Friday, August 30, 2019

दूरदृष्टी



निरपेक्ष, शुद्ध, तत्त्वार्थी देखणा, उदासीन, संसारदुःख विरहित, निरहंकारी असा भक्त सद्‌गुरूंना अधिक जवळचा वाटतो. असा भक्त आध्यात्मिक प्रगती साधतो. भौतिक विकासातही अशा व्यक्ती पुढे असतात. त्यांच्या दूरदृष्टीचा फायदा अनेकांना होतो. सध्याच्या राजकारणात अशा व्यक्तींची गरज आहे.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685
व्यापक आणि उदास । जैसें कां आकाश ।
तैसें जयाचें मानस । सर्वत्र गा ।। 180 ।। अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणे आकाश सर्वव्यापक असून उदास असते त्याप्रमाणे ज्याचें मन सर्वव्यापक असून उदास असते. (म्हणून त्याच्या मनाची कोठेहि आसक्ती नसते.)

जुन्या पिढीतील लोकांमध्ये दूरदृष्टी अधिक होती. सध्याच्या पिढीत तितकीशी दूरदृष्टी दिसून येत नाही. पूर्वी लोकांवर अध्यात्माचा, भारतीय संस्कृतीचा मोठा पगडा होता. या संस्कृतीतच मुळात दूरदृष्टीचा विचार मांडला गेला आहे. अमेरिकेला दूरदृष्टी अधिक आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे ते आज प्रगत आहेत, असेही सांगितले जाते; पण प्रत्यक्षात तेथे सुरू असलेल्या मंदीच्या बातम्या वाचल्यानंतर असे वाटते की, त्यांनी शोध लावले, तंत्रज्ञान विकसित केले पण त्याच्या वापरात दूरदृष्टीचा अभाव होता, असे मानावेच लागेल. कदाचित मी म्हटलेले चूकही असेल, पण सध्या तेथे मंदी आहे, हे खरे आहे. म्हणजे त्यांच्या नियोजनात दूरदृष्टीचा अभाव आहे, हे निश्‍चित. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत दूरदृष्टी असणारे अनेक थोर नेते होते, यामुळे आपला देश स्वतंत्र झाला. दूरदृष्टी असणाऱ्या त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या योगदानामुळे विकासाला मोठी चालना मिळाली. देशाचा विकास हेच त्यांचे ध्येय होते. संतांप्रमाणेच या लोकप्रतिनिधीमध्ये त्यागी वृत्ती होती. स्वातंत्र्यासाठी त्यांनी त्याग केला, पण आताच्या काळातील तरुणांत, लोकप्रतिनिधीमध्ये अशी त्यागी वृत्ती नाही. जुन्या पिढीतील लोकप्रतिनिधींप्रमाणे त्यागी वृत्ती असणारे, दूरदृष्टी असणारे लोकप्रतिनिधी आता क्वचितच पाहायला मिळतात आणि असले तरी सध्याच्या राजकारणात त्यांचा निभाव लागणे तसे कठीणच वाटते. मुळात ते सध्याच्या राजकारणात उतरण्यास नापसंती दर्शवितात, हेही तितकेच खरे आहे. इतका काळ बदलला आहे, पण देशाच्या विकासासाठी आणि सार्वभौत्वासाठी नव्या पिढीत दूरदृष्टी असणे गरजेचे आहे. अध्यात्मातून दूरदृष्टीचा विचार करण्याची प्रेरणा मिळते. व्यापक विचार करण्याची वृत्ती उत्पन्न होते. यासाठी आध्यात्मिक विचारांची कास नव्या पिढीने धरायला हवी. संतांनाही दूरदृष्टी असणारे भक्त अधिक प्रिय असतात. निरपेक्ष, शुद्ध, तत्त्वार्थी देखणा, उदासीन, संसारदुःख विरहित, निरहंकारी असा भक्त सद्‌गुरूंना अधिक जवळचा वाटतो. असा भक्त आध्यात्मिक प्रगती साधतो. भौतिक विकासातही अशा व्यक्ती पुढे असतात. त्यांच्या दूरदृष्टीचा फायदा अनेकांना होतो. सध्याच्या राजकारणात अशा व्यक्तींची गरज आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Thursday, August 29, 2019

कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे ।

यश मिळाले नाही तरी प्रयत्न सोडू नयेत. याचाच अर्थ फळाची आशा न ठेवता कर्म करत राहायचे. जगात अनेक संधी आहेत. पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी प्रयत्नांची गरज आहे. यासाठी आपल्या इच्छा, आकांक्षा मर्यादित ठेवाव्यात.
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे ।
त्यागास्तव आंगवे । शांति सगळी ।।139।। अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - फळाला उत्पन्न करणारें जें कर्म तें जेंव्हा दूर होते, तेव्हा फलत्याग संभवतो आणि अशा त्या त्यागामुळे पूर्ण शांती (पूर्ण ब्रह्मस्थिती) हस्तगत होते.

आशा न ठेवता कर्म करायला हवे. सध्याच्या बदलत्या जीवनपद्धती आणि संस्कृतीमध्ये हे विचार पटणे जरा कठीणच वाटते. कारण सध्याच्या काळात कोणतेही काम हे फळाची अपेक्षा ठेवूनच केले जाते. पगारवाढ मिळावी, पदोन्नती व्हावी, वरचे पद मिळावे, ही अपेक्षा ठेवूनच आपण काम करत असतो. देशातील काम च्या अनुभवावर परदेशात मोठी नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, अशा अनेक फळांची अपेक्षा असते. यासाठीच आपण कर्म करत असतो. अधिक नफा मिळावा या हेतूने व्यापारी काम करत असतो. सध्याच्या काळात तरी सर्वत्र हेच सुरू आहे. फळाच्या आशेनेच प्रगती होत असल्याचे अनेक जण मानतात. यामुळे नव्या पिढीला फलत्याग हा विचार रुजणे जरा कठीण वाटते, पण फळाचा त्याग करूनच कर्म करायला हवे. तसे पाहता ही त्यागी वृत्ती प्रत्येकामध्ये असते. ज्यांच्यामध्ये ही त्यागी वृत्ती नसते, तो कर्मातून योग्य लाभ मिळाला नाही तर निराश होतो. यातून तो भरकटतो. आत्महत्या अशा निराशेतूनच होत आहेत. पगारवाढ नाही, योग्य पैसा मिळत नाही, उत्पन्नात घट झाली, मोठा तोटा झाला, पदोन्नती मिळाली नाही, अशा कारणाने निराशा येते. मुळात यासाठीच तर फळाची अपेक्षा ठेवू नये. यश मिळाले नाही तरी प्रयत्न सोडू नयेत. याचाच अर्थ फळाची आशा न ठेवता कर्म करत राहायचे. जगात अनेक संधी आहेत. पर्याय उपलब्ध आहेत. यासाठी प्रयत्नांची गरज आहे. यासाठी आपल्या इच्छा, आकांक्षा मर्यादित ठेवाव्यात. यातून नैराश्‍य येणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. यासाठी तर फलत्याग हा सोपा मार्ग आहे. फलत्यागातूनच शांती, समाधान मिळते. आध्यात्मिक साधना करतानाही फळाची आशा ठेवू नये. साधना करत राहावे. यातूनच पूर्ण शांती, पूर्ण ब्रह्मस्थिती हस्तगत करता येते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Sunday, August 25, 2019

श्रेष्ठ भक्त कोण ?





सद्‌गुरूंच्या ठिकाणी मन ठेवून, नित्य युक्त होऊन, अतिशय श्रद्धेने युक्त असे जे भक्त सद्‌गुरूंची उपासना करतात ते सर्वांत उत्कृष्ट योगी आहेत, असे सद्‌गुरू समजतात.
- राजेंद्र घोरपडे

यापरी जे भक्त । आपणपें मज देत ।
तेचि मी योगयुक्त । परम मानी ।। 39 ।। अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - याप्रमाणें जे भक्त मला आपला आत्मभाव देतात, त्यांनाच मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतों.

संतांकडे अनेक जण जात असतात. प्रत्येकाचा भक्तीचा, श्रद्धेचा मार्ग वेगळा असतो. कोण स्वतःच्या घरगुती अडचणी सोडविण्यासाठी संतांकडे जात असतो, तर कोण विविध कामे मिळावीत या आशेने जात असतो. सद्‌गुरूंच्या दर्शनाने आपले कष्ट दूर होतात, समस्या सुटतात असा त्यांचा समज असतो. सद्‌गुरूंचे उपदेश ते घेत असतात. यामुळे त्यांची प्रगती होते. साहजिकच भक्ती दृढ होते. विश्‍वास वाढतो. सद्‌गुरू केवळ आध्यात्मिक प्रगतीतच भक्ताला मदत करतात असे नाही, तर भक्ताची भौतिक प्रगतीही ते साधत असतात. भक्तांच्या सांसारिक समस्याही ते समजावून घेत असतात. त्या कशा दूर करायच्या, याबाबत मागदर्शनही करत असतात; पण सद्‌गुरूंचा हेतू हा भक्ताची भक्‍ती दृढ व्हावी, हा असतो. आध्यात्मिक प्रगतीसाठी भौतिक प्रगतीही आवश्‍यक आहे. संसार आणि परमार्थ एकाच वेळी करत असताना भक्ताची भौतिक प्रगती असेल, तरच त्याचे मन अध्यात्मात रमेल, हे सद्‌गुरूंना माहीत असते; पण अनेक भक्तांचा तसेच व्यक्तींचा याबाबत गैरसमज असतो. अनेक व्यक्ती या भौतिक सुखासाठीच सद्‌गुरूंचा वापर करून घेतात. अशा वेळी त्यांच्यातील अहंकार जागृत झाला तर मात्र भक्ती संपते. यासाठी सद्‌गुरू भक्ताला भौतिक प्रगतीसाठी मदत का करतात, हे जाणून घेणे गरजेचे आहे. सद्‌गुरूंचा श्रेष्ठ भक्त कसे होता येते, याचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. सद्‌गुरू श्रेष्ठ भक्त कोणास समजतात, हे समजून घ्यायलाच हवे. सद्‌गुरूंच्या ठिकाणी मन ठेवून, नित्य युक्त होऊन, अतिशय श्रद्धेने युक्त असे जे भक्त सद्‌गुरूंची उपासना करतात ते सर्वांत उत्कृष्ट योगी आहेत, असे सद्‌गुरू समजतात. जे भक्त सद्‌गुरूंना आपला आत्मभाव देतात, त्यांनाच सद्‌गुरू श्रेष्ठ भक्त मानतात. सद्‌गुरूंच्याकडे आत्मज्ञानी होण्यासाठी जावे. भौतिक प्रगतीसाठी सद्‌गुरूंचा वापर करणे योग्य नाही. आध्यात्मिक प्रगतीसाठीच सद्‌गुरू आहेत.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Friday, August 23, 2019

भुजबळ-राणे संदर्भात प्रश्न..द्या मग पटकण उत्तर...


सध्या विधानसभा निवडणूकांजवळ आल्यामुळे राजकिय वातावरण तापू लागले आहे. भाजप-शिवसेनात अनेकजण जाण्यास इच्छुक आहेत. पण नेमके या मागचे गुपीत काय आहे आपणास काय वाटते...असे प्रश्न घेऊन आलो आहे ...मग द्या पटापट उत्तर...


Sunday, August 18, 2019

मराठीची चिंता नको; हवी दर्जेदार साहित्यनिर्मिती






मराठीच्या वाढीसाठी उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. भांडत बसण्यापेक्षा किंवा चिंता करत बसण्यापेक्षा दर्जेदार साहित्य निर्मितीवर भर द्यायला हवा. अशा लेखकांना प्रोत्साहन द्यायला हवे. मराठी भाषा अमर आहे, मनाला चिरंतन स्फूर्ती देणारी भाषा आहे, हे या भाषेचे वैशिष्ट्य जपायला हवे. 

 मऱ्हाठियेचां नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।
घेणे देणे सुखचिवरी । हों देई या जगा ।। 16 ।। अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेंच घेणे देणे होऊ दे.

सध्या मराठी भाषा वापराचा आग्रह धरला जात आहे. कदाचित अशा व्यक्तींना मराठी भाषा लुप्त पावते की काय, याची भीती वाटत असावी. जागतिकीकरणामुळे अनेक प्रांतांतील लोक महाराष्ट्रात आले, तसे महाराष्ट्रातील लोकही परप्रांतात गेले, पण हे प्रमाण इतरांच्या तुलनेत कमी आहे. कारण, मराठी माणसाला घर सुटत नाही. महाराष्ट्राबाहेर जाऊन काम करण्याची त्याच्या मनाची तयारी नाही. यामुळे मराठी माणसाचे स्थलांतराचे प्रमाण इतरांच्या तुलनेत कमी आहे. महाराष्ट्रात सध्या परप्रांतियांची संख्या वाढत आहे. पुण्यातील पिंपरी - चिंचवडमध्ये लोक मराठी ऐवजी हिंदीच अधिक बोलतात. मुंबईतही अशीच परिस्थिती आहे. परप्रांतियांच्या खिचडीने हिंदीचा वापर वाढत आहे. मराठी हळूहळू मागे पडत आहे. कदाचित यामुळे मराठी लुप्त होईल की काय, अशी चिंता व्यक्त केली जात असावी; पण खरे पाहता कोणत्याही भाषेचा प्रभाव आणि वापर हा त्यामध्ये निर्माण होणाऱ्या साहित्यावर अवलंबून असतो. चांगल्या साहित्याच्या निर्मितीने साहजिकच प्रभाव वाढतो. भाषेची लोकप्रियताही वाढते. वापरही वाढतो. मराठी मागे पडत आहे, कारण यामध्ये तशा तोडीच्या साहित्याची निर्मिती केली जात नाही, हे परखड सत्य आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या ज्ञानेश्‍वरी ग्रंथाने मराठी भाषेला अमरत्व दिले आहे. या प्रांतात त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला आहे. ही परंपराही अखंड सुरू आहे. यावर साहित्य निर्मितीही होत आहे आणि यापुढेही साहित्य निर्मिती होत राहील. त्यामुळे मराठी लुप्त पावण्याची भीती बाळगणे व्यर्थ आहे. भाषेचा वापर कमी झाल्याचे पाहून भीतीने इतरांना त्रास देणे, ही मराठी संस्कृती निश्‍चितच नाही. याचे राजकारण करणे, हे यापेक्षाही वाईट. मराठी भाषा लुप्त होईल, अशी चिंता करणाऱ्यांनी लोकांची वाचनाची आवड वाढेल, अशा उत्तम दर्जाच्या साहित्याची र्निमिती करावी. अमरत्व प्राप्त झालेली भाषा लुप्त होईल, ही चिंता करणे व्यर्थ आहे. पण मराठीच्या वाढीसाठी उत्तम दर्जाचे साहित्य निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. भांडत बसण्यापेक्षा किंवा चिंता करत बसण्यापेक्षा दर्जेदार साहित्य निर्मितीवर भर द्यायला हवा. अशा लेखकांना प्रोत्साहन द्यायला हवे. मराठी भाषा अमर आहे, मनाला चिरंतन स्फूर्ती देणारी भाषा आहे, हे या भाषेचे वैशिष्ट्य जपायला हवे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 



Thursday, August 15, 2019

तें किर अनाम अजाती ।



तें किर अनाम अजाती ।
परी अविद्यावर्गाचिये राती -।
माजी वोळखावया श्रुती । खूण केली ।। ३२९।। अध्याय १७ वा

ते ब्रह्म खरोखर नामरहित व जातीरहित आहे; परंतु अविद्यासमुदायरुपी रात्रींत सांपडलेल्या जीवांनी ब्रह्मास ओळखावे, एवढ्यासाठी श्रुतींनी त्या परब्रम्हास जी खूण केली, ते त्या ब्रह्माचे नाम होय. (मामा दांडेकर)