Thursday, April 2, 2020

रोषे प्रेम दुनवटे ।


लहान मुल पडते, रडते आणि यातूनच ते चालायला शिकत असते. त्याने स्वतः चालावे यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तसे गुरु शिष्याला शिकवत असतात. शेवटी चालायला आपणच शिकायचे असते. कारण आपणासच चालायचे असते. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल - 8237857621

अहो तान्हयाची लागता झटे । तरी अधिकचि पान्हा फुटे ।
रोषे प्रेम दुनवटे । पढियंताचेनि ।। 18 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - अहो, गाईच्या सडाला तिच्या वारसाने ढुसणी दिली तर त्या योगाने तिला जास्तच पान्हा फुटतो. कारण आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते.

रागाने प्रेम दुप्पट होते, हे कसे शक्‍य आहे. हे सर्वच बाबतीत नाही तर ज्याच्यावर आपले प्रेम त्याच्या प्रेमामुळे हे घडते. लहान मुलांनी रागाने आदळआपट केली तरी आपण त्याला रागावत नाही. उलट त्याच्यावर प्रेम करून त्याला समजावतो. त्याच्या कृतीला हसून दादही देतो. म्हणजेच त्याच्याप्रती असणारे आपले प्रेम यातून प्रकट होते. लहान मुलांना आवडले नाही तर ते राग व्यक्त करतात. त्याची ही कृती जाणूनबुजून नसते. निरपेक्ष भावनेने ही कृती असते. त्याला काही समजत नसते यातून घडलेले असते. हे आपण समजू शकतो. या गोष्टीचा राग त्यामुळेच येत नाही. उलट त्याला आपण सावरण्याचा, त्याला समजावून सांगण्याचा आपला प्रयत्न असतो. त्याप्रती असलेल्या प्रेमामुळेच आपण हे करत असतो. आपली त्याच्याबद्दल असणारी आपुलकी, जिव्हाळा यामुळेच हे घडते. आपले ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती रागावली तर ती व्यक्ती यात अधिकच सुंदर दिसते. हे खरे आहे ना. प्रेमामुळे रागही सुंदर वाटतो. उलट प्रेम अधिकच वाटते. गाईच्या सडाला जर वासराने रागाने ढुसणी दिली तर गायीच्या सडातून अधिकच दुध बाहेर येते. हे वासराप्रती असलेल्या प्रेमामुळे घडते. सद्‌गुरु सुद्धा गायी प्रमाणेच शिष्यावर प्रेम करतात. आपण त्यांची तान्हुली मुले आहोत. आपणाकडून चुक झाली तरी ते आपली चूक त्यांच्या पोटात घेतात. आपणास प्रेमाने कुरवाळतात. आपण त्यांच्यावर रागावतो तरी ते आपणावर रागावत नाहीत. उलट आपल्या चुका सुधारण्याची संधी ते देतात. आपणास प्रेमाने त्या समजावून सांगतात. गुरु आणि शिष्याचे नाते आई आणि तिच्या लहान मुलासारखे असते. आपणास ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण सद्‌गुरुंची लहान मुलेच आहोत. आपणास ज्ञान व्हावे यासाठी त्यांची धडपड सुरु असते. आपल्या हातून चुका घडल्यातरी त्या सुधारण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांच्याप्रेमामुळेच आपल्यात सुधारणा होत असते. आपल्या हातून चुका घडल्या आपण त्यांच्यावर रागावलो तरी ते आपल्याला सांभाळून घेतात. लहान मुलांप्रमाणे ते ही शिष्य ज्ञानी व्हावा यासाठी धडपडत असतात. लहान मुल पडते, रडते आणि यातूनच ते चालायला शिकत असते. त्याने स्वतः चालावे यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तसे गुरु शिष्याला शिकवत असतात. शेवटी चालायला आपणच शिकायचे असते. कारण आपणासच चालायचे असते. शिष्याने सुद्धा स्वतः ज्ञानी होण्याचा प्रयत्न करायचा असतो. तेव्हाच तो ज्ञानी होतो. 


।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment