आता बाळाचां हिती स्तन्य । जैसे नानाभूती चैतन्य ।
तैसे प्राणिमात्री सौजन्य । आर्जव तें ।।
लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्येचा हा विस्फोट धोकादायक आहे. यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. या प्रश्नांमुळे माणसाचे दैनंदिन जीवन अस्थीर होत चालले आहे. त्यांच्या मनाची शांती, मानसिकता ढळत चालली आहे. तो चिडचिडा होताना पाहायला मिळत आहे. सगळीकडे गोंगाटामुळे तो शांतीच्या शोधात जरूर आहे. अशा वेळी त्याला योग्य मार्ग, दिशा सापडणे गरजेचे आहे. अन्यथा तो भरकटेल. त्याच्यातील माणूसकी नष्ट होईल. ही भीती आहे. कारण शेवटी मनूष्य हा माकड कुळातीलच आहे. यामुळे माणसात माकड कृत्ये जागृत होणास फारसा वेळ लागत नाही. पण माणूस आणि माकडात फरक आहे. हेही विसरता कामा नये. माणसाला मन आहे. विचार करण्याची बुद्धी आहे. जगण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. त्यात अडचणी आल्या की, त्याची मानसिकता ढळते. मनासारखे घडत नसेल तर तो निराश होतो. या नैराश्येतूनच त्याच्या मनाचा समतोल ढळतो. काहीजण अशा या त्याच्या वृत्तीचा फायदा उठवतात व त्याच्या स्वांतत्र्यावर हल्ला चढवतात. अशाने त्याचा समतोल ढळतो. पण या वृत्तीचा सामना करण्याचे सामर्थ तो त्याच्या मनामध्ये उत्पन्न करू शकतो. कितीही कोणी खिचवण्याचा, चिडवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तो शांतपणे सामोरे जाऊ शकतो. चिडचिडापणा सोडून देऊन प्रेमाने, मधूर वाणीने तो इतरावर आपली माया पसरवू शकतो. पण यासाठी मनाची मोठी तयारी करावी लागते. अहिंसेचा विचार सतत मनात जागृत ठेवायला हवा. सामंजस्याने अनेक प्रश्न सोडवले जाऊ शकतात. यासाठी बोलण्यात, वागण्यात तशी मृदूता यायला हवी. बालकाला जर भूक लागली असेल तर याची जाणिव मातेला लगेच होते. ती त्याला लगेच जवळ घेते आणि पाजवते. त्याला तृप्त करते. प्रत्येक प्राणिमात्रामध्ये हा गुण आहे. हे स्नेह, हा जिव्हाळा, हा पान्हा प्रत्येक प्राणिमात्रात पाहायला मिळतो. मातेचे दूध मुलाला हितकारक असते. त्यामुळे बालकात रोग प्रतिकारक शक्ती वाढते. प्रत्येक प्राणिमात्रात आढळणारे हे प्रेम नैसर्गिक आहे. प्राणिमात्रामध्ये असणारे हे प्रेम, हे सौजन्य यालाच आर्जव असे म्हटले आहे. या प्रेमाने जग जिंकता येते. सध्याच्या धकाधकीच्या युगात अशा विचारांची, प्रेमाची गरज माणसाला अधिक वाटणार आहे. जैन धर्मामध्ये क्षमा व मार्दवा पूजाचे आर्जव तत्त्व हे सरळ मार्गाने जीवन जगण्याचा संदेश देते. जणू काही तोच धर्माचा पाया आहे. व्यक्तीने आचारात अहिंसा, विचारात अनेकांतवाद आणि वाणित मधूरता आणली पाहिजे.
राजेंद्र घोरपडे 9011087406
No comments:
Post a Comment