Sunday, May 10, 2020

पारंपारिक वाणांच्या संवर्धनाची गरज


पोषक ठरणारे पारंपरिक वाण सोडून संकरित बियाण्यांचा वापर किती करायचा, याची उत्पादने किती घ्यायची याचाही विचार करण्याची गरज आहे. जमिनीची खालावलेली प्रत ओळखून शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळला आहे, तसा तो आता पारंपरिक बियाण्यांच्या लागवडीकडेही वळेल. आरोग्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना हे पाऊल उचलावे लागणार आहे.
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजीं सामाये । 
ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाति न नशे ।। 59।। अध्याय 17 वा 

ओवीचा अर्थ - बीज नाहीसें होऊन त्याचें झाड होते, झाड नाहीसें होऊन त्याचा बीजांत समावेश होतो, हा क्रम कोट्यावधी कल्पें चालला तरी ( झाडाची ) जात नष्ट होत नाही. 

पिकाच्या पारंपरिक अनेक जाती आता कालबाह्य होत आहेत. पण त्या जातींची चव आजच्या संकरित जातींमध्ये नाही. भाताच्या चंपाकळी, काळा जिरगा, जोंधळा जिरगा, काळी गजरी, घनसाळ, हवळा आदी सुवासिक जाती आहेत. पण या जातींची लागवड फक्त काहीचं शेतकरी करतात. जुन्या जातींचे उत्पादन संकरित बियाण्यांच्या तुलनेत खूपच कमी असते. सध्या वाढत्या लोकसंख्येमुळे, महागाईमुळे अशा बियाण्यांची उत्पादने घेणे आता शेतकऱ्यांना परवडत नाही. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करावी लागत आहे. अशा या परिस्थितीमुळे या पारंपरिक जाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही शेतकरी आवड आणि त्यांचे महत्त्व ओळखून या पिकांची लागवड करत आहेत. अशा शेतकऱ्यांच्यामुळे या बियाण्यांचे संवर्धन होत आहे, ही महत्त्वाची बाब आहे. या जातींची वैशिष्ट्ये शेतकऱ्यांनी ओळखून या जातींच्या संवर्धनाचे कार्य हाती घेण्याची गरज आहे. या जातींचे बियाणे रासायनिक खतांना प्रतिसाद देत नाहीत. सेंद्रिय पद्धतीनेच यांची लागवड करावी लागते. या जातीच्या बियाण्यांची चव, सुवास त्याची प्रत टिकवायची असेल तर सेंद्रिय पद्धतीनेच याची लागवड करणे गरजेचे आहे. संकरित बियाण्यास काही वर्षांनंतर त्याची उत्पादकता, चव, त्याची प्रत नष्ट होते. पण पारंपरिक बियाण्यांची प्रत मात्र टिकून असते. विशेष म्हणजे संकरित बियाणे हे शेतकऱ्यांना दरवर्षी विकत घ्यावे लागते. कारण उत्पादित होणारे दाणे हे वांजोटे आहेत. बीज म्हणून आवश्‍यक गुण त्याच्यामध्ये नाहीत. असे हे वांजोटे उत्पादन सध्या शेतकरी घेत आहेत. बीज म्हणून ते पेरले गेले तर ते उगवत नाही. अशा या संकरित जातींमुळे शेतकऱ्यांची फसवणूकही होत आहे. दरवर्षी संकरित बियाणे तयार करावे लागते. गेल्या काही वर्षातील संकरित जातींचा इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत दर दहा वर्षांनी पिकांच्या नव्याच जाती येताना दिसत आहेत. जुने संकरित वाण टिकून राहात नाही. त्याची गुणवत्ताही टिकून राहात नाही. अशा या बियाण्यांच्या निर्मितीचा उद्योग दरवर्षी करावा लागतो. बदलत्या शेतीच्या या पद्धतीत शेतकऱ्यांनी आरोग्यासाठी उपयुक्त असणारे, पोषक ठरणारे पारंपरिक वाण सोडून संकरित बियाण्यांचा वापर किती करायचा, याची उत्पादने किती घ्यायची याचाही विचार करण्याची गरज आहे. जमिनीची खालावलेली प्रत ओळखून शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळला आहे, तसा तो आता पारंपरिक बियाण्यांच्या लागवडीकडेही वळेल. आरोग्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना हे पाऊल उचलावे लागणार आहे. दरवर्षी बियाणे विकत घेण्याऐवजी पारंपरिक वाणांचे संवर्धन शेतकरी करू लागतील. चांगला वाण, सुवासिक, आरोग्यदायी, चविष्ट अशा या पारंपरिक जातीचे संवर्धन ही काळाची गरज आहे. पारंपारिक वाण टिकून राहणारे आहे. त्याची गुणवत्ता टिकूण राहणारी अशी आहे. 

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621



No comments:

Post a Comment