Sunday, February 16, 2020

सोऽहम साधना



योगसुखाचे सोहळे । सेवका तुझेनि स्नेहाळे ।
सोऽ हंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ।। 4 ।।
(श्री ज्ञानेश्‍वरी अध्याय 12 वा)

ओवीचा अर्थ ः हे प्रेमळ माते, भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात व भक्तांची ते ब्रह्म मी आहे, अशा स्वरूपसिद्धीच्या प्राप्तीची हौस तू पुरवितेस.

अध्यात्म आपणास प्रथम स्वतःचा शोध घेण्यास शिकवते. मी कोण आहे? याचा शोध प्रत्येकाने घ्यायला हवा. स्वतःचे स्वरूप स्वतः ओळखायला हवे. हीच तर साधना आहे. "मी'चा शोध स्वतः घ्यायला हवा. "मी' म्हणजे कोण? आपले नाव म्हणजे आपण आहोत का? नाही तर मग कोण? आपण जिवंत आहोत, हे कशावरून ओळखले जाते? डॉक्‍टर प्रथम श्‍वास सुरू आहे की नाही, हे तपासतात. आपण मरतो तेव्हा आपला श्‍वास बंद होतो. हा श्‍वास म्हणजे काय? श्‍वासातून प्राणवायू (शुद्ध हवा) आत घेतो व अशुद्ध हवा बाहेर सोडतो. श्‍वासाचा स्वर श्‍वास आत घेताना "सो' व बाहेर सोडताना "हं' असा होतो. हेच सोऽ हं. हे जाणून घेण्यासाठीच सोऽ हं साधना आहे. साधनेतून याचा बोध होतो. म्हणजेच मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, हेच माझे खरे स्वरूप आहे. सद्‌गुरुंच्या कृपेने याचा बोध होतो. स्वतःची ओळख स्वतः करून घेणे हीच सोऽ हं साधना यातूनच तो आत्मज्ञानी होतो.

No comments:

Post a Comment