्याचबरोबरीने शेती विकासाच्या नवनवीन कल्पना राबविण्याची संधीही मिळाली. असंडोली परिसरातील जांभळी नदीच्या काठावर डॉ. आनंद यांची शेती आहे. निसर्गरम्य परिसर आणि कोदे येथील पाटबंधारे प्रकल्पामुळे पाण्याची मुबलकता या भागात आली आहे. यामुळे बागायती शेत विकण्याचा विचारही त्यांच्या मनात कधी डोकावला नाही. उलट विविध पीक पद्धतीचे नियोजन त्यांच्या डोक्यात येऊ लागले. या परिसरातील स्वच्छ हवा, बाराही महिने हिरवागार निसर्ग सर्वांना खुणावत राहतो. शहरातील धकाधकीच्या जीवनात थोडीशी विश्रांती आणि कामाचा ताण कमी करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस तरी अशा निसर्गाच्या सान्निध्यात जावे, असे डॉ. आनंद यांना मनोमन वाटते. यातूनच त्यांनी शेतीच्या नियोजनात लक्ष घातले. घरच्या चार एकरांच्या शेतीत डॉ. आनंद ऊस, उन्हाळी भुईमूग, भात, सूर्यफूल, मका, काही प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करतात. त्यातून शेती व्यवस्थापनाचा मेळ घातला जातो. कोल्हापूर शहरापासून 25 किलोमीटरवर असंडोली हे गाव आहे, त्यामुळे दररोज वैद्यकीय कामकाजातून शेतावर जाणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे डॉ. गुरव यांनी वाटेकऱ्याच्या साथीने शेतीचे नियोजन केले आहे. दर आठ ते दहा दिवसांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन वाटेकऱ्याबरोबरीने पीक व्यवस्थापनाचे नियोजन डॉ. गुरव करतात. गरजेनुसार पीक पद्धती ठरविली जाते. शेतीसाठी लागणारा निम्मा खर्च डॉ. आनंद करतात, निम्मा खर्च वाटेकरी करतो. येणाऱ्या उत्पन्न निम्मे- निम्मे वाटून घेतले जाते. त्यामुळे पीक उत्पादन वाढीवर सातत्य ठेवले जाते. पीक व्यवस्थापनाचे नियोजन ः - नदीकाठावर जमीन असल्याने ऊस हेच मुख्य पीक आहे. चार एकर शेतात तीन एकरांवर ऊस घेतला जातो. एका एकरात अन्य पिके घेतली जातात. पिकांच्या फेरपालटासाठी नियोजन डॉ. गुरव करतात. - उसाची आडसाली लागवड असते. खोडवाही ठेवला जातो. त्यामुळे खर्चात काही प्रमाणात बचत होते. पूर्वी पारंपरिक पद्धतीने उसाची लागवड होत होती. आता दोन वर्षांपासून रोप पद्धतीने ऊस लागवड केली जाते. परिसरातील साखर कारखान्यातून उसाच्या को-86032 जातीची रोपे खरेदी केली जातात. परिसरातील शेतकरी आणि ऊस तज्ज्ञांच्या सल्ल्याने पीक व्यवस्थापन केले जाते. उसामध्ये काही प्रमाणात मका, भुईमुगाचे आंतरपीक घेतले जाते. - ऊस रोप लागवडीमुळे पिकाचा एक ते दीड महिन्याचा कालावधी वाचतो. लागवड कमी वेळेत पूर्ण होते. उसाची जोमदार वाढ होते. संख्याही योग्य राखली जाते. लागवडीस मजूरही कमी लागतात. सुमारे पाच हजार रुपये खर्चात बचत होते. - सध्या उसाचे एकरी 35 टन उत्पादन मिळते. ऊस लागवड, रोपे, खत, पाणी आणि मजूर व्यवस्थापनासाठी त्यांना एकरी साधारणपणे 45 ते 50 हजार रुपये खर्च येतो. वाटेकरी आणि सर्व खर्च वजा जाता एकरी 20 हजार रुपये मिळतात. - दर दोन वर्षांनी माती परीक्षण करून त्यानुसार पीक निहाय सेंद्रिय आणि रासायनिक खतमात्रेचे नियोजन केले जाते. - शेताच्या बांधावर देशी केळी तसेच आंब्याची कलमे लावली आहेत. - दर वर्षी भाताची एक एकरावर लागवड असते. भाताच्या जया जातीची चारसूत्री पद्धतीने लागवड केली जाते. त्यामुळे उत्पादनात सातत्य आहे. गगनबावडा परिसरात पाऊस अधिक पडत असल्याने येथे भाताची रोप लावणी केली जाते. पिकांच्या फेरपालटीमध्ये उन्हाळी भुईमूग लागवड केली जाते. त्यामुळे कुटंबास वर्षभर पुरेल इतके भात आणि भुईमुगाचे उत्पादन मिळते. - वर्षभरात चार एकर शेतीतून सर्व खर्च वजा जाता सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. उत्पन्नापेक्षा शेतीमध्ये आनंदाने जाणारा वेळ आणि नवनवीन पीक पद्धतीतून शेतीमध्ये होणारा बदल डॉ. गुरव यांना महत्त्वाचा वाटतो. शेतीमधील प्रयोगांना चालना शेती वाटेकरी करतो म्हणून केवळ उत्पन्न घ्यायलाच जायचे, हे डॉ. आनंद यांना पटत नाही. त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासही प्रारंभ केला आहे. बांधावर फळबाग लागवड, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनुभवाचा शेतीत अवलंब, पाणी व्यवस्थापनाच्या नवीन तंत्राबाबत डॉ. गुरव माहिती घेत असतात. या भागात विजेची अनियमितता आहे. त्यामुळे नदीमध्ये पाणी उपलब्ध असूनही पिकाला पाणी देताना अडचणी येतात. काही वेळा पिकाला गरजेच्या वेळी पाणी देता येत नसल्याने उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन डॉ. गुरव पाणीपुरवठ्याच्या पंपावर मोबाईल स्टार्टर बसविणार आहेत. मोबाईलवरून मिसकॉल दिला की मोटर सुरू होते आणि परत मिसकॉल दिला की मोटर बंद होते, त्यामुळे ज्यावेळी वीज असेल त्या वेळी लगेचच मोटार सुरू करणे शक्य होणार आहे. संपर्क ः डॉ. आनंद गुरव ः 9822187049 |
Saturday, June 6, 2015
आनंद'दायी शेतीतून मिळतेय समाधान
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment