म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील । चोरु म्हणूनि हरील । सर्वस्व तयाचें ।। 112 ।। अध्याय 3 रा ज्ञानेश्वरी
स्वधर्म
कोणता? हे येथे जाणून घेणे आवश्यक आहे. स्वधर्म म्हणजे स्वतःचा आचरण करावयाचा
धर्म. आपण कसे वागायाचे? कसे बोलायचे? कसे संवांद साधायचे? कोणती क्रिया करायची? हे
सर्व स्वधर्मामध्ये मोडते. प्राप्त परिस्थितीमध्ये स्वतःकडून करावी लागणारी कृती
यालाच स्वधर्म म्हणतात. विद्यार्थ्यांने विद्यार्थी दशेत अभ्यास करणे हा त्याचा
धर्म आहे. सतत अभ्यास मग्न राहाणे हे त्याचे कर्तव्य आहे. यातच त्याची प्रगती आहे.
सैनिकांनी सीमेवर सतत सावध राहाणे हा त्यांचा धर्म आहे. या सेवेत कसर पडली तर
स्वतःचे प्राण गमवावे लागतात. आईचा धर्म कोणता? मुलांचा, कुटुंबाचा सांभाळ करणे हा
आईचा धर्म आहे? घरात शांती, सुख-समाधान नांदायचे असेल तर आईने सर्वांना सांभाळूण
घेणे गरजेचे असते. सावलीसारखे आपल्या कुटूंबास छत्र उभा करणे हा तिचा धर्म आहे.
कुटूंब व्यवस्थेतील तो एक स्तंभ आहे. खूर्चीला चार पाय असतात. एक पाय जरी मोडला तरी
खूर्चीवर नीट बसता येत नाही. घराचा एक खांब जरी ढासळला तर घर कोसळू शकते याची जाणिव
असायला हवी. शिक्षकाचा धर्म कोणता? अध्यापन करणे हा शिक्षकाचा धर्म आहे. ज्ञानदान
हा गुरुचा धर्म आहे. विद्यार्थ्यांना-शिष्यांना ज्ञानी करणे हे त्यांचे कर्तव्य
आहे. गुरुदक्षिणेची अपेक्षा न ठेवता हे ज्ञानदान करावे. पण सध्याच्या बदलत्या युगात
ज्ञानाची मंदिरे ही आता नोटा तयार करण्याचे कारखाने झाले आहेत. शिक्षण संस्था ह्या
पैसा कमावण्याचा उद्योग झाला आहे. असे असले तरी कोणती संस्था टिकते. ज्ञानदानाचे
कार्य उत्कृष्टपणे करणारी संस्थाच टिकू शकतो. हा धर्म संस्थेने पाळला नाही तर
थोड्याच कालावधीत ती संस्था मोडकळीस निघते हे विसरता कामा नये. म्हणून स्वधर्म
कोणता याचा विचार, चिंतन, मनन हे करायला हवे. तो सोडला तर अस्तित्व संपते हे
विचारात घ्यायला हवे. स्वधर्म चुकला की शिक्षा ही आहेच. यासाठी स्वधर्माचे पालन
होणे आवश्यक आहे. साधकाचा स्वधर्म कोणता? सद्गुरुंनी पेरलेल्या बीजाची जोपासणा
करणे हा साधकाचा धर्म आहे. दिलेल्या मंत्राची साधना करणे हा त्याचा धर्म आहे. तरच
त्याची प्रगती होऊ शकेल. आध्यात्मिक प्रगतीसाठी या सर्व गोष्टी आवश्यक आहेत.
स्वधर्म पालन हे यासाठीच गरजेचे आहे.
श्री अथर्व प्रकाशनची पुस्तके
| |||
Monday, April 13, 2015
स्वधर्म
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment