Thursday, December 27, 2012

गटशेतीतून भाजीपाला शेती केली यशस्वी

- राजेंद्र घोरपडे
सांगवडेवाडीतील शेतकऱ्यांचे यश 

सांगवडेवाडी (जि. कोल्हापूर) येथील शेतकऱ्यांनी राज्य कृषी विस्तार योजना "आत्मा'अंतर्गत गावात तीन स्वयंसहायता गटांची सुरवात केली. या गटांतील शेतकरी प्रामुख्याने वांगी, टोमॅटो, काकडी या पिकांची लागवड करतात. एकत्रित नियोजन, समन्वय आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग सापडला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी गटशेतीमुळे अनेक समस्या सुटण्यास मदत झाली आहे. 

कोल्हापूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगवडेवाडी येथील 70 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. सिंचनाची सुविधा असल्याने बऱ्यापैकी शेती बागायती आहे; मात्र कमी क्षेत्रातील शेतीमध्ये आव्हाने अधिक आहेत. गाव शहराजवळ असल्याने येथील शेतकऱ्यांनी ऊस पिकाऐवजी भाजीपाला पिकांना प्राधान्य दिले आहे. गेली सात वर्षे येथील शेतकरी भाजीपाला लागवड करतात. 

भाजीपाला उत्पादन करताना बाजारभावातील चढ-उतार, खताची टंचाई, खतासाठी लिंकिंग, वाढता उत्पादन खर्च, कीड- रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट असे प्रश्‍न त्यांना भेडसावू लागले. लहान क्षेत्र आणि कमी आर्थिक ताकदीवर मात करण्यासाठी एकत्र येण्याची गरज त्यांना भासू लागली. त्यांच्या या विचाराला करवीर तालुका कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिले आणि गावात शेतकऱ्यांनी गटांची स्थापना केली. 

आज सांगवडेवाडीत श्री गणेश, श्री जयादेवी, बळिराजा असे तीन स्वयंसहायता गट आहेत. श्री गणेश गटामध्ये 18, श्री जयादेवी गटामध्ये 21, तर बळिराजा गटामध्ये 23 शेतकरी आहेत. हे शेतकरी प्रत्येकी अर्ध्या ते एक एकराच्या क्षेत्रात पावसाळी - उन्हाळी वांगी, टोमॅटो, काकडीची लागवड करतात. हा सर्व भाजीपाला कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड व कपिलतीर्थ मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो.

असे असते पिकांचे नियोजन-

दर्जेदार वांग्याला चांगली मागणी

संजय खोत यांची एकूण पाच एकर शेती आहे. त्यातील 15 ते 20 गुंठे क्षेत्रावर गेल्या दहा वर्षांपासून ते वांग्याचे उत्पादन घेतात. या वर्षी त्यांनी 16 गुंठे वांगी लागवड केली आहे. गटामुळे त्यांना शेतीतील भेडसावणारे प्रश्‍न सोडवण्यास मदत झाली. प्रत्येक महिन्याचा पंधरा तारखेला गटाची बैठक होते. यामध्ये विविध प्रश्‍नांवर विचारविनिमय होतो. त्यातून अडचणी सोडविल्या जातात. शेतीतील नवनव्या तंत्रज्ञानाची देवाण- घेवाण केली जाते. पुढील कामांचे नियोजन केले जाते. फवारणी, एकात्मिक कीड नियंत्रण, ठिबक सिंचन, लागवडीच्या पद्धती आदींवर चर्चा होते. यातूनच त्यांनी वांग्याला ठिबक सिंचन केले आहे. किडींच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावले आहेत.
यंदा खोत यांनी वीस गुंठ्यांवर मांजरी गोटा या जातीची लागवड केली आहे. एकत्रित कामाच्या पद्धतीमुळे मजुरांच्या टंचाईवर काही प्रमाणात मात करणे शक्‍य झाले. पूर्वी सरी- वरंबा पद्धतीने वांग्याची लागवड केली जायची, यंदा मात्र गटातील चर्चेतून त्यांनी पाच फूट रुंद गादीवाफ्यावर झिकझॅक पद्धतीने तीन फुटांवर वांग्याची रोपे लावली आहेत. गटशेतीमध्ये झालेल्या फायद्याबाबत खोत म्हणाले, की एकत्रित लागण, तोडणी आणि वाहतुकीचे नियोजन करता आले. मजुरांच्या समस्येवर मात करता आली.

वांगी लागवडीचा खर्च (क्षेत्र 16 गुंठे)
- पूर्वमशागत- 1000 रुपये
- रोपे तयार करण्याचा खर्च ः 800 रुपये
- तरू लावण : 700 रुपये
- आंतरमशागत : 3200 रुपये
- आळवणी, फवारणी खर्च : 4500 रुपये
- खतासाठी खर्च : 5000 रुपये
- 20 तोडणीचा एकत्रित खर्च : 10,000 रुपये
- वाहतुकीचा खर्च : 2000 रुपये

एकूण............................. 27,200 रुपये

वांग्याचे उत्पादन-
सध्या सहा तोडण्या झाल्या आहेत. एकूण वीस तोडण्या होणे अपेक्षित आहे. त्यातून साधारणपणे 100 ते 150 पाट्या उत्पादन होते. एका पाटीत साधारणपणे 40 किलो माल बसतो. अंदाजे पाच महिन्यांच्या कालावधीत पाच टन वांगी उत्पादन होते. यंदा दहा किलो वांग्याचा दर 100 ते 300 रुपयांच्या दरम्यान आहे. सरासरी दर 150 रुपये विचारात घेता 75 हजार रुपये मिळू शकतील. खर्च वजा जाता 47 हजार 800 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

संपर्क-संजय खोत, 7798537232

पीक व्यवस्थापन खर्चात झाली बचत... 

राम भेंडवडे यांची एकूण दोन एकर शेती आहे. त्यातील एक एकरावर यंदा त्यांनी टोमॅटो लागवड केली आहे. एक एकरासाठी त्यांना 5500 रोपे लागली. गटशेतीबाबत भेंडवडे म्हणाले, की एका रोपवाटिकेतून गटाद्वारे एकत्रित खरेदी केल्याने रोपे स्वस्त मिळाली.
गटातील चर्चेनुसार, टोमॅटोच्या दोन सरींतील अंतर साडेचार फूट आणि ओळींतील अंतर दीड फूट ठेवले. रोपांची संख्या कमी बसली तरी झाडांचा विस्तार चांगला होऊन चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

टोमॅटोचा एकरी खर्च
........... खर्च 1000 रुपये
पेरणी 3000 रुपये
खते 8000 रुपये
रोपांचा खर्च 4500 रुपये
बांधणीचा खर्च 3000 रुपये
अपेक्षित तोडणी ( 20 ते 25 ) 12, 500 रुपये
वाहतुकीचा खर्च 5000 रुपये
अन्य खर्च 4000 रुपये

एकरी खर्च 41,000 रुपये

अपेक्षित उत्पन्न- एका तोडणीत सर्वसाधारण 50 किलोच्या दहा पाट्या उत्पादन मिळते. एकरी सरासरी दहा टन उत्पादन मिळते. टोमॅटोला दहा किलोला सरासरी 50 ते 200 रुपये दर मिळतो. विक्रीतून साधारणपणे एक लाख रुपये मिळतात. खर्च वजा जाता 50 ते 60 हजार रुपये तीन महिन्यांत मिळतात.
संपर्क- राम श्रीपाल भेंडवडे, 9970690451

असा आहे गटशेतीचा फायदा... 

बांधावरच मिळाली खते
गटशेतीमुळे बांधावरच खते उपलब्ध झाली आहेत. यंदाच्या वर्षी गटातर्फे दोन ट्रक खत खरेदी केले. महाराष्ट्र शासनाच्या गोकुळ शिरगाव आणि मार्केट यार्डातील बफर स्टॉकमधून एकाच वेळी खत खरेदी केल्यामुळे पोत्यामागे 40 ते 50 रुपयांची बचत झाली. खत थेट बांधावर उपलब्ध झाल्याने कृषी सेवा केंद्रांतून होणारी लिंकिंग आदीच्या समस्येपासून सुटका झाली.
- सुकमार खोत, टोमॅटो उत्पादक, 9763242534

प्रक्रियाही शिकलो आम्ही
गटामार्फत कृषी विभागाच्या सहकार्याने विविध प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. यामध्ये भाजीपाला, फळे यावर प्रक्रिया कशी केली जाते याचे तंत्र शिकविले जाते. टोमॅटोपासून सॉस, जाम आदीचे महिलांना प्रशिक्षण मिळाले आहे. टोमॅटोचे दर घसरल्यावर प्रक्रिया करून नुकसान टाळण्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे; तसेच विटा आणि वाळूच्या साहाय्याने घरगुती फ्रिज तयार करून त्यामध्ये टोमॅटो कसे सुरक्षित ठेवायचे, हेसुद्धा शिकलो. यामध्ये काही दिवसांसाठी टोमॅटो साठवता येतात.
- उषा जयपाल चौगुले, टोमॅटो उत्पादक

तीन ते चार फवारण्या झाल्या कमी
गटातील शेतकऱ्यांना आत्मा योजनेअंतर्गत जैविक कीड नियंत्रणासाठी प्रशिक्षण देण्यात आले; तसेच शेतकऱ्यांना कामगंध सापळे, ट्रॅप्स अनुदानावर देण्यात आले. यामुळे यंदा तुडतुडे, मावा, पांढरी माशी, रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. साहजिकच फवारणीचा खर्च कमी झाला आहे. जवळपास तीन ते चार फवारण्या कमी झाल्याने खर्चात बचत झाली आहे.
- राजेंद्र चौगुले, वांगी उत्पादक, 9850619494

तोडणीचे करतो नियोजन
गटामुळे पिकाच्या तोडणीचे नियोजन करता येते. गावातील तीनही गटांमध्ये यावर चर्चा होते. एकाच दिवशी सर्वांची तोडणी येणार नाही यासाठी प्रयत्न केले जातात. एकाच दिवशी सर्वांनी तोडणी केल्यास मालाची आवक वाढल्याने दर कमी मिळण्याचा धोका असतो. यासाठी तोडणीचे नियोजन केले जाते. गटांनी विक्रीसाठी एकच व्यापारी ठरवला आहे, त्यामुळे दर योग्य मिळतो, फसवणूक टळते, तसेच तोड केलेल्या सर्वच शेतकऱ्यांनी मालाबरोबर विक्रीसाठी जाण्याची गरज भासत नाही. मालासोबत एक- दोघेजण जाऊन रक्कम आणतात. यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांचा विक्रीसाठी लागणारा वेळ, खर्च वाचतो.
- राजेंद्र हुजरे, टोमॅटो उत्पादक, 8275272527

रोपांची खरेदी झाली स्वस्तात
गटातील शेतकरी रोपांची खरेदी एकाच वेळी एकाकडे करतात, यामुळे रोपे स्वस्त मिळतात. एका रोपाला एक रुपया इतका दर यंदा होता; पण गटामुळे हे रोप 80 पैशांना मिळाले. एकरी हजार रुपये तरी सहज वाचतात. तसेच, एकत्रित वाहतुकीमुळेही बचत होते.
- रावसाहेब दादू चौगुले, वांगी उत्पादक

No comments:

Post a Comment