Saturday, June 27, 2015

"निसर्ग मित्र' जपतेय पर्यावरण संवर्धनाचा वसा

कोल्हापुरातील "निसर्ग मित्र' ही संस्था प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करीत आहे. यामुळे प्रबोधन होतेच, त्याचबरोबरीने पर्यावरण संवर्धनाला हातभारही लागतो. ग्रामीण आणि सांस्कृतिक वसा जपत या संस्थेने गाव परंपरेचा अभ्यास करत त्या जपल्या जाव्यात, यासाठी राबविलेले उपक्रम ग्रामविकासाला मार्गदर्शक आहेत. 

राजेंद्र घोरपडे

सन 1980 च्या प्रारंभी पक्षी निरीक्षण, जंगल भ्रमण, वृक्षारोपण, परसबाग आदींच्या छंदातून कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील व्यक्ती एकत्र आल्या. यात अनेकांनी पर्यावरणाच्या संवर्धनाचा विचार मांडला. यातूनच "निसर्ग मित्र' या संस्थेची संकल्पना सुचली. सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, डॉ. सुभाष आठले यांनी 1982 मध्ये ही संस्था स्थापन केली. या संस्थेमध्ये डॉ. जय सामंत, वसंतराव शिरगावकर, डॉ. पुष्पा बेर्डे, वनस्पती तज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन, डॉ. विजय करंडे, आदम मुजावर, शेखर पडळकर आदींचा सहभाग होता. सन 1998 मध्ये डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुणांनी निसर्ग मित्रतर्फे विविध उपक्रम सुरू केले. संस्थेतर्फे रंकाळा बचाव, पंचगंगा प्रदूषणाबाबत जागृती, सह्याद्री बचाव, पर्यावरणपूरक गणपती उत्सव, वृक्ष दत्तक उपक्रम, नैसर्गिक रंग निर्मिती प्रकल्प, देवराया वाचविण्यासाठी मोहीम आदी विविध चळवळी राबविल्या जातात. अशा विविध उपक्रमांतून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली जाते. केवळ गप्पा नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून प्रबोधन हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. या संस्थेमध्ये कोल्हापूर महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती, जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन समिती, हरितसेना, कोल्हापूर जिल्हा बांबू मिशन हे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

रानभाज्यांचे बीजसंवर्धन ः
पावसाच्या पाण्यावरच रानभाज्या येतात. पण केवळ पावसावर रानभाज्या येतात की त्याची लागवडही केली जाऊ शकते, याबाबत निसर्ग मित्रतर्फे विविध प्रयोग सुरू आहेत. यासाठी परसबाग कार्यशाळा संस्थेतर्फे घेण्यात आली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या 30 कुटुंबांना 30 प्रकारच्या रानभाज्यांचे बियाणे देण्यात आले. भारंगी, टाकाळा, काटेमाठ, राजगिरा, कुरडू, घेटूळी (पूनर्नवा), वाघाटी, केना, आघाडा, तांदळी, वायवर्णा, चांगेरी (आंबुशी), रानउडीद, घोळ, भोकर, गुळवेल आदी रानभाजांचा यामध्ये समावेश आहे. या भाजांची लागवड परसबागेत, टेरेसवर करून त्याचे उत्पादित बीज इतर 29 कुटुंबांना वाटले जाते. जेणेकरून सर्वांकडे या रानभाज्यांच्या बीजाचे संवर्धन होते. बचत गटाच्या माध्यमातूनही रोपवाटिका करून रानभाज्यांच्या बीजसंवर्धनाचेही संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.

देशी वृक्षांचे बीज संकलन
वसुंधरा दिनाच्या निमित्ताने (22 एप्रिल) दरवर्षी वनौषधी बिया, स्थानिक पारंपरिक जातीची बियाणे जमा करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येते. बेल, शेंद्री, जांभूळ, बकुळ, कडिपत्ता, रिठा, सीताअशोक, जारुळ, बहावा, पारिजातक, सोनचाफा अशा विविध सुमारे 40 प्रकारच्या वृक्षांचे बीज गोळा केले जाते. बीज गोळा करण्याबाबत शास्त्रीय माहिती संस्थेतर्फे देण्यात येते. यंदाच्या वर्षी सुमारे तीन लाख बिया गोळा झाल्या. या बिया विविध गटांमध्ये वाटून त्याची रोपे तयार करण्यात आली. उर्वरित बियाणे सामाजिक वनीकरण विभागाकडे संवर्धनासाठी दिले जाते. या उपक्रमातून स्थानिक जैवविविधता जोपासली जात आहे.

नैसर्गिक रंगाची निर्मिती
रंगपंचमीमध्ये नैसर्गिक रंग वापरले जावेत, यासाठी त्यांची निर्मिती आणि प्रबोधन संस्थेतर्फे केले जाते. संस्थेने पळस, काटेसावर, पांगिरा, बेल, पारिजातक, बहावा, मेहंदी, शेंद्री, हिरडा, बेहडा, झेंडू, गुलाब, खैर, नीलमोहर, जास्वंद अशा 23 झाडांचा अभ्यास केला. यांच्या फुलापासून नैसर्गिक रंगही तयार केले. निर्माल्यातून तसेच हार विकणाऱ्यांच्याकडून टाकाऊ फुलातूनही नैसर्गिक रंग तयार करण्यात आले आहेत. वनस्पतीजन्य रंग निर्मितीसाठी आदर्श बचत गटाच्या माध्यमातून हे काम हाती घेतले आहे.

सौरऊर्जेवर चूल
संस्थेचे सदस्य पराग केमकर यांनी सौरऊर्जेच्या चुलीचे विविध प्रकार तयार केले आहेत. गिफ्ट पेपर आणि पुठ्ठ्याच्या मदतीने ही सौर चूल करता येते. या सौर चुलीसाठी अन्न शिजविण्यासाठी दोन डबे लागतात. साधारणपणे पाचशे रुपयांत ही चूल तयार होऊ शकते. गिफ्ट पेपरऐवजी रेडियम पेपर व फायबरचा पुठ्ठाही वापरून टिकाऊ चूल तयार करता येऊ शकते. सौर चूल तयार करण्यासाठी साधनसामग्रीनुसार सुमारे 100 ते 1200 रुपये खर्च येतो. वर्षातील दोनशे दिवस ही चूल वापरून खाद्यपदार्थ शिजविता येतात. यामुळे सिलिंडरचा खर्च वाचतो, पर्यावरणाचे संरक्षण होते. ही चूल फ्लोडिंगची असल्याने कोठेही नेता येऊ शकते. प्रकाशवर्षाच्या निमित्ताने या चुलीचा प्रसार करण्याचे कार्य निसर्गमित्र संस्थेने हाती घेतले आहे. ही चूल तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाते. आत्तापर्यंत सुमारे सातशे जणांनी ही सौर चूल तयार करून वापरही सुरू केला आहे.

संस्थेचे विविध उपक्रम ः
  •  दिवाळीत प्रदूषण रोखण्यासाठी फटाके उडवू नका? हा संदेश दिला जातो. तसेच या सुटीमध्ये फटाके न उडविणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी निसर्ग सहलीचे आयोजन केले जाते. फटाक्‍यांवर होणाऱ्या वायफळ खर्चातून ही सहल होते. 
  • जलप्रदूषण रोखण्यासाठी नैसर्गिक रंगाने रंगविलेल्या शाडूच्या गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याचा उपक्रम गेल्या 12 वर्षांपासून संस्था राबवीत आहे. 
  • "कचरा व्यवस्थापन' याविषयी जागृती करण्यासाठी शिवछत्रपती यांच्या कचराविषयीच्या आज्ञापत्राची आकर्षक पत्रके करून शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे, तरुण मंडळे यांना देऊन प्रबोधन केले जात आहे. 
  • कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण. 
  • कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती आणि खतनिर्मितीबाबत मार्गदर्शन. 

देवराया वाचवूया उपक्रम ः
संस्थेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील देवराया संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यासाठी जिल्ह्यातील 250 च्यावर देवरायांचा अभ्यास संस्थेने केला. या देवरायांची वैशिष्ट्ये जाणून घेतली. देवराईमध्ये असणाऱ्या जैवविविधतेची माहितीही स्थानिकांना दिली जाते. "देवराया वाचवूया, श्रद्धावने तयार करूया' या उपक्रमाअंतर्गत देवरायातील वृक्षांचे बी गोळा केले जातात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या रोपांची लागवड परिसरात केली जाते. भारतीय संस्कृतीतील विविध सणांसाठी लागणारे वड, आपटा, बेल, कडुलिंब आदी वृक्षांची लागवड केली जावी, यासाठी प्रबोधनाबरोबरच प्रयत्नही केले जातात.

वैशिष्ट्यपूर्ण देवराया ः
  • पाल देवराई ः भुदरगड तालुक्‍यातील पाल येथील देवराईमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. येथील वृक्षांचा विस्तार मोठा असल्याने परिसरात गारवा राहतो. या वृक्षांच्या डोलीत घुबड, वेडाराघू, ससाणे, दयाळ आदी पक्षांचे वास्तव्य आहे. 
  • आंबेश्‍वर देवराई ः शाहूवाडी तालुक्‍यातील आंबा येथे पाच एकरांत ही देवराई आहे. येथे कासा, सोनचाफा, आंबा, पिंपर्णी, वड, किंजळ, बांबू, सातवीण, कदंब, कुंकुफळ असे विविध वृक्ष आहेत. ही देवराई वनौषधीने बहरलेली आहे. 
  • कुरकुंभेश्‍वर देवराई ः यात्रेमध्ये कोंबडे देण्याची प्रथा अनेक गावांत असते. पण आजरा तालुक्‍यातील पेरणोली येथील करकुंभेश्‍वर देवराईमध्ये मात्र जिवंत कोंबडे सोडण्याची प्रथा आहे. या देवराईमध्ये असणाऱ्या वन्यप्राण्यांना खाद्य म्हणून गावकरी कोंबडे सोडतात. वन्यप्राणी भक्षासाठी गावात प्रवेश करू नयेत, हा या मागचा हेतू आहे. 

शेवगा महोत्सव ः
शेवगा खाल्ल्याने क्षारधर्म वाढतो. यासाठी पावसाच्या सुरवातील शेवग्याची भाजी खावी असे शास्त्र आहे. याबाबत प्रबोधनासाठी दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात (मृग नक्षत्राच्या प्रारंभी) शेवगा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये शेवग्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखवली जातात. शेवग्याचे सूप, भजी, कढी, आमटी, वडी, थालीपीठ, झुणका, शेवगा फ्राय, चटणी, कटलेट, अशा विविध 63 प्रकारच्या पाककृती या महोत्सवात दाखविल्या जातात.


संपर्क ः 9423858711 अनिल चौगुले (कार्यवाह, निसर्ग मित्र)



No comments:

Post a Comment