Saturday, August 22, 2015

शेती म्हणजे उत्साहाचे टॉनिक

कोल्हापूरातील निहाल शिपूरकर यांनी प्रिटिंग प्रेसचा व्यवसाय सांभाळत आवडीतून शेतीकडेही लक्ष दिले आहे. जमीन, पाणी, खताचे योग्य व्यवस्थापन करीत त्यांना अडसाली उसाचे एकरी 60 टन उत्पादन मिळते. सुटीच्या दिवशी शेतात दिवसभर राहिल्याने कामाचा थकवा जातो, मनाला उत्साह मिळतो. त्यामुळे व्यवसायाबरोबरीने शेतीचीही प्रगती होते, असा त्यांचा अनुभव आहे.

राजेंद्र घोरपडे

कोल्हापूर शहरात निहाल सुरेश शिपूरकर यांचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. वडिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय आता निहाल सांभाळतात. निहाल यांचे वडील सुरेश शिपुरकर हे निसर्गप्रेमी. शेती, पर्यावरण संवर्धनासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. प्रत्यक्ष कृतीतून, अनुभवातून समाज प्रबोधन हा त्यांचा आदर्श आहे. सन 1982 मध्ये त्यांनी सुरू केलेली निसर्गमित्र ही संस्था आजही चांगल्याप्रकारे कार्यरत आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी विविध प्रयोग सुरू असतात. याच आवडीतून त्यांनी मित्रांसोबत कोल्हापूरपासून आठ किलोमीटरवरील पाचगावमध्ये दीड एकर शेती खरेदी केली. सुरवातीची काही वर्षे भागाने शेती केली, परंतु, प्रिंटिंग प्रेसच्या व्यवसायातून त्यांना शेतीकडे पाहण्यास पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे पंधरा वर्षे ही जमीन तशीच पडून होती.
निहाल यांनी सन 2007 मध्ये घरची जमीन विकण्यापेक्षा टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला. तळसंदे (जि. कोल्हापूर) येथील उद्यानपंडित बाळासाहेब चव्हाण हे निहाल यांचे सासरे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निहाल यांनी शेती करण्याचे ठरवले. निहाल यांचे मेहुणे प्रयोगशील शेतकरी विश्‍वास चव्हाण यांनीही त्यांना शेतीच्या नियोजनासाठी सहकार्य केले. व्यवसाय सांभाळून शेती करणे तितके सोपे नाही, हे निहाल यांना ठाऊक होते. पण जिद्द आणि आवड असेल तर कोणत्याही कामात यश निश्‍चित मिळते, यावर विश्‍वास असल्याने त्यांनी योग्य नियोजनातून शेती किफायतशीर करण्याचा प्रयत्न सुरू केला.

शेती विकासाच्या दिशेने...
सुरवातीला निहाल शिपुरकर यांनी शेती भागाने लावण्याचा विचार झाला. शेतावर घर बांधून तेथे शेती नियोजनासाठी कुटुंब ठेवण्याचाही प्रयत्न केला. परंतु, या कुटुंबाने वर्षाला 75 हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे हा विचारही मागे पडला. त्यानंतर मात्र निहाल यांनी स्वतःच शेतात उतरण्याचा निर्णय घेतला. पीक व्यवस्थापनाची निहाल यांना पुरेशी माहिती नव्हती, परंतु, अभ्यास आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्याने त्यांनी शेतीचे नियोजन केले. त्यानुसार 2007 मध्ये त्यांनी शेती करण्यास प्रारंभ केला. निहाल यांची माळजमीन होती. या ठिकाणी केवळ गवतच उगवायचे. पीक लागवडीच्या दृष्टीने निहाल यांनी सुमारे दीड लाख रुपये खर्चून जमिनीचे सपाटीकरण केले. जमीन लागवडीस योग्य केली. शेतातच छोटेसे घर उभारले. या सर्व सोयीसुविधांसाठी निहाल यांनी तीन लाख रुपये खर्च केले. पिकाला पाणी द्यायचे तर शेतावर वीज हवी. वीजेच्या जोडणीसाठी पाच खांब टाकून त्यांनी वीज जोडणी केली. यासाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च झाले. वीज जोडणीची परवानगी मिळविण्यासाठी वीज मंडळाकडे चकरा माराव्या लागल्या. मोठा संघर्षही त्यांना करावा लागला. नंतर मात्र एका योजनेअंतर्गत हा खर्च त्यांना परत मिळाला. निहाल यांच्या शेतात पूर्वी एक कूपनलिका खोदलेली होती. यास पाणी कमी असल्याने त्यांनी ठिबक सिंचनावर शेती करण्याचा निर्णय घेतला. सध्या निहाल एकूण अडीच एकराचे नियोजन करीत आहेत.

ठिबकमुळेच शेती शक्‍य
सध्या अडीच एकरापैकी दोन एकरावर ऊस लागवड आहे. संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन केले आहे. अडीच एकराला पुरेसे पाणी मिळण्यासाठी शेताचे भाग केले आहेत. प्रत्येक भागाला जास्तीत जास्त चार तास पाण्याचा पुरवठा केला जातो. हिवाळ्यात पाणी कमी लागते. त्या वेळी तीन तास पाण्याचा पुरवठा केला जातो. एकावेळी तीन भागांना पाणी दिले जाते. ठिबकने पाणी द्यावे लागत असल्याने फक्त मोटर चालू-बंद करणे इतकेच काम असते. त्यासाठी एका मजूर त्यांनी नेमला आहे. यासाठी मजुराला महिना पाचशे रुपये दिले जातात. इतरवेळी परिसरातील शेतकऱ्यांच्या बरोबरीने चर्चा करून पिकाच्या गरजेनुसार कामापुरते मजूर घेतले जातात.

शिफारशीनुसार पीक नियोजनावर भर ः
  • सध्याच्या काळात पुरेसे शेणखत उपलब्ध होत नाही. त्यामुळे शिपूरकर मळीपासून तयार करण्यात आलेले सेंद्रिय खत जमीन तयार करताना मिसळतात. 
  • सध्या अडीच एकरापैकी दोन एकरावर उसाच्या को-86032 या जातीची लागवड आहे. लागवड एक एकर आणि एक एकर खोडवा आहे. साडेतीन फुटाची सरी करून ऊस लागवड केलेली आहे. एक आड एक सरीतून ठिबक सिंचनाची लॅटरल टाकली आहे. दहा गुंठ्याची मिश्र फळबाग आहे. 
  • अडसाली ऊस व खोडव्यास रासायनिक खताची मात्रा ठिबक सिंचनाने दिली जाते. तज्ज्ञांच्या सल्यानुसार निहाल यांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये व विद्राव्य खतांचे नियोजन केले आहे. त्यानुसार खते वेळेवर दिली जातात. 
  • ऊस लागवड करताना निहाल यांना सुरवातीच्या टप्प्यात अधिक खर्च करावा लागला. वाढता खर्च कमी करण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले आहेत. ठिबक सिंचन करताना खते देण्यासाठी त्यांनी व्हेंच्युरीऐवजी जयसिंगपूर येथील प्रयोगशील शेतकरी श्री. मोटके यांनी विकसित केलेली विद्राव्य खत देण्यासाठीची यंत्रणा वापरली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून अगदी सुलभ व सहजरीत्या खते पाण्यात मिसळतात. गेल्या सात वर्षांहून अधिक काळ निहाल ही यंत्रणा वापरत आहेत. 
  • जमिनीत दरवर्षी पुरेशी शेणखताची मात्रा देणे शक्‍य नसल्याने निहाल यांनी पाचट कुजविण्यावर भर दिला आहे. उसाचा पाला ते कधीही काढत नाहीत, पाला शेतात जाळतही नाहीत. एक सरी आड पाचट शेतात पसरून गाडले जाते. यामुळे जमीन भुसभुशीत आणि सुपीक झाली आहे. याचा ऊस उत्पादनासाठी फायदा होत आहे. 
  •  निहाल यांना अडसाली उसाचे एकरी सरासरी 60 ते 65 टन उत्पादन मिळते. खोडव्याचेही 45 ते 50 टनापर्यंत उत्पादन मिळते. यातून खर्च वजा जाता वर्षाला एक लाख रुपये मिळतात. 
  • दर सोमवारी निहाल शिपुरकर यांच्या प्रिंटिंग प्रेसला सुटी असते. त्या वेळी ते दिवसभर शेतावर जाऊन मजुरांच्या साहाय्याने पुढील एक आठवड्याचे नियोजन करतात. परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा करतात. शेती कामाच्या गरजेनुसार काही वेळा पहाटे लवकर शेतावर जावे लागते. शेतातील काम उरकून ते पुन्हा नऊ वाजता प्रेसमध्ये हजर रहातात. 

"ऍग्रोवन' ठरला दिशादर्शक
शेती करताना अनेक प्रश्‍नांची उत्तरे निहाल यांना "ऍग्रोवन'मधूनच मिळाली. "ऍग्रोवन'मधील पीक निहाय माहितीचा त्यांनी संग्रह केला आहे. "ऍग्रोवन'मधील तांत्रिक लेख आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथेमधून पीक व्यवस्थापनाचे गणित समजते, असे निहाल सांगतात. येत्या काळात निहाल यांनी सागवान आणि बांबू लागवडीचे नियोजन केले आहे.

परसबागेत रमते कुटुंब
निहाल शिपुरकर यांनी शेतावरील घरासमोर दहा गुंठे जागेत तसेच बांधावर नीरफणस, आंबा, केळी, नारळ अशा 30 फळझाडांची लागवड केली आहे. परसबागेत हगांमनिहाय दोडका, अळू, कोथिंबीर, विविध वेलीवर्गीय फळभाज्यांची लागवड ते करतात. या परसबागेतून हंगामानुसार घरापुरता भाजीपाला आणि ताजी फळे मिळतात. कुटुंबातील सदस्य परसबागेत आनंदाने काम करतात. याचा एक वेगळाच आनंद असतो. पत्नी तनुजा यांचीही शेती नियोजनात मदत मिळते.

संपर्क ः निहाल शिपूरकर, 9011169691



No comments:

Post a Comment