Wednesday, May 6, 2020

निंबोळीपासून किटकनाशक..कशावर आहे उपयोगी ?


कडुलिंबाच्या बियांपासून उत्तम कीड नाशक करता येते. लेडी बर्ड बिटल तसेच मावा यावर हे कीडनाशक उपयुक्त आहे. सुकलेल्या निबोळ्या पासून ते तयार केले जाते. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल - 8999732685

कां निंबोळियेचें पिक । वरि गोड आंत विख । 
तैसें तें राजस देख । क्रियाफळ ।। 263 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 14 वा 

ओवीचा अर्थ - अथवा कडुनिंबाच्या निंबोळ्या बाहेरून सुंदर दिसतात, पण आंत विष ( विषासारख्या कडू ) असतात, त्याप्रमाणें ते राजस क्रियांचे फळ आहे, असे समज. 

निंबोळी म्हणजे कडुलिंबाच्या बिया. या वरून गोड असल्यातरी आतून त्या कडू असतात. औषध सुद्धा कडू असले तरी त्याचा परिणाम हा गोड असतो. उसाच्या शेतीमुळे बांधावरील झाडे आता कमी झाली आहेत. पूर्वी प्रत्येकाच्या बांधावर झाडे असायची. यातून दुहेरी उत्पन्न मिळत होते. शेतीच्या उत्पन्ना बरोबरच झाडावरील वृक्षाची फळेही चाखायला मिळत. कडुलिंबाचे वृक्ष खायला फळे देत नाही पण त्याची फळे ही औषधी असतात. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. कडुलिंबाची संख्या आता घटली आहे. बांधावरचा हा वृक्ष कमी झाला आहे. पूर्वी धान्य साठवून ठेवताना त्यामध्ये कीड लागू नये यासाठी कडुनिंबाचा पाला टाकत असतं. धान्याला कीड लागत नसे. पण आता बदलत्या काळात पावडर टाकली जाते. ही पावडर मानवी आरोग्यास धोकादायक असते पण तरीही त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कडुनिंबाचा पाला सहज उपलब्ध असूनही शेतकरी आता हा उपाय योजत नाही. जुने बुरसट विचार म्हणून आपण चांगल्या गोष्टींचा त्याग करत आहोत. याकडे आता पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत जागरूक होण्याची गरज आहे. चांगले विचार जोपासण्याची गरज आहे. आरोग्यास ज्या गोष्टी घातक आहेत त्याचा अवलंब हा आपण रोखायला हवा. आरोग्यदायी उपाय योजायला हवेत. कडुलिंबाचे महत्त्व ओळखून त्याचा वापर पुन्हा शेतीमध्ये वाढवायला हवा. त्याचे फायदे, लाभ घ्यायला हवेत. खर्चाची बचतही होते याचाही विचार शेतकऱ्यांनी करायला हवा. कडुलिंबाच्या बियांपासून उत्तम कीड नाशक करता येते. लेडी बर्ड बिटल तसेच मावा यावर हे कीडनाशक उपयुक्त आहे. निंबोळ्या जरी दिसायला सुंदर असल्या तरी त्या कीटकांसाठी विषारी आहेत. म्हणूनच त्याचा वापर हे किटक नष्ट करण्यासाठी केला जातो.  सुकलेल्या निबोळ्या पासून ते तयार केले जाते. एक किलो सुकलेल्या बिया घेऊन त्याचा कूट करावा. या कुटलेल्या बिया दोन लिटर देशी गाईच्या गोमुत्रात दोन दिवस भिजत ठेवाव्यात. त्यानंतर 15 लिटर पाण्यात हे मिश्रण एकत्र करून कपड्यातून किंवा गाळण्यातून गाळून घ्यावे. हे मिश्रण पिकावर फवारल्यास पिकातील अनेक प्रकारच्या किडी नष्ट होतात. सहज सोपे व कमी खर्चाचे हे उपाय शेतकऱ्यांनी उपयोगात आणून शेतीतील खर्चात बचत करायला हवी. फवारणीचा खर्च वाचू शकतो. तसेच महागड्या रासायनिक कीडनाशकापासून आरोग्यावर होणारे परिणामही यामूळे रोखले जाऊ शकतात. कडूलिंबापासून तयार केलेले कीडनाशक हे शरीराला अपायकारक नसते. त्यामुळे आरोग्यदायी अशा या पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करायला हवा. लिंब कडू असला तरी त्याचा उपाय हा गोड असतो, लाभदायक असतो याचा विचार करायला हवा. मानवी अनेक आजारावरही कडुलिंबाची काढा उपयुक्त आहे. पित्तनाशक, उष्णतेच्या विकारावर कडुनिंबाचा काढा उपयुक्त आहे. अशा या वृक्षाचे संवर्धन करायला हवे. 

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621





No comments:

Post a Comment