Thursday, April 23, 2020

भक्तांमध्ये नम्रता असते कशी ?

जसा शेतकरी शेतीत प्रयोग करतो तसेच भक्तही छोट्या छोट्या अनुभवातून अध्यात्मिक प्रगती साधत असतो. म्हणूनच अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाची शिदोरी त्याच्याजवळ असते. पण त्या ज्ञानाचे तो अवडंबर कधीच माजवत नाही. तो नम्रपणे हे ज्ञान इतरांनाही देत असतो. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8237857621

कां फळलिया तरुची शाखा । सहजें भूमीसी उत्तरे देखा । 
तैसें जीवमात्रा अशेखा । खालवती तें ।। 225 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - अथवा पाहा की, फळभाराने लगडलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते. त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांपुढे ते नम्रपणानें लवतात. 

भक्तांचा स्वभाव कसा असतो ? त्याच्यामध्ये नम्रता कशी असते. ही उत्तम भक्ताची लक्षणे जाणून घेण्याची प्रत्येक शिष्याची इच्छा असते. सर्वत्र सजिव, निर्जिव वस्तूत भगवंत पाहाणे अगदी ब्रह्मदेवापासून ते साध्या लहान चिलटापर्यंत सर्वत्र भगवंताचे स्वरुप पाहायचे. ते अनुभवाचे. त्याचा बोध घ्यायचा. यातूनच भक्ताच्या विचारात, आचारात बदल घडतो. पंढरीच्या वारीत एकदा तरी जाऊन आला तरी या सर्व गोष्टींचा त्याला निश्चितच अनुभव येतो. सहजच त्या गोष्टी समजून येतात. यासाठीच तर एकदा तरी वारी करावी असे सांगितले जाते. भक्त कसा असतो ? भक्तामध्ये नम्रता कशी असते. त्याचा स्वभाव कसा असतो. हे समजण्यासाठी वारी निश्चितच करावी. वारीतली भक्तांची भक्ती पाहून आपणास निश्चितच त्याचा बोध येईल. भक्तांचा भोळपणा पाहून आपणासही निश्चितच भक्तीची ओढ लागेल. वारीतले सगळेच भक्त उच्चशिक्षित नसतात. फारसे शिकलेलेलेही नसतात. पण उच्चशिक्षित व्यक्तीपेक्षाही त्यांचे अध्यात्म ज्ञान, भक्तीचे ज्ञान हे उच्च कोटीचे असते. शेतात राबणारा शेतकरी जसा भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येवर काही ना काहीतरी उपाय शोधत असतो. विविध प्रयोग करून शेतीचा विकास करत असतो. अगदी तसेच भक्त स्वतःची अध्यात्मिक प्रगती साधत असतो. शेतकरी शिकलेला असतोच असे नाही. पण आपल्या अनुभवातून तो शेतीचा विकास साधत असतो. पर्याय शोधणे हे त्याचे प्रथम कर्तव्य असते. झाडावरची फळे तोडण्यासाठी माणसे नाहीत. शेती कामासाठी माणसे नाहीत. म्हणून तो काम सोडत नाही. काही ना काही तरी त्यावर उपाय शोधतोच. फळेतर शेतकऱ्यालाच काढावी लागणार. पण मजूर नाहीत. अशावेळी नुकसान होणार नाही यासाठी योग्य ते तंत्र शोधून तो यावर उपाय शोधतो. अशाने तो नेहमीच शेतीचा विकास साधत असतो. नेहमीच शेतीत वेगवेगळे प्रयोग करणारा शेतकरी हा सर्वाधिक विकास करू शकतो. छोट्या छोट्या प्रयोगातून तो प्रगती करत असतो. जसा शेतकरी शेतीत प्रयोग करतो तसेच भक्तही छोट्या छोट्या अनुभवातून अध्यात्मिक प्रगती साधत असतो. म्हणूनच अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाची शिदोरी त्याच्याजवळ असते. पण त्या ज्ञानाचे तो अवडंबर कधीच माजवत नाही. तो नम्रपणे हे ज्ञान इतरांनाही देत असतो. झाड जसे फांदीला फळे लागल्यानंतर वाकून नम्रपणे भूमीचे आभार मानते तसे भक्तही नम्रपणे गुरुंचे आभार मानत असतो. नम्र भक्तच अध्यात्मिक प्रगती सहज साधतो. 

। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621











No comments:

Post a Comment