आपल्या देशात दुरगामी विचार करून कोणताही प्रकल्प किंवा योजना राबविली जात नाही. केवळ काही वर्षापूरताच होणारा फायदा विचारात घेतला जातो. हे परखड सत्य आहे. नियोजनाचा अभाव आपल्या देशात मोठ्या प्रमाणात याचमुळे दिसून येत आहे. नद्यावर धरणे बांधली. यामुळे सिंचनाखालील तसेच औद्योगिक क्षेत्राला फायदा झाला. पण तो फायदा किती झाला याचे मोजमापही विचारात घ्यायला हवे. पाणी हे जीवन आहे. याचा विचार करून त्याचा वापर करायला हवा.
शहरांसाठी थेट पाईपलाईन योजना राबविली जाते. थेट पाईप लाईनमुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा शहराला होऊ शकतो. हे खरे आहे. पण नदीतील पाणी प्रदुषित करणे योग्य नाही. नदीतील प्रवाही पाण्याचे प्रदुषण रोखणे हे तितकेच गरजेचे आहे. नदीच्या प्रवाही पाण्यात शहरातील सांडपाणी सोडून देऊन नद्यांची गटारगंगा करणे हे योग्य नाही. थेट पाईपलाईन ने शहरांचा विकास केला. पण शहरात आलेल्या या पाण्याचे सांडपाण्यात रुपांतर होऊन ते पुन्हा नदीत का सोडले जाते. ही योजना राबविताना सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणारी योजनाही मंजूर करणे आवश्यक नव्हते का? जितके पाणी आपण शहराला पुरवतो. तितके पाणी हे सांडपाणी होणार याचा विचार तेव्हाच का केला गेला नाही? का केवळ नफाच पाहीला जातो. पंचगंगा नदीकाठी सुमारे 170 गावे आहेत. त्यांना हे दुषित पाणी मिळणार याचा विचार तेव्हाच व्हायला हवा होता. कोल्हापूर समतेच्या विचारांसाठी प्रसिद्ध आहे. मग शहर आणि ग्रामीण भागामध्ये फारकत का? शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी थेट पाईपलाईन व खेड्यांना सांडपाणी मिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी. हा कोणता न्याय. विकास करताना समतेचा विचार का मांडला गेला नाही?
अमेरिकेत सध्या नद्यावरील धरणे फोडण्यास सुरवात झाली आहे. कारण ही धरणे आता कालबाह्य झाली आहेत. ही धरणे सांभाळण्यापेक्षा ती फोडणेच अधिक फायद्याचे आहे असे अमेरिकेला वाटत आहे. कारण या धरणांच्या पाण्यातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा डागडुजी आणि दुरुस्तीचा खर्चच अधिक होत आहे. हे अर्थशास्त्र तिथे मांडले गेले आहे. आपल्याकडे असा शास्त्रोक्त विचार केव्हा केला जाणार? नद्यांचा प्रवाह रोखला गेल्याने पाण्याचे प्रदुषण वाढत आहे. नैसर्गिक जैवविविधता नष्ट होत आहे. आता ही धरणे फोडून नद्यांची जैवविविधता, वाहत्या पाण्याचे सौंदर्य आदीची जोपासना अमेरिकेत केले जात आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या या उपक्रमाचा विचार आपणही करायला हवा. कारण काही वर्षांनी आपलीही ही धरणे कालबाह्य होणार आहेत. याच्या डागडुचीचा खर्च त्यावेळी किती असेल व त्याचा फायदा किती असेल याचे गणित आपण मांडायला हवे? ही समस्या आपणासही भेडसावणार आहे याचा विचार आत्ता पासूनच करायला हवा. अमेरिकेत लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे तेथे तोडाफोडीचा फारसा परिणाम तेथील जनजीवनावर होत नाही. पण आपणास बांधलेली धरणे फोडणे परवडणारे आहे का? ही धरणे डागडुजी करत किती वर्षे टिकवली जाणार? यावर किती खर्च होणार? धरण तोडण्याचीच वेळ आली तर शहरांना पाणी मिळणार कोठून ? यासाठी विकास साधताना हा पुढील विचार करायलाच हवा. यासाठीच नद्यांचा नैसर्गिक प्रवाह टिकवायला हवा. प्रदुषणही यामुळे कमी होते. जैवविविधताही जोपासायला हवी. पंचगंगा नदीचा प्रवाह टिकवायला हवा. त्याची गटारगंगा होऊ नये यासाठी प्रयत्न हा व्हायलाच हवा.
कोणताही विकास साधताना दुरगामी परिणामांचा विचार हा करायलाच हवा. सर्वबाजूंनी विचार व्हायला हवा. तसे सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. सांडपाणी नदी सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करून सोडले गेल्यास प्रदुषण कमी करता येऊ शकते. याचा विचार हा व्हायलाच हवा. सांडपाण्यावर प्रक्रिया केले जाणारे प्रकल्प हे उभारले जावेत. यासाठी आत्ताच विचार व्हायला हवा. याचे नियोजन आता करण्याची खरी गरज आहे. या दृष्टीने समाजाला जागृत करण्याची गरज आहे. महानगरपालीकेने यासाठी विचार करायला हवा.
शहरात पाण्याचा वापर वाट्टेल तसा केला जातो. पाण्याचा बचत करण्यास लोकांना प्रोत्साहित करायला हवे. पाणी वाचविण्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन करायला हवे. यासाठी आसपासच्या खेड्यात पाण्याची कशी समस्या उभी आहे. याचा विचार शहरातील जनतेने करायला हवा? तेथे पाण्यासाठी भटकंती होते. वीजेचा पुरवठाही अनियमित असतो. भारनियमनामुळे खेड्यांचा विकास खुटला आहे. शहरांचा विकास साधताना खेड्यातील ह्या परिस्थितीकडे एक नजर ही टाकायलाच हवी. पंचगंगा नदी वाचवूया या अभियानाच्या निमित्ताने नदी प्रदुषणाचा नदी काठच्या खेड्यावर कसा परिणाम होतो आहे. याचा अभ्यासही व्हायला हवा. नद्या वाचविण्यासाठी खेडी- शहरांनी एकत्र लढा उभा करायला हवा. तरच भावी भविष्य उज्ज्वल राहील. अन्यथा विकासाची ही गंगा गटारीतच संपेल.
राजेंद्र घोरपडे, 9011087406
No comments:
Post a Comment