देवी लक्ष्मी येवढी जवळिक । तेहीं न देखे या प्रेमाचे सुख ।
आजि कृष्णस्नेहाचे पिक । यातेंचि आथी ।। डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, क्रिकेटरचा मुलगा क्रिकेटर, शिक्षकाचा मुलगा शिक्षक, संपादकाचा मुलगा संपादक होतोच असे नाही. याचा अर्थ हाताची पाच बोटे जशी सारखी नसतात. तशा व्यक्तीही सारख्या नसतात. दोन व्यक्ती दिसायला एक सारख्या असतील पण त्यांची कर्मे, ज्ञान ग्रहणाची क्षमता वेगवेगळी असते. प्रत्येकाची आवड निवडही वेगळी असते. यामुळेच हा फरक दिसून येतो. वारसा हक्काने ज्ञान संपादन होत नाही. यामुळे शिक्षकाचा मुलगा त्याचा शिक्षकीपेशा पुढे चालवेलच असे नाही. पुजापाठ करणारे भडजी मात्र त्यांच्या मुलालाच त्याचा हा हक्क देतात. तो हक्क ते सोडत नाहीत. ज्ञानदान, ज्ञान ग्रहणाचा हक्क सर्वांना आहे. कोणीही कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेऊ शकतो. कोणी कशातही पारंगत होऊ शकतो. तसे भडजी सुद्धा सर्वांना होता येते. पण काही कर्मठ ज्ञानीपंडीतांनी हा हक्क केवळ आमचाच आहे असा हेका धरला. यासाठी ही परंपरा राजर्षी शाहू महाराजांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. यातून वादही झाले. गुरू-शिष्य ही परंपरा जातीपाती, वारस, नातीगोती यावर अवलंबून नसते. गुरू-शिष्याचे नाते हे ज्ञान दानाचे, ज्ञान ग्रहनाचे नाते असते. यामध्ये या गोष्टी आड येत नाहीत. कृष्ण आणि अर्जुन यांचेही नाते असेच दृढ होते. कृष्णाचे राधेवर खूप प्रेम होते. पण ज्ञानाचे गुह्य त्यांनी त्यांच्या पत्नीला न सांगता केवळ त्यांनी त्यांचा खरा भक्त अर्जुनालाच सांगितले. गुरू-शिष्यातील नात्याचा हा महत्त्वाचा भाग आहे. प्रेमामुळे, स्नेहामुळे, नातलगांमुळे हे ज्ञान आदानप्रदानाचे कार्य चालत नाही. या ज्ञानावर सर्वांचा हक्क आहे. आत्मज्ञान हे सर्वांना मिळवता येते. यासाठी खरा भक्त होण्याची गरज आहे. खरी सेवा करण्याची गरज आहे. गुरूकृपेने हे ज्ञान प्राप्त होते. यामध्ये भेदभाव नाही. उच्चनिच हा भेद नाही. यामुळे सर्वजातीधर्मातील वारकरी परंपरेमध्ये पाहायला मिळतात. संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत एकनाथ, संत बहिणाबाई, अशी विविध जाती धर्मातील व्यक्ती आत्मज्ञानी झाली. ही गुरू-शिष्य परंपरा आहे. गुरू ज्ञानदान करताना. त्याची जात, वारसा हे पाहात नाहीत. तर त्याची भक्ती पाहतात. घेणारा उत्सुक असेल तर देणाऱ्यालाही स्फुर्ती येते. यासाठी दोघांचे ऐक्य हे गरजेचे आहे. तरच हा ज्ञानसोहळा समृद्ध होतो. ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार, ज्ञान ग्रहन करण्याच्या क्षमतेनुसार ही प्रक्रिया सुरू असते. येथे आरक्षण नाही. येथे वशीला नाही. श्रीमंती पाहीली जात नाही. येथे फक्त गुणाला महत्त्व आहे. गुणानुसार पात्रता ठरते. ही पात्रता गुरू ठरवितात. तो हक्क गुरूंना आहे. आत्मज्ञानी गुरू योग्य शिष्याची निवड करतात. त्यालाचा हा आत्मज्ञानाचा लाभ होतो. | |||
Friday, December 21, 2012
ज्ञानाचा हक्क
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment