Monday, May 4, 2020

अथवा करूं शाड्‌वळ । पर्जन्यवृष्टी ।।


 दुःखाने माणूस खचतो. मन सुकते. अशा काळात त्याला आधार देणारा कोणी भेटला तर त्याच्यात एक नवी उभारी निर्माण होते. सद्‌गुरूही असेच वळवाच्या पावसासारखे आपल्या जीवनात बरसतात. आपल्या सुकलेल्या, दुःखी जीवनात बहार निर्माण करतात. नवी उभारी देतात. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

कां वीजु वर्षोनि आभाळ । ठिकरिया आतो भूतळ ।
अथवा करूं शाड्‌वळ । पर्जन्यवृष्टी ।। 434 ।। ज्ञानेश्‍वरी अध्याय 18 वा

ओवीचा अर्थ - अथवा मेघांतून विजेचा वर्षाव होऊन पृथ्वीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होवोत, अथवा मेघ पर्जन्याची वृष्टी करून सगळें भूतळ हिरवेगार करून टाको.

अनेकदा ढगांचा गडगडाट होऊन पाऊस पडतो. वादळी वाऱ्यासह येणाऱ्या या पावसाला अवेळी पाऊस असेही म्हटले जाते. मे च्या सुरवातीस पडणाऱ्या पावसाला वळीव असे म्हटले जाते. तापलेल्या जमिनीला या पावसाने गारवा मिळतो. पहिल्या पावसाने तर जमिनीतील जीवाणूमुळे (निमॅटोड्‌स) सुंगध दरवळतो. प्रसन्न वातावरण तयार होते. हा पाऊस कधी पडतो कधी पडत नाही. याचा काही नेम नाही. या पावसाने कधी नुकसान होते. विशेषतः फळबागांना फटका बसतो. पण पाणी टंचाई भासणाऱ्या भागात हा पाऊस फायद्याचा ठरतो. निसर्गाचा हा पाऊस गरजेचा आहे. उन्हाने वाळू लागलेली झाडे - झुडपे या पावसाने हिरवीगार होतात. असे नेमके या पावसात असते तरी काय? शास्त्रोक्त अभ्यासानुसार हवेत वीज चमकते तेव्हा 2600 अंश सेल्सिअस इतके तापमान वाढते. या तापमानाला हवेत 78 टक्के इतका असणारा नायट्रोजन पाण्यामध्ये विरघळतो. त्याचे अमोनियामध्ये रूपांतर होते. पावसाचे हे नत्रयुक्त पाणी झाडांना उपलब्ध झाल्यानंतर पालवी फुटते. या नव्या पालवीवरच पुढच्यावर्षी फळे लागतात. यासाठी फळझाडांना हा पाऊस उपयुक्त असतो. उन्हाने वाळत चाललेल्या वृक्षांच्या वाढीसाठी हा पाऊस उपयुक्त असतो. त्या वृक्षांमध्ये यामुळे नव चैतन्य निर्माण होते. वाढत्या तापमानामुळे नष्ट होत चाललेल्या वृक्षांच्या जातींच्या संवर्धनासाठी तर अशा पावसाची गरज आहे. जंगलामध्ये हा पाऊस नवी आशा देऊन जातो. हा पाऊस अवेळी पडत आहे. पण मुख्यतः पावसाळा संपल्यानंतर परतीचा पाऊस हा वादळी असतो. हा पाऊस झाला तर रब्बी मध्ये शेतकरी पिकेही घेऊ शकतात. या पावसामुळे रब्बीच्या उत्पादनात मोठी वाढ होते. ऑक्‍टोंबरमध्ये छाटणी केलेल्या वृक्षांची जोमाने वाढ होण्यासाठीही हा पाऊस उपयुक्त ठरतो. या पावसाने फुटलेली नवी पालवी उन्हाळ्यातही तग धरू शकते. मे च्या मध्यावर हा पाऊस झाला तर उन्हाच्या दाहकतेने सुकत चाललेल्या वृक्षांना पुन्हा बहार येतो. मार्चमध्ये हा पाऊस झाला तर नत्रयुक्त पाणी फळझाडांना मिळाल्याने आंबा, काजू, फणस यांचे उत्पादनही वाढते. निसर्गाची ही देणगी आहे. निसर्गाचा हा नियम आहे. माणसाच्या जीवनातही असेच दुःखाचे प्रसंग घडत असतात. दुःखाने माणूस खचतो. मन सुकते. अशा काळात त्याला आधार देणारा कोणी भेटला तर त्याच्यात एक नवी उभारी निर्माण होते. सद्‌गुरूही असेच वळवाच्या पावसासारखे आपल्या जीवनात बरसतात. आपल्या सुकलेल्या, दुःखी जीवनात बहार निर्माण करतात. नवी उभारी देतात. सुकलेल्या विचारांना नवा विचार जोडतात. नवी उमेद निर्माण करतात. निसर्गाच्या नियमाप्रमाणे हे त्यांचे कार्य अखंड सुरू असते. फक्त आपण त्यांचे हे कार्य समजून घेत नाही. निसर्गाशी आपण स्पर्धा करत राहतो अन्‌ मग दुःखाचा हा डोंगर दूर होत नाही. यासाठी निसर्गावर प्रेम करायला शिकले पाहिजे. निसर्गाचे नियम पाळायला हवेत. निसर्गाची ही देणगी आहे. निसर्ग नियमानेच आध्यात्मिक विकास होतो. 


 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment