कोल्हापूर - रामकंद म्हणून अनेक भागात एका वनस्पतीची विक्री केली जाते. कंद म्हणजे मुळ, पण इतके मोठे मुळ कसे? असा प्रश्न कोल्हापुरातील वनस्पती तज्ज्ञ डॉ. विनोद शिंपले, डॉ. निलेश पवार, डॉ. मानसिंगराज निंबाळकर, डाॅ घनशाम दिक्षीत, डाॅ निलेश पवार यांना पडला. त्यांनी जोतिबा डोंगरावर कंदाची विक्री करणाऱ्या व्यक्तीकडे याबाबत चौकशी केली. त्याने तर हे मुळ आफ्रिकेतून आयात केल्याचे सांगितले. त्यामुळे या वनस्पतीबद्दल तज्ज्ञांना अधिकच रस वाटू लागला. त्यांनी खरचं हे कंदमुळ आहे का ? याचा शोध घेण्याचा निश्चय केला. तेव्हा त्यांना मिळालेली माहिती अधिकच धक्कादायक अशी आहे.

या संशोधकांनी अभ्यासासाठी कंदाचे काही काप खरेदी केले. त्याची व्हॅस्कुलर संरचना त्यांनी प्रथम तपासली. यावरून ही एकदल कुळातील वनस्पती असल्याचे स्पष्ट झाले. तसेच हा काप कंदाचा नसून खोडाचा असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. इतकेच नव्हे तर, ही वनस्पती आफ्रिका किंवा इतर खंडातून आयात केलेली नसून भारतातील कोणत्याही माळरानावर असणारे केकताड किंवा घायपात असल्याचेही त्यांना आढळले.

संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अगेव्ह सिसालाना किंवा अगेव्ह अमेरिकाना असे आहे. कंदमुळ म्हणून विक्री करणाऱ्या व्यक्ती ही वनस्पती जेव्हा फुलोऱ्यावर येते, त्या वेळेस त्याची पाने काढून टाकतात व त्याचा रंदा मारून गुळगुळीत करतात. तसेच त्यावर मातीचा थर देतात. यामुळे हे कंद असल्यासारखे आपणास भासते. मात्र प्रत्यक्षात हा खोडाचा भाग आहे. हे खोड मुळात गोड नसते. त्यावर सॅक्रिन टाकून ते गोड करण्यात येते. खरेतर या वनस्पतीची पाने वाक तयार करण्यासाठी व नंतर हाच वाक दोर बनवण्यासाठी देण्यात येतो.

खाण्यास आरोग्यदृष्ट्या घातक
कंद म्हणून विकला जाणारा हा काप खाण्यास आरोग्यदृष्ट्या घातक आहे. कारण या कंदात व्हीकोजेनीन नावाचे स्ट्युराईड आहे. त्यामुळे ते अति प्रमाणात खाल्ल्यास ते आरोग्यास घातक ठरू शकते.
कसे केले संशोधन
संशोधनाबाबत प्रा. डॉ. मानसिंगराज निंबाळकर म्हणाले, या वनस्पतीची शास्त्रीय ओळख पटवण्यासाठी डीएनए बारकोडींग सारखी अत्याधुनिक पद्धतीचा वापर केला गेला. या वनस्पतीच्या शोधामुळे भविष्यात या पद्धतीचा वापर करून अनेक वनस्पतींचा शोध लावणे शक्य होणार आहे. कंद म्हणून सांगण्यात येणाऱ्या वनस्पतीच्या कापाची जनुकिय चाचणी आम्ही केली. त्याची वैशिष्ट्ये शोधली. उपलब्ध असलेल्या जुनकांच्या सोबत या वैशिष्ट्यपूर्ण जनुकांची तुलना केली. यावरून ही वनस्पती घायपात या कुळातील आहे, हे निश्चित केले.
- राजेंद्र घोरपडे
No comments:
Post a Comment