Tuesday, April 21, 2020

जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।।


पिकांच्या मुळाशी पाणी देणे गरजेचे आहे. हे शास्त्र सांगते. ज्ञानेश्‍वरांनी हे शास्त्र बाराव्या शतकात सांगितले, पण मनुष्याच्या आळशीपणामुळे शास्त्रोक्त पद्धती शेतीत वापरल्या जात नाहीत. काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहेत. पिकांच्या मुळाशी पाणी देण्याची ठिबक सिंचनाची पद्धत वापरून भरघोस उत्पादन घेत आहेत, पण अशा शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

म्हणोनी जाण तेन गुरू भजिजे । तेणें कृतकार्या होईजे । 
जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।। 25 ।। अध्याय 1 ला 

ओवीचा अर्थ - एवढ्याकरिता अहो ज्ञाते पुरुषहो, गुरुला भजावे आणि त्या योगाने कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणें झाडांच्या मुळांना पाणी घातले असतां अनायासें फांद्या व पाने यांना टवटवी येते. 

झाडाची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी त्याच्या मुळाशी पाणी द्यावे लागते हा विचार संत ज्ञानेश्‍वरांनी त्या काळात सांगितला. यावरून त्याकाळात झाडांची, रोपांची वाढ कशी होते. त्याला अधिकाधिक फळे लागावीत, उत्पन्न भरघोस यावे यासाठी प्रयत्न हे केले गेले होते. ठिबक सिंचन हे आज प्रगत शेतीचे तंत्रज्ञान समजले जात असले तरी बाराव्या शतकातही हेच तंत्र वापरून शेती केली जात होती. फक्त त्या काळातील सिंचनाची पद्धत वेगळी होती. मडक्‍याच्या तळाशी छोटे छिद्र पाडून ते मडके झाडाच्या, रोपाच्या मुळाशी पुरले जायचे. तेव्हा विद्युत मोटार किंवा पंपही नव्हते. पाणी दुरून आणून घालावे लागत होते. ही पुरलेली मडकी पाण्याने भरली जायची. मडक्‍याच्या छिद्रातून हळूहळू पाणी झाडाच्या मुळापर्यंत झिरपते. अशा पद्धतीने पाणी दिले जायचे थेट झाडाच्या मुळांशी पाणी देण्याची पद्धत त्याकाळात अवगत होती. खतेही याच पद्धतीने दिली जात होती. झाडाच्या भोवती गोलाकार रिंग करून सेंद्रिय खत पेरले जायचे. पुढील काळात मोटेचा शोध लागला. मोटेने पाणी खेचले जाऊ लागले. त्यानंतर पंपाने पाणी खेचण्याचा शोध लागला. वाट्टेल तेवढे पाणी विहिरीतून खेचता येऊ लागले. तसे पाण्याचा वाट्टेल तसा वापर होऊ लागला. अशाने शेतांना मीठ फुटण्याचे प्रकारही घडत आहेत. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न झाल्याने त्याचा उत्पादनावरही परिणाम होत आहे, पण तरीही आज पाटानेच पाणी देण्याची पद्धत शेतकरी वापरत आहेत. उत्पादन घट होऊनही, जमीनीचा पोत बिघडला जात असूनही शेतकरी पिकांना पाटानेच पाणी देण्याची पद्धत वापरत आहे. शास्त्रोक्त पद्धतीने आज शेती केलीच जात नाही, याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे. पिकांच्या मुळाशी पाणी देणे गरजेचे आहे. हे शास्त्र सांगते. ज्ञानेश्‍वरांनी हे शास्त्र बाराव्या शतकात सांगितले, पण मनुष्याच्या आळशीपणामुळे शास्त्रोक्त पद्धती शेतीत वापरल्या जात नाहीत. काही शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहेत. पिकांच्या मुळाशी पाणी देण्याची ठिबक सिंचनाची पद्धत वापरून भरघोस उत्पादन घेत आहेत, पण अशा शेतकऱ्यांची संख्या फारच कमी आहे. दररोज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत व्हावा यासाठी ज्ञान विस्ताराचे कार्य केले जाते. ठिबकचा वापर शेतीत वाढावा यासाठी शासनाचे अनुदानही उपलब्ध आहे, पण तरीही शेतकरी याचा वापर करत नाहीत. आता शेतकऱ्यांनी हा आळस झटकून शास्त्रोक्त पद्धतीने शेती करायला हवी तरच भावी काळात शेती टिकून राहणार आहे. याचा विचार करायला हवा.  

। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621




No comments:

Post a Comment