Saturday, September 3, 2016

वडिलांच्या प्रेरणेमुळे शेतीमध्ये जपली प्रयोगशीलता

संडे फार्मर
--------------------------------


वडिलांचे शेतीतील कष्ट, प्रयोगशीलता यांचा आदर्श ठेवून सुरेश दगडू काटकर यांनी गावाकडील शेतीशी नाते कायम ठेवले आहे. कोल्हापूर शहरामध्ये सब पोस्टमास्तर पदावर कार्यरत असणाऱ्या सुरेश काटकर यांनी शेतीमध्ये प्रयोगशीलता जपली आहे. कृषी अधिकारी, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून पीक फेरपालटीवर त्यांचा भर असतो.

राजेंद्र घोरपडे

तेलवे (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथे सुरेश काटकर यांची चार एकर शेती आहे. सुरेश यांचे वडील दगडू सखाराम काटकर हे फारसे शिकलेले नसले तरी कष्टातून त्यांनी मुलांना शिकवले. शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी प्रयोगशीलता जपली. वयाच्या ८७ व्या वर्षीही ते शेतीच्या नियोजनात रमलेले असत. आजारपणामुळे त्यांना आता शेतीकडे लक्ष देणे होत नाही; परंतु वडिलांच्या प्रयोगशीलतेचा वसा सुरेश काटकर यांनी जपला आहे. सुरेश हे बांधकाम विषयातील डिप्लोमाधारक. सुरवातीला त्यांनी दोन-तीन वर्षे कंत्राटी व्यवसाय केला. याच दरम्यान त्यांना पोस्ट खात्यात नोकरी मिळाल्यानंतर बांधकाम व्यवसाय सोडला. नोकरीच्या चक्रात अडकल्यानंतर इतर व्यवसाय करणे तितके सोपे नसते. त्यात सरकारी नोकरी असेल तर जबाबदारी जास्तच वाढते. सध्या कोल्हापुरातील शिवाजी पेठेमधील पोस्ट आॅफिसमध्ये सुरेश काटकर हे सब पोस्टमास्तर पदावर कार्यरत आहे. नोकरीतील व्यस्ततेमध्येही त्यांची शेतीची ओढ काही कमी झाली नाही. लहानपणापासूनच शेतीमध्ये गुंतलेले असल्याने नोकरी असूनही आठवड्यातून एकदा तरी कोल्हापूर शहरापासून २५ किलोमीटरवर असणाऱ्या शेतावर जाऊन वाटेकरी, परिसरातील शेतकऱ्यांच्या बरोबरीने चर्चाकरून पीक व्यवस्थापनाचे नियोजन काटकर करतात.

जमिनीनुसार पीक पद्धतीचे नियोजन ः
सुरेश यांची चार एकर शेती आहे. त्यामध्ये अर्धा एकर मळीचे शेत आहे. कासारी नदीपासून सुमारे ३०० मीटरवर अडीच एकर काळवट जमीन आणि एक एकर माळरान आहे. काटकर यांनी नदीवरून पाणीपुरवठा योजना करून सर्व क्षेत्रात पाणी पोचविले आहे. शेतीमध्ये ऊस, सुर्यफूल, भात ही पिके आलटून पालटून घेतली जातात. नदीजवळ असल्याने बारमाही पाणी उपलब्ध होते. सर्व शेती त्यांनी भागाने केली आहे. पाण्याचा खर्च वगळता सर्व खर्च निम्मा-निम्मा विभागून घेतला जातो. तसेच उत्पन्नही निम्मे-निम्मे विभागून घेतले जाते, त्यामुळे शेतीचे आर्थिक नियोजन करणे सोपे जाते. कासारी नदीच्या पूर क्षेत्रात काही जमीन असल्याने काटकर यांना काही वेळा पुराच्या समस्येला तोंड द्यावे लागते. काही वेळा पुराच्या पाण्यात सात-आठ दिवस शेती राहिल्याने पीक नुकसानही सोसावे लागते. पूरबाधित उसाचे करायचे काय हा प्रश्‍न काही वेळा त्यांच्या समोर असतो. हा ऊस काढून मग प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने हंगामी पिकाचे नियोजन ते करतात. यामुळे आर्थिक तोटा कमी करणे त्यांना शक्य होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी कृषितज्ज्ञ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचा सल्ला घेत पीक फेरपालटाचे नियोजन केले. त्यामध्ये त्यांना यशही मिळत आहे.
पीक लागवडीबाबत सुरेश काटकर म्हणाले, की काही शेती पूर क्षेत्रात असल्याने जास्तीचा पाऊस झाला, तर पुराचा धोका असतो. तीन, चार दिवस पुराचे पाणी शेतात राहते, त्यामुळे ऊस पिकाशिवाय अन्य पिकांची लागवड शक्य होत नाही. आडसाली लागवडीसाठी तीन फुटांची सरी सोडून उसाची लागवड केली जाते. माती परीक्षण करूनच उसाला सेंद्रिय आणि रासायनिक खताची मात्रा दिली जाते. दर्जेदार बेणे निवडण्यावर माझा भर आहे. प्रयोगशील ऊस शेतकऱ्यांच्या सल्ल्यानेच लागवडीचे केले जाते, त्यामुळे सध्या एकरी ५५ ते ६० टन ऊस उत्पादन मिळते. खोडव्याला माती परीक्षणानुसार पहारीच्या अवजाराने रासायनिक खत दिले जाते, त्यामुळे खताचा योग्य वापर होतो, आर्थिक बचत होते. उसाचा खोडवे तुटून गेल्यानंतर शेतात फेरपालट म्हणून उन्हाळ्यात भात किंवा सूर्यफुलाची लागवड केली जाते.
भातशेतीच्या नियोजनाबाबत काटकर म्हणाले, की पीक फेरपालटीचे नियोजन आणि उपलब्ध क्षेत्र लक्षात घेऊन कधी उन्हाळी तर कधी पावसाळी भात लागवड केली जाते. भात लागवडीसाठी सुधारित जातीचे बियाणे निवडले जाते. त्यामुळे उतारा चांगला मिळतो. प्रयोगशील भात उत्पादकांचे अनुभव लक्षात घेऊन रत्ना, कर्जत तसेच इतर भाताच्या जातींची लागवड करतो. लागवडीसाठी भात रोपे गादीवाफ्यावर तयार केली जातात. चिखलणी करून भात रोपांची पुनर्लागवड केली जाते. दर वर्षी २० गुंठे ते एक एकरावर भात लागवड असते. मला रत्ना जातीचे एकरी सरासरी १६ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. भात भरडून तांदूळ घरीच वापरतो. काहीवेळा खोडवा गेल्यानंतर दहा गुंठे क्षेत्रावर उन्हाळी हंगामात सूर्यफुलाच्या संकरित जातीची लागवड करतो. या पिकाच्या व्यवस्थापनासाठी पाच हजारांपर्यंत खर्च येतो. सहासरी दहा गुंठ्यांतून चार क्विंटल उत्पादन मिळते. सूर्यफुलाची विक्री न करता घाण्यावरून तेल काढून घेतो. या तेलाचा घरीच वापर करतो. प्रत्येक पिकाच्या व्यवस्थापनाचा हिशेब ठेवला आहे. त्यामुळे नफा, तोटा कळतो. त्यातून पुढील वर्षी सुधारणा करतो.

पाण्याच्या निचऱ्यासाठी चर
काटकर यांची काही जमीन कासारी नदीच्या पूर क्षेत्रात असल्याने काहीवेळा पुराचे पाणी शेतात येते. पूर ओसरल्यानंतरही शेतातील बरेच दिवस पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे क्षारफुटीचा धोका असतो. त्याचा पीक वाढ आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन काटकर यांनी शेताच्या बाजूला अडीच फूट खोलीचा चर काढून तो वाळू, दगडगोट्यांनी बुजविला. हाच चर पुढे ओढ्याला जोडला. चरामुळे जमिनीतील पाण्याचा लगेच निचरा होऊन वाफसा येतो. त्यामुळे जमीन चांगल्या स्थितीत राहिली आहे.

ॲग्रोवनची होते मदत
पीक व्यवस्थापनाच्या माहितीसाठी सुरेश काटकर यांना ॲग्रोवनची मदत होते. याबाबत ते म्हणाले की, मी ॲग्रोवनमधील लेख लिहिणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा करतो. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या कडून पीक व्यवस्थापनाची माहिती घेतो. काही शेतकऱ्यांच्या शेतीला मी भेटीदेखील दिलेल्या आहेत, त्यामुळे मला माझ्या शेती व्यवस्थापनातील चुका समजतात. पुढील वर्षी मी बदल करतो. त्याचा पीक उत्पादनवाढीस फायदा झाला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे आयोजित शिवार फेरीमध्ये मी सहभागी असतो. कृषी अधिकारी सर्जेराव पाटील हे माझे बालमित्र. त्यांच्या सल्ल्यानेच मी दर वर्षीचे पीक नियोजन करतो. आकुर्डे येथील अजित पाटील यांचा पोल्ट्रीचा व्यवसाय पाहून मीदेखील नियोजन केले आहे.

शेतकऱ्यांना गटशेतीचा आधार
गावातील शेती नियोजनाबाबत माहिती देताना काटकर म्हणाले की, आमचे गाव एक हजारपेक्षा कमी लोकवस्तीचे आहे. गेल्या काही वर्षांपासून मजूरटंचाई जाणवू लागली. हंगामाच्या काळात शेती कामाला मजूर मिळत नाहीत. यावर गावकऱ्यांनी गटशेतीचा उपाय शोधला आहे. आता दहा-बारा शेतकऱ्यांचे गट करूनच शेती केली आहे. आलटून पालटून एकमेकांच्या शेतात शेतकरी मदतीला जातात. पीक नियोजन तसेच आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी गटशेतीची मला मदत होत आहे. नोकरीमुळे मी गेली वीस वर्षे एकाच वाटेकऱ्याकडे माझी शेती कसण्यासाठी आहे. श्रमाचा योग्य मोबदला त्यांनाही मिळतो, त्यामुळे तेही समाधानी आहेत. नोकरी संपली, की मीदेखील गावी शेतावरच राहण्यास जाणार आहे.

संपर्क ः सुरेश काटकर ः ९४२०००९५०६