Sunday, January 19, 2020

सत्याची कास


अयोग्य गोष्टीपासून चार हात लांब राहायला शिकवणारी, कोणत्याही गोष्टीत धीर खचू न देणारी, अपयशाचा वासही नसणारी अशी आपली संस्कृती आपण का विसरतो आहोत, याचा विचार व्हायला हवा. 
- राजेंद्र घोरपडे

तू अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न सांडिसी ।
तुझेनि नामें अपयशीं । दिशा लंघिजे ।। 8 ।। अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ - एऱ्हवी तूं अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत नाहीस, कधीहिं धीर सोडीत नाहीस, तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडी पळून जावें.

व्यक्तिमत्त्व कसे असावे? व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही जण शिक्षण घेतात. आजकाल त्याची गरज झाली आहे. लोकांशी कसे बोलावे? कसे वागावे? समोरच्या व्यक्तीवर प्रभाव कसा पाडावा? यासाठी शिक्षण दिले जाते. व्यवसायात प्रगती करायची असेल, तर हे सर्व गरजेचे आहे. सर्वच गुण अंगभूत असतात, असे नाही. काही गोष्टी ह्या शिकाव्याच लागतात. सर्वांना या गोष्टी जमतात, असे नाही. पूर्वीचे ग्रंथ पाहिले तर, यामध्ये हेच शिकवले गेले आहे. मनाचे श्‍लोक काय सांगतात? आपणास काय शिकवतात? याचा विचार करायला नको का? मन स्थिर कसे ठेवावे, मनावर नियंत्रण कसे ठेवायचे, हेच तर सांगतात ना. व्यक्तिमत्त्व विकासात याची गरज वाटत नाही का? चांगले शिक्षण, संस्कारच यातून शिकवले जातात ना. मग आजकाल हे श्‍लोक ऐकायला कोठेच मिळत नाहीत? असे का? गणेश उत्सवात, नवरात्रामध्ये कोणते संस्कार शिकवले जातात, याचा विचार करायला नको का? संस्कृती कोणती याचा विचार व्हायला नको का? गणेश उत्सवात, नवरात्र या सणांध्ये असे श्‍लोक शिकवले गेले तर व्यक्तिमत्त्व विकास होणार नाही का? असे वाटत नाही का? मग या गोष्टींचा विचार ज्येष्ठांनी तसेच तरुण पिढीने करायला नको का? योग्य ते संस्कार करण्यासाठी असे सण आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. हे विचारात घ्यायला हवे. पैशाच्या जोरावर दंगामस्ती करणारी आपली चंगळवादी भारतीय संस्कृती नाही हे लक्षात घ्यायला हवे. पैशाचा योग्य विनियोग कसा करायचा, हे आपल्या संस्कृतीत शिकविले जाते. अयोग्य गोष्टीपासून चार हात लांब राहायला शिकवणारी, कोणत्याही गोष्टीत धीर खचू न देणारी, अपयशाचा वासही नसणारी अशी आपली संस्कृती आपण का विसरतो आहोत, याचा विचार व्हायला हवा. जग कितीही बदलले तरी सत्य बदलत नाही. सत्याचा नेहमीच विजय होतो. या सत्याची कास धरायला शिकले पाहिजे, तर केव्हाच आपल्या पदरी अपयश येणार नाही.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।


No comments:

Post a Comment