Tuesday, December 22, 2009

पाणी प्रदूषणाची वाढती समस्या

पाणी प्रदूषणाची वाढती समस्या

लोकसंख्येच्या विस्फोटामुळे सर्वत्र झपाट्याने शहरीकरण होताना दिसत आहे. शहरांतील दुर्गंधीयुक्त सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जाते, यामुळे नद्यांतील पाणी दूषित होत आहे. औद्योगीकरणातील सांडपाण्यामुळेही नदीचे पाणी दूषित होत आहे. निकेल आणि झिंक यांसारखी विषारी मूलद्रव्ये या सांडपाण्यात असतात. शेतकरी शेतामध्ये खते, कीटकनाशके आदींचा वापर करतो; पण या रासायनिक द्रव्यांचा निचरा पाण्यावाटे होऊन हे पाणी शेवटी नदीतच मिसळते. कोळशाच्या तसेच इतर खनिजांच्या खाणीच्या सांडपाण्यातूनही पाण्याचे प्रदूषण होत आहे. असे हे दूषित पाणी नदीतच सोडण्यात येत असल्याने नदीच्या पाण्याचे प्रदूषण सध्या वाढत आहे, याकडे आज लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
भूगर्भातील पाण्यातही काही विषारी मूलद्रव्ये आढळतात. हे पाणी पिकांना दिल्यास यातून ही मूलद्रव्ये पिकांमध्ये प्रवेश करतात. बांगलादेश, अमेरिका तसेच भारतातील गंगा नदीकाठच्या भातामध्ये प्रमाणापेक्षा अधिक अर्सेनिक आढळले आहे. बांगलादेशात करण्यात आलेल्या एका पाहणीत भाताच्या मुळात 2.4 मिलिग्रॅम प्रति किलो, खोड आणि पानांमध्ये 0.73 मिलिग्रॅम प्रति किलो व तांदळामध्ये 0.14 मिलिग्रॅम प्रति किलो अर्सेनिक आढळले आहे. बांगलादेशातील भाताच्या विविध 13 जातींमध्ये 0.058 ते 1.835 मिलिग्रॅम प्रति किलो अर्सेनिक आढळले आहे, तर अमेरिकेत 0.2 ते 0.46 मिलिग्रॅम व तैवानमध्ये 0.063 ते 0.2 मिलिग्रॅम प्रति किलो अर्सेनिक आढळले आहे. नदीतील प्रदूषित पाणी पिकांना दिल्यास पिकामध्ये हे रासायनिक घटक प्रवेश करतात, तेच घटक माणसाच्या आणि जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. काही भागांत यामुळे विविध विकारही झालेले आढळले आहेत.
तुंगभद्रेचे पाणी हिरवे झाल्याने बेल्लारी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. पाण्यात रासायनिक प्राणवायू (सीओडी) 1125 मिलिग्रॅम, जैविक प्राणवायू (बीओडी) 200 मिलिग्रॅम, सेंद्रिय भार 500 मिलिग्रॅम, फॉस्फेट 1.5 मिलिग्रॅम असे प्रमाण आढळले. यामुळे या पाण्यावर प्रक्रिया करूनच याचा वापर करणे अत्यंत गरजेचे होते. अशी समस्या देशातील अनेक नद्यांमध्ये पाहायला मिळते. कोल्हापुरात साखर कारखान्यांची मळी पंचगंगा नदीत सोडण्यात आल्याने पाणी हिरवे झाल्याचे आढळले आहे. शहरांच्या सांडपाण्यासह विविध औद्योगिक आस्थापनांतून सोडल्या जाणाऱ्या प्रक्रियाविरहित पाण्यामुळे पंचगंगा प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाली आहे, यातून मासे मेल्याच्याही घटना अनेकदा घडल्या आहेत. डेहराडून येथील एका संस्थेच्या पाहणी अहवालानुसार गंगा नदीमध्ये हरिद्वार येथे दररोज 14 दशलक्ष लिटर सांडपाणी सोडले जाते. यामध्ये 20 टन सेंद्रिय पदार्थ, जवळपास 37.5 टन जड पदार्थ दररोज सोडले गेल्याचे आढळते. पाण्यात प्राणवायूची कमतरता भासल्याने लखनौमध्ये मेलेले मासे पाण्यावर तरंगताना दिसतात. ही समस्या देशातील अनेक भागांत पाहायला मिळते. सध्या देशात जवळपास 220 जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती आहे. अशातच पाण्याचे प्रदूषण वाढल्यास उन्हाळ्यात पिण्यासाठी चांगले पाणीच शिल्लक राहणार नाही. यामुळे रोगराईची समस्याही ग्रामीण भागात वाढू शकते, याचा धोका विचारात घ्यायला हवा.
प्रदूषणामुळे हिराकूड धरणातील माशांच्या संख्येत घट होत आहे. यावर जवळपास पाच हजार मच्छीमारांचे जीवन अवलंबून आहे. 74 हजार 592 हेक्‍टरवर पसरलेल्या हिराकूड धरणात गेल्या सहा दशकांपासून 140 जातीचे मासे होते; पण सध्या ही संख्या 43 वर आली आहे. यातील 18 जातीचे मासेच फक्त खाण्यासाठी वापरले जातात, उरलेले पुन्हा धरणात सोडण्यात येतात. फिश फार्मर डेव्हलपमेंट एजन्सीच्या अध्यक्षांच्या मते माशांच्या जाती नष्ट होण्यामागे पाण्याचे प्रदूषण हे मुख्य कारण आहे. छत्तीसगड औद्योगिक क्षेत्रातून सोडण्यात येणाऱ्या गरम पाण्यामुळे माशांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
बिहारमधील पटना आणि भागलपूर जिल्ह्यात डॉल्फिनचे मृत्यू झाल्याचे आढळले आहे. याचा अर्थ असा समजला जात आहे, की गंगेचे पाणी अद्यापही अशुद्ध आहे. डॉल्फिनच्या संख्येत वाढ हे गंगा नदी स्वच्छ होण्याचे प्रमुख चिन्ह मानले जात आहे. यासाठी जनतेमध्ये नदी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. नदीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करण्याची नितांत गरज आहे. यासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारायला हवेत. यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने देशाच्या निम्म्या भागात दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत आहे ते पाणी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यासाठी आत्तापासूनच योग्य पावले उचलण्याची गरज आहे, तरच भविष्यात उद्‌भवणारी पाणीटंचाई व प्रदूषित पाण्यामुळे वाढणारी रोगराई रोखता येणे शक्‍य होणार आहे. भूगर्भातील पाण्याचेही प्रदूषण होणार नाही याची काळजीही यंदा घेणे आवश्‍यक आहे.

- राजेंद्र घोरपडे

कर्नाटक, आंध्रात पिकांवर परतीच्या पावसाचा घाला

कर्नाटक, आंध्रात पिकांवर परतीच्या पावसाचा घाला

परतीच्या प्रवासाला लागलेल्या मोसमी पावसाने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये अभूतपूर्व स्थिती निर्माण केली. तीन दिवसांत जवळपास 400 मिलिमीटर पाऊस झाला. यापूर्वी असा पाऊस झाल्याची नोंद भारतीय हवामान विभागाकडे (आयएमडी) नाही, असे मत केंद्रीय जल मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी एस. पी. काकरन यांनी व्यक्त केले आहे. आयएमडीकडे 1901 पासून झालेल्या पावसाची गणती आहे. सरासरीपेक्षा 600 टक्‍क्‍यांनी अधिक पाऊस झाला, तर काही जिल्ह्यांत तो 800 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक झाला आहे, असे गृहखात्याच्या राष्ट्रीय आपत्कालीन निवारण व्यवस्थापन संस्थेचे डॉ. संतोष कुमार यांनी कबूल केले आहे. ही मते पाहता हवामानातील बदलाच्या परिणामांवर पुन्हा एकदा नव्याने चर्चा होण्याची गरज आहे, असे दिसते.
पूर, दुष्काळ या समस्या आपल्या देशात काही नव्या नाहीत, पण यामध्ये होणारे नुकसान कमी करता येणे शक्‍य आहे. पुरावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाय करता येणे शक्‍य आहे. नैसर्गिक आपत्ती काही सांगून येत नाही, पण वेळीच उपाय केल्यास त्याची तीव्रता कमी करता येणे शक्‍य आहे.
कर्नाटकातील दुष्काळग्रस्त भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. काहींच्या मते हा पाऊस रब्बीसाठी फायदेशीर ठरला. काही ठिकाणी मात्र रब्बीच्या पेरण्याही वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरणही आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार कर्नाटकात 25 लाख हेक्‍टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तूरडाळीचे पीक 50 हजार हेक्‍टरवर होते, त्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या तुरीचे भाव भडकले आहेत, त्यातच अशा नुकसानीमुळे पुन्हा भाव भडकणे व साठेबाजीसारख्या समस्या उत्पन्न होऊ शकतात. अशा समस्यांवर वेळीच उपाय योजण्याची आवश्‍यकता आहे.
आंध्र प्रदेशात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे भाताचे मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम तांदळाच्या किमतीवर झाला असून, तांदळाच्या किमती भडकल्या आहेत. गेल्या काही दिवसांत तांदळाचा भाव क्विंटलमागे 400 रुपयांनी वाढला आहे. किरकोळ विक्रीतही 36 रुपये किलोने असणारा तांदूळ आता 40 रुपये झाला आहे. खरिपात भाताचे उत्पादन 30 लाख टनांनी घटण्याची शक्‍यता निर्माण झाल्यानंतर आता धान्य कोठारांत तांदूळ शिल्लकच नाही, तसेच भाताचे मिल मालक आणि घाऊक व्यापारी यांच्यात कृत्रिम टंचाईसाठी हातमिळवणी झाली आहे.
कर्नुल हे सोना मसुरी तांदळासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात खरिपात 79 हजार 340 हेक्‍टरवर मसुरी तांदळाची लागवड झाली होती. याचा विचार करता 14 लाख क्विंटल तांदळाचे उत्पादन अपेक्षित आहे; पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांना आलेल्या पुरात 50 हजार हेक्‍टरवरील भाताचे पीक नष्ट झाले. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास 200 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी हेक्‍टरी 35 क्विंटल भाताची अपेक्षा ठेवली होती; पण यामध्ये आता घट होण्याची शक्‍यता आहे. पावसामुळे भाताच्या लोंब्यांना काही ठिकाणी फुटवे आले आहेत, तर काही ठिकाणी तो पडला आहे. कर्नुलमधील भाताचे नुकसान झाल्याचा बाजारपेठेवर मोठा परिणाम दिसून येत आहे. मुख्यतः सोना मसुरीवर याचा परिणाम जाणवत आहे. बाजारपेठेत या जातीचा पुरवठाच बंद झाला आहे. कुंदनहोलू गावात सोना मसुरीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या गावातील शेतकरी पी. गौड म्हणाले, ""तुंगभद्रा नदीला आलेल्या पुरात भाताचा एक दाणाही शिल्लक राहिला नाही.'' यामुळे बाजारातील साठेबाजांना ऊत आला आहे. काही साठेबाजांनी कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचे दिसते. अशा साठेबाजांवर त्वरित कारवाई होण्याची गरज आहे.
-------------
आंध्र आणि कर्नाटकातील नुकसानीचा तपशील ः
आंध्र प्रदेश कर्नाटक
अतिवृष्टीचा फटका बसलेले जिल्हे पाच जिल्हे ः कर्नुल, कृष्णा, गंटूर, नालगौंडा आणि मेहबूबनगर 16 जिल्हे ः बेळगाव, गुलबर्गा, विजापूर, रायचूर, धारवाड, बागलकोट, बेल्लारी, कोप्पल, हवेरी, बिदर, गदग, दावणगिरी, कारवार, कन्नडा, चिकबल्लारपूर, चित्रदुर्ग
नुकसानग्रस्त गावांची संख्या 571 4292
अतिवृष्टीमुळे दगावलेल्यांची संख्या 73 227
मृत जनावरांची संख्या 27 हजार 340 7 हजार 882
पडझड झालेल्या घरांची संख्या एक लाख 77 हजार 883 5.26 लाख
अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्र 11.34 लाख हेक्‍टर
-----------
राजेंद्र घोरपडे
............

डॉ. बोरलॉग यांचे अपुरे कार्य पूर्ण करायला हवे

डॉ. बोरलॉग यांचे अपुरे कार्य पूर्ण करायला हवे
.....................
अमेरिकेतील टेक्‍सास येथे नुकताच डॉ. नॉर्मन बोरलॉग स्मृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये भारतातील हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी केलेले भाषण
.....................
डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना जाणून घेण्याचा आणि त्यांच्यासमवेत काम करण्याचा विशेषाधिकार मला होता. बोरलॉग यांनी जगातील भुकेलेल्यांचा प्रश्‍न सोडविला, यासाठी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 1953मध्ये गव्हावरील तांबेरा रोगावर त्यांचे संशोधन सुरू असताना मी त्यांच्याबद्दल प्रथम ऐकले.
1963च्या मार्चमध्ये डॉ. बोरलॉग यांनी गव्हाचे पीक पाहण्यासाठी भारतास भेट दिली, तेव्हा मोटारीतून प्रवास करताना ते बऱ्याचदा गाडी थांबवत आणि शेतकऱ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत; तसेच पीकपाण्याची पाहणी करत. पिके आणि शेतकरी यांच्याशी त्यांचे दृढ नाते होते. गव्हावरील तांबेऱ्याचे समूळ उच्चाटन करणे हे त्यांचे ध्येय होते.
मेक्‍सिकोमध्ये डॉ. बोरलॉग यांनी शेतीवरील संशोधनाचे कार्य सुरू केले तेव्हा जगात अन्नधान्याच्या टंचाईची बिकट समस्या उभी होती. 1942-43मध्ये बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळात दोन दशलक्ष लोक भुकेस बळी पडले. 1950च्या कालावधीत चीनलाही दुष्काळाचा मोठा तडाखा बसला. आफ्रिकेतील इथिओपियामध्ये दुष्काळ हा नेहमीचाच झाला होता. दुष्काळाच्या या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याचा निर्णय बोरलॉग यांनी घेतला होता. गव्हाची निमबुटकी आणि तांबेरा रोगप्रतिकारक जात त्यांनी 1950च्या दशकात मेक्‍सिकोत शोधून काढली. याचा फायदा मुख्यतः भारत, पाकिस्तान आणि इतर देशांना झाला. या विकसनशील देशांत शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्‍वास जागृत झाला.
डॉ. बोरलॉग यांनी त्यांच्या जीवनात पाच तत्त्वांचे पालन काटेकोरपणे केले. ती तत्त्वे अशी ः तुमच्याकडे चांगले काही आहे ते दुसऱ्यास द्या, स्वतःच्या यशस्वितेवर विश्‍वास ठेवा, संकटांना थेट सामोरे जा, प्रश्‍नावर तोडगा निघेल याबाबत विश्‍वास बाळगत राहा, यासाठी स्पर्धेत उतरा आणि जिंका. या तत्त्वांचा वापर त्यांनी शास्त्र आणि कृषी विकासात केला. त्यांनी अनेक देशांतील कृषी विकासाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. 1985मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर विशेष लक्ष केंद्रित केले.
नॉर्मन बोरलॉग या असामान्य व्यक्तिमत्त्वाला त्यांची पत्नी मार्गारेट, मुलगा विल्यम आणि मुलगी जिनी यांची मोलाची साथ मिळाली. माझ्या मते मार्गारेट यांचा बोरलॉग यांच्या हरितक्रांतीमध्ये मोलाचा वाटा आहे, पण त्यांच्या या कार्याचे गुणगान झाले नाही. त्यांच्या साथीमुळेच बोरलॉग यांना इतका लांबचा टप्पा गाठता आला.
डॉ. बोरलॉग हे एक महान संशोधकच नव्हते तर तो एक प्रेमाचा जिवंत झरा होता. त्यांच्या माणुसकीच्या कार्यात स्पर्धा, धर्म, भेदभाव किंवा राजकीय मते यांचा विचार कधीच आला नाही. 12 सप्टेंबर 2009 रोजी रात्री त्यांच्याशी झालेल्या शेवटच्या चर्चेतून ते स्पष्ट होते. या दिवशी सकाळी शास्त्रज्ञांनी त्यांना जमिनीची उत्पादकता मापण्यासाठी विकसित करण्यात आलेला नायट्रोजन आराखडा दाखविला. या वेळी ते म्हणाले, हा आराखडा शेतकऱ्यांपर्यंत न्या. यातून शेतकऱ्यांबद्दल त्यांना असणारी आपुलकी, त्यांच्यासाठी त्यांनी केलेला त्याग दिसून येतो. त्यांचे संशोधन हे केवळ शेतकऱ्यांसाठी होते. डॉ. बोरलॉग यांच्यासारखे शोध अनेक इतर कृषी संशोधकांनी लावले, पण डॉ. बोरलॉग हे त्यांच्याहून खूप वेगळे आहेत.
2007मध्ये डॉ. बोरलॉग यांना कॉंग्रेसनल गोल्ड मेडल देण्यात आले होते. या समारंभास मी उपस्थित होतो. या वेळी त्यांनी 1960 ते 2000 या कालावधीत भुकेलेल्यांची संख्या 60 टक्‍क्‍यांवरून 14 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आली होती असे सांगितले, पण नंतर मात्र ही संख्या स्थिर झाल्याकडे लक्ष वेधले. अद्यापही 850 दशलक्ष जनतेला पुरेसे अन्न मिळत नाही. आरोग्यासाठी आवश्‍यक असणारी प्रथिने, ऊर्जा यापासून ते वंचित आहेत. ते पुढे म्हणाले, कोट्यवधी गरीब जनतेसाठीचा अन्नसुरक्षेचा लढा अद्यापही आपण जिंकलेला नाही.
जगभरातील शास्त्रज्ञ आणि राजकीय नेते यांच्यासाठी डॉ. नॉर्मन बोरलॉग यांनी हे कार्य अर्धवट ठेवले आहे. आता भूक मुक्तीच्या चळवळीचा झेंडा आंतरराष्ट्रीय कृषी नॉर्मन बोरलॉग संस्थेने हाती घ्यावा.
(शब्दांकन ः राजेंद्र घोरपडे)

Monday, December 21, 2009

भुईमूग बीजोत्पादनातील "बाजीराव'

भुईमूग बीजोत्पादनातील "बाजीराव'
---
सातारा जिल्ह्यातील उंडाळे (ता. उंडाळे) येथील बाजीराव पाटील यांनी उन्हाळी भुईमूग बीजोत्पादनात सातत्याने उच्चांकी उत्पादन घेतले आहे. "इक्रिसॅट' पद्धतीच्या लागवड तंत्राची त्यांनी यशस्वी अंमलबजावणी केली असून, अन्य शेतकऱ्यांसाठी ती मार्गदर्शक ठरली आहे...
---
स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब उंडाळकरांचा त्यागाचा वारसा असणारा उंडाळे हे गाव कऱ्हाडपासून जवळपास 20 किलोमीटरवर आहे. या गावातील बाजीराव पाटील शेतीमध्ये नेहमी वेगवेगळे प्रयोग करण्यात गुंतलेले असतात. उंडाळे गावाचे ते उपसरपंचही आहेत. गावातील रयत कृषी विज्ञान मंडळाचे व नाबार्ड पुरस्कृत रयत शेतकरी मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. सामाजिक व राजकीय कार्यात असले तरी शेती ही त्यांच्या अजेंड्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शेतीतील आवडीमुळेच त्यांनी मुलीला जिद्दीने कृषी पदवीधर केले आहे.
बाजीराव पाटील यांनी मुंबई विद्यापीठातून कला शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1993 पासून घरच्या शेतीची जबाबदारी स्वतःकडे घेतली. शेतीमध्ये लक्ष घातल्यावर त्यांना पीक व्यवस्थापनातील खाचाखोचा लक्षात येण्यास सुरवात झाली. याबाबत ते सांगतात, की आजकाल उसाची शेती परवडण्याजोगी राहिली नाही. उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक, उत्पादनाला म्हणावा तसा दर मिळत नाही. बिले वेळेवर मिळत नाहीत. यामुळे शेतीमध्ये उसाव्यतिरिक्त इतर पिकांकडे मी वळलो. टोमॅटो, कोथिंबीर, वांगी, पपई, गोड मका, भुईमूग, केळी या पिकांच्या लागवडीत प्रयोग केले. सुधारित तंत्र आणि योग्य वेळ साधून पिकांचे नियोजन केले तर चांगला नफा मिळतो असे मला दिसले आहे. पिकांचे गणित लक्षात आल्यावर मी शेतकऱ्यांशी चर्चा केली. कृषी विभागाकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे तसेच स्वतःच्या पाहणीतून किती क्षेत्रावर कोणत्या पिकाची लागवड केली आहे. याचा अभ्यास केला व पिकांची निवड करून चांगला फायदा मिळवला. आवड असेल तर कोणतीही गोष्ट सहज साध्य करता येणे शक्‍य आहे, असा माझा अनुभव आहे.
- गुंडे यांनी दिली दिशा...
बदलत्या शेतीची माहिती सांगताना श्री. पाटील म्हणाले, की शेतीमध्ये विविध प्रयोग करताना त्यांनी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांची आवर्जून मदत घेतली. नवनवे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना भेटलो. कृषी विभागाच्या शेतकरी सहलीतून कर्नाटक, केरळ, आंध्रातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतींना भेटी दिल्या. त्यांनी केलेल्या प्रयोगांतून दरवेळी नवीन गोष्टी मिळत गेल्या. या दरम्यान भुईमुगाची आधुनिक पद्धतीने शेती करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीचे प्रयोगशील शेतकरी जयकुमार गुंडे यांची भेट झाली. त्यांनी केलेला प्रयोग विशेष वाटला. या भेटीतून प्रेरणा घेऊन नव्या तंत्राने भुईमुगाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. गुंडे यांच्याकडून लागवडीचे तंत्र समजून घेतले. त्याचबरोबरीने ट्रॉम्बे येथील भाभा अणुसंशोधन केंद्रातील भुईमूग तज्ज्ञ डी. एम. काळे यांनी टीजी 37 ए आणि टीपीजी-41 या जातीच्या बियाण्यांचे प्लॉट घेण्यासाठी प्रोत्साहित केले. यातूनच उन्हाळी भुईमुगाची "इक्रिसॅट' पद्धतीने गादी वाफ्यावर लागवड करण्याचे मी ठरविले. यासाठी मला तत्कालीन मंडल कृषी अधिकारी भरत अर्जुगडे आणि कृषी अधिकारी उदय देशमुख, तालुका कृषी अधिकारी विजयेंद्र धुमाळ यांनी मार्गदर्शन केले. तसेच कालवडे येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे सतत मार्गदर्शन मिळत आहे.
- तंत्र भुईमूग लागवडीचे
गेल्या 10 ते 12 वर्षांपासून पाटील यांच्याकडे भुईमुगाची लागवड असतेच. उपलब्ध जमिनीचा विचार करून त्यांनी ऊस, केळी, भाजीपाला आणि भुईमुगाच्या लागवडीचे नियोजन केले आहे. बीजोत्पादनासाठी लागवड असल्याने साधारणपणे जमिनीची उपलब्धता पाहून फेरपालटीसाठी 20 गुंठे ते दीड एकर भुईमुगाचे क्षेत्र दरवर्षी असतेच.
भुईमूग लागवडीबाबत श्री. पाटील सांगतात, की माझी जमीन मध्यम काळी, सुपीक उत्तम निचऱ्याची आहे. उन्हाळ्यात पाणी पुरवण्यासाठी कूपनलिकाही घेतली आहे, त्यामुळे उन्हाळी भुईमुगाला पुरेसे पाणी देता येते. 1999 मध्ये मला दर्जेदार उत्पादन मिळाले, त्यानंतर मी उत्पादनात सातत्य ठेवले आहे. त्या वर्षी मी श्री. काळे यांनी सुचविल्याप्रमाणे उन्हाळी हंगामासाठी टीएजी- 24 जातीच्या लागवडीचे गादीवाफा पद्धतीने नियोजन केले होते. त्यानंतर मी गेल्या आठ वर्षांत तज्ज्ञांच्या सल्ल्याने जेएल 286, जेएल 501, टीएजी 24, टीजी 37 ए, टीपीजी 41 या जातींची लागवड करत आलो आहे. खरीप आणि उन्हाळी हंगामानुसार जातींची निवड केली जाते. यंदाच्या उन्हाळी हंगामात मी जेएल 286 आणि जेएल 501 या जातींची लागवड केलेली आहे.
उन्हाळी भुईमुगाची लागवड साधारणतः 15 जानेवारीपर्यंत केली जाते. थंडी असल्यास पेरणीचा कालावधी पुढे जातो. लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट, दोन वेळा कुळवण करून 20 गुंठ्याला एक ट्रॉली शेणखत मिसळून देतो. या मशागतीनंतर 120 सें.मी. (चार फूट) अंतराने सरी पाडून घेतो. म्हणजे मधल्या पट्ट्यात गादीवाफा तयार करता येतो. हा गादीवाफा 90 सें.मी रुंदी आणि 15 सें.मी उंचीचा तयार होतो. पाण्याच्या पाटाची रुंदी 30 सें.मी. राहते. गादीवाफा तयार करतानाच लागवडीपूर्वी 100 किलो जिप्सम आणि 50 किलो 18-46-0 मिसळतो. तसेच 100 किलो गांडूळ खतात दोन किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक योग्य पद्धतीने वाफ्यातील मातीत मिसळून देतो. त्यानंतर तुषार संच चालू करून वाफे भिजवून घेतो. वाफसा आल्यानंतर गादीवाफ्यावर हलक्‍या हाताने फळी मारून माती मऊ करून घेतो, त्यामुळे मल्चिंग कागद अंथरताना अडथळा येत नाही. त्यानंतर 13 मि.लि. ऑक्‍सिफ्लोरफेन हे तणनाशक प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून गादीवाफ्यावर फवारून घेतो. त्यामुळे पुढे तणांचा प्रादुर्भाव होत नाही.
अशा पद्धतीने लागवडीची तयारी झाल्यानंतर सात मायक्रॉन जाडीचा मल्चिंग कागद अंथरला जातो. अंथरण्यापूर्वी लागवडीच्यादृष्टीने या कागदावर 8 × 8 इंचावर झिगझॅग पद्धतीने छिद्रे पाडली जातात. त्यामुळे एका गादीवाफ्यावर चार ओळी बसतात. तो या गादीवाफ्यावर अंथरल्यानंतर त्यावरील छिद्रांमध्ये बियाण्याची टोकण केली जाते. एका छिद्रात दोन बी टोकले जातात. साधारणपणे 20 गुंठ्याला 20 किलो बियाणे लागते. टोकणी अगोदर बीजप्रक्रिया केली जाते. एक किलो बियाणास अडीच ग्रॅम कार्बेन्डॅझीमची बीजप्रक्रिया करून सर्व बियाणे 20 ते 25 मिनिटे सावलीत वाळवून त्यानंतर अडीच ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करतो. हे बियाणे सावलीत वाळवितो. पेरणीपूर्वी एक ते दोन तास अगोदर ही सर्व बीजप्रक्रिया केली. बीजप्रक्रिया करताना शेंगदाण्याचे नाजूक टरफल निघणार नाही किंवा खराब होणारी नाही याची विशेष काळजी घेतली जाते.
टोकण झाल्यानंतर लगेचच पहिल्यांदा पाट पाणी देतो. 15 दिवसांत भुईमूग उगवून आल्यानंतर तुषार सिंचनाने पाणी दिले जाते. यापुढील पाळ्या पिकाच्या गरजेनुसार दिल्या जातात. या पाण्याच्या पाळ्या लांबवण्याचे कारण म्हणजे मातीत मुळे खोल जातात. फुलोऱ्याच्यावेळीही पाण्याची पाळी लांबवितात. टीएजी - 24 या जातीच्या जाळीचा विस्तार कमी असतो. तो वाढण्यासाठी उगवणीनंतर 35 दिवसांनी 100 ग्रॅम युरिया प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून एक फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतो. पीक फुलोऱ्यात असताना 70 ग्रॅम 19ः19ः19 हे विद्राव्य खत प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी घेतो. याचबरोबरीने पीक पिवळसर पडू नये म्हणून फुलकळी आल्यावर 50 ग्रॅम झिंक आणि 75 ग्रॅम फेरस सल्फेट प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून एक फवारणी घेतली जाते.
या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसतो. या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 25 मि.लि. एन्डोसल्फान किंवा 15 मि.लि. डायमेथोएट प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी घेतो. टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 25 ग्रॅम मॅन्कोझेब प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक फवारणी केली जाते. साधारणपणे 120 दिवसांत म्हणजेच 15 मेच्या दरम्यान पीक काढणीला येते. गादीवाफा आणि मल्चिंगमुळे पीक दहा दिवस आधी काढणीला येते. गादीवाफ्यामुळे जाळी उपसायला सोपी जातात. शेंगा तुटत नाहीत. तण होत नसल्याने भांगलणीचा खर्च नाही. पाणी बचत होते.
---
चौकट ः 1
1999 मध्ये बीजोत्पादनासाठी टीएजी-24 जातीच्या 20 गुंठे लागवडीसाठी मशागतीपासून ते काढणीपर्यंत आलेला खर्च ः
नांगरणी 700 रुपये
कुळवाच्या दोन पाळ्या 400 रुपये
शेणखत (वाहतुकीसह) 2000 रुपये
गांडूळ खत 400 रुपये
जिप्सम (दोन पोती) 100 रुपये
बियाणे 1400 रुपये
रायझोबियम कल्चर 25 रुपये
स्फुरद विरघळवणारे जिवाणू 80 रुपये
कार्बेन्डॅझीम 80 रुपये
मल्चिंगचा खर्च 2500 रुपये
टोकणीसाठी मजुरी 750 रुपये
गादीवाफ्याची मजुरी 200 रुपये
पाणी खर्च (चार महिन्यांचा) 800 रुपये
पाण्यासाठीची मजुरी (चार महिने) 600 रुपये
कीडनाशके 45 रुपये
फवारणीसाठीची मजुरी 200 रुपये
मॅन्कोझेब 80 रुपये
19-19-19 विद्राव्य खत (एक किलो) 110 रुपये
काढणीची मजुरी 700 रुपये
शेंगा वाळविण्यासाठी मजुरी 200 रुपये
---
एकूण खर्च 11,370 रुपये
---
चौकट ः 2
टीएजी - 24 जातीचे 20 गुंठ्यांमध्ये मिळालेले उत्पादन ः 14 क्विंटल
विक्रीसाठी योग्य बियाण्यांच्या शेंगांचे उत्पादन ः 12 क्विंटल
शेंगांना मिळालेला दर ः 40 रुपये प्रति किलो
एकूण मिळालेले उत्पन्न ः 48,000 रुपये
खर्च वजा जाता मिळालेले उत्पन्न ः 36,630 रुपये
---
कृषी खात्याने तालुका पातळीवर घेतलेल्या स्पर्धेत उत्पादनाचे परीक्षण एक गुंठ्यातील क्षेत्रावर केले. सुरवातीला त्यांनी जाळ्यांसह शेंगांचे वजन केले. नंतर शेंगा स्वतंत्र करून शेंगा व मोकळ्या जाळ्यांचे वेगवेगळे वजन कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी काढले. एक गुंठा क्षेत्रावर केलेल्या या परीक्षणामध्ये वाळवलेल्या शेंगांचे वजन 70 किलो भरले.

- बीजोत्पादनात संधी...
बाजीराव पाटील यांनी बियाणे प्लॉट घेतल्याने विक्री करताना प्रति किलो 40 ते 45 रुपयांपर्यंत दर मिळाला. या कालावधीत भुईमुगाचा दर 16 ते 18 रुपये प्रति किलो इतका होता. श्री. पाटील यांनी 20 गुंठ्यांत भुईमुगाचे यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची लागवड करण्यास सुरवात केली आहे. जवळपास 90 ते 100 एकरांवर उन्हाळी भुईमुगाची लागवड मल्चिंग पद्धतीने करण्यात येत आहे. रेठरे परिसरातही 50 ते 60 एकरावर गादीवाफ्यावर मल्चिंग पेपरचा वापर करून पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

आतापर्यंतच्या जातींच्या निवडीबाबत श्री. पाटील सांगतात, की जेएल 24 या जातीच्या बरोबरीने जेएल 286, जेएल 501, टीएजी 24, टीजी 37 ए, टीपीजी 41 या जातींची लागवड मी केली आहे. सध्या जेएल 286 व जेएल 501 या जाती तेलासाठी चांगल्या असल्याने त्यांना चांगली मागणी आहे. भुईमुगामध्ये पिकांची फेरपालट करणे खूप गरजेचे आहे. फेरपालट न केल्यास शेंगा व शेंगदाण्यावर काळे डाग पडतात. शेंगदाणा किडका होतो.

- मल्चिंग पेपरसाठी शासनाचे प्रयत्न हवेत...
यंदाच्या वर्षी त्यांना मल्चिंग पेपर वेळेवर मिळाला नाही, पण 20 गुंठे क्षेत्रावर त्यांनी जेएल 501 आणि जेएल 286 या जातींचे बीजोत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांना जर मल्चिंग पेपरची उपलब्धता होत नसेल तर सामान्य शेतकऱ्यांची काय स्थिती असेल याचा विचार कृषी विभागाने केला पाहिजे. कृषी विभागाने मल्चिंग पेपर खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाबरोबर हा पेपर शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध होईल याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. ग्रामीण भागात मल्चिंग पेपर उपलब्धच होत नाही. यासाठीही ग्रामपंचायती किंवा कृषी विभागामार्फत वितरणाची सोय कृषी विभागाने केली पाहिजे. याचबरोबरीने शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्धतेसाठी कृषी विभागाने मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादनाचे कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

भुईमुगातील उत्पादन वाढ ही श्री. पाटील यांची प्रयोगशील वृत्ती, पीक नियोजनाचे गणित आणि कृषी विभागातील कृषी अधिकारी भाऊसाहेब धुमाळ, मंडळ कृषी अधिकारी दत्तात्रेय खरात, कृषी सहायक विनोद कदम, कृषी पर्यवेक्षक अशोक कोळेकर, बाबासाहेब तोरणे, संभाजी शेवाळे याचे मोलाचे सहकार्य मिळते. शेतकऱ्यांचे कष्ट, पिकांचे नियोजन आणि कृषी विभागाची साथ असेल तर प्रत्येक जिल्ह्यात भुईमूग बीजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची फळीच तयार होईल. यातून प्रत्येक गावात दर्जेदार बियाणे तर पोचलेच, त्याचबरोबरीने तेलबिया उत्पादनात आपण स्वयंपूर्णता गाठू शकू असा विश्‍वास वाटतो.
- कृषी विभागाने दिली दिशा
बाजीराव पाटील यांना बीजोत्पादनासाठी कृषी अधिकारी विजयेंद्र धुमाळ यांनी सहकार्य केले. याबाबत बोलताना श्री. धुमाळ म्हणाले, ""तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या नियमित बैठका आयोजित करत असतो. यातून त्यांचे अनेक प्रश्‍न आमच्या निदर्शनास येतात. या बैठकांना बाजीराव पाटील नियमित येत असत. या वेळी त्यांनी गुंडे यांचे मार्गदर्शन घेतले. गादी वाफ्यावर मल्चिंग पेपर अंथरून भुईमुगाची लागवड करण्यासंबंधीचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. कऱ्हाड परिसरात भुईमुगाचे हेक्‍टरी केवळ 16 क्विंटलच उत्पादन येते; पण या नव्या तंत्राने एकरी 25 ते 30 क्विंटल उत्पादन शेतकरी घेत आहेत. बाजीराव पाटील यांनी केलेली प्रगती पाहून सध्या या परिसरात अनेक शेतकरी हे तंत्र आत्मसात करत आहेत. काहींनी चांगले उत्पादनही घेतले आहे.''
---
संपर्क ः
बाजीराव पाटील,
उंडाळे, ता. कराड, जि. सातारा
संपर्क ः 9421118615
---
- राजेंद्र घोरपडे