Thursday, May 21, 2020

लसणाचा वास उग्र, पण हे आहेत फायदे

लसणामुळे तमोगुण वाढतो म्हणून साधना करताना लसूण खाऊ नको, असे सांगितले जाते. पण या लसणाचे आयुर्वेदात अनेक उपयोग सांगितले आहेत. वाताचे विकार कमी करण्यासाठी लसणाचा उपयोग केला जातो. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

लसणातें न सांडी गंधी । का अपथ्यशीळातें व्याधी । 
तैसी केली मरणावधीं । विषादें तया ।। 757 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 18 वा 

ओवीचा अर्थ - ज्याप्रमाणें लसुणाला घाण कधीच सोडत नाही अथवा पथ्य न करणाऱ्याला रोग सोडीत नाही, त्याप्रमाणें त्या तामसी पुरुषाला मरणाऱ्या वेळेपर्यंत शेद सोडीत नाही. 

लसणाचा वास उग्र असतो. तो कधीही, कशानेही जात नाही. हा उग्रवास औषधी आहे. पूर्वीच्याकाळी आतासारखे दवाखाने नव्हते. लगेच औषधाची सोयही नव्हती. किरकोळ आजार तर अंगावरच काढले जायचे. सर्दी, पडसे हे काही आजार मानलेच जात नव्हते. सर्दी झाल्यावर देशी उपाय केले जायचे. लहानमुलांना सर्दी झाली की आता लगेच दवाखाने गाठले जातात. श्‍वसनास त्रास होतो, त्याला व्यवस्थित झोप लागत नाही, म्हणून लगेच उपचार केले जातात. पूर्वीही अशा आजारावर उपचार केले जायचे. लसणाच्या पाकळ्या लहान मुलांच्या गळ्यात बांधल्या जातात. त्याच्या उग्र वासामुळे व त्यातील उष्णतेमुळे सर्दी नाहीशी होते. इतका हा वास उपयुक्त आहे. 

इतकेच काय पिकांवरील कीड-रोग घालविण्यासाठीही लसणाचा उपयोग केला जातो. लसणापासून कीड व रोग नाशके तयार केली जातात. एक किलो लसूण कुटायचा. कुटताना त्यामध्ये पाणी अजिबात घालायचे नाही. यात एक किलो सेंद्रिय गूळ मिसळायचा. हे मिश्रण छोट्या बाटलीत भरून 10 दिवस ठेवावे. दहा दिवसानंतर यापासून उत्तम बुरशीनाशक तयार होते. हे बुरशीनाशक दोन मिली मिश्रण एक लिटर पाण्यामध्ये मिसळूण पिकावर फवारावे. पिकावरील सर्व बुरशीचे रोग नष्ट होतात. 

लसणापासून उत्तम प्रकारचे कीडनाशकही तयार करता येते. दोन किलो लसूण पाणी न घालता कुटायचा. त्यात 25 मिली केरोसीन (रॉकेल) घालून हे मिश्रण प्लॅस्टिकच्या डब्यात संध्याकाळी सातच्या आत ठेवावे. दुसरेदिवशी सकाळी ही दोन किलो पेस्ट 100 ग्रॅम लाल मिरची पुडीत मिसळावी. त्यात पाच लिटर पाणी घालावे. लगेचच हे मिश्रण फडक्‍याने गाळून घ्यावे. यात 250 लिटर पाणी घालून एक एकरावर फवारावे. शेतातील सर्व प्रकारचे कीटक नष्ट होतात. 

लसणामुळे तमोगुण वाढतो म्हणून साधना करताना लसूण खाऊ नको, असे सांगितले जाते. पण या लसणाचे आयुर्वेदात अनेक उपयोग सांगितले आहेत. वाताचे विकार कमी करण्यासाठी लसणाचा उपयोग केला जातो. बाळंतणीस भाजलेल्या लसणाच्या पाकळ्या खायला दिल्यास तिच्या शरीरातील वाताचे विकार कमी होतात. विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसणाचा धूप केला जातो. विशेषतः बाळंतणीच्या खोलीत हा धूप केला जातो. कान दुखत असेल तर लसणाचा वास घ्यावा. त्यामुळे कानाचे दुखणे थांबते. 

लसणात तामस गुण आहेत. पण त्याचा वापर योग्य कारणासाठी केला तर ते उपकारक आहेत. विकार बरा होण्यासाठी काही पथ्ये सांगितली जातात. ती पथ्ये पाळली नाहीत तर विकार हा बरा होणार नाही. तो बळावत जाणार. लसणाचा वास जसा जात नाही, तसा तामस गुण घालवून जात नाही. लसणाचा वास जसा विकारावर उपयुक्त ठरतो. तसे तामस गुण विकारावर वापरून ते नष्ट करायला हवेत. म्हणजेच ते सात्त्विक गुणात परावर्तित करता यायला हवेत. वाईट सवयी चांगल्या सवयीत बदलायला हव्यात. उत्तम साधनेसाठी याची गरज आहे. 

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment