Friday, May 15, 2020

येर पत्र पुष्प फळ । तें भजावया मिस केवळ ।


शुद्ध मनाने, अंतःकरणाने केलेली साधना निश्चितच फलद्रुप होते. म्हणूनच पान, फुल, फळ मग ते कोणत्याही वृक्षाचे असे तेच सद्गुरु स्वीकारतात. सद्गुरु मंत्रांच्या उर्जेतून शिष्यातील पानांचा विकास होतो. साधना फुलते अन् त्या शिष्यरुपी वृक्षाला आत्मज्ञानरुपी फळे लागतात. 
- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

येर पत्र पुष्प फळ । तें भजावया मिस केवळ । 
वांचूनि आमचा लागे निष्फळ । भक्तितत्त्व ।। 396 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 9 वा

ओवीचा अर्थ - बाकी पान, फूल, फळ याचे अर्पण करणे ते मला भजण्याचे केवळ निमित्त आहे. वास्तविक पाहिलें तर आम्हांला आवडतें असें म्हटले म्हणजे, 

भक्तांच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्तितत्त्वच होय. गुरुंना फक्त पान, फुल, फळच गुरु दक्षिणा म्हणून दिले जावे. पान मग ते कोणत्याही वृक्षाचे असो. सकलेले असले तरी चालते. फुल, फळ ते मग कोणतेही असो. ते गुरुंना चालते. ते फक्त शुद्ध भावाने अर्पण करावे, असा त्यांचा भाव आहे. शुद्ध भावानें, मनानें ते अर्पण केले तर ते सद्गुरु निश्चितच स्वीकार करतात. त्यांना द्रव्य लागत नाही ना स्थावर, मालमत्ता, पैसा आडका अशी कशाचीही ते अपेक्षा करत नाहीत. मग असे सद्गुरु शिष्यामध्ये पाहतात तरी काय ? शिष्याचा फक्त मनोभाव पाहतात. त्याने शुद्ध मनाने, शुद्ध विचाराने, अंतःकरणाने, शुद्ध भावनेने जर ते दिले तरच ते सद्गुरुंच्यापर्यंत पोहोचते. ते त्याचा स्वीकार करतात. म्हणजेच भक्ताच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्तितत्वच संत पाहातात. पण फक्त पान, फुल, फळच का ? सूर्यप्रकाश पान शोषते. सूर्याची उर्जा पानात साठवली जाते. पानावर प्रकाशसंश्लेषण होते. सूर्याच्या उर्जेचे रुपांतर केले जाते. यातून त्या रोपट्याची वाढ होऊन त्याचे वृक्षात रुपांतर होते. त्याला पुढे फुले आणि मग फळे लागतात. सूर्याची जशी उर्जा फळामध्ये रुपांतरीत होते. तशी सद्गुरुच्या मंत्रात उर्जा असते. सूर्यापासून जशी उर्जा पानाला मिळते तसे त्याचा विकास होतो. तसा सूर्यस्वरुप असणाऱ्या तेजस्वी सद्गुरुंकडून मंत्राच्या रुपातून उर्जा मिळते. त्या उर्जेतून शिष्याचा आध्यात्मिक विकास होतो. रोपटे रुपी शिष्याचा यातून विकास होऊ लागतो. मंत्राची उर्जा हळूहळू फुलते. शिष्याची साधना जशी फुलते तसा त्याचा विकास होऊ लागतो. या साधनेतूनच मग आत्मज्ञानाचे फळ लागते. सद्गुरुंना यासाठी साधनारूपी फुलाची अपेक्षा असते. तेच ते स्वीकारतात. शुद्ध मनाने, अंतःकरणाने केलेली साधना निश्चितच फलद्रुप होते. म्हणूनच पान, फुल, फळ मग ते कोणत्याही वृक्षाचे असे तेच सद्गुरु स्वीकारतात. सद्गुरु मंत्रांच्या उर्जेतून शिष्यातील पानांचा विकास होतो. साधना फुलते अन् त्या शिष्यरुपी वृक्षाला आत्मज्ञानरुपी फळे लागतात. मग ब्रह्मसंपन्न अशी ही साधना फळद्रुप होऊन त्या फळातील बिजातून पुन्हा नवी रोपे उदयाला येतात. ही आत्मज्ञान रुपी फळे परंपरा वाढवतात. 

 ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

राजेंद्र कृष्णराव घोरपडे लिखित अध्यात्मावरील पुस्तके
इये मराठीचिये नगरी  किंमत - 80 रुपये,
कृषि ज्ञानेश्वरी - 100 रुपये
अनुभव ज्ञानेश्वरी - 100 रुपये
या पुस्तकांसाठी करा संपर्क - मोबाईल - 8237857621

No comments:

Post a Comment