Friday, October 28, 2011

गुरुकृपा

मग आलिंगिला पूर्णिमा । उणीव सांडी चंद्रमा ।
तैसें होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ।।

गुरुकृपा म्हणजे काय? ती कशी होते? याबद्दल प्रत्येकाला उत्सूकता असते. मला एक गृहस्थ म्हणाला. गुरूकृपेने मला सगळे मिळाले. गुरुंचा शब्द मी पाळला आणि अमाप पैसा मिळाला. माझा अध्यात्मावर विश्‍वासही नव्हता. तसे या युगात अध्यात्मावर विश्‍वास तरी कोण ठेवणार? पण मला गुरूकृपेचा अनुभव आला. गुरुंच्या शब्दाला महत्त्व असते. मला दैनंदिन जीवनात अनेक कटकटी वाटत होत्या. घरगुती समस्यांनी मी त्रस्त झालो होतो. समस्यांच्या गर्तेत अडकल्यानंतरच जनतेला देव आठवतो. तसा मलाही देव आठवला. देवळात जायला लागलो. तेथे नेहमी प्रवचन चालायचे. प्रवचनकार सांगत होते. माऊलीने संसार करत परामर्थ करा असे सांगितले आहे. संसार सोडण्याचा विचार माझ्या मनात घोळत होता. यासाठीच मी सन्यस्थाचा मार्ग स्वीकारण्याचा विचार करत होतो. पण येथे तर उलटेच सांगितले जात आहे. संसार न सोडता परमार्थ करा असे सांगितले जाते. हे कसे शक्‍य आहे. मी विचार केला. ठिक आहे. हा ज्ञानेश्‍वरांचा आदेश, गुरूंचा आदेश असे समजून प्रयत्न तरी करून पाहू. संसार होत राहतो. परमार्थ करावा लागतो. संसारात राहायचे पण त्यात गुरफटायचे नाही. काय हरकत आहे. असे करून पाहायला. असे समजून मी प्रयत्न सुरू ठेवले. घरगुती समस्यांपासून मी दूर राहीलो. रोजच्या कटकटींचा विचारच सोडून दिला. त्यामुळे झाले काय? संसार सुरू होता. पण त्या संसाराचा त्रास मला होत नव्हता. माझ्या कामावर, व्यवसायावर या कटकटींचा परिणाम होत नव्हता. घरच्या नेहमीच्या कटकटी त्याच असतात. त्याकडे कानाडोळा केला. संसार होतच राहीला. पण त्या कटकटींपासून मी दूर राहीलो. माझा विकास झाला. हातात अमाप पैसा खेळू लागला. आपोआपच संसारात शांती नांदू लागली. पण परमार्थांचा अर्थ अद्याप समजलेला नाही. मोक्ष म्हणजे काय हेही माहित नाही. पण तरीही संसारात शांती नांदते. याचे समाधान आहे. गुरूंचा आर्शिवाद पाठीशी आहे. असे वाटते. ही गुरूकृपाच आहे. आता आत्मज्ञानाचा अभ्यास करत आहे. सांगण्याचा ताप्तर्य हेच की सद्‌गुरू भक्ताला आत्मज्ञानाची गोडी लावतात. गुरुकृपेतूनच ही गोडी लागते. गुरुंचा आर्शिवाद यासाठी महत्त्वाचा आहे. गुरुंचा शब्द यासाठीच महत्त्वाचा आहे.



राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Friday, October 21, 2011

आत्महत्या

येर काह्यां मोलें वेंचूनि । विष पियावें घेऊनि ।
आत्महत्येसि निमोनि । जायिजे जेणें ।।

धकाधकीच्या जीवनात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जीवनात नैराश्‍य आल्याने, कर्जबाजारीपणाला कंटाळून, अपयश आल्याने आत्महत्या केल्या जात आहेत. त्रासाला कंटाळूनही काहीजण आत्महत्या करतात. नव्या पिढीत माणूसकी कमी होत आहे. यातूनच आत्महत्येच्या घटना घडत आहेत. माणसाला आधार देणारा माणूसच राहीलेला नाही. कौटूंबिक जीवनातही वादाचे प्रसंग वाढत आहेत. चंगळवादी संस्कृतीमुळे तर मैत्रीची व्याख्याच बदलली आहे. अशा या युगात मानवता याच धर्माची गरज आहे. त्याचा प्रसार होण्याची गरज आहे. अशी परिस्थिती पूर्वीच्या काळीही होती. पण त्या काळात संतांच्या महान कार्यामुळे यावर प्रतिबंध बसला. सध्याही अशा मानवतेच्या संतांची गरज आहे. सध्या भगवीवस्त्रे घालून धर्माचा प्रसार करणारे अनेकजण दिसतात. पण मानवतेचा गंधही त्यात नसतो. नुसती प्रवचने, सल्ले देऊन हे कार्य होत नाही. यासाठी स्वतः आत्मज्ञानी होण्याची गरज आहे. आत्मज्ञानी संतंच हा मानवतेचा धर्म टिकवू शकतात. असा संत प्रत्येकजण होऊ शकतो. जगातील सर्व धर्म हे मानवतेचीच शिकवण देतात. तरीही जगात अशांतता आहे. धर्माधर्मात तेढ निर्माण केली जाते. स्पर्धा लावली जाते. सत्तेच्या हव्यासापायी तंटे लावले जातात. अशा या स्वार्थानेच धर्म बदनाम होत आहे. हुकुमशहांच्या हव्यासाने अनेकांचे बळी घेतले जातात. पण या हुकुमशहांचा शेवट खूपच वाईट असतो पण याची चर्चा होत नाही. हे हुकुमशहा मरताना दयेची याचना करतात. पण त्यांना कोणीही दया दाखवत नाही. काही हुकुमशहांनी तर आत्महत्याच केल्या आहेत. मग त्यांनी अत्याचार तरी केले कशासाठी? दिनदुबळ्यांना दया दाखविली नाही त्यांना कोण दया दाखविणार. हत्या करणारेच आत्महत्या करतात. हाच इतिहास आहे. यातून बोध घ्यायला हवा. यासाठीच तर मानवता धर्माची गरज आहे. देशात सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी गंभीर रुप धारण केले आहे. नैसर्गिक आपत्तीतून, सावकारी पाशातून या आत्महत्या होत आहेत. शोषणामुळेच शेतकरी आत्महत्या करतो आहे. मानवतेच्या धर्माचा प्रसार झाला तर हे शोषण निश्‍चितच थांबेल. या खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मानवतेच्या धर्माचा प्रसार करायला हवा.


राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Monday, October 17, 2011

स्वधर्माचे आचरण

अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणी जरी विषमु ।
तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणें ।।

अध्यात्माचा अभ्यास करणाऱ्यांवर नेहमीच टिका होते. पारायणे करून कुठे देव भेटतो का? पारायणांचा फायदा काय? संतांच्या मागे लागून वेळ फुकट घालविण्यात काय अर्थ आहे? ध्यान, धारणेत वेळ घालविण्या ऐवजी देशसेवा करा? असे विविध सल्ले, प्रश्‍न उपस्थित केले जातात. टिका करणारे नास्तिक आहेत असेही नाही. पण टिका होते. सध्या वेळेला महत्त्व आले आहे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. जग वेगाने बदलत आहे. जागतिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. तसे माणसाची विश्रांतीही कमी झाली आहे. आराम हराम आहे. पण आराम काही काळ तरी हवा असतो. हे मान्य करायलाही वेळ नाही. नवीपिढी आरामच हरवून बसली आहे. अशा या बदलत्या जगाला देवाचा विचार करायला वेळ कुठे आहे. देव आहे तर मग दाखवा? नाहीतर तो विचार सोडून द्या. अशी विचारसरणी बनली आहे. अध्यात्म हे थोतांड आहे. असे नव्या पिढीला वाटत आहे. देवाला रिटायर करा असे म्हणणारे, तसे सल्ले देणारेही आज बरेच आहेत. भारतात अनेक थोर संत होऊन गेले. त्यांनी अनेक ग्रंथ लिहीले आहेत. पण ते वाचायला आज नव्या पिढीला वेळच नाही. ते काय आहेत हे जाणून घेण्याचीही त्यांची इच्छा नाही. ज्यांची इच्छा आहे. त्यातील अनेकजण हे ते केवळ त्यातून पैसा कसा मिळवता येतोच याचाच विचार करतात. देशातील महान अध्यात्मिक ग्रंथावर टिका होत आहे. देशातीलच नागरिक त्यावर टिका करत आहेत. वेळ असणाऱ्या मंडळींनी मांडलेले शास्त्र, वेळ घालविण्यासाठी मांडलेले सिद्धांत आहेत. असे म्हटले जात आहे. टिका करणारे परके नाहीत. देशीच आहेत. असे का? तर या स्वधर्माचे आचरणच थोडे विषम आहे. झटपट निकाल यात लागत नाही. पुर्वी एक दिवशीय सामना 60 षटकांचा असायचा. नंतरच्या काळात तो 50 षटकांवर आला. पुढे पुढे 45 षटकेच खेळली जाऊ लागली. आता ट्‌वेंटी ट्‌वेंटी सामने खेळले जात आहेत. झटपट निकाल लागला पाहीजे. कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर लगेच मिळायला हवे. लाभ झटपट मिळायला हवा. हुशारीची व्याख्याही बदलली आहे. गुण मिळविणारे हुशार. मग ते कसेही मिळविलेले असोत. पाठांतर करून घोकम पट्टी करून आज काल हुशार होता येते. गुणांवर हुशारी तोलली जात आहे. अशाने नव्या पिढीतील चिंतन, मनन वृत्तीच नष्ट होत आहे. ती क्षमताही राहीलेली नाही. पैसा कमविणे हेच उद्दिष्ट झाले आहे. अशा या विचारसरणीत स्वधर्माचे पालन करण्यात अडचणी येत आहेत. व्यापारी वृत्तीने अध्यात्माचा विचारच संपवला आहे. विश्‍वास, श्रद्धा, भक्तीवर आधारिलेले अध्यात्म आता दिसेनासे झाले आहे. मतांच्या पेट्यांसाठी रथ यात्रा काढली जाते. उत्सव भरवले जातात. पैसा मिळतो म्हणून देवधर्म केला जातो. दानही पैसा अधिक मिळावा यासाठीच केले जाते. फळाची अपेक्षा ठेऊन कर्म केले जात आहे. अशात स्वधर्माचा विसर पडला आहे. स्वधर्म म्हणजे स्वतःचे अस्तित्व स्वतःच जाणणे. मी कोण आहे याचा शोध घेणे. मी आत्मा आहे. तो आत्मा सर्वांमध्ये आहे. सर्वांमधील आत्मा समान आहे. तो एक आहे. आत्मा अमर आहे. देह नाशवंत आहे. देहामध्ये तो अडकला आहे. हे जाणणे. यासाठी ध्यान, धारणा आहे. यातून सुख, शांती, समाधान मिळते. यातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. यासाठी याचे आचरण करणे गरजेचे आहे. आत्मज्ञानाचे फळ निश्‍चितच मिळते. म्हणूनच तर ही गुरूशिष्य परंपरा आजही अखंड सुरू आहे.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Monday, October 10, 2011

परमसेवा

तैसें स्वामीचिया मनोभाव । न चुकिजे हेचि परमसेवा ।
येर तें गा पांडवा । वाणिज्य करणें ।।
सद्‌गुरु मनकवडे असतात. ते भक्ताच्या मनातील भाव ओळखतात. आत्मज्ञानी संत त्यानुसार भक्ताला मार्गदर्शन करतात. आधार देतात. भक्ताची आध्यात्मिक प्रगती करतात. पण अशा आत्मज्ञानी सद्‌गुरुंचा मनोभाव ओळखणार कसा? सद्‌गुरुंच्या मनातील भाव ओळखून त्यानुसार त्यांची सेवा करणे, हीच खरी परमसेवा आहे. खरा शिष्य सद्‌गुरूंच्या मनातील भाव ओळखू शकतो. त्यानुसार त्यांची सेवा करतो. आत्मज्ञानी संताना शिष्याकडून फक्त पान, फुल, फळ याचीच अपेक्षा असते. स्वच्छ अंतकरणाने दिले तरच ते त्याचा स्वीकार करतात. पण हल्ली संतांना आणि देवस्थानांना देणग्या देण्याची चढाओढ प्रचंड सुरू आहे. काही समाजात तर पुजेचे मान मिळविण्यासाठी लिलावही आयोजित केले जातात. विशेष म्हणजे लाखो, कोटी रुपये खर्चून ही सेवा केली जाते. देवाला जर फक्त पान, फुल, फळ हेच लागते तर ही जडजवाहिरे, धनसंपत्ती दान का केली जाते? दान दिल्या जाणाऱ्या संपत्तीमध्ये काळ्यापैशाचे प्रमाण अधिक आहे. मुळात ही संपत्ती गैरमार्गाने कमविली जाते आणि ती पचनी पडण्यासाठी देवाला दान दिले जाते. हे कसले दान. खरे दान, खरी सेवा ही यामध्ये नाहीच. अशा प्रकारामुळेच अध्यात्माची चौकट बदनाम होत आहे. या अपप्रचारामुळेच धर्मावर शिंतोडे ओढले जात आहेत. खरे तर धर्मामध्ये याला सेवा म्हटलेले नाही. हा तर व्यापार आहे. यासाठी सेवेचा खरा अर्थ समजून घेतला पाहीजे. अध्यात्माचा अभ्यास केला पाहीजे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्‍यक असणारी साधना केली पाहीजे. हीच खरी भक्ती आहे. हीच खरी सेवा आहे.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Sunday, October 2, 2011

आदित्याची झाडे

आदित्याचीं झाडें । सदा सन्मुख सूर्याकडे ।
तेवीं समोर शत्रूपुढें । होणें सदा ।।

आदित्याची झाडे म्हणजे सुर्यफुल. ते नेहमी सूर्याकडे तोंड करून उभे असते. सूर्याच्या धगीला ते घाबरत नाही. क्षत्रियाचे हे एक लक्षण आहे. पण सध्याच्या युगात हा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा. न भिता, न डगमगता, न घाबरता शत्रूचा सामना करायला हवा. नुसते ताठ उभे राहीले तरी शत्रूची पळता भय थोडी होते हे लक्षात घ्यावे. अंगात असा ताठर बाणा हवा. घरात कुत्रा असेल तर त्या घरात जायला आपण घाबरतो. कुत्रे काहीही करत नाही. तरीही भीती असते. ते अंगावर येईल का? ते चावेल का? ते भुंकेल का? असे ना ना विचार डोक्‍यात घोळत असतात. कुत्रे फक्त उभे राहीले तरी समोर जायला भीती वाटते. ते नुसते पाहात असते. पण समोर जाण्याचे धाडस होत नाही. इतकी दहशत कुत्रा निर्माण करतो. कुत्र्याचा ताठरपणा इतका प्रभावी असतो. त्याच्या या व्यक्तीविशेषामुळेच तो घरात पाळतात. घराचे संरक्षण तो करतो. चोरांच्या आहटाने कुत्रा भुकतो. मालकाला जाग येते. चोरी होण्यापासून संरक्षण होते. शेतातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी भुजगावणे उभारतो. भुजगावण्यामुळे पक्षी दूर पळतात. धाटातील दाण्यांचे सरक्षण होते. पक्षी शेतात कोणी तरी उभे आहे असे समजून तेथे जात नाहीत. इतका या भूजगावण्याचा प्रभाव आहे. आजार हा माणसाचा शत्रू आहे. मग तो कोणताही असो. सध्याच्या युगात अनेक मानसिक आजार माणसाला जडले आहेत. आजारपणात धीर हेच मोठे औषध आहे. धीर खचला तर आजारपणातून बाहेर येणे कठीण होते. धीर खचता कामा नये. आजाराचा सामना खंबीरपणे करायला हवा. ध्यैर्याने सामोरे जायला हवे. जो घाबरला तो संपला. भीती मनात उत्पन्न होते. यासाठी मन खंबीर असायला हवे. मन खचू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मनावरच सगळे अवलंबून आहे. मनात आले तर सर्व काही साध्य करता येते. मनात आले तर जगही जिंकता येते. यासाठी मनाची तशी तयारी करायला हवी. आत्मज्ञान प्राप्तीसाठीही मनाची तयारी करावी असावी लागते. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. मन स्थिर झाले की नेम चुकत नाही. लक्ष्य साध्य होते. यासाठी मनावर नियंत्रण मिळवायला हवे. आदित्याच्या झाडाप्रमाणे मनालाही सामर्थवान बनवले पाहीजे.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

Saturday, October 1, 2011

राजेशाही

आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडंव होये ।
कां राक्षसां दिवो पाहे । राति होऊनी ।।
सध्या लोकशाही आहे. राजेशाही पूर्वी होती. राजेशाहीत राजा होता. लोकशाहीत आता लोकप्रतिनिधी आहेत. या दोन्ही शाहीत निश्‍चितच फरक आहे. राजेशाहीत भ्रष्टाचारी राजाचे शासन जनता उलथून पाडत असे. जनतेने राजाच्या विरोधात विद्रोह केल्याच्या अनेक घटना इतिहासात घडल्या आहेत. लोकशाहीत भ्रष्ट लोकप्रतिनिधींचा पराभव करण्याचा अधिकार जनतेला दिला आहे. सध्याचे लोकप्रतिनिधी हे आजचे सरदार व मंत्री हे राजे आहेत असे म्हणायला काहीच हरकत नसावी. काळ बदलला तसा विचारही बदलले. सत्ता पलटली आहे. एकाधारशाही आता संपली आहे. पण विचार केला तर राजेशाहीत जनता जितकी सुखी होती तितकी लोकशाहीत निश्‍चितच सुखी नाही. पण लोकशाही आवश्‍यक आहे. लोकशाहीत स्वातंत्र्य आहे. सर्वांचा विचार यामध्ये आहे. पण लोकप्रतिनिधींनी सामर्थवान राजाच्या गुणांचा, आदर्शांचा वारसा जपायला हवा. केवळ ऐशोआराम करणे म्हणजे राजेशाही अशी व्याख्या करणे योग्य नाही. सध्या हे लोकप्रतिनिधी असेच समजून जगत आहेत. सत्ता आली की ऐश्‍वर्य. स्वतःचे घर भरायचे. उलट राजेशाहीत राजांनी काय केले. त्यांनी सत्तेचा भोग घेतला स्वतःचे राजवाडे भरले. असे सांगून त्यांचाच हा आदर्श आहे. हे पटवून देण्यातही हे लोकप्रतिनिधी मागे नाहीत. पण प्रत्यक्षात राजेशाहीचा अर्थ तसा नाही. सामर्थवान राजाचा प्रभाव काय होता हे ज्ञानेश्‍वरांनी एका ओवीतच सांगितले आहे. राजाची दहशत काय असते हे यातून स्पष्ट होते. राजा ज्या वाटेने जातो त्या वाटेवर जायलाही चोर घाबरतो. चोराचे धाडसही होत नसते. इतकी दहशत त्यांच्यामध्ये होती. मग सध्याच्या लोकप्रतिनिधींची अशी दहशत आहे का? ती का नाही. उलट लोकप्रतिनिधीच चोरांना सोडवायला पोलिस ठाण्यात दाखल होतात. असे आजचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींच्या सभेतच चोरीच्या अनेक घटना घडतात. लोकप्रतिनिधींच्या वाटेवर जायला आजची जनताच घाबरते आहे. यामुळेच सभेला पैसे देऊन जनता गोळा करावी लागते. चोरावर धाक असणाऱ्या राजाचा रुबाब काय असेल याची कल्पनाही या लोकप्रतिनिधींना करवत नाही. लोकप्रतिनिधींनी नुसता राजाच्या रुबाबाचा जरी आदर्श घेतला तरी जनता धन्य होईल. देशातील भ्रष्टाचार नष्ट होईल. लोकप्रतिनिधींनी राजेशाहीच्या व्याख्याच बदलून टाकल्या आहेत. पण व्याख्या बदलून तो आदर्श नष्ट करता येत नाही. तो विचार कधीही नष्ट होत नाही. राजेशाही ही श्रेष्ठच आहे. अशा श्रेष्ठ राजांचा आदर्श हा जपायलाच हवा. त्यांचे गुण हे अंगी बाणायलाच हवेत.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406