Sunday, December 16, 2012

विकारांवर उपाय



सांगे श्रवणीं ऐकावे ठेलें । की नेत्रींचें तेज गेलें ।
हें नासारंध्र बुझाले । परिमळु नेघे ।।

धकाधकीच्या जीवनामुळे माणसांची झोपच उडाली आहे. यामुळे अनेक विकार, विकृती मानवामध्ये दिसून येऊ लागल्या आहेत. लहरीपणा, चिडचिडेपणा वाढत चालला आहे. अती आवाजामुळे, ध्वनी प्रदुषणामुळे श्रवणशक्ती कमी होताना आढळत आहे. डोळ्यांना विश्रांती न मिळाल्याने अंधत्व येण्याचे प्रमाणही वाढत आहे. दुर्गंधीमुळे सुगंधाचा वासही नाकाला झोंबू लागला आहे. बदलत्या जीवनशैलीचा हा परिणाम आहे. नियोजनच कोलमडल्याने हे प्रकार वाढत आहेत. पुर्वीच्याकाळी हे विकार उतारवयात होत असत पण ऐन तारुण्यात वृद्धत्वाच्या विकारांचा सामना नव्यापिढीला करावा लागत आहे. यावर औषध उपचारांचाही परिणाम फारसा दिसून येत नाही. मनाची शांतीच मनुष्य हरवून बसला आहे. यावर उपाय आपल्या संस्कृतीत सांगितले आहेत. पण पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे त्याला हे साधेसोपे उपायही समजेनासे झाले आहेत. अशाने मनाला शांती मिळते. समाधान मिळते. हेच मुळात पटेणासे झाले आहे. पैशाने सर्व खरेदी करता येते याच भ्रमात मनुष्य वावरत आहे. मनशांती ही पैशाने विकत मिळत नाही. ती आपल्याला मिळवावी लागते. योगा, व्यायाम यामुळेही क्षणिक मनशांती लाभते. ताजेतवाने होता येते. पण कायमस्वरूपी मनशांती मिळवायची असेल तर त्यासाठी आपण नियोजनबद्ध जीवनशैली आत्मसात करावी लागते. नियोजनाला जीवनात खूप महत्त्व आहे. या नियोजनात काही काळ हा मनाला विश्रांतीसाठी द्यावा लागतो. दररोज तासभर मनाला शांतीसाठी अध्यात्मात मन रमवायला हवे. त्याचा अभ्यास करायला हवा. त्यामध्ये सांगितलेले साधनेचे उपाय योजायला हवेत. साधनेने मनाचा थकवा दूर होतो. मनाला नवी उभारी मिळते. मनातील विचार शांत होतात. मन प्रसन्न होते. यासाठी साधना ही आवश्‍यक आहे. कमीत कमी पाच मिनिटेतरी साधना करायला हवी. पण यासाठी मानवाला वेळच नाही. शांत बसून मन एकाग्र करायला हवे. मनाची एकाग्रता वाढली की विचार शक्ती वाढते. मनाला चांगल्या कामाची सवय लागते. चांगले विचार मनात घोळू लागतात. साहजिकच मन प्रसन्न होते. अध्यात्मिक ग्रथांच्या पारायणाने मनाला सतविचारांची सवय लागते. हळुहळु मन त्यामध्ये रमु लागते. शांत झोप लागते. यामुळे होणाऱ्या विकारावर हा एकमेव उपाय आहे. याचा विचार करायला हवा. औषधाने जे साध्य होत नाही ते यामुळे निश्‍चितच साध्य होते. यासाठी प्रयत्न करायला हवा.

1 comment:

  1. खरी गोष्ट आहे.
    एक तास मनन ,चिंतनासाठी हवाच

    ReplyDelete