Saturday, February 29, 2020

संन्यास म्हणजे काय ?


मनाची स्थिरता हीच अध्यात्मात महत्त्वाची आहे. स्थिर मनाने साधना उत्तम होते. साधनेवर मन स्थिर राहीले. श्वासावर मन स्थिर झाले. तर मग मनाला तो सो ऽ हम् सो ऽ हम् चा स्वर आपोआप ऐकायला येऊ लागतो. कानाने तो ऐकायचा असतो व मन त्यावर स्थिर करायचे असते. तरच खरी साधना होते. मनाला सोहम् चा बोध होऊ लागतो. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

आता गृहादिक आघवें । तें काहीं नलगे त्यजावे ।
जे घेतें जाहलें स्वभावे । निःसंगु म्हणऊनी ।। 22 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5 वा

ओवीचा अर्थ -  अशा स्थितीत घर वैगरे सर्वांचा त्याग करण्याची कांही जरुरी नाही, कारण त्यांची आसक्ती घेणारें जें मन, तेंच स्वभावतः निःसंग झाले आहे. 

संन्यास म्हणजे काय ? घरदार सोडून साधनेसाठी जंगलात जाणे किंवा अध्यात्मिक पिठाच्या मठासाठी आपले जीवन व्यथित करणे म्हणजे संन्यास. असा सर्वसाधारण अर्थ आपणास पूर्वीपासून माहीत आहे. पण यामध्ये आपला मुख्य हेतू हा आत्मज्ञानप्राती हा असायला हवा. तरच तो संन्यास होऊ शकतो. अन्यथा  जीवनात आलेल्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी केलेला घरादाराचा त्याग असा होईल. किंवा जीवनात बदल म्हणून स्विकारलेला मार्ग असेही त्यास म्हणता येऊ शकेल. मग हा संन्यास कसा होईल. जीवनात बदल म्हणून जरी अध्यात्मिक मार्ग स्वीकारला तरी काही हरकत नाही. आत्महत्येपेक्षा अध्यात्माचा आधार घेऊन जीवन जगलेले कधीही चांगलेच. दुःखाने खचलेले मन अध्यात्माने सावरले जाऊ शकते. पुन्हा तो नव्याने संसारात रमूही शकतो. आत्महत्या केली त्याचे दुःख तो इतरांवर लादतो. त्यामुळे इतरांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. अध्यात्माने तो सावरला तर पुन्हा तो आपले जीवन सुखाने जगू शकतो. अध्यात्मात संन्यास याचा अर्थ आत्मज्ञानप्राप्तीसाठी मनाची केलेली तयारी असा आहे. मग यासाठी घरदाराचा त्याग करण्याची काहीच गरज नाही. मनातून आसक्ती काढल्याने मन निःसंग होते. ते संसारात गुतून राहात नाही. आपण संसार करत असतो पण मनाने त्या संसाराचा त्याग केलेला असतो. मन त्यापासून अलिप्त झालेले असते. जे काही घडते ते सद्गुरुंच्या कृपेने असे म्हणून आलेल्या सुख-दुःखाने मन व्यथित होत नाही. सुखाने तो हरळूनही जात नाही किंवा दुःखाने तो खचूनही जात नाही. सुख आले काय अन् दुःख झाले काय?  या दोन्हीही गोष्टी ह्या त्याच्यासाठी समानच असतात. त्याचा त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नाही. मनाची स्थिरता हीच अध्यात्मात महत्त्वाची आहे. स्थिर मनाने साधना उत्तम होते. साधनेवर मन स्थिर राहीले. श्वासावर मन स्थिर झाले. तर मग मनाला तो सो ऽ हम् सो ऽ हम् चा स्वर आपोआप ऐकायला येऊ लागतो. कानाने तो ऐकायचा असतो व मन त्यावर स्थिर करायचे असते. तरच खरी साधना होते. मनाला सोहम् चा बोध होऊ लागतो. मी कोण आहे याची जाणीव होऊ लागते. साहजिकच मनाची वाटचाल ही आत्मज्ञानप्राप्तीकडे होऊ लागतो. आत्मज्ञानाचा बोध होऊ लागतो. अन् नराचा नारायण होतो. मग यासाठी संन्यास कशाचा केला हे लक्षात घ्यायला हवे. अध्यात्मातील संन्यासाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. तरच अध्यात्मिक प्रगती होऊ शकेल. 

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

No comments:

Post a Comment