Saturday, February 29, 2020

संन्यास म्हणजे काय ?


मनाची स्थिरता हीच अध्यात्मात महत्त्वाची आहे. स्थिर मनाने साधना उत्तम होते. साधनेवर मन स्थिर राहीले. श्वासावर मन स्थिर झाले. तर मग मनाला तो सो ऽ हम् सो ऽ हम् चा स्वर आपोआप ऐकायला येऊ लागतो. कानाने तो ऐकायचा असतो व मन त्यावर स्थिर करायचे असते. तरच खरी साधना होते. मनाला सोहम् चा बोध होऊ लागतो. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

आता गृहादिक आघवें । तें काहीं नलगे त्यजावे ।
जे घेतें जाहलें स्वभावे । निःसंगु म्हणऊनी ।। 22 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5 वा

ओवीचा अर्थ -  अशा स्थितीत घर वैगरे सर्वांचा त्याग करण्याची कांही जरुरी नाही, कारण त्यांची आसक्ती घेणारें जें मन, तेंच स्वभावतः निःसंग झाले आहे. 

संन्यास म्हणजे काय ? घरदार सोडून साधनेसाठी जंगलात जाणे किंवा अध्यात्मिक पिठाच्या मठासाठी आपले जीवन व्यथित करणे म्हणजे संन्यास. असा सर्वसाधारण अर्थ आपणास पूर्वीपासून माहीत आहे. पण यामध्ये आपला मुख्य हेतू हा आत्मज्ञानप्राती हा असायला हवा. तरच तो संन्यास होऊ शकतो. अन्यथा  जीवनात आलेल्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी केलेला घरादाराचा त्याग असा होईल. किंवा जीवनात बदल म्हणून स्विकारलेला मार्ग असेही त्यास म्हणता येऊ शकेल. मग हा संन्यास कसा होईल. जीवनात बदल म्हणून जरी अध्यात्मिक मार्ग स्वीकारला तरी काही हरकत नाही. आत्महत्येपेक्षा अध्यात्माचा आधार घेऊन जीवन जगलेले कधीही चांगलेच. दुःखाने खचलेले मन अध्यात्माने सावरले जाऊ शकते. पुन्हा तो नव्याने संसारात रमूही शकतो. आत्महत्या केली त्याचे दुःख तो इतरांवर लादतो. त्यामुळे इतरांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. अध्यात्माने तो सावरला तर पुन्हा तो आपले जीवन सुखाने जगू शकतो. अध्यात्मात संन्यास याचा अर्थ आत्मज्ञानप्राप्तीसाठी मनाची केलेली तयारी असा आहे. मग यासाठी घरदाराचा त्याग करण्याची काहीच गरज नाही. मनातून आसक्ती काढल्याने मन निःसंग होते. ते संसारात गुतून राहात नाही. आपण संसार करत असतो पण मनाने त्या संसाराचा त्याग केलेला असतो. मन त्यापासून अलिप्त झालेले असते. जे काही घडते ते सद्गुरुंच्या कृपेने असे म्हणून आलेल्या सुख-दुःखाने मन व्यथित होत नाही. सुखाने तो हरळूनही जात नाही किंवा दुःखाने तो खचूनही जात नाही. सुख आले काय अन् दुःख झाले काय?  या दोन्हीही गोष्टी ह्या त्याच्यासाठी समानच असतात. त्याचा त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नाही. मनाची स्थिरता हीच अध्यात्मात महत्त्वाची आहे. स्थिर मनाने साधना उत्तम होते. साधनेवर मन स्थिर राहीले. श्वासावर मन स्थिर झाले. तर मग मनाला तो सो ऽ हम् सो ऽ हम् चा स्वर आपोआप ऐकायला येऊ लागतो. कानाने तो ऐकायचा असतो व मन त्यावर स्थिर करायचे असते. तरच खरी साधना होते. मनाला सोहम् चा बोध होऊ लागतो. मी कोण आहे याची जाणीव होऊ लागते. साहजिकच मनाची वाटचाल ही आत्मज्ञानप्राप्तीकडे होऊ लागतो. आत्मज्ञानाचा बोध होऊ लागतो. अन् नराचा नारायण होतो. मग यासाठी संन्यास कशाचा केला हे लक्षात घ्यायला हवे. अध्यात्मातील संन्यासाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. तरच अध्यात्मिक प्रगती होऊ शकेल. 

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Friday, February 28, 2020

यशासाठी धीर हवा



तू अनुचिता चित्त नेदिसी। धीरु कंहीच न सांडिसी।
तुझेनि नामें अपयशीं। दिशा लंघिजे ।। 8 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 2 रा


ओवीचा अर्थ - एरवी तू अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीस, कधीही धीर सोडीत नाहीस, तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडी पळून जावे.

पैशाच्या जोरावर दंगामस्ती करणारी आपली चंगळवादी संस्कृती नाही. पैशाचा योग्य विनियोग कसा करायचा, हे आपल्या संस्कृतीत शिकविले जाते. अयोग्य गोष्टीपासून चार हात लांब राहायला शिकवणारी, कोणत्याही गोष्टीत धीर खचू न देणारी अशी आपली संस्कृती आहे. पण आपण ती विसरत चाललो आहोत. मानसिकता ढळू लागल्यानेच अनेक समस्या आता उभ्या राहू लागल्या आहेत. किरकोळ कारणांवरून गुन्हेगारी, आत्महत्या घडत आहेत. छोट्या छोट्या अपयशाने आपण खचून जात आहोत. आपल्या संस्कृतीचा ऱ्हास यास कारणीभूत आहे. योग्य संस्कार घडवणारी आपली संस्कृती आपण यासाठीच जोपासायला हवी. अयोग्य गोष्टींकडे दुर्लक्ष, कठीण प्रसंगी धीर ढळू न देणे व सत्याची कास धरायला शिकले पाहिजे, तर केव्हाच आपल्या पदरी अपयश येणार नाही.

Tuesday, February 18, 2020

गारवेलच्या नव्या प्रजातींचा शोध...

  कोल्हापूर - गारवेलच्या (आयपोमोईया) सुमारे 58 प्रजातींची नोंद भारतात केली गेली आहे. शिवाजी विद्यापीठांतर्गत न्यू कॉलेजमधील डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. आम्रपाली कट्टी यांनी यावर संशोधन केले. डॉ. शिंपले आणि डॉ. कट्टी यांनी संशोधनामध्ये प्रामुख्याने आफ्रिकेच्या जंगलात आढळणाऱ्या तीन प्रजातींची नव्याने नोंदणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट या संशोधनासाठी अर्थसहाय्य केले. 
मराठवाड्यातील पैठणमध्ये आयपोमोईया टेन्युपेस, गुजरातमधील बलसाडमध्ये अकॅन्थोकारपा ही दुसरी, तर कर्नाटकातील चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यात नंदी हिल्स या डोंगररांगांत फल्विकाऊलिस ही तिसरी प्रजाती आढळल्याची नोंद डॉ. शिंपले व डॉ. कट्टी यांनी केली आहे. यामध्ये नंदी हिल्समधील प्रजातीस मार्चमध्ये, तर इतर जातींना डिसेंबरपर्यंत फुले येत असल्याचे आढळले. 
आयपोमोईया लॅक्‍सिफ्लोरा ही प्रजाती उत्तर भारतात आढळते. ही भारताशिवाय अन्यत्र कोठेच आढळत नाही. भारतात आढळणाऱ्या 58 प्रजातींपैकी सुमारे 40 प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. यातील काही प्रजाती प्रदेशनिष्ठ असून ठराविक प्रदेशातच त्या वाढतात. त्यामध्ये आयपोमोईया लॅक्‍सिफ्लोरा, क्‍लार्की, डायव्हर्सिफोलिया, सालसेटेन्सिस, डेक्कना व्हरायटी लोबाटा आदींचा समावेश आहे. आयपोमोईयाच्या दुर्मिळ प्रजातीमध्ये असारिफोलिया, मोम्बास्साना, म्युल्लेरी, रुबेन्स, लाक्‍युनोसा आणि टेन्युपिस यांचा समावेश होतो. या प्रजाती संपूर्ण भारतात एक किंवा दोन ठिकाणीच सापडतात. 

गारवेलचे महत्त्व 

1. आयपोमोईया (गारवेल)मध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. आयपोमोईया मोरेसियाना यामध्ये ऍन्टिडायबेटिक गुणधर्म आहेत. त्याच्या मुळांचा उपयोग हर्बल मेडिसिनमध्ये केला जातो. यामध्ये ऍन्टिमायक्रेबेल गुणधर्म आहेत. संसर्गजन्य जीवाणूंच्या नियंत्रणासाठी त्याचा उपयोग होतो. 
2. आयपोमोईया स्पेसकॅपरी ही वनस्पती समुद्रकिनारी आढळते. समुद्राच्या लाटांमुळे जमिनीची धूप होते; पण ही वनस्पती धूपप्रतिबंधक म्हणून कार्य करते. तिची मुळे जमिनीला घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे जमिनीची धूप रोखली जाते. 

जैवविविधतेमध्ये महत्त्व 

संशोधकांच्या मते, गारवेलच्या काही प्रजाती नष्ट झाल्यास जैवविविधतेला मोठा धोका पोहोचू शकतो. फळातील रस शोषणाऱ्या कीटकांचे (कॅटरपिलर) जीवनचक्र या वनस्पतीवर अवलंबून आहे. ही वनस्पती नष्ट झाल्यास हे कीटकही नष्ट होण्याचा धोका आहे. तसेच भुंगे, मुंग्या, बिट्‌स, मधमाशाही यावर अवलंबून आहेत. त्यांचेही जीवनचक्र धोक्‍यात येऊ शकते.
 विषारी गुणधर्म 
आयपोमोईया कारनिया किक्‍युलर (बेशरम किंवा गारवेल) ही वनस्पती विषारी आहे. या वनस्पतीच्या चिकात विषारी गुणधर्म आहेत. आयपोमोईया असारीफोलिया या वनस्पतीची पानेही विषारी आहेत. शेळी, मेंढी, डुक्कर यांनी ही पाने खाल्ल्यास त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. तर आयपोमोईया ट्रायलोबा हे उसाच्या शेतात तण म्हणून आढळते. 

मॉर्निंग ग्लोरी असेही टोपणनाव 

ही वेलवर्गिय वनस्पती असून त्यांना आकर्षक फुले येतात. म्हणून त्यांचा उपयोग शोभेची झाडे म्हणून सुद्धा होतो. या प्रजातींना मॉर्निंग ग्लोरी असे टोपणनाव आहे कारण यांची फुले पहाटे पाच ते सकाळी नऊ या वेळेत उमलतात आणि दुपारी बारा वाजता सुकतात. पहाटे फुले उमलण्याची प्रक्रिया खूप प्रजातींमध्ये पहावयास मिळते, पण काही प्रजातींची फुले रात्री उमलतात. त्या प्रजाती I. aculeata, I. alba, I. violacea, I. salsettensis, I. involucrata आणि I. kotschyana या होत. रात्री उमलणाऱ्या प्रजातींची फुले मुख्यत्वे पांढरी आहेत, पण I. involucrata आणि I. kotschyana प्रजातींची फुले गुलाबी रंगाची आहेत. 

नोंदविण्यात आलेल्या काही प्रजाती 

1. I. salsettensis प्रजाती मुंबईच्या सालसेट द्विपावर 1958 नोंद, 2016 मध्ये राजापूर (रत्नागिरी) मध्येही आढळल्याची नोंद. 
2. I. aculeata आणि I deccana var. lobata या प्रजातींचा आढळ गोवा राज्यात. 
3. समुद्र किनारी आढळणाऱ्या प्रजाती I. violacea, I. pes-caprae, I. littoralis 
4. I. kotschyana गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील वालुकामय प्रदेशात. 
5. I. tenuipes, I. tuberculata या उष्ण व कमी पाण्याच्या ठिकाणी. 
- राजेंद्र घोरपडे

रामकंद छे ! हे तर...




 कोल्हापूर -  रामकंद म्हणून अनेक भागात एका वनस्पतीची विक्री केली जाते. कंद म्हणजे मुळ, पण इतके मोठे मुळ कसे? असा प्रश्‍न कोल्हापुरातील वनस्पती तज्ज्ञ डॉ. विनोद शिंपले, डॉ. निलेश पवार, डॉ. मानसिंगराज निंबाळकर, डाॅ घनशाम दिक्षीत, डाॅ निलेश पवार यांना पडला. त्यांनी जोतिबा डोंगरावर कंदाची विक्री करणाऱ्या व्यक्तीकडे याबाबत चौकशी केली. त्याने तर हे मुळ आफ्रिकेतून आयात केल्याचे सांगितले. त्यामुळे या वनस्पतीबद्दल तज्ज्ञांना अधिकच रस वाटू लागला. त्यांनी खरचं हे कंदमुळ आहे का ? याचा शोध घेण्याचा निश्‍चय केला. तेव्हा त्यांना मिळालेली माहिती अधिकच धक्कादायक अशी आहे.
या संशोधकांनी अभ्यासासाठी कंदाचे काही काप खरेदी केले. त्याची व्हॅस्कुलर संरचना त्यांनी प्रथम तपासली. यावरून ही एकदल कुळातील वनस्पती असल्याचे स्पष्ट झाले. तसेच हा काप कंदाचा नसून खोडाचा असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. इतकेच नव्हे तर, ही वनस्पती आफ्रिका किंवा इतर खंडातून आयात केलेली नसून भारतातील कोणत्याही माळरानावर असणारे केकताड किंवा घायपात असल्याचेही त्यांना आढळले. 
संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अगेव्ह सिसालाना किंवा अगेव्ह अमेरिकाना असे आहे. कंदमुळ म्हणून विक्री करणाऱ्या व्यक्ती ही वनस्पती जेव्हा फुलोऱ्यावर येते, त्या वेळेस त्याची पाने काढून टाकतात व त्याचा रंदा मारून गुळगुळीत करतात. तसेच त्यावर मातीचा थर देतात. यामुळे हे कंद असल्यासारखे आपणास भासते. मात्र प्रत्यक्षात हा खोडाचा भाग आहे. हे खोड मुळात गोड नसते. त्यावर सॅक्रिन टाकून ते गोड करण्यात येते. खरेतर या वनस्पतीची पाने वाक तयार करण्यासाठी व नंतर हाच वाक दोर बनवण्यासाठी देण्यात येतो. 

खाण्यास आरोग्यदृष्ट्या घातक 

कंद म्हणून विकला जाणारा हा काप खाण्यास आरोग्यदृष्ट्या घातक आहे. कारण या कंदात व्हीकोजेनीन नावाचे स्ट्युराईड आहे. त्यामुळे ते अति प्रमाणात खाल्ल्यास ते आरोग्यास घातक ठरू शकते. 

कसे केले संशोधन 

संशोधनाबाबत प्रा. डॉ. मानसिंगराज निंबाळकर म्हणाले, या वनस्पतीची शास्त्रीय ओळख पटवण्यासाठी डीएनए बारकोडींग सारखी अत्याधुनिक पद्धतीचा वापर केला गेला. या वनस्पतीच्या शोधामुळे भविष्यात या पद्धतीचा वापर करून अनेक वनस्पतींचा शोध लावणे शक्‍य होणार आहे. कंद म्हणून सांगण्यात येणाऱ्या वनस्पतीच्या कापाची जनुकिय चाचणी आम्ही केली. त्याची वैशिष्ट्ये शोधली. उपलब्ध असलेल्या जुनकांच्या सोबत या वैशिष्ट्यपूर्ण जनुकांची तुलना केली. यावरून ही वनस्पती घायपात या कुळातील आहे, हे निश्‍चित केले. 
- राजेंद्र घोरपडे

Sunday, February 16, 2020

आत्मरूप गणेश



 आत्मरूप गणेशु स्मरण । सकळ विद्यांचे अधिकरण ।
तेचि वंदू श्रीचरण । श्री गुरूंचे ।। 1 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - सर्व विद्यांचें आश्रयस्थान जें आत्मरूप गणेशाचें स्मरण, तेच श्रीगुरूंचे श्रीचरण होत. त्यांस नमस्कार करूं.

कोणत्याही शुभ कार्याची सुरवात करताना श्री गणेशाचे स्मरण केले जाते. ही आपली संस्कृती आहे. आपला जन्म होतो म्हणजे काय होते ? आपल्या पंचमहाभूताच्या या शरीरात आत्मा येतो. मृत्यूनंतर हा आत्मा या शरीरातून बाहेर पडतो. म्हणजे आत्मा हा आपल्या जीवनाची सुरुवात आहे. अशा या आत्माचे स्मरण आपण नित्य ठेवायला हवे. जन्माला आलेल्या प्रत्येकाचे नाव हे वेगळे आहे. ती त्याच्या शरीराची ओळख आहे; पण या प्रत्येक नावाच्या शरीरात असणारा आत्मा हा एकच आहे. हे ओळखणे हेच अध्यात्म आहे. या ज्ञानाची ओळख सद्‌गुरू करून देतात. अशा गुरूंना वंदन करून नित्य साधनेतून आपणही त्यांच्याप्रमाणे आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करायला हवा.

सोऽहम साधना



योगसुखाचे सोहळे । सेवका तुझेनि स्नेहाळे ।
सोऽ हंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ।। 4 ।।
(श्री ज्ञानेश्‍वरी अध्याय 12 वा)

ओवीचा अर्थ ः हे प्रेमळ माते, भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात व भक्तांची ते ब्रह्म मी आहे, अशा स्वरूपसिद्धीच्या प्राप्तीची हौस तू पुरवितेस.

अध्यात्म आपणास प्रथम स्वतःचा शोध घेण्यास शिकवते. मी कोण आहे? याचा शोध प्रत्येकाने घ्यायला हवा. स्वतःचे स्वरूप स्वतः ओळखायला हवे. हीच तर साधना आहे. "मी'चा शोध स्वतः घ्यायला हवा. "मी' म्हणजे कोण? आपले नाव म्हणजे आपण आहोत का? नाही तर मग कोण? आपण जिवंत आहोत, हे कशावरून ओळखले जाते? डॉक्‍टर प्रथम श्‍वास सुरू आहे की नाही, हे तपासतात. आपण मरतो तेव्हा आपला श्‍वास बंद होतो. हा श्‍वास म्हणजे काय? श्‍वासातून प्राणवायू (शुद्ध हवा) आत घेतो व अशुद्ध हवा बाहेर सोडतो. श्‍वासाचा स्वर श्‍वास आत घेताना "सो' व बाहेर सोडताना "हं' असा होतो. हेच सोऽ हं. हे जाणून घेण्यासाठीच सोऽ हं साधना आहे. साधनेतून याचा बोध होतो. म्हणजेच मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, हेच माझे खरे स्वरूप आहे. सद्‌गुरुंच्या कृपेने याचा बोध होतो. स्वतःची ओळख स्वतः करून घेणे हीच सोऽ हं साधना यातूनच तो आत्मज्ञानी होतो.

खरे प्रेम





प्रियाचां ठायी सन्मान । प्रिय न पाहे समर्था जाण ।
तेवीं उच्छिष्ट काढिलें आपण । ते क्षमा कीजो ।। 575 ।। अध्याय 11 वा

ओवीचा अर्थ - असें पाहता की, स्नेह्याच्या ठिकाणी स्नेही सन्मानाची मुळीच इच्छा करत नाही. त्याप्रमाणे आपण आमच्या घरी उच्छिष्ट काढले. त्याची आपण क्षमा करावी.

असे म्हटले की, प्रेमात आणि युद्धात सर्व गोष्टी माफ असतात; पण प्रेमात सर्व गोष्टी माफ म्हणजे काय? प्रिय व्यक्तीने आपला मान राखला नाही, तरी त्याच्याकडून तशी अपेक्षा आपण कधीच करायची नसते. ती सन्मान करो न करो, आपण मात्र याबद्दल माफ करायचे असते. तरच ते प्रेम प्रेम राहते, तरच ते प्रेम टिकते आणि स्नेह वाढतो. आपल्या प्रिय व्यक्तीने निमंत्रण दिले नाही म्हणून आपण त्याला भेटायचे नाही, त्याबद्दल मनात राग मनात धरायचा, नाराजी व्यक्त करायची, असे कदापि न करता त्याबद्दल त्याला माफ करून स्नेह कसा कायम राहील हेच पाहायचे असते. हेच खरे प्रेम असते. अध्यात्मात गुरू - शिष्य संबंध हा अशाच प्रेमावर आधारलेला आहे. पुत्राचे अपराध जसे वडील पोटात घेतात, तसे गुरू हे शिष्याचे अपराध आपल्या पोटात घेऊन स्नेह ठेवतात आणि शिष्याच्या प्रगतीवर ते लक्ष देतात.

Wednesday, February 5, 2020

दानप्रसाद



वेळेला आणि पैशाला महत्त्व आल्याने अध्यात्माचा विचार आता कमी होऊ लागला आहे. अशा या बदलत्या परिस्थितीत भावी पिढी कोणता आदर्श घेणार हे त्या काळाची परिस्थिती ठरवेल, पण गुरू-शिष्यांची ही परंपरा कायम राहील, हे विसरता कामा नये. 
- राजेंद्र घोरपडे


येथ म्हणें श्री विश्‍वेश्‍वरावो । हा होईल दानपसावो ।
येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ।। 1801 ।। अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - तेव्हा विश्‍वांचे प्रभुराय श्री निवृत्तीनाथ म्हणाले, हा दानप्रसाद होईल, या वरानें ज्ञानदेव अंतःकरणांत सुखी झाले.

सद्‌गुरू फक्त तुमचे लक्ष मागतात. तुमचे ध्यान मागतात. अवधान मागतात. तुमचे स्थिर मन मागतात. दृढ निष्ठा मागतात. भक्ती मागतात. हे दान सद्‌गुरू मागतात. भक्ताच्या याच दानाचे ते भुकेलेले असतात. यातूनच त्यांना तृप्ती प्राप्त होते. हे दान जो भक्त देतो त्याला सद्‌गुरूंचा आशीर्वाद निश्‍चित लाभतो. याच दानाचा स्वीकार सद्‌गुरू करतात. हे दान देण्यासाठी स्पर्धा करावी. लाखो, कोटी रुपयांचे दान देणारे भक्त आज गल्लोगल्ली भेटतात, पण असे दान देणारा भक्त भेटत नाही. संपत्ती देऊन सद्‌गुरूंचा आशीर्वाद भेटत नाही. तो एका क्षणाचा सद्‌गुरू स्मरणानेही भक्ताला सहज भेटू शकतो. तशी भक्ती, श्रद्धा मात्र सद्‌गुरूंच्यावर असावी लागते. सद्‌गुरूंना आवश्‍यक असणारे दानच भक्ताने द्यावे. सद्‌गुरू हे प्रसाद वाटायला बसले आहेत. हा प्रसाद घेण्यासाठी भक्ताने धडपड करायला हवी. सद्‌गुरूंच्या प्रेमातून सुख, आनंद ओसंडून वाहत आहे. याचा आस्वाद घेता यायला हवा. सद्‌गुरूंचा हा प्रसाद मिळविणारा भक्त नेहमी तृप्त राहातो. यासाठी ही तृप्ती टिकविण्यासाठी प्रयत्न भक्ताने करायला हवा. देवधर्माचा विचार आता कमी होत चालला आहे. लोकांचा यावर आता विश्‍वास राहिलेला नाही. मानवाला देवस्थानाचा मान देणेही अनेकांना पटत नाही. सद्‌गुरूंना देव म्हणणे हा विचारही आता मागे पडत आहे. पाद्यपूजा या गोष्टीतर आता लांबच राहिल्या आहेत. ही बदलती संस्कृती गुरूंना पैशाच्या हिशेबात मोजत आहे. वेळेला आणि पैशाला महत्त्व आल्याने अध्यात्माचा विचार आता कमी होऊ लागला आहे. अशा या बदलत्या परिस्थितीत भावी पिढी कोणता आदर्श घेणार हे त्या काळाची परिस्थिती ठरवेल, पण गुरू-शिष्यांची ही परंपरा कायम राहील, हे विसरता कामा नये. कारण हे नाते पैशाने तोलता येत नाही. ते प्रेमानेच टिकते.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।



Monday, February 3, 2020

उतारवयातील आरोग्यासाठी हे औषध





मन स्थिर ठेवणे हे रोगावर सर्वात मोठे औषध आहे. तरच शरीराला औषधे साथ देतात. अन्यथा औषधांचा परिणाम दिसून येत नाही.
- राजेंद्र घोरपडे
मोबाईल 8237857621


देखे रोगातें जिणावें । औषध तरी देयावें ।
परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसे ।। 19 ।। अध्याय 3 रा

ओवीचा अर्थ - हे पाहा, रोग हटविण्याकरितां औषध तर द्यावें, पण तें औषध ज्याप्रमाणें, अतिशय रुचकर आणि गोड असावें.

औषध गोड नसते. ते कडू असते, पण त्याचा परिणाम हा मधुर असतो. सल्ला हा औषधासारखा असतो. तो गोड कधीही वाटत नाही. तो मनाला पटतही नाही, पण हा कडवटपणा आपणास स्वीकारावा लागतो. तो स्वीकारल्यानंतर अनुभव हे गोड असतात. जीवनात अनेक कठीण प्रसंगीही असेच अनुभव येतात. उतारवयात मात्र बऱ्याचदा शरीर औषधांना साथ देत नाही. त्यावेळी डॉक्‍टर आपल्या शरीराची प्रयोगशाळाच करतात. विविध प्रयोग त्यांचे सुरू असतात. शरीराला साथ देणारी औषधेच घ्यावी लागतात. तरच त्याचा परिणाम दिसून येतो. शरीराप्रमाणे माणसाच्या मनाचे, स्वभावाचेही असेच आहे. वय वाढेल तसे स्वभाव बदलत राहतो. तारुण्यात मन तरुण असते. एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीचा पटकन्‌ राग येतो. अन्यायाविरुद्ध मन पेटून उठते. हळूहळू वय वाढेल तसे मनाला, स्वभावाला याची सवय होते. मग मन त्यावर पर्यायी मार्ग निवडते. देहबोली, हालचालींध्येही फरक असतो. पोरकटपणा कमी होतो. तारुण्यात पेटून उठणारे मन मात्र इथे शांतपणे मार्ग निवडत असते. त्यावर योग्य उपाय योजत असते. हा बदल वयोनानुसार होतो. तरुणपणी सल्ले मनाला रुचत नाहीत, पण हे सल्ले स्वीकारावे लागतात. त्याचा योग्य परिणामही दिसून येतो. उतारवयात मात्र मन हे सल्ले स्वीकारण्यास पटकन्‌ तयार होत नाही. बळजबरीने ते स्वीकारले जातात. त्यामुळे याचा परिणाम फारसा चांगला दिसून येत नाही. कित्येकदा काही सल्ले मनाला न पटल्याने स्वभाव चिडचिडा होतो. हे शरीर गुणधर्म आहेत, पण शरीर निरोगी राहण्यासाठी काही उपाय आहेत. सर्व रोग हे मनात दडलेले असतात. मन शांत असेल तर हे सर्व रोग शांत असतात. मनाची चलबिचलता सुरू झाली की रोगांचीही चलबिचलता सुरू होते. हळूहळू रोग डोके वर काढतात. यासाठी मनाची स्थिरता ही महत्त्वाची आहे. मन स्थिर ठेवणे हे रोगावर सर्वात मोठे औषध आहे. तरच शरीराला औषधे साथ देतात. अन्यथा औषधांचा परिणाम दिसून येत नाही. मनाच्या स्थिरतेसाठी सांगितलेले उपाय यासाठी योजने गरजेचे आहे. उतारवयात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्वात उपयुक्त असे औषध आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।