Saturday, April 4, 2020

सद् गुरूंचे लक्ष कसे असते ?


सद् गुरूंची शीतलता चंद्राच्या शीतलते पेक्षाही अधिक आहे. त्यांनी लक्ष दिले तर आपल्यात खूप मोठा बदल होऊ शकतो.  त्यांची एक नजर चंद्रापेक्षाही अधिक शिथिलता देऊ शकते.
-राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल ८२३७८५७६२१

परी आता चंद्रापासून निवविते । जे अमृताहुनि जीवविते ।
तेणे अवधानें कीजो वाढते । मनोरथा माझिया ।। २४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा

ओवीचा अर्थ - तर आता चंद्रापेक्षा शांत करणारे व अमृताहुनी जीवित वाढविणारे असे चे आपले लक्ष त्या लक्षाने माझ्या मनोरथाची वाढ करावी.

सद्गुरूंचे लक्ष कसे असते ? अध्यात्मिक प्रगतीसाठी शिष्याने हे जाणून घेण्याची गरज आहे. चंद्राची शीतलता आता नव्या पिढीला फारशी माहित नसेल. त्यांनी ती अनुभवली ही नसेल आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण चंद्र फक्त कोजागिरी पौर्णिमेला आठवतो. तेही फक्त चंद्राची आकृती पाहण्यासाठी. कारण समोर सुरू असणारा गाण्यावरील नाचामुळे त्या चंद्राची शीतलता आपणास कधीही अनुभवता येत नाही. अन्य वेळी चंद्राकडे आपले कधीच लक्ष जात नाही कारण विजेची मुबलकता झाल्याने अंधारात चाचपडत जाण्याचा कधी अनुभवच आलेला नाही. अंधारातून चंद्राच्या प्रकाशात वाट काढत जाणे याच्यासारखा आनंद दुसरा या जगात नाही. पण आता रस्त्यावर विजेची उपलब्धता असल्याने आपणाला चंद्राच्या शीतलतेचा अनुभव नाही. मग तेथे सद्गुरूंच्याकडून प्राप्त होणारी शीतलता कशी अनुभवता येईल. लहान मुल जेवत नसेल तर त्याला चंद्र दाखवून आई त्याला जेवू घालत असे. आता असे प्रसंग क्वचितच पाहायला मिळतात. कारण चंद्राचा विसर आपणास पडला आहे. 
धकाधकीच्या जीवनात शांत जीवन जगण्यासाठी या चंद्राची शीतलता अनुभवण्याची गरज आहे. या चंद्राच्या शीतलतेणे आपणास आपल्या मनाची शांती निश्चित भेटू शकेल. सद्गुरूंची शीतलता चंद्राच्या शीतलते पेक्षाही अधिक आहे. त्यांनी लक्ष दिले तर आपल्यात खूप मोठा बदल होऊ शकतो.  त्यांची एक नजर चंद्रापेक्षाही अधिक शिथिलता देऊ शकते. त्यांनी लक्ष दिले तर शिष्य निश्चितच अमर होईल. कारण त्यांचे लक्ष हे अमृतापेक्षा ही जीवित वाढवणारे आहे. यासाठीच सद्गुरुकृपा ही अध्यात्मात खूप महत्त्वाची मानली जाते. आत्मज्ञानी होण्यासाठी गुरुकृपा ही महत्त्वाची आहे. शिष्याने प्रयत्न करायचे असतात. सद्गुरूंचे त्या शिष्याकडे लक्ष असेल तर तो शिष्य निश्चितच प्रगती करू शकतो. यासाठी सद्गुरूंना लक्ष देण्यासाठी विनवणी करायची असते. सद्गुरुंचे स्मरण करायचे असते. नमस्कार करून त्यांना लक्ष द्या असे म्हणायचे असते. सद्गुरूंच्या या नजरेत आपणास निश्चित शांती मिळेल. मनाची शांती अध्यात्मिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे आहे मन शांत असेल तर निश्चितच ध्यानधारणा व्यवस्थित होते. यासाठी सद्गुरूंनी आपणाकडे लक्ष द्यावे, त्यांची कृपा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विनंती करण्याची गरज आहे. अशाने आत्मज्ञान प्राप्तीचा आपला मनोरथ आपण निश्चितच पूर्ण करू शकू.


।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621




No comments:

Post a Comment