Monday, October 17, 2011

स्वधर्माचे आचरण

अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणी जरी विषमु ।
तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणें ।।

अध्यात्माचा अभ्यास करणाऱ्यांवर नेहमीच टिका होते. पारायणे करून कुठे देव भेटतो का? पारायणांचा फायदा काय? संतांच्या मागे लागून वेळ फुकट घालविण्यात काय अर्थ आहे? ध्यान, धारणेत वेळ घालविण्या ऐवजी देशसेवा करा? असे विविध सल्ले, प्रश्‍न उपस्थित केले जातात. टिका करणारे नास्तिक आहेत असेही नाही. पण टिका होते. सध्या वेळेला महत्त्व आले आहे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. जग वेगाने बदलत आहे. जागतिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. तसे माणसाची विश्रांतीही कमी झाली आहे. आराम हराम आहे. पण आराम काही काळ तरी हवा असतो. हे मान्य करायलाही वेळ नाही. नवीपिढी आरामच हरवून बसली आहे. अशा या बदलत्या जगाला देवाचा विचार करायला वेळ कुठे आहे. देव आहे तर मग दाखवा? नाहीतर तो विचार सोडून द्या. अशी विचारसरणी बनली आहे. अध्यात्म हे थोतांड आहे. असे नव्या पिढीला वाटत आहे. देवाला रिटायर करा असे म्हणणारे, तसे सल्ले देणारेही आज बरेच आहेत. भारतात अनेक थोर संत होऊन गेले. त्यांनी अनेक ग्रंथ लिहीले आहेत. पण ते वाचायला आज नव्या पिढीला वेळच नाही. ते काय आहेत हे जाणून घेण्याचीही त्यांची इच्छा नाही. ज्यांची इच्छा आहे. त्यातील अनेकजण हे ते केवळ त्यातून पैसा कसा मिळवता येतोच याचाच विचार करतात. देशातील महान अध्यात्मिक ग्रंथावर टिका होत आहे. देशातीलच नागरिक त्यावर टिका करत आहेत. वेळ असणाऱ्या मंडळींनी मांडलेले शास्त्र, वेळ घालविण्यासाठी मांडलेले सिद्धांत आहेत. असे म्हटले जात आहे. टिका करणारे परके नाहीत. देशीच आहेत. असे का? तर या स्वधर्माचे आचरणच थोडे विषम आहे. झटपट निकाल यात लागत नाही. पुर्वी एक दिवशीय सामना 60 षटकांचा असायचा. नंतरच्या काळात तो 50 षटकांवर आला. पुढे पुढे 45 षटकेच खेळली जाऊ लागली. आता ट्‌वेंटी ट्‌वेंटी सामने खेळले जात आहेत. झटपट निकाल लागला पाहीजे. कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर लगेच मिळायला हवे. लाभ झटपट मिळायला हवा. हुशारीची व्याख्याही बदलली आहे. गुण मिळविणारे हुशार. मग ते कसेही मिळविलेले असोत. पाठांतर करून घोकम पट्टी करून आज काल हुशार होता येते. गुणांवर हुशारी तोलली जात आहे. अशाने नव्या पिढीतील चिंतन, मनन वृत्तीच नष्ट होत आहे. ती क्षमताही राहीलेली नाही. पैसा कमविणे हेच उद्दिष्ट झाले आहे. अशा या विचारसरणीत स्वधर्माचे पालन करण्यात अडचणी येत आहेत. व्यापारी वृत्तीने अध्यात्माचा विचारच संपवला आहे. विश्‍वास, श्रद्धा, भक्तीवर आधारिलेले अध्यात्म आता दिसेनासे झाले आहे. मतांच्या पेट्यांसाठी रथ यात्रा काढली जाते. उत्सव भरवले जातात. पैसा मिळतो म्हणून देवधर्म केला जातो. दानही पैसा अधिक मिळावा यासाठीच केले जाते. फळाची अपेक्षा ठेऊन कर्म केले जात आहे. अशात स्वधर्माचा विसर पडला आहे. स्वधर्म म्हणजे स्वतःचे अस्तित्व स्वतःच जाणणे. मी कोण आहे याचा शोध घेणे. मी आत्मा आहे. तो आत्मा सर्वांमध्ये आहे. सर्वांमधील आत्मा समान आहे. तो एक आहे. आत्मा अमर आहे. देह नाशवंत आहे. देहामध्ये तो अडकला आहे. हे जाणणे. यासाठी ध्यान, धारणा आहे. यातून सुख, शांती, समाधान मिळते. यातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. यासाठी याचे आचरण करणे गरजेचे आहे. आत्मज्ञानाचे फळ निश्‍चितच मिळते. म्हणूनच तर ही गुरूशिष्य परंपरा आजही अखंड सुरू आहे.

राजेंद्र घोरपडे, कोल्हापूर
9011087406

No comments:

Post a Comment