Sunday, September 22, 2019

परोपकारू न बोले । न मिरवी अभ्यासिलें ।





संतांच्या शिकवणीचा अभ्यास, चिंतन, मनन केले जावे. ज्ञानाचा गर्वही नसावा. सध्याच्या युगात दररोज नवनवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे. यामुळे तुचे ज्ञान यामध्ये क्षुल्लक ठरू शकते. यासाठी शाश्‍वत ज्ञानाची ओढ मनाला लागायला हवी. त्याचा अभ्यास करायला हवा.
- राजेंद्र घोरपडे

परोपकारू न बोले । न मिरवी अभ्यासिलें ।
न शके विकूं जोडले । स्फीतीसाठी ।। 208 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - आपण दुसऱ्यावर केलेल्या उपकाराचा तोंडाने उच्चार करीत नाही, आपण जो कांही (वेदशास्त्र वगैरेचा) अभ्यास केला असेल त्याचा डौल मिरवीत नाही व आपली भरभराट व्हावी म्हणून जो आपण मिळविलेलें पुण्य विकण्यास धजत नाहीं.

प्रत्येकाला स्वतःची प्रगती व्हावी, ही मनोन इच्छा असते. प्रगती झाली तर त्याचा नावलौकिक वाढतो. पत वाढते. समाजात मान मिळतो, पण स्वतःच्या प्रगतीचा डांगोरा पिटणे योग्य नाही. दुसऱ्याला यातून चिडविणे योग्य नाही. दुसऱ्याची यातून निंदानालस्ती होईल, असे करणेही योग्य नाही. झालेल्या प्रगतीवर समाधान व्यक्त करणे, त्यामध्ये आणखी काही सुधारणा करता येणे शक्‍य आहे का, हे पाहणे गरजेचे आहे. प्रगतीतून समाधान मिळते. शांती मिळते. ते समाधान, ती शांती कायमस्वरूपी टिकवून कशी ठेवता येईल, हे पाहणे आवश्‍यक आहे. स्वतःच्या प्रगतीतून दुसऱ्यावर केलेल्या उपकाराचीही वाच्यता करणे योग्य नाही. यामुळे दुसऱ्यांचे मन दुखावले जाऊ शकते. दुसऱ्याला दुःख होणार नाही, याची काळची घ्यायला हवी. अनेक संतांच्या अशीच शिकवण असते. संतांच्या या शिकवणीतून सात्त्विक भाव जागृत होतो. यासाठी संतांच्या उपदेशाचे आचरण करणे गरजेचे आहे. संतांच्या शिकवणीचा अभ्यास, चिंतन, मनन केले जावे. ज्ञानाचा गर्वही नसावा. सध्याच्या युगात दररोज नवनवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे. यामुळे तुचे ज्ञान यामध्ये क्षुल्लक ठरू शकते. यासाठी शाश्‍वत ज्ञानाची ओढ मनाला लागायला हवी. त्याचा अभ्यास करायला हवा. या अभ्यासाचाही डांगोरा पिटाळणे योग्य नाही. डांगोरा पिटाळून मनाला समाधान मिळत नाही, उलट यातून दुःखच मिळत राहते. साधनेसाठी मन समाधानी राहणे आवश्‍यक आहे. संतांच्या शिकवणीतून समाधान टिकवून कसे ठेवता येते, याचा विचार करायला हवा. यातून सात्त्विक विचारांची बैठक उभी राहू शकते. समाधानी चित्तच साधनेत रमते. साधनेत बाधा येणार नाही यासाठी अंगात सात्त्विक भाव कसा जागृत होतो, याचा अभ्यास करायला हवा. त्याचे आचरण करायला हवे. संतांच्या शिकवणीतून सात्त्विक भाव जागृत होतो.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 



Tuesday, September 17, 2019

देईल गुरुसेवा । इया बुद्धी पांडवा ।


आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरूसेवा हाच सोपा मार्ग आहे. पूर्वीच्या काळी गुरूंच्या घरी राहून गुरूंची सर्व कामे करून त्यांची सेवा केली जात होती. गुरूंच्या घरी राहूनच ज्ञान प्राप्त केले जात होते.

देईल गुरुसेवा । इया बुद्धी पांडवा ।
जन्माचा सांडोवा । टाकित जे ।। 167 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, गुरूसेवेने तें ज्ञान मिळेल, या बुद्धींने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात.

प्रत्येक भक्त आत्मज्ञानी व्हावा, हीच सद्‌गुरूंची इच्छा असते. या दृष्टीने ते सतत भक्तांना मार्गदर्शन करीत असतात. भक्तांच्या साधनेत येणारे अडथळे ते दूर करत असतात. अनेक समस्यांत गुरफटलेल्या भक्ताला ते आत्मज्ञानाची गोडी लावतात. भक्ताचीही तशी दृढ भक्ती असते. अनेक भक्त गुरुकृपेसाठी सतत सद्‌गुरूंची सेवा करत असतात. गुरूंनी दिलेल्या नियमांचे पालन करून दिलेल्या गुरुमंत्राची साधना ते करत असतात. काही भक्त तर यासाठी संसाराचाही त्याग करतात. सतत त्यांना सद्‌गुरू सेवेचाच ध्यास असतो. ते ज्ञान गुरुकृपेने प्राप्त होते, असा त्यांचा दृढ विश्‍वास असतो. यासाठी गुरूसेवेत ते त्यांचा जन्म ओवाळून टाकतात. जे ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते, बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडते आणि जे मनाचे दारिद्य्र नाहीसे करते अशा या आत्मज्ञानाची ओढ त्यांना सतत लागलेली असते. काही जण संसारात राहूनही गुरूसेवा हीच खरी सेवा मानून आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात. संसारातील प्रत्येक गोष्ट ही गुरूंच्या कृपेने मिळते, अशी त्यांची धारणा असते. इतकी दृढ श्रद्धा, भक्ती त्यांची गुरूप्रती असते. आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरूसेवा हाच सोपा मार्ग आहे. पूर्वीच्या काळी गुरूंच्या घरी राहून गुरूंची सर्व कामे करून त्यांची सेवा केली जात होती. गुरूंच्या घरी राहूनच ज्ञान प्राप्त केले जात होते. सध्याच्या आधुनिक युगात असे आश्रम आणि असे गुरू फारच क्वचित पाहायला मिळतात. अशी गुरूसेवा आता दुर्मिळ झाली आहे. कारण तसे योग्य आत्मज्ञानी गुरूही भेटणे आवश्‍यक आहे; पण यामुळे नाराज होण्याचे काही कारण नाही. आयुष्यातील प्रत्येक क्षणी गुरूंचे स्मरण ठेवणे ही सुद्धा एक प्रकारे सेवाच आहे. कारण चराचरांत गुरूंचे अस्तित्व आहे. त्यांच्या नित्य स्मरणानेही, नित्य भक्तीनेही आत्मज्ञान प्राप्ती होऊ शकते. सद्‌गुरूंचे नित्य स्मरण हीच खरी गुरूसेवा आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Sunday, September 15, 2019

मनाची चंचलता



आवाजामुळे मन विचलित होऊ नये यासाठी मनच स्थिर होणे गरजेचे आहे. ज्याने मन जिंकले. त्याने जग जिंकले, असे म्हटले जाते.

एहींचि पांचे द्वारी । ज्ञानासिं धांव बाहेरी ।
जैसा कां हिरवे चारी । भांबावे पशु ।। 118 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - या पांच द्वारांनीच ज्ञान बाहेर धांवते, तें कसें? तर जसें हिरवेंगार गवत उगवलेल्या कुरणामध्ये जनावरे भांबावतात तसे ज्ञान भांबावते.

मन नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मन स्थिर राहिले तरच साधना होते. मन नेके भरकटते कशामुळे? आपणास जेवताना अनेक पदार्थ समोर ठेवले तर हे खाऊ का ते खाऊ, असे होते. मन चलबिचल होते. एकदम सगळे पदार्थ पाहून काही वेळेला खाण्याची इच्छाच राहात नाही. असे आपणास कित्येकदा होते. कुरणातील हिरवागार चारा पाहून जनावरेही भांबावतात. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत. या ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे. साधनेच्या काळात आपल्यामध्ये सूक्ष्म विचार करण्याची वृत्ती निर्माण होते. अति खोलवर एखाद्या गोष्टीचा विचार होतो. दूरचे आवाच स्पष्ट ऐकू येतात. दूरचे वासही स्पष्ट समजतात, इतकी ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता वाढते. दूरच्या वासाने मन विचलित होऊ नये यासाठी काही जण साधना करण्यापूर्वी उदबत्ती लावतात किंवा काही जण सुगंधी अत्तर फवारतात. सुगंधामुळे मनाला मोहकता येते. मन प्रसन्न राहते. असे अनेक उपाय साधना करताना योजले जातात. हेतू एकच असतो की, मन स्थिर राहावे. मन चंचल होऊ नये; पण मन भरकटते म्हणून साधना सोडून देणे योग्य नाही. आवाजामुळे मन विचलित होऊ नये यासाठी मनच स्थिर होणे गरजेचे आहे. ज्याने मन जिंकले. त्याने जग जिंकले, असे म्हटले जाते. चंचलता हा मनाचा गुणधर्म आहे. हे विचारात घेऊन मनात विचारच उत्पन्न होणार नाहीत, यासाठी प्रयत्न व्हायला हवा. गुरुमंत्रावर मन स्थिर करायचा प्रयत्न करायला हवा. हळूहळू साधनेने हे शक्‍य होते. फक्त यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

आत्मज्ञानाचे फळ





कोणतीही गोष्ट करायची म्हटले, की त्यासाठी असणारे नियम, हे पाळावेच लागतात. अन्यथा सर्व व्यर्थ जाते. अध्यात्मात प्रगती साधायची असेल तर गुरूंचा शोध घ्यावा लागतो. गुरू हा आत्मज्ञानी असावा लागतो. या देहाच्या क्षेत्रात आत्मज्ञानाचे पीक घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूकडूनच बीजाची (गुरुमंत्राची) पेरणी होणे आवश्‍यक आहे. तरच त्या पिकाला आत्मज्ञानाची फळे येतील.

नातरी विधीचिये वाफे । सत्क्रियाबीज आरोपे ।
तरी जन्मशत मापें । सुखचि मविजे ।। 32 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - अथवा विधीची योग्य वाफ साधून जर सत्कर्मरूप बीज पेरले तर शेकडोच्या शेकडो जन्म सुख भोगावे, एवढे अचाट पीक येते.

शेतात कोणती पिके घ्यायची हे शेतकऱ्याला आधी ठरवावे लागते. योग्य वेळी योग्य पिके घेतली तरच भरपूर उत्पादन मिळते. बाजारभावानुसारही पिकांचे नियोजन करावे लागते. तरच नफा मिळतो. पुढील काळातील गरजा ओळखून पिकांची निवड करावी लागते. सध्या शेतीचे स्वरूप बदलले आहे. आधुनिक तंत्राने शेती केली जात आहे. अधिक उत्पादनासाठी नव्या सुधारित जातींची निवड केली जात आहे, पण योग्य जमिनीत योग्य तीच पिके घ्यावी लागतात. वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. हे जे ठरले आहेत त्यानुसारच शेती केली तर ती फायदेशीर ठरते. अन्यथा शेतीत मोठा फटका बसू शकतो. मेहनत करूनही ती व्यर्थ जाते. अध्यात्मातही तसेच आहे. येथेही नियमांचे पालन करावे लागते. कोणतीही गोष्ट करायची म्हटले, की त्यासाठी असणारे नियम, हे पाळावेच लागतात. अन्यथा सर्व व्यर्थ जाते. अध्यात्मात प्रगती साधायची असेल तर गुरूंचा शोध घ्यावा लागतो. गुरू हा आत्मज्ञानी असावा लागतो. या देहाच्या क्षेत्रात आत्मज्ञानाचे पीक घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूकडूनच बीजाची (गुरुमंत्राची) पेरणी होणे आवश्‍यक आहे. तरच त्या पिकाला आत्मज्ञानाची फळे येतील. पेरलेल्या गुरुमंत्राला साधनेचे खतपाणी द्यावे लागते. अहंकार, राग, द्वेष आदी तणे उगवणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते. तरच आत्मज्ञानाची फळे चाखायला मिळतील. आत्मज्ञानासाठी आवश्‍यक गोष्टींचा अभ्यास करून त्याची अमंलबजावणी काटेकोरपणे करायला हवी. मुळात हेच होत नसल्याने आत्मज्ञानी होण्यात अडचणी येतात. तेथेपर्यंत पोहोचता येत नाही. आत्मज्ञानाचे फळ मिळवायचे असेल तर, त्या झाडाची योग्य वाढ कशी होईल, खताची मात्रा, पाण्याची मात्रा, तण, किडरोगापासून संरक्षण हे करायलाच हवे. अन्यथा फळे येऊ शकणार नाहीत. योग्य वाढीसाठी काय आवश्‍यक आहे हे ही अभ्यासावे लागेल. अभ्यासानेच आत्मज्ञानाचे फळ मिळवता येऊ शकते. निसर्गाची, गुरूंची कृपा असेल तर, फळ निश्‍चित मिळेल. यासाठी आशावादी राहायला हवे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Wednesday, September 11, 2019

क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ



प्रत्येक जण आत्मज्ञानी होऊ शकतो आणि प्रत्येकाने आत्मज्ञानी होण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. यासाठी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करायला हवा. हे शास्त्र जाणून घ्यायला हवे. हे शास्त्र प्रत्येक धर्मात सांगितले आहे. म्हणूनच सर्व धर्म सारखेच आहेत.
- राजेंद्र घोरपडे

क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें । जाणणे जें निरूतें ।
ज्ञान ऐसें तयातें । मानूं आम्ही ।।9।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञानाला जे यथार्थ जाणणें, त्याला ज्ञान असे आम्ही समजतों.

शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते. म्हणजे देहाला क्षेत्र म्हटले जाते. या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणावे. क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणे, त्याला ज्ञान असे समजावे. देह आणि आत्मा वेगळा आहे. या देहात आत्मा आला आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाचा देह हा पंचमहाभूतापासून बनला आहे. फक्त प्रत्येकाच्या देहाची रचना वेगवेगळी आहे. कुणाचा देह गोरा आहे, तर कुणाचा काळा आहे. कोण दिसायला कुरूप आहे, तर कोण दिसायला अति सुंदर असते. हे सर्व बाह्य रंग आहेत, पण या देहात असणारा आत्मा सर्वांच्या ठिकाणी आहे. तो एक आहे. आत्मा हा अमर आहे. देह नाशवंत आहे. वयोनानुसार देहाची स्थिती बदलते, पण आत्मा बदलत नाही. जन्माच्या वेळी तो देहात येतो. मृत्यूवेळी तो देहातून मुक्त होतो. आत्म्याचे हे ज्ञान ज्याला अवगत झाले तो आत्मज्ञानी. नव्या युगात अनेक शोध लागले आहेत, पण अद्याप आत्मा देहात येतो कसा आणि जातो कसा, हे कोणी शोधू शकले नाही. त्याला पकडून ठेवणे कोणाला अद्याप जमले नाही. ते मानवाच्या हातात नाही. ती हाताबाहेरची गोष्ट आहे. याचाच अर्थ येथे देवाचे अस्तित्व आहे. हे देवत्व प्रत्येक सजीवाच्या ठिकाणी आहे. म्हणूनच प्रत्येक जण आत्मज्ञानी होऊ शकतो आणि प्रत्येकाने आत्मज्ञानी होण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. यासाठी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करायला हवा. हे शास्त्र जाणून घ्यायला हवे. हे शास्त्र प्रत्येक धर्मात सांगितले आहे. म्हणूनच सर्व धर्म सारखेच आहेत. सर्वांचा हेतू एकच आहे. फक्त प्रत्येक धर्माच्या रीती वेगळ्या आहेत. वाटा वेगळ्या आहेत. तरी शेवटी त्या एकाच ठिकाणी जातात. आत्मज्ञानी होणे, हाच सर्वांचा हेतू आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।



Sunday, September 8, 2019

तेचि भक्त तेचि योगी



आत्मज्ञान प्राप्तीची ओढ असणारा भक्तच खरा भक्त, खरा योगी म्हणून ओळखला जातो,. पण आजच्या पिढीत हे दिसून येत नाही. गणेश उत्सवात, नवरात्रीमध्ये अध्यात्माचा गंधही दिसत नाही. नुसते टिळे लावले म्हणजे भक्त झाला, असे होत नाही. देव समजून घ्यायला हवा. ते देवत्व स्वतःमध्ये उतरविण्याचा प्रयत्न करायला हवा.
- राजेंद्र घोरपडे


पार्था या जगीं । तेचि भक्त तेचि योगी ।
उत्कंठा तया लागी । अखंड मज ।। 234 ।। अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - अर्जुना, या जगामध्ये तेच भक्त व तेच योगी आहेत व त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली असते.

सध्या अध्यात्मावर फारशी चर्चा करताना कोणी दिसत नाही. फारसा रस कोणी दाखवतही नाही, पण देवदर्शनासाठी सगळीकडे रांगांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. गणेश उत्सवात गणपती पाहण्यासाठी गर्दी केली जाते. नवरात्र आले की देवीच्या दर्शनासाठी गर्दी होते. इतरही अनेक जातीधर्माच्या मंदिरांत दर्शनासाठी रांगांच्या रांगा पाहायला मिळतात. पंढरीत तर नेहमीच दर्शनासाठी मोठी रांग असते. आळंदीतही गर्दी होते. दर्शन मिळावे, हीच प्रत्येकाची इच्छा असते. कोणी केवळ मुख दर्शन घेऊनच समाधानी होतात, तर कोणी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतात. गर्दीमुळे तर केवळ कळसाचे दर्शनही घेण्याची प्रथा आहे. दर्शन कोठूनही घेतले तरी ते भगवंतापर्यंत पोहोचते. फक्त मनापासून दर्शन करायला हवे. मनातूनही दर्शन घडते. देवाची ओढ असणाऱ्यांना देव स्वप्नातही येऊन दर्शन देतात. फक्त दर्शनाची ओढ असावी लागते. सद्‌गुरूंचे सतत स्मरण करणारे भक्त त्यांना अधिक प्रिय असतात. आत्मज्ञान प्राप्तीची ओढ असणारा भक्तच खरा भक्त, खरा योगी म्हणून ओळखला जातो,. पण आजच्या पिढीत हे दिसून येत नाही. गणेश उत्सवात, नवरात्रीमध्ये अध्यात्माचा गंधही दिसत नाही. नुसते टिळे लावले म्हणजे भक्त झाला, असे होत नाही. देव समजून घ्यायला हवा. ते देवत्व स्वतःमध्ये उतरविण्याचा प्रयत्न करायला हवा. संगीताच्या तालावर नाचणे म्हणजे साधना नव्हे. भजन, कीर्तनाचे प्रकारही या अशा उत्सवांत दिसत नाहीत. नेके हे काय चालले आहे, हेच समजत नाही. अशा या प्रकारामुळे अध्यात्म काय आहे? याबाबत गैरसमज पसरत आहे. नवी पिढी खऱ्या अध्यात्मापासून दूर लोटली जात आहे. देवळात दर्शनाच्या रांगा वाढल्या, पण अध्यात्म समजून घेणारे यामध्ये फारच थोडे असतात. धकाधकीच्या जीवनात या कडे दुर्लक्षही होत आहे. पर्यटन म्हणून देवदर्शनाला जाणे, हीच परंपरा आता रूढ होत आहे. देवस्थानाचा विकास हा आर्थिक विकासासाठी केला जात आहे. आध्यात्मिक विकास त्यामुळे मागे पडत आहे. तो विचारही आता या देवस्थानांच्या ठिकाणी दिसून येत नाही. यासाठी भक्तांनी खऱ्या भक्ताची लक्षणे जाणून घेण्याची आज गरज भासत आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

हे विश्‍वचि माझे घर

जुन्या पिढीतील लोकांनी "विश्‍वची माझे घर' असे समजून विकास घडवला. फक्त स्वतःपुरता विचार त्यांनी केला नाही. संपूर्ण समाजाचा, भागाचा, प्रांताचा विकास करायचा, या ध्येयाने त्यांनी काम केले.
हे विश्‍वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ।।213 ।। अध्याय 12 वा

ओवीचा अर्थ - हे विश्‍वची माझे घर आहे. अशा ज्याचा दृढनिश्‍चय झालेला असतो, फार काय सांगावें सर्व स्थावर जंगमात्मक जग जो अनुभवाच्या अंगाने आपणच बनला आहे.

जुन्या पिढीतील लोक व्यापक विचारसरणीचे होते. त्यांच्या विचारावर अध्यात्माचा पगडा होता. त्यामुळे त्यांच्या आचार - विचारात दूरदृष्टीपणा, व्यापकता होती. सध्याच्या पिढीत इतकी व्यापकता दिसून येत नाही. संकुचित विचारसरणी सध्या वाढीस लागली आहे, पण त्यामुळे प्रगतीही संकुचित होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. सध्या जागतिकीकरणाचे वारे आहे. याचा लाभ आपण उठवायला हवा. विचार संकुचित न ठेवता त्यामध्ये व्यापकता आणायला हवी. इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आहे. हे विश्‍व महाकाय आहे, असे वाटत नाहीये. जुन्या पिढीतील लोकांनी "विश्‍वची माझे घर' असे समजून विकास घडवला. फक्त स्वतःपुरता विचार त्यांनी केला नाही. संपूर्ण समाजाचा, भागाचा, प्रांताचा विकास करायचा, या ध्येयाने त्यांनी काम केले. त्यामुळे कोणी महात्मा झाले, तर कोणी कर्मवीर झाले, तर कोणी शिक्षण महर्षी झाले, तर कोणी सहकार महर्षी झाले. नव्या पिढीने त्यांची ही विचारसरणी आत्मसात करायला हवी. "एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ' असा विचार ठेवून त्यांनी सहकार क्षेत्र उभे केले. ते स्वतः कारखाना उभा करून मोठे कारखानदार होऊ शकत होते, पण त्यांनी स्वतःपुरते कधी पाहिले नाही. इतरांचाही विकास त्यांनी पाहिला. अनेक उद्योग, कारखाने सहकारातून उभे राहिले; पण सध्या या संस्थांमध्ये संकुचित विचारसरणीच्या लोकांचा प्रभाव वाढला आहे. त्यांनी स्वतःचा विकास सुरू केला आहे. यामुळे हे उद्योग अडचणीत आले आहेत. केवळ स्वतःचा फायदा पाहणाऱ्या या लोकुांळेच सहकाराचा स्वाहाकार झाला आहे. यासाठी ही विचारसरणी बदलायला हवी. सर्वांचा विकास साधणारे विचार जोपासायला हवेत. संतमहात्म्यांच्या विचारांची कास यासाठीच धरायला हवी. जागतिकीकरणात टिकायचे असेल, तर हा विचार आत्मसात करायला हवा. "विश्‍वची माझे घर' समजूनच विकास साधायला हवा.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


Wednesday, September 4, 2019

आत्मरूप गणेशु स्मरण


सद्‌गुरूंच्या ठिकाणी सर्वांना समान संधी आहे. प्रत्येक जण आत्मज्ञानी होऊ शकतो, हा संदेश यातून द्यायचा आहे;पण आत्मज्ञानी होण्यासाठी सद्‌गुरूंचा अनुग्रह होणे आवश्‍यक आहे.



आत्मरूप गणेशु स्मरण । सकळ विद्यांचे अधिकरण ।
तेचि वंदू श्रीचरण । श्रीगुरूंचे।।1 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - सर्व विद्यांचे आश्रयस्थान जें आत्मरूप गणेशाचें स्मरण, तेच श्री गुरूचे श्रीचरण होत, त्यास नमस्कार करू.

इमारतीचा पाया भक्कम असेल तर इमारत उभी राहू शकते अन्यथा कोसळते. मजबूत पायामुळे इमारतीला स्थैर्य प्राप्त होते. अध्यात्माचा पायाही भक्कम असावा लागतो. तरच पुढची प्रगती साधता येते. यासाठी सद्‌गुरूचरणी नतमस्तक होणे गरजेचे आहे. याचाच अर्थ मनातील अहंकार, मीपणा काढून टाकणे असा आहे. अहंकार, क्रोध, लोभ मनात असतील तर अध्यात्माच्या प्रगतीचा पाया खचतो. नुसते सद्‌गुरूंच्या चरणी मस्तक ठेवले म्हणजे झाले असे नाही, तर यामागची भूमिका जाणून घेणे गरजेचे आहे. आत्मज्ञान प्रातीसाठीच्या पायऱ्या चढताना अहंकार, लोभ, मीपणा, क्रोध यांचा त्याग केला तरच पुढे प्रगती साधता येते. अन्यथा पाया कमकुवत झाल्याने प्रगतीचा जीना कोसळतो. अनेक विठ्ठल मंदिरात तसेच आळंदीतील श्री ज्ञानेश्‍वर मंदिरात वीणा घेऊन नामस्मरण करण्याची प्रथा आहे. हा वीणा दुसऱ्याकडून घेताना त्याच्या प्रथम पाया पडावे लागते. ही पद्धत आहे. मग एखाद्या लहान मुलाकडूनही वीणा घेताना त्याच्या पाया पडावे लागते. हा लहान, हा मोठा, असा भेदभाव येथे नाही. येथे उच्च-नीच हा भावही नाही. गरीब-श्रीमंत, असाही भेदभाव येथे नाही. यातून समानता येथे नांदावी, हा उद्देश आहे. सर्वांना समान हक्क आहे. सद्‌गुरूंच्या ठिकाणी सर्वांना समान संधी आहे. प्रत्येक जण आत्मज्ञानी होऊ शकतो, हा संदेश यातून द्यायचा आहे;पण आत्मज्ञानी होण्यासाठी सद्‌गुरूंचा अनुग्रह होणे आवश्‍यक आहे. सध्या अनेक पुस्तकी पंडित गुरू आहेत, पण ते आत्मज्ञानी असतील, तरच ते खरे गुरू अन्यथा ते केवळ पंडित आहेत. आत्मज्ञान प्राप्तीसाठी आत्मरूपी गुरूंचे स्मरण सतत करायला हवे. सर्व विद्या त्यांच्यात एकवटलेल्या असतात. अशा या सद्‌गुरूंच्या चरणी लीन व्हावे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।