Thursday, April 28, 2011

धनलोभी

ऐसेनि धना विश्‍वाचिया । मीचि होईन स्वामिया ।
मग दिठी पडे तया । उरों नेदी ।।

पैसा हा सध्याच्या नव्या युगाची अत्यावश्‍यक गोष्ट आहे. पैसा असेल तर सर्व काही सुलभ होते. पैशाशिवाय आज माणसाला काहीच किंमत नाही. यामुळे प्रत्येकजण पैशाच्या मागे धावत आहे. या धनाच्या लोभातूनच अनेक प्रश्‍न उत्पन्न होत आहेत. खून, मारामाऱ्या तर आजकाल नेहमीच्याच घटना झाल्या आहेत. तसे पूर्वीच्या काळीही ह्या समस्या होत्या. राजेशाहीत स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी, वाढविण्यासाठी लढाया होत होत्या. सारा कोणी वसूल करायचा यातून वाद होत होते. पैशासाठीच ह्या लढाया झाल्या. सध्यातर कोणताही काम धंदा न करणारी गुंड माणसे लोकांकडून हप्ते वसूल करून स्वतःचे गुंडगिरीचे साम्राज्य प्रस्थापित आहेत. पैशाच्या लोभानेच हे साम्राज्य उभे राहात आहे. चंगळवादातून गुन्हेगारी वाढत आहे. यामध्ये अशिक्षित आहेत, असे नाही तर सुशिक्षितांचीच संख्या अधिक आहे. अनेक शिकली सवरलेली माणसेच हे काम करत आहेत. राजकिय नेते तर ही माया जमविण्यासाठी रोज नवनव्या युक्‍त्या शोधतात. त्याचा अवलंब करतात. योजना राबविण्यापेक्षा त्यातून किती माया आपणास जमा करता येते. यावरच त्यांचा भर अधिक असतो. अशा योजनांसाठी ते दिल्ली वाऱ्या, मंत्रालयाचे खेटे मारतात. योजनेचा पैसा लाटण्यातच त्यांना अधिक रस वाटतो. पैसा कमविण्यात मठ, मंदीरेही मागे नाहीत. अशाने अध्यात्माचा खरा अर्थच नष्ट झाला आहे. अनेक साधूंनी वैराग्याच्या नावाखाली भलीमोठी माया जमविलेल्याची अनेक उदाहरणे आहेत. सर्वाधिक पैसा कमविणारे देवस्थान सर्वाधिक श्रेष्ठ समजले जाते. हा बदललेल्या समाजाचा आरसा आहे. उलट अशा पद्धतीने अध्यात्मातही बदल करायला हवेत असे तत्त्वज्ञानही ही मंडळी सांगत आहेत. पैसा हेच वर्चस्व आहे. असा ग्रह त्यांचा झाला आहे. पैशाने सारे जग जिंकता येते असे त्यांना वाटते. पण समाधान जिंकता येत नाही हे परखड सत्य आहे. पैशाचा मोह माणसाला संपवितो. हा मोह सुटला कि मग समाधानच समाधान. या समाधानातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते.


राजेंद्र घोरपडे 9011087406

Monday, April 25, 2011

अती तेथे माती

कारण जें जीविता । तें वानिलें जरी सेवितां ।
तरी अन्नचि पंडुसुता । होय विंष ।।

कोणतीही गोष्ट अती केली की त्याचे दुष्परिणाम हे भोगावेच लागतात. जेवन सुद्धा प्रमाणातच जेवायला हवे. अन्यथा अपचन होते. अती अभ्यासामुळे परिक्षेत नापास झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. पिकांना रासायनिक अधिक खत दिल्यास पिके जळून जातात. पाणी अधिक दिल्यास पिकांची वाढ खुंटते. यासाठी कोणतीही गोष्ट प्रमाणातच असायला हवी. प्रत्येकात चांगले तसेच वाईट गुण हे आहेतच. निसर्गाची ती देणगीच आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा व्हायला नको. निसर्गाचे नियम हे तोडता येत नाहीत. निसर्गापुढे मनुष्य काहीही करू शकत नाही. शोध कितीही लागले. प्रगती कितीही केली तरी निसर्गाच्या शक्तीशी वैर करून चालत नाही. त्या शक्तीचा योग्य उपयोग करून घ्यायला शिकले पाहीजे. पाऊस पडतो. पण या पडणाऱ्या पावसाचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा. कधी पाऊस अधिक पडतो, तर कधी पडतच नाही. पण पडणाऱ्या पावसाचा थेंब अन थेंब हा मातीत जिरवायला हवा. तो साठवता यायला हवा. नैसर्गिक पावसावरच आपले जीवन अवलंबून आहे. तो ठेवा जपायला हवा. पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याची कारणे शोधायला हवीत. तेथील वृक्षसंपदा जपायला हवी. जगाचे तपमान वाढत आहे. ते का वाढत आहे. या मागची कारणे शोधायला हवीत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदुषण वाढत आहे. ते रोखायला हवे. निसर्गाच्या नियमांचा आपल्या जीवनात लाभ उठवता यायला हवा. निसर्गाचा प्रकोपलाही मानवी चुका तितक्‍याच कारणीभूत आहेत. हे विसरता कामा नये. मानवी चुकात सुधारणा व्हायला हवी. निसर्गाच्या नियमांचे पालन हे करायलाच हवे. मानवाचा श्‍वासोच्छास्वही नैसर्गिक आहे. साधनेने याची अनुभूती येते. त्या नैसर्गिक शक्तीची जाणिव होते. ती नैसर्गिक शक्ती आपल्यामध्येही आहे. याचा अनुभव होतो. यासाठी साधना ही करायला हवी. आत्मज्ञानप्राप्तीसाठी साधना करायला हवी.

राजेंद्र घोरपडे 9011087406

Saturday, April 23, 2011

आध्यात्मिक तेज

ऐसें ईश्‍वराकडे निज । धावें आपसया सहज ।
तया नावं तेज । आध्यात्मिक तें ।।

जपानमध्ये त्सुनामी आली. ही दृष्ये पाहताना निसर्गाचा कोप काय असतो हे स्पष्ट दिसले. निसर्गापुढे कोणाचेही काही चालत नाही याची जाणीव झाली. अशा प्रसंगामुळे आपणास देवाची आठवण जरूर होते. ठेच लागल्यावर जशी आईची आठवण होते. तोंडातून अगदी सहजपणे आई गं.. असे शब्द बाहेर पडतात. एकंदरीत संकटाच्या काळात आपणास देवाची आठवण होते. इतरवेळी देवाची आठवण होत नाही. भीतीमुळे आपण देवाकडे वळतो. आधाराची गरज वाटते. पण प्रत्यक्षात अध्यात्मात असे काही नाही. नित्य देवाचे स्मरण करावे. आनंदी राहावे. विधीलिखीत आहे ते टाळता येत नाही. घडणारे घडतच राहणार. प्राप्त परिस्थितीत आनंदी कसे राहता येईल व दुसऱ्यांना कसे आनंदी ठेवता येईल हेच महत्त्वाचे आहे. नव्या पिढीमध्ये देवाचा ओढा फारसा दिसत नाही. पुर्वीच्या काळी सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर देवाची स्तोत्रे म्हटली जायची. संध्याकाळची सुरवातही देवाच्या स्मरणाने व्हायची. पण आताच्या काळात असे फारसे आढळत नाही. हे संस्कार आताच्या पिढीत नाहीतच. फक्त संकटे आली की मगच देवाचे स्मरण होते. इतर वेळी नुसता दिखावा केला जातो. एवढेच काय देव धर्म मानणाऱ्या व्यक्तीला वेळेचा दुरपयोग करणारा मुर्ख असे समजले जाते. बदलत्या काळात वेळेला अधिक महत्त्व आले आहे. कमी वेळात किती नफा कमविला हेच पाहिले जाते. यावरच प्रगती ठरविली जाते. जग वेगाने बदलत आहे. बदलत्या जगाचा वेग अधिक आहे. यानुसार माणसालाही धावावे लागत आहे. पूर्वी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या गाड्या आता ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने धावत आहेत. वेग वाढला म्हणून पृथ्वीचा फिरण्याचा वेग काही वाढलेला नाही. तो स्थिर आहे. यासाठी ह्रद्‌याचे ठोकेही स्थिर ठेवणे आवश्‍यक आहे. ते वाढले तर ह्रद्‌यविकाराचा झटका बसू शकतो. हे लक्षात घ्यायला हवे. हे स्थिर ठेवण्यासाठीच शरीराला स्थिरतेची गरज आहे. ही स्थिरता योगातून येते. आध्यात्मिक विचारातून येते. ईश्‍वराच्या सतत स्मरणातून जीवनात ही स्थिरता येते. एकदा या स्थिरतेची ओढ लागली की आपोआप देवाचे स्मरण घडते. ती ओढ लागते. हे जे सहजपणे देवाकडे ओढणे, धावणे आहे त्यालाच आध्यात्मिक तेज असे म्हटले जाते.


राजेंद्र घोरपडे 9011087406

Tuesday, April 19, 2011

चला पंचगंगा वाचवू या....

आपल्या देशात दुरगामी विचार करून कोणताही प्रकल्प किंवा योजना राबविली जात नाही. केवळ काही वर्षापूरताच होणारा फायदा विचारात घेतला जातो. हे परखड सत्य आहे. नियोजनाचा अभाव आपल्या देशात मोठ्या प्रमाणात याचमुळे दिसून येत आहे. नद्यावर धरणे बांधली. यामुळे सिंचनाखालील तसेच औद्योगिक क्षेत्राला फायदा झाला. पण तो फायदा किती झाला याचे मोजमापही विचारात घ्यायला हवे. पाणी हे जीवन आहे. याचा विचार करून त्याचा वापर करायला हवा.
शहरांसाठी थेट पाईपलाईन योजना राबविली जाते. थेट पाईप लाईनमुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा शहराला होऊ शकतो. हे खरे आहे. पण नदीतील पाणी प्रदुषित करणे योग्य नाही. नदीतील प्रवाही पाण्याचे प्रदुषण रोखणे हे तितकेच गरजेचे आहे. नदीच्या प्रवाही पाण्यात शहरातील सांडपाणी सोडून देऊन नद्यांची गटारगंगा करणे हे योग्य नाही. थेट पाईपलाईन ने शहरांचा विकास केला. पण शहरात आलेल्या या पाण्याचे सांडपाण्यात रुपांतर होऊन ते पुन्हा नदीत का सोडले जाते. ही योजना राबविताना सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणारी योजनाही मंजूर करणे आवश्‍यक नव्हते का? जितके पाणी आपण शहराला पुरवतो. तितके पाणी हे सांडपाणी होणार याचा विचार तेव्हाच का केला गेला नाही? का केवळ नफाच पाहीला जातो. पंचगंगा नदीकाठी सुमारे 170 गावे आहेत. त्यांना हे दुषित पाणी मिळणार याचा विचार तेव्हाच व्हायला हवा होता. कोल्हापूर समतेच्या विचारांसाठी प्रसिद्ध आहे. मग शहर आणि ग्रामीण भागामध्ये फारकत का? शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी थेट पाईपलाईन व खेड्यांना सांडपाणी मिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी. हा कोणता न्याय. विकास करताना समतेचा विचार का मांडला गेला नाही?
अमेरिकेत सध्या नद्यावरील धरणे फोडण्यास सुरवात झाली आहे. कारण ही धरणे आता कालबाह्य झाली आहेत. ही धरणे सांभाळण्यापेक्षा ती फोडणेच अधिक फायद्याचे आहे असे अमेरिकेला वाटत आहे. कारण या धरणांच्या पाण्यातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा डागडुजी आणि दुरुस्तीचा खर्चच अधिक होत आहे. हे अर्थशास्त्र तिथे मांडले गेले आहे. आपल्याकडे असा शास्त्रोक्त विचार केव्हा केला जाणार? नद्यांचा प्रवाह रोखला गेल्याने पाण्याचे प्रदुषण वाढत आहे. नैसर्गिक जैवविविधता नष्ट होत आहे. आता ही धरणे फोडून नद्यांची जैवविविधता, वाहत्या पाण्याचे सौंदर्य आदीची जोपासना अमेरिकेत केले जात आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या या उपक्रमाचा विचार आपणही करायला हवा. कारण काही वर्षांनी आपलीही ही धरणे कालबाह्य होणार आहेत. याच्या डागडुचीचा खर्च त्यावेळी किती असेल व त्याचा फायदा किती असेल याचे गणित आपण मांडायला हवे? ही समस्या आपणासही भेडसावणार आहे याचा विचार आत्ता पासूनच करायला हवा. अमेरिकेत लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे तेथे तोडाफोडीचा फारसा परिणाम तेथील जनजीवनावर होत नाही. पण आपणास बांधलेली धरणे फोडणे परवडणारे आहे का? ही धरणे डागडुजी करत किती वर्षे टिकवली जाणार? यावर किती खर्च होणार? धरण तोडण्याचीच वेळ आली तर शहरांना पाणी मिळणार कोठून ? यासाठी विकास साधताना हा पुढील विचार करायलाच हवा. यासाठीच नद्यांचा नैसर्गिक प्रवाह टिकवायला हवा. प्रदुषणही यामुळे कमी होते. जैवविविधताही जोपासायला हवी. पंचगंगा नदीचा प्रवाह टिकवायला हवा. त्याची गटारगंगा होऊ नये यासाठी प्रयत्न हा व्हायलाच हवा.
कोणताही विकास साधताना दुरगामी परिणामांचा विचार हा करायलाच हवा. सर्वबाजूंनी विचार व्हायला हवा. तसे सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. सांडपाणी नदी सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करून सोडले गेल्यास प्रदुषण कमी करता येऊ शकते. याचा विचार हा व्हायलाच हवा. सांडपाण्यावर प्रक्रिया केले जाणारे प्रकल्प हे उभारले जावेत. यासाठी आत्ताच विचार व्हायला हवा. याचे नियोजन आता करण्याची खरी गरज आहे. या दृष्टीने समाजाला जागृत करण्याची गरज आहे. महानगरपालीकेने यासाठी विचार करायला हवा.
शहरात पाण्याचा वापर वाट्टेल तसा केला जातो. पाण्याचा बचत करण्यास लोकांना प्रोत्साहित करायला हवे. पाणी वाचविण्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करायला हवे. यासाठी आसपासच्या खेड्यात पाण्याची कशी समस्या उभी आहे. याचा विचार शहरातील जनतेने करायला हवा? तेथे पाण्यासाठी भटकंती होते. वीजेचा पुरवठाही अनियमित असतो. भारनियमनामुळे खेड्यांचा विकास खुटला आहे. शहरांचा विकास साधताना खेड्यातील ह्या परिस्थितीकडे एक नजर ही टाकायलाच हवी. पंचगंगा नदी वाचवूया या अभियानाच्या निमित्ताने नदी प्रदुषणाचा नदी काठच्या खेड्यावर कसा परिणाम होतो आहे. याचा अभ्यासही व्हायला हवा. नद्या वाचविण्यासाठी खेडी- शहरांनी एकत्र लढा उभा करायला हवा. तरच भावी भविष्य उज्ज्वल राहील. अन्यथा विकासाची ही गंगा गटारीतच संपेल.


राजेंद्र घोरपडे, 9011087406

Friday, April 15, 2011

आर्जव

आता बाळाचां हिती स्तन्य । जैसे नानाभूती चैतन्य ।
तैसे प्राणिमात्री सौजन्य । आर्जव तें ।।

लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्येचा हा विस्फोट धोकादायक आहे. यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. या प्रश्‍नांमुळे माणसाचे दैनंदिन जीवन अस्थीर होत चालले आहे. त्यांच्या मनाची शांती, मानसिकता ढळत चालली आहे. तो चिडचिडा होताना पाहायला मिळत आहे. सगळीकडे गोंगाटामुळे तो शांतीच्या शोधात जरूर आहे. अशा वेळी त्याला योग्य मार्ग, दिशा सापडणे गरजेचे आहे. अन्यथा तो भरकटेल. त्याच्यातील माणूसकी नष्ट होईल. ही भीती आहे. कारण शेवटी मनूष्य हा माकड कुळातीलच आहे. यामुळे माणसात माकड कृत्ये जागृत होणास फारसा वेळ लागत नाही. पण माणूस आणि माकडात फरक आहे. हेही विसरता कामा नये. माणसाला मन आहे. विचार करण्याची बुद्धी आहे. जगण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. त्यात अडचणी आल्या की, त्याची मानसिकता ढळते. मनासारखे घडत नसेल तर तो निराश होतो. या नैराश्‍येतूनच त्याच्या मनाचा समतोल ढळतो. काहीजण अशा या त्याच्या वृत्तीचा फायदा उठवतात व त्याच्या स्वांतत्र्यावर हल्ला चढवतात. अशाने त्याचा समतोल ढळतो. पण या वृत्तीचा सामना करण्याचे सामर्थ तो त्याच्या मनामध्ये उत्पन्न करू शकतो. कितीही कोणी खिचवण्याचा, चिडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तो शांतपणे सामोरे जाऊ शकतो. चिडचिडापणा सोडून देऊन प्रेमाने, मधूर वाणीने तो इतरावर आपली माया पसरवू शकतो. पण यासाठी मनाची मोठी तयारी करावी लागते. अहिंसेचा विचार सतत मनात जागृत ठेवायला हवा. सामंजस्याने अनेक प्रश्‍न सोडवले जाऊ शकतात. यासाठी बोलण्यात, वागण्यात तशी मृदूता यायला हवी. बालकाला जर भूक लागली असेल तर याची जाणिव मातेला लगेच होते. ती त्याला लगेच जवळ घेते आणि पाजवते. त्याला तृप्त करते. प्रत्येक प्राणिमात्रामध्ये हा गुण आहे. हे स्नेह, हा जिव्हाळा, हा पान्हा प्रत्येक प्राणिमात्रात पाहायला मिळतो. मातेचे दूध मुलाला हितकारक असते. त्यामुळे बालकात रोग प्रतिकारक शक्ती वाढते. प्रत्येक प्राणिमात्रात आढळणारे हे प्रेम नैसर्गिक आहे. प्राणिमात्रामध्ये असणारे हे प्रेम, हे सौजन्य यालाच आर्जव असे म्हटले आहे. या प्रेमाने जग जिंकता येते. सध्याच्या धकाधकीच्या युगात अशा विचारांची, प्रेमाची गरज माणसाला अधिक वाटणार आहे. जैन धर्मामध्ये क्षमा व मार्दवा पूजाचे आर्जव तत्त्व हे सरळ मार्गाने जीवन जगण्याचा संदेश देते. जणू काही तोच धर्माचा पाया आहे. व्यक्तीने आचारात अहिंसा, विचारात अनेकांतवाद आणि वाणित मधूरता आणली पाहिजे.


राजेंद्र घोरपडे 9011087406

Saturday, April 2, 2011

संगतीचा परिणाम

पाणी बुडऊ ये मिठातें । तंव मीठची पाणी आतें ।
तेवीं आपण जालेनि अद्वैतें । नाशेभय ।।

पाण्यात मीठ टाकले तर पाणी खारट होते. पाण्यात साखर टाकली तर पाणी गोड होते. पाण्याचा संग कोणाशी होतो यावर त्याची चव ठरते. तसे चांगल्याची संगत केली तर चार चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. वाईटाच्या संगतीत चार वाईट सवयी लागू शकतात. मीठ पाण्यात टाकल्यावर ते त्यामध्ये विरघळते. यामुळे ते खारट लागते. पण अशुद्ध मिठ त्यापाण्यामुळे शुद्ध होते. अशुद्ध मीठ शुद्ध पाण्यात टाकून ते शुद्ध करता येते. शुद्ध, सात्विक वृत्तीच्या सानिद्धात राहील्यावर आपल्यावरही त्या चांगल्या संस्काराचा प्रभाव पडतो. पण सध्याच्या युगात चांगल्या गोष्टी कोणत्या हे ठरविणेच अवघड झाले आहे. मठामध्येही भ्रष्टाचार बोकाळला आहे. अनेक वाईट गोष्टी मठामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत. अशावेळी सुसंस्कृत ठिकाणे कशी शोधायची हा मोठा प्रश्‍न आहे. अशाने धर्माची बदनामीही होत आहे. याबाबत अपप्रचारही केला जात आहे. स्पर्धेच्या, चढाओढीच्या युगात प्रत्येकजण एकमेकाला खाली खेचण्याचेचे प्रयत्न करत आहे. अशाने वाईट गोष्टींना प्रोत्साहन मिळत आहे. अनेक समस्यांनी त्रस्त अशा वातावरणात सात्विक ठिकाणे मिळणार कोठे? चांगली ठिकाणे नाहीत याचा अर्थ धर्म संपला आहे. असे नाही. चांगला विचार हाच खरा धर्म आहे. चांगल्या विचारांची पुस्तके हीच सात्विक विचारांची ठिकाणे आहेत. ती शोधणे गरजेचे आहे. चांगल्या विचारांच्या संगतीत, चांगल्या विचारांच्या पुस्तकांच्या संगतीत आपोआपच चांगल्या गोष्टीची संगत घडते. स्वतःलाच ही सवय लावली तर इतरही त्यामध्ये सहभागी होतील. इतरांनीही ही सवय लागेल. मुख प्रचारातूनच चांगल्या गोष्टींचा प्रसार होऊ शकतो. यातूनच चांगले व्यासपीठ उभे राहू शकते. दुसरा भ्रष्ट कारभार करतो म्हणून स्वतः भ्रष्ट कारभार करणे योग्य नाही. दुसऱ्याने हात काळे केले याचा अर्थ आपणही काळे केले चालते हे चूक आहे. चांगल्या संगतीत राहीला तर चांगले संस्कार घडतील. लोक चांगले म्हणतील. चांगल्या विचारात राहील्यावर वाईटाची भीती कसली?

राजेंद्र घोरपडे 9011087406