Sunday, October 13, 2019

सन्मार्गाची कास


वाईट मार्गाने कमविलेली संपत्ती फार काळ टिकत नाही. तेव्हा वाईट गोष्टींचा मोह धरू नये. तो टाळणे यातच खरे हित आहे. मोह माणसाला आवरता यायला हवा. यासाठी सन्मार्गाची कास धरायला हवी. 
- राजेंद्र घोरपडे, मोबाईल 8999732685

तरि वाघाचिये अडवे । चरोनि एकवेळ आला दैवें ।
तेणें विश्‍वासें पुढती धांवे । वसू जैसा ।। 763 ।। अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ - तर वाघाच्या अरण्यांतून दैवयोगानें एक वेळ (सुरक्षितपणे) बैल चरून आला, तर त्या विश्‍वासानें जसा तो बैल पुन्हा त्या अरण्यांत धावतो.

जंगलात गेलेला बैल वाघासमोरून एकदा चरून आला, पण दैवयोगाने वाघाने त्याला कोणतीही हानी पोचविली नाही. यामुळे त्या बैलाचा विश्‍वास बळावला. वाघाबाबतची भीती त्याच्या मनातून गेली व तो बैल पुन्हा तेथेच चरायला गेला. काय झाले असेल? वाघाने त्याचा फरशा पाडला. चोराची एक चोरी यशस्वी झाली की तो लगेचच दुसरी चोरी करण्याचा विचार करतो. त्याला चोरी करण्याचे व्यसन लागते. माणसाचे मनावर नियंत्रण नसते. सतत ते विषयांच्या मागे धावत असते. दहशतवादी कृत्येही अशाच अज्ञानातून वाढत आहेत. एखादे गैरकृत्य पचले की पुढे दुसरा गैरप्रकार करण्याची वृत्ती होते. यातून गैरकारभार करण्याची सवयच लागते. माणूस त्याच्या आहारी जातो. त्याचे मनावर नियंत्रण राहात नाही. सध्या अनेक राजकारण्यांना सुद्धा हीच सवय लागली आहे. एखादा गैरकारभार केला, तो पचला की लगेच दुसरा करायचा. अशाने भ्रष्टाचार वाढला आहे. लोकांना तो आता शिष्टाचार वाटू लागला आहे. नियंत्रण सुटलेले आहे; पण आपण एकदा सापडलो तर कायमचे बाद, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. ठेच लावल्याशिवाय भान येत नाही म्हणतात ना ते हेच ! राजकारणात अशी बाद झालेली अनेक घराणी आहेत. चुकांची सुद्धा एक मर्यादा असते. मर्यादेबाहेर गेल्यावर सुधारण्यासाठीही संधी मिळत नाही. एकदा चुकल्यानंतर ती लगेच सुधारणे व पुन्हा अशी चूक न करणे यातच खरा शहाणपणा आहे, पण तसे होत नाही. ऊस गोड लागला म्हणून तो मुळासकट खायचा नसतो. वाईट सवयीचे व्यसन लगेचच लागते, पण ते जडू नये यासाठी प्रयत्न व्हायला हवा. तरच खरे यश संपादन करता येईल. वाईट मार्गाने कमविलेली संपत्ती फार काळ टिकत नाही. तेव्हा वाईट गोष्टींचा मोह धरू नये. तो टाळणे यातच खरे हित आहे. मोह माणसाला आवरता यायला हवा. यासाठी सन्मार्गाची कास धरायला हवी. व्यसन असावे, पण ते चांगल्या गोष्टीचे असावे. वाईटाचे व्यसन हे आपणासाच खाऊन टाकते, हे विसरता कामा नये.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।। 

No comments:

Post a Comment